अवडक चवडक……….दामाडू!!!!!

अवडक चवडक……….दामाडू!!!!!

काहीच अर्थ नाही ह्या शब्दांना, पण खूप जवळचे नाते आहे ह्या शब्दांशी. वय वर्ष १ ते ५ मधील हा खेळ. खेळताना शब्दांची लय पकडली जाते. बडबड गीत कसे असते ना, अगदी तसेच असते. खेळायला मात्र आजी लागते. आज्जीच बोट हळुवार पणे नातवंडाच्या बोटांच्या उंचवट्यावरुन फिरते. जसे बोट फिरते तशी बाळाची नजर आणि मान पण फिरते. हीच असते घरी असलेली पारंपारिक फिजिओथेरपी जी नातवंडांच्या बोटांना आणि डोळ्यांना प्रमाणित व्यायाम घडवून आणते.

अटक मटक चवळी कशी असते चटक!!!!, हा ही खेळ पारंपारिक आहे . सुट्टी लागली आहेच. आपल्या परिसराच्या लहान बाळांचा एखादी आजी असा संस्कार वर्ग घेत असेल. छंद वर्ग म्हणजे सुट्टीचे केलेले शिस्तबद्ध आयोजन असते. कोणी कोणाशी खेळायचे हे त्या वर्गाच्या मावशी सांगतात. मस्त मोकळीक मिळतेच असे नाही. धकाधकीच्या जीवनात, गजबजलेल्या परिसरात मैदाने तर फारच कमी आहेत. इमारतींमध्ये शेजारचे कोणी माहित नसते तर मूल खेळायला पाठवायचे कुठे?? असेच छंद वर्ग ही काळाची गरज आहे. नियम तर हवेच पण तिथे खरोखरी मुलांना काही शिकवले जाते का?? अशी ही काही उत्तम शिबिरे असतात जिथे मूल अत्यंत मोकळ्या वातावरणात रोज काहीना काहीतरी खेळते, नवीन ज्ञान आत्मसात करते, त्याच्यातील कलागुणांची जोपासना होते. संस्कार घडवले जातील. असे मुलांना मिळाले तर मुलंच दर वर्षी सुट्टीची मनापासून वाट पाहतील.

आई वडिलांना मुलांची सुट्टी म्हणजे फार अडचणीची ठरते. दोघे ही नोकरी करत असले तर कुठेतरी दिवसभर मूल पाठवावे लागते.  मग अशा वेळी ते सांभाळले जाते ही बाजू गृहीत असते. शाळांमधून पण अशा छंद वर्गांची गरज पूर्ण केली जाते. आपलं मूल कुठल्या बाबतीत उत्सुक आहे हे मुलांशी बोलून पालकांनी जाणून घेतले पाहिजे म्हणजे छंद वर्गांचा काळ संपल्यावर ती रुची वाढण्यासाठी अधिक मार्गदर्शन देता येईल.

बैठे खेळ हे सुद्धा जराश्या मोठ्या मुलांमध्ये आवडीने खेळले जातात. आधुनिक तंत्रद्यान शिकवणारे पण वर्ग आहेत. मुलांमध्ये उर्जा खूप असते तिला योग्य ते वळण लावले गेले पाहिजे. धुसपूस करणारी मुले, उपद्व्याप करणारी मुले कि कुठेतरी अस्वस्थ असतात. मानिसक अशांतता हे कारण प्रामुख्याने असते. छोटेसे समुपदेशन अशा वेळी योग्य ठरते. पालकांशी बोलून समस्येचे निराकारण केले जाऊ शकते. मुलांची उर्जा ही पालकांना सुट्टीत डोईजड जाते. मग घराच्या जवळ जो छंद वर्ग आहे तो निवडला जातो. बंदिस्त अशा एका खोलीत दाटीवाटीने मूल बसवली जातात. असे वर्ग घेणारे प्रशिक्षित असतातच असे नाही. सुट्टीचा एक घरगुती उद्योग म्हणून पण असतात.

पालकांनी नेहमी जाणीवपूर्वक चौकशी करून असे छंद वर्ग निवडले पाहिजेत. असेच जर विचार न करता मुलांना पाठवत राहिले तर मूल सुट्टीलाही कंटाळेल. जे त्याच्या बौद्धिक, शारीरक आणि मानसिक वाढीला  अडथळा ठरेल. सुट्टी करता दर वेळी लांबच, खूप पैसे खर्च करूनच गेले पाहिजे असे ही नाही. आपल्या घर जवळच्या एखाद्या डोंगरावर, किल्ल्यावर, बागेत कुठेही जाता येते. मुलांना आई वडील बरोबर असणे हे खूप आवडते. वय वर्ष पाच ते आठ मध्ये अग्निशामक, पोलीस, पोस्ट ऑफिस, एखादा उद्योग व्यवसाय पाहायला जाण्यास त्यांना आवडते. मुलांची सुट्टी म्हणजे पालकांनी त्यांच्या सुट्टीचे नियोजन  करावयास हवेच. काही दिवस घरी तर काही वेळ बाहेर असे कागदावर मांडून ठेवावे.

