TAG…….

धन्यवाद गौरी, ह्या वर्षाचा छान खेळ घेवून आलीस. तू आज खो!! खो!! सारखा खेळ आम्हाला सगळ्यांना खेळायला लावलास. आवडला. अशाच काही कल्पना नवीन वर्षा करिता असतील तर जरूर पास ऑन करा. आमच्या खेळात प्रतिक्रया देवून सहभागी व्हा आपले स्वागत!! आणि हो! हा खेळ सर्व ब्लॉग वर असेल प्रत्येक ठिकाणी आवर्जून भेट द्या.

TAG—–

1.Where is your cell phone?
रिंग देउन पहा.
( मी माझ्याच सेल ला रिंग देते शोधण्याकरिता)

2.Your hair?
हालच हाल चालू आहेत,
( मुलगा केसाच्या तारा उभ्या करतो आणि ह्यांचा सगळाच खर्च कमी झाला आहे)

3.Your mother?
आई,

4.Your father?
माझा अभिमान, आदर्श

5.Your favorite food?
भेल, पाणीपुरी ( ह्यांच्या भाषेत कचरापट्टी ), बटाटे वडा

6.Your dream last night?
पडतच नाहीत.
( बाहेर कुठे खट्ट वाजले कि जाग येते. पण झोप एका सेकंदात पुन्हा ढाराढूर पंढरपूर)

7.Your favorite drink?
ताक

8.Your dream/goal?
हम्म … इंटरेस्टिंग प्रश्न आहे. सद्ध्या तरी मला स्वतःचा व्ययसाय करायचा आहे.

9.What room are you in?
होम ऑफिस

10.Your hobby?
कंटाळा कधी येत नाही.
( जे परिस्थिती प्राप्त आहे त्यात मी रमते)

11.Your fear?
अपरात्री येणारा भारतातील फोन.

12.Where do you want to be in 6 years?
कायम घराबरोबर

13.Where were you last night?
मस्कत सोडून कुठे जाणार??
( भारतात असते तर कदाचित……)

14.Something that you aren’t?
diplomatic माझा परिवार व स्वतः बरोबर

15.Muffins?
अर्थात कुठलेही गोड पदार्थ

16.Wish list item?
शेतातील घर कौलारू.

17.Where did you grow up?
ठाणे

18.Last thing you did?
tag लिहिण्यासाठी घेतला.

19.What are you wearing?
जीन्स आणि कुर्ता.
( गणपती साठी नऊवारी साडी व नथ, दिवाळीत मात्र छानशी साडी)

20.Your TV?
‘हाय वे ऑन युअर प्लेट’ कार्यक्रमा साठी

21.Your pets?
खिडकीत पाणी पिण्यासाठी येणाऱ्या चिमण्या, चिनू मिनू कासवांची जोडी, आई कडचा मार्शल अल्सेशियन.

22.Friends?
डॉ. अनिरुद्ध जोशी.
( आमच्या परिवाराचे बापू.)

23.Your life?
काही खास नाही. रुटीन.

24.Your mood?
नेहमीच आनंदी
( काम व घर ह्यांच्यात योग्य अंतर ठेवू शकते)

25.Missing someone?
भारत

26.Vehicle?
निसान सनी
( कदाचित काही दिवसांनी टोयोटा land cruzer प्राडो)

27.Something you’re not wearing?
दागिने (नसती कटकट)

28.Your favorite store?
लुलू हायपर मार्केट व Carre fore (मस्कत)
भारतात बिग बाजार, सांगली व कोल्हापूर येथील( माझे सासर) आठवड्याचा बाजार. पुणे येथील कर्वे नगर विठ्ठल मंदिर रस्त्यावर शेतातील ताजी भाजी पहाटे येते, खरेदी साठी सही नेहमीच ताजेतवाने असते.

29 Your favorite color?
सगळे रंग आवडतात.

30 When was the last time you laughed?
गौरीचे tagal वाचून.
(महेंद्र्जी माझ्या सारखे गोंधळले म्हणून….हा हा!!! मी एकटीच नाही)

31.Last time you cried?
रडणे आठवत नाही.

32 Your best friend?
सेकंड ऑप्शन असेल तर नवरा, मुलगा

33 One place that you go to over and over?
अर्थात भारत.
( आई कडे व बापूंकडे बांद्र्याला)

34 One person who emails me regularly?
नवऱ्याशिवाय कोणीच नाही.

35. Favorite place to eat?
मस्कत मध्ये अन्नपूर्णा(साउथ इंडिअन हॉटेल)
व रोहन व पंकज ने सांगितलेल्या खादाडीच्या जागा.
———————————————————————————————————–
@ [ मी हेमंत, अखिल, प्रणव w ,चंद्रशेखर( अक्षर धूळ),यांना tag करते. ]

खारीचा वाटा, पर्यावरणाच्या सेतूसाठी………….

सध्या कोपेनहेगन च्या परिषदेवर, जागतिक पर्यावरण व त्यातील राजकारणावर भरपूर लेख येत आहेत. हिमनगांचे वितळणे. समुद्राने सीमारेषा बदलणे, वाहतूक, औद्योगिक करण असे वर्षानु वर्ष चावून चोथा केलेले विषय पुन्हा नवीन घास घेतल्या सारखे चावत राहतात. हा विषय आवाका फार मोठा आहे. वर्तमानपत्राचे एक पान सुद्धा अपुरे पडेल.

घरचे पर्यावरण पण अनेक वेळेला असेच चघळून बोलले गेले आहे. मी काय नवीन लिहिणार, असे असले तरी खारीचा छोटासा सहभाग पण रामाला महत्वाचा होता. आपण नुसते वाचतो, आपल्यावर वेळ आली तर कळवळून लिहितो. पण खरेच आपण आपल्या घरापासून पर्यावरण राखण्यासाठी कृती करतो का? लेखांची मांदियाळी त्यात सुद्द्धा जड जड शब्द वापरून लेख पण समस्येसारखा होतो. जे कोणी पर्यावरण वाचवण्यासाठी अगदी मनापासून कृतीशील आहेत त्यांना माझा सलाम!

आजच्या युगात कोणाला वेळ आहे असे करायला? खरय पहाटे पासून ते मध्य रात्री पर्यंत कामाचे, जवाबदारीचे, संसाराचे, तब्येतीचे, अशी अनेक ओझी आपण वाहत असतो अव्याहतपणे, अविरत करतो कारण दुसरा पर्याय नाही. स्पर्धात्मक युगात राहण्यासाठी धडपड करणे हा निश्चित आयुष्याचा अविभाज्य घटक आहे. पण आठवड्यात, महिन्यात असे छोटेसे काम केले तरी त्याचे समाधान खूप काळ पर्यंत साथ देते. हा अनुभव माझा आहे.

मी सोसायटी किंवा गृह संकुल गृहीत धरून सांगते. आवारात घरची भाजीची देठे, किंवा फळांचे अवशेष, झाडाचा पाचोळा असे एकत्र करून नैसर्गिक खत मिळू शकते. घरात गॅलरीत, गच्चीत कुंडीत असे खत तयार करू शकतो. ज्याचा उपयोग परिसरातील झाडां करिता केला जावू शकतो. पण हे करणार कोण? कचरेवाला कचरा घेवून जातो, किंवा डक्ट मध्ये टाकतो. असा जैविक कचरा वेगळा गोळा करून ठेवायचा हे काम लक्षात राहील का? खरेच अवघड आहे? कचरे वाल्याला शिकवा, तो पण वेगळा चार्ज मागेल. पुन्हा सोसायटीचे बिल वाढेल. समस्या वाटेल पण सर्वांच्या मताने घेतल्यास पर्याय मिळू शकतो. अशक्य नाही, पण जमणार कसे? ह्या विचारात हे सर्व विसरतो. सर्वाचे सहकार्य सुरवातीला उत्साहाचे असते पण सातत्य कसे राहणार?

वर्तमान पेपर पासून पिशव्या बनवणे. स्वत: करिता उपयोग होतो. पण व्यवसाय म्हणून गृहिणी परिसरातील दुकानदारांना विकू शकतात त्या योगे घरात राहून व्यवसाय करता येईल. हे म्हणायला सोप्पे आहे पण पुन्हा करणार कोण? बाजारात उपलब्ध असल्यास विकत घेवू पण असे काही करायला वेळ नाही. ही वस्तुस्थिती मी नाकारत नाही. कोणीतरी वाचून अमलात आणेल हि आशा मला नक्की आहे.

पुण्यात नवीन बांधकामांना रेन हार्वेस्टिंग सक्तीचे केले आहे. नेहमी प्रमाणे ह्या गोष्टी प्रत्यक्षात कार्यान्वित कमी प्रमाणात दिसतात. आपण गच्चीतले पाणी खाली ड्रेनेज ला सोडतो. त्याऐवजी जमिनीत टाकी बांधून साठवले तर, आपल्याला व परिसराला अडचणीच्या वेळेला उपयोगी पडेल. योजना मांडायला गोंडस असतात. पण आपण सर्वांना ह्यात सहभागी करून घेतले तर, गोंडस न राहता कणखर पणे कार्यान्वित निश्चित होतील. गरज आहे ती महिन्यातून एकदा एकत्र येण्याची व सातत्य पणे कार्यान्वित राहण्यासाठी नियोजन करण्याची, तसेच पर्यावरणाचे भान, समाजाची बांधिलकी जपणे. ह्यातुनच मनातला राम आपल्याला मिळतो कारण कृती खारीच्या वाट्याची असते.

आम्ही घरच्या बाल्कनी, गच्चीत कुंड्या मध्ये जैविक खत तयार करतो. भाजी, तांदूळ डाळ साधारण पणे दोनदा धुतो ते पाणीझाडा करिता वापरते. घरी गांडूळ खत पण बरेच जण तयार करतात. घरच्या कुंड्या मध्ये मका लावतो, त्याचा जनावरासाठी ताजा हिरवा पाला संस्थेमार्फत शेतकऱ्याला पाठविला जातो. जुन्या साड्या पासून गोधड्या बनवतो. साड्या, मका बी, खतासाठी लागणारे बेसिक सामान संस्थे तर्फे आणतो, तयार करून देतो.

