जमिनीखालचे तळे……..एक अनोखा अनुभव…


आपण सिनेमा बघायला जातो तेंव्हा उशीर झाला तर एकमेकांना पकडत, विजेरी किंवा पायऱ्यांच्या दिव्याचा उजेड ह्यांचा आधार घेत कोणाच्या मांडीत बसण्याचे दिव्य घडणार नाही. ह्याची चाचपणी करीत बसतो. तसाच किंबहुना त्यापेक्षाही अधिक काळोख पण अनोखा अनुभव आम्ही ऑस्ट्रिया येथे जिप्सम खाणीत घेतला. व्हिएना ह्या ऑस्ट्रियाच्या राजधानी शहरापासून १७ की.मी अंतरावर सीग्रोत्ते ही खाण प्रवाश्यांचे प्रमुख आकर्षण आहे. जिप्सम जे शेती करिता खतांसाठी वापरले जाते. सिमेंट तसेच प्लास्टर ऑफ प्यारीस चा प्रमुख घटक आहे. येथे लाल, पांढरे व करडया रंगांचे जिप्सम सापडत होते. १८४८ ते १९१२ पर्यंत ही खाण कार्यरत होती. १९१२ मध्ये ब्लास्ट केला आणि खाणीत २० मिलीयन लिटर पाणी वेगाने घुसले व खाण बंद झाली.

१९३० मध्ये खाण पुन्हा प्रवासी आकर्षण म्हणून तयार करण्यात आली. खाणीत प्रामुख्याने तीन स्तर आढळतात. सर्व स्तर जमिनी खाली फक्त ९ डिग्री सेल्सिअस तापमान मध्ये पाहावे लागतात. बाहेरून पाहिल्यास एक छान प्रवेश द्वार दिसते. आपल्याला कल्पना ही येत नाही. खाण कुठे आहे? आणी ह्या आकर्षक दारातून प्रवेश होतो जमिनी खालच्या काळोखात, येथे तापमान ९डिग्री सेल्सिअस असल्याने तुम्हाला छोटी घोंगडी सदृश रजई दिली जाते.

वाळूत बनवलेलं भुयार हे एक अप्रूप असायचे. खाण म्हणजे पण एक लांबलचक भुयार मणाचे, टनी वजनाचे असे अनेक लाकडी दरवाजे, आता उघडून ठेवलेले पण पूर्वी बंद असावेत. चारी बाजूनी अंधार पायापाशी छोट्या प्रकाशाची सोय होती पण चटकन चेहरे काही दिसत नव्हते. जवळ जवळ ४ ते साडे चार किलोमीटर खाण आहे. माहिती देण्यासाठी येथे गाईड दिला जातो. बरेच दरवाजे आम्ही थंड गार वातावरणात पार केले. प्रकाशाचे जग ठिपक्यात पण दिसत नव्हते. साहस करायचे जरा हटके बघायचे हा विचार असून देखील मनात जप करीत होते.

अचानक गाईड ने थांबवले, भुयारात जेंव्हा खाण कार्यरत होती तेंव्हा खूप लोक काम करायचे. २०० फुट जमिनीखालचे कामाचे ठिकाण अतिशय गूढ. निशब्द शांततेचे असे होते. आम्ही सर्वात वरच्या स्तरावर होतो. भिंतीत खोल्या केलेल्या होत्या. घोड्यांचे तबेले, प्रार्थनेची खोली, विश्रांतीची खोली, स्वयंपाकाचे ठिकाण जवळ जवळ एक पूर्ण वसाहत फक्त जमिनीखाली. काय करमणूक? कुठे परिवार? कसा घेत असतील मोकळा श्वास एक कुठेतरी झरोका दिसायचा. छे भयंकर स्थिती असते खाणीत, आपण मात्र जमिनीवर धनाढय होतो ते ही लोकांचे जीवन गाडून! आता सुद्धा थरारक वाटत होते. तिथे एक जागा वाईन साठी होती ह्याच जागेवर निशब्द जागेवरील खाण कामगार उत्सव साजरे करायचे. आनंदी ठेवण्याचा जमिनी खालचा हा अनोखा प्रयत्न. मानाने त्या सर्वांकरता सलाम केला.

काही खोल्या गेल्यावर पाण्याने भरलेले छोटे तळे, म्हणजे खोलगट जागा दाखवली. तिथे अंधार, हिरवा रंग ह्या पलीकडे मला काहीही दिसले नाही. गाईड म्हणाला अजून सुरवात झाली नाही. किती रहस्ये बघायची आहेत ह्याचा काही अंदाज येत नव्हता. प्रेअर च्या ठिकाणी आम्हाला थांबवण्यात आले. जे कोणी येथे गाडले गेले त्याकरिता प्रार्थना करा असे सांगण्यात आले. मी हात जोडून विश्व प्रार्थना मनात म्हणाले. तोच नेपाळी गाईड मला विचारतो फ्रॉम इंडिया? येस. आर यु मल्याली? सावळा रंग कसा दिसला ह्याला? हा विचार करत रागच आला. मुलगा मात्र खो खो हसत होता.

पुढे पुढे चालत होतो, आता म्हणे दुसऱ्या स्तरात आलो. काही पायऱ्या बनवलेल्या होत्या. तिथून खाली उतरायचे. खाली विस्तीर्ण असा जलाशय होता. पाण्यावर पूर्ण हिरवा रंग होता. लाइफ जाकेट देण्यात आली. २००४ ला बोटीचा अपघात झाला त्यात चार व्यक्ती मरण पावल्या. अरे देवा! आता हे काय संकट म्हणून लेकाचा हात घट्ट धरला. बेटा वडिलांबरोबर बिनधास्त होता. मीच मात्र स्वामी, साई, बापू यांचा धावा करत होते. पायऱ्या उतरून खाली गेले म्हणजे सगळ्यात खालचा तिसरा स्तर. हळू हळू एक बोट आमच्या कडे येत होती. काळ्या मिट्ट अंधारात डोलत होती. जवळ आल्यावर पाहिली आपली नल दमयंतीच्या गोष्टीतील किंवा दिलीप कुमार यांच्या चित्रपटातील हंसांची नौका मस्त सोनेरी रंगात आम्हाला घेण्यासाठी पायरी जवळ आणली गेली.

दिमाखदार बोटीतून प्रवास सुरु झाला.जमिनी खालचे तळे, खाण मानव निर्मित परंतु पाणी मात्र अजूनही अविरत येते. पंपाने उपसून घेतात. पूर्ण काळा अंधार, डोक्यावरती छतावर पहिल्या थराचे अजून एक तळे. काही ठिकाणी कमानी होत्या. त्याखालून नौका जायची, काही ठिकाणी छोटासा प्रकाशाचा ठिपका जाणवायचा. सर्व निशब्द: शांतता. घन गंभीर वातावरण, फक्त ९ सेल्सियस तापमान, पाण्यात हात घातला, थंड पाणी, चटकन बोटे गारठली. ह्याचे चित्रीकरण थ्री मस्केटीअर ह्या चित्रपटासाठी झालेले आहे. अनोखे दृश प्रत्येक टप्प्यावर होते. पाण्यावर पडलेले बोटीचे प्रतिबिंब बोटीवरचा कंदील दाखवत होता. भिंतीवर वेगवेगळ्या छटा निर्माण झालेल्या होत्या. कधी उंच अशा एकाद्या कोपऱ्यात पाणी चमकताना दिसायचे. मंद असे प्रकाशझोत सौन्दर्य अजून वाढवत होते पण अंधाराचा डौल कुठे ही बिघडवत नव्हते.

अर्धा तासाहून अधिक काळ बोटीत होतो. पायऱ्या चढून वर आलो. थोड्यावेळ पुन्हा टनेल पार केले. डोळे प्रकाशाने पटकन मिटवले. अजूनही स्मरणात राहिला निशब्द: करणारा युरोप मधील सर्वात मोठ्या जमिनीखालच्या तळ्यातील प्रवास. आज पर्यंत १०मिलीयन लोकांनी हे तळे पाहून झाले. गेल्या वर्षी २५०,००० प्रवासी येवून गेले. आम्ही पण तिघे त्यात आहोत. इतका विलक्षण अंधारातला प्रवास तो ही पाण्यातील. जिथून प्रवेश केला. तिथेच कॉफी घेतली. परतीचा प्रवास बस मध्ये अबोल पणे केला. कारण मन भरून व्यापून राहिला जमिनीखालच्या तळ्यातील……रोमांचकारी अनुभव.

अशी मी ….आणि अशी माझी मुंबई

माझी प्रोफाईल……. २६/११ साठी,

आपली जन्मभूमी ह्याचा अभिमान असणे हे सहजीच आहे. कर्मभूमी पण तेव्हढीच जवळची असते. आपल्या आयुष्यातले चढ उतार, भावनिक, मानसिक धागे दोरे हे आपल्या गावाशी, शहराशी वेढून असतात. मी मुंबईची म्हणून मला माझ्या शहराने मोठे केले. त्या शहराला माझे शिक्षण, माझे अनुभव आज अर्पित करते. ते ही २६/११ ला कारण ही तारीख माझ्या मुंबईची आहे. भारतच काय पण सर्व जग जणू काही दहशतीने वेठीस धरले होते. त्यातून माझी मुंबई ही कायम टार्गेट असते. हा मुंबईच्या इतिहासातला काळाकुट्ट दिवस पण पोलिसांनी, कमांडोज, ह्यांनी निडरपणाने मुकाबला करून दहशतवाद्याचा बिमोड केला. गतिमान, धाडसी, संवेदनक्षम, हळवी, विचारी अशी माझी मुंबई.

मी मुंबईत जन्मले, शिक्षण, करिअर सर्व काही मुंबई. माझी प्रोफाईल ही मुंबईचाच घटक आहे. जन्म घाटकोपर, शाळा ठाणे, कॉलेज रुइया ह्या परिघातच मी मोठी झाले, भक्कम बनले, सक्षम, उच्च विद्याविभूषित, संवेदनक्षम बनले.

शाळेत असताना पोहणे, मैदानी खेळ ह्यात मला आवड होती.कॉलेज ला गेल्यावर एन. सी. सी. जॉईन केले. मला यु. पी. एस. सी, किंवा आय. पी. एस. परीक्षा देवून आय. ए. एस. किंवा पोलीस ऑफिसर बनायचे मी ठरवले होते. एन. सी. सी. चे प्रशिक्षण चालू असताना अनेक पारितोषिके पटकावली. ऑल इंडिया लेव्हल मिलिटरी चे सिग्नल यंत्रणा करिता अखिल भारतीय श्रेणीचा प्रथम क्रमांकाचा चांदीचा कप मला मिळाला. महाराष्ट्र प्रतिनिधित्व करण्याची संधी मला राजधानीत मिळाली. सर्व ठिकाणी मेरीट होल्डर झाले. फायरिंग, हॉर्स रायडींग, स्युबा डायविंग, प्यारा सेलिंग, ह्या धाडसी प्रकारात अव्वल नंबर टिकवून होते. कॉलेज व एन. सी. सी तर्फे महाराष्ट्रातील सर्व डोंगर, किल्ले ट्रेकिंग करून पाहून झाले.

