आपला रोजचा प्रवास हा रिक्षाने केल्याशिवाय दिवस पार पडत नाही. रिक्षा कधी खडखड आवाज करणारी असते, तर कधी उंच अशा सीट च्या पाठीमुळे अवघडून बसावयास भाग पाडते. वळणावर तर आपण अलगद पणे डाव्या हाताला असलेल्या कॅटरीना च्या फोटोला धडकतो तर उजवीकडचा ऐश्वर्या ला खेटून बसतो. मीटर कडे लक्ष ठेवत एव्हढी आपटाआपटी व्हायचीच. असले कोण बघते. खरय पण ह्याच रिक्षाचा अनुभव जर आपण वाहतुकीच्या कोंडीत सापडलो तर वैतागवाणा होतो. वेळ कसा जाणार? बाहेर तरी किती डोकावून बघणार. त्यातून पाऊस असेल तर वैताग येतो. आपला कान बरा व आपले कानाला लावून ऐकण्याचे गाणे बरे असे म्हणावेसे वाटते.
पण अशी एखादी रिक्षा मिळाली की जी तुम्हाला प्रवास अगदी मीटर च्या भाड्यासाहित, सुखद करवून आणेल. आवडेल न ही कल्पना! मी काही रिक्षाचे नवीन मॉडेल येणार आहे का ते नाही सांगत तर मला असा सुखद अनुभव मिळाला आहे. जो मला आज पुन्हा आठवला.
मला एक विरोप आला त्या मुळे मला पुन्हा मी केलेल्या प्रवासाची आठवण झाली. मुंबईत तर रिक्षा ने केलेला प्रवास हा काही फारसा उत्तम नसतो. मी काही कामा निमित्ताने बांद्र्याला जाण्यासाठी रिक्षाला हात दाखवीत होते. रिक्षात बसल्यावर लक्षात आले ही अनोखी रिक्षा आहे. सर्व अत्याधुनिक सोई आहेत. खर पाहिलं तर बिन दाराचे हे वाहन जोखमीच्या सोईनी पाहून आश्चर्य वाटले होते.
प्रवाश्यांसाठी वृतपत्रे होती, विमानात मासिक व वृतपत्र ह्या करिता जसा पाऊच असतो त्याच पद्धतीची खास सोय वाचन साहित्य ठेवण्यासाठी केलेली आहे. दूरदर्शन दाखविणारा टीव्ही पण होता. हसणे म्हणजे सर्व ताणांचे निरसन होय. मग हेच हसणे ‘पैसे’ म्हणजे मीटर चे भाडे देताना व घेताना असले तर…… सामंजस्य व मैत्री आणि प्रकृती ह्यांचा विचार कल्पकतेने लिहिलेला होता.
आपली गाडी वेगवेगळ्या अत्याधुनिक सोयीने सजावट करून अभिमानाने फिरवणे हे काही अप्रूप राहिले नाही. परंतु आपण किती जण आपल्या गाडीत आठवणीने प्रथोमपचार ठेवतो? प्रश्न केल्यास बऱ्याच जणांकडून अरे! हो आम्ही विसरलोच! असे उत्तर सहज मिळते. हा तर रिक्षावाला, ह्याने आवर्जून प्रथमोपचार रिक्षात खास सोय करून ठेवला आहे. औषधे ठेवली होती कापूस, डेटोल व काही. ह्या वरूनच कळत होते की, सुशीक्षितपणा हा शिकलो म्हणून नसतो तर तो मुळातच अंगी असावा लागतो. ही एक खास रिक्षा आहे हे ओळखायला वेळ लागणार नाही.
दिनदर्शिका होती. सर्व धर्मीय करिता त्या त्या धर्मातील त्यांची शुभ चिन्हे होती. इस्लाम, बुद्ध, शीख, हिंदू असे सर्व धर्म चिन्हांनी सामंजस्याने राहत होते. सर्व धर्मा करिता त्याचा आदर व्यक्त होत होता. काही फोटो पण आपली वंदना स्वीकारत आपल्याला त्यांनी देशाकरिता केलेल्या बलिदानाची आठवण करून देत होते. २६/ ११ चे कामटे, साळसकर, उन्नीकृष्णन ह्यांचे फोटो आहेत. ह्या सर्वांचे फोटो त्यांनी आपण त्यांना खेटून बसावे असे लावले नसून रिक्षाच्या काचेवर प्रथम दर्शनी दिसतील असे आहेत. आदर कसा असावा ह्याचे भान जाणवते. त्यावरून नुसती रिक्षाच खास नाही तर रिक्षावाला पण विशेष खास होता. आगीपासून बचाव करणारे उपकरण होतेच, रेडीओ, घड्याळ पण होते.
