‘लॅण्ड क्रुझर प्राडो’ …….वाढदिवसाची भेट.

गाडीत घर घेऊन फिरतात. हे त्या गाडीत बसल्यावर लक्षात येते. मी ही ह्याच कुळातील आहे. गाडी म्हणजे चारचाकी होय. आमचा परिवार एकाच मुलाचा, टपरवेअर मध्ये घेतलेलं खाण, त्या खाण्याचे विविध डबे.. उदा. पोळी भाजीचा, हलकासा नाश्ता, बिस्कीट, गोळ्यांचा. असे. हे पण कमी काय म्हणून बाळ, मुंबई-पुण्या पर्यंतच्या प्रवासात झोपायचे म्हणून मागच्या सीट वर त्याची छोटी उशी, चादर. वाटेत गाडी अडकली तर…..तेंव्हा जलद गती मार्ग नव्हता. जुन्या घाटात हमखास वाहन कोंडी अनेक तासांची पण होत असे. नंतर जेंव्हा द्रुतगती मार्ग तयार झाला तरी पण अकारण गाडी भरण्याची माझी जुनी सवय काही गेली नाही.

प्रवास अनेक तासांचा झाला तर काय त्रास होऊ शकतो म्हणून अनेक कोरडे खाण्याचे प्रकार, औषध पेटी, माझी गाडी चार दिवस जरी अडकून पडली तरी काहीही अडणार नाही इतकी जय्यत तयारी करण्याची माझी खोड आहे. हि झाली गाडीच्या आतील तयारी, पुण्याहून किंवा कुठून हि परत येताना तेथील काही रोपटी, आकर्षक वस्तू ह्यांनी गाडी खचाकच भरत असे. माझा सहनशील नवरा संसारात पडल्याने हतबल होऊन जायचा. माझे आपले एकच म्हणणे असायचे हातात थोडीच घ्यायचे आहे, डिकीत ठेवायचे. जर काही इमर्जन्सी झाली तर मुल लहान आहे.

भारतात माझ्याकडे तेंव्हा ‘पोमेरीअन’ होता. ‘पोमेरीअन’ चे सर्व सामान खाण्याचे, पाण्याचे भांडे, पट्टा, त्याची खेळणी, कुत्र्याची पण औषधे, ते घरतील लहान मुलच होते.. कुत्र्याला ठेवण्याची सोय नव्हती असे नव्हते तर मला त्याच्या शिवाय चैन पडायचे नाही, म्हणून त्याच्या सकट जमेल तसा प्रवास. कोणाचे कशापासून अडू नये. चारही दिवस प्रवासाचे मजेत असावेत म्हणून माझा कोण आटापिटा असायचा. ह्यांना असला फाफट पसारा करून प्रवासाची आवड नाही.

‘मारुती ८००’ आणि ‘अल्टो’ ह्या आमच्या गाड्या घर च होत्या. गाडीत एव्हढे सामान असणे म्हणजे काही सुटसुटीत प्रवास नाही. गाडीची शान राखा. लहान मुला बरोबर प्रवास कोणी करत नाही का? ते कसे इतके सुटसुटीत प्रवास करतात. इतके जपलेस तर अजिंक्य बाहेर कसे शिकणार? इतकी बोलणी बसायची, पण प्रवासात आईकडे खाण्यासाठी काहीच नसल्याने हतबल झालेली बाळे मी पहिली आहेत. मुल लहान असेल तर बरोबर एखादा बिस्कीट चा पुडा आणि पाणी तरी निदान बरोबर असावे ह्या ठाम मताची मी आहे. मग प्रवास दहा मिनिटाचा असला तरी, तो कधीही जास्त होऊ शकतो हि शक्यता आईने नेहमीच लक्षात घ्यावी. माझा प्रवास चार दिवसाचा असला तर, सगळीकडे घर करून टाकले आहे असे म्हणत, ‘हे’ सर्व सामान घेत. अजिंक्य कधी एकदा माझ्या दृष्टीने मोठा होतो असे ह्यांना झाले होते.

