कोवळी हिरवाई…
हिरवाई नेहमीच मनास भावते. आधुनिक जगाच्या स्पर्धेत लहान मुलेच काय पण अनेक मोठ्ठी माणसे देखील मोबाईल वर शेतीचा खेळ खेळताना दिसतात. प्रत्येकाला हिरवी जमीन लाभते असे नाही. मनात दडलेली सुप्त अशा हिरवाईची आवड हि अनेक ताण तणावातून मोकळा श्वास घ्यायला शिकवते.
हल्ली प्रत्येक शाळा हि अत्याधुनिक होत असताना दिसते. मुलांच्या हातात TAB संगणक, स्मार्ट बोर्ड, वर्ग सुद्धा वातानुकुलीत, सुट्टीचा डब्बा सुद्धा ब्रेड, पिझ्झा, बर्गर असा पटकन संपणारा, भरमसाठ फी आणि वर्गात मुल सुद्धा मर्यादित असे साधारणपणे चित्र दिसते. एकच गोष्ट अजून फारशी बदलली नाही ती म्हणजे मुलांच्या बसण्याच्या लाकडी खुर्च्या, ह्या सुद्धा बदलून गुबगुबीत खुर्च्या येण्यास वेळ लागणार नाही.
अशा वर्गात निसर्ग असतो स्मार्ट बोर्ड वर, त्यांच्या हातातील TAB वर, खेळाची मैदाने पण सुंदर अशा गवताने आच्छादलेली असतात. मातीचा स्पर्श नाही, धुळीचा अनुभव नाही. कसं वाढणार निकोप मन, सुदृढ शरीर आणि मोकळा स्वभाव. पालक म्हणून आपण अशाच शाळा निवडतो कारण जगाच्या स्पर्धेत मुलांना जगायचे आहे. इतक्या कृत्रिम परिस्थितीत सुद्धा पालक म्हणून आपल्या बाळाचे आयुष्य छान घडवता येते.
मानसिक शास्त्राच्या अभ्यासानुसार मुलांना नेहमी वाढणाऱ्या रोपट्याचे मित्र बनवा. घरात, घराच्या गच्चीवर अगदी घरात सुद्धा त्यांच्यासाठी, त्यांच्याकरता छान छोटी छोटी अशी रोपे लावा. मुल झाडाबरोबर मनाने, डोळ्याने, स्पर्शाने संवाद साधते. जगदीश चंद्र बोस ह्या शास्त्रज्ञानी झाडांना संगीत समजते असा प्रसिद्ध सिद्धांत मांडला आहेच. जशी झाडे प्रतिसाद देतात तशीच मुलांची कोवळी मने निसर्गाच्या समवेत सुखावतात. मोठ्या माणसांना पण हि प्लांट थेरेपी खूप उपयोगी पडते. एक तरी झाड मुलांकडून घरात लावा, मुल त्याची काळजी घेतील. संगणकावर अधिक माहिती मिळवतील. मुलांना छान घडवण्याचा अगदी सहज सोप्पा हा उपाय आहे.
शाळेत शिक्षकांनी निसर्ग क्लब बनवून मुलांनी वाढवलेली झाडे, रोपटी ह्यांचे छानसे प्रदर्शन भरवुन, उत्तम झाडांसाठी स्पर्धा ठेवावी. शाळेच्या जागेत, गच्चीत फळबाग, परसबाग फुलवावी. ह्या उपक्रमाच्या उत्पादनाची विक्री ठेवावी म्हणजे बाजारपेठ, हिशोब आपोआपच विद्यार्थ्यांना समजतील.
एका झाडाचा अभ्यास म्हणजे जवळ जवळ सर्व विषय समावेशक अभ्यास असतो. झाडाचा इतिहास, आवश्यक असणारी भौगोलिक परिस्थिती, झाडांवर होणारे रसायनाचे दुष्परिणाम, जीवशास्त्र म्हणजे झाडाचा इतिहास म्हणजे मुळ स्थान कुठले, जीवशास्त्रीय नाव वैगरे अशा अनेक विषयांचा अभ्यास करणे होय.
