TAG…….

धन्यवाद गौरी, ह्या वर्षाचा छान खेळ घेवून आलीस. तू आज खो!! खो!! सारखा खेळ आम्हाला सगळ्यांना खेळायला लावलास. आवडला. अशाच काही कल्पना नवीन वर्षा करिता असतील तर जरूर पास ऑन करा. आमच्या खेळात प्रतिक्रया देवून सहभागी व्हा आपले स्वागत!! आणि हो! हा खेळ सर्व ब्लॉग वर असेल प्रत्येक ठिकाणी आवर्जून भेट द्या.

TAG—–

1.Where is your cell phone?
रिंग देउन पहा.
( मी माझ्याच सेल ला रिंग देते शोधण्याकरिता)

2.Your hair?
हालच हाल चालू आहेत,
( मुलगा केसाच्या तारा उभ्या करतो आणि ह्यांचा सगळाच खर्च कमी झाला आहे)

3.Your mother?
आई,

4.Your father?
माझा अभिमान, आदर्श

5.Your favorite food?
भेल, पाणीपुरी ( ह्यांच्या भाषेत कचरापट्टी ), बटाटे वडा

6.Your dream last night?
पडतच नाहीत.
( बाहेर कुठे खट्ट वाजले कि जाग येते. पण झोप एका सेकंदात पुन्हा ढाराढूर पंढरपूर)

7.Your favorite drink?
ताक

8.Your dream/goal?
हम्म … इंटरेस्टिंग प्रश्न आहे. सद्ध्या तरी मला स्वतःचा व्ययसाय करायचा आहे.

9.What room are you in?
होम ऑफिस

10.Your hobby?
कंटाळा कधी येत नाही.
( जे परिस्थिती प्राप्त आहे त्यात मी रमते)

11.Your fear?
अपरात्री येणारा भारतातील फोन.

12.Where do you want to be in 6 years?
कायम घराबरोबर

13.Where were you last night?
मस्कत सोडून कुठे जाणार??
( भारतात असते तर कदाचित……)

14.Something that you aren’t?
diplomatic माझा परिवार व स्वतः बरोबर

15.Muffins?
अर्थात कुठलेही गोड पदार्थ

16.Wish list item?
शेतातील घर कौलारू.

17.Where did you grow up?
ठाणे

18.Last thing you did?
tag लिहिण्यासाठी घेतला.

19.What are you wearing?
जीन्स आणि कुर्ता.
( गणपती साठी नऊवारी साडी व नथ, दिवाळीत मात्र छानशी साडी)

20.Your TV?
‘हाय वे ऑन युअर प्लेट’ कार्यक्रमा साठी

21.Your pets?
खिडकीत पाणी पिण्यासाठी येणाऱ्या चिमण्या, चिनू मिनू कासवांची जोडी, आई कडचा मार्शल अल्सेशियन.

22.Friends?
डॉ. अनिरुद्ध जोशी.
( आमच्या परिवाराचे बापू.)

23.Your life?
काही खास नाही. रुटीन.

24.Your mood?
नेहमीच आनंदी
( काम व घर ह्यांच्यात योग्य अंतर ठेवू शकते)

25.Missing someone?
भारत

26.Vehicle?
निसान सनी
( कदाचित काही दिवसांनी टोयोटा land cruzer प्राडो)

27.Something you’re not wearing?
दागिने (नसती कटकट)

28.Your favorite store?
लुलू हायपर मार्केट व Carre fore (मस्कत)
भारतात बिग बाजार, सांगली व कोल्हापूर येथील( माझे सासर) आठवड्याचा बाजार. पुणे येथील कर्वे नगर विठ्ठल मंदिर रस्त्यावर शेतातील ताजी भाजी पहाटे येते, खरेदी साठी सही नेहमीच ताजेतवाने असते.

29 Your favorite color?
सगळे रंग आवडतात.

30 When was the last time you laughed?
गौरीचे tagal वाचून.
(महेंद्र्जी माझ्या सारखे गोंधळले म्हणून….हा हा!!! मी एकटीच नाही)

31.Last time you cried?
रडणे आठवत नाही.

32 Your best friend?
सेकंड ऑप्शन असेल तर नवरा, मुलगा

33 One place that you go to over and over?
अर्थात भारत.
( आई कडे व बापूंकडे बांद्र्याला)

34 One person who emails me regularly?
नवऱ्याशिवाय कोणीच नाही.

35. Favorite place to eat?
मस्कत मध्ये अन्नपूर्णा(साउथ इंडिअन हॉटेल)
व रोहन व पंकज ने सांगितलेल्या खादाडीच्या जागा.
———————————————————————————————————–
@ [ मी हेमंत, अखिल, प्रणव w ,चंद्रशेखर( अक्षर धूळ),यांना tag करते. ]

खारीचा वाटा, पर्यावरणाच्या सेतूसाठी………….

सध्या कोपेनहेगन च्या परिषदेवर, जागतिक पर्यावरण व त्यातील राजकारणावर भरपूर लेख येत आहेत. हिमनगांचे वितळणे. समुद्राने सीमारेषा बदलणे, वाहतूक, औद्योगिक करण असे वर्षानु वर्ष चावून चोथा केलेले विषय पुन्हा नवीन घास घेतल्या सारखे चावत राहतात. हा विषय आवाका फार मोठा आहे. वर्तमानपत्राचे एक पान सुद्धा अपुरे पडेल.

घरचे पर्यावरण पण अनेक वेळेला असेच चघळून बोलले गेले आहे. मी काय नवीन लिहिणार, असे असले तरी खारीचा छोटासा सहभाग पण रामाला महत्वाचा होता. आपण नुसते वाचतो, आपल्यावर वेळ आली तर कळवळून लिहितो. पण खरेच आपण आपल्या घरापासून पर्यावरण राखण्यासाठी कृती करतो का? लेखांची मांदियाळी त्यात सुद्द्धा जड जड शब्द वापरून लेख पण समस्येसारखा होतो. जे कोणी पर्यावरण वाचवण्यासाठी अगदी मनापासून कृतीशील आहेत त्यांना माझा सलाम!

आजच्या युगात कोणाला वेळ आहे असे करायला? खरय पहाटे पासून ते मध्य रात्री पर्यंत कामाचे, जवाबदारीचे, संसाराचे, तब्येतीचे, अशी अनेक ओझी आपण वाहत असतो अव्याहतपणे, अविरत करतो कारण दुसरा पर्याय नाही. स्पर्धात्मक युगात राहण्यासाठी धडपड करणे हा निश्चित आयुष्याचा अविभाज्य घटक आहे. पण आठवड्यात, महिन्यात असे छोटेसे काम केले तरी त्याचे समाधान खूप काळ पर्यंत साथ देते. हा अनुभव माझा आहे.

मी सोसायटी किंवा गृह संकुल गृहीत धरून सांगते. आवारात घरची भाजीची देठे, किंवा फळांचे अवशेष, झाडाचा पाचोळा असे एकत्र करून नैसर्गिक खत मिळू शकते. घरात गॅलरीत, गच्चीत कुंडीत असे खत तयार करू शकतो. ज्याचा उपयोग परिसरातील झाडां करिता केला जावू शकतो. पण हे करणार कोण? कचरेवाला कचरा घेवून जातो, किंवा डक्ट मध्ये टाकतो. असा जैविक कचरा वेगळा गोळा करून ठेवायचा हे काम लक्षात राहील का? खरेच अवघड आहे? कचरे वाल्याला शिकवा, तो पण वेगळा चार्ज मागेल. पुन्हा सोसायटीचे बिल वाढेल. समस्या वाटेल पण सर्वांच्या मताने घेतल्यास पर्याय मिळू शकतो. अशक्य नाही, पण जमणार कसे? ह्या विचारात हे सर्व विसरतो. सर्वाचे सहकार्य सुरवातीला उत्साहाचे असते पण सातत्य कसे राहणार?

वर्तमान पेपर पासून पिशव्या बनवणे. स्वत: करिता उपयोग होतो. पण व्यवसाय म्हणून गृहिणी परिसरातील दुकानदारांना विकू शकतात त्या योगे घरात राहून व्यवसाय करता येईल. हे म्हणायला सोप्पे आहे पण पुन्हा करणार कोण? बाजारात उपलब्ध असल्यास विकत घेवू पण असे काही करायला वेळ नाही. ही वस्तुस्थिती मी नाकारत नाही. कोणीतरी वाचून अमलात आणेल हि आशा मला नक्की आहे.

