पपेट्स…..

पपेट्स…..सेकंड करिअर. एक Turning point.

मुन्नी बदनाम हुई…..गाण्यावर वाढदिवस साजरा केला जातो…मोठ्यांनी हेच गाणे लावले तर छोटे पण हरवलेच….माझ्या शेजारची डॉ. जावडेकर खूप वैतागून म्हणत होती. त्यांच्या लेकीच्या शाळेला सुट्टी सुरु होणार होती. त्या निमित्ताने तीच्या सर्व मैत्रिणींना एकत्र आणून संध्याकाळ फक्त छोट्यांची साजरी करण्याचे निमित्त होते. पपेट्स… हा एक कार्यक्रम छोट्यांची संध्याकाळ आनंदात साजरी होण्याकरता आयोजिला होता. पपेट्स मध्ये पण बऱ्याच ठिकाणी ही मुन्नी त्यांनी पहिली होती पपेट्स म्हणजे निखलस आनंद देणारा एक निरागस रूपाचा खेळ रूपी अविष्कार असतो. अशा ह्या पपेट्स मध्ये पण मोठ्यांनी छोट्यांना अर्थहीन बनवले. पण ह्या परिस्थितीत पण अपवाद शोधणारे असे माझे शेजारी आहेत. डॉक्टरांनी एक अतिशय सुंदर पारंपारिक गोष्टी सांगणारी ,कथेत मुलांना रमवून ठेवणारी, छोट्यांच्या गाण्यात मोठ्यांना पण ताल धरायला लावणारी, पपेट्स कार्यक्रम करणारी गृहिणी शोधली. पपेट्स चे उत्पन्न किती मिळते हा आर्थिक वेध घेणारी ही गृहिणी नव्हती तर मुलांच्या करता संस्कार करणारी ती एक आई होती. स्वतःची आवड ही विकसित करून पपेट्स घेऊन त्या मुलांकरता ठिकठिकाणी जातात. संध्याकाळ अविस्मरणीय बनवतात. डॉक्टरांनी लेकीची, तीच्या मैत्रिणींची आणि मोठ्यांची पण संध्याकाळ आनंदी केली. हा कार्यक्रम सर्वांची दाद मिळवता झाला.

अगदी साधीशी गोष्ट मी खीर खाल्ली तर….बुड घागरी, चल रे भोपळ्या टुणूक टुणूक….नाच रे मोरा… जुनेच पण नवीन स्वरुपात पाहायला आवडले. खोटे बोलणे पकडले जातेच पण आपल्या हुशारीने ते कसे पकडायचे ही गोष्ट खिरीने भरलेल्या मांजरीच्या पोटाची आज वेगळ्या दृष्टीकोनातून पाहण्यास मिळाली. सुरेखशी मांजर, खोडकर माकड मुलांच्या चेहऱ्यावर आश्चर्य उमटवून गेली. लेकीकडे जाणारी आजी खुपच छान आजी वाटली. मोठा भोपळा त्यात बसणारी आजी म्हणजे संकटात स्वःताची काळजी कशी घ्यायची हे सांगणारी गोष्ट पपेट्स ने मनावर ठसली गेली. नाचणारा मोर, पडद्याच्या एका बाजूकडून दुसऱ्या बाजूकडे नाचत जाणारा मोर मुलांना पण डोलवत होता. अर्धा तास पपेट्सचा होता पण जमणाऱ्या प्रत्येक छोटूकल्यांच्या हृदयापर्यंत पोहचला. त्यांनी तो आपल्या वर्णनांनी घरोघरी नेला.मुले तर भारावून गेलीच होती पण मी तर चक्क पपेट्स च्या प्रेमात पडले.

खूप वर्ष मोठ्यांना शिकवले आत्ता मी मोंटेसरीचा कोर्से करण्याचे ठरवले आहे हा परिणाम पपेट्सने केला. पपेट्स सादर करताना आवाजाच्या विविध छटा द्वारे गोष्ट पुढे पुढे जात असते. हातांचे कौशल्य शिकण्यास मिळते. हल्लीच्या संगणकाच्या युगात अजूनही छोट्यांचे मन छोटेच असते जरी ते संगणकावर खेळ खेळत असले तरीही, मोबाईल वापरण्यात तरबेज असले तरीही…मी सुरवातीला साशंक होते कि मुले अशा पपेट्स मध्ये रमतील का? पण मुलांच्याच रमण्याने माझे प्रश्न मनातून कधीच विरळ होऊन नाहीसे झाले.