कुठलीही प्रसिद्धी नाही, गाजावाजा नसतो. पर्यावरणासाठी, शेतकऱ्यासाठी. गरिबासाठी, देशासाठी जो तो आपल्या परीने सेवा देतो. ह्याचे प्रशिक्षण पण दिले जाते. तुमची भक्ती आहे का ह्या बेस वर नक्की नाही तर तुम्हाला स्वता:साठी शिकायचे आहे व त्याच बरोबर समाजाकरिता करण्याची इच्छा आहे. एव्हढेच मनात असावे लागते. मग तुमचा परमेश्वर किंवा श्रद्धा स्थान वेगळे असले तरी शेवटी एकाच जगतनियान्त्र्याकडे ही सेवा जाणार आहे. राम असो किंवा रहीम असो!

बरेच जण अशी सेवा वेगवेगळ्या संस्थे मार्फत करीत असतात. बचत गट, महिला गट, अशा अनेक माध्यमा तर्फे खूप जण सेवा व अर्थार्जन करीत आहेत. मी माझ्या संस्थेशी निगडीत आहे म्हणून माझा अनुभव लिहिला. असे काम मांजरीच्या गळ्यातील घंटा सारख्या अशक्य पठडीतील नाही. व्यवस्थित नियोजन केले तर आपल्या मनातील मदत करू इच्छिणारी खार आनंदाने विहार करू शकेल. मन सुखी तर आयुष्य आनंदी. हाच तर राम आहे जीवनातला. भले खूप मोठ्या प्रमाणावर करणे शक्य नाही पण जिथे कुठे जमेल तिथे फक्त पैशाने नव्हे तर कृतीने पण सहभागी होणे म्हणजे पर्यावरण करिता आपल्या क्षमतेला सक्रीय करणे होय.

घरात बऱ्याच वेळेला अकारण लाईट राहतो म्हणजे बाहेर जाताना बंद करण्याचे विसरतो, आंघोळीचे पाणी बदली भरून वाहत राहते, आवडते म्हणून अकारण भरपूर पाणी अंगावर घेतले जाते. बिल आम्ही भरतो कारण पैशांची क्षमता आमची आहे. असे असले तरी निसर्गा कडून तुम्ही मिळवता. हे नुकसान किंवा ह्याची भरपाई निसर्गाला पैशाच्या बळावर भरून देता येत नाही. रस्त्यावर लाईट दिवसभर चालूच राहतात असले तर????? पाणी पाईप फुटलेला असतो. हे सर्व कोण सांभाळणार ?

मस्कत मध्ये ह्या गोष्टी व्यवस्थित नियोजन बद्ध आहेत. परदेशाची सवय झाली की भारतात राहणे अवघड होते. ही पण माणसे आपल्या सारख्याच रक्त मासाची आहेत. परदेशाची असा शिक्का त्यांच्या भाळी नाही. मग आपण नैसर्गिक साधन संपत्तीने समृद्ध असूनही का मागे पडतो?. घरासाठी, परिसरासाठी, देशासाठी पर्यावरणाचा विचार करून, एखादी जरी गोष्ट केली. काही अंशी तरी आपण खारीच्या पाठीवरील रामाच्या चार बोटांचे प्रेम मिळवू शकू.

इथे समुद्राचे पाणी गोडे करून आम्हाला पुरविले जाते. मी पोस्ट करणार आहे ह्या वेगळ्या विषयासाठी, माहिती गोळा करणे चालू आहे. रत्याच्या दोन्ही बाजूला गच्च हिरवाई ची अनेक झाडे लावली आहेत. नयन रम्य भल्या मोठ्ठ्या निजामशाही बागा आहेत. बाथरूम चे सांडपाणी वेगळे गोळा करून त्यावर शुद्ध होण्याची प्रक्रिया केले जाते. हे पाणी बागांना व झाडांना वापरले जाते. अत्यंत काटेकोर पणे अमलात आणतात.

पावलोपावली भल्या मोठ्या डोंगर रांगा आहेत. सरळ सपाट जमीन कमी आहे. प्रत्येक रस्ता डोंगर कापून तयार केला आहे. डोंगरावर एकही साधे झुडूप पण नाही पण शहरापासून दूर जबल अकतर, सलालासारखे भाग मात्र भारताच्या पर्यावरणाशी मिळते जुळते आहेत. विरुद्ध पर्यावरण असूनही हे राष्ट्र समतोल राखून आहे. निसर्गाच्या संतुलनाची आपण मात्र जाण ठेवत नाही.

पर्यावरणाचा सर्वकष विचार जसा आंतरराष्ट्रीय पातळीवर केला जातो. तसाच घरात चार जणाच्या कुटुंबात पण व्हायला हवा. आपल्या जाणीवांना, जवाबदारीला ओळखले पाहिजे. आपली निष्क्रिय झालेली चेतना उत्फुल्लित करण्यास हवी. चावून चावून चोथा झालेले पर्यावरण विषय आता कृतीशील बनवून काहीतरी आपल्या परीने योगदान करावयासच पाहिजे. आपल्याला परिसरात अशा योजना कुठे राबवल्या जातात, आपण सहभागी होवू शकतो का? अशी माहिती मिळवून काही ठोस उपाय करता येतील का? या बाबत आपण जागरूक होवून एकत्र आलो तर पर्यावरणाचे राजकारण संपुष्टात नक्की येईल.

आपण समाजाचा एक छोटा परंतु महत्वपूर्ण घटक आहोत. एकट्याने जमेल तसे करणे व अनेकांना एकत्र करून भरीव काम करणे. ह्यातच पर्यावरण जपले जाते. छोटी खार पण पिढ्यान पिढ्या रामाची प्रेमाची चार बोटे पाठीवरती घेवून दिमाखदार पणे आपल्याच घराच्या आजूबाजूला दबकत, सावध, पण चाणाक्ष नजरेने फिरते. खार मदत करीत होती. बघता बघता सेतू सीतामाई कडे जाण्या करिता तयार झाला. प्रभू श्रीराम तिचे दैवत होते. वानर तिचे आदर्श झाले व खार मात्र सेतू जोडीत कधीच मनाने सीतामाईचे दर्शन घेवून आली

निसर्ग सांभाळून केलेला सेतू, जो आपल्याला पर्यावरण जोडण्यास सांगत आहे. निसर्गासाठी, आपल्या साठी मनातील खार कृतीशील होणे गरजेचे आहे.

मार्गशीर्ष महिना………

प्रत्येक घरात, प्रत्येक मनात एक कोपरा असा असतो की, जेथे आपणच आपल्याला अजमावत असतो. हे स्थान आदराचे, प्रेमाचे तर कधी भक्तीचे असते. घरातल्या ह्या कोपऱ्याला आपण देवघर जागा असे संबोधतो. मनातील ह्या कोपऱ्यात स्वता:चे प्रतिबिंब आपण पाहतो. भारतीय संस्कृतीत प्रत्येक धर्मात अशा जागांना काही महत्व दिले गेले आहे. भक्ती, प्रेम , आदर, आदर्श, संस्कृती, परंपरा, अभिमान ह्यापूर्णपणे व्यैयाक्तिक बाबी आहेत.मनुष्याचे दिनक्रमण व्यावहारिक, सामाजिक, आर्थिक, अध्यात्मिक, वैगरे दृष्ट्या सुलभ व्हावे म्हणून काळ क्रम गणना आहे. वर्षाचे महिने हे सुद्धा ह्या करिता द्योतक आहेत. श्रावण महिना हा व्रतवैकल्यांचा म्हणून ओळखला जातो. मार्गशीर्ष हा महिना ‘गुरु’भक्तीचे समर्थन करतो.

देव किंवा गुरु हे मानावेत का नाही हे मी पुन्हा नमूद करते की, ह्या व्यैयाक्तिक बाबी आहेत. प्रत्येक मताचा मी आदरच करते. मी देव मानते, मी गुरूही मानते. मार्गशीर्ष महिना हा जे दत्तगुरू मानतात त्यां साठी खूप महत्त्वाचा आहे. सर्व महिन्यांचा मार्ग दाखविणारा हा महिना.आपण जे काही अनुभवले त्याची पुन्हा उजळणी करून देणारा हा गुरु तत्वाचे अधिष्ठान जपणारा महिना. श्रावणात गुरवार हा दत्ताचा वार असल्याने बरेच जण हाही दिवस मोठ्या श्रद्धेने जपतात. पण मार्गशीर्ष महिना पूर्ण पणे जे काही घडले, जे काही अपूर्ण राहिले, असा सर्व विचार करावयास लावणारा आहे. वर्षभर नाही तर जीवनभर गुरूंचा आदर्श ठेवावयास हवा.

गुरु असे असावेत की, जे आपल्याला प्रारब्ध सोसण्याचे बळ देतील, चांगल्या कृती घडवून आणतील. सकारात्मक विचार करावयास शिकवतील. संत परंपरा ही विठू माउली भक्तीकडे आकर्षित करते. शिवाजीराजे, राणा प्रताप, झाशीची राणी हे राज्यकर्ते पण गुरु स्थानीच आहेत. विवेकानंद, कबीर, अगदी आताच्या काळातले पु. ल. ह्यांचे विचार,लिखाण आपल्या मनात एक कोपरा व्यापून असते. थोडक्यात काय तर जे आपल्याला भावते, पटते, कळते, योग्य वाटते, त्यात आपले मन सुद्धा गुरुस्थानीच आहे. दत्तगुरुनी सुद्धा टिटवी पासून ते पिंगला पर्यंत २४ गुरु स्वीकारले आहेत. आपले आदर्श कोण असावेत? प्रत्येक अनुभवातून शिकायला मिळते, त्याचीच उजळणी म्हणजे मार्गशीर्ष होय.

