महिला दिन जस जसा जवळ येउ लागतो तसे अनेक लेख महिलांच्या प्रगतीचा आढावा घेणारे वाचण्यास मिळतात. क्षेत्र कुठलेही असो तिने तिच्या जबाबदारीची, कर्तुत्वाची छाप पाडलेली दिसते. घर, शेती, विविध तंत्रद्यान तिने सहज काळाप्रमाणे आणि तिच्या गरजेप्रमाणे आत्मसात केले. तिच्या आवडीप्रमाणे तिचे कामाचे, आवडीचे क्षेत्र पण वेगळे असते. कोणाला घराची चौकट…पती, मुले आणि संसार तर कोणाला आकाशाची भरारी….एव्हढी अफाट कुवत तिच्यात आहे.
आकाशात भरारी घेणारी एखादी पायलट, शेजारच्या गृहिणीची जवाबदारी पार पडणाऱ्या आपल्या मैत्रिणी बरोबर पण रमते, त्यांच्या मैत्रीमध्ये कर्तुत्व आड येत नाही. घराचा उंबरा, पारंपारिक चौकट पण तिला हवीशी असते आणि आकाशात झेप घेणाऱ्या पंखाची पण तिला ओढ असते. हा सहज स्वभावातला बदल स्वीकारणे हे स्त्री च्या रक्तातच आहे. तिच्या प्रकृतीत आहे. जशा संधी येतील, तशा स्वीकारत आपली जवाबदारी पार पडणे आणि तेही हसत मुख राहून, हे वैशिष्ट्य. असे लेख म्हणजे प्रोत्साहन देणारे, कर्तुत्वाला सलाम करणारे, अंतर्मुख करणारे ठरतात. अनेक दिवस मनात ठाण मांडून बसतात. स्त्रीच्या प्रगतीच्या ह्या आलेखात तिला कधी कोणाची साथ मिळते तर कधी ती एकाकी असते. घर ते आकाश ती स्वतः भोवती फिरवत राहते. त्यातच ती आनंदी राहते. जेव्हढे मिळाले त्या संधीचा पुरेपूर मनसोक्त आस्वाद घेण्याची कला तिज जवळ निश्चितच आहे.
एकात एक अशा मावणाऱ्या बाहुल्यांच्या मध्ये पण तिला द्वितीय स्थान असते. प्रथम दर्शनी असते हि पुरुषाची बाहुली. कदाचित हेच दृढ असे जीवनाचे सत्य सर्वसंमत असावे. घरातील सदस्य तिचा सहज आधार घेतात.आतल्या कोशात राहूनही तिच्या आत्मबला मुळे सहज सर्व जवाबदारीवर पूर्णतः यशस्वी होते. ग्राम स्तरावर आणि शहरी वातावरण ह्या प्रमाणे स्त्री च्या व्यक्तीमत्वात, जवाबदारीवर फरक असतो पण कुठेही ती घर दारासाहित सर्वाना सांभाळून घेते. जसा हा सकारात्मक बदल अनुभवास येतो तसेच काही प्रमाणात अजूनही तफावत हि आढळते. उदा. घरचे कितीहि शिकवायला तयार असले तरी ( मागच्या पिढीतील )आई… संगणक चटकन शिकण्यास राजी होत नाही. स्वतःचा इमेल आयडी हि पूर्णतः अगदी घरगुती स्वरूपावर असला तरी सुद्धा प्रत्येकाची वैयातिक बाब आहे. समजा ती गृहिणी असली तर इमेल आयडी चा पासवर्ड सुद्धा ती अतिशय प्रामाणिक पणे मुलां कडून किंवा पतीला तयार करून देण्यास सांगते. पतीचा, मुलांचा आयडी आमचे अतिशय महत्वाचे काम असते उगाच डिलीट काहीतरी होईल म्हणून ते तिला सांगत नाहीत. खरे तर घरात असे काहीच नसते.तिला तिच्या सर्व वैयक्तिक बाबी सुद्द्धा कुटुंबा बरोबरच आवडतात. माझ्या ह्या पिढीतल्या बऱ्याच मैत्रिणी ह्या अशा आहेत. अजूनही असे वातावरण पाहून आश्चर्य वाटते. घरची आणि आजूबाजूची परिस्थिती शिकवण्यास सकारात्मक असेल तरीही हि स्वतः भोवती कुंपण आखून घेते. पासवर्ड न सांगण्याचा घरच्यांचा मुद्दामहून खोडसाळ नसतो. मी व्यवस्थित पाहू शकते हा तिचाच आत्मविश्वास कुठेतरी अजून वाढण्यास हवा. स्त्री ला स्व:ताची झेप ओळखता येते. पूर्णतः आत्मनिर्भर होण्यासाठी अधिक आत्मबल ओळखण्याची गरज अजूनही कुठेतरी जाणवत रहाते. अर्थात सर्व ठिकाणी असे विरोधाभास दिसत नाहीत हि जमेची बाजू.
