मिमोसा पुडीका…… हे बोट्यानिकल नाव. सहज सापडणारे, हाताचा स्पर्श पानांना झाला की, लगेच पाने मिटवून घेते. असे छोटेसे रोपटे म्हणजे ‘लाजाळूचे’ झाड. इंग्लिश मध्ये ह्याला “टच मी नॉट”, आणि हिंदी मध्ये “छुई मुई” म्हणतात.
शाळेत असताना कायम अभ्यासलेले. वाटेत दिसले की, हात लावण्यासाठी लहान, थोर आकर्षित होतात. ‘लाजाळूचे झाड’ हे विशेषण लाजाळू स्वभावाकरिता,विशेषतः मुलींकरिता पूर्वी तरी असे म्हणायचे. ‘लाजणे’ ह्या स्त्री सुलभ भावनेसाठी बऱ्याच वेळेला धीट स्वभाव नसलेल्या मुलांकरिता पण कुत्सित टोमण्या सारखे वापरले जात होते. कवींना सुद्धा ह्या स्वभावाची खूप भूल पडलेली दिसते. “लाजून हासणे अन …………मी ओळखून आहे, सारे तुझे बहाणे”. प्रेमाची उपमा पण ह्याच झाडाभोवती रुंजी घालताना सापडते.
जसे दारापुढे तुळशीचे रोपटे, तसे प्रत्येकाच्या मनात लाजाळूचे झाड असतेच. लहान मुलांच्या बाबतीत फार हळुवार पणे हे झाड जपावे लागते तर कधी बालकाचा सर्वांगीण विकास होण्यासाठी त्याला खास अशी देखभाल करावी लागते. हा स्वभाव मुलींकरता प्रामुख्याने असला तरी ह्या झाडाच्या अस्तित्वामुळे बऱ्याच प्रमाणात आपण ताण तणाव यांचे वाढणारे तण मर्यादित करू शकतो. हा माझा अनुभव आहे. मत मतांतरे असतील पण एखादी छान भावना टोमणे, कुत्सित पणे, किंवा चेष्टे करिता नाही ठेवली तर मनाला प्रसन्न नक्कीच करते.
मन प्रसन्न तर जग अधिकपणे सुंदर भावनेने पाहता येते. काही संभाव्य धोके मात्र ह्यात आहेत. कदाचित ही भावना अधिक पणे प्रकट केलीत तर ज्याला आपण इंग्लिश मध्ये मस्का पॉलीसी म्हणतो त्या वळणावर ही येवू शकते. किंवा ही हळुवार भावना व्यक्त करताना आपण अधिक जवळीक शब्दांद्वारे करण्याचा प्रयत्न केला तर, ‘काय गळ्यातच पडतात’, असे मत आपल्यासाठी होवू शकते.
एखादी व्यक्ती आपल्या मतांबाबत खूपच आग्रही असेल, तुम्हाला ती मते पटत नसतील तरीही त्या आग्रही मताचे स्वागत करा. लगेच विरोध व्यक्त करू नका. त्या व्यक्तीत असलेले लाजाळूचे झाड आपल्या शब्द स्पर्शाने सुखावू शकता. आपापसातल्या नात्यात कटुता येवू न देण्याची हुशारी आपण शिकायची असते. योग्य वेळ पाहून आपले स्वताचे मत सांगा.
विरोध जिथून निर्माण होतो त्याठिकाणीच स्वागत करून थांबवला तर समोरच्या व्यक्तीतले लाजाळूचे झाड नंतर तुमचे मत स्वीकारण्यास तयार होईल. कामाच्या ठिकाणी आपल्या बॉस चे आपले नाते असे दृढ करून कामाच्या ठिकाणी होणारा मनस्ताप निश्चित तुम्ही स्वत: करिता कमी करू शकाल. बॉस चा स्वभाव बदलणे, किंवा कोणाचाच जन्मतः असलेला स्वभाव पूर्णपणे बदलणे शक्य नाही. परंतु आपण आपल्या करिता सर्व सुखावह होण्यासाठी समोरच्या व्यक्तीत असलेल्या लाजाळूच्या झाडा मार्फत काही अंशी, काही काळापुरता आपल्याकरिता बदल करू शकतो.
घरात सुद्धा सहजच आपण ही भावना जपू शकतो. मन जसे एका घावात, एका शब्दात दुखवू शकतो, तसे ते एका शब्दात सुखावते सुद्धा. प्रेमी युगुल तर दोघे ही लाजेतच चूर असतात. आता च्या आय. टी. युगात कितपत आहे? ह्याचा अंदाज परदेशात बसून मला करता येत नाही. नजरेत घायाळ होणारे, लाजून हसल्याने माझ्या सख्यांनी अनेकांना धारातीर्थी केल्याचे मी साक्षीदार म्हणून ठामपणे सांगू शकते.
प्राजक्ताच्या फुलासारखी नजरेत अलगद वेचता येणारी, अबोली सारखी गालातच लाजणारी, लाजल्यावर मोगऱ्याच्या कळीसारखी टवटवीत होणारी, अशी स्त्री सुलभ भावना मुलांकरिता, ‘सुर्यफुल’ म्हणून संबोधणे कसे तरी वाटते. ह्याच करिता आख्खे लाजाळूचे झाड मनात शोधणे जास्त संयुक्तिक होईल.
चिडणे म्हणजे चेहरा रागीट होतो, रडणे, हसणे ह्या हावभावांचे वर्णन वाचून समजू शकतो. पण लाजल्यामुळे चेहरा गोरामोरा, म्हणजे नेमका कसा? ‘हे जावे, त्याच्या लाजेच्या गावा’ तेंव्हाच कळते. ही भावना छोट्या बाळांच्या चेहऱ्यावर, नवपरिणीत जोडपे, प्रेमी युगुल, इथे नेहमी पहावयास मिळते.
