‘ज्वेल ऑफ मस्कत’ बोटीचा प्रवास……मस्कत ते सिंगापूर.

सिंदबादच्या सफरींची आठवण झाली. इथे एका राउंड अबाउट म्हणजे रस्त्याच्या एका सुंदर वळणावर राजमहाला समोर सुशोभित अशा आकर्षक हिरवाईत अत्यंत देखणे पणाने, डोलदार अशी सिंदबाद ची बोट उभारून ठेवली आहे. बोटीच्या खडतर प्रवासाची जाणीव होऊन सवेंदना थिजल्या होत्या.

मस्कत च्या इतिहासातला सुवर्ण क्षण पुन्हा एकदा जसाच्या तसा अनुभव घेण्यासाठी ‘ज्वेल ऑफ मस्कत’ ह्या बोटीचा प्रवास, मान्यवर सरकारी अधिकारी, बोटीवरच्या खलाशांचे नातेवाईक ह्यांच्या साक्षीने सुरु झाला. भव्य असा उदघाटन सोहळा व प्रत्यक्ष बोटीचा प्रवास सुरु झाला. ही बोट पूर्वीच्या पद्धतीने बांधण्यात आली आहे. १९९८ साली इंडोनेशियन समुद्रात मोडक्या अवस्थेत अशा बोटीचा शोध लागला. तिथून पुढील कार्य सुरु झाले. आताची बोट म्हणजे ह्या पुरातन काळाच्या बोटीच्या अवशेषावरून जसा च्या तसा आराखडा तयार करण्यात आला. नंतर तिची बांधणी चे नियोजन झाले.


एकही खिळा न वापरता फक्त नारळाच्या काथ्याच्या साह्याने बांधून मूळ ढाचा तयार केला गेला. आफ्रिकन जंगलातील घाना येथून लाकूड घेतले गेले. ओमान च्या कंताब येथे तिचे काम करण्यात आले. फक्त १७ खलाशी घेऊन ही बोट प्रत्यक्ष मस्कत ते सिंगापूर असा प्रवास करणार आहे

पूर्वी दिशा दर्शक म्हणून सूर्य व चंद्राच्या साक्षीने ‘कमाल’ ( kamal – an ancient navigational tool ) यंत्राच्या साह्याने बोट चालवली जायची. तेच तंत्र व तेच यंत्र आता सुद्धा वापरणार आहेत.

ही बोट प्रथम मस्कत- कोची( भारत) येथे थांबून पुन्हा पाण्याच्या बाहेर काढून तिचा ढाचा तपासाला जाणार आणि तिचे चुणाम (anti fouling ) पाहून पुन्हा एकदा नवीन थर देण्यात येईल. नंतर श्रीलंका–पेनांग बेट–मलेशिया व शेवटी सिंगापूर येथे जुलै च्या मध्य पर्यंत पोहोचणार आहे. सिंगापूर येथे संग्रहालयात ठेवण्यात येणार आहे. सिंगापूर व मस्कत ह्यांच्या सहर्कायाने ही बोट पुन्हा व्यापार उदीमाच्या स्मृतींना उजाळा देणारी ठरेल. तसेच पूर्वीच्या श्रमांना दिलेला सलाम आहे.

ह्या लिंक वर ह्याची माहिती आहे. ओमान सरकारने प्रत्येक घडामोडीची अत्यंत सविस्तर माहिती उपलब्ध करून दिलेली आहे. जवळ जवळ साडे सातशे फोटो आहेत तसेच ह्या बोटीचा कप्तान सालेह सैद अल जाबरी ह्याचा व्हीडीओ सुद्धा आहे. काही खलाशी तर पहिल्यांदाच प्रवास करणारे आहेत. पण त्या सर्वाना काटेकोर पणे प्रशिक्षित केले गेले. कप्तान व त्याच्या सह खालाश्यांचे मनोधैर्य खूपच भक्कम आहे. बोटीवर त्यांचे खाण्याचे समान कुठे ठेवले असेल?. तसेच विश्रांती बोटीवर नेमकी कशी घेणार? पाण्याची साठवण कशी ठेवत असतील? अशा मला भेडसावणाऱ्या प्रश्नांची उत्तरे ही साईट पाहून मिळाली.

फक्त दिलेल्या साईट वरच्या डाव्या बाजूच्या प्रत्येक बाबीवर आठवणीने क्लिक करून पहाच.

