जो आवडे सर्वाना…..

मी भारतात २९ मार्च ला येणार होते. आईला घेऊन मस्कत चा तिचा पहिला विमान प्रवास माझ्यासोबत होणार होता. माझ्याकडे कागदी तिकीट राहिले ती देवाघरी २७ तारखेला निघून गेली.
मी रिकाम्या हाताने मस्कत ला परत आले. अधिक काही लिहू शकत नाही कारण ती फक्त माझीच आई नव्हती तर परिसरात तिचा आधार अनेकांना होता. कुठेलेही दुखणे तिला नव्हते पहिल्यांदाच लेकीला भेटण्यासाठी तिच्या हृदयाने परवानगी दिली नाही. गेल्या वर्षी जून ला मी तिला पहिले होते. मी आता पूर्णपणे पोरकी झाले. तिला मात्र माझा ब्लॉग खूप आवडायचा. तिनेही तुमच्या सारखेच मस्कत पोस्ट मधून पहिले. तुम्हा सर्वांच्या प्रतिक्रिया पण तिला खूप आवडत होत्या. …….तोची आवडे देवाला. हरी ओम.

ओमानी चहा, व कॉफी……..पाहुणचार.

ओमान मध्ये चहा व कॉफी ही वेगवेगळ्या पद्धतीने मिळते. ह्यांना ‘कावा’ असे संबोधतात. ईद, रमादान ह्या सणांना किंवा पाहुणे म्हणून गेल्यास स्वागत ह्या पेयाने केले जाते. जपानी पद्धतीचे छोटे छोटे बिन कानाचे कप असतात. इथल्या काही राउंड अबाउट म्हणजे रस्त्याच्या नाक्यावर इथल्या वैशिष्ट्य पूर्ण चहाच्या सुरया व छोटे कप ह्यांची सिमेंट मध्ये प्रतिकृती तयार करून ठेवल्या आहेत . चहा व कॉफी जणू काही आपल्याला देऊन स्वागत करीत आहेत. अशा रीतीने ह्या चहाच्या पेल्यांची परंपरा जपली आहे.

आपण त्यांच्या घरी गेल्यास मुस्लीम प्रथेप्रमाणे स्त्री व पुरुष यांची बसण्याची सोय वेगळी असते. ह्या पाहुणचाराच्या खोलीला ‘मजलिस’ असे म्हणतात. जपानी पद्धती प्रमाणे खाली बसून चहा घेण्याची रीत आहे.

प्रथम तुमचे स्वागत हे धुपाच्या सुगंधाने केले जाते. जमिनीवर बुटका परंतु रुंद असा टीपॉय असतो. जमिनीवर गालिच्यांचा गुबगुबीत असा सरंजाम असतो. शाही असे सोफा सेट असतात. त्यापासून जरा अंतरावर ही चहा घेण्याची सोय केली असते. सुगंधित धूप, ओमानी हलवा व चहा असा बेत शांत वातावरणात पाहुणचारासाठी असतो. गडबडीत पटकन चहा घेऊन जा असा पटापट मामला येथे नाही.

ओमान मध्ये चहा किंवा कॉफी च्या बागा नाहीत. भारत, श्रीलंका आदी देशातून आयात केला जातो. परंतु चहा बनवण्याची पद्धत वेगळी आहे. इथे त्यांच्या परंपरेमध्ये चहात किवा कॉफी त दुध घातले जात नाही. सौम्य प्रमाणात उकळवलेला असतो. पाणी गरम करून सुरईत ओतले जाते व बाकीचा मसाला घातला जातो. काही वेळाने हा मसाला खाली बसतो व अलगद पाणी कपात म्हणजे छोट्या भातुकली सारख्या बाउल मध्ये घालून दिले जाते. ह्या समवेत खजूर, ओमानी हलवा हा असतोच. नाशत्याला बरेच पदार्थ असतात पण हा सरंजाम फक्त थोड्या काळासाठी आलेल्या पाहुण्यासाठी असतो.