भारंभार पोथ्या न समजता वाचणे ही भक्ती परिपक्व नाही. जे काही वाचाल ते प्रेमाने वाचा त्यातील अर्थ जीवनाशी साधर्म्य करून समजून वाचा. भले तुमच्या आवडत्या लेखकाचे पुस्तक पण असेल ते सुद्द्धा नकळतपणे जीवनात आदर्श संस्कार करत असते. गुरु तत्व स्वीकारणे म्हणजे कायम आपल्याबरोबर त्यांच्या विचारांचा आदर्श घेणे होय व त्या नुसार वर्तन परिवर्तन करून घेणे ही गुरु भक्ती. चांगला शिष्य लाभणे तसेच गुरु ही मिळणे हे प्रत्येकाचे भूत, भविष्य व वर्तमान परिस्थिती प्रमाणे असते. मानवी गुरु एव्हढ्या पुरतेच ह्या कक्षा सीमित न ठेवता,जीवनाच्या प्रत्येक जडण घडणीवर, अनुभवावर पण अवलंबून असते.

गुरूंचा पुरस्कार करण्या साठी मार्गशीर्ष नाही तर त्या मागच्या भावना, आदर, विचार ह्यांचा समन्वय साधण्यासाठी हा महिना. गुरु प्रत्यक्षात आहेत किंवा नाहीत तर ह्या हून ही अधिक आपण काय शिकलो हे महत्वाचे आहे. माझ्या गुरुनी मला व्यैयाक्तिक स्वरुपात काही अनुभव दिलेत. हे चमत्कार नाहीत तर ते अनुभव आहेत. मासिकात छापून आलेत. आज लाखो लोकांनी ह्या महिन्यात माझे अनुभव वाचले. ते माझे अनुभव आहेत, मी मानते, जे सदगुरूना मानतात त्यांच्यासाठी आहेत. जे मानत नसतील तर मला काहीच फरक पडत नाही. प्रत्येकाला मतांचे स्वातंत्र्य आहे. अनुभव हे मार्गदर्शक असतात. सकारात्मक घ्यायचे, का अर्थ नाही म्हणून सोडून द्यायचे हा माझा विषय नाही.मार्गशीर्ष महिना हा दत्तगुरू जयंती चा महिना ज्याप्रमाणे त्यांनी साध्या वाटणाऱ्या घटनांतूनही गुरु म्हणून तत्व जीवना करिता स्विकारीले. ही भक्ती, ही श्रद्धा होय. हा आदर्श. हे जीवनावर केलेले प्रेम आहे.

रोजच्या धकाधकीच्या जीवनात कुठे वेळ आहे? दिवस जसा समोर येईल तसा स्वीकारतो. पण कधी कधी खूप अस्वस्थ वाटते. किंवा माझ्याच बाबतीत असे का घडते? म्हणावे तसे यश, समाधान, शांती मिळत नाही. अश्या प्रश्नाकरिता उत्तरे मिळवण्यासाठी आपण आपल्या मनातील कोपरा चाचपला पाहिजे. आपल्याला जे कोणी आदर्श आहेत त्यांचा विचार, त्यांचे मार्गदर्शन आठवून बदल करावयास हवेत. शरीराच्या स्वास्थ्य करिता मानसिक शांती, समाधान आवश्यक आहे. अध्यात्म ही म्हातारपणी गात्र शिथिल झाल्यावर करण्याची योग्य वेळ नाही. तरुणपणीच खूप ताण शरीरावर, मनावर येतो त्याचा परिणाम आपल्या आरोग्यावर होतो. योग अभ्यास मानसिक, शारीरिक स्वास्थ्य देतात पण सदगुरू प्रारब्ध झेलण्यास मन, शरीर कलुषित होवून देत नाहीत. गुरूंच्या मार्गदर्शन मुळे मी पूर्णपणे ताणविरहित आहे.

आज दत्त जयंती सदगुरूना प्रणाम!

अशी मी ….आणि अशी माझी मुंबई

माझी प्रोफाईल……. २६/११ साठी,

आपली जन्मभूमी ह्याचा अभिमान असणे हे सहजीच आहे. कर्मभूमी पण तेव्हढीच जवळची असते. आपल्या आयुष्यातले चढ उतार, भावनिक, मानसिक धागे दोरे हे आपल्या गावाशी, शहराशी वेढून असतात. मी मुंबईची म्हणून मला माझ्या शहराने मोठे केले. त्या शहराला माझे शिक्षण, माझे अनुभव आज अर्पित करते. ते ही २६/११ ला कारण ही तारीख माझ्या मुंबईची आहे. भारतच काय पण सर्व जग जणू काही दहशतीने वेठीस धरले होते. त्यातून माझी मुंबई ही कायम टार्गेट असते. हा मुंबईच्या इतिहासातला काळाकुट्ट दिवस पण पोलिसांनी, कमांडोज, ह्यांनी निडरपणाने मुकाबला करून दहशतवाद्याचा बिमोड केला. गतिमान, धाडसी, संवेदनक्षम, हळवी, विचारी अशी माझी मुंबई.

मी मुंबईत जन्मले, शिक्षण, करिअर सर्व काही मुंबई. माझी प्रोफाईल ही मुंबईचाच घटक आहे. जन्म घाटकोपर, शाळा ठाणे, कॉलेज रुइया ह्या परिघातच मी मोठी झाले, भक्कम बनले, सक्षम, उच्च विद्याविभूषित, संवेदनक्षम बनले.

शाळेत असताना पोहणे, मैदानी खेळ ह्यात मला आवड होती.कॉलेज ला गेल्यावर एन. सी. सी. जॉईन केले. मला यु. पी. एस. सी, किंवा आय. पी. एस. परीक्षा देवून आय. ए. एस. किंवा पोलीस ऑफिसर बनायचे मी ठरवले होते. एन. सी. सी. चे प्रशिक्षण चालू असताना अनेक पारितोषिके पटकावली. ऑल इंडिया लेव्हल मिलिटरी चे सिग्नल यंत्रणा करिता अखिल भारतीय श्रेणीचा प्रथम क्रमांकाचा चांदीचा कप मला मिळाला. महाराष्ट्र प्रतिनिधित्व करण्याची संधी मला राजधानीत मिळाली. सर्व ठिकाणी मेरीट होल्डर झाले. फायरिंग, हॉर्स रायडींग, स्युबा डायविंग, प्यारा सेलिंग, ह्या धाडसी प्रकारात अव्वल नंबर टिकवून होते. कॉलेज व एन. सी. सी तर्फे महाराष्ट्रातील सर्व डोंगर, किल्ले ट्रेकिंग करून पाहून झाले.

शिवाजी मैदानावर परेड च्या दरम्यान हेमंत करकरे ह्यांच्याशी बोलण्याचा योग आला होता. आपण प्रशासकीय सेवा करिअर करता निवडा असे मोलाचे मार्गदर्शन त्यांनी मला केले होते. पण मराठी तरुणांचा तेंव्हा फारसा सहभाग नसायचा. लग्न करून ज्या ठिकाणी सासर असेल तिकडे जायचे असे पुरोगामी विचारांचा पगडा मुलीं भोवती असायचा. मला काही फारसे प्रोत्साहन मिळाले नाही त्यामुळे त्यांना प्रयत्न करते असे म्हटलेले पूर्ण होऊ शकले नाही. मी शिक्षण क्षेत्र करिअर करता निवडले. शाळा ते महाविद्यालय इथे शिकवत राहिले. गाईड चे ट्रेनिंग घेवून आपत्कालीन उपाययोजना, क्याम्प घेवून विद्यार्थ्यांना शिकवल्या.

आज माझे अनेक विद्यार्थी मी सुचवलेल्या प्रमाणे प्रशासकीय परीक्षा देवून रुजू झाले आहेत. मी पूर्ण करू शकले नाही. पण माझ्या विद्यार्थ्यांच्या रूपाने आज करकरे साहेबाना सलाम करते. काही पोलीस ओळखल का टीचर? म्हणून समोर येतात. माझे जे कार्यक्षेत्र आहे ते पुढच्या भावी पिढीचे आहे. त्यामध्ये मी करकरे, साळसकर असे अनेक शूर वीर पाहते.

आम्हा स्त्रीयांना सकाळी एक व्यक्ती अश्लील हावभाव करून रस्त्यात त्रास द्यायची. दहा जणी असूनही सर्व तिकडे दुर्लक्ष करायच्या. मी पोलिसांना फोन करून सांगितले व सर्वांची सुटका झाली. रस्ता निर्वेध बनला. पोलिसांची गस्त सुरु झाली तेंव्हा जाणवले की घेतलेले शिक्षण वाया जात नाही.

एन. एस. एस मध्ये पण सहभागी झाले. अल्प उत्त्पन गट निवडून कांजुरमार्ग विक्रोळीच्या डोंगरा वरच्या झोपडपट्टीत काम केले. मुंबईचे हे जीवन ही फार जवळून अनुभवले. त्यांनी दिलेला प्रेमाचा चहा, आग्रह, आमच्या गटाने त्यांना घरगुती रोजगार करता साधन सामुग्री, शिक्षण देण्याचे काम केले. त्या कुटुंबांचा चेहऱ्यांवर दिसणारा आनंद मला आज आठवला.