सगळ्या प्रकारचे खेळ हल्ली मुलांच्या कडे असतात. पपेट्स फार कमी दिसतात. कोणी भेट दिले तर ते फक्त हाताच्या बोटावर पकडून पाच मिनिटेच मुलांच्या हातात दिसतात. स्वतः गोष्ट सादर करणे ही कला मुलांना लहानपणीच शिकवली तर मेंदूचा तल्लख पण वाढीस निकोपदृष्ट्या वाढीस लागेल. छोटासा पडदा तयार करून , निकामी झालेली बाहुली पोटातून मोकळी करून त्यात हाताच्या बोटांनी बाहुलीला हालचाल करावयास लावणे. निकामी झालेल्या खेळण्याचा उपयोग तर होईलच पण हातांच्या हालचालीचे संतुलन साधले जाऊन बोटांची कार्यक्षमता निश्चितच वाढेल. निरागस हास्य होऊन स्नायूंच्या आणि मनाच्या सबलीकरणास उपयोगी होईल. बालमानस शास्त्र वाचून शिकून मुलांना मोठे करणे ह्या तंत्रापेक्षा सहज सोप्पे साधेसे वाटणारे हे पपेट्स मोठ्यातील पण मूल जपण्यास मदत करेल. पपेट्स शिकणे हे बघण्यास जेवढे सोपे वाटते तेव्हढे सोपे निश्चितच नाही परंतु अवघड पण नाही. जसे गर्भ संस्कार आवश्यक असतात तसेच सुजाण पालक होण्यासाठी आपल्या बाळाच्या साठी पपेट्स ही कला शिकायला हवी

सुट्टीत खूप काही मुलांना शिकण्यासारखे असते पण यंदाच्या सुट्टीत असाच एखादा पपेट्स चा कोर्स मुलांना शिकवता येईल ह्याचा विचार पालक आणि शिक्षिका म्हणून माझ्या मनात सतत घोळत आहे. आठवड्याच्या सुट्टीत मोठ्यांना छोटे बनवणारे असे कोर्सेस मिळाले तर प्रत्येक घरच पपेट्स जगणारे घर होईल. संस्कार म्हणून वेगळा विचार करण्याची गरज उरणार नाही कारण आजूबाजूला संस्कारहीन वातावरण असले तरी आपल्या बाळांचे मन तिकडे आकृष्ट होणार नाही. घरच्या घरी आपल्या मुलांना पपेट्स शिकवून त्यांच्या मित्र मैत्रिणींना बोलावून एक छोटासा कार्यक्रम आयोजित करता येईल त्यातूनच मुलांचा सभाधीटपणा वाढेल आणि नियंत्रित विचार मार्गास लागतील.असे पपेट्स आमच्या छोट्या अवनी जावडेकर मुळे मला ही खूप काही शिकवून गेले मी ही माझ्यातील मूल जपू लागले आणि छोट्या  मुलांमध्ये ह्या पुढचे करिअर करण्याचे ठरविले आणि पपेट्स शिकवून छोट्यांचे छोटे पण जपण्यास पालक म्हणून तयार झाले.

मुलांनाच काय मोठ्यानाही बऱ्याच वेळेला आपले कलागुण कुठेही व्यक्त करण्याची संधी मिळत नाही. मुलांना तर स्पर्धात्मक जग आहेच पण हेच मोठ्यानाही आहे म्हणूनच आपणच मार्ग आपल्या छोट्यांकरता तयार करावयास हवा. जस जमेल तस कारण त्यातूनच आत्मनिर्भर पिढी तयार होणार आहे. जगात प्रत्येक वेळेला संधी मिलेलेच असे नाही तरीही मी माझ्या आनंदाकरता शिकणार हीच वृत्ती म्हणजे जीवनाचे आनंदी पपेट्स होतील असे मला तरी वाटते ह्यातूनच माझे सेकंड करिअर सुरु झाले