कावा बनवण्यासाठी दालचिनीची पावडर, काश्मिरी ग्रीन चहा ची पाने चुरून घ्यायची , हिरवी वेलची कुटून ,बदाम किसून व साखर. पाणी गरम करून त्यात मसाला घालून लगेच किटलीत ओतून पाच मिनिटांनी कपात पिण्यास द्यायचे. हा चहा गाळत नाहीत. इथे कावा खूप लोकप्रिय आहे. ईद, रमादान काळात तर रस्त्यावर सुद्द्धा खजूर, कावा व ओमानी हलवा कोणालाही मुफ्त दिला जातो.

जास्वंदी फुलापासून बनवलेला चहा पण येथील लोकांना आवडतो. सुकलेली फुले, दोन ते तीन लवंगा, किसलेले आले, जेव्हढी फुले असतील त्याच भांड्याच्या मापाने बरोबरीने साखर,एक मोठा चमचा लिंबाचा रस ह्या करता जर सात कप पाणी घेतले असेल तर ते तीन कप होईपर्यंत उकाळावयाचे त्यात पुन्हा चार कप पाणी घालून थंड होऊन द्यायचे. पाणी गाळून बर्फावर घालून हा चहा दिला जातो. ह्याच्यात त्यांना पुदिन्याची खूप आवड असल्याने तो ही घातला जातो.

ओमानी लिंबांचा चहा ह्याचे वैशिष्ट्य म्हणजे ही लिंबे मिठाच्या पाण्यात उकळवून नंतर सुकवली जातात. त्यांना इथे झातर( zaatar )असे म्हणतात किंवा अरब देशात ओमानी लूमी असे म्हणतात. चहा व कॉफी त तर झातर असतेच पण ओमानी किंवा अरेबिक देशात ह्याचे पदार्थात, सूप मध्ये खूप महत्व आहे. इथे प्रत्येक ओमानी माणसाच्या घरांच्या अंगणात लिंबू चे झाड असतेच. झातर ची पावडर पण मिळते. सध्या लिंबापेक्षा ह्याची चव खूप वेगळी असते. अशा लिंबाच्या चहा ला चार कप पाणी घेतले तर पाच ते सहा झातर ची साले(वाळलेली लिंबे फोडून साल वेगळे काढता येते), मोठे दोन चमचे मध व थोडी साखर घालून पाच मिनिटापर्यंत उकळवून गाळून गरम गरम चहा दिला जातो.

लाल रंगाचा साधी चहा पावडर टाकून तीन प्रकारे चहा केला जातो. पुदिन्याची पाने घालून किंवा रोजमेरी / सागे ची सुकलेली पाने, झातर ची / लेमन thym ची सुकलेली पाने घालून चहा बनविला जातो. त्याला रेड टी म्हणतात. भारताशी जवळचा व्यापारी व संस्कृतीशी ह्या देशाचा संबंध असल्याने आपल्यासारखा दुध घातलेला चहा हवा आहे का असे सौजन्याने विचारले जाते. पण त्यांच्या घरी मात्र ते आवर्जून त्यांच्या प्रथेप्रमाणेच चहा घेतात.

कॉफी तर फारच वेगळ्या पद्धतीने बनविली जाते. ह्या प्रथेचा त्यांना खूप अभिमान आहे. कॉफी च्या बिया येमेन किंवा ब्राझील मधून आयात केल्या जातात. हिरव्या बिया घेऊन त्या ओव्हन मध्ये भाजतात. त्याची ब्राऊन रंगाची पावडर नेहमी ताजी घरीच बनविली जाते. चार कप पाण्यात १/३ कप कॉफी पावडर घालून त्यात चार हिरव्या वेलच्या कुटून घालायच्या. पाणी उकळत ठेवायचे. पाच मिनिटांनी थंड झाल्यावर त्यात चार लवंगा आख्ख्या घालतात. हे पाणी थर्मास मध्ये घालून त्यात गुलाब जल व केशराच्या काड्या घालून न हलवता अलगद कपात ओतायचे म्हणजे लवंगा खाली बसून कपात येणार नाहीत.