बोट बांधण्या पासून ते तिच्या प्रत्यक्ष प्रवास पर्यंत आपण पण अत्यंत आदराने सलाम करतो. अशा स्तुत्य प्रयत्नांना यश नक्कीच येईल. जगाचा नियंत्रा प्रत्येक धर्मात वेगळ्या नावाने असला तरी परंपरा जपण्याच्या ह्या आगळ्या वेगळ्या प्रवासासाठी शिडांना वाऱ्याची गती देईल. नारळी पुनवेचा सागराचा मान त्याला श्रीफळ अर्पून आपण ही कोळी बांधव समवेत सर्वांच्या शुभ सागरी प्रवासाची मनोकामना व्यक्त करतो.

यंदाच्या पुनवेला ओमान चे पण नावाडी सामील करूया. कारण देशाला सीमा आहेत, सागराला नाही व आपल्या सर्वधर्म समान संस्कृतीत पण मनाला बंध नाहीत. ओमान मध्ये पण सर्वाना आदराची वागवणूक मिळते कारण भारताशी बरीचशी मिळती जुळती परंपरा येथे ही आहे.

धन्यवाद ओमान सरकारचे व प्रवासासाठी ‘ज्वेल ऑफ मस्कत’ ला शुभेच्छा.

ओमान ची गुहा…….

डोंगरात लुप्त असे असंख्य पाण्याचे स्त्रोत असतात. खडका मध्ये जिथे कमकुवत जागा असेल तिथून ते खाली झिरपत येतात. खडकात जर चुनखडीचे प्रमाण जास्त असेल तर त्या चुनखडीत पाणी शोषले जाते. कालांतराने तिथे जमिनी पासून वर चढत जाणारे ‘ऊर्ध्वमुखी’ व छतापासून खाली झेपावणारे ‘अधोमुखी’ लवणस्तंभ तयार होतात. ही प्रक्रिया वर्षानुवर्षे चालू असते. शेंदरी,पांढरा,सोनेरी, करडा, गुलाबी, बेज असे रंग येथील निसर्गाच्या कलाकारीत पाहण्यास मिळतात. अशाच प्रकीयेमुळे त्या ठिकाणी मोठ्या मोठ्या गुहा तयार होतात.

‘अल हुता केव्ह’. Al Hoota Cave लवण स्तंभांची प्रेक्षणीय गुहा. मस्कत पासून ‘निझवा’ ह्या ठिकाणी ‘जबल अल शम्स’ म्हणून डोंगरांची रांग आहे त्याच्यातील ‘अल हजर’ डोंगरात ही गुहा पाहण्यास मिळते. एका मेंढपाळा ने शोधली आहे. दोन मिलिअन वर्ष जुनी आहे. साडे चार किलोमीटर चा परिसर ह्या गुहेत फिरण्यास मिळतो. ही गुहा पाहण्यासाठी ओमान ची पहिल्या ट्रेन ची सुरवात करण्यात आली. ही ट्रेन बऱ्याच वेळेला बंदच असते. चालण्याची तयारी ठेवावी लागते. गुहा पाहण्यासाठी आतमध्ये पायऱ्या बांधण्यात आलेल्या आहेत. २३० पायऱ्या चढल्यावर आपण गुहेच्या सर्वात उंच ठिकाणी म्हणजे ६५ मीटर उंची पर्यंत वर येतो. पुन्हा २०० पायऱ्या उतरून खाली यावे लागते. गुहा पूर्णपणे थंड असून हवेचा पुरवठा गुहेत खेळवला आहे. वाळवंटी परिसरात, विशेषतः डोंगरावर एकही झाड सुद्धा नसते. अशा ठिकाणी एवढ्या मोठ्या प्रमाणात लुप्त असे पाणी असेल ह्यावर परिसर पाहून मुळीच विश्वास बसत नाही.

ह्या संदर्भातले एक उत्कृष्ट असे संग्रहालय प्रवेश द्वारापाशी आहे. अशा खडकात सापडणारी स्फटिके, खडकांचे विविध नमुने, येथील कीटक, असा संग्रह आहे. २.७ किलोमीटर लांब असे टनेल म्हणजे बोगदा आहे. नंतर आपण प्रत्यक्ष गुहेत प्रवेश करतो.
आद्रतेचे प्रमाण ९०% आहे. पाणी झिरपून अत्यंत नयनरम्य असे विविध आकार तयार झालेले आहेत. सिंह, जॉर्ज वाशिंग्टन ह्यांची चेहेरे पट्टी, माश्याचा आकार, मला तर तेथे गणपतीचा आकार सुद्धा स्पष्ट दिसला. आपण आपापल्या संस्कृती नुसार नजरेने पाहत असतो.
गल्फ मधील सर्वात मोठी केव्ह आहे. १८ डिसेंबर २००६ ला लोकांकरिता ओपन केली गेली. दरोरोज ७५० लोक भेट देतात. फोन करून तुम्हाला उपलब्ध वेळ व दिवस सांगितला जातो. प्रत्येकाचे रेकॉर्ड असते. गुहेतील ईको सिस्टीम बिघडू नये म्हणून ही खबरदारी काटेकोर पणे सांभाळली जाते.१०० लोक एका वेळेला पाठवले जातात. उच्छ्वासाचे चे प्रमाण वाढेल म्हणून ही खबरदारी घेतली जाते. तुम्हाला येथे बुकिंग करूनच जावे लागते. अचानक गेलात तर भेट करून देतील याची खात्री नाही.