लांबचा प्रवास असेल तर परतीच्या प्रवासात छोट्यांचे कपडे सीट च्या चहुबाजूनी वाळत घातलेल्या गाड्या पहिल्या कि, हे तर माझ्या पठडीतले आहेत. असे माझे मन भरून येते. घर आणि गाडी असा भेदभाव न करता मजल दर मजल प्रवास करत माझे बाळ मोठे झाले. आता सुद्धा मस्कत वरून येता, जाता, मी किती नको ते सामान घेऊन प्रवास करते हि, चिडचिड ह्यांची सुरु असते मस्कत मध्ये आलो तेंव्हा आमच्या प्रवासाचा पूर्व अनुभव असल्याने, मला आणि अजिंक्यला ‘ह्यांनी’ बऱ्याच गोष्टी गाडी करता समजावून सांगितल्या.

‘लॅण्ड क्रुझर प्राडो’ म्हणजे ह्यांचे खूप काळापासून जपलेले स्वप्न होते. आम्ही अनेक गाड्यांच्या शोरूम मध्ये जाऊन आलो. पण ह्यांचे प्रेम ह्या गाडीवर इतके आहे कि, ह्या गाडीला जपणे म्हणजे ह्यांना अजून एक बाळ झाले अशीच भावना माझी व अजिंक्यची आहे. वर्षानुवर्षे जपलेले ‘ लॅण्ड क्रुझर प्राडो’ चे स्वप्न प्रत्यक्षात अवतरले. सध्या असलेली आता असलेली ‘निसान सनी’ हि गाडी पण आम्ही बरीच वापरली आहे म्हणून गाडी बदलून ह्यांनी त्यांची ‘ लॅण्ड क्रुझर प्राडो’ घेण्याची इच्छा पूर्ण केली.

माझ्या वाढदिवसाच्या निमित्ताने मला २०१० ची ‘लॅण्ड क्रुझर प्राडो’ हि गाडी ह्यांच्या कडून भेट देण्यात आली. आम्ही दोघांनी गाडीत कसे बसावे ह्या करता ‘ह्यांनी’ शिकवणी घेतली….. नियमावली अशी आहे……..

१) दरवाजा हळू लावायचा.
२) गाडीत खाणे बंद.
३) पाय वर करून मांडी घालून बसायचे नाही.
४) अकारण बोलणे बंद.
५) पेपर चा कचरा करायचा नाही.
६) डिकी मोठी आहे म्हणून उगाचच सामान भरायचे नाही.
७) गाडी पूर्णपणे स्वयंचलित असल्याने, हे काय, ते काय, असे मध्ये मध्ये विचारायचे नाही.
८) गाडीत सीट मोठी आहे म्हणून लोळायचे नाही.
९) पाणी पिताना सांडायचे नाही.
१०) डोक्याला जास्त तेल लावुन गाडीत बसायचे नाही.
११) लांबच्या प्रवासाल गेलो तरी उशी, चादर घेऊन पसरायचे नाही.
१२) वाटेत मिळेल ते खाणे करायचे. खाण्याचा डबा बरोबर घेतला असेल तर शिस्तीत वाटेत थांबून खाऊन मग गाडीत बसायचे.
१३) गाडी मोठी असल्याने कुठे हि पटकन थांबा असे म्हणायचे नाही
१४) वेफर्स चे पुडे कारण नसताना गाडीत फोडून सांडासांड करायची नाही.
१५) सामान गरजेचे घेणे झाल्यास व्यवस्थित डिकीत ठेवणे.

अशा अनेक नियमांची पारायणे आमची होत आहेत. खूप जपलेले स्वप्न ‘धनंजय’ यांना मळके करायचे नाही, आपल्या स्वप्नाच्या पूर्ततेचा सन्मान आपणच ठेवायचा असतो. अजिंक्य पण मोठा झाला आहे. आता प्रवासात मला काहीच काळजी करावी लागत नाही. हीच योग्य वेळ आहे अशी मोठी गाडी घेण्याची असे मलाही पटले.

अजिंक्य ला ‘ह्यांनी’ वेगवेगळ्या गाड्याच्या शोरूम मध्ये नेऊन आपल्या बजेट मध्ये हि गाडी कशी बसते, आणि आपली गरज कशी पूर्ण होते . हि बाब पूर्णपणे समजावून सांगितली. मोठ्या होणाऱ्या मुलाकरता योग्य वेळी काही गोष्टी समजावून सांगणे म्हणजे आपल्याच स्वप्नाचा आनंद मिळतो. गाडीत अनेक सोई सुविधा आहेत. गाडी सांभाळून कशी ठेवायची हे पित्याचे कर्तव्य आजच्या ह्या फास्ट पिढी करता सांगणे खूप गरजेचे आहे. ह्या पिढीला अनेक गोष्टी सहज मिळतात पण आई- वडिलांनी त्या केंव्हा, कशा आणि कोणत्या वेळी सांगणे म्हणजेच सुरक्षित जीवन आणि आई वडिलांचे वर्तन सन्माननीय आदर्श ठरते.