पुण्यात नवीन बांधकामांना रेन हार्वेस्टिंग सक्तीचे केले आहे. नेहमी प्रमाणे ह्या गोष्टी प्रत्यक्षात कार्यान्वित कमी प्रमाणात दिसतात. आपण गच्चीतले पाणी खाली ड्रेनेज ला सोडतो. त्याऐवजी जमिनीत टाकी बांधून साठवले तर, आपल्याला व परिसराला अडचणीच्या वेळेला उपयोगी पडेल. योजना मांडायला गोंडस असतात. पण आपण सर्वांना ह्यात सहभागी करून घेतले तर, गोंडस न राहता कणखर पणे कार्यान्वित निश्चित होतील. गरज आहे ती महिन्यातून एकदा एकत्र येण्याची व सातत्य पणे कार्यान्वित राहण्यासाठी नियोजन करण्याची, तसेच पर्यावरणाचे भान, समाजाची बांधिलकी जपणे. ह्यातुनच मनातला राम आपल्याला मिळतो कारण कृती खारीच्या वाट्याची असते.

आम्ही घरच्या बाल्कनी, गच्चीत कुंड्या मध्ये जैविक खत तयार करतो. भाजी, तांदूळ डाळ साधारण पणे दोनदा धुतो ते पाणीझाडा करिता वापरते. घरी गांडूळ खत पण बरेच जण तयार करतात. घरच्या कुंड्या मध्ये मका लावतो, त्याचा जनावरासाठी ताजा हिरवा पाला संस्थेमार्फत शेतकऱ्याला पाठविला जातो. जुन्या साड्या पासून गोधड्या बनवतो. साड्या, मका बी, खतासाठी लागणारे बेसिक सामान संस्थे तर्फे आणतो, तयार करून देतो.

कुठलीही प्रसिद्धी नाही, गाजावाजा नसतो. पर्यावरणासाठी, शेतकऱ्यासाठी. गरिबासाठी, देशासाठी जो तो आपल्या परीने सेवा देतो. ह्याचे प्रशिक्षण पण दिले जाते. तुमची भक्ती आहे का ह्या बेस वर नक्की नाही तर तुम्हाला स्वता:साठी शिकायचे आहे व त्याच बरोबर समाजाकरिता करण्याची इच्छा आहे. एव्हढेच मनात असावे लागते. मग तुमचा परमेश्वर किंवा श्रद्धा स्थान वेगळे असले तरी शेवटी एकाच जगतनियान्त्र्याकडे ही सेवा जाणार आहे. राम असो किंवा रहीम असो!

बरेच जण अशी सेवा वेगवेगळ्या संस्थे मार्फत करीत असतात. बचत गट, महिला गट, अशा अनेक माध्यमा तर्फे खूप जण सेवा व अर्थार्जन करीत आहेत. मी माझ्या संस्थेशी निगडीत आहे म्हणून माझा अनुभव लिहिला. असे काम मांजरीच्या गळ्यातील घंटा सारख्या अशक्य पठडीतील नाही. व्यवस्थित नियोजन केले तर आपल्या मनातील मदत करू इच्छिणारी खार आनंदाने विहार करू शकेल. मन सुखी तर आयुष्य आनंदी. हाच तर राम आहे जीवनातला. भले खूप मोठ्या प्रमाणावर करणे शक्य नाही पण जिथे कुठे जमेल तिथे फक्त पैशाने नव्हे तर कृतीने पण सहभागी होणे म्हणजे पर्यावरण करिता आपल्या क्षमतेला सक्रीय करणे होय.

घरात बऱ्याच वेळेला अकारण लाईट राहतो म्हणजे बाहेर जाताना बंद करण्याचे विसरतो, आंघोळीचे पाणी बदली भरून वाहत राहते, आवडते म्हणून अकारण भरपूर पाणी अंगावर घेतले जाते. बिल आम्ही भरतो कारण पैशांची क्षमता आमची आहे. असे असले तरी निसर्गा कडून तुम्ही मिळवता. हे नुकसान किंवा ह्याची भरपाई निसर्गाला पैशाच्या बळावर भरून देता येत नाही. रस्त्यावर लाईट दिवसभर चालूच राहतात असले तर????? पाणी पाईप फुटलेला असतो. हे सर्व कोण सांभाळणार ?

मस्कत मध्ये ह्या गोष्टी व्यवस्थित नियोजन बद्ध आहेत. परदेशाची सवय झाली की भारतात राहणे अवघड होते. ही पण माणसे आपल्या सारख्याच रक्त मासाची आहेत. परदेशाची असा शिक्का त्यांच्या भाळी नाही. मग आपण नैसर्गिक साधन संपत्तीने समृद्ध असूनही का मागे पडतो?. घरासाठी, परिसरासाठी, देशासाठी पर्यावरणाचा विचार करून, एखादी जरी गोष्ट केली. काही अंशी तरी आपण खारीच्या पाठीवरील रामाच्या चार बोटांचे प्रेम मिळवू शकू.

इथे समुद्राचे पाणी गोडे करून आम्हाला पुरविले जाते. मी पोस्ट करणार आहे ह्या वेगळ्या विषयासाठी, माहिती गोळा करणे चालू आहे. रत्याच्या दोन्ही बाजूला गच्च हिरवाई ची अनेक झाडे लावली आहेत. नयन रम्य भल्या मोठ्ठ्या निजामशाही बागा आहेत. बाथरूम चे सांडपाणी वेगळे गोळा करून त्यावर शुद्ध होण्याची प्रक्रिया केले जाते. हे पाणी बागांना व झाडांना वापरले जाते. अत्यंत काटेकोर पणे अमलात आणतात.

पावलोपावली भल्या मोठ्या डोंगर रांगा आहेत. सरळ सपाट जमीन कमी आहे. प्रत्येक रस्ता डोंगर कापून तयार केला आहे. डोंगरावर एकही साधे झुडूप पण नाही पण शहरापासून दूर जबल अकतर, सलालासारखे भाग मात्र भारताच्या पर्यावरणाशी मिळते जुळते आहेत. विरुद्ध पर्यावरण असूनही हे राष्ट्र समतोल राखून आहे. निसर्गाच्या संतुलनाची आपण मात्र जाण ठेवत नाही.

पर्यावरणाचा सर्वकष विचार जसा आंतरराष्ट्रीय पातळीवर केला जातो. तसाच घरात चार जणाच्या कुटुंबात पण व्हायला हवा. आपल्या जाणीवांना, जवाबदारीला ओळखले पाहिजे. आपली निष्क्रिय झालेली चेतना उत्फुल्लित करण्यास हवी. चावून चावून चोथा झालेले पर्यावरण विषय आता कृतीशील बनवून काहीतरी आपल्या परीने योगदान करावयासच पाहिजे. आपल्याला परिसरात अशा योजना कुठे राबवल्या जातात, आपण सहभागी होवू शकतो का? अशी माहिती मिळवून काही ठोस उपाय करता येतील का? या बाबत आपण जागरूक होवून एकत्र आलो तर पर्यावरणाचे राजकारण संपुष्टात नक्की येईल.

आपण समाजाचा एक छोटा परंतु महत्वपूर्ण घटक आहोत. एकट्याने जमेल तसे करणे व अनेकांना एकत्र करून भरीव काम करणे. ह्यातच पर्यावरण जपले जाते. छोटी खार पण पिढ्यान पिढ्या रामाची प्रेमाची चार बोटे पाठीवरती घेवून दिमाखदार पणे आपल्याच घराच्या आजूबाजूला दबकत, सावध, पण चाणाक्ष नजरेने फिरते. खार मदत करीत होती. बघता बघता सेतू सीतामाई कडे जाण्या करिता तयार झाला. प्रभू श्रीराम तिचे दैवत होते. वानर तिचे आदर्श झाले व खार मात्र सेतू जोडीत कधीच मनाने सीतामाईचे दर्शन घेवून आली

निसर्ग सांभाळून केलेला सेतू, जो आपल्याला पर्यावरण जोडण्यास सांगत आहे. निसर्गासाठी, आपल्या साठी मनातील खार कृतीशील होणे गरजेचे आहे.

गुरुत्वाकर्षणच्या विरोधात……..

गुरुत्वाकर्षण च्या नियमाप्रमाणे कुठलीही वस्तू उंचावरून किंवा उतारावरून खाली पडते, यात काही वादच नाही. परंतु निसर्गात काही गोष्टी गुरुत्वाकर्षण च्या विरोधात पाहायला मिळतात. ह्यालाच इंग्लिश मध्ये anti garavity म्हणतात. सर्वसाधारण कुठल्याही कार म्हणजे चारचाकी गाडीला नियंत्रण करण्यासाठी ब्रेक, accelerator, गिअर असतात. ज्या योगे आपण गाडी सुलभतेने चालवू शकू.