येथे ८०० मीटर लांब व्याप्तीचे २३ डिग्री उष्ण तापमानाचे तळे आहे. तिथे अशा गुहेतल्या पाण्यात राहणारे आंधळे मासे आहेत. (Garra barreimiae) अशी जात त्यांची आहे. डोळ्याचे आकार आहेत पण डोळे अविकसित अवस्थेत असतात हे मासे अशाच प्रकारच्या जैव परिस्थितीत गडद अंधाराच्या पाण्यात असतात. विजेरीच्या साह्याने ह्यांना पाहावे लागते. संपूर्ण गुहा गाईड दाखवीत असतो. शांत गूढ हिरवे पाणी पाहून हे मासे बिन डोळ्यांचे खाणे कसे शोधत असतील असा प्रश्न मला पडला. ते बारीक जीव शोधून खातात असे गाईड ने सांगितले. पाण्यात नेहमीच ताज्या पाण्याचा पुरवठा सतत सुरु आहे. तसेच हे पाणी पुन्हा झिरपून दुसरीकडे जाते व पुढे कुठेतरी 'वादी' म्हणजे पाण्याचे अस्तित्व असलेली जागा तिथे बाहेर पडते.

इथे फोटो काढायला पूर्ण बंदी आहे. मोबाईल किंवा कॅमेराचा फ़्लॅश चालत नाही. ओमान गव्हर्मेंट ने काही फोटो उपलब्ध करून दिले आहेत. तसेच विशिष्ट परवानगी काढून असे शूटिंग केले जाते. त्यातीलच काही उपलब्ध अशा संग्रहातून काही फोटो मिळाले. ते इथे पोस्ट करीत आहे.

आवर्जून बघून यावी अशी ओमान ची अल हुता केव्ह आहे. वाळवंटी शुष्क भागात पाण्याचे दुर्भिक्ष जाणवत असताना पाणी मात्र जमिनीच्या अंतर्गत भागातून वाहत असते. पाण्याने तयार झालेली ही भव्य दिव्य गुहा बघणे म्हणजे शांत, थंड, गूढ वातावरणातील हा विसरू न शकणारा अनुभव निश्चितच आहे.

दिनू चे आई बाबा नेहमीच का दमतात?

गेले काही दिवस मी दमलेले बाबा चे विरोप न वाचता डिलीट करीत आहे. त्या पूर्वी दिनू च्या आईने मला सतावले होते. एखादा भावना प्रधान विषय एकदाच बरा वाटतो. सतत तोच विषय पुनुरावृती झाला की भावनिक काळे विरोप म्हणजे भावनेचे दबाव तंत्र सुरु होते. त्यातून बाहेर पडावेसे वाटत नाही. खूप जणांनी हे दोन विरोप पाठवले. आई वडिलांच्या भावना, त्यांचे कष्ट ह्याची जाणीव मुलांना असणे गरजेचे आहे. पण आईवडील म्हणून आपणच त्यांना भावनिक दबाव तंत्राने स्वतःला त्यांच्या पुढे आपण किती थोर आहोत हे सांगत असतो. मुलांच्या मानसिक वाढीसाठी पालकांचे हे दबाव तंत्र घातक ठरते. मी आतापर्यंत हे दोन्ही विरोप अजिंक्य ला दाखवले नव्हते. काल सहज त्याने मी काय डिलीट करते म्हणून पहिले तर ही गोष्ट मी वाचतो असे म्हणाला तर मी म्हंटले ठीक आहे वाच पण तुझे मत मला जाणून घ्यायला आवडेल. त्याने त्याची जी काही मते सांगितली त्यावरून आजची पोस्ट तयार झाली.