माझा वाढदिवस म्हणून ह्यांनी ‘२०१० ची ‘लॅण्ड क्रुझर प्राडो’ घेण्याचे स्वप्न प्रत्यक्षात आणून मला बहाल केले. खरच!! ह्यांच्या ‘ह्या’ नवीन बाळाचा लळा आंम्हाला पण लागला आहे. आम्ही ‘ह्यांचे’ स्वप्न नीटपणे जपून खूप वर्ष पुन्हा नवीनच आहे असा अनुभव घेऊ.

गाडीतले घर किंवा घरा एव्हढी गाडी असली तरी ध्येयाने पाहिलेल्या स्वप्नाची पूर्तता होणे आणि त्यांचा आदर करणे हेच खरे घरपण आहे.

मला वाढदिवसाची ‘२०१० ची ‘लॅण्ड क्रुझर प्राडो’ हि अनोखी भेट खूप आवडली आहे.

कातरवेळ, काहूर आणि सांजवात

हल्ली बऱ्याच वेळेला घडते. संगणकावर काम करत राहिले कि वेळेचे बंधन राहत नाही. अचानक लक्षात येते, घरात चारी बाजूनी अंधार आला आहे. विचारांचे काहूर काही संपत नाही. संध्याकाळ ची कातरवेळ मला खूप अपराधी बनवते. हुरहूर अधिक जाणवते. खिडकीतून आधार देणारी झाडे नकोशी वाटतात. खिडकीतून झाडां ऐवजी, माणसांचा आधार बरा वाटतो. थंड हवेच्या ठिकाणी, गर्द झाडातून मला मुंबईची आठवण खूप येते. घरात सुद्धा मनात कोंडलेले विचार आठवतात. घरी एकटे असले तर हे बरेच जाणवते. भित्रे मन नसून हि संवेदनाक्षम मनाची खुण आहे, ह्या खुणा मी खूप जपते. त्यातूनच मी मला पाहते. दूर गेलेली आपली माणसे घरी असावी असे जाणवते. त्यातूनच ” या चिमण्यानो परत फिरा रे, घराकडे अपुल्या, जाहल्या तिन्हीसांजा” हे गाणे हमखास आठवते.

काम संपून मी मी टीव्ही पाहावा म्हणून बाहेर येऊन बसले, घर चौथ्या मजल्यावर. बाहेर गुलमोहराचे झाड, त्याचा फांद्या न्याहाळत दुपारी चहा घ्यावा. हा क्रम नित्याचा, फांद्यांचे आणि माझे नाते जुळले होते. नवीन आलेला अंकुर पण मला ते आवडीने दाखवायचे. संध्याकाळ मात्र हे नाते गडद व्हायचे. डास येऊ नये म्हणून मी मला कोंडून बसायचे. असंख्य चिमण्या परत यायच्या. अशीच वेळ अचानक चिमण्यांचा फडफडाट व गलका ऐकू आला . मनात शंका आलीच की, काही तरी विपरीत होत असणार. खिडकी उघडली तोच अंधार दाटून आला. मी टोर्च आणली व फांद्यान मधून फिरवत राहिले. दोन दाहक डोळे, व सरपटणारे अंग दिसले. काय करू मी, हैराण झाले. तो जहरी पुढे पुढे सरकत होता. मी जोरात हुशः हुशः आवाज काढत ओरडत होते. मागची बाजू कोण असणार? साप, साप ओरडावे तर ऐकून काय होणार. अपराधी वाटत होते. सापाची अन्ना करता धडपड, चिमण्यांची पिल्लं करिता फडफड व खिडकीत मी, देवा वाचव यांना, म्हणून टाहो फोडत होते. त्याने गिळले काही तरी, कारण शांतता झाली. मी पाहीले तो, उतरत होता. काळाने घास घेतला