अंतर्मुख होऊन विचार करते तेंव्हा हे निश्चितच पटते की आपल्या भूमीचा आपण मोठे होण्यात खूप महत्वाचा हिस्सा आहे. २६/११ च्या भीषण हल्ल्यात नागरिकही खूप मोठ्या प्रमाणात बाहेर येवून मदत करीत होते. पुरात पहिले की एकमेकांना वाचवण्यासाठी शर्थ करीत होते. पाण्यात अडकलेल्या लोकांना अन्न, वडापाव, पाणी सर्व काही घरासारखे देत होते. कोणी कोणाचे नव्हते होते ते फक्त मुंबईकर. ह्यांच्या पण प्रत्येकाच्या प्रोफाईल मध्ये एक मुंबई आहे. निर्भीड, कणखर, हळवी, गतिमान व वैव्हीध्य अशा शिक्षणाने परिपूर्ण असलेली. कितीही संकटे आली तरी न डगमगता धीराने सामोरी जाणारी, बदल स्वीकारणारी, प्राप्त परिस्थितीत पण योग्य मार्ग काढणारी.

मी मुंबईचे प्रतिनिधित्व करते. मुंबईचे लोक जगात कुठे ही मजेत राहू शकतात. भारतात येताना विमानातून झोपडी दिसली कसे आलबेल आहे ते जाणवते. सगळ्यांना सामावून घेतले. भले वाद असतील पण संकट काळी सर्व मुंबईकर असतात. पोलीस अधिकारी ते सामान्य व्यक्ती २६/११ ला एकमेकां करता अश्रू डोळ्यात ठेवून. जे राहिले आहेत त्यांच्या करता मदत करीत होते हे जेंव्हा परदेशी बसून आम्ही टी.व्ही. वर पाहत होतो तेंव्हा मुंबईचा अभिमान आमच्या डोळ्यात पाण्याने भरून गेला.

आम्ही नाही मदत करायला ह्याचे वाईट वाटले. इकडून पैसे, कपडे, धान्य वैगरे मदती करता पाठवतो. पण बॉम्ब स्फोटात मदत कार्य, पुरात भुकेल्याच्या पोटी अन्न, वाचवण्या करता हात इकडून पाण्यात नाही देवू शकत. हात जोडतो ३३ कोटी देवांना की माझ्या मुंबईला, भारताला वाचव संकटातून.

आपल्या आयुष्याची प्रोफाईल म्हणजे आपली जन्मभूमी होय. मी मुंबईची म्हणून तिची व माझी जीवनरेखा सारखी वाटते. अशा मुंबईला सलाम!!!!

More

ऋणानुबंध………

सकाळी फिरण्या करता बाहेर पडले. काही मैत्रिणी मुलांना शाळेच्या बस करिता सोडवायला आल्या होत्या. रस्त्याच्या कोपऱ्यावर बरीच गर्दी गोळा झाली होती. सगळे पुरुष होते, त्यातल्या काही जणांचा घोगरा आवाज घाबरून ओरडल्या सारखा होता. त्यातले काही जण एक पायावर उडया मारल्यासारखे पटापट पाय वर उचलत होते. व्यायामाची जागा नव्हती. आम्ही तमाम आई वर्ग आश्चर्याने बघत, अंदाज घेत होतो. आमची काही धिटुकली बाळे, सूचना न जुमानता पुढे गेली. क्षणाधार्त पळत माघारी आली, ते ही किंचाळत. मम्मा, डॉगी चे बाईट करणारे पिल्लू आहे. बस आली आयांनी पोरे ढकलली. स्वताही धूम ठोकत आत पळून गेल्या. मला काही कळायच्या आत माझा पाय घोट्याजवळ घट्ट धरला गेला. धारदार दात मला जाणवत होते. त्याचे अंग पूर्णपणे थरथरत होते. मागून माझ्यामैत्रिणींचा किंचाळ्या ऐकू आल्या. चावले! चावले!. पिल्लू अजून घाबरले. मला काळजी होती कर्र कर्र आवाज येत होता खरेच चावले तर, किती सुया बसतील.

मला कुत्रा पाळल्याचा अनुभव आहे. माहेरी ‘पाशा'( जर्मन शेफर्ड) होता. आता मार्शल हाही जर्मन, सनी हा रॉट जातीचा, माझ्या मुलाकरता ‘ज्याकी’ हा पॉम पिल्लू असल्यापासून आमच्या बरोबरीने घरात होता. ह्यांना पण लहानपणी पासून आवड व घरात पाळला होता. त्यामुळे मी ह्या चावऱ्या वेड्याला अलगद माझ्या पायापासून सोडवले. जवळ पोटाशी धरले. कोणीतरी चावरे म्हणून सोडून दिलेले असावे. माणसांचा खूप राग होता. नीट वागवले नसणार. बिलगून बसले. मैत्रिणी अग सोडून दे म्हणून कलकलाट करू लागल्या. खिडकीतून मुलगा बघत होता. आपण पिल्लू आणू या म्हणून अजूनही दंगा करतो, त्याला तर ही पर्वणीच होती. धावत खाली आला, येताना बिस्कीट चा पुडा, पाणी देण्यासाठी वाटी घेऊन आला. तो जवळ आला की, ह्या पिल्लाने हातातून खाली उसळी मारली व मुलाचा पाय पकडला. आता मात्र मी पुरतीच घाबरले. उगाच कनवाळू झाले असे क्षणभर वाटले. त्याचा पाय जबड्यातून सोडवला. खायला दिले. पटापट संपविले.

आई, घे न घरात, तोच त्याने दात फिस्कारून दाखवले. आई, हे का ग चिडले? कदाचित त्याला अनुभव वाईट आला असेल. आपण नाही पाळू शकत. दोन महिने आपण भारतात जातो. तिकडेही सगळीकडे फिरतो, इकडे डॉग सीटर कडे सोडावे, मला नाही जमणार. तू मावशीकडे गेलास की खेळ, मार्शल, सनी, काळू आहे ना. त्यांच्या कडे सोडू. नको बाळा, मी समजूत काढत होते. माझ्या कडेवर बसून पिल्लू ऐकत होते. चल आता घरी जावू, हे इथेच खेळत राहील. मी त्याला खाली सोडून, त्याचे लक्ष नाही असे पाहून मी वरती घरी गेले. बिल्डींग ४० फ्ल्याट ची, टोलेजंग, एका मजल्यावर एक विंग ला ओळीत ५ घरे, मध्ये लांबलचक प्यासेज आहे. इकडच्या बाजूला दोन घरे व प्यासेज ला काच असलेले दार, तसेच दुसऱ्या बाजूला. मध्ये एक घर त्यासमोर जिना व लिफ्ट. अशी रचना, दोन्ही विंग पुन्हा अश्याच प्यासेज ने जोडलेल्या.

दोन तासानंतर घरची बेल वाजली. दारात सोसायटीचा केअर टेकर उभा होता. म्याडम, कुत्ते का बच्चा आपके घर है? नही, बच्चा अभी तक बाहर गया नही. नही, परेशान किया सबको, काटने को आता है. अभी छुप गया है. इधर पुलिस को बुलाना पडता है. ऐसा कानून है. फिर कुत्ता पकड्ने वाला आता है. लेकर जाता है. बहोत काटा तो, मारते है. पक्का मालूम नही. मी जाम काळजीत पडले. चलो धुंडते है. बाहेर आले तोच हे वेडं पुन्हा येवून पाय घट्ट पकडून बसलं. हे माझे घर शोधत इतके वर आले? म्याडम, पकडके रखना मै बॉक्स लेके आता हुं. डाल देंगे अंदर. बोलायचा अवकाश, हे पात्र इतके हुशार की त्याच्या अंगावर गेले धावून. केअर टेकर ने प्यासेजचे दार बंद करून कोंडून घेतले. मी मान डोलावली होती, आता त्याचा विश्वास पण गमावून बसले. माझ्यापासून दूर दूर पळून जावून रडून दाखवत होते.

दाराच्या पलीकडे केअरटेकर, त्या दारापलीकडे मैत्रिणी व मध्ये आणि पिल्लू. येरे बबड्या म्हणून मी चुचकारत होते. माझ्या मनातील ओळखून की, मी त्याला सांभाळणार नाही व पकडून देणार म्हणून ते उद्धवस्त चेहेऱ्याने मला फक्त बघत होते. सोसायटीत ते प्रत्येकाच्या अंगावर दात दाखवून धावत गेले व मी एकच अशी होते की, त्यांनी मला काहीही त्रास दिला नाही. त्यामुळे त्याला पकडायची जवाबदारी माझ्या वर होती. मी ह्यांना फोन केला, एक दिवस त्याला ठेवून घेवू या का? हे ठामपणे नाही म्हणाले. नको गुंतूस पुन्हा, आपण परदेशी राहतो. युरोप सारखे फ्रीडम नाही. बीच, गार्डन, काही रस्त्यांवर फिरवायला परवानगी नाही.

कोणीतरी चादर फेकली. पकड़ा त्याला. पिल्लू ने चादर तोंडात पकडली माझ्या समोर टाकली. मला रडूच कोसळले. आपण रागवायला जावे, तर बाळाने हातात पट्टी आणून ठेवायची, असे झाले. कित्ती! ग शहाण माझं छबड! काय करू बाळा मी. ये रे जवळ. ते ही भोळं आल लगेच. कुशीत घेतल. हळूच बॉक्स मध्ये ठेवले. केअर टेकर ला म्हणाले, मेरे पेहेचान की एक संस्था है. वो लोग कुत्तेका बच्चा लेकर मुफ्त मे अच्छे घर मे भेजते है. बॉक्स वरून ओपन होता. मी मुलाला क्लासला पोचवायला गेले. दहा मिनिटात परत येणार होते. आल्यावर बास्केट मध्ये ठेवू. रस्त्या पर्यंत पोचते तोच, पोलीस गाडी पहिली. अंदाज आला की कोणीतरी फोन केला असेल. मी लगेच मागे वळले, मुलाला म्हटले की जा तू एकटाच क्लासला.

