मातीचे गोकुळ…

मातीचे गोकुळ…

gokul1

“आज गोकुळात सखे खेळतो हरि….. प्रत्येक मराठी मनाच्या कोपऱ्यात हे गाणे असतेच. कुठे आहे हे गोकुळ, कसे आहे, असे अनेक प्रश्न मनात येत असताना, आज्जी म्हणते, बाळा तुला एक गमंत दाखवते. देवघरात नक्षीदार पटाच्या भोवती सुबक अशी महिरप काढलेली असते. पाटाच्या बाजूस एक तेलवात तेवत असते. आज्जी हाताला  धरून बसवते आणि म्हणते चल, आपण गोकुळ करूया. अनेक घरात स्मरत असलेली परंतु आता धुसर आठवणीत असणारी हि कोणे एके काळी अशी कथा झालीय.

काळ्याशार मऊसुत मातीचा मऊ गोळा. ज्वारीचे पुष्कळ दाणे, कापसाचे वस्त्र, हळद कुंकु आणि मंजिऱ्या असलेला तुळशीचा पानांचा झुबका आणि खूप सारी कृष्ण रंगांची गोकर्ण फुले. इथेच घराचे गोकुळ आज्जी च्या प्रेमळ आशीर्वादानी भरून जात असते.

उदबत्तीच्या सुवासात, वसुदेवं सुतं देवं कंस चाणूर मर्दनम ….एकेक शब्द मंत्रांचा उच्चारत, बाळ कृष्णाला आमंत्रण दिले जाते. घनगंभीर मंत्रोच्चारात खट्याळ कृष्णलीला साकारत असते. मातीचा छोटा गोळा हातावर घेऊन प्रथम तुळशी वृंदावन आकार घेते. त्यात प्रेमाने तुळशीचा गुच्छ ठेवला जातो. जेथे तुळशी तेथे पावित्र्य आणि तेथेच हरिचा निवास. मग साकारले जातात एकेक आकार, आख्खे गोकुळ गाव बनविले जाते. आपला लंगडा, दूडदुड धावणारा बाळ कृष्ण आणि बलराम सुद्धा बनवून बाजूला ताटलीत ठेवले जातात कारण संपुर्ण गोकुळ नगरी जेंव्हा तयार होऊन सजते तेंव्हा बाळ कृष्ण आणि बलराम ह्यांच्या स्वागतासाठी गोकुळ साजूक तुपाच्या शांत निरांजनात उजळून जाते.

गाय, गाढव, कावळा, उखळ, जातं, चूल गवळी गवळणी, असं गोकूळ मातीचं तयार करायचं. कृष्ण पाळणा बनवायचा.  पुतना, कंस ह्यांच्या संहाराच्या कथा चित्रे पण साकारायची. सगळे आकार मातीचे, सावळ्याची बासरी सुद्धा येथे काळीच असते. सर्व काही एकाच काळ्या रंगांचे कारण शामल सुंदर होऊनी कान्हा येतो, तेंव्हा साऱ्यांनाच आपल्या रंगांत मिसळून घेतो.

कान्हा, बलरामचे दागिने ज्वारीचे दाणे खोचुन घडवायचे आणि साऱ्यांचे डोळे सुद्धा ज्वारीच्या दाण्यांचेच बनवायचे. खूप काही मांडता येते. घरातील आज्जी यशोदा मैया च्या भूमिकेतुन तिच्या छोट्या कान्हाला तिच्या घराच्या गोकुळात येण्यासाठी मंत्रोचारांच्या सुरावटीत त्याचीच कथा कच्च्या मातीत बनवत असते.

कच्च्या मातीचा काळाशार मऊसुत गोळा अलवार भावनात, कोमलपणे, हळुवार असा प्रत्येक आकारात बनतो आणि बघता बघता पाटावर गोकुळ साकारते. मायमाऊली भूमातेची पूजा येथे कृष्ण रुपात केली जाते. आपल्याला सुजलाम सुफलाम बनवणारी हि काळी माती देवघरात पुजली जाते. ह्याच पावसाळी दिवसात हि माती भक्तीचे नवांकुर सृजनतेने उमलवत असते. कृष्ण कथेला मृत्तिका चित्र रुपात साजरे करण्याचा श्रावण असतो. स्त्री च्या कोमल भावना अशा रूपाने कौशल्य दाखविणाऱ्या असतात.