सकाळी पुन्हा चिवचिवाट ऐकू आला. जीवन सुरु झाले. मी रात्री जेवू शकले नाही. मुलाला घट्ट मिठीत घेऊन झोपले. तो ही गोंधळला होता. एकटा झोप म्हणणारी, आई एकदम बदलली कशी. मी मात्र काही करू न शकल्यामुळे चिमण्यांची अपराधी झाले. ह्या छोटाश्या चिमण्या मला अंधार कसा स्वीकारायचा, प्रकाश कसा बघायचा शिकवून गेल्या. देश सोडला इथे चिमण्या पुन्हा मिळाल्या. खिडकीतून पुन्हा झाड डोकावते आहे. चिमण्या करता मी पुन्हा खिडकीतून जीवन बघत आहे.

काहूर दाटले गुलमोहरी छटांचे, रंग सोनेरी सांज वेळेचे, अजूनही मी ह्या वेळी घरी, माझ्या भारतात परतते. कवी बी. रघुनाथ ह्यांच्या सांज ह्या कविता संग्रहा ची आठवण झाली. माझ्या मातीच्या मायेसाठी प्रत्येक सांज मी चंद्र केली. घरी परतणारी गुरे त्यांच्या खुरांनी उडलेली धूळ, सांजेलाही उदी रंग मिळाला, एक शाश्वत गहिरा रंग.

अशा कातर वेळी सुखी मन पण तरल होते. मन भटके होते. मनाच्या स्थिरते करिता मी सांजवात लावते. छोटासा पण प्रकाश मला मनाने काय घेतले, ते मलाच परत करण्यासाठी शुभंकरोती म्हणून समर्पित करण्याचे शिकवून जातो. पुन्हा मी घरात रमू लागते, दूर असलेल्या भावनांना घरचा मार्ग स्पष्ट दिसावा म्हणून प्रकाश पणती दारात लावते. तन- मना च्या जोडीची ही सांजवात, तिळा सारख्या उबदार भावनेत रात्रभर तेवती राहू दे.

आई, गृहिणी म्हणून घरासाठी,तुळशीपाशी विश्वासाठी प्रार्थना ची परंपरा अजूनही चालू आहे. प्रत्येकाच्या मनाला अशी सांज आठवण ठेवून गेलेली असते. लेखन, कविता, ह्यासाठी तर ही खूप आवडती आहे. जे अनुभवू पाहतात त्यासाठी सांज अनुभूती देते.

चंद्राचा शांत, शीतल प्रकाश सांजेलाही उजळ करून गेला म्हणून माझी सांज मी चंद्र केली. अशा कातरवेळी प्रकाश निसटू पाहतो, अंधार अंगावर येऊ लागतो ह्या सीमा रेषेवर, मी सांजवातीचा आधार शोधते. ह्या काजोल वेळी उद्याचा येणारा पितांबरी रंगाचा प्रकाश मनाला नकळत पणे उदी रंग लेऊन जातो. पितांबरी सोनसळी रंगाने मी पुन्हा भरून जाण्याकरता सांज मी स्वीकारते. चिमणीरुपी दूर गेलेल्या मनाची आवर्तने रोखण्यासाठी पुनश्च एकदा सांज प्रकाश भरून मनात व्यापून राहिली.

कुठल्याही उत्सवात संध्याकाळी मन कसे तृप्त असते. गणपती बाप्पाच्या विसर्जन नंतर हि संध्याकाळ अशीच एकटी वाटते. बाप्पाच्या सहवासाने घर कसे भरून पावते तीच पोकळी कातर वेळ म्हणून जाणवायला लागते. माझ्या मनाला तरी असा आधार लागतो. मग दुसऱ्या दिवशी संध्याकाळी लावलेली तीच सांजवात बाप्पा असताना उत्साहाची वाटत होती, आता मात्र शांत निरामय अशी होते. शुभंकरोती चे आपलेच स्वर , बाहेर मस्जिद मधून कानावर पडणारी अल्लाची पुकार ह्यांचा एकत्रित नाद घरात गुंजन करू लागतो. भारताच्या बाहेर पडल्यावर हि वेळ फार जाणवायला लागली. बाप्पा नंतर येणारी नवरात्र पुन्हा एकदा संध्याकाळ उजळून टाकेल आणि नंतर येणारी दीपावली हि तर दिव्याची सम्राज्ञी… एकेक सणांनी पाठोपाठ सांज सजवली आहे.