सोसायटीच्या गेट मध्ये पहिले तर पिल्लू बाहेर पळत आलेले होते. लगेच पोलिसांनी त्यावर जाळे टाकले. उचलले व घेवून गेले पण. मी रिकाम्या डोळ्यांनी पाठमोऱ्या गाडीकडे पाहत राहिले. केअर टेकर म्हणाला कुत्तेका बच्चा, आपके पिछे दोडके आया. पुलिस का स्मेल शायद मालूम पडा होगा. कोनसा थाना? मै जाके लेके आयेगी. म्याडम वो तो मालूम नही. पाय जड होणे म्हणजे काय ते समजले. वर येवून फोन वर खूप विचारले. काहीही पत्ता लागला नाही. खूप रडले. काय होता त्याचा आणि माझा ऋणानुबंध, कित्ती माया होती त्याच्या मनात, हे दुष्ट जग त्याला जगू देईल का?

खूप दिवस जेवण गेले नाही. सारखे वाटायचे कुठूनतरी मला शोधत येईल. पण बरेच महिने झाले ते काही परत आले नाही. एक दिवस घरी काम करणारी मेड आली म्हणाली मला आता गावी जायचे आहे. माझ्या बहिणीचे मुल हरवले आहे. मिळत नाही. मला क्षणात पिल्लू आठवले, त्याचे माझे नाते काही तासांचे होते. आपले मुल म्हणजे आपला श्वास तोच हरवला तर, जगायला उमेद कुठून मिळणार? एकटे असणाऱ्या आजी आजोबांच्या डोळ्यात रिकामे पण दिसते. जगात कुठे तरी, त्यांचे पिल्लू नोकरी करता लांब गेलेले असते. सध्या वेळ मिळाला की डॉग सीटर कडे जाते, मालक गावाला गेल्यामुळे ते तिथे राहतात. त्यांना भेटून, त्यांचे लाड करून येते. ते माझी वाट पाहतात त्यांतूनच मी माझ्यातले पिल्लू जपते. नाना नानी पार्क मधले आजी आजोबा पण एकमेकांचे साथीदार बनलेले असतात तेंव्हा जाणवते की, नवीन जीवनाची सुरवात झाली आहे.

‘म’……मुंबईचा……..‘म’.. मराठीचा……

माय मराठी…………..मोठी मराठी.

काही खरेदी करण्यासाठी मी ‘ कॅरे फोर’ ह्या मॉल मध्ये गेले होते. मी व हे वस्तू घेण्यासाठी मराठीतून चर्चा करत होतो.तिथल्या सेल्स मन शी इंग्लिश मध्ये शंका विचारात होतो. अचानक तो मराठीत बोलला,” हे घ्या चांगले आहे”. माणूस ‘मल्याळी’ शुद्ध मराठी बोलतो. मी काही बोलायच्या आत तो म्हणाला, मुंबईत नोकरी करण्यासाठी माझे आजोबा आले होते.आमची तिसरी पिढी. चांगले आहे, मराठी सक्तीचे करतात त्यानिमित्ताने मराठी बोलणे सुधारते. मी काही मल्याळी बोलू शकत नाही. त्यामुळे ह्या संस्कृतीशी परिचय होऊ शकला नाही.

तामिळनाडू, मध्ये हिंदी पण बोलत नाहीत. पण ती माणसे मुंबईत आली कि मराठी शिकून घेतात, हिंदी चा सराव पण त्यांना होतो. मुंबईत कारखाने उभारून नोकरीच्या संधी उपलब्ध झाल्या,त्या कारखान्यातून मालक, व इतर कर्मचारी संपूर्ण देशातून आले. इथे अनेक तमिळ असे आहेत की आवर्जून मराठी बोलतात. हिंदी पण बोलतात.

भाषा च्या ह्या घनघोर युद्धात मी मात्र दुसरी कुठलीही भारतीय भाषा बोलू शकत नाही. आज मुंबईत पावलोपावली गुजराथी माणूस आहे. वाणी आहे. तो गुजराथ सोडून इकडे आला, त्याने मराठी बोललेच पाहिजे, तसा तो शिकला. सर्वांशी छान मराठीत बोलतो. माझा मराठी चा अभिमान सुखावतो. काही कामा निमित्त अहमदाबाद ला गेले. तेंव्हा जाणवले, मला गुजराथी समजते, पण घडाघडा बोलता कुठे येते.

राष्ट्र भाषा पण अस्खलित कुठे येते. मी माझ्या तोडक्या मोडक्या हिंदीत संवाद साधताना चुकून, ‘’अरे ये कितनीकू मिलता है. आपुनको नको’’. आता सांगा, धड हिंदी नाही, दुसरी भारतीय भाषा सराईत पणे बोलता येत नाही.आमच्या मराठी शाळा मुलांनी भराव्या म्हणून ‘खिचडी’ देवू ला गलो. ‘इंग्लिश’ मराठी माणसाला शिकावे लागते कारण जगाच्या व्यवहाराची ती भाषा आहे. त्याकरता शाळेत अभिनव उपक्रम राबवतो.

मराठीचे मात्र शुद्धलेखन सुद्धा पुढच्या आयुष्या करता कठीण होते. मराठी लिपी संगणकावर शोधतो. जे काही ज्ञान आमचे आहे, ते पाजळतो पण शुद्धलेखनाची साईट काही मिळत नाही. माझे काम मी चोख बजावतो, माझ्या ज्ञान, विश्वासावर मी दुसऱ्यांना हुशार करतो. मग सहज मिळेल अशी साईट तयार करा. आम्हालाही अभिमानच आहे. मराठी चा. प्रश्न शोधतो, चुका दाखवतो पण पर्याय तयार करत नाही. मी कशाला कोणीतरी करेल.

असा माझा भाषेचा घोळ आहे. मुंबईत ज्या प्रमाणात लोकसंख्या इतर राज्यातून येऊन स्थिरावली. तेव्हढी मराठी भाषा मोठी मोठी होत गेली. मुंबईत मी मराठीच बोलणार कारण भय्या असो, मल्याळी असो, नाहीतर बंगला देशी असू दे. त्यांनीच मराठी बोलले पाहिजे नसेल बोलायचे तर जा, आपल्या राज्यात परत. उगाच गर्दी करतात. मी असे बोलायचा अवकाश इथे पण ‘हे’ इतर आमच्याशी मराठी बोलतात. आपापसात त्यांच्या भाषेत बोलतात. हरकत नाही, माझ्याशी तरी मराठी बोलतात. केव्हढा दबदबा मराठीचा.

सात समुद्र पलीकडे पण मी मराठी…….अशी गर्जना करावी लागत नाही. पण माझ्या भाषा विकासाचे काय हा प्रश्नच राहतो. मल्याळी मराठीतून ओणम समजावून सांगतो. मी म्हंटले मला पण मल्याळी शिकायचे आहे. तर उत्तर येते, आम्हाला मराठी येते. आमचे मराठी चांगले होईल.

मी मग भारतीय भाषा शिकू का नको? कारण सगळे मराठी बोलू लागल्यावर मराठी च्या कक्षा विस्तृत होणार, मराठी मोठी भाषा होऊ लागली आहे. मस्कत मध्ये पण खूप ठिकाणी आम्ही मराठी बोलतो. आहे की नाही मराठी ची मज्जा. मराठी माणसे पण आवर्जून मराठी तून कशी आहेस? मी बरी. असे बोलून, इट इज सो हॉट टुडे. हे दुसरे वाक्य असते. मराठीतून मी ‘इंडियाला’ चालले असे सांगते, मल्याळी त्याच्या गावाचे नाव घेऊन सांगतो. मी माझे काम परदेशी करते आहे असे म्हंटल्यावर सहजीच ‘इंडिया’ असे येणार. मग हा मात्र मुंबई ला निघालात का? असे बोलतो. कारण त्याला त्याचे काम झाले की गाव आठवते. मी मुंबई मोठी झाली म्हणून खुश होते.

शाळेत फ्रेंच घेतो, संस्कृत च्या जवळची भाषा शिवाय परदेशी पण, भरपूर गुण देते. दहावी नंतर कशाला हवी? ‘गरज सरो……. असे आहे. पंजाबी, मल्याळी, तमिळ हा पर्याय नाहीच. आपापल्या राज्य भाषा शिका. दुसरी राज्य असे काही करीत नाहीत तर मराठी राज्यात का? प्रश्न बरोबर. पण अनेक भारतीय भाषा शिकले तर बिघडेल का? शिका तुम्ही कुठे ही, भारतात इतर भारतीय भाषा शिकवल्या जातात पण प्रमाण फारच कमी आहे. माझी तर शाळा संपली, जाऊ दे मला काय करायचे.

एक न धड…….असा माझा भाषा विकास खुंटला. मुंबई ला वित्त, व्यवसाय, उद्योग,ह्या करिता महानगर म्हणून जगात मानाचे स्थान आहे. अनेक अमराठी लोक इथे येऊन स्थिरावले, इथली संस्कृती शिकले. मराठी भाषा शिकून पिढ्यान पिढ्या राहतात. मराठी माणूस इतर भाषा शिकण्यास कमी पडतो का? इतर राज्यांमधून मुंबईच्या तुलनेत कमी मराठी लोक आहेत. की इतर राज्यांशी कमी संपर्क व्यवसाया निमित्त आहे.अंतर्मुख होवून विचार करते, मला गरज किती आहे? फारच कमी. जो येतो तो मराठी शिकतो.छान आहे मराठी विस्तृत होतीय. पण एक दिवस ह्यांच्या कडून मराठी शिकायला लागेल असे वाटते. जर कोणाला इतर भारतीय भाषा येत असल्या तर विकासाची प्रथम पायरी समजली जाते.राष्ट्र विकास होण्यासाठी भाषा संगम ला अनन्य साधारण महत्व आहे. नवीन भाषा म्हणजे एका संस्कृतीची ओळख, मैत्रीचे संबध विकसित होण्यासाठी हृदयाची भाषा शिकणे म्हणजेच अजून एका मातेची भाषा होय.