गाडी चालू करून जर आपण गिअर न्युट्रल ला केला तर गाडी पुढे जात नाही. पायथ्यापासून उंचीवर किंवा चढावरून खाली येत नाही. परंतु anti gravity मुळे गाडी जरी nutral ला असली तरी ती पुढे ओढली जाते. आता जरी चढ असला तरी ती गाडी चढावर आपोआप वर जाते

ओमान मध्ये ‘सलाला’ ह्या ठिकाणी हे बघण्याची संधी मिळाली. मी येथे जे व्हीडीओ दिले आहेत ते यु ट्यूब वरून घेतले आहेत. पण गाडी न्युट्रल असूनही निदान ४० कि मी प्रती तास वेगाने पायथा ते चढ किंवा उलट वरून वेगाने खाली येते. ह्या व्हीडीओत रस्त्याचा चढ लक्षात येत नाही परंतु टेकडी एवढा चढ प्रत्यक्षात आहे. इथे हा व्हीडीओ व्यवस्थित दिसतो का? कळवावेत, गाडीची स्थिती प्रत्यक्ष कशी असते हे मी निवडलेल्या व्हीडीओ त स्पष्ट दिसते.

हे कसे घडते किंवा ह्याचे लॉजिक काय आहे हा पूर्ण पणे वेगळा मुद्दा आहे, मी जावून आले प्रत्यक्ष अनुभव घेतला म्हणून पोस्ट द्वारे आपल्याला तो कळवून आपण हि आनंद घ्यावा.

भारतात लडाख येथे आहे, तसेच अजूनही काही देशात हा point आढळतो. मला तांत्रिक भू गर्भ ज्ञान व त्याचा सखोल अभ्यास नाही. परंतु आवर्जून जावून हा अनुभव घ्यावा असे पर्यटक स्थान आहे.

व्हीडीओ ज्या पर्यटकांचा आहे त्यांचे आभार.

मी नगरसेविका…………

अनुक्षरे म्हणाली, उद्या एक छान आश्चर्यजनक पोस्ट देते, मी ‘अनुक्षरे’ ला माझ्या मैत्रीणीला माझा निरोप कळवला. दोन दिवस तुझ्या पोस्ट मी वाचू शकत नाही. मागची पोस्ट शोधून वाचायला एवढा वेळ नसतो. त्या पेक्षा दोन दिवस थांब, माझी कारणे तर समजावून घे. सध्या काही लग्न मुहूर्त नाहीत तरी पण लगीन घाई आहे हो माझी. कामाची ही भली मोठी यादी आहे. नाहीतर मैत्रीण असूनही मी प्रतिक्रिया का देत नाही? असा समज व्हायला नको. वाचकांना उसंत मिळेल तेंव्हा येतातच. पण मी मुद्दामहून येत नाही हे का ते तुला समजेल. तशी मी दुसऱ्या पोस्ट वर पण नाही हो असणार. वेळ नाही म्हणजे, कुठेच नसेन इतका प्रामाणिकपणा मी जपला आहे.

मी वसईला चालले आहे आणि गोव्याला माझे मिस्टर. दोन्ही ठिकाणे काही हे माहेर व ते सासर असे नाही. आम्ही आहोत समाजसेवक पण म्हणतात नगरसेवक. वर्षभर काही न काही तरी कामे करीत असतोच. शीणवटा जाणवतो. आमचे पण संसार आहेत. ते सांभाळून समाजा करिता नगरसेवक होणे होय. ह्यांचा पक्ष वेगळा, माझा वेगळा आहे. मुद्दामहूनच वेगळा निवडला.

वर्षातून एकदा आमच्या मतांचे महत्व पक्ष श्रेष्ठींना जाणवते. दोन दिवस फार जपतात. दोघानाही वेगवेगळ्या ठिकाणी जाण्यास मिळते. पक्षाच्या खर्चाने, बडदास्त ठेवतात. दोन्ही ठिकाणची माहिती काढून नंतर मुलांना पाठवता येते. दोन पक्ष वेगळे तरी कामे एकाच घरातून करतो आम्ही. वैर, राग, लोभ बाजूला ठेवून जो समाजा करिता काम करतो.

आज मी आता तरी ब्युटी पार्लर मध्ये जाते. कुठे ही खास जायचे असले तर निदान चेहेरा ताजातवाना वाटायला हवा. मी बाहेर दोन दिवसा करिता जात आहे. घरचे सगळे मॅनेज करून निघाले. माझे पतीराज सुद्द्धा बाहेर निघाले. आम्ही एकत्र कुटुंबाच्या सहलीला निघालो नाही. मला दोन मुलगे आहेत. त्यांना माझ्या मैत्रिणीच्या फार्म वर पाठवले. सगळ्यांच्या सोयी लावताना जीव मेटाकुटीला आला.

आता तरी गडबड आहे ती पार्लर ला जाण्याची. कालच कळले आम्हाला वसईला नेणार. आमचा श्रम परिहार होणार. काय काय वसईला मिळते त्याची शोधाशोध ब्लॉग वर केली. हल्ली वर्तमान वृत्त फारसे वाचत नाही. आमच्या सारख्या सेवका बद्धल उगाच ओरड केलेली असते. त्या पेक्षा ब्लॉग चांगले. अद्यावत माहिती मिळते, शिवाय पक्षा कडून मिळालेला संगणक चांगल्या गोष्टी वाचण्या करिता उपयोगी पडतो. काही असे ब्लॉग वर असते, ते वाचायचे नाहीत. क्लिक करणे तरी माझ्या हातात असते. पेपर सारखा धाडकन आपलाच फोटो अंगावर कोसळत नाही.

वसई चा स्पेशल ब्लॉग काही मिळाला नाही. खाणे ते खरेदी बद्धल वाचून हॉटेल वर मागवता येतात. मागे पक्ष कामाकरिता ‘इंदोर’ ला गेले होते. बर झाल मी संगणक प्रशिक्षित आहे. कुठे ही गेले तरी ब्लॉग मुळे अडत नाही. छान खाणे कळले. खुशीत पोटभरून अनेक शुभेश्च्या लेखकाला दिल्या. तशी मी लॅपटोप नेतेच पण आता नाही नेऊ शकत, माझ्या बरोबर निदान बस भर मैत्रिणी आहेत, उगाच त्यांना कळायला नको माझ्या माहितीचा सोर्स. सगळ्या नगरसेवक आहेत.

पण स्त्री स्वभाव उगाच जास्त माहिती नको द्यायला. साऱ्याजणी कशा चकाचक येतील, भारी मेकप, उंची आवड दर्शवणारी साडी, लेदर ला बंदी असली तरी पर्सेस त्याच असतील. माझी हीच धावपळ चालू आहे. खादी साडी, पांढरे केस करून समाज सेवा करणऱ्या आम्ही आंदोलन कर्त्या नव्हेत. ‘तुमची वाहिनी’. असे ममत्व तुम्हाला वाटले तर, तुमच्या समस्या मला सोडविता येतील. मग व्यवस्थित नको का असायला.

आमच्या नगरसेवक मैत्रिणी सारख्या ठरवतो. काय काय करायचे. छे त्या आय टी मधल्या ब्लॉग वर वाचले कसले रटाळ सेमिनार असते. जांभया येतात म्हणे, बिच्चारे! आमचे काही शिक्षण पद्धती,पाणी प्रश्न असे गहन सेमिनार नाही. आम्ही पण सर्वसाधारण गृहिणी आहोत. ज्याचे सरकार ते निर्णय घेतील.

आयते माहेर मिळणार. हाच आनंद मोठा आहे. मी तरी थ्री स्टार हॉटेल ला आहोत पण ‘हे ‘तर गोव्यात पंच तारांकित आस्वाद घेतात. तसा इथे पण स्पा आहे पण त्यापूर्वी बस मध्ये इम्प्रेशन चांगले पाहिजे. हा खर्च माझ्या पाकिटातून नाही करणार. पार्लर वालीचे एक लायसन्स चे काम मी करणार आहे. मग तीच अवघडेल पैसे मागण्यास. असाच लोभ वाढत असतो जन समाजात आमचा.

एकीचा फोन आला नवरा व ती एकाच पक्षाच्या. तर तिची इच्छा आहे की एकच स्पेशल सुट म्हणजे स्पेशल खोली त्यांना मिळावी. कमालच आहे, त्यांचा हनिमून पण पक्ष प्रमुख करतील का? काय सांगू मी कश्या समस्या सोडवते. ‘भुजिंग’ म्हणे खास आहे वसईची खासियत खाण्यासाठी पण ती माहिती पण खाण्यासाठी जन्म असूनही मला ब्लॉग वर भटकंती करून पण मिळाली नाही. ‘अनुजा’ ठाण्याची, तिथून वसई लांब नाही पण ही सुद्धा शिक्षणाच्या अवघड गप्पा करीत बसली. कोणाला विचारले नाही. मग मी ह्यांना विचारले, माहिती मिळवली.

असो पार्लर चे काम आटोपले आता ठेवणीतल्या साड्या, आणि पोहण्याचा सरंजाम पण नेते बरोबर. गुलाबाच्या पाकळ्या पसरवलेला म्हणे तलाव आहे. तरीच स्पेशल सुट हवा आहे. उगाच काही दुसरी भानगड नको निर्माण व्हायला काय करणार आम्ही पण गृहिणी आहोत.