संध्याकाळची अशी आवर्तने मनास पुन्हा पुन्हा मायदेशी….. आईच्या घरच्या उंबरठ्यावर अलगद नेतात. सांजेच्या ह्या दोलायमान विचारास एक दिशा नाही, एक विचार नाही कारण काहूर साठवून आले ते आजच्या दिवशी, मी आईकरता अजूनही लहानच असते, आज संध्याकाळी तिने मज साठी केलेले सांज औक्षण माझे वय लहानच ठेवते. आकाशात पसरणाऱ्या सांजेत चंद्र डोकावत असताना लेकीचे कौतुक चंद्रात सामावून जाते. प्रत्येक सांज अशी वेगवेगळ्या विचारांनी प्रकट होत असते.

विचारांची आवर्तने आणि सांज वेळ याची भूल मला हि पडली आणि जाणवली काहूर… कातरवेळ आणि सांजवात मनातली…..

हुक्का….शिशा…..आरोग्यास घातक.

नवाबी चित्रपटात, मुघल गोष्टीत नेहमी हुक्का किंवा शिशा डोकावायचा. तंबाखू च्या व्यसनाचा हा पण एक घातक प्रकार आहे. मस्कत मध्ये आल्यावर शिशा दिसू लागला. जगात सिगारेट सगळीकडे मुबलक आहे. इथे सिगारेट चे प्रमाण भर रस्त्यावर त्या प्रमाणात कमी आहे. कदाचित काही नियम असतील बहुतेक… किंवा मॉल मध्ये तर जाहीर धुम्रपान करण्याची सवय मी पहिली नाही. नक्कीच कायदा असणार.

ओमान मध्ये किंवा हल्ली बऱ्याच आखाती देशात सरकारने हुक्का संदर्भात कायदे केले आहेत. लोकांमध्ये व्यसनाची भयानकता जाणवून देण्याचे काम सरकार आणि अनेक अन्जिओ संस्था करत आहेत. ह्या घातक हुक्का किंवा शिशा ओढण्याकडे बंधने घातली जात आहेत.

वाळवंटातील रात्र अनुभवणे हि इथली परंपरा आहे. तंबू, बार्बेक्यू , कॉफी, नृत्य, संगीत अशा वातावरणात इथल्या सुट्टीच्या रात्री चा आनंद त्यात असणारा हा शिशा…. साध्या हॉटेल पासून ते पंचतारंकित पर्यंत, वाळवंटापासून ते समुद्र किनाऱ्यावर कुठेही विशेषतः रात्री हा शिशा घेऊन बसलेले काही ओमानी, लेबनीज , इस्रायली , युरोपिअन अशी लोक प्रामुख्याने दिसतात. ओमान मध्ये ओमानी स्त्रिया धुम्रपान किंवा शिशा ओढताना बाहेर दिसत नाहीत. इतर देशीय स्त्रिया दिसून येतात.

शिशा ओढणे हि परंपरा पूर्ण बंद करणे शक्य नाही परंतु जागरूकता आणण्याचे काम सरकार करत असते. शिशा च्या तळातील भागात पाणी घातले जाते, त्यावर भांडे ठेवून त्यात तंबाखू ठेवला जातो आणि वरती जळणारा कोळसा असतो. तंबाखू एकदम जळून खाक न होता धुराच्या रुपात नळीतून ओढला जातो. हा धूर सुद्धा आरोग्य नष्ट करतो.

भारतात पण जिथे मुघल जीवन शैलीचा अंमल अजूनही आहे त्या ठिकाणी कदाचित असेलही पण माझा अशा राज्यांशी फारसा संबंध आलेला नाही. चित्रपटात पाहिलेला, गोष्टीत वाचलेला हा शिशा नजरेस पडला. एक घातक पण फार पूर्वीची परंपरा म्हणून लिहिले.

जरूर लक्षात ठेवा——- तंबाखू हा आरोग्यास घातक आहे.