ज्या प्रमाणे संगणक माहिती करून घेणे हे आजच्या युगात चटकन संपर्क साधण्याकरता खूप गरजेचे आहे तसाच मोबाईल सुद्धा महत्वाचा आहे. माझी आई तर ७० वर्षाची होती. मोबाईल नीट राहावा म्हणून डब्यात घेऊन जात असे मग कुठले कनेक्शन मिळणार?? रस्त्यावर जात असे घरात आम्हाला मात्र ती सुखरूप दिसे पर्यंत चैन पडत नसे. मागच्या पिढीला हे तंत्रज्ञान नवीन होते. माझ्या गृहिणी मैत्रिणी घरात त्यांचा मोबाईल कुठे आहे? तो चार्ज आहे का नाही ह्याचा काहीही थांगपत्ता त्यांना नसतो. नेहमीचे बोलणे ऐकवतात तू नोकरी करतेस म्हणून तुला सवय आहे ह्या गोष्टींची, आम्ही काय घरातच..घरचा न आहे, मग कशाला उगाचच मोबाईल चा त्रास सहन करायचा. हे आणि मुल ठेवतात लक्ष. कमाल वाटते मला अशा बोलण्याची, घरात सर्व सोई उपलब्ध करून दिल्या आहेत न, मग त्या आत्मसन्मानाने स्वीकारायला शिका!!!! काळाची गरज म्हणून तरी निदान!!!
दागिने हा स्त्री चा अतिशय जिव्हाळ्याचा मुद्दा असतो अर्थात आवड असेल तर. बाजारातले भाव मधले चढ, उतार ह्याची तिला अद्यावत माहिती असते. अनेक प्रसंगाच्या निमित्ताने दागिने घेतले जातात. ते कधी घेतले?? त्याचा तेंव्हाचा भाव काय होता?? ते किती वजनाचे आहेत ह्या सर्व गोष्टी तिच्या मनात कधीही विचारल्या तरी अचूक माहितीनिशी तयार असतात. ह्या दागिन्याचा कागदावर हिशोब, किवा संगणकावर नोंद, बँक च्या लॉकर मध्ये एक प्रत तिने तयार करून ठेवली तर…तिलाही आणि पुढच्या पिढीलाही उपयोगी पडेल.
एकाच वेळेला अनेक गोष्टींचे भान ठेवून सर्व बाबी पूर्ण करण्याची तिला जन्मतःच क्षमता आहे. अनेक टप्प्यातून ती प्रत्येक वेळेला काहीतरी नवीन शिकत असते. स्वतःकडे बघण्याचा दृष्टीकोन तिने तिच्या करता व्यापक करण्यास हवा. ह्या सर्व तारेवरच्या कसरती करताना ती सुपर वूमन बनण्याचा अट्टाहास करत असते. सर्व गोष्टी मीच माझ्या हातानीच पूर्ण करणार. अशा हाताने केलेल्या गोष्टी नेहमीच नीट नेटक्या होतातच पण तिच्या स्वतःच्या बाबी कडे दुर्लक्ष होते. ज्या गोष्टी यंत्राच्या मदतीने करता येणाऱ्या असतील तेंव्हा आधुनिक मशीन ची मदत घ्यावी. सर्व कामे मीच करणार ह्या मध्ये दमणूक मात्र होते. ह्या सर्वाचा परिणाम तिच्या शारीरिक स्वास्थ्यासाठी खूप महत्वाचा ठरतो. स्त्री ची वैद्यकीय तपासणी नियमित करून घेणे खूप गरजेचे आहे. अकारण जीवतोड मेहनत केल्या मुळे शारीरिक त्रास लवकर सुरु होतो. दर्जेदार आयुष्य जगण्यासाठी ह्या तिच्या यंत्रे किंवा कोणाच्या मदतीने काम करून घेणे पण आज काळाची गरज आहे. अनेक गोष्टी करताना ती स्वताकडे पण तेव्हढेच लक्ष ठेवत असेल तर उत्तमचं परंतु अजूनही अशा मैत्रिणी आहेत. जमेल तेव्हढे समजावून सांगावे.
स्त्री च्या अफाट कर्तुत्वाला एकाच पोस्ट मध्ये सामावणे शक्य नाही. आजच्या युगात आपल्या आजूबाजूला असलेल्या आपल्या मैत्रिणीना माझे विचार सांगावेत म्हणून आजची पोस्ट……..स्वःताचे आत्मबल वाढवा…आजच्या युगात आपल्या घरच्या स्त्रीला आपल्या बरोबर ठेवा. तिने स्वतः भोवती कोश गुंडाळला असला तरी एक व्यक्ती म्हणून सर्वानी निदान घरापासून तरी सुरवात केली तरी माझ्या संगणकावर नियमित येणाऱ्या कोणातरी घरच्या बहिणी, आई, आजी मला आवर्जून सांगेल…बयो..माझ्या मुलाने, नातवंडाने मला तुझ्याशी बोलण्यासाठी तयार केले. तुझी पोस्ट मला वाचण्यास दिली. बस्स….अजून काय हवे??? हि छोटीशी विंनती संगणकावर नियामित् येणाऱ्या वाचक वर्गासाठी….
स्त्री भोवती विश्व सामावलेले असते. आध्यत्मिक प्रांतात पण आईला म्हणजे देवेतेला अग्रस्थान आहे. ती माता….जगन्माता आहेच. ती शक्ती आहे, प्रेरणा आहे….ती मोठी आई आहे.. माझ्या आईला, मोठ्या जगन्मातेला माझ्या गुरु माऊलीला, माझ्या सखींना त्यांच्या भोवतीच्या त्यांच्या जगाला माझा प्रणाम आणि खूप खूप शुभेच्छा!!!!!!!
एकच प्रार्थना….स्त्री च्या शक्ती रुपासाठी..
||जयंती, मंगला, काली, भद्रकाली, कपालिनी,
दुर्गा, क्षमा, शिवा, धात्री, स्वाहा सुधा नमोस्तुते||