संगीताचा कार्यक्रम पण ठेवला आहे. बरे झाले खूप दिवसात निवांत गाणे ऐकले नव्हते. पाहुणे म्हणून हजेरी असते तेंव्हा पक्षाची जवाबदारी वेगळी असते. रग्गड जेवणे, सगळ्यांशी गप्पा करणे. असेच सोशल असतो आम्ही कारण समाजात मोकळे पणाने फारसे फिरत नाही. समस्या पाहिल्या की वेदना होतात. निवडणूक झाली की आमची स्वता:ची कामे सुरु करतो. म्हणून हा निवांतपणा खाजगी पण, पक्षाचा असतो.

इतके सर्व व्याप आहेत. दोन दिवस मी नेट पासून दूर राहणार आहे. रूम मध्ये सोय आहे. पण शेअर करणाऱ्या नगरसेविका आहेत. त्यांचे कसे चालले आहे. पक्षाच्या मर्जीतले कोण? पक्ष प्रमुखांच्या घरचे काय म्हणतात. झालेच तर एखादीचा नवरा कसा बेताल वागतो त्याला श्रेष्ठी कडून कसे वटणीवर आणायचे सर्व काही पहायचे आहे. कोणाचा परदेश दौरा आहे का? कसा अमलात आणला त्याचे रहस्य जाणणे गरजेचे आहे. अनुजा कधीची मस्कत ला ये म्हणते, पक्षाकडून विमानाचे तिकीट पाहिजे. तो पर्यंत ओमान च्या प्रेक्षणीय स्थळा बद्धल लिही. मी ब्लॉग वर माहिती घेऊन ठेवते. म्हणून तिला सांगितले दोन दिवसा नंतर लिही.

ह्यांना सांगायला पाहिजे, गोवा तसे निर्बंध मुक्त आहे पण तब्येत सांभाळून दोन दिवस सुखात रहा. कारण परमेश्वराला माहिती नाही की, आपण नगर सेवक आहोत म्हणून स्पेशल आपल्यासाठी काही करावे. परमेश्वर असा आहे की, त्याचे काम नगरसेवक करीता अडत नाही.

ता. क.—-आता दिलेली पोस्ट पूर्णपणे काल्पनिक आहे. नगरसेवकांना निवडणुकीत खास करून वेगळे टेवतात. कारण त्यांची मते दुसरा पक्ष मिळवण्याचा प्रयत्न करतो. ह्या बातमी वरून सुचलेली ही पोस्ट आहे. जिवंत अथवा मृत व्यक्तीशी, अथवा कुठल्याही घटनेशी ह्या पोस्ट चा संबंध नाही. वाचकांनी कृपया ही नोंद घ्यावी अशी नम्र विनंती. धन्यवाद.

एक ललित उशीचे…….

परवा अंधारून आले होते, पाऊस पडेल. वर्षभरात इथे ह्या महिन्यात साधारण पणे दोन दिवस पाऊस पडतो. शुक्रवार चा वार म्हणजे सुट्टी, दिवसभर आराम केला. संध्याकाळी मात्र गारवा पाहून घरात बसवेना, ह्यांना खरे तर बरे नव्हते तरी पण स्व:ताच म्हणाले, “चला मस्त हवा आहे भटकायला जावू’’. जवळच समुद्र किनारा आहे. अत्यंत स्वच्छ किनारा, पाणी पण पारदर्शक आहे. तिथेच ओमानी लोक बार्बेक्यू पेटवून चिकन भाजत होते, मला भाजलेल्या भूट्या ची दणकून आठवण आली. थोडेसे पुढे गेलो तर बुचाच्या थोड्या उग्र पण मोहक वासाने मला अजून आनंदित केले. बाजूला डोलणारी नारळाची झाडे मला आपल्या किनाऱ्याची आठवण करून देतात. असे फिरून मॉल मध्ये थोडी रोजची खरेदी करून माघारी आलो.

येणारा पाऊस, त्यावेळी असणारे ढगाळ वातावरण दोन गोष्टींचा अनुभव देते, एकतर मिळेल त्या दिशेला दूरवर भटकायला जाणे किंवा डोंगराचा माथा गाठून, मनाला पंख लावून, ढगांजवळ जावून, हवा पूर्णपणे पंखात भरून, विहार करावासा वाटतो. डोंगरमाथा किंवा समुद्र किनारी जावून, निशब्द बसून, राहणे व निसर्गाने इतका सुंदर दिलेला अनुभव अनुभवणे

पावसाळी वातावरण होते. इथे ड्रेनेज सिस्टीम नाही, म्हणजे रस्त्याच्या बाजूला गटारे नाहीत की ज्यामुळे पाणी वाहून जाईल. दोन दिवसाचा पाऊस पण आख्खे मस्कत तळ्यासारखे करतो. मोठ्या मोठ्या वादी म्हणजे नाले आहेत की, जे डोंगरावरचे पाणी वाहून आणतात. एकाही डोंगरावर झुडूप सुद्धा नाही. बाहेर पूर येतो. म्हणून आज मुक्काम घरीच केला. आजचा दिवस लोळण्याचा असे मनोमन ठरवून टाकले. वातावरण निर्मिती पण पोषक होती. पोस्ट काय लिहायची काहीही विचार सुद्द्धा नव्हता. टीव्ही वर पण आज मन रमत नव्हते.

दुसरा अनुभव म्हणजे मस्त लोळणे. हातात पुस्तक, बाजूला गरमागरम चहा, खेकडा भजी असेल तर ‘सोने पे सुहागा’. गळ्या पर्यंत आपलेच पांघरुण व आपलीच उशी. भटकंती करून झाली की, पावसाच्या दुसऱ्या दिवशी असे भाग्य मिळणे, हीच पुण्याईची जाणीव कदाचित असेल.

दुपारी मस्त पैकी गरमागरम जेवून डोळे बऱ्यापैकी पेंगत होते. आज माझ्या पुण्याईचा कडेलोट मी करणार होते. मला चहा घेतला की छान झोप येते. ही माझी आवड घरी अगम्य आहे. गुबगुबीत गादी, गळ्यापर्यंत पांघरूण असा सरंजाम मला दुपारी पण लागतो. डुलकी असो नाहीतर वामकुक्षी म्हणा पण मला सरंजाम सहित राणी सारखे निद्रा देवीची आराधना करायला आवडते. कसे घरीच रॉयल वाटते. पण दगा!!!!!!! झाला. एका साथीदाराने साथ सोडली. माझेच दुर्लक्ष झाले म्हणा, सरंजाम हवा पण राणी सारखे लक्ष ठेवता येत नाहीना. ह्या कुशीवरून त्या कुशी वर वळते. पण डोळे काही बंद होईना? काहीतरी गोंधळ नक्की झाला.

चाचपडून अंदाज घेतला तर माझ्या डोक्याखाली आधार म्हणून घेतलेली उशी बदलली गेली होती. काल उशीचा अभ्रा मी धुवून भलत्या उशीलाच घातला. आपलीच उशी आपल्याला कळते. आमच्याकडे तर उशी बदलली गेली तर वादळे निर्माण होतात. म्हणतात न, ‘रात्र चांगली तर दिवस चांगला’. हे गणित दिवसा पण आहे. माझ्या माहेरी तर माझी आई जागा बदलली तर झोपतच नाही. उशी बदलणे किंवा कुठलीही उशी चालणे ह्याला फार मोठे मन लागते. मी लग्न ठरले तेंव्हा आईला विचारले होते माहेरची साडी जशी अलका कुबल ची असते तशी मी माझी उशी नेवू का? ह्याला आंधळे प्रेम म्हणतात का ते माहित नाही पण ज्यांना माझ्या सारखी खोड आहे त्यांची उशी बदलली की अस्वस्थ वाटते. मनाचा आधार म्हणा किंवा डोक्याचा आधार म्हणा ही उशी फार जवळची असते.

ह्याच उशीच्या कुशीत आईने तान्हे असताना शेवरीच्या कापसाची किंवा म्हातारीच्या कापसाची छोटीशी उशी करून त्यात निजवले असते. मोहरी वापरून तान्ह्या मस्तकाला गोल आकार प्राप्त व्हावा म्हणून आजी नातवंड करिता खास उशी करीत असे. उशीत लहानपणी आईचा ओरडा किंवा बाबांचा मार खाल्ला की तिच्यात तोंड खुपसून भोकाड नाही तर मुसमुसत रडायचे, तरुणाईत हिचा आधार घेत हिरवाई अनुभवायची, प्रेमाच्या छुप्या गोष्टी उशीखालीच दडवून झोपायचे. कितीतरी कल्पना वास्तवात ह्या उशीच्या आधाराने पहिल्या. उशांची मारामारी आता पण आवडेल करायला. भरभर कापूस उडाला की, परी राज्यात गेल्या सारखे वाटते.