विमानातून दिसलेली मुंबई………

एरिअल फोटोग्राफी हि संकल्पना नवीन नाही. प्रत्येक वर्षी जून महिन्याच्या सुट्टी ची आवर्जून वाट पाहत असतो कारण भारतात यायचे असते. विमानाची खिडकी मागणे हे तर माझ्या मुलाचेच म्हणणे नसते तर मला हि खिडकी ची जागा हवी असते. खर तर तीन सीट ची रचना विमानात असते. तरी पण खिडकीजवळच्या दोन जागा मागून घेतो. काही वेळानंतर अस्पष्ट दृश होते , नंतर ढगातून विमान वर वर उंची गाठू लागते आणि अवकाशात तरंगू लागतो. असे असताना खिडकीचा आग्रह कशाला? तीच तर ओढ आहे…..

मुंबई जशी जशी जवळ येऊ लागते तस तशी नजर जमिनीचा खिडकीतून वेध घेऊ लागते. एव्हढासा जमिनीचा तुकडा दिसला तरी नजर आणि मन भरून येते. आतापर्यंत कधी फोटो काढले नव्हते, हे हि फोटो मोबाईल वरून काही सेकंदात काढले आहेत.

मुंबईचा हा भाग कुठला आहे हे समजले नाही परंतु हीच माझी मुंबई……. अजिंक्य ने मोबाईल वरून टिपून घेतली…..

हात जोडून मातृभूमी ला वंदन करतो आणि सुजलाम सुफलाम……. आठवून डोळे भरून येतात.

पुन्हा पुढच्या सुट्टीची वाट पाहतो………

गणपती बाप्पा मोरया…..

गणपती बाप्पा मोरया …..गणेश उत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा…
या वर्षी चे गौरी गणपतीचे फोटो….
दर्शनाला नक्की या….

भेसळ……..

सध्या टीव्ही वर बातम्या पहिल्या कि भेसळीची बातमी हटकून असतेच. प्रत्येक पदार्थात भेसळ करण्याचे प्रमाण वाढतच चालले आहे. दिवस सुरु होतो तोच भेसळीच्या चहाने, दुधाने… नायाहारीला सांजा, उपमा करण्याचे ठरवले तर रव्याच्या शुद्धतेची खात्री नाही. जेवणास भाजी हा तर अपरिहार्य घटक आहे. हीच भाजी रंगाच्या इंजेक्शन ने छान टवटवीत केलेली आहे का?? हाच संशय मनात येत राहतो. फळांची वाढ, त्यांचे पिकवणे हे रसायनाच्या मदतीने तर झाले नसेल न? किती किती म्हणून अस्वथता झेलायची? कुटुंबाचे, आपले स्वतःचे आरोग्य असेच उधळून टाकायचे? अनेक प्रश्नांनी मनात काहूर माजवले. स्वयंपाक घरात जाण्याचे मनच होईना.

प्रत्येक वेळी भेसळ पकडली जाते. गुनेह्गाराना अटक होते. आपण हळहळत बसतो कि कशातच आता शुद्धता राहिली नाही. असेच फक्त विचार करतो, ह्यावर चर्चा होते, परिसंवाद होतात. पुन्हा पहिले पाढे पन्नास ह्या उक्ती प्रमाणे पुन्हा भेसळीची बातमी येत राहते. ज्या गोष्टी आहार म्हणून घेतो त्यात अशी भेसळ म्हणजे आयुष्य कमी करून घेणे होय. ज्या गोष्टी आपल्या कडून हाताळल्या जातात त्यात पण भेसळ असली तर स्पर्शाने पण आपल्याला कातडीचे आजार उद्भवतात. दिवाळीचे रंग. होळीचे रंग. कुंकू, बुक्का इत्यादी घटक आपल्या सणाचे व संस्कृतीत असतातच. ह्या सर्व गोष्टी तर हानिकारक ठरतातच.