प्रथम म्हणाला दिनूची आई बद्धल सांगतो. आई अशी किती तरी घरे मी पहिली आहेत की जिथे आईचे काम केले की आई पैसे देते. त्यांचे बाबा संध्याकळी घरी आले की त्यांचा मुलगा पाणी देतो. वडील त्याला घरचा नियम म्हणून पैसे देतात. अभिमानाने सांगतात की तो बचत करतो. मग दिनूने स्वतःहून पैसे मागितले काय बिघडले? पालकच अशी शिकवण देतात तर मग आई किती थोर आहे ह्याला काहीच अर्थ उरत नाही. ह्या गोष्टी मी पण जवळच्या काही घरातून पहिल्या आहेत. आई दमते, रात्री खस्ता काढून मुलांची दुखणी काढते. असे मी म्हंटले तर जन्म तुम्हीच दिलात न. मग आई म्हणून बाळा करिता केले तर ते छोटे बाळ मोठे झाल्यावर त्याला हेच ऐकवणार का?

दिनू ची आई दिनूच्या चांगल्या भविष्य करिता कष्ट करते. पण आई ह्याचा अर्थ असा होत नाही न दिनू चुकला आहे. दिनूने माझ्या सारखेच असे पैसे पालकांनी दिलेले पहिले असतील. कदाचित त्याची आई पैसे देत ही नसेल म्हणून आपले मुल चुकले हे दाखवून देण्या करिता पालकांनी काय काय मुलांकरिता केले हे दाखवण्या पेक्षा दुसरा पर्याय नाही का? आई तूच सांगते न तुला वाढवण्यात मला काहीही त्रास झाला नाही. अशीच वयस्कर लोकांची पण सेवा करायची असते. आपण तुमचे करून दमलो किंवा आम्ही खूप काही करतो हे सांगत बसायचे नसते.

आम्हालाही समजते की आमच्या काळजीने तुम्ही किती करता आमच्या करता पण हेच सकारात्मक करून घेता येईल का? आई दिनू ची आई तिने त्याच्या करता काय केले ते सांगूनही बिल मात्र शून्य लावते ह्याचा अर्थ दिनूने मोठेपणी ते बिल भरायचे का? का ह्याच दबावात बसायचे की तिने किती किती काय केले. आई, मुलांकडून चुका होतातच पण ह्याचा अर्थ त्यांना भावनिक दबाव आणून सांगणे का त्यांच्याशी नीट शेअर म्हणजे गप्पा करून त्यांना समजावून सांगणे. तूच सांग तुला काय पटते. आई तू अशी चिठ्ठी माझ्या करता ठेवली असतीस का?

आता माझ्या कौशल्याची वेळ आली. मी नसती अशी चिठ्ठी ठेवली कारण तुला योग्य वेळी समजावून सांगितले असते. घरच्या कामाचे पैसे नसतात किंवा आईने मुलाकरता करणे पण तिची आई म्हणून जवाबदारी आहे. कारण बाळ पाहिजे हा निर्णय आई वडिलांचा असतो तेंव्हा पुढील जवाबदारी त्यांना पेलावता यायला पाहिजे तरच ते पालक होतील. आम्ही मोठी माणसे पण चुकतो. पण चुकातून शिकायचे असते.

मला माझ्या वडिलांनी १९७० साली माझे स्वतःचे खाते बँकेत उघडून दिले होते. महिना १० रुपये दर महिन्याला भरायचे होते. ते दर महिन्याला रक्कम देत असत व मी जाऊन भरत असे. अजिंक्यला पण त्याच्या पहिल्या वाढदिवसाला आम्ही त्याचे खाते उघडून दिले. तो स्वतः त्यात आम्ही दिलेली रक्कम भरतो. त्यातूनच त्याच्या आवडीचे घड्याळ व आम्हाला, आजी आजोबाना. मित्रांना, भेट वस्तू देत राहतो. असे पैशाचे महत्व व त्याचा हिशोब कुठे ठेवायचा हे आपल्याला त्यांना शिकवता येतो. मग आईचे बिल व दिनूचे बिल असे मानसिक द्वंद उभे ठाकत नाही.

मुल चुकले तर त्याला त्याच्याच पद्धतीने उत्तर देणे सर्वस्वी चुकीचे आहे. मुलाने आपल्याला, “सॉरी मी चुकलो” म्हणणे हे ह्याचे उत्तर नाही तर मुलांच्या मानसिकतेशी हा खिलवाड आहे. आई तू काम करून दमतेस, माझे सर्व कौतुकाने करताना तू थकतेस तरीही करत राहतेस, माझ्या साठी तू रात्रभर जागून माझी दुखण्यात सेवा करतेस. आई तुला बरे नसले की मी पण तुझी काळजी घेतोच तू दमतेस म्हणून मला वेळ मिळाला की तुला मदत ही करतो. आई आयुष्य हे एकमेकांकरता असते त्यात समजावून घेणे हे जास्त महत्वाचे आहे. असे माझा लेक मला सांगत होता. दिनू ची आई मी नाही म्हणून मला खूप आनंद झाला. एक चांगला माणूस म्हणून माझा लेक आयुष्यात कधीही मागे पडणार नाही. मोठ्या बाळाची मी चटकन पापी घेतली.

