कासवी ची दृष्टी………..

कासवी ची दृष्टी तिच्या पिल्लांवर असते. ती लांबूनच नजरेने पिल्लांचा सांभाळ करते. पुराणात, कथांमध्ये अनेक वेळेला हे विधान पाहायला मिळते. हल्ली डिसकव्हरी चॅनेलवर खूप वेळेला कासवांची फिल्म पाहायला मिळते. पण प्रत्यक्षात पाहणे म्हणजे काही अप्रूप च आहे. इथे ओमान मध्ये ‘सूर’ म्हणून मस्कत पासून 300 कि. मी. अंतरावर ओमान चा किनारा आहे. तिथे ‘ रासल- हद’ म्हणून किनारा कासवांसाठी प्रसिद्ध आहे. दर वर्षी साधारण तीस हजार पर्यंत संख्या त्यांच्या येण्याची आहे. हा किनारा हा साध्या किनाऱ्या पेक्षा खूपच वेगळा आहे. आम्ही पण प्रत्यक्ष पाहण्यासाठी गेलो.

जून ते सप्टेंबर. ह्या कालावधीत फार मोठ्या प्रमाणात पाहायला मिळतात. साधारणपणे पाच वेळा अंडी घालण्यासाठी किनाऱ्यावर येतात. ऑक्टोबर नंतर संख्या तशी कमी होते. पण दिसतात. उबदार व फार वाळूचे थर असतात म्हणजे साध्या किनाऱ्याच्या पेक्षा खूप वाळू असते. मध्य रात्री नंतर जावे लागते. गडद अंधार, निशब्द किनारा, वाळूत पाय ठेवल्याबरोबर गुढग्या पर्यंत पाय खोल खोल रुतत जातो. सारखे वाटते पाया खाली हलते, बहुतेक कासवाचे पिल्लू तर नाही. धाक धुक होत जावे लागते. पण प्रत्यक्षात अंडी घालण्याची जागा जरा दूर असते. हे परत येताना कळते.

अत्यंत सुरक्षा व्यवस्था आहे. तुम्हाला बरोबर मोबाईल चा रिंगटोन सुद्धा वाजवण्याची परवानगी नाही. काही फॉर्म भरून जावे लागते. नियमांची काटेकोर बजावणी होते. किनारा पूर्णपणे ओमानी बघतात. तुम्हाला एक ओमानी माणूस सोबत दिला जातो. बोलणे पण करायचे नाही. कॅमेरा चा फ़्लॅश अजिबात चालत नाही. अंधारात पाय खोल खोल रुतवत जावे लागते. इथे ही मी लेकाचा हात घट्ट पणे पकडून ठेवला होता.

मागून ओरडावेसे वाटत होते. नको हा अंधार, जावू या परत. आंधळी कोशिंबीर होती. पण कडक नियमांच्या धास्ती मुळे आवाज फुटत नव्हता. आपले माणूस कळत नव्हते. साधारण समुद्राच्या दिशेने चाललो होतो. समोर येणारा वाळूचा ढीग आठ वर्षाच्या मुलाच्या उंचीचा होता. एक टेकाड स्व:ताला बुडवत पार केले की दुसरे. धृतराष्ट्राची गांधारी पट्टी असूनही बावचळली नसेल.

येथे प्रामुख्याने हिरव्या पाठीचे कासव लाल समुद्र व भारतीय उपसागरातून अंडी घालण्यासाठी येतात. साधारणपणे पूर्ण वाढीची कासवी पस्तीस वर्षाची होते तेंव्हा अंडी घालण्यासाठी सक्षम होते. पूर्ण वाढ ही १.२ मीटर लांब व २०० किलो वजनाची असते. एका वेळी साधारण १०० ते २०० अंडी असतात. स्व:ताच्या पायांनी खोल खड्डा गोल गोल चक्राकार आकारात वाळू उडवत तयार करते, अंडी घालते. पुन्हा ती प्रचंड ढिगारा सदृश वाळू एकसारखी करायची. अंडी पूर्णपणे झाकून ठेवायची. किती हे कष्ट! मी उगाचच मनात चुकचुकत होते. प्रसव वेदना तिच्या डोळ्यातून साधारण पणे द्रव्या सारख्या वाहत होत्या. पप्पा कासव कुठे असतो कोणास ठावूक? त्यापेक्षा पक्षी बरे, दोघे मिळून तरी घरटे तयार करतात.

दरवर्षी कासवी अंडी घालण्याकरिता येतेच असे नाही. पंचावन ते साठ दिवस आधी अंडी घालतात. पिल्लू अंड्यातून बाहेर आले की ७२ तासाच्या आत समुद्रात पाण्यात जाते. घारी, समुद्र पक्षी, पाण्यातले मोठे मासे खूपशी पिल्ले खावून टाकतात. आणि विशेष बाब म्हणजे ती प्रत्येक वेळेला तिचा जन्म ज्या किनाऱ्यावर झाला तिथेच ती अंडी घालते. असे ही माहेरपण!!