आपण काही करू शकत नाही का? हा अत्यंत प्रारंभीचा विचार आला. आपले स्वतःचे ह्या मध्ये काही योगदान होऊ शकत नाही का? नुसती चर्चा करून उपयोगाचे नाही. प्रत्येक गोष्टीची भेसळ आपण नाही थांबवू शकत. भेसळीला अटकाव करणे हे तर पोलिसांचे काम आहे. मी घरातून काय म्हणून यात सहभाग घेऊ शकेन. ह्या प्राथमिक विचारांनी हैराण झाले. माझी, माझ्या कुटुंबाची. समाजाची आरोग्य व आहार सुरक्षा अशी वेशीवर टांगलेली सहन करण्या पेक्षा काही विचार मला सुचले. इथे हि मस्कत मध्ये मॉल मधून हायब्रीड असलेल्या भाज्या मिळतात. त्यांना विशेष अशी रुची म्हणजे चव नसते. चकचकित भाज्या, फळे अत्यंत आकर्षक पद्धतीने ठेवलेल्या असतात. ह्या फळ भाज्यांची शुद्धता म्हणजे त्यांची वाढ हि रसायनाच्या मदतीशिवाय झाली आहे हे ओळखण्याचे मापदंड कोणते आहेत?

नेट वर शोधाशोध केली, काही जणाकडे चौकशी केली तर घरच्या घरी पण आपण भेसळ शोधू शकतो. हे उपाय आहेत तरी मुळ प्रश्न कायम राहिला कि शोध घेण्याची रसायने सहज उपलब्ध आहेत का? ह्या उपायाच्या मदतीने भेसळ ओळखणे प्रत्येक वेळी लक्षात राहिल का? माझ्या घरच्या वयस्कर मंडळीना हे जमेल का? असे अनेक उप प्रश्न पण निर्माण झाले. कठीणच वाटले. ह्या चा स्वंतंत्र अभ्यास करावा लागेल का? आधीच रोज काय नाविन्य पूर्ण बनवायचे हा महिला वर्गाचा अत्यंत जिव्हाळ्याचा प्रश्न आहेच, त्यात आत्ता भर पडली भेसळीची परीक्षा करत स्वयंपाक बनवायचा.

जाऊ दे काय होईल ते होईल, कशाला डोक्याला ताप करून घ्या. चांगल्या कंपनीचे उत्पादन घेऊया आणि मनस्ताप कमी करूया. सध्याच्या काळात आयुष्याची काय भ्रांत आज आहोत तर पुढच्या क्षणाला नसू. इथ पर्यंत विचाराची मजल जाऊ लागली. शेती उत्पादना करता मोजमापे, कायदे आहेत का? शेती अधिकाऱ्यांकडून तपासून पहिली जाते का? ह्या बाबत घरात बसून शोध घेणे अवघड आहे. शेती खात्यात पण भ्रष्टाचार बोकाळला असेलच. शेतीत आपल्या उत्पादनाकरता रासायनिक खतांचा वापर केला जातोच पण फळांवर, भाज्यावर इंजेक्शने दिली जात आहेत का ह्याचा पाठपुरावा करणे म्हणजे समुद्रातून सुईचा शोध घेण्यासारखे होईल.

भेसळ हि शेतातून आणि विक्रीच्या माध्यमाद्वारे होत असते. आयुर्वेदिक औषधे पण ह्या भेसळीच्या तडाख्यात सापडली आहेत. बाहेरचे शत्रू बरे पण हे भेसळ करणारे अस्तनीतले निखारे रोजच्या जीवनात पण मृत्यू सापळ्यात प्रत्येकाला नेत आहेत. कुठून आणि कसा बंदोबस्त ह्या भेसळीच्या किडीचा करायचा हा पुरून उरणारा गहन प्रश्न बनला आहे. प्रत्येक बाबत जागरूक राहणे हे धकाधकीच्या जीवनात सहज सोप्पे नाही. जागरूक राहून व्यवहार जरी केला तरी पोटाकरता निवांत खाणे हे हि महत्वाचे आहे. इथेही भेसळ आहेच मग अस्वस्थता आलीच.

१) शाळेत भेसळ ओळखण्याचा तास ठेवला तर?

२) ज्या प्रमाणे गलोगल्ली वैद्यकीय तपासण्या करणाऱ्या प्रयोगशाळा आहेत त्याच प्रमाणे भेसळीच्या पण प्रयोगशाळा असाव्यात. आपल्याला जर शंका आली तर त्वरित तो पदार्थ तपासणी साठी नेता आला पाहिजे.

३) दुकानदार करता कडक कायदे केले पाहिजेत. काही काळा करता त्यांचा विक्री परवाना रद्द केला पाहिजे. दुकानाला इथे भेसळ सापडली आहे असे सील लावले गेले पाहिजे.