शिवाजी मैदानावर परेड च्या दरम्यान हेमंत करकरे ह्यांच्याशी बोलण्याचा योग आला होता. आपण प्रशासकीय सेवा करिअर करता निवडा असे मोलाचे मार्गदर्शन त्यांनी मला केले होते. पण मराठी तरुणांचा तेंव्हा फारसा सहभाग नसायचा. लग्न करून ज्या ठिकाणी सासर असेल तिकडे जायचे असे पुरोगामी विचारांचा पगडा मुलीं भोवती असायचा. मला काही फारसे प्रोत्साहन मिळाले नाही त्यामुळे त्यांना प्रयत्न करते असे म्हटलेले पूर्ण होऊ शकले नाही. मी शिक्षण क्षेत्र करिअर करता निवडले. शाळा ते महाविद्यालय इथे शिकवत राहिले. गाईड चे ट्रेनिंग घेवून आपत्कालीन उपाययोजना, क्याम्प घेवून विद्यार्थ्यांना शिकवल्या.

आज माझे अनेक विद्यार्थी मी सुचवलेल्या प्रमाणे प्रशासकीय परीक्षा देवून रुजू झाले आहेत. मी पूर्ण करू शकले नाही. पण माझ्या विद्यार्थ्यांच्या रूपाने आज करकरे साहेबाना सलाम करते. काही पोलीस ओळखल का टीचर? म्हणून समोर येतात. माझे जे कार्यक्षेत्र आहे ते पुढच्या भावी पिढीचे आहे. त्यामध्ये मी करकरे, साळसकर असे अनेक शूर वीर पाहते.

आम्हा स्त्रीयांना सकाळी एक व्यक्ती अश्लील हावभाव करून रस्त्यात त्रास द्यायची. दहा जणी असूनही सर्व तिकडे दुर्लक्ष करायच्या. मी पोलिसांना फोन करून सांगितले व सर्वांची सुटका झाली. रस्ता निर्वेध बनला. पोलिसांची गस्त सुरु झाली तेंव्हा जाणवले की घेतलेले शिक्षण वाया जात नाही.

एन. एस. एस मध्ये पण सहभागी झाले. अल्प उत्त्पन गट निवडून कांजुरमार्ग विक्रोळीच्या डोंगरा वरच्या झोपडपट्टीत काम केले. मुंबईचे हे जीवन ही फार जवळून अनुभवले. त्यांनी दिलेला प्रेमाचा चहा, आग्रह, आमच्या गटाने त्यांना घरगुती रोजगार करता साधन सामुग्री, शिक्षण देण्याचे काम केले. त्या कुटुंबांचा चेहऱ्यांवर दिसणारा आनंद मला आज आठवला.

अंतर्मुख होऊन विचार करते तेंव्हा हे निश्चितच पटते की आपल्या भूमीचा आपण मोठे होण्यात खूप महत्वाचा हिस्सा आहे. २६/११ च्या भीषण हल्ल्यात नागरिकही खूप मोठ्या प्रमाणात बाहेर येवून मदत करीत होते. पुरात पहिले की एकमेकांना वाचवण्यासाठी शर्थ करीत होते. पाण्यात अडकलेल्या लोकांना अन्न, वडापाव, पाणी सर्व काही घरासारखे देत होते. कोणी कोणाचे नव्हते होते ते फक्त मुंबईकर. ह्यांच्या पण प्रत्येकाच्या प्रोफाईल मध्ये एक मुंबई आहे. निर्भीड, कणखर, हळवी, गतिमान व वैव्हीध्य अशा शिक्षणाने परिपूर्ण असलेली. कितीही संकटे आली तरी न डगमगता धीराने सामोरी जाणारी, बदल स्वीकारणारी, प्राप्त परिस्थितीत पण योग्य मार्ग काढणारी.

मी मुंबईचे प्रतिनिधित्व करते. मुंबईचे लोक जगात कुठे ही मजेत राहू शकतात. भारतात येताना विमानातून झोपडी दिसली कसे आलबेल आहे ते जाणवते. सगळ्यांना सामावून घेतले. भले वाद असतील पण संकट काळी सर्व मुंबईकर असतात. पोलीस अधिकारी ते सामान्य व्यक्ती २६/११ ला एकमेकां करता अश्रू डोळ्यात ठेवून. जे राहिले आहेत त्यांच्या करता मदत करीत होते हे जेंव्हा परदेशी बसून आम्ही टी.व्ही. वर पाहत होतो तेंव्हा मुंबईचा अभिमान आमच्या डोळ्यात पाण्याने भरून गेला.

आम्ही नाही मदत करायला ह्याचे वाईट वाटले. इकडून पैसे, कपडे, धान्य वैगरे मदती करता पाठवतो. पण बॉम्ब स्फोटात मदत कार्य, पुरात भुकेल्याच्या पोटी अन्न, वाचवण्या करता हात इकडून पाण्यात नाही देवू शकत. हात जोडतो ३३ कोटी देवांना की माझ्या मुंबईला, भारताला वाचव संकटातून.

आपल्या आयुष्याची प्रोफाईल म्हणजे आपली जन्मभूमी होय. मी मुंबईची म्हणून तिची व माझी जीवनरेखा सारखी वाटते. अशा मुंबईला सलाम!!!!

More

तिचा व माझा फोन…………

आमच्या दोघींचा मैत्रिणींचा फोन म्हणजे एक प्रचंड उत्सुकता अहो न ची होती, मुलगा पण म्हणायचा घरात राहून तुम्ही इतके काय बोलता. तसा आमचा फोन एक दिवसा आड असतोच. सर्व विषय समावेशक, असे हे चालते, ब्लॉग आहेत मुलांच्या समस्ये पासून ते समाजकारणापर्यंत. मोलकरीण समस्या, नवऱ्याच्या आवडी, स्वभाव, नातेवाईकांचे अनुभव. नवीन आलेले सिनेमा, नाटके सध्या चालू असलेले घडामोडी. भारतातील राजकारण, शेजारणीच्या गुजगोष्टी, सोन्याचे भाव, भाजीचे भाव, जमेल तर एखादी रेसिपी, मुलांचा शाळेचा डबा, खरेदी, आजार, इतर मैत्रेणींची चौकशी, ब्लॉगचे विषय.अनेक विषय असतात.

ह्यांना कुठून सुरवात झाली व कुठपर्यंत बोललो काय काय सांगणार? सुरवातीला विचारायचे पण आता काहीच बोलत नाहीत. फक्त बिल किती होईल याचा सुज्ञ विचार करा, खर आहे. पण इथे घरात बसून दुसरे छंद पण जोपासता येत नाहीत. हा फोन म्हणजेच एक दिलासा आहे. नेटवर सर्व सुविधा आहेत पण कानाला फोन लावल्याशिवाय घरच्या सारखे वाटत नाही कारण संवाद विनाखंड असावा लागतो. नेट वेब चा आधार घेवून भारतात बोलायचे व कानाला फोन लावून विनाखंड बोलायचे ह्यात फरक आहे.

अजुन दुसरा फोन येतो तो आईचा भारतातून फोन. रात्री वेब वर भेटली तरी त्या फोन ला काही अर्थ नाही. म्हणून दोन दिवसात पुन्हा फोन येतोच. तिकडच्या नातेवाईकांची लग्न कार्ये, समस्त वृतांत सांगायचा असतो. माझ्या लेकाची शाळेची परीक्षा असली तर त्याला ‘भीमरूपी’ म्हणायला सांग पासून ते त्याचा अभ्यास कसा चालला आहे तिथपर्यंत, फोन वर त्याचा आवाज जर बरा वाटला नाही तर सल्ल्यांची ही भली मोठी यादी फोन वर देते. आता मला त्याच्या बरोबर असायला हवे होते म्हणून खंत व आम्ही आईवडील तिच्या नातवंडा कडे दुर्लक्ष करतोय का असा जवाबदारीचा धाकाचा फोन येतो. जावयाशी त्यांचे ऑफिस, तब्येत ह्या गप्पा तर चालतातच.

दिवाळीत तर फोनवर लाडू, चकली ह्यांची रेसिपी असतेच अधिक भरीस भर म्हणजे मी पण काही स्वयंपाकात गोंधळले तर लगेच फोन करते. ‘हे’ लगेच म्हणतात की, ह्यापेक्षा भारतात जावून खावून आलो तर स्वस्त पडेल. पण अडचणीला पहिली आईच आठवते ना!
माझ्या कडून काही कारणामुळे मुलगा दुखावला गेला असला, तर दुसऱ्या दिवशी हमखास तिचा फोन ठरलेला. नातवंडा चा मेसेज पोहोचलेला असतो रात्रीच. अशा वेळी तिचे व माझ्या मुलाचे सिक्रेट असते दोघेही पत्ता लागून देत नाहीत. मला मात्र आईकडून सज्जड दम तर मिळालेलाच असतो वरून ह्यांची बोलणी बसतात.

आता सुट्टीला भारतात एकटा निघालाय. आपण किती मोठे झालोय हे सतत आजमवायचे असते. आम्हाला ही धाकधूक आहेच. पण आईचे दोन दिवसात सूचनांचे इतके फोन आले की, त्या पेक्षा मी गेले असते तर बरे. अजूनही फोन चालूच आहेत. ठरवून फोन करूया असे कलम मान्य झाले तरी चार दिवसात पुन्हा फोन. फार नको बोलूस तुझा आवाज ऐकायचा होता. आईच्या माये ला जगात तोड नाही हेच खरे.

हा तिसरा सुद्धा फोन महत्वाचा कारण तिने मला मिस कॉल केला की समजावे की मेड ची आज दांडी आहे. इथे हे सुख आहे की त्या फोन करून तुम्हाला कळवतात. हा फोन काम वाढवतो.

अजूनही असे मिस कॉल येतात की, आपले बिल वाढवतात. काही मैत्रिणी आमच्या घरी फक्त इन कमिंग आहे. कारण आमची मुले लहान आहेत, केंव्हाही बटने दाबतात व राँग कॉल करतात. तुम्हीच करा. काय बोलणार कप्पाळ? करते मी लाजे खातर. माझे मुल लहान होते का? हा प्रश्न पडतो. बर करावा तर, त्यांच्या बाळाचे कौतुक करण्यावर माझे फोन बिल वाढते.