उशी बद्धलचे इतके ममत्व ट्रेन च्या प्रवासात मात्र वैताग देते. बर्थ नामक प्रकार व हवेने फुगणारी उशी बरीच स्टेशने जागीच ठेवते. विमानाचा रात्रीचा प्रवास म्हणजे ट्रेन चा भाऊच. जे लोक वारंवार प्रवास करतात त्यांच्या सवई ह्या जागतीकरण सारख्या उद्दात झालेल्या असतात. तो विषय वेगळाच आहे. पण घरी आल्यावर मात्र आपली उशी सगळे ताण विसरायला मदत करते. अशी ही आमच्या लहानपणी पट्ट्या पट्ट्यांच्या कापडाची खोळ उशीला असायची. हे पट्ट्यांचे कापड मोठ्या अर्ध्या विजारीला पण असायचे फक्त त्या काळी थ्री फोर्थ असे गोंडस नाव नव्हते.

आई बाबां च्या उशीवर डोके टेकले की, आश्वासक वाटायचे. बाळाच्या उशी पण लाडोबा असते. अभ्रा बदलला तरी आतली उशी आपली आहे का नाही ते तिच्यावर डोके टेकले की कळते. कापसाची उशी ते फोम ची उशी असा आलेख आहे. प्रत्येकाला आपल्या आवडी प्रमाणे, गरजे प्रमाणे स्वातंत्र्य आहे. एकच उशी का उशांची चळत असे ही व्यक्ती प्रमाणे वैव्हीध्य आहे.

ह्या सगळ्या माझ्या उशीच्या शोधा, शोधीत मला मात्र ‘उशी’ पोस्ट सापडली, त्यावर एक चारोळी पण मी लगेच लिहिली. ती अशी………

‘उशीने तरुणाईत सुखाला, जागा दिली,
दुखः झाले तेंव्हा, अश्रुना वाट दाखवली,
मी मेलो तेंव्हा रडली सारी आप्त मंडळी,
‘उशीने’ मात्र नेहमीची, जागा सोडली’

अशी ही उशी की मनुष्य जिवंत असेपर्यंत साथ देते मात्र नंतर जमिनीवरच डोके ठेवले जाते. ज्यांना उशीच लागत नाही त्यांची गोष्ट निराळी पण सर्वसाधारण पणे उशी हा अविभाज्य घटक आहे शांत निद्रेच्या आधाराचा.

कष्टकरी हाताचा आधार घेतात, दगडाचा आधार पण घेतात पण कसे सुखाने झोपतात. आपण मात्र गुबगुबीत गादीत लोळत सुखाचे ललित मांडत राहतो……

शंखातले घर..

शंखातले हे सचिन तेंडूलकर चे सुंदर घर इमेल ने मला मिळाले…मला खूप आवडले. तुम्हा सर्वांसाठी पाठवीत आहे. हे खरेच आहे का?














सहावी जाणीव(Sixth Sense)

आमच्याकडे व्हरपूल ची उपकरणे आहेत. तुम्ही पण घ्या. काजोल नाही का जाहिरातीत सारखी सांगते की, तिच्या फ्रीज ला कळते पटकन बर्फ तयार करावा. कारण ह्या उपकरणात sixth sense technology’ आहे. असे मला माझी शेजारीण बरेच दिवस सांगत होती. माणसातल्या मनातले तर कळते पण, मशीन ना सुद्धा समजते. काल पासून तर एन. डी. टी. व्ही. वर मागच्या जन्मी चे रहस्य सांगणारा नवीन रिअलिटी शो सुरु झाला. खरे खोटे त्यांनाच माहिती. ८४ लक्ष योनी नंतर मनुष्य जन्म मिळतो असे पुराणातून ठामपणे सांगितले आहे. आज आपण सत्य मानणे हे अनेक बाबी तपासून, तावून सुलाखून आपली मते तयार करतो.

संमोहन शास्त्र किती प्रगत आहे काहीच कल्पना नाही.. शक्य आहे हे सर्व? अनेक प्रश्न माझा मुलगा मला विचारणार याची खात्री होती. तत्पूर्वी मी नेटची मदत घेण्याचे ठरवले, सहावी संवेदना असे सर्च ला दिले तर एक व्हीडीओ मिळाला.

‘प्रणव मिस्त्री’ ह्यांनी ‘TED sixth sense technology’ म्हणून मनुष्याच्या मनातले काम व आधुनिक तंत्रज्ञान ह्यांचा मेळ घालून एक डीव्हायसीस तयार केले आहे. मी काही जास्त लिहित नाही कारण मीच गोंधळून गेले आहे. माझा हा गोंधळ कमी व्हावा म्हणून मी सगळ्यांशी हा व्हीडीओ शेअर करते कारण अजिंक्य ला योग्य ते समजावून सांगण्यासाठी मला अधिक जाणून घेणे योग्य वाटते.

हे पाहून विचार करीत राहिले की मागच्या जन्माचे रहस्य कळण्याकरिता पण कुठले उपकरण शरीराला लावले आहे का? शास्त्र, विज्ञानाचा शोध म्हणून स्वीकारायचे का मूर्ख बनवतात म्हणून गप्प बसायचे? म्हणून शेवटी कमीतकमी शब्दांची ही पोस्ट लिहिली. संगणकाच्या महाजालावर माहिती खूपच आहे. शेवटी प्रश्न मनात कायम राहिला खरेच वास्तव जगात हे शक्य आहे, असेल तर परिणाम काय होणार?

पूर्वी संमोहित करून शस्त्रक्रिया केलेले दाखले आहेत. मला वेळ जाणून घ्यायची आहे मनगटावर घड्याळ नाही. तरी बोटाला काही पट्टी गुंडाळून, गळ्यात काही उपकरण ठेवून मनगटावर घड्याळ उमटवता येईल? जे मला वेळ दाखवेल. व्हीडीओ तर दाखवले आहे. असे असेल तर बोर्डाची गणिते हात ते हात अशी उमटवून हातोहात परीक्षा केंद्रात सहज विद्यार्थ्या पर्यंत पाठवता येतील. छे माझे मन फार भरकटत चालले……काय सांगायचे पुढच्या पिढीला? रेड्याच्या मुखातून वेद उमटले ते………. का मनातले पण मशीन ने शोधून काढता येते किंवा मागचा जन्म कळतो हे!!!!!!!

आताच डॉ. धनसिंग चौधरी, अंधश्रद्धा निर्मुलन चळवळीचे शाम मानव ह्यांनी पुनर्जन्मात मनुष्याला नेणे हे थोतांड म्हणून सांगितले, व ह्याचा परामर्श करून खोटे सिद्ध करून दाखवू असे आव्हान दिले आहे. माझे ही सपष्ट मत आहे की हे थोतांड आहे. चला निदान एकाचा तरी निकाल लागला.

टेड तंत्रद्यानाचे हा एक व्हीडीओ अजून माझी उत्सुकता वाढवू लागला आहे.

कासवी ची दृष्टी………..

कासवी ची दृष्टी तिच्या पिल्लांवर असते. ती लांबूनच नजरेने पिल्लांचा सांभाळ करते. पुराणात, कथांमध्ये अनेक वेळेला हे विधान पाहायला मिळते. हल्ली डिसकव्हरी चॅनेलवर खूप वेळेला कासवांची फिल्म पाहायला मिळते. पण प्रत्यक्षात पाहणे म्हणजे काही अप्रूप च आहे. इथे ओमान मध्ये ‘सूर’ म्हणून मस्कत पासून 300 कि. मी. अंतरावर ओमान चा किनारा आहे. तिथे ‘ रासल- हद’ म्हणून किनारा कासवांसाठी प्रसिद्ध आहे. दर वर्षी साधारण तीस हजार पर्यंत संख्या त्यांच्या येण्याची आहे. हा किनारा हा साध्या किनाऱ्या पेक्षा खूपच वेगळा आहे. आम्ही पण प्रत्यक्ष पाहण्यासाठी गेलो.

जून ते सप्टेंबर. ह्या कालावधीत फार मोठ्या प्रमाणात पाहायला मिळतात. साधारणपणे पाच वेळा अंडी घालण्यासाठी किनाऱ्यावर येतात. ऑक्टोबर नंतर संख्या तशी कमी होते. पण दिसतात. उबदार व फार वाळूचे थर असतात म्हणजे साध्या किनाऱ्याच्या पेक्षा खूप वाळू असते. मध्य रात्री नंतर जावे लागते. गडद अंधार, निशब्द किनारा, वाळूत पाय ठेवल्याबरोबर गुढग्या पर्यंत पाय खोल खोल रुतत जातो. सारखे वाटते पाया खाली हलते, बहुतेक कासवाचे पिल्लू तर नाही. धाक धुक होत जावे लागते. पण प्रत्यक्षात अंडी घालण्याची जागा जरा दूर असते. हे परत येताना कळते.