बरेच जण उपस्थित असतात. त्यांना फरक पडतो तो आवाज व उजेड ह्यामुळे, नाहीतर परत माघारी जातात. व अंडी उजेडामुळे खराब होतात. पिल्लू तयार होवू शकत नाही. म्हणून मध्य रात्री उबदार वाळूत, पण थंड वातावरणात त्यांचा मौसम असतो. त्यामुळे आधीच परदेशी कायदे कडक त्यात कासवांचा किनारा तर अहोरात्र पहाऱ्यात असतो. मोकाट रानटी कुत्रे, माणसे ह्याकरिता राखणदारी असते. अंडी घालून झाली की त्याभोवती एक सूचना फलक लावून जागा संरक्षित करतात. परवानगी शिवाय दिवसा पण जाता येत नाही. किनाऱ्यावर पोलीस ठाणे आहे.

असे असूनही खूप जण नियमांचा भंग करतात. वाळूत नुकतीच जन्मलेली पिल्ले हातात धरून त्यांना संसर्गजन्य बनवतात. त्यांचा आयुष्याचा काळ साधारण पाचशे वर्ष मानला तरी जन्मल्यावर फार थोडी पिल्ल एव्हढी मोठी होत असतील. इथे पोलीस कारवाई पण अतिशय कडक असते. कासवांची अंडी बरेच जण खाण्यासाठी वापरतात. म्हणूनच ह्या विशेष जाती करिता कायदे आहेत.

तुम्हाला बऱ्याच एन. जी. ओ. कासवांची घरटी म्हणजे अंडी घालण्याची जागा, दत्तक म्हणून देतात. ठराविक रक्कम तुम्ही द्यायची त्याचा उपयोग ह्यांच्या संवर्धनासाठी केला जातो. अंड्यातून पिल्ले बाहेर आली की तुमच्या घरट्याची आठवण म्हणून तुम्हाला त्यांचा विशेष फोटो पाठवला जातो. घरट्याचे संरक्षण केले जाते. कासवांच्या क्लब चे मेंबर बनविले जाते. अर्थात पाण्यात पिल्ले गेल्यावर त्यांच्या नशिबावर सोडून द्यावे लागते. पण तो पर्यंत तरी तुम्ही घरी राहूनही पिल्लांवर कासवी सारखी दृष्टी ठेवू शकता. असे ही पालकत्व स्वीकारता येते.

इथे घरी पाळण्या करिता सहज बाळ कासवे मिळतात. घरची कासवे टोलेजंग होत नाहीत. पाण्यातली कासवे मी ही घरी आणली आहेत. चार वर्षांची झाली. आणली तेंव्हा रुपयाच्या नाण्याच्या आकाराची होती, आता आपला तळवा पूर्णपणे रुंदावला तर जेव्हढा होईल त्या आकाराची झालीत. खूप शहाणी, खूपच तरतरीत आहेत. आमच्या घरचे लहानथोर जे येतात ते त्यांच्यातच रमतात. त्यांच्याबद्धल एक स्वतंत्र पोस्ट होईल. आम्ही त्यांच्या जोडीला ‘चिनू मिनू’ हाक देतो तेंव्हा नावाप्रमाणे प्रतिसाद देतात. संध्याकाळी जेंव्हा माझे मिस्टर घराच्या जवळ येतात तेंव्हा ते धडधड आवाज करीत मला सांगतात. असे खूप बोलके सवांद त्यांच्यात व आमच्यात होत असतात. ह्याचा अर्थ त्यांची संवेदना खूप सक्षम असते.

कासावीची दृष्टी किंवा ती आपल्या नजरेने पिल्लांवर लक्ष ठेवते म्हणे. असे कथांमधून वाचावयास मिळते. म्हणजे नेमके कसे? हा उलगडा मला अजून झाला नाही. अंडी घालून समुद्रात जाते. तिथे पिल्लांवर कसे काय लक्ष ठेवते हे मी अजून पहिले नाही. असो पुरणाची वांगी पुराणातच! कथा ह्या रूपक असतात. पण मी माझ्या नजरेने निसर्गावर सोपवलेले जीवन पहिले.

अशीच वाळूत अंडी घालायला मगर येते, पण पिल्ले आपल्या तोंडात धरून घेवून जाते. कासवांची पिल्ले जन्मली की स्व:ताच समुद्रात आयुष्याच्या ओढीने चालू पडतात. त्यांचे आईबाबा भेटतात कि नाही, ह्याचे रहस्य समुद्राच्या पाण्यातच दडले आहे. त्यातल्या कन्या आई होण्यासाठी तिथेच परत येतील. कासवीने केलेल्या घरटे ते समुद्र ह्या मार्गावरूनच पिल्ल समुद्राकडे एकमेकांना चिटकून चालत राहतात.

डोळ्यासमोरून अंधारात पाहिलेली कासवीची दृष्टी मला निसर्गाकडे पाहण्याचा उत्कट अनुभव देती झाली.