चहा नको असेल तर लबान म्हणजे ताकाचा तरी आग्रह नक्कीच होतो. सकाळच्या न्याहारीपासून ते रात्री जेवणापर्यंत ताक घेतले जाते. हे ताक पातळ असते. त्यामध्ये थंड पाणी, मीठ, जिरे पूड,रेड पिपर पावडर, ओरेगनो, किंवा झातरपूड, व ताज्या लिंबाचा अर्धा चमचा रस घालून दिले जाते. आणि येमेन हा देश अगदी जवळ असून त्याप्रमाणे हे मिश्रण मिक्सर मध्ये घालून त्यात टॊमॅटॊपण घातला जातो. cilantro पण ताजेच घालून दिले जाते. असे हे अनोख्या चवीचे ताक ओमानी पद्धतीचे असते. ह्या समवेत खजूर व ओमानी हलवा देण्याची पद्धत आहे. डेटस व नट्स कुकीज पण इथे चहा बरोबर दिल्या जातात. ओमानी हलवा व गोडधोड पदार्थांची रेलचेल असते. ओमानी जेवणात वैविध्य आहे. असा पाहुणचार व आदरातिथ्य पाहुण्याचे केले जाते.

‘फलाज’………वाळवंटातील पाण्याचा पुरवठा.

ओमान मध्ये अत्यंत रुक्ष दिसणारे, एकही झाड अंगावर न बाळगणारे, वातावरणाचे वैविध्य जपणारे असे डोंगर आहेत. पूर्ण देशात विस्तीर्ण असा सपाट असा भूभाग कमी आहे. प्रत्येक मीटर अंतरा वर नजर न ठरेल एव्हढ्या अफाट डोंगर रांगा आहेत. देशाचा दक्षिणेकडचा भाग भारतीय भौगोलिक बाबींशी मिळता जुळता आहे. ‘सलाला’ असे नाव आहे. इथे तुम्ही केरळ किंवा कोकणात आला आहेत असेच वाटेल. जून ते सप्टेंबर अफाट पाऊस, त्यापुढील काही भूप्रदेश वर्षभर गच्च असे जंगल. हिरवाई, फळांच्या बागा. नयनरम्य सौदर्य स्थळे आहेत. ‘अल हजर’ अशा नावाच्या डोंगर रांगा आहेत. ह्या भागाला ‘जबल अल अक्तर’ असे म्हणतात.

मस्कत शहरात मात्र हिरवाई ही रस्त्याच्या दुतर्फा अतिशय उत्तम पणे निर्माण केली आहे. असा देश हा वाळवंटी म्हणून तर आहेच पण आज संपूर्ण आखाती देशात शेती, पाटबंधारे, व जलसिंचनासाठी अग्रसेर आहे. इथे पाऊस खूप कमी आहे, वरील नमूद केलेल्या भागात मात्र अपवाद आहे. असे असताना पेट्रोल करता प्रसिद्ध असून देखील प्रतिकूल निसर्ग न मानता कल्पकतेने स्वयंपूर्ण झालेल्या ह्या देशाची ही ओळख ही मेहनती व प्रामाणिक पणा यांनी समृद्ध आहे.

फलाज’ चा अर्थ पाण्याचा झरा किंवा स्त्रोत आणि अनेक प्रवाह म्हणजे अ’ फलाज असे संबोधतात. वाळवंटातील इथल्या डोंगरांमध्ये लुप्त किंवा सुप्त असे पाण्याचे झरे आहेत. डोंगरातून थेट शेतीकरता पाणी हे बांधीव मार्गाने आणले जाते. ओमान मध्ये जवळ जवळ सर्व शेती उत्पादने घेतली जातात. खडकाळ अशा डोंगर रांगांमध्ये अचानक अशी शेती दिसू लागते. वरकरणी पाहता कुठेही पाण्याचे अस्तिव दिसत नाही. ही हिरवळ व शेती मन व डोळे शांत करते. अशा डोंगरातून निघालेल्या प्रवाहांना येथे फलाज( falaj ) असे संबोधतात

आपल्याकडच्या पाटाच्या पाण्याची आठवण हमखास येते. ही पद्धत इस्लाम धर्म स्थापन होण्याआधी पासूनची आहे. ओमानी पूर्वजांनी परिस्थितीचे आव्हान स्वीकारले व कायम स्वरूपी असे पाण्याचे भूमिंतर्गत व स्त्रोत शोधून काढले. तिथे दगडी असे चॅनल बांधले. झरा ज्या ठिकाणी मिळाला तिथे संरक्षित असे बांधकाम केले. इथल्या डोंगरांमध्ये मातीचे प्रमाण नाही त्यामुळे चढण्यास बिकट व निसरते असे दगड असताना असे बांधीव काम करणे दुरापास्त आहे.