वय वर्ष आठ नंतर इलेक्ट्रिकल चा बेसिक कोर्स, थोडीशी सुतार कामाची माहिती, प्लंबिंग म्हणजे काय हे सर्व काही मित्र मैत्रिणींचा गट तयार करून ह्या कामातील आपल्या घरी नेहमी बोलावणाऱ्या व्यक्तीला बोलावून आपल्या उपस्थितीत मार्गदर्शन मिळवून द्यावे. घरातील काही जवाबदारी सोपवावी. प्रत्येक सुट्टीकरता काहीतरी वेगळे असावे.

पारंपारिक खेळाबरोबर आधुनिक जीवन शैलीत उपयोगी पडणारे खेळांची पण माहिती असावी. खेळ आणि सुट्टी यांचे नाते जपले तर पाहिजेच. सुट्ट्या कधीच सुरु झाल्यात, कंटाळवाण्या वाटण्याच्या आत सुट्टीचे नियोजन करुया आणि मुलांबरोबर ताजेतवाने होऊया…

अनुजा पडसलगीकर

पाटपाणी पार्टी…….

 

पाटपाणी पार्टी…….

शनिवार आणि रविवार म्हणजे हॉटेल्स मध्ये तुडुंब गर्दी असते. वीकएंड साजरा करण्याची आणि घरी आईला आराम देण्यासाठी हाच पर्याय सध्या लोकप्रिय आहे. हॉटेल मधील भर गर्दीत सुद्धा एखाद्या कुटुंबातील बाळ टेबलामधून मस्तपैकी पकडापकडी खेळते त्याचे त्यादिवशीचे मित्र ही तेथे असतात. बाळाची आई अत्यंत कौतुकाने सांगत असते, ही नेक्स्ट जनरेशन म्हणजे, अजिबात बुजत नाही कि गोंधळत नाही. ह्या हॉटेल मध्ये आम्हीं नेहमीच येतो. आमचे आवडते हॉटेल आहे. जणू काही त्याचे घरच आहे. आईचे बोलणे बाळ टक लावून ऐकत असते. पालकांकडून त्याच्या धीटपणाला शाबासकी मिळालेली असते. बाळ्याचा हा धीटपणा बाकीच्यांना अस्वस्थ करतो.

एखादा समारंभ असला कि, बाळ्या पाहिजे तिथे दूडघुस घालत असतो. पालकांचे ठरलेले उत्तर हल्लीच्या मुलांना रागावलेले अजिबात चालत नाही. त्यांच्या बालमनावर परिणाम होतो. पालक सुज्ञ आहेतच. बालमनाच्या संगोपनाचा विचार देखील करतात. संगोपन बरोबर संस्कार असले तर उत्तम व्यक्तिमत्व घडते. हॉटेल मध्ये जाऊच नये का?? जरूर जावे पण हॉटेल मध्ये, समारंभात कसे वागावे ह्याचे संस्कार जाणीवपूर्वक घडवावेत.

Rangoli.jpgपूर्वीच्या काळी पाटपाणी घेणे जेवण्याच्या यज्ञकर्मासाठी आवश्यक बाब होती. नकळत पणे संस्कार रुजवले जात असत. काळाच्या ओघात शिसवी पाटाच्या चार बाजूला असलेल्या पितळी नक्षीफुलाचे लाकडी पाट अदृश्य होत आहेत आणि पाण्यासाठी तांब्या भांडे हे पूजा भांडे म्हणून मर्यादित झाले. वस्तू नष्ट होत नाहीत तर संस्कार विरळ होत चालले आहेत. आजच्या भाषेत सांगायचे झाले तर ही आऊट डेटेड गोष्ट आहे. कोण एवढा खटाटोप करणार?? जेवणाचे ताट हातात घ्यायचे आणि टीव्ही समोर जाऊन बसणे हेच सोप्पे आहे.