आता मी मस्कत ला अरेबिक सगळीकडे. माझ्या ओमानी शेजारणीला मी बटाटा, तवा, आंबा हे मराठीतून आम्ही असेच म्हणतो, कारण ही नावे इथे पण अशीच आहेत. हे हिंदीतून सांगते, तिला भारत माहिती आहे. तिला मुंबईत पाऊस एन्जोय करायला जायचे आहे. मला मराठी शिकव म्हणून मागे लागली आहे. शोप्स मराठीतून वाचायला यायला हवेत इतकी माहिती तिला आहे. इथे पण अरेबिक मध्ये आहेत म्हणून दुबई पेक्षा ग्रोथ कमी आहे. जाऊ दे मला काय? मला ओमानीना मराठी शिकवायला हवे.

‘म’………… माझ्या मराठी चा हे पक्के पाठ झाले आहे.

‘बालदिन’ निमित्त……………….. ‘अजिंक्य’

काल जेवण्यासाठी हॉटेल मध्ये गेलो होतो. पदार्थ सांगण्यासाठी मेनू कार्ड पाहत होतो. पदार्थ येई पर्यंत वेळ होता. साहजिकच शेजारी कोण आहे हे पाहीले. दोन छोटी मुले, मोठे साधारण चौथीत असावे, व छोटी शाळेत नुकतीच जाणारी असावी. छान गोंडस चेहऱ्याची बाळे होती. हॉटेल शांत वातावरणाचे होते, मंद सुरात संगीत होते. नेहमीच्या उडपी गलक्यापेक्षा कधीतरी ही शांतता पण आवडते. पदार्थ आले, माझे निरीक्षण आटोपते घेतले.

पहिला घास मुखी घेणार तोच……. ”पाप्प्पा” अशी आरोळी टारझन च्या थाटात आरपार कान भेदून पार गेली. आश्चर्य नाही वाटले कारण ही गर्जना मोठ्या गोंडस ने केली होती.आईने एक कटाक्ष टाकला आपल्या टारझनकडे. मला पाणी नको, पेप्सी पाहिजे. आवाज पाठोपाठ मागणी आली. आवाजाने वेटर ने तत्परतेने कॅन समोर आणून ठेवला.
छोटीने पाण्याचा ग्लास उपडा केला. मी घास घेत,ते मनोहारी दृश पाहात होते. तिच्या अंगावर पाणी सांडले, भोकाड पसरले. बाबा, तिला उचलून बाहेर गेला. मोठा, एकाग्रतेने आपला कॅन पीत होता. दहा मिनिटे शांतता झाली. मला वाटले चला, आता तरी फूड एन्जॉय करू. मग त्यांची ऑर्डर देणे सुरु झाले.

त्यांची आई माझ्या कडे तृप्तनेने पाहात होती. मी पण माझ्या स्मित रेषा हलवल्या. डीश ठेवल्या, छोटी लगेच उठली, चमचा घेऊन प्लेट वर संगीत निर्माण करू लागली. बाबांनी पहिले व आपल्या मोबाईल वरून टकटक करीत मान खाली घालून काम करू लागले. संगीत थांबले, जेंव्हा पदार्थ आले. मला हे नक्को! अरे तूच म्हणाला होतास न…. इति आई. पण आता नको. छोटी पुन्हा उठली, टेबल क्लोथ चा आधार घेत. क्षणार्धात मला कल्पना आली, की सगळी उलथापालथ झाली.

दुसरे टेबल त्यांनी निवडले, व चिकाटीने बसले. मुले टेबला मधून पकडा पकडी खेळू लागली. बाबा व आई त्यांच्या मोबाईल मध्ये गर्क. आपटा आपटी, दंगा यथेश्च केला. मला मात्र सांगावेसे वाटत होते, आईवडिलांना लक्ष द्या. हे घर नाही. बाहेर वागण्याचे संकेत त्यांना शिकवा. पण ह्यांनी मला दाटले, तू तुझे बघ. शाळा घेऊ नकोस. तेवढ्यात आई घास भरवित होती. माझ्या कडे बघून म्हणाली, आम्ही न इथे नेहमी येतो. मुल पण हॉटेल सवयीचे आहे म्हणून छान रमतात ( रमण्याची जागा ही!!?) बाहेर गेलो की अगदी लाज आणतात नाही. म्हणून आम्ही नेहमीच्या ठिकाणी आणतो……इति माता.

आता मात्र मला अगदी राहवेना विचारले, घरी असाच दंगा करत असतील .माता….. हो! ह्या पेक्षा ही खूप, हल्लीची कार्टी वाह्यात झालीत. धीट तर केव्हढी अगदी घरा सारखी वागतात. आपल्या वेळी अस नव्हत. जराही मोकळे पणा मिळत नसे. आजी, आजोबा. काका सगळ्यांचे धाक! फोरवर्ड आहे पिढी. तुम्हाला एकच का हा. मी……हो
माता…….. एकटा पडत असेल. कंटाळत असणार.
मी बोलायच्या ऐवजी, अजिंक्य म्हणाला……. ऑन्टी, मी माझ्या पेरेंट्स बरोबर खूप एन्जॉय करतो. ते माझे मित्र पण आहेत. मला कधीच एकटे वाटले नाही आणि हो मी छोटा असल्यापासून त्यांनी घरी हॉटेल मध्ये गेल्यावर बसायचे कसे? शांत पणे खाणे कसे खायचे शिकवले. आई तर इथल्या सारखे टेबल घरी तयार करायची रविवारी व आम्ही हॉटेल, हॉटेल म्हणून जेवायचो. प्लीज, आम्ही कार्टी नसतो. माझ्या आईने मला असे कधी ही हर्ट केले नाही.

दुसरा प्रसंग…….
घरी पाहुणे म्हणून एक कुटुंब आमंत्रित केले होते. दोन मुले, आईबाबा प्रवेशते झाले. पहिली पाच मिनिटे ओळख झाली. अजिंक्य त्या छोट्यांशी गप्पा करू लागला.पाहुण्यांचा अंदाज घेत मी स्टील का काच ग्लास, ते ठरवते. ह्या वेळी काहीही सांडले नाही. बाळे आई च्या बाजूला नम्रतेने बसली होती. मलाच अवघडले, घर पहा, या असे म्हणायचा अवकाश, माझ्या पायावर मीच धोंडा पडून घेतला. कसा ते पहा………

मुले, आई उठली पाहून, सोफ्यावर हाताच्या जागी वर चढली, व वडिलांच्या अंगावर कसे कोसळावे तशी सोफ्याच्या सीटवर दणादण कुदू लागली. अजिंक्य आता ट्रेंड झालाय, कंट्रोल करायला, ही उड्या मारायची जागा नाही, सोफ्यावर नीट बसा. दरवेळी मावशी रागवेल ह्नं! हा वाइट पणा मला मिळायचा. अजिंक्य सांभाळतो. पाच मिनिटे गप्प बसली, सोफ्या ला उशा आहेत हे त्यांच्या चाणाक्ष डोळ्यांनी पहिले, दादा कडे न पाहता एकमेकांना उशी ची मारामारी करायला लागले. अजिंक्य चटकन उठला व उशा काढून घेतल्या, व म्हणाला चला आपण माझ्या खोलीत खेळूया.

अजिंक्य, तुझ्या कडे यायला नको पुन्हा. रागावतोस का ? लहान आहेत ती. माझ्या लक्षात आले की आता हा उत्तर देणार, तसेच झाले……..
अजिंक्य……. मी रागवत नाही. ती छोटी आहेत हे मला समजत. सोफ्यावर नीट बसा सांगितले. माझ्या खोलीत खेळायला घेऊन जातो.
अरे तुझा सोफा खराब नाही होणार. त्यांचे पाय मळके नाहीत. उशांशी ते खेळतात. तुला माहिती नाही हा गेम, मज्जा येते.
ऑन्टी, मला खेळण्यासाठी आईने एक उशी वेगळी दिली आहे. मी आणि बाबा उशीची खूप फायटिंग खेळतो. सोफा मळका झाला तर पुसता येईल. पण फोम लूज झाला तर सोफा डयामेज होईल, स्प्रिंग खराब होतील म्हणून नीट बसा म्हंटले.

बघा, दादा किती हुशार आहे.

अजिंक्य ने हसून पहिले व मुलांना घेऊन आत गेला. ह्या म्याडम पण बघूया, अजिंक्य ची रूम म्हणत आत निघाल्या.
अरे, अजिंक्य, अजिबात पसारा नाही. गुड बॉय आहेस.
नाही ‘ऑन्टी’, पसारा असतो, फक्त कोणी येणार असले तर आई आठवण करून देते, ती व मी मिळून आवरतो.

मोठा फळा ठेवला आहेस खूप अभ्यास करतोस न.
ऑन्टी, हा फळा बाबांनी प्लायवूड वर काळा रंग लावून तयार केला.मला खूप मोठे चित्र, लहानपणी काढायचे असायचे. बाबा, नी भिंत डर्टी होते म्हणून हा तयार केला. माझ्या पेक्षा मोठा होता, त्यामुळे मज्जा यायची. आई बाबा पण मला जॉईन व्हायचे. ही पण बघा कशी एन्जॉय करतात.

अजिंक्य बरेचसे सांभाळतो. तरी पण पाहुण्यांच्या ह्या बाळांनी, माशांच्या पेटीत कोक ओतले, दिवाळीची रांगोळी पायांनी उधवस्त करतात, गणपती पुढे ठेवलेले कुंकू, प्रसाद स्वताकडे खेचून घेतात, फ्रीज घरी खेळायची सवय! असल्याने उघडून दाणकन आपटून बंद ही करतात.

अजिंक्य ने ही, लहानपणी त्याचे नवे कोरे विमान पाण्यात धवून काढले होते, ते तर बादच झाले पण त्याच्या बाबाने सर्व खोलून त्याचे पार्टस, त्याचे काम सोप्या भाषेत त्याला समजावून सांगितले.कूलर च्या फ्ल्याप मध्ये गवारीच्या शेंगा घातल्या, पुन्हा त्याचा वर्क शॉप घेण्यात आला. त्याचे आवडते काका, पोलीस, कंडक्टर, फायर ब्रिगेड अंकल, पोस्टमन जमेल तसे मी त्याला घेऊन गेले, त्यांचे काम त्याला दाखवले.