हे बांधीव पाट थोडे थोडके नसून इथे असे ११००० फलाज आहेत त्यापैकी ४००० हे कायम पाण्याचा पुरवठा करतात. ‘घैली’ पद्धत म्हणजे हे प्रवाह उघड्या अशा कॅनल मधून प्रवाहित केले जातात ते पिण्यासाठी वापरत नाहीत तर ‘दौडी’ पद्धतीने बंदिस्त बांधलेले प्रवाह हे शुद्ध असून घरगुती वापराकरता असतात. देखभाल सरकारकडून व ओमानी लोकांकडून अतिशय काळजीपूर्वक केली जाते.
फलाज सिस्टीम चे नेटवर्क खूपच कल्पक आहे. डोंगरांमध्ये अचानक पाण्याचा पुरवठा वाढतो तेंव्हा हे कॅनाल्स एकमेकांना पूरक अशा पद्धतीने पाणी वाहून नेतात. अत्यंत जोरदार असा पाण्याचा पुरवठा झाल्यास शहरी भागात ‘वादी’ म्हणजे ‘नाले’ बांधून ठेवले आहेत. मोठी कार किंवा ट्रक पाण्याच्या दबावामुळे कित्येक किलोमीटर पर्यंत ढकलली जावू शकतात एव्हढा जोर पाण्याला असतो.


तळपता सूर्य पण ह्या पाण्याचे मोठ्या प्रमाणात बाष्पीभवन करू शकत नाही. कारण पाणी छोट्या छोट्या अशा दगडी बांधकामात वरून बंधिस्त नसले तरी पाण्याचा मोठा असा भाग सलग नसल्याने ही कल्पकता वर्षानुवर्षे ओमान ला हरित पणा देऊन, शेतीत स्वयंपूर्णता आली. डोंगरांमध्ये लांबलचक असे बांधकाम एखाद्या रस्त्या सारखे भासते. ह्या पाण्याला शेतीकरता कुठेही मीटर किंवा पंप लावलेला नाही.
साधारण पणे वर्षभर पाण्याचा स्त्रोत चालूच असतो. येथे मस्कत शहरात डिसेंबर ते मार्च काळात पाऊस पडतो. पाऊस रोज नसतो महिन्यातून दोनदा पडतो. त्यावेळी जे उघडे फलाज आहेत ते भरभरून वाहतात. परंतु खरा स्त्रोत हा जमिनीखाली दडलेला असतो. ह्या मुळ प्रवाहापाशी म्हणजे ‘मदरवेल’ ची खोली ६५ ते २०० फुट असते व तेथून ५० ते ६० मीटर लांब मुख्य फलाज बांधून काढतात. त्यापुढे ते वेगवेगळ्या बांधीव वाटा मार्फत किंवा पाट काढून प्रवाहित केले जातात.

पाण्याचा पुरवठा ९ गॅलन/ प्रती सेकंद असतो.हा पुरवठा निश्चित पणे जलसिंचनासाठी व पाटबंधारे साठी मोलाचे कार्य करतो. घैली ह्या प्रवाहापासून ५५% तर दौडी पासून ४५ % पुरवठा पाण्याचा होतो. त्यातील दौडी हे अतिशय खोल अशा भूस्तारातून शोधून काढलेले प्रवाह आहेत. ह्यांचेच पाणी पिण्यासाठी पुरवठा करण्यासाठी ओमानी कंपन्या आहेत. आम्ही रतीब प्रमाणे ह्यांचे पाणी विकत घेतो. १ लिटर पासून ते २० लिटर च्या गॅलन मध्ये मिळते. आर्थिक समीकरणे हा वेगळा विषय आहे. पण शुद्ध असे पाणी सहज उपलब्ध आहे.