ज्वारीच्या दाण्यांनी काळ्या काळ्या गोकुळाचे राधेचा गौर रूपासारखे वृंदावन होते. जीवनाचे दोन्ही रंग सहज एकमेकात मिसळून गेले तर असे सुरेख गोकुळ जीवनाचे बनते. घरची मोठी स्त्री लहान लहान बाळांना एकत्र करून गोकुळ साकारून घेते. जात्यावरून हात कसा फिरवावा, धान्याचे उखळ गोलाकार बनविताना त्यात ज्वारीचे दोन दाणे नित्य असावे. मातीच्या चुलीची कशी रचना असावी ह्याचे जणु काही नकळतपणे संस्कार घडवत असते.

कंस आणि पुतना ह्यांना जीवनाच्या पाटावर कोपऱ्यात कसे मांडावे. अनेक गोष्टी प्रत्येक कथेत खूप काही शिकवणाऱ्या असतात. मंत्र म्हणताना, हात सुद्धा मातीत आकार घडवत असतात. एकाच वेळी अनेक कामे कशी करावी ह्याचा जणु परिपाठच होतो. मातीत खेळताना आनंद मिळतो तो शब्दात मांडणे शक्यच नाही.

मातीचे गोकुळ जेंव्हा जांभळ्या, निळ्या गोकर्ण फुलांनी सजते, पाटाच्या चारही कोपऱ्यात मातीच्या खळग्यात रान भाज्यांचे तुरे खोचले जातात आणि सभोवताली दुर्वा खोचल्या जातात तेंव्हा मनात गोकुळ कुठे आहे ह्या प्रश्नांचे उत्तर सुंदर होऊन सामोरी साकारते. बाळाच्या गालाच्या खळग्यात बाळकृष्ण खुदकन हसतो.

निरांजनाच्या ताम्हणाने गोकुळाचे औक्षण केले जाते. गोकुळाला हळदी कुंकवाचे बोट लावले जाते आणि समोरच्या वाटीत झाकून ठेवलेले पांढरे शुभ्र लोणी कान्हा करिता ठेवत, आज्जी आपल्या लाडूल्याला त्यातील लोणी बोटाने हळुच ओठावर टेकवते. आज्जीच्या कुशीत कृष्ण बलरामाची गोष्ट ऐकताना तिच्या बाळ कृष्णाला झोप लागते.

दुसऱ्या दिवशी हे गोकुळ झाडाच्या बुंध्यात समर्पित केले जाते. त्यातील ज्वारीच्या दाणे अंकुरित होऊन पुन्हा कणसे लागतात आणि त्यावरी चिऊताई येते आणि अंगणात आज्जीची गोष्ट पुन्हा सुरु होते. चातुर्मास असाच येतो, विठु माऊली च्या नाम गजरातून पुन्हा बाळ कृष्ण होऊन कान्हा येतच राहतो.

एक विसरत चाललेली आणि पुरातन अशी एक परंपरा आज फेसबुक वर माझ्या मित्र मंडळीनी त्यांच्या घरच्या मातीच्या गोकुळाच्या फोटोतून मनात पुन्हा उजळती झाली. आज्जी मातीत खेळते पाहून खुदकन हसणारी श्री अमित कुलकर्णी ह्यांची छोटीशी कन्या अजूनही मातीच्या गोकुळात रमते. आत्ताच्या पिढीला परंपरेचा वारसा समजावा आणि तो नित्य असावा म्हणून मैत्रीण सुरेखा कुलकर्णी आपली परंपरा अतिशय प्रेमाने साकारतात. ह्या दोघांचे सहकार्य आणि फोटोसाठी विशेष आभार.

लिखाण–अनुजा पडसलगीकर.

 

gokul 2