‘हिरवे हिरवे गार गालिचे……..’ अस म्हंटल कि डोळ्यासमोर येतो तो नितांत सुंदर असा निसर्ग. भारतातील पावसाळी अनुभव घ्यायचा असेल तर ओमान मध्ये पण निसर्ग आहे. हिरवा कच्च….. डोंगरावरून धोधो पडणारे धबधबे…….अगदी आपल्यासारखी लाल माती सगळे कसे जणू काही फार पूर्वी भारताशीच भूमी म्हणून जोडले असावे. इथे जून ते सप्टेंबर’ खरीप हंगाम’ असतो. येथील लोक खरीप सिझन असेच म्हणतात. रब्बी आणि खरीप ह्या दोन हंगामाची भूगोलात घट्टपणे साथ असतेच. ह्या हंगामात आपल्यासारखा मान्सून पण आहे.
मस्कत शहरानंतर ओमान मधील हे दुसरे मोठे शहर. मस्कत पासून दक्षिणेला आहे. साधारण पणे रात्री बस मध्ये बसले तर पहाट उजाडे पर्यंत सलाला येते. वाळवंटाची टेकाडे, वादळे, शुष्क आणि कोरडे हवामानात प्रवास करताना छान लाल माती व हिरव्या निसर्गाचा दरवळ आपल्याला ‘ने मजसी ने……ची आठवण करून देतो.
हा निसर्ग पाहताना लक्षात येते कि, आपण कोकणच्या भूमीत जणू काही प्रवेश करत आहोत. इथल्या पावसाळी पर्यटन करता अतिशय लोकप्रिय आहे. विमान व रस्ता दोन्ही मार्गे येथे पोहचता येते. अरेबिक राष्ट्रातून ह्या पर्यटन स्थळा करता फार मोठा ओघ असतो. रस्त्याच्या दुतर्फा व नजर जाईल तिथ पर्यंत हिरवळ, जंगल आणि पाऊस.
ईद च्या सुट्टीत सलाला येथे भेट म्हणजे उपवास संपलेला आणि हिरव्या निसर्गात ताजेतवाने होऊन मस्त पैकी वातावरण आणि खाणे आणि आराम करणे हे प्रमुख आकर्षण आहे. केळीच्या बागा, नारळ, पानाचा मळा(विड्याची पाने) फक्त सलालात पाहण्यास मिळतात. विड्याच्या पानांना मस्कत मध्ये बंदी आहे. सर्व प्रकारची फळझाडे, विविध फुलझाडे आणि येथेच ओमान चे प्रसिद्ध बखुर म्हणजे धुपाचे झाड पाहण्यास मुबलक मिळते.
पर्यटन स्थळे म्हणजे गुरुत्वाकर्षणाच्या विरोधात टेकडी वर चढणारी कार. अर्थात गाडी न्युट्रल ला करून फक्त स्पीड नियंत्रित करावा लागतो. येथे गाडीचा स्पीड ४० च्या हि पुढे जातो. ह्या ठिकाणावर पण खूप गर्दी असते.
समुद्र किनारी ‘सिंक होल’ आहेत. खडकातून समुद्राच्या लाटे बरोबर पाणी फार मोठ्या तुषार स्वरुपात वर येते. सिंक होल चे वैशिष्ट्य म्हणजे खूप खोल अशी विवरे आहेत. लाटेची गाज धीरगंभीर आवाजात आपल्या अंगावर प्रचंड प्रमाणात पाणी उधळून आपले सामर्थ्य प्रकट करते.ह्या सिंक होल च्या भोवती भक्कम असे ग्रील आहे बऱ्याच अंतरावरून आपल्याला उभे राहावे लागते. पाण्याचा खळखळ आवाज माधुर्य निर्माण करतो पण हा आवाज म्हणजे शरीरास व मनास देखील कापरे भरवतो. जीवन क्षणभंगुर आहे तसेच सुंदर हि आहे ह्या दोन टोकाच्या परिसीमा अनुभवायच्या असतील तर ह्या सिंक होल शिवाय सलाला पाहणे म्हणजे अपूर्ण ठरेल. चुनखडी चे प्रमाण लक्षणीय असल्याने खडकात विविध आकार. रंग छटा पाहण्यास मिळतात.
