एक आहे काऊ…………

एक होता काऊ आणि एक होती चिऊ पासून अनेक गोष्टी आपण ऐकत आलो आहोत. कावळ्याच्या हुशारीच्या गोष्टी तर अनंत काळापर्यंत अस्तित्वात राहणार आहेतच. प्रत्येक भाषेत हा काऊ आपल्याला भेटतच असतो. चिमणी आपल्या संसारात इतकी मग्न होती की दाराबाहेर मैत्री करता उभा असलेला कावळा तिने दार उघडून कधीही घरात घेतला नाही. तिला तिच्या पिल्लांची काळजी होती, एकदा का त्याला घरात घेतला तर तो आपल्यालाच हुसकावून बाहेर काढेल. चिऊची काळजी व्यर्थ नसावी.

‘पैलतोगे काऊ कोकताहे, शकून ग माये सांगताहे…..’ असा हा काऊ शुभ शकुना करता पण आहे. हाच जर जिवंत माणसाला स्पर्श करून गेला तर सूतक लागले म्हणून विधी धर्मात आहेत. नेहमी घराबाहेर राहणारा पण आईने ओळख करून दिलेला, बाळाच्या बरोबरीने हा पण घास खाणारा असतो. आईला न घाबरता बिनदिक्कत घास घेऊन जातो. आई हाच काळा, कर्कश ओरडणारा पक्षी प्रथम का बरे दाखवीत आली असावी.

रंगीत जग खूप सुंदर आहे पण काळा पण तितकाच सुरेख आहे. बाळाची नजर स्थिर व्हावी व कर्कश आवाजाने ऐकण्याची एकाग्रता शक्ती वाढावी असा हेतू असेल का? तोंडात दात नसताना ह्याची ओळख होते. आईला बिलगून घास खाताना हाच काऊ प्रथम भेटतो. मग छोटीशी चिऊ अवतरते, सुंदर नाजूक भावना आई दाखवते. मन धीट करण्याकरता काऊ खूप मदत करतो. आईच्या विश्वासहार्य आधाराने बाळ कठोर आवाज स्वीकारायला व काळा रंग ओळखायला शिकते.

घरी येणारा पाहुणा ह्याच्या मुळे आधीच कळतो. निसर्गात आपत्ती येणार असेल, किंवा ती ज्या झाडावर राहत असेल त्याच्या आजूबाजूला जर साप येत असेल तर अनेक कावळे एकत्र येऊन एकच कर्कश गलका करतात. अचानक प्रचंड संख्येने कसे व केंव्हा एकत्र हे आपल्याला कळतच नाही. ह्यांचे नेटवर्क खूप पावरफुल आहे. आपल्याला अंदाज येतो की अवकाळी पाऊस, वादळ, गारा तत्सम गोष्टी घडणार आहेत. हा स्वतः सतर्क असतो व इतरानाही सावध करतो. पक्षी किंवा प्राणी हे सूचक असतात पण हाच एक पक्षी आहे की एकत्रित ओळ करून मोठ्या संख्येने दिसतो.

आपल्या घरट्यात कोकिळेची अंडी पण उबवतो, त्याला अंड्याची संख्या मोजता येत नाही का? एखादे जास्तीचे अंडे आहे ह्याची जाणीव असूनही अतिशय प्रेमळ पणे त्या अंड्यातून पिल्लू बाहेर येईपर्यंत आपल्या अंड्या सारखी काळजी घेतो. ह्याला कोणीही फसवू शकत नाही कारण ह्याच्या कडे बुद्धी आहे, मग कोकिळा कशी बरे निवांत राहते? कारण शोधले तर, माहित असूनही उगाचच एखाद्याच्या निष्पाप जीव घ्यायचा ह्याच्या तत्वात बसत नसावे. पण कोणी खोडी काढली तर डोक्यावर चोच मारून जखमी करण्याची नामी शक्कल पण स्वभावात दिसते. ह्याला पण मानवाचा स्पर्श झाला तर ह्याचे भाई ह्याला टोच मारून मारून जखमी करून मृत करतात. जखमी झाला तर त्याच्या भोवती जमून तो मरे पर्यंत एकच कर्कशाट करतात. मेलेला कावळा फारसा दिसत नाही कारण म्हणे ह्याला दीर्घायुष आहे.

सूतक कार्यात तर ह्याला अनन्य साधारण महत्व आहे. दहाव्याच्या पिंडाला हा शिवलाच पाहिजे नाहीतर आत्म्याच्या इच्छा अतृप्त आहेत असे शास्त्रात मान्य आहे, असे अनुभव ही येतात. व्यक्तीच्या आवडीची गोष्ट नेमकी कावळ्या कडून उचलली जाते. अनेक कावळे तिथे घुटमळत असतात पण पिंड ठेवल्यावर एखादा पुढे येतो व झपाट्याने घास घेऊन जातो. आत्म्याच्या इच्छा अतृप्त असतील तर संबधित नातेवाईकांनी तिथे उच्चारून त्या पूर्ण करण्याचे जो पर्यंत वचन कावळ्याच्या कानात पडत नाहीत तो पर्यंत माणसाना ताटकळून रहावे लागते.

असा हा काऊ कधी नव्हे तर मला रोज सकाळी खिडकीच्या बाहेर झाडावर एक मिनिटा करता दिसू लागला आहे. हीच वेळ होती की मला आईचा भारतातून फोन यायचा. माझा आवाज फोन वर (मस्कत हून) कावळ्याने ऐकला आणि ठाण्यात पिंडाला कावळा शिवला. असा माझे व आईचे नेटवर्क काऊ च्या माध्यमातून सुरु झाले. हाच आधार मला फोन च्या ऐवजी तो भेटून देतो. आज मला हा काऊ उद्याचा विश्वास देत आहे. एक काउ माझ्याकरता आहे.