आता १३ पूर्ण झाली. ऐलायसी पोलिसी, नेट वर अजुकेशनल साईट्स आवडीने बघतो, आमच्या बरोबर चर्चा करतो. वेगवेगळ्या फ्याक्टरी दाखवतो, त्याच्या बरोबर संध्याकाळी खेळायला हेंल्थ क्लबला जातो. फेस बुक, पी. एस. टू. खेळण्यासाठी पार्टनर होतो. आठवीचा अभ्यास घेतो. त्याची स्वताची मत तयार होतात. आम्ही मतांना योग्य दिशा दाखवण्याचे काम करतो. त्याला प्राडो, पजेरो गाड्या आवडतात, बाबांची पण आवड आहे, म्हणून पगारात किती आलौंस मिळतो, त्यामध्ये ह्या गाड्यांचा ई एम आय कसा बसेल ह्याचा प्रोजेक्ट तो करतो. त्याला गाड्यांच्या शो रूम मध्ये घेऊन जातो, प्रश्न तो विचारतो. पैशांचा हिशोब करतो. चाललय जस जमेल तसं

आता मोठा होतोय…… बाबां पेक्षा उंच झालाय.

लहान बाळे आली की घर त्यांच्या गडबडीने आनंदीत होते. मुले निरागस असतात. ती काही सांगून मस्ती करीत नाहीत. मग सांगणार केंव्हा? कितीही वेळा सांगितले तरी लक्षात थोडेच राहते. संकेत, आणि शिष्टाचार हे मोठ्या माणसाकरता ठीक आहे. मग मुलांना मोकळीक नाही रहात. अगदी बरोबर, लहानच आहेत ती, पण आपण तर मोठे असतो.

मी शाळेत असताना विद्यार्थांच्या पालकांशी संवाद साधायची तेंव्हा हे प्रश्न विचारायचे. तुम्ही जेंव्हा वेळ मिळेल तसा मुलां बरोबर व्यतीत करा. त्यांच्या बरोबर कार्टून पहा, गेम खेळा, खास गप्पा करायला बसा. मग बघा मी काही सांगायची गरज नाही. त्यांच्या अपेक्षा, गरजा, आनंद, त्यांची काळजी तेच छान भाषेत आपल्याला सांगतात.

‘लहानपण देगा देवा, माझ्या जीवनातला अमुल्य ठेवा’.

मुले निरागस च असतात. द्वाड पणा पण छोट्यानीच करावा. अगदी १०८% मान्य. पण आईबाबा होणे हा निसर्गाने दिलेला सन्मान, सुजाण पालक म्हणून स्वीकारलात तर आपलीच ही पिढी सुसंस्कारित, योग्य म्यानर्स सहीत मोठीहोईल. निरागसता जपणे आवश्यक आहेच, अजिंक्य ला मोठे करताना, माझा अनुभव मी मांडला……कच्चा घडा, आपणच पक्का घडवायचा, आकार देणे आपल्या हातात आहे.

बालदिना च्या शुभेश्च्या. आपण ही बाल होऊ या व त्यांचे मन ओळखून, पुन्हा अनेकदा ,लहानपणाचा अनुभव घेउया.

अभ्यासाच्या नावाने ………………

अभ्यासाच्या नावाने ………………

चार दिवस नेट नव्हते म्हणून कधी नव्हे ते बऱ्याच वेळ टीव्ही समोर होते. आज पोस्ट चे नाव पूर्ण लिहू शकले नाही. खूप दिवस मनात रेंगाळत होता विषय, तशी मी सुरवात दम दमा दम……पोस्ट (सहजच ब्लॉग वर आहे) ने केली होती. परंतु अस्वस्थता होतीच. त्याचवेळी मी टी. व्ही. वर पाहिले कि, महेश मांजरेकरचा ‘शिक्षणाचा आयचा घो’ नवीन सिनेमा येतोय.

मला अजूनही आठवते, अल्यूमिनीअम ची पत्र्याची पेटी, किंवा पिवळे दप्तर, कडीचा दोन कप्प्याचा खाऊचा डब्बा, कितीतरी सेंटी…….भावनिक गोष्टी जुडलेल्या आहेत. शाळेचा प्रत्येक कोपरा एक पोस्ट होऊ शकते. आठवणींचे ठीक आहे हो आपल्याकडे त्या आहेत, पण आता शाळेतील विद्यार्थी मला किंवा तुम्हाला बघणे सुद्धा कठीण होऊन बसले आहे. जड जड स्याक्स पाठीवर, पाठीचे धनुष्य झालेले, पाय ओढत, शाळेकडे जाताना दिसतात. काय आठवणी घेऊन ते बाहेर पडतील? शिक्षण, शाळा म्हटले की आमची लेखणी सरसावली म्हणून समजा. पूर्वी पण पुस्तके होतीच, अभ्यास ही असायचाच, पण दडपण कधी जाणवले नाही.

एकेदिवशी लेकाने मला प्रश्न विचारला, ”आई, तुला शाळेचे खूप कळते ना मग असा देश शोधून दे की, ज्या शाळेत इतिहास भूगोल चे प्रोजेक्ट असतील, पेपर नसेल. मी मोठा झालो की त्या देशात नोकरी शोधेन. माझ्या मुलांना मी हा त्रास होऊ देणार नाही” समाज शास्त्राची शिक्षिका मी हतबल झाले. मी कमी पडले का शिकवायला? इतिहास तर मी त्याला गोष्टी सारखा शिकवला, भूगोल तर माझाच विषय. छे! मी नाही कमी पडले. आज २० वर्ष होतील मी शिक्षिका होऊन, मग हा असे का बरे बोलला? गुणात मोजायचे तर २ ते ४ इतकेच गुण कमी असतात. पण ह्या विषयांची उदासीनता खूप आहे आणि शिक्षण क्षेत्रात तर खूप खोल रुजलेली आहे. त्याचाच परिणाम मुलांना भोगावा लागतो. मुलाची नावाजलेली सी. बी. एस. सी शाळा आहे. शाळेत मी पण काही काळ शिक्षिका म्हणून काम केले आहे.

१) सध्या फळ्यांच्या ऐवजी स्मार्ट इलेक्ट्रोनिक बोर्ड आहेत. शिक्षिका जागेवर इलेक्ट्रोनिक पेन्सिलीने लिहिते, बोर्ड वर आपोआपच उमटते. शिक्षकांचे खूप परिश्रम कमी होतात.
२) आठवड्याचा अभ्यासक्रम पालकांना त्यांच्या ई.मेल वर पाठवला जातो.
३) विषयां नुसार दृक श्रवण फिती दाखवल्या जातात.
४) सुसज्ज संगणक वर्ग आहे, जिम आहे, तरणतलाव आहे, शाळेचे डॉक्टर आहेत.
५) सध्या दहावीला मुलांना लॉकर उपलब्ध आहेत,ज्यांची एक चावी वर्ग शिक्षक कडे असते.

अशा अनेक सुसज्ज शाळा मॉल प्रमाणे, भरपूर फी घेऊन भारतात पण आहेत. मुले खुश ठेवण्याचा प्रयत्न. शाळेत शिक्षक पण उच्च विद्याभूषित अनुभवी असतात. ह्या मलम पट्या, मूळ दुखणे जात तर नाहीच, तर ते अधिक दुख:कारी, ठरतात. वरील पैकी काहीतरी बाबी महापालिकेच्या शाळेत करता येण्याजोग्या आहेत. बोर्ड आता नाही तरी परीक्षा आहेतच की, काही विषय प्रयोगशील ठेऊन त्याचे मूल्यमापन करावे. दुःख रहाते याचे कि, विद्यार्थ्यांना ते घोकून निरर्थक पणे पाठ करून जावे लागते. शिक्षण मंत्री सुशिक्षित हवेत निदान शिक्षक तरी द्वि पदवीधर हवा तर समाज शास्त्र हे प्रोजेक्ट द्वारे कसे शिकवता येते इतकी डेप्थ त्याच्या, ज्ञाना करता तयार होते. शाळा कितीही सुसज्ज असली तरी पुस्तकांचे ओझे, अकारण वह्या, ते तरी कमी करणे शक्य आहे.

समाज शास्त्र शिकवा पण ते प्रोजेक्ट चे माध्यम करून. बाबर ला किती मुले ह्याचा संगणक युगात कितीसा उपयोग? जगात भारतीय बुद्धिमान म्हणून, भारतीय शिक्षण स्तर उच्च प्रतीचे आहे. हि अभिमानास्पद बाब आहे मग हाच भारतीय कॉर्पोरेट जगात स्ट्रगल करताना दिसतो. कारण शिक्षणाच्या ह्या अकारण वाढवलेल्या ओझ्यामुळे, दडपणामुळे.
मला लेकाने असा प्रश्न का विचारला त्याचे उत्तर मिळाले. अकारण वाढवलेल्या पाठांमुळे मुले कंटाळतात व उदासीनता वाढू लागते. शिक्षण पद्धती शासन स्तरा पासून बदलली पाहिजे. नुसते अद्यावत शाळा निर्माण करून होणार नाही तर मूळ अभ्यासक्रम बदला. विषयांची डेप्थ ठेवा पण काही विषय प्रयोगशील करून मुलांचा, पालकांचा ताण कमी झाला तर सुसंकारीत शिक्षणाचा अभिमान पुढील पिढीत निर्माण होईल. माझी शाळा छान आहे पण इंडियातून बोर्ड कमी केले पण लिहिण्याच्या परीक्षे पेक्षा प्रोजेक्ट का ठेवले नाही निदान सोशल विषय तरी . आम्हालाही शिवाजी, झाशी ची राणी आवडतात पण सोशल बोअर होते. अशी पिढी बनणे घातक आहे. स्वातंत्र्याची जाणीव, बलिदाने, वैभव शाली इतिहास, वैविध्य पूर्ण भूगोल हि भारतीय परंपरा पुढे अविरत जाण्यासाठी शिक्षण, अभ्यास पद्धती, ह्यावर विचार व कृती करून काळाच्या गरजानुसार नवीन बदल गरजेचे आहे .

