खूप दिवस झाले मी लिहीत का बर नाही याचा विचार करत होते. लिहिण्यासारखे विशेष काही नव्हते. आज विषय मिळाला. गढूळपणाचा शहाणा अनुभव मिळाला. गढूळपणा हा पाण्याशी निगडीत असा शब्द आहे. गढूळ पाणी पिण्यास अपायकारक असते. पण हेच पाणी स्थलांतरित पक्षांचा एक प्रमुख अन्न स्त्रोत असतो. त्याच गढूळ पाण्यात जैविक विविधता असते. फ्लेमिंगो हे खर तर भारतातील स्थलांतरित पक्षी आहेत. समुद्राच्या खाड्या त्यांचे स्थान असते.
गढूळ पाण्यातील फ्लेमिंगो पाहताना पाण्याची एक विलक्षण शांतता जाणवत होती. खूप सारे एकत्र असूनही त्यांच्या पायांनी पाण्यावर रेष ही उमटत नव्हती. आपल्या काटकुळ्या पण मजबूत पायांनी ते स्थिर उभे होते. एकत्र असताना त्यांचा आवाज मात्र त्यांच्या नेटवर्क चे काम करत होता. पाणी जेवढे शांत तेवढेच गढूळ असूनही त्यात हालचाल नसल्याने पाण्यातील गाळ तळाशी बसला होता. गढूळ पाण्यालाही एवढी पारदर्शकता होती कि. काठाला उभी असणारी झाडे पाण्यात आरशासारखी स्वच्छ दिसत होती.
कॅमेरा ने फ्लेमिगो टिपणे हे छान होतेच पण त्याहूनही अधिक भावली ती गढूळ पाण्याने दिलेली पारदर्शकता, प्रतिबिंब पण कसं स्वच्छ होत. पाण्यात उलटी दिसत असलेली काठावरची झाडे सुद्धा जणू काही साधे पान सुद्धा पाण्यात पाडत नसतील. निसर्ग इतका स्वतःला सांभाळतो हे प्रथमच अशा ठिकाणी जाणवले. मन शांत आणि स्तब्ध झाले. डोळ्यांच्या कॅमेराने पाहण्यापेक्षा फ्लेमिंगो होऊन स्तब्ध कसे असावे हे शिकवते झाले. खाडीचे पाणी खाजण होऊन स्थिरावले होते. खारफुटीच्या वाढीने समृद्ध असे जीवन तिथे चैतन्य होऊन जगत होते.
फ्लेमिंगो बरोबर पांढरे शुभ्र बगळे सुद्धा त्या ठिकाणी स्तब्ध उभे राहून चिंतनाचा अविर्भाव आणून खाद्याकडे डोळा ठेवून होते. स्थलांतरित पक्ष्यांना त्यांची जागा त्यांची स्पेस त्या बगळ्यांनी जपली होती. बगळे त्या गावाचे कायमचे होते पण आलेल्या पाहुण्यांना जपणे हे त्यांचे अगत्य आवडले. फ्लेमिंगो मध्ये पण दोन प्रकार असतात लहान आणि मोठे आकाराने असतात. त्यांच्या गुलाबी पायांचे रंग लहान मोठे जातीचे आहेत त्या प्रमाणे असतात.
पायांचा गुलाबी रंग आणि अंगी मात्र करडा पांढुरका असे त्याचे रूप असते. गुलाबी रंगांचे पाय गढूळ पाण्यात सुद्धा जगण्याचा गुलाबी प्रेमाचा संदेश देतात. अंगी रंग कसाही असो पाय मात्र प्रेमाच्या रंगात आहेत. आहे त्या परिस्थितीत गुलाबी ठामपणा किरकोळ दिसणाऱ्या पायाच्या शक्तीत भक्कम पणा देतात. कॅमेरात फोटो टिपताना फ्लेमिंगो चे थवे म्हणजे गुलाबी लांब देठाच्या फुलाचे उडणे वाटते. कॅमेरात पक्ष्यांचे डोळे आणि भाव टिपण्याची धडपड खूप स्थिरपणे करावी लागते. फोटोग्राफर च्या मनातले द्वंद शांत होते ते असते पक्ष्यांचे फोटो काढणे. ह्या पक्ष्यांच्या स्थलांतराची बरीच माहिती इंटरनेट वर उपलब्ध आहेच.