प्लॅस्टिक कंपनीत हा रिक्षावाला नोकरीला होता. कंपनी बंद पडल्यावर गेल्या आठ ते नऊ वर्षापासून हा रिक्षाचा व्यवसाय सुरु केला होता. घरी बसून टीव्ही पाहून काय मिळणार त्या पेक्षा रिक्षा चालवूया असे त्याने ठरविले. शाळेत जाणारी दोन मुले आहेत. दोन पैसे मिळाले तर भाविष्याकरिता उपयोगी पडतील हा विचार पक्का करून रिक्षा सुरु केली. सकाळी आठ ते रात्री दहा पर्यंत हा रिक्षा चालवतो. ह्यात काय विशेष आहे? हे तर सर्वसाधारण पणे हमखास असणारे दाहक सत्य आहे. जर तो आजारी पडलाच तरच रिक्षाचा खाडा होतो. त्याला ह्या दिवसभरच्या रिक्षा मुळे फारसा वेळ मिळत नसावा म्हणून त्यांनी ह्या सोई करून घेतल्या असतील. ह्या सर्व सोई प्रवासी मजेत असावेत म्हणून केल्या आहेत. हे त्याचे छोटेसे घर आहे व येणारा प्रवासी हा त्याचा अतिथी आहे
अजून काही व्यवसाय आहे का? वेळ फारसा मिळत नाही पण एक गोष्ट मात्र आवर्जून करतो. अंधेरीच्या एका महिला वृद्धाश्रमात हा जातो. तिथे रोजच्या गरजेच्या वस्तू म्हणजे टूथब्रश. टूथपेस्ट, साबण, केसाचे तेल वैगरे गोष्टी तेथील महिला वृद्धाना देतो. प्रत्येक आठवड्याला हा वस्तू देतो कारण त्याच्या कडे त्याच्या गरजेपेक्षा जास्त पैसे जमा झालेले असतात. एव्हढेच नव्हे तर मीटर च्या आकारणीत २५% सवलत अपंगाना त्याने देऊ केली आहे तसे मीटर च्या खाली व्यवस्थित लिहून ठेवले आहे. अंध व्यक्तींना रुपये ५० पर्यंत मोफत प्रवास देऊ केला आहे.
हा असा रिक्षावाला आहे की जो मुंबईचे प्रतिनिधित्व जपतो. मुंबई ची जिद्द, चिकाटी, संकटे आली तरी न डगमगता मुंबई पुन्हा जोमाने कामाला सुरवात करते. अडचणींना कवटाळून बसत नाही. संकटात सर्वाना मदत करते. कामाचा उत्साह, चैतन्य व सामाजिक जाणीव अशीच मुंबईत अनुभवयास मिळते. हा रिक्षावाला निस्वा:र्थी मदत करीत आहे. स्वता:च्या गरजा ओळखून जास्तीचे पैसे दुसऱ्यांना मदत करण्यासाठी वापरतो. हा स्वता:शी, समाजाशी प्रामाणिक आहे. असे कितीसे उत्पन्न मिळत असेल पण त्यात पण हा दान धर्म हा माणुसकी करिता करतो. आपल्यालाही आराम देतो, अपंगाना ही पैशात दिलासा देतो. ह्या रिक्षातून प्रवास केला तर नकळतपणे आपणही त्याचा आदर करून सलाम कराल.
मला ह्याच रिक्षावाल्याचा विरोप मिळाला. विरोपात टायटन कंपनीचे ‘सुवेंदू रॉय’ ह्यांनी ह्या अनोख्या रिक्षातून प्रवास केला. रिक्षावाल्याची अनोखी कहाणी त्यांनी विरोपातून सगळ्यांना पाठवली असावी. मला विरोप आमच्या ‘बापू परिवारातून’ पाठविला आहे. हाच रिक्षावाला आज मला त्याच्या रिक्षातून मी पण प्रवास केला होता त्याची आठवण करून देता झाला.
श्री. संदीप बच्छे ( Mr sandeep bachhe ) असे नाव रिक्षावाल्याचे आहे. रिक्षाचा नंबर MH -02 -Z -8508 असा आहे.
मला आता नीटसे आठवत नाही कारण मलाही ह्या रिक्षाने प्रवास केलेल्याला जवळजवळ तीन वर्ष झालीत. पण ह्या रिक्षात प्रवाश्यांसाठी पाण्याची बाटली असावी तसेच त्या रिक्षात असलेल्या खाकी रंगाच्या बॅगेत पण नक्कीच काहीतरी प्रवाश्यांच्या करिता उपयुक्त असावे असे वाटते. आपण जर ह्याच रिक्षातून प्रवास केलात तर मला जरूर कळवा. जमला तर त्याचा मोबाईल नंबर मला पाठवा. मी भारतात जाईन तेंव्हा पुन्हा एकदा आवर्जून त्याच्या ह्या छोट्याशा घरात अतिथी प्रवासी म्हणून प्रवास करेन.
आपणाला जर संदीप बच्छे रिक्षावाले मिळाले तर माझाही पुन्हा एकदा नमस्कार कळवा. आपला प्रवास निश्चित छान होईल याची खात्री आहे. तसेच आपणही आपल्याला जमेल तसे नव्हे तर आवर्जून जेव्हढी मदत करता येईल तेव्हढी निश्चित करण्याचे ठरवूया. सलाम माझा अशा चांगल्या माणुसकीला. येथे मी श्री. सुवेंदू रॉय तसेच माझ्या परिवाराचे आभार मानते.
कारण मला पुन्हा चांगल्या माणसाची आठवण करून दिली.