आता लेकाने दमलेले बाबा वाचण्यास सुरवात केली. आई बाबांना ऑफिसचे टेन्शन, पगारात काय काय करायचे हा मोठा प्रश्न? मुलांची शिक्षणे. घरची जवाबदारी हे सर्व आम्हालाही समजते, आई वडिलाचे होणारे वाद, त्यांचे जास्तीचे काम करणे, रात्री दमून घरी येणे ह्या मुळे मुलेही मनाने दमतात. त्यांना पण खजील वाटू लागते. मी अजिंक्य च्या ह्या स्पष्टीकरण देण्याने उत्सुकतेने ऐकू लागले.

आई तुमच्या कडे गरजे पेक्षा जास्त साड्या, पर्सेस असतात. त्याचे बिल कमी केले तर अधिक बचत घराकरता होऊ शकते. मग मुलांनी एखादा टी शर्ट जास्त मागितला तर तो मुलगा चुकला का? दर सणांना तुम्ही डायमंड किंवा सोन्याचे दागिने घेता मग बाबा गरीब कसे? दर महिन्याला मोठ्या माणसांचे माप बदलत नसते त्यामुळे ते वर्षातून सारखे कपडे घेत नाहीत. आमचे माप बदलून कपडे तोकडे होतात त्याला आमचा काय दोष?

बाबा अधिक अधिक जागा राहण्यासाठी घेतात त्याचे कर्ज देतात त्यातच बराचसा पगार जातो. हे सर्व मुलां करता असते. पण त्यात तुम्ही राहणार नाही का? मला एक जागा ठेवली. मी माझ्या मुलाकरता बंगला घेईन, तो पुढच्या पिढी करता थंड हवेच्या ठिकाणी, समुद्र किनारी अशा वेगवेगळ्या जागा घेत राहील त्यात विशेष काय आहे. मी जर माझ्या पगारात नियोजन करून ह्या गरजा वाढवून निभावू शकतो तर तो पुरुषार्थ आहे. ती घराकरता पालकांची जवाबदारी आहे.

बाबा त्यांच्या करता एखादी गोष्ट पैशाचे नियोजन करून घेऊ शकत नाहीत का? आम्ही बऱ्याच वेळेला हट्टी पणा करत असतो. पण तुम्हाला जर दागिना घेतला नाही तर आई पण रुसून बसते की नाही. आम्ही त्याला ठराविक रक्कम पगार म्हणून सांगितली आहे. त्यात घरचे हिशोब, शिल्लक राहणारी काही विशिष्ट रक्कम ह्याचा हिशोब ठेवण्याचे काम त्याला दिले आहे. तो दर महिन्याला लिहून काढत असतो. शिल्लक रकमेत तींघांच्या गरजे प्रमाणे खरेदीचे नियोजन तोच आम्हाला सांगतो. त्यामुळे गरीब बिच्चारे बाबा असे उद्दातीकरण माझ्या घरी नाही.

आमचा बाबा दमतो पण लेकाला त्याचा दबाव देत नाही. आता पण फोर व्हील अशी जी एम सी/ प्राडो लैंड क्रूज़र गाडी घेऊया असा आग्रह करतो. नंतर कर्जाचा हप्ता पगारात कसा बसवायचा ह्याचा हिशोब लावत गणिते मांडत राहतो. शेवटी आमच्या बजेट मध्ये बसणारी ही गाडी त्याला मिळाली. त्याचे टेक्निक, सोई सुविधा ह्या बाबी त्याने शोरूम मध्ये जाऊन पहिल्या. आंम्ही तिघांनी ही गाडी जमू शकते असा निर्णय घेतला आहे. असे नियोजन मुलांना प्रत्यक्ष सहभागी करून शिकवता येते.

पुढे म्हणाला आई ज्यांचे बाबा सैनिक असतील तेच खरे दमतात. मुलांना भेटण्यासाठी त्यांना ठराविक सुट्टी दिली जाते. त्यांचे घर त्यांची मूले ही त्या घरच्या आईची जवाबदारी असते. त्यांची खूप घरे ही नसतात. ते देशाकरता प्राण पण देण्यास तयार असतात. मला तेच खरे बाबा वाटतात. मुलांना उशिरा का होईना पण तुम्ही भेटू शकता. पण सैनिक असलेला त्यांचा बाबा पुढच्या वेळेस आपल्याला मूले, घर, दिसेल याची खात्री नसूनही कसा निर्धाराने देशाकरता लढतो. आई आम्हा सगळ्यांचे बाबा स्वतःच्या घराकरता कष्ट करतात, संपत्ती वाढवतात, पण तुला नाही का वाटत हे सैनिक असलेल्या बाबा च्या पुढे खूप स्वार्थी आहे. सगळे सैनिक नसतात पण मग दमून जाण्या इतक्या गरजा का वाढवतात. मुलांना पण ह्याचे प्रेशर देतात.