रोजच्या रोज जमणार नाही पण वर्षभरात निदान एक दिवस खास मुलांसाठी बाजारातून भाडेतत्वावर का होईना एक दिवसासाठी लाकडी पाट, एखादी मोठी समई, छान मोठी ताटे, तांब्या भांडे आणून पाटपाणी पार्टी घरच्या सर्वांसमवेत करता येणे अवघड नाही. समईच्या प्रकाशात, लाकडी पाटाचे आसन, सुरेखशी रांगोळी, सनईचे सूर, उदबत्तीचा सुवास आणि वदनी कवळ घेता…. म्हणताना  वाढलेला साधा वरण भात सुद्धा मुलांना एक वेगळी अनुभूती देतो. आपल्याही जुन्या रम्य काळाच्या स्मृती जागवणाऱ्या ठरतो.

एखादा शनिवार किंवा रविवार खास मुलांसाठी राखून ठेवावा. आज काय आहे? आपण असे जेवायचे? असे आशचर्यचंबू झालेला आपल्या बाळाचा चेहरा आणि त्या चेहऱ्यावरची उत्सुकता कमालीची सुंदर असते हा अनुभव आपल्या प्रयासाना शाबासकी देतो. आंम्ही आमच्या लहानपणी रोजच असे जेवायचो बघ आज तुझ्यासाठी केले आहे सगळे, तुलाही आवडेल आणि कळेल आंम्ही कसे जेवायचो ते..असा आपला संवाद सुरु होतो  तो आपल्या बाळाच्या स्मृतीपटलावर कोरला जातो. असेच संस्कार रुजतात. तुझे मित्र आले कि आपण पुन्हा करू असे सगळे बघ त्यांना ही मज्जा येईल. बाळ खूप खुश होते आणि संस्कारांची उजळणी होते.

लहान मुलांच्या शाळेमधून असा एखादा इव्हेंट सहज आयोजित करता येऊ शकतो. शाळेतून निवृत्त झालेल्या शिक्षकांनी एकत्र येऊन वर्षभर वेगवेगळ्या शाळांमधून असे कार्यक्रम आयोजित केले तर त्यांचे ही मुलांबरोबर कायम सहसंबध राहतात. जेवणाबरोबर गप्पा गोष्टी ही करता येतात.  भात कसा कालवावा, भातावर लिंबू कसे पिळायचे आणि भातावर हळूच न सांडता वरण कसे वाढून घेणे इत्यादी बाबी एखादी शिक्षिका त्यांच्या बरोबरीने करून दाखवत असेल तर लहानग्या कोवळ्या बोटांच्या पकडीला कृतीने  बळकटी येईल. पाटापासून ते ताटा पर्यंत मर्यादित कोनातून झुकून खाणे हे मुलांच्या पाठीच्या मणक्याला लवचिक बनवण्यास मदत करते. त्यांना त्यांच्या शरीराचा तोल कसा सांभाळावा हे त्यांच्याच हालचालीतून शिकण्यास मिळते.

संस्कार ते शिक्षण ह्या सहज परस्पर भावबाधांच्या दोन एकमेकापूरक अशा प्रमुख बाजू आहेत. विस्मरणात चाललेल्या पद्धती ह्या काळाच्या ओघात आधुनिकतेने कशा पुन्हा पुनर्जीवित करायच्या हे पूर्णपणे पालकांच्या हाती आहे. अशा कार्यक्रमाचे व्हिडीओ शूटिंग केले तर हीच सी.डी. त्या मुलांना कायमस्वरूपी आठवण राहते.

घरापासून शाळा सुरु होते. पालकानी पण कधी पाटपाणी तर कधी पिझ्झा पार्टी आयोजित केली तर मुलांचा संवाद वाढीस लागतो. आपले बाळ आणि आपण ह्या पुरतीच छोट्या वयात ही पार्टी करावी. घरच्या टेबल वर छानशी रंगीत चादर पसरून, छोटीशी मेणबत्ती लावून ,घरचे सदस्य किती आहेत त्या प्रमाणे गुलाबाची फुले आणून ठेवावीत. एकमेकांना फुल देऊन, वाद्य संगीताच्या मधुर अशा सुरावटीत घरीच हॉटेल….हॉटेल मुलांबरोबर खेळता येते.

जेवताना शांत असावे, उगाच सारखे उठायचे नसते, काट्या चमच्यांनी कसे खायचे हे सारे घरीच त्यांच्या नकळत शिकवता येते. मग काही दिवसांनी त्याच्या मित्रमंडळीना बोलवावे आणि हॉटेल…हॉटेल पार्टी करावी. मुलांना ही कल्पना बेहद्द आवडते. शक्यतो घरी कल्पकतेने पदार्थ बनवावे. जमेल तशी पदार्थ वाढताना सजावट करून टेबलवर पदार्थ मांडावेत. मुलांशी मात्र ते मोठ्ठे असल्यासारखे त्यांच्या बरोबर वागावे. बाहेर गेल्यावर ही मुले काही ठिकाणी मोठी असणे खूप आवशयक असते. वय मोठे करायचे नसते  पण शिष्टाचारांची सुरवात त्यांना स्थिर करण्यास मदत करते. आपण घरी अशा पार्टीच्या वेळेस मोठे झाल्यासारखे वागल्याने त्यांना नकळतपणे हॉटेलचे शिष्टाचार कळू लागतात. कधी कधी बेफाट वागणे पण त्यांना धोकादायक होऊ शकते. वय वर्ष दोन ते आठ वर्षापर्यंत  पाटपाणी पार्टी ते पिझ्झा पार्टी असा आनंद मुलांना वयानुसार द्यावा.