आम्हाला ही कौतुक आहे, पण ह्या तर गळ्यातच पडतात. माझे ही बाळ असेच वाढले व अजूनही कौतुक करावे असे खूप काही त्याच्या कडे आहे. पण अतिरेक झाला की, हास्यास्पद वाटते. त्यांचे बिल नसते माझे असते. मैत्रीण म्हणून करावा तर ह्यांची वंशावळ माझा निदान एक तास तरी घेते. मिस कॉल का करतात? पैसे नाहीत तर ठीक आहे. हे बोलणे पण नागाच्या विषापेक्षा जहरी होते. एखादा मिस कॉल ठीक पण ह्यांच्या मुलाला मिश्या फुटल्या तरी स्वताचा पैसा घालणार नाहीत. पण मी पण समजून घेते की, आई होऊन त्यांचे प्रेम मला सांगणार नाहीत तर कुणाला? मलाच चैन पडत नाही, की बरेच दिवसात खबरबात नाही मिळाली तर काळजी वाटते. कारण मैत्रीण म्हणून मी स्वीकारले आहे. त्याचा फायदा घेते हे दिसत असूनही मीच बिल भरते.

पहिला फोन करणारी मैत्रीण अशी आहे की आंम्ही दोघीही आलटून पालटून फोन करतो कारण आमची मैत्री आहे.एकमेकीना चैन पडत नाही त्याकरता आम्ही आमच्यावर कुठलाही खर्च फक्त स्वता करता करीत नाही. घरच्या बजेट मध्ये बसवायचे असते. आणि आमचे दोघींचे अहो पण आमच्या मैत्री करता खुश असतात. आईचा येणारा फोन हा तिच्या एकटे राहण्याकरता खूप गरजेचा आहे. लेक, नातवंड व जावई हे तिच्या पासून दूर आहेत. आम्ही इकडूनच त्याचे बिल ऑन लाईन भरतो. ह्या बिला मुळे आम्हाला आई चा दिलासा आहे हे जाणवते व सुरक्षित वाटते. आम्हा कोणालाही इकडे बरे नसले की त्या दिवशी आईचा फोन काळजीचा येतो, व म्हणते, काल रात्री पासून चैन पडत नाही. तुम्ही ठीक आहात न. हिला बरोबर कोणीही न कळवता कळते हीच आईची टेलीपथी, अनेक बिल भरण्याचे बळ देते. आईने आपल्याला वाढवले म्हणून कुठलेही बिल लावलेले नसते.

ऋणानुबंध………

सकाळी फिरण्या करता बाहेर पडले. काही मैत्रिणी मुलांना शाळेच्या बस करिता सोडवायला आल्या होत्या. रस्त्याच्या कोपऱ्यावर बरीच गर्दी गोळा झाली होती. सगळे पुरुष होते, त्यातल्या काही जणांचा घोगरा आवाज घाबरून ओरडल्या सारखा होता. त्यातले काही जण एक पायावर उडया मारल्यासारखे पटापट पाय वर उचलत होते. व्यायामाची जागा नव्हती. आम्ही तमाम आई वर्ग आश्चर्याने बघत, अंदाज घेत होतो. आमची काही धिटुकली बाळे, सूचना न जुमानता पुढे गेली. क्षणाधार्त पळत माघारी आली, ते ही किंचाळत. मम्मा, डॉगी चे बाईट करणारे पिल्लू आहे. बस आली आयांनी पोरे ढकलली. स्वताही धूम ठोकत आत पळून गेल्या. मला काही कळायच्या आत माझा पाय घोट्याजवळ घट्ट धरला गेला. धारदार दात मला जाणवत होते. त्याचे अंग पूर्णपणे थरथरत होते. मागून माझ्यामैत्रिणींचा किंचाळ्या ऐकू आल्या. चावले! चावले!. पिल्लू अजून घाबरले. मला काळजी होती कर्र कर्र आवाज येत होता खरेच चावले तर, किती सुया बसतील.

मला कुत्रा पाळल्याचा अनुभव आहे. माहेरी ‘पाशा'( जर्मन शेफर्ड) होता. आता मार्शल हाही जर्मन, सनी हा रॉट जातीचा, माझ्या मुलाकरता ‘ज्याकी’ हा पॉम पिल्लू असल्यापासून आमच्या बरोबरीने घरात होता. ह्यांना पण लहानपणी पासून आवड व घरात पाळला होता. त्यामुळे मी ह्या चावऱ्या वेड्याला अलगद माझ्या पायापासून सोडवले. जवळ पोटाशी धरले. कोणीतरी चावरे म्हणून सोडून दिलेले असावे. माणसांचा खूप राग होता. नीट वागवले नसणार. बिलगून बसले. मैत्रिणी अग सोडून दे म्हणून कलकलाट करू लागल्या. खिडकीतून मुलगा बघत होता. आपण पिल्लू आणू या म्हणून अजूनही दंगा करतो, त्याला तर ही पर्वणीच होती. धावत खाली आला, येताना बिस्कीट चा पुडा, पाणी देण्यासाठी वाटी घेऊन आला. तो जवळ आला की, ह्या पिल्लाने हातातून खाली उसळी मारली व मुलाचा पाय पकडला. आता मात्र मी पुरतीच घाबरले. उगाच कनवाळू झाले असे क्षणभर वाटले. त्याचा पाय जबड्यातून सोडवला. खायला दिले. पटापट संपविले.

आई, घे न घरात, तोच त्याने दात फिस्कारून दाखवले. आई, हे का ग चिडले? कदाचित त्याला अनुभव वाईट आला असेल. आपण नाही पाळू शकत. दोन महिने आपण भारतात जातो. तिकडेही सगळीकडे फिरतो, इकडे डॉग सीटर कडे सोडावे, मला नाही जमणार. तू मावशीकडे गेलास की खेळ, मार्शल, सनी, काळू आहे ना. त्यांच्या कडे सोडू. नको बाळा, मी समजूत काढत होते. माझ्या कडेवर बसून पिल्लू ऐकत होते. चल आता घरी जावू, हे इथेच खेळत राहील. मी त्याला खाली सोडून, त्याचे लक्ष नाही असे पाहून मी वरती घरी गेले. बिल्डींग ४० फ्ल्याट ची, टोलेजंग, एका मजल्यावर एक विंग ला ओळीत ५ घरे, मध्ये लांबलचक प्यासेज आहे. इकडच्या बाजूला दोन घरे व प्यासेज ला काच असलेले दार, तसेच दुसऱ्या बाजूला. मध्ये एक घर त्यासमोर जिना व लिफ्ट. अशी रचना, दोन्ही विंग पुन्हा अश्याच प्यासेज ने जोडलेल्या.

दोन तासानंतर घरची बेल वाजली. दारात सोसायटीचा केअर टेकर उभा होता. म्याडम, कुत्ते का बच्चा आपके घर है? नही, बच्चा अभी तक बाहर गया नही. नही, परेशान किया सबको, काटने को आता है. अभी छुप गया है. इधर पुलिस को बुलाना पडता है. ऐसा कानून है. फिर कुत्ता पकड्ने वाला आता है. लेकर जाता है. बहोत काटा तो, मारते है. पक्का मालूम नही. मी जाम काळजीत पडले. चलो धुंडते है. बाहेर आले तोच हे वेडं पुन्हा येवून पाय घट्ट पकडून बसलं. हे माझे घर शोधत इतके वर आले? म्याडम, पकडके रखना मै बॉक्स लेके आता हुं. डाल देंगे अंदर. बोलायचा अवकाश, हे पात्र इतके हुशार की त्याच्या अंगावर गेले धावून. केअर टेकर ने प्यासेजचे दार बंद करून कोंडून घेतले. मी मान डोलावली होती, आता त्याचा विश्वास पण गमावून बसले. माझ्यापासून दूर दूर पळून जावून रडून दाखवत होते.

दाराच्या पलीकडे केअरटेकर, त्या दारापलीकडे मैत्रिणी व मध्ये आणि पिल्लू. येरे बबड्या म्हणून मी चुचकारत होते. माझ्या मनातील ओळखून की, मी त्याला सांभाळणार नाही व पकडून देणार म्हणून ते उद्धवस्त चेहेऱ्याने मला फक्त बघत होते. सोसायटीत ते प्रत्येकाच्या अंगावर दात दाखवून धावत गेले व मी एकच अशी होते की, त्यांनी मला काहीही त्रास दिला नाही. त्यामुळे त्याला पकडायची जवाबदारी माझ्या वर होती. मी ह्यांना फोन केला, एक दिवस त्याला ठेवून घेवू या का? हे ठामपणे नाही म्हणाले. नको गुंतूस पुन्हा, आपण परदेशी राहतो. युरोप सारखे फ्रीडम नाही. बीच, गार्डन, काही रस्त्यांवर फिरवायला परवानगी नाही.

कोणीतरी चादर फेकली. पकड़ा त्याला. पिल्लू ने चादर तोंडात पकडली माझ्या समोर टाकली. मला रडूच कोसळले. आपण रागवायला जावे, तर बाळाने हातात पट्टी आणून ठेवायची, असे झाले. कित्ती! ग शहाण माझं छबड! काय करू बाळा मी. ये रे जवळ. ते ही भोळं आल लगेच. कुशीत घेतल. हळूच बॉक्स मध्ये ठेवले. केअर टेकर ला म्हणाले, मेरे पेहेचान की एक संस्था है. वो लोग कुत्तेका बच्चा लेकर मुफ्त मे अच्छे घर मे भेजते है. बॉक्स वरून ओपन होता. मी मुलाला क्लासला पोचवायला गेले. दहा मिनिटात परत येणार होते. आल्यावर बास्केट मध्ये ठेवू. रस्त्या पर्यंत पोचते तोच, पोलीस गाडी पहिली. अंदाज आला की कोणीतरी फोन केला असेल. मी लगेच मागे वळले, मुलाला म्हटले की जा तू एकटाच क्लासला.

सोसायटीच्या गेट मध्ये पहिले तर पिल्लू बाहेर पळत आलेले होते. लगेच पोलिसांनी त्यावर जाळे टाकले. उचलले व घेवून गेले पण. मी रिकाम्या डोळ्यांनी पाठमोऱ्या गाडीकडे पाहत राहिले. केअर टेकर म्हणाला कुत्तेका बच्चा, आपके पिछे दोडके आया. पुलिस का स्मेल शायद मालूम पडा होगा. कोनसा थाना? मै जाके लेके आयेगी. म्याडम वो तो मालूम नही. पाय जड होणे म्हणजे काय ते समजले. वर येवून फोन वर खूप विचारले. काहीही पत्ता लागला नाही. खूप रडले. काय होता त्याचा आणि माझा ऋणानुबंध, कित्ती माया होती त्याच्या मनात, हे दुष्ट जग त्याला जगू देईल का?