आमचे छान छोटेसे बालपण त्यात तुमच्या काळज्या असल्या की मोठे होणे वाईट आहे का असा विचार येतो. आई पालकांचे कष्ट, बाबांचे दमणे, त्यांचे घराकरता मन मारून राहणे, स्वतःची आवड, हौस पूर्ण करता न येणे. आईचे बिल न मागता काम करणे हे पालकांना कमी करता येणार नाही का?आम्हालाही आमचा अभ्यास, परीक्षा, स्पर्धा, मित्र परिवार ह्यांच्या काळज्या आहेतच की आम्ही कोणाला न सांगता हे सर्व लहान म्हणून पूर्ण करत राहायचे आहे. हेच स्पर्धात्मक जग तुम्ह्लालाही आहेच मग मनाने असे दुबळे होऊन कसे चालेल? अजिंक्य च्या ह्या प्रश्नाने मला चांगलेच कोंडीत पकडले.

पैशाचे नियोजन, वेळेचे नियोजन केले तर बराचसा ताण कमी होऊ शकतो. आपले काम त्याचा दबाव मुलांवर आणू नका. त्यांना घरच्या नियोजनाच्या कामात योग्य वय झाले की सामावून घ्या. दिनू च्या आई सारखे बिन मोबदल्याचे काम मुलांना सांगण्याची वेळ येणार नाही. दमलेले बाबा त्याचे उद्दातीकरण करू नये. आपण त्यांना समजावून सांगणे हा एक मध्यम मार्ग होऊ शकतो. आपले बाबा दमून, न झेपणारी कामे करून वैतागत होते हे किल्मिष मुलांच्या मनात राहणार नाही.

मुख्य म्हणजे आई, वडील, मूले, घरचे जेष्ट ह्यांना समान सन्मान द्या तरच दमलेले बाबा असे समीकरण कायमचे पुसून जाईल व पुढच्या पिढीत दमलेले दिनू राहणार नाहीत.

वेळापत्रक आणि मी………

वेळापत्रक आणि मी हा सहसंबध खरे तर माझा जवळचा विषय. शाळेत असताना किंवा लहानपणापासून हे सर्व आठवणे म्हणजे असे काही उल्लेखनीय घडले नाही तर लिहिणार काय? हा एक प्रश्नच आहे. एक बरे असते की शाळेचे वेळापत्रक, आपल्या कार्यालयाचे वेळापत्रक हे ठरलेले असते म्हणून निदान ह्या दोन्ही ठिकाणी बरोबर वेळेत पोहचायचे. शिक्षिका असल्याने शाळेत विद्यार्थ्यांसारखे उशीर करून चालत नाही. वर्ग सांभाळायला पर्यायी शिक्षक असला तर ठीक नाहीतर वर्ग शिक्षिकेशिवाय तसाच राहू शकतो.

पण अशी अनेक वेळापत्रके केली व ती कधीच पूर्ण झाली नाहीत. कॉलेज ला असताना संध्याकाळी नियमित मैदानावर खेळायला जायचे कारण तसा नियम क्लब चा होता. वेळ पाळण्याचे बंधन असले की सगळ्या गोष्टी वेळेतच होतात. स्वतःच्या आवडीच्या गोष्टी करिता एखादे ध्येय किंवा उद्दिष्ट पूर्ण करणे हे एकवेळ जमते. पण अशाच दुसऱ्या गोष्टी वेळ पाळून, नियम करून जमतातच असे नाही. अशा गोष्टी का झाल्या नाहीत म्हणून कारणे शोधणे म्हणजे आपलेच समाधान करून घेणे ठरते. सकाळचा ठराविक व्यायाम, चालणे,किंवा पोषण मुल्ये पाहून खाणे, आहारात प्रोटीन पाहून बदल करणे, अशा गोष्टींचा नादच सोडून दिला आहे. जे वेळेत जमत नाही ते उद्या पासून नक्की करू असे ठरवत असते.