अत्यंत सुरक्षा व्यवस्था आहे. तुम्हाला बरोबर मोबाईल चा रिंगटोन सुद्धा वाजवण्याची परवानगी नाही. काही फॉर्म भरून जावे लागते. नियमांची काटेकोर बजावणी होते. किनारा पूर्णपणे ओमानी बघतात. तुम्हाला एक ओमानी माणूस सोबत दिला जातो. बोलणे पण करायचे नाही. कॅमेरा चा फ़्लॅश अजिबात चालत नाही. अंधारात पाय खोल खोल रुतवत जावे लागते. इथे ही मी लेकाचा हात घट्ट पणे पकडून ठेवला होता.

मागून ओरडावेसे वाटत होते. नको हा अंधार, जावू या परत. आंधळी कोशिंबीर होती. पण कडक नियमांच्या धास्ती मुळे आवाज फुटत नव्हता. आपले माणूस कळत नव्हते. साधारण समुद्राच्या दिशेने चाललो होतो. समोर येणारा वाळूचा ढीग आठ वर्षाच्या मुलाच्या उंचीचा होता. एक टेकाड स्व:ताला बुडवत पार केले की दुसरे. धृतराष्ट्राची गांधारी पट्टी असूनही बावचळली नसेल.

येथे प्रामुख्याने हिरव्या पाठीचे कासव लाल समुद्र व भारतीय उपसागरातून अंडी घालण्यासाठी येतात. साधारणपणे पूर्ण वाढीची कासवी पस्तीस वर्षाची होते तेंव्हा अंडी घालण्यासाठी सक्षम होते. पूर्ण वाढ ही १.२ मीटर लांब व २०० किलो वजनाची असते. एका वेळी साधारण १०० ते २०० अंडी असतात. स्व:ताच्या पायांनी खोल खड्डा गोल गोल चक्राकार आकारात वाळू उडवत तयार करते, अंडी घालते. पुन्हा ती प्रचंड ढिगारा सदृश वाळू एकसारखी करायची. अंडी पूर्णपणे झाकून ठेवायची. किती हे कष्ट! मी उगाचच मनात चुकचुकत होते. प्रसव वेदना तिच्या डोळ्यातून साधारण पणे द्रव्या सारख्या वाहत होत्या. पप्पा कासव कुठे असतो कोणास ठावूक? त्यापेक्षा पक्षी बरे, दोघे मिळून तरी घरटे तयार करतात.

दरवर्षी कासवी अंडी घालण्याकरिता येतेच असे नाही. पंचावन ते साठ दिवस आधी अंडी घालतात. पिल्लू अंड्यातून बाहेर आले की ७२ तासाच्या आत समुद्रात पाण्यात जाते. घारी, समुद्र पक्षी, पाण्यातले मोठे मासे खूपशी पिल्ले खावून टाकतात. आणि विशेष बाब म्हणजे ती प्रत्येक वेळेला तिचा जन्म ज्या किनाऱ्यावर झाला तिथेच ती अंडी घालते. असे ही माहेरपण!!

बरेच जण उपस्थित असतात. त्यांना फरक पडतो तो आवाज व उजेड ह्यामुळे, नाहीतर परत माघारी जातात. व अंडी उजेडामुळे खराब होतात. पिल्लू तयार होवू शकत नाही. म्हणून मध्य रात्री उबदार वाळूत, पण थंड वातावरणात त्यांचा मौसम असतो. त्यामुळे आधीच परदेशी कायदे कडक त्यात कासवांचा किनारा तर अहोरात्र पहाऱ्यात असतो. मोकाट रानटी कुत्रे, माणसे ह्याकरिता राखणदारी असते. अंडी घालून झाली की त्याभोवती एक सूचना फलक लावून जागा संरक्षित करतात. परवानगी शिवाय दिवसा पण जाता येत नाही. किनाऱ्यावर पोलीस ठाणे आहे.

असे असूनही खूप जण नियमांचा भंग करतात. वाळूत नुकतीच जन्मलेली पिल्ले हातात धरून त्यांना संसर्गजन्य बनवतात. त्यांचा आयुष्याचा काळ साधारण पाचशे वर्ष मानला तरी जन्मल्यावर फार थोडी पिल्ल एव्हढी मोठी होत असतील. इथे पोलीस कारवाई पण अतिशय कडक असते. कासवांची अंडी बरेच जण खाण्यासाठी वापरतात. म्हणूनच ह्या विशेष जाती करिता कायदे आहेत.

तुम्हाला बऱ्याच एन. जी. ओ. कासवांची घरटी म्हणजे अंडी घालण्याची जागा, दत्तक म्हणून देतात. ठराविक रक्कम तुम्ही द्यायची त्याचा उपयोग ह्यांच्या संवर्धनासाठी केला जातो. अंड्यातून पिल्ले बाहेर आली की तुमच्या घरट्याची आठवण म्हणून तुम्हाला त्यांचा विशेष फोटो पाठवला जातो. घरट्याचे संरक्षण केले जाते. कासवांच्या क्लब चे मेंबर बनविले जाते. अर्थात पाण्यात पिल्ले गेल्यावर त्यांच्या नशिबावर सोडून द्यावे लागते. पण तो पर्यंत तरी तुम्ही घरी राहूनही पिल्लांवर कासवी सारखी दृष्टी ठेवू शकता. असे ही पालकत्व स्वीकारता येते.

इथे घरी पाळण्या करिता सहज बाळ कासवे मिळतात. घरची कासवे टोलेजंग होत नाहीत. पाण्यातली कासवे मी ही घरी आणली आहेत. चार वर्षांची झाली. आणली तेंव्हा रुपयाच्या नाण्याच्या आकाराची होती, आता आपला तळवा पूर्णपणे रुंदावला तर जेव्हढा होईल त्या आकाराची झालीत. खूप शहाणी, खूपच तरतरीत आहेत. आमच्या घरचे लहानथोर जे येतात ते त्यांच्यातच रमतात. त्यांच्याबद्धल एक स्वतंत्र पोस्ट होईल. आम्ही त्यांच्या जोडीला ‘चिनू मिनू’ हाक देतो तेंव्हा नावाप्रमाणे प्रतिसाद देतात. संध्याकाळी जेंव्हा माझे मिस्टर घराच्या जवळ येतात तेंव्हा ते धडधड आवाज करीत मला सांगतात. असे खूप बोलके सवांद त्यांच्यात व आमच्यात होत असतात. ह्याचा अर्थ त्यांची संवेदना खूप सक्षम असते.

कासावीची दृष्टी किंवा ती आपल्या नजरेने पिल्लांवर लक्ष ठेवते म्हणे. असे कथांमधून वाचावयास मिळते. म्हणजे नेमके कसे? हा उलगडा मला अजून झाला नाही. अंडी घालून समुद्रात जाते. तिथे पिल्लांवर कसे काय लक्ष ठेवते हे मी अजून पहिले नाही. असो पुरणाची वांगी पुराणातच! कथा ह्या रूपक असतात. पण मी माझ्या नजरेने निसर्गावर सोपवलेले जीवन पहिले.

अशीच वाळूत अंडी घालायला मगर येते, पण पिल्ले आपल्या तोंडात धरून घेवून जाते. कासवांची पिल्ले जन्मली की स्व:ताच समुद्रात आयुष्याच्या ओढीने चालू पडतात. त्यांचे आईबाबा भेटतात कि नाही, ह्याचे रहस्य समुद्राच्या पाण्यातच दडले आहे. त्यातल्या कन्या आई होण्यासाठी तिथेच परत येतील. कासवीने केलेल्या घरटे ते समुद्र ह्या मार्गावरूनच पिल्ल समुद्राकडे एकमेकांना चिटकून चालत राहतात.

डोळ्यासमोरून अंधारात पाहिलेली कासवीची दृष्टी मला निसर्गाकडे पाहण्याचा उत्कट अनुभव देती झाली.

कशासाठी एव्हढे……………..हे तर प्रेमासाठी.

”आई, आत्या, काकू, मावशी…………आम्ही भारतात येतोय”

सुट्टी अजूनही मस्तच असते. आम्ही दरवर्षी जून महिन्यात भारतात जातो. हा निरोप फोन वर देवून झाला की इकडे व तिकडे दोन्ही ठिकाणी लगीनघाई सुरु होते. साधारणपणे मे महिन्यात परीक्षांचे व ह्यांच्या सुट्टीचे नियोजन करावे लागते. मग लगबग सुरु होते प्रथम खरेदीची, दरवर्षी ही भलीमोठ्ठी यादी होते.