खूप दिवस जेवण गेले नाही. सारखे वाटायचे कुठूनतरी मला शोधत येईल. पण बरेच महिने झाले ते काही परत आले नाही. एक दिवस घरी काम करणारी मेड आली म्हणाली मला आता गावी जायचे आहे. माझ्या बहिणीचे मुल हरवले आहे. मिळत नाही. मला क्षणात पिल्लू आठवले, त्याचे माझे नाते काही तासांचे होते. आपले मुल म्हणजे आपला श्वास तोच हरवला तर, जगायला उमेद कुठून मिळणार? एकटे असणाऱ्या आजी आजोबांच्या डोळ्यात रिकामे पण दिसते. जगात कुठे तरी, त्यांचे पिल्लू नोकरी करता लांब गेलेले असते. सध्या वेळ मिळाला की डॉग सीटर कडे जाते, मालक गावाला गेल्यामुळे ते तिथे राहतात. त्यांना भेटून, त्यांचे लाड करून येते. ते माझी वाट पाहतात त्यांतूनच मी माझ्यातले पिल्लू जपते. नाना नानी पार्क मधले आजी आजोबा पण एकमेकांचे साथीदार बनलेले असतात तेंव्हा जाणवते की, नवीन जीवनाची सुरवात झाली आहे.

पुरुष दिन……….शुभेच्छा!!!

पुरुष दिन……….शुभेच्छा .

आज शुक्रवार आमच्या कडे सुट्टी असते. रविवार सारखे जरा आरामात चालते. माझे अहो! मात्र रोजच्या सारखे ५ ला उठतात. मीच ७ वाजेपर्यंत ताणून झोपते. रोजचा सकाळचा चहा तयार असतो. कामाच्या दिवशी सगळे लवकरच उठतो. ह्यांना मात्र असे एक दिवस सुद्धा उशिरा पर्यंत झोप येत नाही. असो.

हॉलमध्ये चहाचा कप घेवून आले तर टी. व्ही. वर एक स्त्री आपल्या पतीला धपाधप बडवत होती असा व्हिदिओ होता. चर्चा सुरु होती….पुरुष दिन ची. ह्यांच्यावर स्त्रिया अत्याचार करतात. म्हणून कायदा बदला, किंवा अजून एक कायदा तयार करा. स्त्री ची बाजू दाखवत नव्हते. वकील पण सहभागी होते. कायदा काय आहे ते सांगण्याकरता. असो हा झाला प्रोग्राम सकाळी पुरुष दिन बद्धल……

आज सुट्टीचा दिवस, आणि साजरा करण्या करता घरच्या दीड पुरुषांचा विचार केला पाहिजे. आता एक माझे अहो! दुसरा मिशी फुटत असलेला माझा छोकरा हा अर्धा. तसा मुलगा लगेच म्हणतो कसा, मी का अर्धा? अरे बाळा तुला मिशी फुटायला लागली म्हणून. बाबा सुखावला पण मी मात्र माझे छोटेसे पिल्लू अजून जपते त्या करता तुला अर्धा ठेवला. सकाळी मी उठे पर्यंत हे घर बरेचसे आवरून ठेवतात. रात्रीची भांडी जागेवर जातात, दोरीवरचे कपडे घड्या करून ठेवतात. हे लहानपणापासून आईला मदत करत आले आहेत. माझी एक दिवसाची सकाळची झोप जपतात. कोशींबर करता काकडी, जमेल तेव्हढी भाजी चिरून ठेवतात. स्वयंपाक घरात ह्यांची लुडबुड चालू असते, एकीकडे माझ्याशी गप्पा करत असतात. माझ्या आईला, बहिणीला, माझ्या जावेला सगळ्यांना मदत करत असतात.एक तर स्वभाव खवय्या, आणि खिलवायला पण आवडते.

त्यातून ह्यांची रास ‘ कन्या ‘ म्हणजे राशी प्रमाणे बरहुकूम स्वभाव. तसा सुट्टी करता खास बेत, ह्यांचा वाढदिवस म्हणून, दीपावलीचा पाडवा, बहिणीचे भाऊ आहेत म्हणून भाऊबीज, आणि एक हो माझा वाढदिवस म्हणून खास बेत, आता पुरुष दिन.

मातृदिन, महिला दिन हे माझे डे आहेत न. पण ह्या मध्ये प्रमुख आचारी मीच असते. ह्यांची मदत असतेच, पण स्वयंपाक झाल्यावर पहिल्या घासाला ह्यांचा चेहरा फार बोलका होतो. हे दडपण पण मीच झेलते डोळ्यासमोर गोष्टी असल्या तरी हे जोरदार आरोळी ठोकतात, मिळत नाहीये तेंव्हा मीच तिथूनच काढून हातात देते. मी शाकाहारी ह्यांच्या करता मासे, चिकन करायला शिकले. त्यांच्या आवडी करता, प्रेमासाठी मीच बदलले. माझ्या आवडीकरता, सोयी साठी,मला बरे नसते म्हणून, मला कंटाळा आला म्हणून, हे हॉटेल मधून खूप वेळेला जेवण घेवून येतात. कारण त्यांना माहिती आहे, की आपल्या बाळ करता मी करियर सोडून घरातच असते. काम करण्याची सवय असली की पुरुषांना निवृत्ती नंतर काय? हा मोठ्ठा प्रश्न पडतो. छंद म्हणून काही जोपासायला वेळ मिळाला नसतो. म्हणूनही पोकळी पुरुषात लवकर तयार होते. स्त्री म्हणून ती घरात केंव्हाही राहून स्वताला रमवून घेते काम सोडून कसे चालेल? तुमच्या मागण्या कशा पूर्ण होणार? तुमच्या पगारात घर चालेल का? असल्या पुरुषी प्रश्न ती उध्भवूच देत नाही. घर सांभाळत राहते.

असा चाललाय संसार, असे होतात डे साजरे. परस्परांवर असलेला विश्वास, प्रेम, आपण एकमेकां करता आहोत. ही भावना, आपलाच अंश म्हणून आलेला छोटासा जीव, त्यांना वाढवण्यात पुन्हा जगलेले बालपण, आई वडील किंवा मोठी माणसे यांचा जिव्हाळा ह्यावर घर बुलंद, अभेद्य होते. घर ते समाज व पुढे राष्ट्र अशीच घडामोड अविरत असते. मदत करणे, एकमेकांना जपणे, भांडणे किंवा मत भिन्नता होणारच कारण दोन वेगळी माणसे कायम एकत्र राहण्यासाठी लग्न करून, एकाच छताखाली कुटुंब तयार करून राहतात. मुलगी एक दिवस आपले घर सोडून नव्या घरात राहायला येते तेंव्हा तिच्या सवई जपणे, तिने पण नवीन स्वीकारणे हे पती पत्नी दोन्ही बाजूनी सकारात्मक असावे लागते. तरच रोज पुरुष दिन, महिला दिन, व बालदिन घरात साजरा होईल.

मला अत्यंत आवडणारे एक गाणे लगेचच पाहायला मिळाले…..बम चिकी चिकी बम, चिकी बम बम, एक दुसरेसे करते है प्यार हम, एक दुसरे के लिये बेकरार हम, एक दुसरे के वासते मरना पडे तो है तैयार हम……

पोस्ट करता विषय सुचला, ह्यांनी फक्त आमटी भात कर म्हणजे तुला पोस्ट चे लिहायला वेळ मिळेल. आमटी मात्र परवा सारखी कर, मला खूप आवडली होती. अजून एकदा मला तशीच हवी आहे. ह्याच प्रेमा करता अनेक गोष्टी मी झेलायला तयार आहे. लेकाने पण, आई, खेकडा आज नको उद्या कर.आज तू लिही अजून काय हवे सांगा सगळ्यांचे असेच काहीसे अनुभव असतात त्यातूनच शिकायचे, एकमेकांच्या आनंदात सहभागी व्हायचे. आयुष्य सुखी करायचे. जगात चांगले, वाईट दोन्ही आहेत. आपल्याला दोन्ही बाजू नीट माहिती असतातच असे नाही. आपल्याला संसार आनंदी करायचा आहे, थोडेसे बदलूया, स्वीकारुया, हसत राहूया एव्हढेच आज.

पूर्ण परिवाराला पुरुष दिनाच्या शुभेच्छा . असा पुरुषांचा दिवस असतो, ह्याचा शोध आम्हाला आजच लागला.

भित्या पाठी……………….. ब्रह्मराक्षस

पाठ, पोट, अंग, पाय, अजून काय काय डोळे भरून पाहतात. गर्भार रूप वेगळे शोधता सहज येते म्हणे. तिथे पण रंगाला महत्व पण आहे.गोरा रंग चालत नाही, चक्क काळ्या रंगाची स्तुती करतात (भारताच्या इतिहासाची कल्पना असावी). तो काय किंवा ती काय पूर्ण परिवारावर मनापासून प्रेम करणारे असंख्य आहेत. थंडीत, पावसाळ्याच्या सुरवातीला ह्या जमाती कडे आदराने पहिले जाते.

चिखलातले कमळ जितके लोभस असते तसेच ह्यांच्या कडे पाहतात. पाय तर इतके आकर्षक, व मजबूत रीतीने आपल्याकडे आनंदाने धावत येतात. त्यांचे स्वागत पण जंगी केले जाते. माझा ही मुलगा फार लहानपणी ह्यांच्या प्रेमात पडला. घरी आणूया म्हणून बाल हट्ट करू लागला. शेजारणी कडे प्रेमाखातर, तिच्या दारात उभा राहू लागला. देवदास होण्याआधी मीच घट्ट मन करून आपल्याही घरी येतील असा विश्वास मुलाला दिला. कडा उतरून जाणारी हिरकणी मला आठवली.

हा पाहुणा बोलवण्यासाठी खास काही स्त्रिया पुढाकार घेवून त्यांना आपल्या घरी पोहचवतात. त्यांना घरच्या व्यक्ती एव्हढे आदराचे स्थान असते. बाळकृष्ण कसा नंदाच्या टोपलीत आरामात पहुडला होता. तसेच हे टोपलीतून घरी येतात. मावशीबाई म्हणतात. ह्या मावश्या, लगबगीने भरदुपारी खणखणीत आवाजात आरोळी देतात. माशांचा कोयता अजूनही चोरांच्या जातीला धाक देतो. रेल्वे मध्ये ह्या, “म्हावर हाय बाजूला व्हा’’ असे बिनदिक्कत ठाण्कावतात.

अश्याच एका मावशीला शनिवारी संध्याकाळी, माझा लेक घेऊन आला. त्याला दिलेल्या वचनामुळे मी पण कटिबद्ध होते. मावशी, ”जरा हात लाव टोपलीला” म्हणून हुकुम देती झाली. मी मासा प्रजातीशी ओळख नुकतीच करून घेतली होती. वरण भात परब्रह्म असणारी मी, नवखीच होते. टोपलीत एका कपड्याखाली हे खेकडे महाशय झाकून ठेवले होते. सगळे हलत डुलत होते.त्यातला एकही बाहेर पडू शकत नव्हता. बाहेर पडला तर, पाय नेतील त्या दिशेला सैरावैरा अक्षरशः पळतो. जुजबी माहिती मला होती. कोळीण पण निवांत होती. मला एक खेकडा हवा होता.मी तर बादच होते, हे परदेशी नोकरीला होते. कोळीणीच्या लक्षात हे नवखे पण आले असावे. माझ्या चौकश्या सुरु केल्या. घरात म्हातारी कोण? माझी आई.शेवटी, असे ठरले की,तिने रविवारी दुपारी येवून मला चिम्बोरीची पाकनिष्पत्ती दाखवायची. चहा पिवून कोळीण मावशी गेल्या. वाटपाचे सामान तयार करून ठेव, असा प्रेमळ आदेश पण दिला. अर्धा तास मैत्रीचा झाला.