अजिंक्य चा जन्म झाला आणि मला वयानुसार तान्ह्यांचे खाणे काय असते ही पुस्तके वाचण्याचा छंद लागला. आपले बाळ आरोग्यपूर्ण असावे म्हणून मी तो जसजसा मोठा होईल तसे अनेक पुस्तकांचा आधार घेऊन आईशी हिरहिरीने चर्चा करून अनेक पोष्टिक मुल्ये जपणारे असे त्याच्या खाण्याच्या वेळेचे पत्रक बनविले व स्वयंपाकाच्या दारावर लावुन ठेवले होते. त्याचा दिनक्रम, भुकेच्या वेळा इत्यादीचा कुशलतेने विचार करून अनेक डाळींचे रवे, पीठे, भाजी चे सत्व ह्याचे बारकाईने टिपण करून डोळ्यासमोर ठेवले. आई ऐकून घेत होती, रवा, पीठे वैगरे बनवून ठेवण्यासाठी मदत पण करत होती. पण स्वतःचे मत काही व्यक्त करीत नव्हती, मी विचारले तर म्हणाली तुमची पुढची पिढी, नवीन विचार चांगले आहेत.

इथेच माझे हे वेळापत्रक कोलमडले, कारण अजिंक्य ला सुरवातीला मी मोठ्या कौतुकाने भाताची पेज वैगरे भरवली पण आई पोळ्या करीत असताना त्याला पोळीचा छोटासा तुकडा तूप लावुन चघळायला द्यायची हा ही पठ्या माझे आधुनिक विचार केलेले खाणे फुर्र करून तोंडातून उडवायचा. भाजी केली की, छोट्याशा ताटलीत देऊन त्याच्या पुढे ठेवायची, मजेत भाजी चिमटीत पकडून खायचा. आपले पुस्तकी शहाणपण फारसे उपयोगाचे नाही हे समजून मी वेळापत्रकाचा कागद काढून टाकला. आईची पोष्टिक मुल्ये सोपी होती. आपलेच जेवण तेल, तिखट, मसाले कमी करून प्रथम बाळांना द्यायचे मग तो पदार्थ मोठ्या करिता बदल करून वाढायचा. आपण जेवत असताना त्यांना नेहमी आपल्या बरोबर जेवणासाठी बसवायचे आपोआपच चांगल्या सवयी लागतात. बाळ मोठे कधी झाले हे मलाच समजले नाही. सर्व घरचेच, पण बाळापासून ते वयस्कर पर्यंत सर्वाना आरोग्य पूर्ण व संस्कार सहित वदनी कवळ घेता म्हणून जेवणास सुरवात करून देणारे ठरले

अजिंक्य च्या अभ्यासाचे वेळापत्रक हे कायम अयशस्वी झालेले आहे. मी त्याला वेळापत्रक करून द्यायचे. आज हा अभ्यास पूर्ण करायचा आहे म्हणून उद्यापासून बघू असे वचन मला देतच राहिला. आता मात्र तो स्वतःचा अभ्यास स्वःताच करतो. काही अडले तरच मदत करावी लागते. ठराविक वेळी काही विषय आवर्जून करतो असे माझ्या लक्षात आले. त्याला विचारले तर म्हणतो कसा तूच आतापर्यंत किती वेळा मला अभ्यासाचे वेळापत्रक करून दिले त्यामुळे मी स्वतः अभ्यास करायला लागलो. संध्याकाळच्या वेळी खेळून आला की रात्री तो वाचन करतो व सकाळच्या वेळी लिखाण करतो.

मला वाटत होते की माझे प्रयत्न फुकट गेले पण त्यानेच वेळापत्रकाचे निरीक्षण करून स्वतः ही जवाबदारी घेतली हे पण माझ्या अयशस्वी वेळापत्रकाचे यश म्हणावे लागेल. बरेच वेळेला वाटते की शाळेतले प्रोजेक्ट्स आपल्यालाच पूर्ण करावे लागतात. मुले कधी करणार हा प्रश्न पडतो पण ती एकटी करायला लागतात तेंव्हा समजते की त्यांनी आपली निरीक्षणं करून ठेवली होती. मुलेच आपल्याला धीर देतात. स्वतः ते कधी शिकतात ते आपल्याला समजत नसते. असा हा दुसरा वेळापत्रकाचा प्रयोग.