हुमायून ने काय केले हा इतिहास शाळेतच तासाला विद्यार्थांचा गट तयार करून प्रोजेक्ट सारखे लिहून घेतले तर, विषय गोडी वाढून सर्वांचा सहभाग असेल. गणित ला महत्व व्यावहारिक जगात आहे. शाळेत त्याचा सराव अधिक करून घेतला तर गणित बद्धल आत्मविश्वास दुणावेल. सगळे करणे शक्य आहे जर शासनाने शिक्षक शाळे करता ठेवले तर, मतदान, जनगणना, अकारण ठेवलेले उपक्रम अशा अनेक गोष्टीं करिता शिक्षक भरडला जातो. महिने महिने शाळेशी संपर्क नसतो. मुख्य म्हणजे शिक्षक व विद्यार्थी हे नाते ताणाशिवाय मुक्त होईल. कार्यानुभव सारखे विषय शाळेत असतात, त्यांना पूरक असे प्रशिक्षण ठेवले तर मुलांना त्यांच्या व्यवसायाकरिता उपयोगी ठरेल. महाराष्ट्र राज्यात ह्या बाबी कमी आढळतात. केंद्र सरकार त्यांच्या शाळा अद्यावत करते तर मग मराठी शाळा मागे का? कारण राज्य शिक्षण मंडळ! घरचा अभ्यास कधी द्यायचा ह्याचे पण नियोजन करून वेळापत्रक दिले तर वह्यांचे ओझे कमी होऊ शकते. वर्षभर मुलांना ताण कमी पडू शकतो. असे बरेच पर्याय आहेत.राज्य, शिक्षण मंडळ यांच्या नियोजनावर अवलंबून आहे.

‘शिक्षणाचा आयचा घो’ ……………..सिनेमा, बघू या कसा विचार मांडतो ते

त्यांचा, आदेश…………….

कालच्या दिवसभरच्या धावपळीने थकवा वाटत होता. मनासारखे घडले नाही म्हणून नाराज होतो. रेल्वे च्या गर्दीतून बाहेर पडल्यावर, बंद पुकारलेला असल्याने रस्त्यावर जी शांतता जाणवते, तसे मनाचे झाले. प्रत्येक जण एकटा होऊन रस्ता चालत असतो, सर्वांचा लोभ मिळवणारा मी, आज तसाच एकटा पडलोय. शांततेचा भंग करणारी दारावरची थाप ऐकून बेल वाजवायचे पण कष्ट नको ह्यांना, कोण बर असेल विचार करीत दार उघडले.

दाराच्या उंबऱ्या वर चेहेरा पण दिसणार नाही अशा पद्धतीने, ‘त्या’ दोन्ही हातात बाळाला आडवे करावे तसे, एकावर एक पिशव्यांची चळत ठेऊन फक्त डोळ्यांनी मला पाहत होत्या. खुणेनेच मला सांगितले, पायाने दार वाजविले. मिलियन डॉलर चे नाही, पण मोनालिसा एवढे तरी हास्य चेहऱ्यावर आणत म्हणालो, ”या”

‘त्याही’ शांतपणे घरात आल्या. पिशव्यांची चळत खाली ठेवायला साहजिकच मदत केली. मध्यमवयीन गृहिणी असाव्या. ‘त्या’ पाणी पीत होत्या व मी विचार करीत होतो. कोण आहेत ह्या? हे काय आणले आहे. दोघां मध्ये शांतता होती, जी मला असह्य शांत करते. मी बैचन होऊन ‘त्या’ बोलणार कधी ह्याची वाट पाहत होतो.

”त्या”——– ‘नमस्कार’ आज मी मुदामहून आपणाला भेटण्यासाठी आले. सुखात सगळे येतात, दुखा:त जो येतो, तोच आपला म्हणायचा

(विचार आला माझे दुखः दिसते वाटत चेहेऱ्यावर) तरी भाबडेपणा चेहऱ्यावर आणला, छे! हो, असे काही नाही.

”त्या”——— असो! वाईट गोष्टी कशाला आठवा. हे सर्व तुम्हाला द्यायला आले.

(दुखा:त पण भेटी येतात, हे ‘दादुनी’ सांगितले नव्हते) कोणी पाठविले तुम्हाला?

”त्या”———– कोणी कशाला पाठवेल. तुमच्या मुळे मी हुशार झाले, म्हणून स्वतः निर्णय घेतला व आले.

(मी शिक्षकाचे काम कधीही केले नाही)

———————तुमची ओढ इतकी आहे कि मी ठरवलेच काही नाही आपण साथ द्यायची. त्या साठी ह्यांच्याशी पण भांडून इकडे आले.

(मी ओढ लावण्यासारखे कधीच बाहेर काही केले नाही. मला राणी मुखर्जी सारखी दिसणारी, माझी बायको मोठ्ठी असली तरी, आजही प्रिय आहे)————तुम्ही भांडून का आलात?

”त्या”—————-फारच कोरडे पणाने बोलता आपण. पूर्वी कसे मधाळ हसू चेहऱ्यावर असायचे, शब्दात गोडवा जाणवायचा. तरी मी ह्यांना म्हणाले कि, ”राजकारणात भल्या भल्यांचे माकड होते”.

मी समाजकार्याची आवड म्हणून राजकारणात आलो. घरा, घरातून फिरताना अडचणी जाणवत होत्या. माझी मदत करण्याची ईच्छा होती. जाऊ दे भूतकाळ आहे माझा.

(तरीही ‘त्या’ आपला हेका सोडत नव्हत्या)

”त्या”————– किती! दुखी: केलेत आम्हाला तुम्ही. सासरी आल्यावर पण मी एव्हढी रडले नव्हते. आता नवीन लोकां बरोबर जमून घेते पण नाईलाजानेच. माझ्या सारख्या दुखी: झालेल्या आपल्या माहीम मधल्या १०० जणी कडे मी गेले.

कशाला एवढा त्रास घेतलात. आधीच संसारातुनी वेळ काढुनी……….व्याप सांभाळणे कठीण असते. आभारी आहे. आता जरी घरी बसलो तरी ‘दादुना’ सांगेन जमेल तशी मदत करायला.

“त्या”———– तीन नि तीन अपेक्षा पण नव्ह्ती, साईबाबा न कडून डोके मिळवून आले. ‘ सर दे साई’ असे मागत होते म्हणे! म्हणून तेरा झाले.

एकाच घराच्या दोन भिंती, कशाला इकडचे, तिकडचे असा फरक करा. दरवाजा तर भक्कम आहे. शून्य तरी नाही, शंभर व्हायला वेळ कितीसा लागेल. ‘जय भवानी, जय शिवाजी’

”त्या”———— जाऊदे ते समाजकारण आणि राजकारण. मी आले कशाला ते सांगते व जाते कारण पुढच्या दीपावलीत ह्यांना खर्च नको, हेच ९८ जणींना समजावून भेट द्यायला आले.

कोण ९८? कळले नाही. उखाणे ऐकण्याची सवय होती मला एककेकाळी, पण हे सांगितल्या पेक्षा १० वस्तू वेगळ्या आणल्या सारखे झाले.

”त्या”————९८ माझ्या मैत्रिणी अधिक मी १ म्हणजे ९९ झाल्या. एकाचीच तर गंमत आहे.

(ह्या तर आकडे सांगायला लागल्या, ‘मातोश्रींना’ बोलावू का मदतीला) ——एक आकडा सविस्तर सांगता का?

”त्या”——— मी हावभाव करते. ओळखा.

त्यांनी बोटांनी १ आकडा दाखवला, व नंतर २ अक्षरी शब्द आहे असा दमशेरा खेळ खेळला. मला काहीही बोध झाला नाही. गोड बोलून कोडी घालणारा मी, सोन्याचे नाणे हरविल्या सारखा माझा चेहेरा झाला.———कळले नाही हो मला.

”त्या”———–९९ चा हिशोब कळला असेल. आता हा १ आकडा म्हणजे, “ ……………..योग तुझा घडावा” ह्या श्लोकाची सुरवात जिथून होते तो शब्द म्हणा.

ठीक आहे, ठीक आहे. म्हणजे, सदा……………असेच न! पण ह्या पिशव्यातून आहे तरी काय?

”त्या”———-आमच्या ९९ जणींच्या व सदा ची सर्वदा असणारीने पण, आमच्या नवऱ्यानी तुम्हाला लक्षात ठेवले नाही. ह्याचा फार राग आला आहे म्हणून तुम्ही दिलेल्या ‘पैठण्या’ परत द्यायला आणल्या आहेत.

मी घेऊन काय करू?

”वाहिनी”———-आम्ही प्रेमाने देतोय. सदा च्या घरातून निरोप आहे, ”तुम्ही दिलेली पैठणी नेसून ह्यांना ओवाळणार होते पण आता शक्य नाही. राग मानू नका. पण ह्यांना कदर नाही हो! म्हणून मागच्या दारातून परत करते” आता या न तुम्ही पहिल्या सारखे, दारात छान रांगोळी घालते. पाच वर्ष तरी पुन्हा सवड आहे आहे तुम्हाला. तुमची पैठणी नेसून तुम्हालाच ओवाळायचे आहे आम्हाला, हे ही खूष पैठणीचा खर्च नको ………”भाऊजी”

मी नेहमी सारखा हसलो. वाहिनी नी मोबाईल केला, ”अहो!” पलीकडून आवाज ऎकू आला ”आला आला बांदेकर पैठणी घेऊन परत आला”

असा त्यांचा आदेश मी स्वीकारला