भारत माझ्या दरवाज्यात……
काल बेल वाजली, दुपारचा वेळ होता, दरवाजा उघडून पहिले तर एक परदेशी स्त्री दारात उभी होती. मला म्हणाली मी तुमची शेजारी, आय एम एलिझाबेथ फ्रॉम ऑस्ट्रिया. मी या, या, घरी या म्हणत, तिला आत घेऊन आले. मला म्हणाली, मला इंडियन शेजारी हवेच होते. आय लाईक इंडिया. भरकन माझा चेहरा जणु माझी मावशी आल्याचा आनंद घेत खुश झाला.
एलिझाबेथ म्हणाली, मला तुमचे स्पायसेस खूप आवडतात. दोनच दिवसापूर्वी लखः घासलेला आपलाच मिसळणाचा डब्बा कौतुकाने दाखविला. तिने डब्यातल्या वाट्या मोजल्या आणि मला म्हणाली, सो मच लेस स्पायसेस.. भारत मसाल्यांचा व्यापार करीत असे हे इतिहासात घोकलेले वाक्य आठवले. लगेच मी म्हणाले,छे छे, आमचा भारत खूप मोठ्ठा आहे. प्रत्येक राज्यानुसार, राज्यातील भागानुसार मसाले पण खूप वेगळे आहेत. माझ्यातील शिक्षिका उफाळून आली. तेंव्हा कुठे तिच्या चेहऱ्यावर मी खरंच भारतीय असल्याचा विश्वास उमटला. अचानक ती म्हणाली, शो मी ऑल…
माझ्या डोळ्यासमोर संपुर्ण भारत माझ्या दरवाज्यात दिसला. कुठे असतो हा मसाल्यांचा व्यापार, दक्षिणेकडे का उत्तरेकडे….नव्हे माझ्या फ्रिज च्या दारात.
साधारणपणे निरीक्षण केल्यास प्रत्येकाच्या घरचे फ्रिजचे दार मसाल्यांच्या पुड्क्यानी ठासून भरलेले असते. माझे हि असतेच. काय करणार काळाची गरज झाली आहे. ह्या शिवाय वेगवेगळे मसाला कीपर ओट्यावर ठाण मांडून असतातच. मी जशी नेट वर खाद्य प्रकार शोधत असते तसेच घरचे पण नेट वर असतातच कि, त्यांच्या हि नेट वरच्या फर्माईशी असतात त्या नुसार अनेक खाद्य संस्कृतीची ताळमेळ घालताना माझा फ्रिज चा दरवाजा भरून जातो.
महाराष्ट्र म्हंटले तरि केवढे मसाले असतात. कोल्हापुरी पदार्थाला तोच मसाला लागतो, कोकणी पदार्थांना त्यांचाच मसाला लागतो, सी के पी, मालवणी, साताऱ्याकडचा, नागपुरी अशा सर्व महाराष्ट्राची चव पावलो पावली निराळीच असते. त्या पुढे मग दक्षिणेकडचे, पंजाबचे, आसामचे, बंगालचे कित्ती आणि काय काय असतात. एवढे सगळे थोडक्यात कसे सांगु मी माझ्या शेजारणीला असे झाले. पुन्हा म्हणाली शो मी , आय लाईक टू सी.
मसाले वाढतात तसा फ्रिज हि लहान पडू लागतो, मोठ्ठा दाराच्या कप्यांचा फ्रिज असावाच लागतो. छोले करायचे झाले तर आपल्या काळ्या वाटाण्याचा मसाला कसा बर चालेल? काय सांगु मी? माझ्या विचारातच मी गुरफुटून गेले. तेव्हढ्यात माझा मुलगा आला, त्याला म्हंटले कि, ह्यांना जरा इंटरनेट वर आपले मसाले दाखव तो पर्यंत मी फ्रिज चा दरवाजा नीट करते. एलिझाबेथ नेट वरचा भारत बघू लागली. मी पटकन माझ्या हिमालायची आठवण यावी अशा उत्तुंग फ्रिजपाशी गेले.