सकाळच्या वेळेत चालणे हे आरोग्यदायी नक्कीच आहे पण हे मला काही निग्रहाने जमत नाही. काल झोपच पूर्ण झाली नाही, कंटाळा आला, नाहीतर सकाळची कामे डबे तयार करणे कोण करणार इत्यादी कारणे माझीच मला मी देत राहते. स्वतःचे वेळापत्रक अजूनही जमत नाही. कामाला निघायचे त्याआधी घरातील सर्व कामे लगबगीने पूर्ण करावी लागतात. कामाचे नियोजन मात्र जमावेच लागते कारण कार्यालयात वेळेवर पोहचायचे असते. सध्या एक विम्याची जाहिरात सतत दाखवतात त्यात कर्मचारी आरोग्याच्या काळजीने व्यायाम करतात. जाहिरातीसारखे दरोरोज कामाच्या ठिकाणी काही वेळ आलटून पालटून प्रत्येकाला असे व्यायाम प्रकार करावयास कार्यालयातच जागा ठेवली किंवा एखादे छोटेसे जिम ठेवले, किंवा मार्गदर्शनाने योगासने करून घेतली तर? अशक्य बाब आहे पण प्रत्यक्षात आली तर आरोग्यम धनसंपदा असा कर्मचारी वर्ग तयार होईल.

तसेच जेवणाच्या वेळेत सलाड, कोशिंबिरी असे पोष्टिक मुल्ये जपणारे पूरक अन्न पुरवठा (घरगुती ऑर्डर) करून डब्याच्या सोबत घेतले तर दुपारचे जेवण उरकणे न राहता, उत्साह वाढवणारे ठरेल. अर्थात बरेच कर्मचारी सहभागी असले तर सहज शक्य होईल. असे माझे व्यायामाचे वेळापत्रक कार्यालयात करता येईल का म्हणून आशेवर राहिले आहे. तसेच सलाड वैगरे पैसे देऊ पण आयते मिळू दे अशा इच्छे वर तग धरून आहे.

अजिंक्य वडिलांच्या पावलावर पाय ठेवून पक्का खवय्या झाला आहे. सध्या मी घरचे मेनू आठवडी प्रमाणे करण्याचे नवीन वेळापत्रक ठरविले आहे. महिन्याचे साधारणपणे चार आठवडे त्या प्रमाणे एक आठवडा पंजाबी, गुजराथी, चायनीज, मराठी व पाचवा आठवडा आलाच तर कॉनटीनेनटल असे नाश्ता, जेवण त्या त्या पद्धतीचे करायचे असे ठरविले आहे. आतापर्यंत तरी घरी माझ्या नवीन कल्पनेचे ह्या दोघांनी स्वागत केले.

सध्या गुजराथी आठवडा सुरु आहे त्या प्रमाणे फुलके, ज्वार बाजारांनी रोटली, खिचडी, कढी, ढोकले, खमणी, उंधियो असे प्रकार करून झाले. गुजराथी पद्धतीची भाजी, त्यात कच्छ असा प्रदेश पण मी सहभागी करून घेतला आहे. पण मलाच मध्येच पिठलं भाकरी करावी असे वाटू लागले आहे. नवनवीन वेळापत्रके करून माझीच मी मोडत असते. वेळापत्रके बनवण्याची हौस काही पूर्ण होत नाही. असे माझे उत्साहपूर्वक प्रयोग कोलमडतात, पण बनवता येतात हा तरी आनंद आहेच.

अजिंक्य ला प्रांतीय मेनू कळावेत व आई पण सुगरण आहे हे दाखवायचा सुप्त हेतू आहेच.खवय्ये हे उत्तम खाणे असेल तर विना तक्रार मजेत असतात. म्हणून माझा हा आटापिटा चाललेला असतो. आठवडी मेनू ठरला असला तर आधीच तयारी करून ठेवता येते. माझ्या ह्या वेळापत्रक मुळे हे दोघेही खुश आहेत. त्यात पण माझे शाकाहारी व त्यांचे सामिष असे दोन्ही मेनू करीत असते. सकाळी कामाला निघण्या आधी दिवस भराचे खाण्याचे नियोजन करून तशी तयारी करून असते. खाण्यात प्रांतीय वाद माझे घर मानत नाही. सर्व जाती धर्माच्या खाण्याला समान वागणूक मिळते. मला ह्या दोघांच्या उत्साहाकरिता हे वेळापत्रक कसोशीने अमलात ठेवले पाहिजे.

माझ्या ह्या अभूतपूर्व अनेक वेळा पत्रकांमुळे ह्यांना नवीन वर्षाच्या संकल्पना म्हणता येणार नाही कारण अनेक वेळा पत्रके मला गरजे प्रमाणे सुचतात. कधीही एक जानेवारीला मी काहीही ठरवत नाही. कारण पूर्ण वर्ष नवनवीन संकल्पना नव्हे तर वेळा पत्रके मी बनवत राहते. आता मात्र सकाळी जमत नाही म्हणून संध्याकाळी आवर्जून हेल्थ क्लब ला जाते. मदती करिता कामाला मुलगी ठेवली आहे. नवीन अत्याधुनिक उपकरणांची मदत घेऊन पूर्ण होणारी नवीन वेळा पत्रके बनविणार आहे.