४) घरगुती स्वरुपात जर पदार्थाच्या तपासण्या करता येत असल्या तर त्याला लागणारी रसायने जवळच्या औषधाच्या दुकानात उपलब्ध असली पाहिजेत.

५) जनजागृती करावयास हवी.

६) स्थानिक पक्षाकडून नागरिकांसाठी अशी केंद्रे उघडली पाहिजेत.

७) भेसळ ओळखण्याची व्यवसायभिमुख प्रशिक्षण केंद्रे सरकार कडून सुरु व्हावीत.

८) भेसळीच्या तक्रारीसाठी ग्राहक निवारण मंच ची विशेष त्वरित न्याय प्रणाली असावी.

९) भेसळी मुळे नुकसान झाले तर त्याची जलद भरपाई मिळावी.

१०) धाडी मोहिमा करून, प्रत्येक वेळी तक्रार असली तरच कारवाई होईल इथपर्यंत प्रकरणे विलंबित ठेवू नयेत.

असे अनेक पर्याय आहेत पण सुरवात कोण करणार?’ शिवाजी जन्माला यावा पण शेजारच्या घरात’, हि वृतीच फक्त वैचारिक खल, निष्कर्ष पर्यंतच मजल करते. पण आशावाद अजूनही संपला नाही मी माझ्या कडून छोटीशी सुरवात केली आहे. इथल्या शेती चे भारतीय मान्यवर अधिकारी ह्यांच्याशी विचारविनिमय सुरु केला आहे. ह्या बद्धल जनजागृती आणि माहितीच्या अधिकार करता लवकरच सर्वांशी भेट घडवून आणण्याचे प्रयत्न सुरु केले आहेत. इथे पण खूप शेती आहे त्याबद्धल पण माहिती मिळवता येईल. सेंद्रिय शेती हा एक पर्याय आहे पण त्याची उत्पादने इतर उत्पादनाच्या तुलनेत महाग मिळतात.

इथले एकच उदाहरण देते कि, जे मी नेहमी पाहते मग घेते. रोज लागणारी अंडी. आपण दुकानात जातो आणि घेतो. इथे मिळणाऱ्या प्रत्येक अंड्यावर उत्पादन कधी घेतले आहे त्याची तारीख आणि कुठल्या तारखेपर्यंत ते वापरावे ह्याचा छाप असतो. तसेच क्रेट मधल्या अंड्यांचा जन्म म्हणजे कोंबडीचे खाणे सेंद्रिय आहे का ह्याचा उल्लेख सरकारी नोंदिनिशी प्रत्येक क्रेट वर असतो. काही वेळेला कोंबडीला काही औषधे दिले जातात त्याचा उल्लेख पण इथे बंधनकारक आहे. प्रत्येक उत्पादनासाठी सरकारकडून नियंत्रक असतो आणि आंतरराष्ट्रीय परिमाणे काटेकोर पणे अमलात आणली जातात.

सेंद्रिय उत्पादने घरच्या घरी घेऊ शकता. अनेक विद्यापीठांनी किवा खाजगी संस्थांनी उद्यान कला, बागकाम असे प्रशिक्षण वर्ग सुरु केले आहेत. आम्हाला गच्ची नाही. असली तर ती सगळ्यांची आहे. तिथे परसबाग केली तर नियंत्रण कोण ठेवणार? घरी ग्यालरीत लावली तर उपद्व्याप कोण वाढवणार? रोजचे काम करायला वेळ मिळत नाही. अशी अनेक कारणे समोर येतात. हि कारणे पण वस्तुस्थिती दर्शवणारी आहेत. जेष्ठ नागरिकांनी जर अशा बागांचे व्यवस्थापन पहिले तर…… सोसायटीची गच्चीची चावी त्यांच्या कडे ठेवू. काही सभासदांच्या मदतीने गच्चीत घेतलेले उत्पादन घरोघरी वाटप केले जाईल. निदान काही अंशी तरी भेसळीच्या भाज्या खाण्याचे टाळता येईल. असे अनेक पर्याय आहेत……

सुरवात तर करायला हवी. कोणाची कशाला वाट पहायची?? शिवाजीचा जन्म शेजारच्या घरी झाला तरी निदान एक मावळा तरी आपल्या घरचा असेल हा दृष्टीकोन ठेवला तर भेसळीची सरमिसळ कमी कमी होत त्याला कायमचा आळा घालता येईल.