सलग असा सपाट भूप्रदेश खूप कमी आहे. असे असताना दहा किलोमीटर अंतरावर असलेल्या दुसऱ्या शेतीकरता किंवा बागेसाठी हे लोक प्रामाणिकपणे आपल्या शेतीत येणाऱ्या प्रवाहात दगडाचा अडथळा ठेवून गरजे पुरते पाणी घेऊन प्रवाह पुढच्या शेतीसाठी वळवतात. आपल्या परिसरातील फलाज चा भाग स्वच्छ करण्याची जवाबदारी तेथील लोकांची असते. तळातून दगड अतिशय कल्पकतेने एकमेकात बांधल्यामुळे वाळूत पाणी झिरपत नाही. अत्यंत स्वच्छ असे फलाज शेतीकरता पण आहेत. बांधकामाची विशेष अशी अवजारे नसताना कठीण परिस्थितीत हजारो किलोमीटर लांबीचे हे फलाज कौतुकास्पद आहेत.

हाच प्रामाणिकपणा त्यांच्या परंपरेसाठी, देशासाठी हरित मने दाखवतो. भाजी पाला व शेतीकरता स्वयंपूर्ण देश आहे. देशाची गरज भागवण्या करता कमी प्रमाणात उत्पादक गोष्टी बाहेरून स्वीकारल्या जातात.

झुला ताकाचा…..ओमानचा.

मस्कत पासून २४० किमी अंतरावर ‘सहाम (saham ) हे खेडेगाव सदृश असा ग्रामीण भाग आहे. ह्या गावात प्रत्येकाच्या अंगणात झुला तीन काठ्यांच्या आधाराने बांधलेला दिसतो. लहान मुल झोपलेले असावे असे वाटते. घरोघरी ग्रामीण भागातल्या अनेक स्त्रिया आपल्या हाताने पाळणा झुलावताना, तसेच हळुवारपणे गाणे गुणगुणताना पाहण्यास मिळतात. आपण जर त्यांच्या शेजारी बसलो तर लक्षात येते की गाणे हे अंगाई सारखे हळुवारपणे म्हंटले जाते परंतु हळू हळू हाताने झुल्याचा वेग वाढत जातो.

तीन काठ्यांच्या आधाराने बांधलेला हा झुला शेळी ,मेंढी च्या कातडी पासून बनवलेला असतो. हा झुला पारंपारिक असून तो बरेच वर्ष टिकतो. ह्या झुल्यात त्यांनी पाळलेल्या गाईचे दुध त्या पासून बनवलेले दही पाणी घालून ठेवलेले असते. हाताने झुला हलवून ताल सुरात लोणी काढले जाते. हे लोणी काढलेले पातळ ताक मीठ घातलेले असते

ओमानमध्ये ‘अलमराई’ म्हणून अति गाढ म्हणजे लस्सी एव्हढे ताक ‘लबान’ म्हणून प्रत्येक ठिकाणी विकण्यास १०० मिली पासून २ लिटर पर्यंत प्लास्टिक कॅन मध्ये उपलब्ध आहे. इथे अशा ताकाची फार सवय चटकन लागते. ह्या ताकाचे लोणी निघत नाही तसेच ते आंबट पण अजिबात नसते.

आपले घरचे पांढरे लोणी इथे दुर्मिळ आहे. अमूल बटर, तूप मिळते पण थालीपिठावर, गरम भाकरी वरचे लोणी फक्त भारतात आल्यावरच पाहायला मिळते. असे असताना मला फार आनंद झाला. वाळवंटी प्रवासात ताक हे खूपच उपयोगी असते. ह्या ग्रामीण लोकांचा प्रवास पण एका गावातून दुसऱ्या गावापर्यंत पारंपारिक पद्धतीने उंटावरून केला जातो. खारवलेले भाजलेले सुके मासे व ओमान चा खास ग्रामीण भागातला guruz al gamar ( ओमानी ब्रेड) असा सरंजाम प्रवासासाठी असतो.