घरच्या समारंभात त्यांना त्यांच्या आवडीची एखादी जवाबदारी द्यावी. अगदी चोखपणे मोठ्ठे झाल्याच्या अविर्भावात मुले काम पार पडतात. पाहुण्यांना अत्तर लावणे, किंवा प्रसाद देण्यासाठी एका ठिकाणी बसवावे. मुलांकडे क्रियाशक्ती अफाट असते. लक्ष्य वेधून घेणे हे नैसर्गिक आहे पण गुड बॉय किंवा गुड बेबी असे पाहुण्यांनी केलेले कौतुक त्यांना सर्वांचाच शहाणा बाळ्या बनवण्यास प्रोत्साहित करते. प्रत्येक वेळेला काही निमित्तच असण्याचे कारण नाही. आपले बाळ संस्कार सहित होण्यासाठी असे प्रयास खास करून केले गेले पाहिजेत. विभक्त कुटुंब पद्धती आणि धकाधकीचे जीवन ह्यामध्ये घरापासून ते समाजापर्यंत आपण आपल्या मुलांसमवेत असणे हे खूप गरजेचे आहे. जी गोष्ट पूर्वीच्या काळी लहान मुलांच्या मनावर सहज बिंबवली जात होती ती आज मुलांच्या पालकांची जवाबदारी बनली आहे.

लहान बाळे आली की, घर त्यांच्या गडबडीने आनंदीत होते. मुले निरागस असतात. ती काही सांगून मस्ती करीत नाहीत. मग सांगणार केंव्हा?  कितीही वेळा सांगितले तरी लक्षात थोडेच राहते. संकेत  आणि शिष्टाचार हे मोठ्या माणसाकरता ठीक आहे. मग मुलांना मोकळीक नाही रहात. अगदी बरोबर, लहानच आहेत ती पण आपण तर मोठे असतो.

मी विद्यार्थांच्या पालकांशी संवाद करताना नेहमी हे सांगत असते कि, तुम्ही जेंव्हा वेळ मिळेल तसा मुलां बरोबर व्यतीत करा. त्यांच्या बरोबर कार्टून पहा,  गेम खेळा, बाहेरच्या सामाजिक जाणीवा त्यांच्या बरोबर पुन्हा एकदा अनुभवा, त्यांच्या बरोबर हॉटेल, बँक, भाजी बाजार असे सार्वजनिक खेळ खेळा. आवर्जून आयोजन करा. त्यांच्या समवेत  खास गप्पा करायला बसा. मग बघा त्यांच्या अपेक्षा, गरजा, आनंद,  त्यांची काळजी तेच त्यांच्या भाषेत छानपैकी आपल्याला सांगतात.

‘लहानपण देगा देवा….. माझ्या जीवनातला अमुल्य ठेवा’.

मुलांच्या निमित्ताने पुन्हा एकदा लहानपण अनुभवता येते. मुले निरागसच असतात. द्वाडपणा पण छोट्यानीच करावा. अगदी १०८% मान्य. पण आईबाबा होणे हा निसर्गाने दिलेला सन्मान आहे तो   सुजाण पालक म्हणून स्वीकारलात तर आपलीच ही पिढी सुसंस्कारित,  योग्य जाणीवे सहित, कौटुंबिक आणि सामाजिक भान मनात ठेवून मोठी होईल. निरागसता जपणे आवश्यक आहेच. त्याच बरोबर आपल्या पाल्याचा सर्वांगीण विकास घडेल हे सुद्धा पहाणे आवश्यक आहे.

कच्चा घडा  आपणच पक्का घडवायचा असतो आणि त्यांना आकार देणे आपल्याच हातात असते. पिझ्झा पार्टी ते पाटपाणी अशी काळाची साथसंगत दोन पिढ्यांना जोडणारी ठरते. पोटातून मनाकडे जाणारी ही संवादाची पद्धत समाधान देणारी असते असे म्हणणे योग्य होईल.

अनुजा पडसलगीकर.