आधुनिक तंत्रज्ञान हे नेहमीच उपयोगी असते. ओमान चा शेतकरी तंत्राद्यानाची मदत घेऊन आपले शेतीचे उत्पन्न नुकसानीत होऊन देत नाही. इथे सरकार दरबारी शेतकरी खूप सन्मानित केला जातो आणि सरकारकडून सर्व मदत दिली जाते. खजुराच्या लाखोंच्या संख्येत असणाऱ्या झाडांवर, शेतीवर दुबास किडीचा प्रादुभाव खूप वाढला आहे. खेडोपाड्यातील शेती ची किडी करता मोजदाद करण्यासाठी शेती विभागाकडून शेतकऱ्यांना जी. पी. एस. सेवा उपलब्ध करून देण्यात आली आहे.
अति अंतर्गत भागात किंवा दुर्गम भागात सरकारी अधिकारी पोहचे पर्यंत शेतकऱ्याचे अपरिमित नुकसान होते. तसेच कागदोपत्री अशी मोजदाद ठेवणे पण अवघड होऊन बसते. अशा अडचणी येथे पण आहेत. ओमान च्या शेतीचा मुख्य आधार म्हणजे खजुराची झाडे होत. येथील सरकारने त्वरित शेतकऱ्यापर्यंत किंवा किडीचा पादुर्भाव असलेल्या भागापर्यंत योग्य ती उपाय योजना जलद मिळण्यासाठी हि आधुनिक सेवा शेतकऱ्यांना दिली आहे.
लाखोंच्या संख्येत झाडे आहेत आणि किडीचा प्रभाव, वाढ पण तितक्याच संख्येत आहे. हि कीड येथे ‘दुबास’ नावाने संबोधिली जाते. प्रत्येक भागात अगदी रस्त्याच्या दुतर्फा असलेल्या खजुराच्या झाडांची पण मोजणी काटेकर पणे केली जाते. हि कीड झाडातील रस शोषून घेते आणि झाड शेवटी मृत्युमुखी पडते. संपूर्ण देशात युद्धपातळीवर योजना अमलात आणली जात आहे. येथील शेतकरी हे राष्ट्र करता सन्मानीय आहेत.
पिवळसर असलेल्या ह्या किडीची मोजदाद नजरेस पडली आणि येथील वृत्तपत्रातून त्वरित शेतीवर आलेले अस्मानी संकट आणि उपाय योजना सविस्तर सर्वाना जाणवून दिली. अनेक संस्था येथे सरकारच्या बरोबरीने मदत करत आहेत.
प्रत्येक वेळी कीटकनाशके फवारणी हि मार्गदर्शनाने केली जाते तसेच अजूनही काही उपाय आहेत का ह्याची चाचपणी केली जाते. कीटके एकत्र गोळा करण्यासाठी बादली सदृश असा एक वेगळ्या प्रकारचा फासा झाडाच्या बुंधापाशी ठेवण्यात येत आहे. कीटके आतच पकडली जातात आणि आतील विशिष्ट प्रकारच्या वासामुळे आकर्षित होऊन बादलीच्या आतच मरतात.
सरकारने दिलेल्या जी पी एस वर त्या त्या भागाच्या शेतकऱ्यांनी किडीचा पादुर्भाव किती प्रमाणात आहे ह्याची नोंदणी करायची असते त्या साठी हे तंत्रज्ञान त्यांना शिकवण्यात आले आहे. एकत्र येवून आपल्या भागाची चोख पाहणी करणे आणि डेटा एन्ट्री करणे. लगेच तिथपर्यंत
सरकारी अधिकारी आणि शेती तज्ञ पोहचतात. किडीचा पादुर्भाव प्रखर असलेल्या भागाची नोंद मिळत राहते आणि देशभर पसरलेल्या लाखो शेतकऱ्यांना नुकसानी पासून वाचविले जाते.
अनेक संस्था शेतीच्या कामाकरता पुढे येवून, काही शेतकरी जर दत्तक घेऊन त्यांना आपली अशी खाजगी सेवा देवून काही प्रमाणात तरी शेतीच्या समस्या कमी करण्यास मदत होईलच आणि शेतकऱ्यांना फार मोठा आधार मिळेल.
कदाचित आपल्या ग्रामीण विकासाकरता आपले हे योगदान म्हणजे राष्ट्राचा विकास ठरेल.
मला हि योजना पटली फक्त गरज आहे अशा प्रकारच्या संस्थांची आणि आपल्या शहरी नागरिकांची शेतकरी आणि शेती करता असलेल्या जबावाबदरीच्या जाणीवेची…..कोणी तरी, कुठली तरी संस्था ह्या लेखातून प्रेरणा घेऊन अशी सुरवात करेल हीच अपेक्षा आणि एक चांगली योजना आपण माहिती करून घेण्यासाठी….