पण वडिलांनी आईला गजरा दिल्यावर तिच्या चेहऱ्यावर उमटणारे शांत ज्योती सारखे सलज्ज भाव हे घराचे सौंदर्य वाढवतात. टी. व्ही. वर येणाऱ्या कुटुंब नियोजनाच्या जाहिराती मुले किंवा मुली जेंव्हा घरातील जेष्ठ व्यक्ती समवेत पाहतात. तेंव्हा त्यांच्या मिशी फुटणाऱ्या मुलाच्या किंवा षोडश कन्येच्या चेहऱ्यावर लाज येताना पाहणे हे आईबाबांना एक सेकंद तरुण करून जाते पण दुसऱ्या सेकंदाला काळजी वाटावयास भाग पाडते.
अशी ही सुरेख भावना लाजाळूचे झाड शिकवून जाते. तरुण होणाऱ्या माझ्या मुलाच्या पिढीत एस. से. मेस. ते इमेल सगळीकडे ”हाय ड्यूड!” असे असते. ‘मिमोसा पुडीका’ पण ह्याच तरुण डोक्यातून आलेला शब्द आहे. शब्द बोट्यानिकल पिढीतला असो किंवा आपले लाजाळूचे झाड. भावना त्याच अजूनही उमटतात हे नसे थोडके. एकमेकांना निरोप देताना स्वभावाप्रमाणे ही पिढी शास्त्र पुस्तकातले चक्क फोर्म्युले नि संबोधतात. अभ्यास होतो पण ही काय पद्धत झाली असा माझा घोष सुरु असतो.
मला मात्र लाजून चूर होणारी जयश्री गडकर आवडते. ‘रेखा’ आहाहा!!! काय अदाकारी होती. अजूनही ‘सिलसिला’ वेड लावतो. तिच्या सारखे लाजणे शिकणे हा छंद मुलींमध्ये होता. आता करीना, क्याटरीना, आठव्याव्या लागतात कधी लाजल्या होत्या. लाज गुंडाळून त्या पैसे कमावतात आणि आपणच गोरेमोरे होवून सिनेमे पहायचे असतात.
‘कालाय तस्मे नमः’ असे म्हणण्या व्यतिरिक्त काय बोलणार? असे हे चटकन लाजणारे, सुखावणारे, आनंद पानात दडवून बंद करणारे आपल्या मनातील ‘लाजाळूचे झाड’ आपण जपले पाहिजे. तरच बाहेरील जगात आनंदी आनंद आपण शोधू शकू. कटुता, नात्यात येणारा दुरावा, अधिक नाते संबंध दृढ करण्यासाठी, ‘लाजाळूचे झाड’ समोरच्या व्यक्तीच्या मनात दडले आहे. ते पाहून हळुवार शब्द स्पर्शाची जाणीव करून, समोरून पण आपल्याकरिता आनंद निर्माण करता आला पाहिजे. ह्यालाच म्हणतात, जीव जोडायला शिकवणारे, ‘मिमोसा पुडीका’.
डिसेंबर 02, 2009 @ 23:10:27
मला लहानपणी लाजाळुच्या झाडाबद्दल खुप कुतुहल आणी आकर्षण वाटायच.आज नैसर्गीक लाजाळुपणाचा जो थोडा अंश आपल्यात असतो तो सोडून जो तो आपण बोल्ड असल्याच भासवायचा प्रयत्न करत असते.कारण आजच्या फ़ास्ट लाइफ़ मध्ये ्कोणालाही आपणही फ़ोरवर्ड आहोत अस दाखावायच असते.असो लेख छान झाला आहे.लाजाळुच्या फ़ुलाचा फ़ोटो सुदंर आहे.
डिसेंबर 03, 2009 @ 08:14:57
देवेंद्र,
खूप छान मुद्दा लिहिलाय. खरय सध्या बोल्ड होण्याच्या स्पर्धेत आपण सहजसुंदर भावना हरवून बसतो.लेख आवडला खूप बरे वाटले. मी खरतर
लिहून गोंधळले होते, विचारांच्या ओघात भराभर लिहित गेले पण नंतर दोन दोनदा वाचून काढला की काही सेनसेबल लिहिले का नुसता वैचारिक
गोंधळ लिहून ठेवला. आज प्रतिक्रिया पाहून जरा हुश्श झाले.
डिसेंबर 02, 2009 @ 23:34:24
मिमोसा पुडीका……. 🙂 सही आहे.
डिसेंबर 03, 2009 @ 08:01:36
पोस्ट आवडली, मस्त वाटल.
डिसेंबर 03, 2009 @ 06:57:06
Atishay uttam lekh …….. Lajalu che zad mala khup awaday che me lahan pani lawale hote amacha baget diwsatun ekda tari javun tyala hat lawane ha maza awadi ch udyog hota …….
डिसेंबर 03, 2009 @ 07:44:14
अश्विनी, अजूनही मस्तच वाटते हात लावयला. इथे पण मी आता शोधते नर्सरी मधून, जमल तर लावीन घरी. अस म्हणतेय.
डिसेंबर 06, 2009 @ 21:23:41
अखिल,
मनमोकळे करून अभिप्राय दिलास मनाला हळुवार स्पर्श देता झाला. ही एक छान संवेदना आहे. प्रत्येकात असतेच, जपली पाहिजे हे नक्कीच.