रात्री बेड वर पाठ टेकणार, एव्हढ्यात चिरंजीव बोलते झाले. आई कॉट च्या जवळ आता खेकड्या सारखे हलले. बोलून महाशय दोन मिनिटात झोपून गेले. १० वाजले होते. शेजारी आई होती.ताडकन उठली, बघ बघ गेला का कॉट खालती. अग, मी नाही घेतला, मावशी उद्या देईल. आई,म्हणते खेकडे ते काय भरवसा? तू चहा करत असताना टोपलीतून सटकला असेल. माझे ही अंग शहारले. हो की ग. मी टोर्च घेतली व कॉट खाली उजेड पाडला. जमीन व कॉट ह्याच्यात एक वीतभर अंतर होते. पेटी कॉट होती. आणि मला काहीतरी हलताना उजेडात दिसले. असेल जळमट म्हणून समाधान करून घेणार तोच, तिथला आकार हलायला लागला. आई, पण डोकावून पाहत होती. किंचाळत कॉट वर गेली व माझ्या लेकाला कडेवर उचलून हॉल मध्ये, सुरक्षित ठिकाणी गेली. लहानपणी शाखा केल्याचा परिणाम होता.

अर्धा तास मी जमिनीवर पडून, न्याहाळत होती. माझी खात्री झाली, की हा सटकून घरात घुसला. काय करावे सुचेना. असाच राहू दे का? नको. कॉट वर झोप येईल? आई बाहेरून, शाकाहारी खावे, तिला भजीला पण खेकडा म्हटलेले चालत नाही. पंढरपूर मध्ये मंदिरा समोर माझे आजोळ आहे. त्यामुळे साहजिकच त्रागा होणे स्वाभाविक, पण नातवंड आग्रह पुढे सर्व माफ होते. झाडू आणला म्हटले, हुस्कावावे बाहेर आला की, झाडूने दाराबाहेर ढकलावे. जस, जसा झाडू फिरवत होते. तसा तो, अजूनच आत जावून बसला. मला मात्र जमिनीला नाक टेकवून कंटाळा आला. बेडरूम दार लावून टाकावे, सकाळी पाहू. तितक्यात पहिले की दाराला पण फट आहे. खिंड लढवावी लागणार अशीच चिन्ह होती.

कॉट सरकावी म्हणजे त्याला ढकलता येईल. पण माझे काम इतके बलवत्तर की कॉट, जुन्या गाद्या सहित पूर्ण खण भरलेली होती. हरकत नाही. आलिया भोगासी दुसरे काय? भावाला बोलवावे कारण रात्रीचे १२ वाजले होते, अशा वेळी भाऊराया पण उपलब्ध नव्हता. एकेक सामान काढून शेजारच्या रूम मध्ये ठेवू लागले. खालती लक्ष ठेव तुझा पाय तो पकडेल हा सल्ला आई सतत देत होती. दीड तास गेला. पलीकडे डोंगर रचला गेला. कॉट सरकवली, त्याचा पत्ता कुठे? पुन्हा वाकले तर कॉट च्या खाली सपोर्ट असलेल्या कोनाड्यात बहुतेक चढला असावा.पुन्हा कॉट जागेवर ठेवली. माझे षड्यंत्र रचणे सुरु झाले. आईला दया आली म्हणाली, ही जात पाण्यात असते. सुकून मरेल. तू कॉट खाली पाणी ओत. रात्रीचे २ वाजले. आता पाणी? म्हणायच्या आत तिने भरकन दयाळू भावनेने बादलीभर पाणी ओतले सुद्धा

पाणी ढकलत होते. हा पठ्या काही बाहेर यायला तयार नव्हता. खोली स्वच्छ धुतली गेली. पहाटेचे चार झाले. चहा घ्यावसा वाटू लागला. आईने ही जवाबदारी घेवून मला खोलीत त्याच्या वर लक्ष ठेव असे बजावले. हॉल मध्ये चिरंजीव गुडूप सोफ्यावर झोपला होता. जाम वैतागले. ह्या कोळण्या का बरे असे बिनधास्त ठेवतात? सकाळी दुधवाला आला, घाईत होता तरी म्हटले, बघ बाबा. कॉट खाली डोकावून म्हणाला, दिसत नाही काही. पण असेल असे वाटते. तुम्ही लोक खाता म्हणून मच्छी महाग झाली. काय बोलणार? अरे बाबा, तमाम ख्व्यायांची जात एकच असते, भेदभाव पहाटे कशाला? चहा दिला. तो ही गेला. शेजारीण तमिळ सकाळी चालायला बाहेर पडली, खिडकीतून डोकावून विचारते, कल रातमे बहुत आवाज आ राहता, आप भी फोरेन शिफ्ट हो रही होक्या? काय सांगणार महाभारत. कुछ नही,ऐसेही काम कर राही थी. थोडक्यात आटोपले. रात्रीदहाला सुरु झालेला शोध, सकाळी सहा वाजेपर्यंत संपला नव्हता. सोसायटीतले दुकान उघडले, त्याच्या पोऱ्याला बोलावले. कॉट उपर ढकलो असे ऐक्शन सहित समजावले. कॉट वर उचलली पहिले.जळमट पाण्याने भिजून चिटकून बसले होते. पोऱ्याला चहा व पैसे दिले.

सामान पुन्हा भरण्यात नऊ झाले. ह्यांचा फोन आला, आवाजा वरून म्हणाले बर नाहीये का? पंधरा मिनिटे फोन बिल झाले. चिरंजीवाना उठवले. तो बाबांशी त्यापुढे बोलला. आई तुला तिची गमंत झाली ते सांगणार आहे. अर्धा तास मी खेकडा पुराण सांगत होते. तर म्हणतो कसा मला ते इतके आवडतात. आता पण जमिनीवर दिसतात. कपाळाला हात लावून घेतला. सकाळी दहा वाजता कॉट वर पाठ टेकली. कोळीण आली तिला सांगण्यात वेळ गेला. आई तर दिवसभर फोन वर ज्याला त्याला हेच सांगत होती. आता त्यांना सराईतपणे पकडून रस्सा, तर्री करते. मुलगा त्यांच्या पायाची नामो निशाणीही शिल्लक ताटात ठेवत नाही. सगळे फस्त होते. अजूनही त्यांचा हिसका विसरले नाही. म्हणतात न भित्या पाठी………

‘म’……मुंबईचा……..‘म’.. मराठीचा……

माय मराठी…………..मोठी मराठी.

काही खरेदी करण्यासाठी मी ‘ कॅरे फोर’ ह्या मॉल मध्ये गेले होते. मी व हे वस्तू घेण्यासाठी मराठीतून चर्चा करत होतो.तिथल्या सेल्स मन शी इंग्लिश मध्ये शंका विचारात होतो. अचानक तो मराठीत बोलला,” हे घ्या चांगले आहे”. माणूस ‘मल्याळी’ शुद्ध मराठी बोलतो. मी काही बोलायच्या आत तो म्हणाला, मुंबईत नोकरी करण्यासाठी माझे आजोबा आले होते.आमची तिसरी पिढी. चांगले आहे, मराठी सक्तीचे करतात त्यानिमित्ताने मराठी बोलणे सुधारते. मी काही मल्याळी बोलू शकत नाही. त्यामुळे ह्या संस्कृतीशी परिचय होऊ शकला नाही.

तामिळनाडू, मध्ये हिंदी पण बोलत नाहीत. पण ती माणसे मुंबईत आली कि मराठी शिकून घेतात, हिंदी चा सराव पण त्यांना होतो. मुंबईत कारखाने उभारून नोकरीच्या संधी उपलब्ध झाल्या,त्या कारखान्यातून मालक, व इतर कर्मचारी संपूर्ण देशातून आले. इथे अनेक तमिळ असे आहेत की आवर्जून मराठी बोलतात. हिंदी पण बोलतात.

भाषा च्या ह्या घनघोर युद्धात मी मात्र दुसरी कुठलीही भारतीय भाषा बोलू शकत नाही. आज मुंबईत पावलोपावली गुजराथी माणूस आहे. वाणी आहे. तो गुजराथ सोडून इकडे आला, त्याने मराठी बोललेच पाहिजे, तसा तो शिकला. सर्वांशी छान मराठीत बोलतो. माझा मराठी चा अभिमान सुखावतो. काही कामा निमित्त अहमदाबाद ला गेले. तेंव्हा जाणवले, मला गुजराथी समजते, पण घडाघडा बोलता कुठे येते.

राष्ट्र भाषा पण अस्खलित कुठे येते. मी माझ्या तोडक्या मोडक्या हिंदीत संवाद साधताना चुकून, ‘’अरे ये कितनीकू मिलता है. आपुनको नको’’. आता सांगा, धड हिंदी नाही, दुसरी भारतीय भाषा सराईत पणे बोलता येत नाही.आमच्या मराठी शाळा मुलांनी भराव्या म्हणून ‘खिचडी’ देवू ला गलो. ‘इंग्लिश’ मराठी माणसाला शिकावे लागते कारण जगाच्या व्यवहाराची ती भाषा आहे. त्याकरता शाळेत अभिनव उपक्रम राबवतो.

मराठीचे मात्र शुद्धलेखन सुद्धा पुढच्या आयुष्या करता कठीण होते. मराठी लिपी संगणकावर शोधतो. जे काही ज्ञान आमचे आहे, ते पाजळतो पण शुद्धलेखनाची साईट काही मिळत नाही. माझे काम मी चोख बजावतो, माझ्या ज्ञान, विश्वासावर मी दुसऱ्यांना हुशार करतो. मग सहज मिळेल अशी साईट तयार करा. आम्हालाही अभिमानच आहे. मराठी चा. प्रश्न शोधतो, चुका दाखवतो पण पर्याय तयार करत नाही. मी कशाला कोणीतरी करेल.

असा माझा भाषेचा घोळ आहे. मुंबईत ज्या प्रमाणात लोकसंख्या इतर राज्यातून येऊन स्थिरावली. तेव्हढी मराठी भाषा मोठी मोठी होत गेली. मुंबईत मी मराठीच बोलणार कारण भय्या असो, मल्याळी असो, नाहीतर बंगला देशी असू दे. त्यांनीच मराठी बोलले पाहिजे नसेल बोलायचे तर जा, आपल्या राज्यात परत. उगाच गर्दी करतात. मी असे बोलायचा अवकाश इथे पण ‘हे’ इतर आमच्याशी मराठी बोलतात. आपापसात त्यांच्या भाषेत बोलतात. हरकत नाही, माझ्याशी तरी मराठी बोलतात. केव्हढा दबदबा मराठीचा.