वयस्कर व्यक्तींची नावे निदान दहा तरी जण जवळचे असतात. घरचे तीन ते चार, आमचे काका, आत्या, मावशी हे मागच्या पिढीचे जेष्ठ नागरिक, त्यात शेजारचे आजी, आजोबा, मित्र मैत्रिणींचे आईवडील असे मिळून साधारण वीस पर्यंत होतात. त्यांच्या वयानुसार सुकामेवा, गरम कपडे, बी. पी. मोजायचे यंत्र वैगरे. आई व सासूबाई ह्यात एखाद दोन व्यक्ती आवर्जून सांगतात. कोणाची पंचाहत्तरावी तर कोणाची साठी झाली असते. मग त्या नुसार जरा वेगळा विचार करून खास खरेदी करायची. जेष्ठ नातेवाईक पासून सुरवात होते.

सुकामेवा पण मऊ असा बेदाणे, काजू, अंजीर घ्यायचा उगाच जर्दाळू, बदाम असे कडक प्रकार टाळायचे. गरम कपडे पण हलके व उबदार हवेत. इकडे खर तर उन्हाळा खूप पारा पन्नास अंश पर्यंत जातो, तशीच थंडी पण बोचरी कारण मूळ वाळवंटी देश आहे. अनेक देशातील वस्तू मिळतात. त्यामुळे अमेरिका ते आफ्रिका सर्व आहेच. चीन तर कुठे ही असतोच. असो ह्या परदेशी वस्तूंचे आकर्षण अजूनही आहे. त्यामुळे आजी आजोबांची खरेदी प्रथम करणे.

नंतर खरेदी करणे मधली पिढी सर्वांची खरेदी एकाच पद्धतीची करायची. ड्रेस कापड, पर्सेस, परफ्युम, मेकपचे सामान सर्व काही नामवंत देशांचे.मैत्रिणी, मित्र, त्यांचा परिवार. शेजारच्या सख्या, सोसायटीचे काही खास लोक की जे आमच्या घरावर लक्ष ठेवतात. दीर, भाऊ, पुतण्या, भाचे,त्यांचे काही जवळचे आहेत त्यांच्या करिता पण घ्या असा फोन भारतातून हमखास येतो. ह्या वयोगटाची यादी खूप विस्तारत जाते.

मोबाईल ते लॅपटॉप, घड्याळे, कॅमेरा काय काय घ्यायचे? भारतात घेणे चांगले कारण नंतर त्याची सर्विस मिळते. शक्य तिथे पटवून सांगतो. तरीही यादी असतेच. आता तर विमानतळावर खूप त्रास होतो. स्मगलर आरामात बाहेर पडत असतील, पण सामान्य वर्ग चेहेरे पट्टी असूनही अडवणूक होते.त्यात आता तापाचे फॉर्म भरावे लागतात. खूप वेळ जातो. वैताग येतो. आम्ही मुंबईत अजूनही टपरींवर पण खातो. कसे ठणठ्णीत आहोत. पण ती वेळ नसते हे पटवून देण्याची मुकाट्यानी तासंतास वेळ जातो.

नंतर नंबर असतो बच्चे मंडळींचा. इथे नुकताच जन्म घेतलेला सर्वात छोटा नातेवाईक ते कॉलेज ला जाणारे युवक इतका मोठा विस्तार असतो. आता ह्यांच्या सर्व गोष्टी भारतात छानच मिळतात पण आम्ही परदेशावून येत असल्याने घरा समोरच्या दुकानातून विकत घेणे विचार सुद्धा करता येत नाही. मस्कत वरून येतात आम्ही म्हटलेच, घरात फॉरेन च्या वस्तू येतील. आम्ही इकडूनच घेवून जातो. अपेक्षा भंग करणे जीवावर येते. चॉकलेट ते जर्किन.परफ्युम, मनगटा वरची घड्याळे, इत्यादी वयाचा विचार करून घेतो.

लग्न होवून बरीचशी भावंडे आईबाबा झालेली असतात. मग अशा वेळी त्यांच्या धर्मपत्नी किंवा नवीन पती व त्यांचे छोटेसे बाळ ह्या बातम्या आधीच दोन्ही आईनी कानावर घातलेल्या असतात. मग वेगळे पॅकेज करावे लागते. कारण काका, मावशी, आत्या, अशा नवीन नात्यांनी ओळखले जाणार असतो. कधी कधी पूर्ण घराकरिता केशर डबी ते कधी सोन्याची पण मागणी होते. घरचे नातेवाईकात लग्न होणार असते मग इकडचे सोने म्हणजे चकाचक. इथे या व आपल्या पसंतीने घ्या. अशी नम्र विनंती करावी लागते.

दारातला गुजराथी दुकानदार तर अंगावरच्या वस्तू, रोख पैसे देतो पण मला देवून जा. असा वाणी हिशोब मांडत असतो. पूर्वीची कामवाली, गेटमन जाता येता अकारण सलाम ठोकतो त्याच्या हातावर पैसे ठेवावे लागतात कारण आम्ही दिवाळीत नसतो व अधिक त्याच्या मुलांकरिता कॅड्बरी परदेशाची ठेवावी लागते.पूर्वीचा दुधवाला, कचरेवाला, अगदी भाजीवाला सुद्धाघराची खिडकी उघडी दिसली म्हणून विचारपूस करायला आवर्जून येतो. त्याच्या नातवंडाची माहिती देतो. एक छोटे का होईना चॉकलेट द्यावे लागते.

एवढा उपद्व्याप कोणी सांगितला? नाही घ्यायचे असे दरवर्षी ठरवतो. पण मायेचे पाश इतके असतात की त्रास झाला तरी आनंदच मिळतो. दोन्ही आई सारख्या सांगतात तुमच्या भल्या मोठ्ठ्या बॅगा भरून काहीही आणू नका. तुम्ही दिसता, भेटता हेच खूप आहे. पण महिनाभर पायाला चक्र लागलेली असतात. प्रत्येक नातेवाईक भेटणे शक्य होत नाही.एकतर पाऊस आम्हाला दमवतो. तरी पण काही घरे करावीच लागतात.

वयस्कर मंडळी आम्ही पुढच्या वर्षी आहोत का नाही असे म्हणून गहिवर देतात. नवीन लग्न झालेल्या भावंडाना खूप उत्साह असतो. एखादी भाची, पुतणी, बहिण शिक्षणाला अमेरिकेत जाणार असते. तिला भेटणे सहज शक्य नाही म्हणून तिकडे ही जातोच. जुने शाळकरी मित्र परिवार, एक ना दोन खूप कारणे असतात. परदेशाहून येणे सोप्पे होते पण प्रत्येक वेळी पाणी, खाणे, झोपेच्या सवई, वातावरण बदल्यामुळे आजारी पडतोच.

खरेदीत पैसा एव्हढा खर्च होतो की वर्षातून एकदा कंपनी तिकीट देते म्हणून बचत करून एकदाच जातो. त्या खरेदीच्या पैशात भारतात दोनदा येवून गेलो असतो. पण दारात उभी असलेली आई, आवडीचा पदार्थ करून जेवायला बोलावणारी मावशी, थरथरणारा हात चेहऱ्यावरून फिरवणारी आत्या, धावत बिलगणारी बच्चे कंपनी, खुश होणाऱ्या बहिणी, मागे मागे फिरणारे भाऊ, आवर्जून बोलावणारा मित्रपरिवार, साध्या स्वभावाची भेटणारी रोजची मंडळी, दारातले मी लावलेले झाड जपणारा गेटमन, कोणा कोणाची नाती सांगू? सर्व आपुलकीने विचारपूस करतात.

ह्याच आपुलकी साठी, जिव्हाळ्यासाठी हा सोस. परत येताना असतात बाबांची घट्ट मिठी, आईचे अश्रू, बहिणींचे दुखी: चेहरे, भावांची काळजी, मित्र परिवाराचे हातात हात घातलेले स्पर्श, साध्या स्वभावानी दिलेली मूक परवानगी, वयस्करांचे आशीर्वाद, बच्चे कंपनीची जावू नका म्हणून घातलेली गळ. सोडवत नाही म्हणून परतांना हे सामान बरोबर परदेशी माघारी घेवून येतो.

पुन्हा मोठी बॅग भरते ती लाडू, घरचे मसाले, मुरांबे, मेतकुट मिरगुंड, घरी केलेली लोणची, बटाटा कीस, चितळे बाकरवडी, केप्र उत्पादने पुन्हा खूप सामान होते. ठराविक वजन नेता येते म्हणून काही शिल्लक राहते. आईचा गलबललेला चेहरा आठवतो. वर्षभर पुरणार नाहीच. बरेचेसे परदेशी मिळते पण त्यात माया, प्रेम नसते. पुरवून पुरवून वापरायचे. कारण पुढच्या जून पर्यंत वाट पहायची असते. कशासाठी एव्हढे तर ह्या प्रेमासाठी. आंम्ही परत परत बॅग भरत असतो भारतासाठी, आपल्यांसाठी…….

