Which मोदक you like moooooossst——मोदक ललित

Which one you like moooooossst——I enjoyed both. मोदक बाप्पा करिता, हा प्रसाद हवाच, हं, पण तो कसा आपल्या घराची परंपरा राखणारा, आम्ही फक्त उकडीचेच मोदक करतो, कोकणातले नं आम्ही, आंम्ही तळणीचे करतो, आंम्ही देशावरचे राहणारे…. ह्या गप्पांना स्त्री आणि पुरुष ह्यांच्यात भेदभाव न बाळगता, मोदक कुठला करतो ह्या बद्धल हिरहिरीने बोलणे होते. जशी मध्य रेल्वे आणि पश्चिम रेल्वे ह्यांच्यातील वाद न संपणारा आहे अगदी तसेच.

उकडीवाले म्हणतात, कसे मऊ लुसलुशीत, कळीदार, पांढरे शुभ्र, तुपाच्या धारे बरोबर जिभेवर रेंगाळत, तोंडभर पसरत अगदी रसपूर्ण खावे असे असतात. तळणीवाले म्हणतात, खुसखुशीत तुपात तळलेले, खमंग सारणाचे असतात. मग ह्यात अंतर्गत बाबींचे खूप मुद्दे असतात. मोदकाला कळ्या कित्ती, त्याचा आकार कसा सुटसुटीत, देखणेपणा कसा…..कोणाचा अधिक वैगरे वैगरे..आणि पहावे तर कोकणप्रांत मंडळी आणि देशावरची मंडळी दोन्हीही मोदकांचा भरपूर आस्वाद घेतात.. ह्यालाच म्हणतात, बोलायचे मोदक आणि खाण्याचे मोदक.. दोन्हीही प्रकारचे मोदक खाण्यासाठीच तर बाप्पा आलाय नां!!!!!!!! आत्ता तर चौकलेट मोदक, पनीर मोदक, श्रीखंड मोदक खूप प्रकार बाजारात ठाण मांडून व्यवस्थित विकले जाऊन सर्वांना आनंद देतात,, तरीही हा मोदक प्रकार घरचा तो घराचा आणि जिव्हाळ्याचा.

मोदक तयार होताना घरभर पसरलेला सुगंध हा उकडीचे आणि तळणीचा असा भेदभाव न करता सर्वांना प्रसन्न करतोच. उकड करून चाळणीवर वाफेला गेले की, आपोआप जिभेवर पाणी सुटते, तळताना तुपाचा खमंग सुवास आला की, चटकन नकळत खुसखशीत पारी कधी फोडतो असे होते. हं, सारण पण नारळाचे हवे, नारळ खावला कसा गेला आहे ह्या वर त्याचा रसदार पणा बराचसा अवलंबून असतो. सारण तुपात परतत असताना, त्यात गुळ आणि वेलची पूड पडली की, अह्हा!!!!! गणपती बाप्पा मोरया!!!!!!

काही ठिकाणी मात्र पुरणाचे मोदक असतात, अहो!!!! कुठले का असेना!!!! खाणे आपले काम. कोकण काय किंवा देशावरचे काय भेदभाव मी तरी नाही करू शकत…. तुम्हीही दहा दिवसात जेव्हढे विविध प्रकारचे मोदक अवश्य खाऊन घ्या , मोदकांचा आस्वाद तो मोदकांचा आस्वाद त्यात डावे, उजवे नाहीच बर का!!!!

संपवते माझे मोदक ललित…. लिखाण मात्र आवडले का ते जरूर कळवा. मोदकांच्या गणपती बाप्पा मोरया!!!

हरतालिका पूजन…..मिळूनी साऱ्या जणी.


सखी पार्वतीच्या आगमनाची वाट पहाते. हातावर सुरेख रेखीयेली मेहंदी, झोपाळ्याचे मस्त झोके, साऱ्या मैत्रिणी मिळूनी शिव शंकराची केलेली पत्री पूजा… आई म्हणत असे लेकीनो, पूजा छान करा बर का…. चांगला नवरा मिळतो, मग आमचे साऱ्या जणींचे खुसुखुसू हसणे, नवीन ड्रेस, भावाला मनसोक्त पूजेच्या जागेवर बसून पूजेकरिता , मदती करिता दिलेले हुकुम, त्याचे घरातून वैतागून निघून जाणे, पण हळूच प्रसादासाठी येणे..
प्रसादा साठी केलेल्या खुसखुशीत करंज्या, लाडू सारे कसे फस्त करायचे, आई च्या पदराला हात पुसत खेळण्यासाठी धुम्म ठोकायची, बाहेर पडताना त्या दोघींकडे पटकन डोकावून पहायचे आणि आई च्या हाकेसरशी घरात धपकन येऊन आदळायचे, भावाकडे पाहत, आईच्या दटावणीत नैवैद्य जेवण डोळ्यावर आले की, आईच्या दुलईत जाऊन मस्त पैकी ताणून झोपणे सार सार काही आठवते ह्या दोघींना पहिले की…..
दुसऱ्या दिवशी बाबांची आणि भावाची गणपती पूजेची लगबग असायची, तेंव्हा भाऊ आदल्या दिवशी आम्ही साऱ्या जणींनी त्याला खूप कामाला लावले म्हणून उट्टे काढणार हे ठरलेले असायचे, आदला दिवस सखी पार्वतीचा आमच्या हक्काचा म्हणूनच आठवणींचा माहेरचा झोका सखी पार्वतीचा नेहमी उंच असतो.

आम्ही हरतालिकेची फुले, आणि पत्री गोळा करीत हरतालिकेच्या आदल्या दिवशी अख्ख्या गल्लीत, वाड्यांमधून, गल्ली बोळातून फिरायचो, तेंव्हाही साऱ्या जणी मिळूनी जायचो. कोणी तरी काकू स्वताहून पत्री आणि फुले तोडून घेऊन जा असे म्हणायची, पण न विचारता हरतालिकेची पत्री घेतली तरी कोणी रागवायचे नाही. कारण एकच असावे, प्रत्येक लेकीला चांगला नवरा मिळावा म्हणून प्रत्येक घरातील आई, आजी पत्री नेण्याकडे कानाडोळा करीत असावी. मजा यायची कारण मिळूनी साऱ्या जणी…

नंतर ह्याच सख्या आणि पार्वती लग्नाच्या आधी आम्हांला गौरी हार पूजनाला भेटते आणि हळूच म्हणते, लबाडे, छान केली होतीस, लहानपणी पूजा शिव शंकर मिळावा म्हणून….आणि आम्ही सखीला मागे ठेवून पार्वती प्रमाणे माहेरचा उंबरा ओलांडतो आणि दुसऱ्या घरी गृहप्रवेश करतो…..