सात समुद्र पलीकडे पण मी मराठी…….अशी गर्जना करावी लागत नाही. पण माझ्या भाषा विकासाचे काय हा प्रश्नच राहतो. मल्याळी मराठीतून ओणम समजावून सांगतो. मी म्हंटले मला पण मल्याळी शिकायचे आहे. तर उत्तर येते, आम्हाला मराठी येते. आमचे मराठी चांगले होईल.

मी मग भारतीय भाषा शिकू का नको? कारण सगळे मराठी बोलू लागल्यावर मराठी च्या कक्षा विस्तृत होणार, मराठी मोठी भाषा होऊ लागली आहे. मस्कत मध्ये पण खूप ठिकाणी आम्ही मराठी बोलतो. आहे की नाही मराठी ची मज्जा. मराठी माणसे पण आवर्जून मराठी तून कशी आहेस? मी बरी. असे बोलून, इट इज सो हॉट टुडे. हे दुसरे वाक्य असते. मराठीतून मी ‘इंडियाला’ चालले असे सांगते, मल्याळी त्याच्या गावाचे नाव घेऊन सांगतो. मी माझे काम परदेशी करते आहे असे म्हंटल्यावर सहजीच ‘इंडिया’ असे येणार. मग हा मात्र मुंबई ला निघालात का? असे बोलतो. कारण त्याला त्याचे काम झाले की गाव आठवते. मी मुंबई मोठी झाली म्हणून खुश होते.

शाळेत फ्रेंच घेतो, संस्कृत च्या जवळची भाषा शिवाय परदेशी पण, भरपूर गुण देते. दहावी नंतर कशाला हवी? ‘गरज सरो……. असे आहे. पंजाबी, मल्याळी, तमिळ हा पर्याय नाहीच. आपापल्या राज्य भाषा शिका. दुसरी राज्य असे काही करीत नाहीत तर मराठी राज्यात का? प्रश्न बरोबर. पण अनेक भारतीय भाषा शिकले तर बिघडेल का? शिका तुम्ही कुठे ही, भारतात इतर भारतीय भाषा शिकवल्या जातात पण प्रमाण फारच कमी आहे. माझी तर शाळा संपली, जाऊ दे मला काय करायचे.

एक न धड…….असा माझा भाषा विकास खुंटला. मुंबई ला वित्त, व्यवसाय, उद्योग,ह्या करिता महानगर म्हणून जगात मानाचे स्थान आहे. अनेक अमराठी लोक इथे येऊन स्थिरावले, इथली संस्कृती शिकले. मराठी भाषा शिकून पिढ्यान पिढ्या राहतात. मराठी माणूस इतर भाषा शिकण्यास कमी पडतो का? इतर राज्यांमधून मुंबईच्या तुलनेत कमी मराठी लोक आहेत. की इतर राज्यांशी कमी संपर्क व्यवसाया निमित्त आहे.अंतर्मुख होवून विचार करते, मला गरज किती आहे? फारच कमी. जो येतो तो मराठी शिकतो.छान आहे मराठी विस्तृत होतीय. पण एक दिवस ह्यांच्या कडून मराठी शिकायला लागेल असे वाटते. जर कोणाला इतर भारतीय भाषा येत असल्या तर विकासाची प्रथम पायरी समजली जाते.राष्ट्र विकास होण्यासाठी भाषा संगम ला अनन्य साधारण महत्व आहे. नवीन भाषा म्हणजे एका संस्कृतीची ओळख, मैत्रीचे संबध विकसित होण्यासाठी हृदयाची भाषा शिकणे म्हणजेच अजून एका मातेची भाषा होय.

आता मी मस्कत ला अरेबिक सगळीकडे. माझ्या ओमानी शेजारणीला मी बटाटा, तवा, आंबा हे मराठीतून आम्ही असेच म्हणतो, कारण ही नावे इथे पण अशीच आहेत. हे हिंदीतून सांगते, तिला भारत माहिती आहे. तिला मुंबईत पाऊस एन्जोय करायला जायचे आहे. मला मराठी शिकव म्हणून मागे लागली आहे. शोप्स मराठीतून वाचायला यायला हवेत इतकी माहिती तिला आहे. इथे पण अरेबिक मध्ये आहेत म्हणून दुबई पेक्षा ग्रोथ कमी आहे. जाऊ दे मला काय? मला ओमानीना मराठी शिकवायला हवे.

‘म’………… माझ्या मराठी चा हे पक्के पाठ झाले आहे.

बस्ता जिव्हाळ्याचा………….भरजरी आठवणींचा

‘शालू हिरवा,…………. साजणी बाई, येणार साजण माझा……….

लग्न घटिका ही मनात अशीच ध्रुव पदासारखी अढळ जागा करून स्थिरावलेली असते. अक्षता, आशीर्वाद यांच्या जोडीला साज शृंगार सांभाळून, वधू भांबावलेली असते. त्यात ‘शालू’ आवरून, सावरून दमणूक होते. सध्या ‘शालू’ ला आधुनिक पर्याय स्वीकारले जावू लागलेत. पण लग्नाचा शालू हे अनुभवणे हे, ‘जावे त्याच्या वंशा’, सारखे असते. अतिशय संवेदनाक्षम अशी ही खरेदी असते. जोडीदार निवडणे हे एक वेळ सोपे ठरेल पण तिचा शालू…….तिची भावना ह्यात माहेर व तिचे होणारे सासर, (प्रेमविवाह असो की, पसंती विवाह) गुंतलेले असते. कधी ज्या, त्या ,पार्टीने आपापली खरेदी करायचे ठरते, तर तुम्ही खरेदी करा, आम्ही पैसे देतो असा समंजस पणा असतो. बदलत्या विचार प्रवाहात वाग्दत्त वधूवरा वर तुमच्या आवडीप्रमाणे घ्या असा व्यापक दृष्टीकोन असतो. अजूनही, ‘लग्नाचा बस्ता’ म्हणजे कपडेपटा सहीत देणे-घेणे काही ठिकाणी ठरवतात. हा बस्ता पुणे, नगर. जळगाव भागात दुकानाच्या जाहीरातीत अधिक दिसून येतो.

पांढऱ्या शुभ्र चादरी, लोड, गुबगुबीत गाद्यांवर घालून, थंड सरबताने आपले स्वागत दुकाने करतात. मी पण बस्ता करता मैत्रिणीच्या लग्नासाठी तिच्या सहीत सहभागी झालेले होते. कसे काय ठरवतात हे पाहण्याची मला जाम उत्सुकता होती. कारण ही विवाहवेदी मला सुद्धा चढावी लागणार होती. इकडच्या गादीवर १५ जण मुलीचे, तिकडे पण तेवढेच. मध्ये दुकानाचा इवेन्ट मालक बसला होता. घरातल्या मानाचे वैगरे कपडे निवडले गेले. आता शालू चा गठ्ठा मलमललीच्या वेष्टनातून उलगडला गेला.

एकेक, शालू सर्वांच्या हातातून फिरत होता. पैठणी, शालू, हिऱ्याची निदान एक छोटीशी अंगठी ही राजेशाही स्वप्ने मुलींच्या मनात नैसर्गिक असतात. माझीही होती. वर वधू त्यांचे नातेवाईक, त्याचा मित्र, तिच्या मैत्रिणी ह्यांच्या हातातून शालू फिरत होता. हा नको, तो नको करत, सर्व संमतीने एक शालू निवडला. पुन्हा तो सर्वांच्या हातातून फिरला. माझी चुळबुळ चाललेली होती. हिला आवडला का कधी विचारणार? सासर्यांनी विचारले, सुनबाई पसंत आहे का शालू? तिने हो म्हटले, आणि मुंबईच्या, तुमच्या मैत्रिणी त्यानला पसंद पडला की नाही. मी पण मान डोलावली. मला ही एक साडी त्यांनी निवडली.

तिला मी एकटी आहे असे पाहून विचारले, खरच आवडला का? ‘हो’, असे ठामपणे बोलली. अग, तू त्याला विचारलेस का? त्याने मला तेंव्हाच सांगितले. कधी? मी गोंधळले! कारण, तो फक्त हसून गेला मग बोलला कधी? तुझे लग्न ठरले की, कळेल तुला. मी गप्पच झाले. लग्न, सोन्याच्या तारा नी बनवलेल्या शालूत पार पडले. बाईसाहेब मला बाय करून पळाल्या.मी मात्र हे कोडे कधी उलगडेल ह्या विचारात जयश्री गडकर, सीमा देव, अगदी अलका कुबल पण आठवत राहिले. शालू चा नखरा, त्याचे सौंदर्य, त्याचे हळवेपण सिनेमातून माझ्या मनात बिंबले होते.

माझे लग्न ठरले. आंम्हाला दोघांना खरेदी साठी पाठवायचे ठरले. दादर ची निवड केली. शालू घेवूया, मस्त जेवूया असा फर्मास बेत मी केला. प्लाझा चा भाग तसा फिरण्या करता मस्तच आहे. आता दुकानाची नावे आठवत नाहीत पण अलंकारिक, भावूक नावे असतात. हे दुकान झाले, ते पण पाहूया…….असे करत करत आम्ही फिरत राहिलो.

सगळ्या नट्यांच्या जागी मी मला पाहत होते. सोपे असते, असा माझा समज होता. गेले दुकानात घेतली साडी, बाहेर पडले, हा सरळ हिशोब मी करत होते. ह्यांची कपडे खरेदी करता निवड चांगली आहे. ही माझ्या जमेची बाब होती. शालू निवडला, ‘हे’ विचारात होते की, आवडला का? हो, नाही, म्हणायच्या आत, माझे मात्र डोळे पाण्याने डबडबले. आज प्रथम मी फक्त माझ्याकरता साडी घेतली. आईच्या साड्या बिनदिक्कत उचलून नेसत होते. आज आईशी वाद घालता येणार नव्हता. आईने तुझी निवड छान असेलच असा विश्वास ठेवून पाठवले, पण त्या वेडीला कळेल का? तिचे कपाट मला उचकायला आवडते.

ह्यांनी विचारले आईची आठवण आली का? भोकाड पसरून जोरात रडावेसे वाटले. ‘हे’, समंजस पणाने म्हणाले, आपण उद्या पुन्हा येवूया, आईला घेवून चालेल?. मी बुक करून ठेवतो. आईला फोन केला, तर ती ओरडली, रिकाम्या हातानी परत यायचे नाही. (इतकी का ही दुष्ट झाली? आज मला ती हवी आहे) तर म्हणते, जावयांच्या आवडीचा घे. चांगला असेल, खोड्या काढू नकोस. मला लग्नाचा बस्ता आठवला, माझ्या बरोबर कोणी नाही. घरी गेल्यावर आईशी भांडायचे ठरवले. दादर चौपाटीवर भटकून आलो. घरी येई पर्यंत रात्र झाली.