गच्च भरलेला माझा फ्रिज, संपुर्ण आसेतु हिमाचल त्याच्या पोटात सामावून घेत होता. बर, ह्या मसाल्यांच्या पुड्क्यांच्या जागा हि नेहमी साधारण पणे ठरलेल्या असतात. पंजाबी, सांबार, चहाचा असे एका ठिकाणी, कधीतरी लागणारा रस्सम मसाला हा जरा मागे, खूप काही जागा अशी दरवाज्यात नसतेच. दोन दोन ओळीच बसतात त्या मोजक्या दोन ओळीच्या अनेक डब्यात माझ्यातील अन्नपूर्णा चे रहस्य दडलेले असते. कितीही व्यवस्थित ठेवले तरि, भारतीय संस्कृती कधी एकमेकांशी मिळून मिसळून जातात आपल्यालाही पत्ता लगत नाही. व्हेज, नॉन व्हेज मसाले हा हि सवतासुभा एकत्र नांदत असतो. त्यात भार म्हणजे चायनीज, रशियन आणि कुठल्या कुठल्या सलाड ड्रेसिंग, मसाल्यांच्या बाटल्या ह्याच दारात ठेव्याव्या लागतात. एकंदरीत काय विविधतेत पण सुजलाम सुफलाम असतेच.
बाहेरून मुलाचा आवाज आला, आई नेट वरती फ्रिज चे कप्पे छान दाखवलेत. भरभर इकडे तिकडे दाटुन भरलेले सामान म्हणजे वेगवेगळी लोणची आणि चटण्या आवरत बसले. इतकं सार भारतीय पोटाकरता लागतं, हे पटवून सांगायचय मला हा प्रश्न उभा ठाकला. नेट वरती घरच खा, आपलंच जेवण करा, न्याहारी करा कशाला परदेशी बाबी अनुकरण करता अश्या सल्यांने माझे परिवर्तन होताच असते. म्हणजे ओघाने थालीपीठ, घावन, डोसे, अशी सगळी पीठे फ्रिज मधेच असतात. काय काय सांगु, आणि कुठे काय आवरू…
मी शाळेत शिक्षिका आहे त्या मुळे साहजिकच आठवडी सुट्टीला नेट जास्त पाहणे होते त्या मुळे आठवड्याचा बेत , त्याची तयारी ठेवायला फ्रिज आहेच. अनेक विचारातून, सहज लीलया हाताने आवरत होते. कशाला एवढे मसाले लागतात, एक बेसिक मसाला करायचा बस्स झालं. असे मत पण सर्वांच्या प्रभावाने होतेच. बेसिक तरि का करा, साधा डाळ भात आणि भाकरी, भाजीने आत्तापर्यंत तब्येत उत्तम ठेवलीच आहे कि, पुन्हा माझे लक्ष मिसळणाच्या डब्याकडे गेलंच.
एव्हाना मुलाने बाहेरून आरोळी ठोकली, त्या किचन मधे येत आहेत ग…… माझा फ्रिज बघून म्हणाली, टू मच बिग, उघडून म्हणाली, आहा! फुल्ली लोडेड…. मी येस म्हंटल, वुई लाईक इट ऑल. एलिझाबेथ येस, येस म्हणाली… मग मला म्हणाली, तिची होणारी सुन इंडिया ची आहे. ते दोघे तिकडेच आहेत. ते हि मोठा फ्रिज शोधत आहेत. तरिच हि सासुबाई चौकशा करण्यास आली. घेऊ देत, घेऊ देत, भरल्या फ्रिज चा तोंड भरून आशीर्वाद दिला. तिचाही संसार असाच भरून राहु देत.
आपला आल्याचा, दुधाचा चहा घेऊन ती निघाली. पुढच्या आठवड्यात ती आणि तिचा नवरा त्यांची जागा सोडून दुसऱ्या देशात जाणार आहेत. तो पर्यंत भारत मसाल्यांचा व्यापार करीत असे हा इतिहासातला प्रश्न मी फ्रिज च्या मदतीने सोडवत राहणार हे निश्चित्त आहेच. आपला वैभवशाली इतिहास असाच सर्व दुर पसरो अशी प्रार्थना करत अन्नपूर्णे पाशी सांजवात लावली आणि साध्या दही भाताचा बेत रात्री करता ठरवून टाकला..