कॅमेरा हाताळणारा न बोलणारा कवी, लेखक, वाचक आणि मुख्य म्हणजे तो उत्तम मन जाणणारा असतो. बरेच जण हा अविर्भाव आणतात कि आंम्ही भावनांना अवास्तव महत्व देत नाहीत पण अशाच कॅमेरा मागे न दिसणारे भाव डोळ्यात साठवून कॅमेरात टिपून घेतात. पक्षी त्याच जागी असतात फक्त वेगवेगळे कॅमेरा तेच पक्षी विविध रुपात सदर करतात. निशब्द निसर्गात असलेला शांतपणा हा कॅमेरा आणि पक्षी ह्यांना जोडणारा दुवा असतो. हेच फ्लेमिंगो गढूळ पाण्यात सुद्धा पारदर्शी दिसतात. काय पहायचे हे ठरवावे लागते पण कसे पहावे ह्या साठी पक्षांचे आयुष्य हवे.
बोलणारे माझे मन अबोल झाले आणि त्याच गढूळ पाण्यात पारदर्शी पणा शोधू लागले. हळूच पाण्यात डोकावून माझेच प्रतिबिंब दिसते का हे आजमावयला लागले. पाणी गाळ तळाशी बसल्याने स्वच्छ होतेच फक्त त्यात डोकावयाचे माझे मन गढूळ होते. खूप सारा गढूळ पणा माझ्यात प्रवाही करून आले होते. तो जेंव्हा ह्या पाण्यात पाहू लागले तेंव्हा तो गाळ हि मनाच्या तळाशी बसला आणि मलाच पारदर्शी पाहून फ्लेमिंगो चे गुलाबी पाय मला लाभले. करड्या पांढुरक्या पंखांच्या सहायाने स्थिर झाले.
अचानक जेंव्हा शांतता जेंव्हा अलवार पणे मनी भिनू लागते आणि खाडीच्या पाण्यातील खरखरीत खारफुटीची झाडे सुद्धा मोहक वाटतात. फोटो काढणे तेही उत्तम हा सरावाचा भाग आहे पण निदान परिसरात आपल्याला शोधणे हे सोप्पे असते.
आजूबाजूचा निसर्ग हा नेहमीच मला सुखावतो. डोंगरांचे सौंदर्य मन वर करून सहज बघता येते. खाडीच्या उग्र वासामध्ये सुंदर सौंदर्य असते हे जाणवले. खाडीचा उग्र वास जाणवत नाही. जशी भरती येते तसे खाजण भरू लागते आणि खारफुटीच्या झाडात विसावलेले अनेक पक्षी स्वप्ने सोडून वास्तव तितक्याच सहजतेने स्वीकारतात. सूर्य जसा वर वर चढू लागतो तसे हे गुलाबी पाय भरती ओहोटीच्या प्रमाणे खाजणातील आपली जागा बदलतात अगदी सहजतेने, बदल आपलासा करतात.
थोड्या अंतरावर असलेला समुद्राचा खळखळाट ऐकू ही येत नाही. भरतीचे पाणी खडी अलगद आपल्या मिठीत घेते. नवीन आलेले पाणी गाळावर अलगद पसरते. ऐकू येते ती फक्त फ्लेमिंगो ची भाषा, आपल्या सहकाऱ्यांना साथ घेण्याची साद असते. निसर्गात फुलत असलेले अलवार प्रेम सादाला प्रतिसाद कसा द्यावा हे उत्फुल्ल जगत असते.
मोबाईल चे रिंगटोन नको त्या वेळी वाजून फोटोग्राफर चे लक्ष एक सेकंद विचलित करतात, त्या सेकंदात पाण्यात स्वतःचे प्रतिबिंब पाहत असणारा बगळा निघून जातो. नजरेचा वेध चुकल्याने चुटपुटत बसत विव्हळत बसायचे नसते तर पुढच्या पक्ष्याकडे नवीन आशेने शोध घ्यावा लागतो. कॅमेरा हातात असतो, डोळ्यांनी टिपण्याची हौस असते. समोर असलेला निसर्ग साद घालतोच गुलाबी पायांचे आकर्षण असते. अशी ही छोटीशी सफर खूप काही सांगून जाते.
अबोलपणाचा कॅमेराचा अनुभव शब्दात बोलका करून गढूळ पाण्यातील पारदर्शी फ्लेमिंगोचे गुलाबी पाय मनात स्थिर करून कॅमेरानी टिपून घेतले.
मनास आलेला शांतपणा फोटोग्राफर सकाळ फारच शांत आहे असे सहज लिहून इंटरनेट वर पाठवतो आणि त्यातूनच उलगडली गढूळ पाण्यातील पारदर्शी फ्लेमिंगो फोटोग्राफी…….