मिमोसा पुडीका………हळुवार संवेदना

मिमोसा पुडीका…… हे बोट्यानिकल नाव. सहज सापडणारे, हाताचा स्पर्श पानांना झाला की, लगेच पाने मिटवून घेते. असे छोटेसे रोपटे म्हणजे ‘लाजाळूचे’ झाड. इंग्लिश मध्ये ह्याला “टच मी नॉट”, आणि हिंदी मध्ये “छुई मुई” म्हणतात.

शाळेत असताना कायम अभ्यासलेले. वाटेत दिसले की, हात लावण्यासाठी लहान, थोर आकर्षित होतात. ‘लाजाळूचे झाड’ हे विशेषण लाजाळू स्वभावाकरिता,विशेषतः मुलींकरिता पूर्वी तरी असे म्हणायचे. ‘लाजणे’ ह्या स्त्री सुलभ भावनेसाठी बऱ्याच वेळेला धीट स्वभाव नसलेल्या मुलांकरिता पण कुत्सित टोमण्या सारखे वापरले जात होते. कवींना सुद्धा ह्या स्वभावाची खूप भूल पडलेली दिसते. “लाजून हासणे अन …………मी ओळखून आहे, सारे तुझे बहाणे”. प्रेमाची उपमा पण ह्याच झाडाभोवती रुंजी घालताना सापडते.

जसे दारापुढे तुळशीचे रोपटे, तसे प्रत्येकाच्या मनात लाजाळूचे झाड असतेच. लहान मुलांच्या बाबतीत फार हळुवार पणे हे झाड जपावे लागते तर कधी बालकाचा सर्वांगीण विकास होण्यासाठी त्याला खास अशी देखभाल करावी लागते. हा स्वभाव मुलींकरता प्रामुख्याने असला तरी ह्या झाडाच्या अस्तित्वामुळे बऱ्याच प्रमाणात आपण ताण तणाव यांचे वाढणारे तण मर्यादित करू शकतो. हा माझा अनुभव आहे. मत मतांतरे असतील पण एखादी छान भावना टोमणे, कुत्सित पणे, किंवा चेष्टे करिता नाही ठेवली तर मनाला प्रसन्न नक्कीच करते.

मन प्रसन्न तर जग अधिकपणे सुंदर भावनेने पाहता येते. काही संभाव्य धोके मात्र ह्यात आहेत. कदाचित ही भावना अधिक पणे प्रकट केलीत तर ज्याला आपण इंग्लिश मध्ये मस्का पॉलीसी म्हणतो त्या वळणावर ही येवू शकते. किंवा ही हळुवार भावना व्यक्त करताना आपण अधिक जवळीक शब्दांद्वारे करण्याचा प्रयत्न केला तर, ‘काय गळ्यातच पडतात’, असे मत आपल्यासाठी होवू शकते.

एखादी व्यक्ती आपल्या मतांबाबत खूपच आग्रही असेल, तुम्हाला ती मते पटत नसतील तरीही त्या आग्रही मताचे स्वागत करा. लगेच विरोध व्यक्त करू नका. त्या व्यक्तीत असलेले लाजाळूचे झाड आपल्या शब्द स्पर्शाने सुखावू शकता. आपापसातल्या नात्यात कटुता येवू न देण्याची हुशारी आपण शिकायची असते. योग्य वेळ पाहून आपले स्वताचे मत सांगा.

विरोध जिथून निर्माण होतो त्याठिकाणीच स्वागत करून थांबवला तर समोरच्या व्यक्तीतले लाजाळूचे झाड नंतर तुमचे मत स्वीकारण्यास तयार होईल. कामाच्या ठिकाणी आपल्या बॉस चे आपले नाते असे दृढ करून कामाच्या ठिकाणी होणारा मनस्ताप निश्चित तुम्ही स्वत: करिता कमी करू शकाल. बॉस चा स्वभाव बदलणे, किंवा कोणाचाच जन्मतः असलेला स्वभाव पूर्णपणे बदलणे शक्य नाही. परंतु आपण आपल्या करिता सर्व सुखावह होण्यासाठी समोरच्या व्यक्तीत असलेल्या लाजाळूच्या झाडा मार्फत काही अंशी, काही काळापुरता आपल्याकरिता बदल करू शकतो.

घरात सुद्धा सहजच आपण ही भावना जपू शकतो. मन जसे एका घावात, एका शब्दात दुखवू शकतो, तसे ते एका शब्दात सुखावते सुद्धा. प्रेमी युगुल तर दोघे ही लाजेतच चूर असतात. आता च्या आय. टी. युगात कितपत आहे? ह्याचा अंदाज परदेशात बसून मला करता येत नाही. नजरेत घायाळ होणारे, लाजून हसल्याने माझ्या सख्यांनी अनेकांना धारातीर्थी केल्याचे मी साक्षीदार म्हणून ठामपणे सांगू शकते.

प्राजक्ताच्या फुलासारखी नजरेत अलगद वेचता येणारी, अबोली सारखी गालातच लाजणारी, लाजल्यावर मोगऱ्याच्या कळीसारखी टवटवीत होणारी, अशी स्त्री सुलभ भावना मुलांकरिता, ‘सुर्यफुल’ म्हणून संबोधणे कसे तरी वाटते. ह्याच करिता आख्खे लाजाळूचे झाड मनात शोधणे जास्त संयुक्तिक होईल.

चिडणे म्हणजे चेहरा रागीट होतो, रडणे, हसणे ह्या हावभावांचे वर्णन वाचून समजू शकतो. पण लाजल्यामुळे चेहरा गोरामोरा, म्हणजे नेमका कसा? ‘हे जावे, त्याच्या लाजेच्या गावा’ तेंव्हाच कळते. ही भावना छोट्या बाळांच्या चेहऱ्यावर, नवपरिणीत जोडपे, प्रेमी युगुल, इथे नेहमी पहावयास मिळते.

पण वडिलांनी आईला गजरा दिल्यावर तिच्या चेहऱ्यावर उमटणारे शांत ज्योती सारखे सलज्ज भाव हे घराचे सौंदर्य वाढवतात. टी. व्ही. वर येणाऱ्या कुटुंब नियोजनाच्या जाहिराती मुले किंवा मुली जेंव्हा घरातील जेष्ठ व्यक्ती समवेत पाहतात. तेंव्हा त्यांच्या मिशी फुटणाऱ्या मुलाच्या किंवा षोडश कन्येच्या चेहऱ्यावर लाज येताना पाहणे हे आईबाबांना एक सेकंद तरुण करून जाते पण दुसऱ्या सेकंदाला काळजी वाटावयास भाग पाडते.

अशी ही सुरेख भावना लाजाळूचे झाड शिकवून जाते. तरुण होणाऱ्या माझ्या मुलाच्या पिढीत एस. से. मेस. ते इमेल सगळीकडे ”हाय ड्यूड!” असे असते. ‘मिमोसा पुडीका’ पण ह्याच तरुण डोक्यातून आलेला शब्द आहे. शब्द बोट्यानिकल पिढीतला असो किंवा आपले लाजाळूचे झाड. भावना त्याच अजूनही उमटतात हे नसे थोडके. एकमेकांना निरोप देताना स्वभावाप्रमाणे ही पिढी शास्त्र पुस्तकातले चक्क फोर्म्युले नि संबोधतात. अभ्यास होतो पण ही काय पद्धत झाली असा माझा घोष सुरु असतो.

मला मात्र लाजून चूर होणारी जयश्री गडकर आवडते. ‘रेखा’ आहाहा!!! काय अदाकारी होती. अजूनही ‘सिलसिला’ वेड लावतो. तिच्या सारखे लाजणे शिकणे हा छंद मुलींमध्ये होता. आता करीना, क्याटरीना, आठव्याव्या लागतात कधी लाजल्या होत्या. लाज गुंडाळून त्या पैसे कमावतात आणि आपणच गोरेमोरे होवून सिनेमे पहायचे असतात.

‘कालाय तस्मे नमः’ असे म्हणण्या व्यतिरिक्त काय बोलणार? असे हे चटकन लाजणारे, सुखावणारे, आनंद पानात दडवून बंद करणारे आपल्या मनातील ‘लाजाळूचे झाड’ आपण जपले पाहिजे. तरच बाहेरील जगात आनंदी आनंद आपण शोधू शकू. कटुता, नात्यात येणारा दुरावा, अधिक नाते संबंध दृढ करण्यासाठी, ‘लाजाळूचे झाड’ समोरच्या व्यक्तीच्या मनात दडले आहे. ते पाहून हळुवार शब्द स्पर्शाची जाणीव करून, समोरून पण आपल्याकरिता आनंद निर्माण करता आला पाहिजे. ह्यालाच म्हणतात, जीव जोडायला शिकवणारे, ‘मिमोसा पुडीका’.

Previous Older Entries