सकाळी पहिले तर, मला मावशी उठवत होती. गाईच्या डोळ्यात कशी तृप्तता दिसते तशी मला आईच्या चेहऱ्यावर दिसत होती. ती अतिशय प्रेमाने शालू वरून हात फिरवत, माझ्या सासूबाई ना शालू दाखवत होती. नंतर अनेक वेळा, तो शालू अनेक हातात फिरत होता. प्रत्येक वेळेला तिचे डोळे तसेच असायचे, प्रत्येक हात आपले स्वप्न पुन्हा स्पर्श करून पाहत होता. बहिणी, आपला जोडीदार असा असेल, अशी स्वप्न माझ्या शालूत डोकावून पहायच्या. आईचा प्रेमाचा बस्ता अनेक वेळा मी अनुभवला.

माझ्या जोडीदाराला माझ्या डोळ्यातला ‘होकार’ मी न बोलता कसा कळला?, हा मैत्रिणी बद्धल चा प्रश्न मला आज उत्तर देता झाला. लग्नात, ह्यांनी, फुलांच्या ताटातील मोगऱ्याचा गजरा हळूच पणे हातात दिला, आणि हिऱ्यांचा मुकूट मला मिळाला.

माझा शालू तसा तो लग्नानंतर पडूनच होता. अजून खराब होईल, कोणीतरी वापरेल असा माझा विचार होता. शालू द्यायचा नसतो. वधूवस्त्र असते. ही भावना जपतात.

लेक सासरी सुखी आहे, हे शालू जेंव्हा जिरतो, विरतो तेंव्हाच आईला समाधान मिळते. सांभाळून ठेवला आहे. कन्या म्हणून जन्मून मी, भरजरी शालूत सासरी राहते.

‘बालदिन’ निमित्त……………….. ‘अजिंक्य’

काल जेवण्यासाठी हॉटेल मध्ये गेलो होतो. पदार्थ सांगण्यासाठी मेनू कार्ड पाहत होतो. पदार्थ येई पर्यंत वेळ होता. साहजिकच शेजारी कोण आहे हे पाहीले. दोन छोटी मुले, मोठे साधारण चौथीत असावे, व छोटी शाळेत नुकतीच जाणारी असावी. छान गोंडस चेहऱ्याची बाळे होती. हॉटेल शांत वातावरणाचे होते, मंद सुरात संगीत होते. नेहमीच्या उडपी गलक्यापेक्षा कधीतरी ही शांतता पण आवडते. पदार्थ आले, माझे निरीक्षण आटोपते घेतले.

पहिला घास मुखी घेणार तोच……. ”पाप्प्पा” अशी आरोळी टारझन च्या थाटात आरपार कान भेदून पार गेली. आश्चर्य नाही वाटले कारण ही गर्जना मोठ्या गोंडस ने केली होती.आईने एक कटाक्ष टाकला आपल्या टारझनकडे. मला पाणी नको, पेप्सी पाहिजे. आवाज पाठोपाठ मागणी आली. आवाजाने वेटर ने तत्परतेने कॅन समोर आणून ठेवला.
छोटीने पाण्याचा ग्लास उपडा केला. मी घास घेत,ते मनोहारी दृश पाहात होते. तिच्या अंगावर पाणी सांडले, भोकाड पसरले. बाबा, तिला उचलून बाहेर गेला. मोठा, एकाग्रतेने आपला कॅन पीत होता. दहा मिनिटे शांतता झाली. मला वाटले चला, आता तरी फूड एन्जॉय करू. मग त्यांची ऑर्डर देणे सुरु झाले.

त्यांची आई माझ्या कडे तृप्तनेने पाहात होती. मी पण माझ्या स्मित रेषा हलवल्या. डीश ठेवल्या, छोटी लगेच उठली, चमचा घेऊन प्लेट वर संगीत निर्माण करू लागली. बाबांनी पहिले व आपल्या मोबाईल वरून टकटक करीत मान खाली घालून काम करू लागले. संगीत थांबले, जेंव्हा पदार्थ आले. मला हे नक्को! अरे तूच म्हणाला होतास न…. इति आई. पण आता नको. छोटी पुन्हा उठली, टेबल क्लोथ चा आधार घेत. क्षणार्धात मला कल्पना आली, की सगळी उलथापालथ झाली.

दुसरे टेबल त्यांनी निवडले, व चिकाटीने बसले. मुले टेबला मधून पकडा पकडी खेळू लागली. बाबा व आई त्यांच्या मोबाईल मध्ये गर्क. आपटा आपटी, दंगा यथेश्च केला. मला मात्र सांगावेसे वाटत होते, आईवडिलांना लक्ष द्या. हे घर नाही. बाहेर वागण्याचे संकेत त्यांना शिकवा. पण ह्यांनी मला दाटले, तू तुझे बघ. शाळा घेऊ नकोस. तेवढ्यात आई घास भरवित होती. माझ्या कडे बघून म्हणाली, आम्ही न इथे नेहमी येतो. मुल पण हॉटेल सवयीचे आहे म्हणून छान रमतात ( रमण्याची जागा ही!!?) बाहेर गेलो की अगदी लाज आणतात नाही. म्हणून आम्ही नेहमीच्या ठिकाणी आणतो……इति माता.

आता मात्र मला अगदी राहवेना विचारले, घरी असाच दंगा करत असतील .माता….. हो! ह्या पेक्षा ही खूप, हल्लीची कार्टी वाह्यात झालीत. धीट तर केव्हढी अगदी घरा सारखी वागतात. आपल्या वेळी अस नव्हत. जराही मोकळे पणा मिळत नसे. आजी, आजोबा. काका सगळ्यांचे धाक! फोरवर्ड आहे पिढी. तुम्हाला एकच का हा. मी……हो
माता…….. एकटा पडत असेल. कंटाळत असणार.
मी बोलायच्या ऐवजी, अजिंक्य म्हणाला……. ऑन्टी, मी माझ्या पेरेंट्स बरोबर खूप एन्जॉय करतो. ते माझे मित्र पण आहेत. मला कधीच एकटे वाटले नाही आणि हो मी छोटा असल्यापासून त्यांनी घरी हॉटेल मध्ये गेल्यावर बसायचे कसे? शांत पणे खाणे कसे खायचे शिकवले. आई तर इथल्या सारखे टेबल घरी तयार करायची रविवारी व आम्ही हॉटेल, हॉटेल म्हणून जेवायचो. प्लीज, आम्ही कार्टी नसतो. माझ्या आईने मला असे कधी ही हर्ट केले नाही.

दुसरा प्रसंग…….
घरी पाहुणे म्हणून एक कुटुंब आमंत्रित केले होते. दोन मुले, आईबाबा प्रवेशते झाले. पहिली पाच मिनिटे ओळख झाली. अजिंक्य त्या छोट्यांशी गप्पा करू लागला.पाहुण्यांचा अंदाज घेत मी स्टील का काच ग्लास, ते ठरवते. ह्या वेळी काहीही सांडले नाही. बाळे आई च्या बाजूला नम्रतेने बसली होती. मलाच अवघडले, घर पहा, या असे म्हणायचा अवकाश, माझ्या पायावर मीच धोंडा पडून घेतला. कसा ते पहा………

मुले, आई उठली पाहून, सोफ्यावर हाताच्या जागी वर चढली, व वडिलांच्या अंगावर कसे कोसळावे तशी सोफ्याच्या सीटवर दणादण कुदू लागली. अजिंक्य आता ट्रेंड झालाय, कंट्रोल करायला, ही उड्या मारायची जागा नाही, सोफ्यावर नीट बसा. दरवेळी मावशी रागवेल ह्नं! हा वाइट पणा मला मिळायचा. अजिंक्य सांभाळतो. पाच मिनिटे गप्प बसली, सोफ्या ला उशा आहेत हे त्यांच्या चाणाक्ष डोळ्यांनी पहिले, दादा कडे न पाहता एकमेकांना उशी ची मारामारी करायला लागले. अजिंक्य चटकन उठला व उशा काढून घेतल्या, व म्हणाला चला आपण माझ्या खोलीत खेळूया.

अजिंक्य, तुझ्या कडे यायला नको पुन्हा. रागावतोस का ? लहान आहेत ती. माझ्या लक्षात आले की आता हा उत्तर देणार, तसेच झाले……..
अजिंक्य……. मी रागवत नाही. ती छोटी आहेत हे मला समजत. सोफ्यावर नीट बसा सांगितले. माझ्या खोलीत खेळायला घेऊन जातो.
अरे तुझा सोफा खराब नाही होणार. त्यांचे पाय मळके नाहीत. उशांशी ते खेळतात. तुला माहिती नाही हा गेम, मज्जा येते.
ऑन्टी, मला खेळण्यासाठी आईने एक उशी वेगळी दिली आहे. मी आणि बाबा उशीची खूप फायटिंग खेळतो. सोफा मळका झाला तर पुसता येईल. पण फोम लूज झाला तर सोफा डयामेज होईल, स्प्रिंग खराब होतील म्हणून नीट बसा म्हंटले.

बघा, दादा किती हुशार आहे.

अजिंक्य ने हसून पहिले व मुलांना घेऊन आत गेला. ह्या म्याडम पण बघूया, अजिंक्य ची रूम म्हणत आत निघाल्या.
अरे, अजिंक्य, अजिबात पसारा नाही. गुड बॉय आहेस.
नाही ‘ऑन्टी’, पसारा असतो, फक्त कोणी येणार असले तर आई आठवण करून देते, ती व मी मिळून आवरतो.

मोठा फळा ठेवला आहेस खूप अभ्यास करतोस न.
ऑन्टी, हा फळा बाबांनी प्लायवूड वर काळा रंग लावून तयार केला.मला खूप मोठे चित्र, लहानपणी काढायचे असायचे. बाबा, नी भिंत डर्टी होते म्हणून हा तयार केला. माझ्या पेक्षा मोठा होता, त्यामुळे मज्जा यायची. आई बाबा पण मला जॉईन व्हायचे. ही पण बघा कशी एन्जॉय करतात.

अजिंक्य बरेचसे सांभाळतो. तरी पण पाहुण्यांच्या ह्या बाळांनी, माशांच्या पेटीत कोक ओतले, दिवाळीची रांगोळी पायांनी उधवस्त करतात, गणपती पुढे ठेवलेले कुंकू, प्रसाद स्वताकडे खेचून घेतात, फ्रीज घरी खेळायची सवय! असल्याने उघडून दाणकन आपटून बंद ही करतात.