हा ब्रेड हा ताकाच्या बरोबरीने खाल्ला जातो. जमिनीवर निखारे पसरवून त्यावर अल्युमिनिअम चा पत्रा ठेवतात त्यावर गव्हाच्या पिठाचा गोळा पसरवून ब्रेड चा आकार करून भाजला जातो. हा ब्रेड महिना ते दोन महिने पर्यंत टिकतो. ग्रामीण भागात ही परंपरा अजूनही सांभाळली जाते.

गाई, शेळ्या, मेंढ्या, कुत्रे, उंट, गाढव असे प्राणी इथल्या खेडेगावात पाहून मला जाणवले की, परंपरा ह्या देशाच्या सीमा रेषा पलीकडे पण एकमेकांकडे फार पूर्वीच सरमिसळून गेल्या आहेत. बुरुड काम, लोकरीचे (शेळ्यांची लोकर) काम तसेच तिथली पद्धत, रूढी परंपरा ह्या जवळच्या वाटल्या. घरे कौलारू नसून धाब्याच्या पद्धतीची होती. साधारण पणे राजस्थानशी साधर्म्य दर्शवणारी होती

इथे मॉल मध्ये किंवा छोट्या फूड स्टफ मध्ये मिळते ते ‘लबान’ पण ह्या पातळ ताकाला ‘लबेन’ (laben ) असे म्हंटले जाते. साधारणपणे इथे मार्च पासून कडक उन्हाळा सुरवात होते. ५० ते ६० डीग्री पर्यंत उन्ही पारा चढत जातो. अशा प्रखर वातावरणात हे ताक म्हणजे जगण्यासाठी वरदान ठरते. हे लोणी गाईच्या दुधापासून काढलेले असल्याने पिवळसर झाक असेलेले होते. मीठ घालून हे लोणी साठवून ठेवतात, सध्या फ्रीज प्रत्येकाकडे आहे पण पूर्वी आपल्यासारखे मातीच्या भांड्यात साठवून ठेवले जायचे.

इथल्या खेडेगावाची तरुण पिढी शहरात काम करायला गेली आहे. परंतु प्रत्येक आठवडी सुट्टीला गावात येतात. जेष्ठ स्त्रिया ह्या पुढच्या पिढीला पारंपारिक गोष्टी आवर्जून शिकवतात. ह्या कातडी पिशवीत थंड पाणी घालून स्वच्छ केली जाते. साधारणपणे एक दिवसाआड लोणी काढले जाते. इथे मैद्याच्या पिठात अंडे घालून आपल्या सारखी ‘कोर रोटी’ बनवतात. ही रोटी किंवा ब्रेड हा हाताने तव्यावर पीठ पसरवून केला जातो. गरम तव्यावर पातळ असा हा ब्रेड अनेक महिने टिकतो. हा पण ताक किंवा लोण्या बरोबर खाल्ला जातो.

ओमानी स्त्रिया ह्या परंपरेवर अधिक भर देताना दिसतात पण त्याच बरोबर काळाची गरज ओळखून नवीन ज्ञान पण घेताना दिसतात. मला भावली ती फोटो मधील ‘दहीवा हमद’ ही मधयम वयीन ओमानी स्त्री. आपल्या पुढच्या पिढी करता खेड्यात राहिली, त्यांना परंपरा शिकवत आहे पण त्याच बरोबर गेले २० वर्ष ती शाळेकरता बस ड्रायव्हर म्हणून काम करीत पण आहे. इथे मार्केट मध्ये ओमानचे पारंपारिक लोणी विकत घेण्यासाठी मिळत नाही. पण लबान व लबेन मात्र उपलब्ध आहे. अशी ह्यांची लोणी काढण्यासाठी झुल्याची पद्धत, त्यासाठी म्हंटले जाणारे गाणे हे मुला एव्हढेच परंपरेवर प्रेम असावे हे पटवून देते झाले. नकळतपणे मी कृष्णाच्या रंगपंचमी निमित्त दही, ताक व लोणी ह्या ओमान च्या परंपरेत अजून एक प्रेमाचा रंग शोधू लागले.