येथेच शहरात एक मुस्लीम पीर दर्गा आहे. त्यांची उंची चाळीस फुट होती. हा दर्गा सर्व पर्यटकांसाठी पाहण्यास ठेवला आहे. हा टोम्ब मेरी म्हणजे जिझस ची आई तिच्या वडिलांचा आहे. ह्याचा कुराणात उल्लेख आहे असे कळले. ‘टोम्ब ऑफ नबी इम्रान’ गर्दी नेहमीच असते.
येथीलच पण काहीसा दूर असणारा दुसरा दर्गा म्हणजे ‘जॉब्स टोम्ब’ ह्यांची पण उंची सर्वसाधारण उंची पेक्षा जास्तच आहे. ह्यांच्या पावलाचे ठसे दर्ग्या समोर खडकात उमटलेले आहेत. आकाराने बराच मोठा असा हा ठसा आहे.प्रत्येक धर्मात असे ‘अजानबाहू’ गुरु किंवा धर्मोपदेशक आहेत हे मनोमन पटले.
रस्त्यावरून जाताना किंवा बाजूला हिरवळीत आपल्यासारखीच गाई, गुरेढोरे, मेंढ्या चरताना दिसतात जणू काही भारतातून स्थलांतरित झाल्या असाव्यात. पण त्यांच्या बरोबर गवत चारणारे उंट पहिले कि मात्र मन भानावर येते. आजूबाजूला आपल्यासारखी कौलारू घरे फारशी नाहीत, तेथून धुरांड्यातून येणारा भाकरीचा दरवळ मात्र आसमंतात नाही. दुधाची तहान ताकावर भागवावी लागते हे हि काही प्रमाणात तथ्य नक्की आहे. येथे येणारे युरोपिअन, सौदी लोक मात्र ह्या वातावरणावर खूप खुश होतात. जर पावसाळ्यात भारतात जाणे झालेच नाही तर इथेच हा जवळ प्रती भारत आहे. अर्थात सलाला मस्कत सोडण्याआधी नक्की बघावे. असेही फिरण्यास खूपच छान आहेच.
रस्त्याची वाट हि गच्च अशा आमराईतून, केळीच्या पोपटी बागामधून, विड्याच्या पानाच्या मळ्यातून जाते. झुळझुळ वाहणारे पाटाचे पाणी आहे, नाही ती मराठी वाहिनी बाय……मालकी हक्क फक्त ओमानी लोकांकडे आहे आणि हे सर्व सांभाळणारे आपले मल्याळी….. शहाळी, ताजी ताजी फळे अगदी बागामधून झाडावरून काढून पण देतात. अशा टपरी रस्त्याच्या दुतर्फा आहेत. गोवा पण आपल्याच जवळ आहे असे वाटते
पुरातन काळात एक गाव होते, त्या गावात एक धर्म गुरु राहत असे. लोकांचे स्वैराचार वाढले होते. वारंवार सांगून देखील लोकांनी आपले वर्तन सुधारले नाही म्हणून गावातील लोकांना व सर्व गावाला त्याने शाप दिला कि तुमची सर्वांची घरे उलटी होतील. घराचे छत खाली, दरवाजा पण उलटा आणि घराचा चौथरा वरती होईल. असे एक आख्खे गाव आज पुरातन जागा म्हणून पाहण्यास मिळते. हि गोष्ट आम्हाला तिथल्या गाईड ने सांगितली आणि ह्या गावचा असा उल्लेख कुराणात आहे. सध्या पूर्ण पणे ढासळत हे उलटे गाव चालले आहे. ह्या जागी फिरण्यास आपल्याला एक छोटी गाडी घेऊन फिरते. त्याच प्रमाणे कालौघात नष्ट झालेली पण खांबाचा पुरावा ठेवलेले असे अल बलिद सारखी पण गावे उत्खानात सापडलेली दिसतात.
असे हे निसर्गरम्य आणि प्रदूषण विरहित सलाला म्हणजे ओमान मधील आशिया होय. हिरवा निसर्ग हा भोवतीने……. राजस्थान मधील वाळवंट आणि सह्याद्रीची आठवण आल्याशिवाय राहत नाही. salalah हा शब्द अरेबिक सूची मध्ये आहे. वाढ होणारे बी किंवा आर्च ऑफ द वूड असा अर्थ आपण घेऊ शकतो. जिथे निसर्ग मुक्त पणे बहरतो ते सलाल्लः होते.
.