अजिंक्य ने ही, लहानपणी त्याचे नवे कोरे विमान पाण्यात धवून काढले होते, ते तर बादच झाले पण त्याच्या बाबाने सर्व खोलून त्याचे पार्टस, त्याचे काम सोप्या भाषेत त्याला समजावून सांगितले.कूलर च्या फ्ल्याप मध्ये गवारीच्या शेंगा घातल्या, पुन्हा त्याचा वर्क शॉप घेण्यात आला. त्याचे आवडते काका, पोलीस, कंडक्टर, फायर ब्रिगेड अंकल, पोस्टमन जमेल तसे मी त्याला घेऊन गेले, त्यांचे काम त्याला दाखवले.

आता १३ पूर्ण झाली. ऐलायसी पोलिसी, नेट वर अजुकेशनल साईट्स आवडीने बघतो, आमच्या बरोबर चर्चा करतो. वेगवेगळ्या फ्याक्टरी दाखवतो, त्याच्या बरोबर संध्याकाळी खेळायला हेंल्थ क्लबला जातो. फेस बुक, पी. एस. टू. खेळण्यासाठी पार्टनर होतो. आठवीचा अभ्यास घेतो. त्याची स्वताची मत तयार होतात. आम्ही मतांना योग्य दिशा दाखवण्याचे काम करतो. त्याला प्राडो, पजेरो गाड्या आवडतात, बाबांची पण आवड आहे, म्हणून पगारात किती आलौंस मिळतो, त्यामध्ये ह्या गाड्यांचा ई एम आय कसा बसेल ह्याचा प्रोजेक्ट तो करतो. त्याला गाड्यांच्या शो रूम मध्ये घेऊन जातो, प्रश्न तो विचारतो. पैशांचा हिशोब करतो. चाललय जस जमेल तसं

आता मोठा होतोय…… बाबां पेक्षा उंच झालाय.

लहान बाळे आली की घर त्यांच्या गडबडीने आनंदीत होते. मुले निरागस असतात. ती काही सांगून मस्ती करीत नाहीत. मग सांगणार केंव्हा? कितीही वेळा सांगितले तरी लक्षात थोडेच राहते. संकेत, आणि शिष्टाचार हे मोठ्या माणसाकरता ठीक आहे. मग मुलांना मोकळीक नाही रहात. अगदी बरोबर, लहानच आहेत ती, पण आपण तर मोठे असतो.

मी शाळेत असताना विद्यार्थांच्या पालकांशी संवाद साधायची तेंव्हा हे प्रश्न विचारायचे. तुम्ही जेंव्हा वेळ मिळेल तसा मुलां बरोबर व्यतीत करा. त्यांच्या बरोबर कार्टून पहा, गेम खेळा, खास गप्पा करायला बसा. मग बघा मी काही सांगायची गरज नाही. त्यांच्या अपेक्षा, गरजा, आनंद, त्यांची काळजी तेच छान भाषेत आपल्याला सांगतात.

‘लहानपण देगा देवा, माझ्या जीवनातला अमुल्य ठेवा’.

मुले निरागस च असतात. द्वाड पणा पण छोट्यानीच करावा. अगदी १०८% मान्य. पण आईबाबा होणे हा निसर्गाने दिलेला सन्मान, सुजाण पालक म्हणून स्वीकारलात तर आपलीच ही पिढी सुसंस्कारित, योग्य म्यानर्स सहीत मोठीहोईल. निरागसता जपणे आवश्यक आहेच, अजिंक्य ला मोठे करताना, माझा अनुभव मी मांडला……कच्चा घडा, आपणच पक्का घडवायचा, आकार देणे आपल्या हातात आहे.

बालदिना च्या शुभेश्च्या. आपण ही बाल होऊ या व त्यांचे मन ओळखून, पुन्हा अनेकदा ,लहानपणाचा अनुभव घेउया.

सुखी, आनंदी…….घराचा मायना(दरवाजा) .

घरे बोलतात! अगदी खरे काय ते सांगतात. घरांच्या नावाच्या पाट्या खूपच बोलक्या असतात. तसेच प्रवेशद्वार पण बोलते. काही खुणा देते. घर त्या कुटुंबाचा आरसा असे म्हणतात. टापटीप ठेवलेल्या घरात पण सुख असते ,तसेच छुपे वादळ ही समजते. घराच्या प्रवेश द्वारा पासून सुरवात करू.

१) दाराचा उंबरठा—— स्टीकर ची रांगोळीची पट्टी लावलेला असला तर, पट्टीला मध्ये चिरा असल्या, कडेने फाटलेल्या असल्या तर त्या घरात नवीन फर्निचर घेतलेले असते. मुले, नातवंड असलेले घर समजावे. रोज त्यांची सायकल बाहेर जात असावी. खाते पिते घर असे असते, जिथे अभिरुची व तब्येत दोन्ही ला ही महत्व आहे हे लक्षात येते.

२) दाराच्या चौकटीचे चे तोरण केंव्हाही जा सुकलेले, आंब्याची पाने वाळून कडक झालेली दिसली तर घरात व्यस्त व्यक्ती अधिक असाव्यात. आर्थिक बळ दिसते. तोरण बदलून दुसरे लावण्या इतका वेळ पण ह्यांच्या पाशी नाही हे जाणून आर्थिक उलाढालीत असलेली व्यस्तता, आधुनिक, अद्यावत सूखसोइंचे हे घर आहे असे दर्शवते.
धूळ बसलेले प्ल्यास्टिक चे तोरण म्हणजे, पाहुण्यांचा राबता नेहमी असावा. दार कायम खुल्या मनाने स्वागत करत असणार. मित्र परिवारात, मैत्री चे मूल्य अधिक वरचढ असणार.

३) उंबरठ्याच्या बाजूला रांगोळीची छोटी गोपद्मे, स्वस्तिक असले तर ती स्त्री परंपरा जपण्याचा प्रयत्न करते असे जाणवते. आधुनिक स्टीकर व मांगल्य यांचे घराला घरपण दिसते. कालची रांगोळी भिंतीच्या कडेला ढकललेली आढळली नाही, तर स्त्रियांची संख्या जास्त असणार. नीटनेटके पणा नक्कीच समजतो.

४) घराच्या दारावर धूळ दिसली तर मंडळी व्यक्तीविकासाच्या पुरस्कर्त्या असाव्यात.

५)दारावरच्या बेल चे बटन मळके, हाताने पडलेल्या बोटांच्या ठशांचे असेल तर, आदराने स्वागत केले जाईल ही खुणगाठ मी बांधते.

६) दारासमोर असलेले पायपुसणे जागेवर असले म्हणजे, त्याचा एक कोपरा तिरका नसेल तर ओळखावे शिस्तीचे महत्व जपले जाते. पायपुसणे जिरून जुनाट वाटले तर थोरामोठ्या व्यक्तींचा हे घर मान राखते कारण विरलेल्या धाग्यातूनच हे पिढीजात असावे, असा माझा तर्क आहे

७) दारातून बाहेर पडणारी मुंग्याची ओळ दिसली की मी ओळखते प्राणीमात्रांवर प्रेम केले जाते. प्रत्येकाला आपला घास मिळतो. अन्नपूर्णा सुखी असणार.

८) दारावरच्या नावाच्या पाटीवर सौ व श्री अशी दोन्ही नावे या क्रमाने वाचावयास मिळाली की स्त्री दाक्षिण्य जपले जाते.

९) घरात वाचनाची आवड असावी, हे बाजूच्या भिंतीवर असलेल्या वर्तमान पत्राच्या नोंदी वरून लक्षात येते.

१०) दाराला अजून एक सुरक्षा दार असले तर प्रासंगिक, मानसिक भक्कमपणा जाणवतो..

११) दारावरच्या लाकडाच्या चौकटी च्या कोपऱ्यात, कोनावर कोळीष्टके दिसली, तर पाहुण्यांनी घर नेहमी भरलेले असावे. पाहुणचार व्यवस्थित होईल असा विश्वास वाटतो.

१२) सुस्वागतम् ची पाटी, मराठीत असली तर आवर्जून मातृभाषा आठवते, इंग्रजीत असली तर माझ्या इंग्रजी बोलण्याची चाचपणी मी मनात करते.

१३) चपलांची सोय, एखादे छोटेसे रोपटे, दाराजवळ असले की वास्तूशास्त्र व स्वच्छता यांचा अभ्यास केला आहे. इतर विषयांची चतूरस्त्रता घरात असावी हा आडाखा मी बांधते.
१४) दारावर स्वस्तिक, गणपती, किंवा इतर मांगल्याची चिन्हे असली तर देव्हाऱ्या चे संस्कार असतील ह्याची खुणगाठ मनी ठसते.

१५)दरवाजाला जर जाळीचे आय होल (म्हणजे नेत्र कटाक्ष स्थान) असले तर कटाक्ष एव्हढा संपर्क पण प्रस्थापित ठेवतील. म्हणजे पुन्हा येण्यास हरकत नसावी असा संदेश माझ्या मनाला मिळतो. जर प्य्लास्टिक चे धुरकट कडा तुटलेले भिंग बाहेरून दिसले तर मी समजते की, पुन्हा येण्याआधी अंतर्मुख होऊन विचार करावा लागेल.

१६) सदनिका क्रमांक—–
लाकडात असला तर दुसरी पिढी पण परंपरा जतन करते.
स्टील,अल्लुमिनिम असली, तर दीर्घकाळ उपयुक्तता ह्याला महत्व.
काचेची, लक्षवेधी असली, तर दारासमोर खेळण्यास बंदी असावी.

१७)भुकेची जाणीव देणारे, बाहेर पोचणारे पदार्थांचे सुवास स्वयंपाक निपुणता गुण देतात दाराच्या कोपऱ्यावर खाली सापडणारे उदबत्ती चे अस्तित्व, किंवा धुपाचा येणारा सुगंध संस्कार दर्शवतात.

१८) दरवाजाचा रंग किंवा पॉलिश हे त्या घरातील व्यक्तींचे स्वभाव दर्शवतात. सरळ, गहिरा, आनंदी, ह्याचा स्वतंत्र अभ्यास आहे.

१९) दाराची मुठ ही सुद्धा घरात राहणाऱ्या व्यक्तींच्या स्वभावाचे विविध कंगोरे उलगडते.

२०)दार फारच टापटीप असले तर वागणे, बोलणे संयमित करावे लागेल असे वाटते. अघळपघळ पणा करता येणार नाही. असा बिचकत अंदाज घेते.
असे घराचे दार बोलते, सांगते, समजावते. बेल वाजवण्या पूर्वीच घर माझ्याशी बोलू लागते. घरा संबंधी नंतर केंव्हा तरी लिहीन. सध्या तरी मी दारातच उभी आहे. पोस्ट देताना वाचकांचा अंदाज घेते, कारण ब्लॉग रुपी घरात मी अजूनही रुळायची आहे.

Previous Older Entries