Post-Traumatic Stress Disorder (PTSD) म्हणजे अत्यंत क्लेशकारक मानसिक ताण, कधीकधी घरातील वातावरण आणि आर्थिक अडचणी, पालकांच्या अवास्तव अपेक्षा, मुलांच्या भोवतालची त्यांना त्रासदायक वाटणारी अशी परिस्थिती या सर्व गोष्टींमुळे विद्यार्थ्यांच्या मनावर खूप ताण येतो. (PTSD) अशी क्लेशकारक घटना घडण्यापूर्वीची ही काळजी एखादे छोटेसे झाड घेते. झाडांच्या जवळ मुल असल्यास अति ताण त्यांच्या मनावर येत नाही.
घरातील कुंडीतील रोपटे वाढताना त्याची वाढ नोंद करण्यास शिकवावी, त्यांचे आजार, रोग ह्यावर उपाय सांगावेत, घरी आपण नसल्यास झाडांना पाणी कसे पुरवावे ह्या साठी घरगुती ठिबक सिंचन समजावुन सांगावे. परसबाग अभ्यासक्रमाची ओळख मुलांना सुद्धा करून द्यावीत. सेंद्रिय भाजीपाला स्वतः लावल्याने त्याचे आरोग्यदायी महत्व हि मुलांना कळते. झाडाचे पान आपण तोडु शकतो पण परत जसेच्या तसे झाडाला जोडू नाही शकत अशी पर्यावरणपुरक मनोधारणा मुलांची तयार होते.
अगदी छोट्या वयापासून सुरवात करावी, मोठ्या मुलांसाठी जशी जागा उपलब्ध असेल तसे त्यांनाच इंडोअर किंवा आउटडोअर गार्डन प्लान करावयास सांगावा. असे अनेक पर्याय आहेत पुन्हा निसर्गाकडे वळण्याचे आणि ह्या मुळे मन,शरीर आरोग्यपूर्ण राहतेच. भाजीपाला, फळझाडे, फुलझाडे लावण्याचे अनेकविध प्रकार सध्या विकसित झालेले आहेत त्यांचीही ह्या निमित्ताने माहिती घेता येईल.
एकच छोटेसे झाड मुलांच्या विकसित होण्याच्या प्रक्रियेत मदत करते. मुलांना आपल्या घरातील बाग हि नेहमीच आवडत असते. शेती बघण्यासाठी, एक दिवस निसर्गात रमण्यासाठी हल्ली बरेच जण शेती सहल करत असतात. अशा भेटी देऊन मुलांचे ज्ञान वाढते. त्यातलाच एखादे रोपटे घरी लावले तर मुलांच्या मनात ममत्व निर्माण वाढीस लागते. शाळेच्या गृहपाठ साठी किंवा खेळण्यासाठी मुळे सतत इलेक्ट्रोनिक्स किंवा इंटरनेट च्या माध्यमात सतत असतात. कृत्रिम जगापेक्षा अधिक सुंदर बाहेर जग आहे ह्याची जाणीव त्यांना होत नाही. अशा वेळी आलेला ताण हा कमी करण्यासाठी घराच्या झाडांजवळ गेल्यास खूप बरे वाटते.
आपल्या घरातील बाग समजा घराच्या खिडकीत असेल तर तिथे मुलांशी झाडांबद्धल संवाद साधा. मुलांनी कशी उत्तम काळजी घेतली आहे ह्याचे कौतुक आवर्जून करा तसेच मार्गदर्शन हि करा. छंद म्हणून लावलेले छोटेसे रोपटे मुलांनां सकारात्मक बनवते. हसरे बनवते. आनंदी ठेवते. एक तरि छोटे झाड आपल्या मुलांना त्यांचे स्वःताचे म्हणून भेट द्या. मुलांना सांगुन त्यांचा असा एक बागेकरता ग्रुप बनवा. एकमेकांच्या घरी ह्या कारणांसाठी एकत्र येणे मुलांचे होईल. विचारांची देवाणघेवाण होईल. छंद गटात त्यांची अधिक जाणून घेण्याची जिज्ञासा वाढीस लागेल.
छोट्याश्या इवल्याश्या पानातील कोवळी हिरवाई आपल्या मुलांची कोवळी मने निश्चीत्तपणे जपते. आधुनिक जगात हरवत चाललेला मोकळा श्वास मुलांना सहज मिळेल आणि पालक मुलांचा संवाद हि वाढेल. एक तरि झाड मुलांसाठी निश्चित्त लावा.
अनुजा पडसलगीकर.शारजाह More