ओमान मधील बर्फवृष्टी……………….

ओमान मध्ये जबल अख्तर म्हणजे हिरवा पर्वत…..ओमान मध्ये निझवा भागात हा पर्यटकांचा अतिशय लाडका पर्वत आहे. बारा महिने हिरवीगार राहणारी हि डोंगर रांग आहे.
समुद्र सपाटीपासून साधारणपणे दहा हजार फुट उंच आहे. सध्याच्या दिवसात ओमान मध्ये पाऊस पडतो. राजधानी मस्कत मध्ये १४ पर्यंत तापमान खाली गेले आहे तर ह्या पर्वत भागात तापमान उणे दोन झाले आणि बर्फवृष्टी होते. दरवर्षी हा अनुभव येतो. पन्नास पर्यंत तापमान अनुभवयास मिळते तसेच बर्फवृष्टी चा पण आनंद घेण्यास मिळतो.

हाच बर्फ काही फोटो च्या माध्यमातून पोस्ट साठी…….
ओमान मध्ये वाळवंट असूनही इतर आखाती देश पेक्षा हेच ओमान चे आगळे वेगळे वैशिष्ट्य आहे कि इथे अप्रतिम निसर्ग, डिसेंबर आणि जानेवारीत जबल अख्तर आणि मस्कत मध्ये भरपूर पाऊस, तसेच एकही झुडूप नसलेला अगणित डोंगर प्रदेश,सलाला सारखा भाग तर प्रती आशिया आहे. ओमान मधील प्रत्येक भाग हा स्वतःचे स्वतंत्र भौगोलिक वैशिष्ट्ये असणारा आहे.

बर्फवृष्टी हि दरवर्षी होतेच हि येथील निसर्गाची किमया आहे. वैविध्यपूर्ण भौगोलिक रचना, अप्रतिम निसर्ग सौंदर्य अशी एकता येथे आहे. आखाती देशातून, युरोप मधून पर्यटक ओमान बघण्यासाठी खास येतात.

जबल अख्तर हा भाग अतिशय समृद्ध आहे. येथे वर्षभर पूर्णपणे थंड हवामान असते. हा भाग येथील थंड हवेचे ठिकाण म्हणून प्रसिद्ध आहे. येथे डोंगर रांगातून पायऱ्याची शेती केली जाते. येथील प्रमुख आकर्षण म्हणजे हिरवेगार डोंगर, वर्ष भर कोसळणारे धबधबे, गुलाब पाणी आणि अत्तरासाठी येथे खास गुलाबी रंगाच्या गावठी जातीच्या पण अत्यंत सुवासिक अशा गुलाबाची शेती अक्खा परिसर सुगंधित करते, तसेच येथील डाळिंबे पण जगात अव्वल आहेत. असंख्य फळझाडे, फुले, शेती आणि उंच डोंगर रांगा ह्यामुळे वर्षभरपर्यटक येत असतात.

येथील दरवर्षी होणारी बर्फ वृष्टी पाहण्यासाठी आणि अनुभवण्यासाठी खास पर्यटक निवास उपलब्ध आहेत. येथे फक्त मोठी गाडीच घेऊन जाता येते असा शासकीय नियम आहे कारण वळणाच्या, उंच कडे कपारीचा हा प्रदेश आहे. येथील बर्फ वृष्टी हि साधारणपणे महिनाभर टिकते इतका घट्ट थर बर्फाचा जमलेला असतो.

ह्या वर्षीचा पहिला बर्फ कालच पडण्यास सुरवात झाली. तापमान उणे दोन असे होते. आत्ता हळूहळू बर्फाचे थर वाढत जातील आणि महिनाभर तरी हा बर्फ वृष्टीचा आनंद घेता येतो. उन्हाळ्यात ५० अंश पर्यंत उन्ही पारा वाढतो आणि थंडीत बर्फही ओमान मध्ये नवीन वर्षाच्या स्वागता करता हजर होतो. अशी तापमानातील, वातावरणातील विविधता अनुभवण्यासाठी आखाती देशामधील एकमेव ओमान.

माळ्यावरची ट्रंक…….एक पूर्ण विद्यापीठ.

माळ्यावरती एक ट्रंक कायम असते. तिचा रंग उडून गेलेला असतो तरी पण तिच्यावर प्रेम कायम असतेच. घरातील बच्चे मंडळीची उत्सुकता कायम ह्याच ट्रंक भोवती रुंजी घालत असते. असत काय ह्या ट्रंकेच्या पोटात??? म्हणण्यास निरर्थक पण कधीतरी उपयोगी पडेल म्हणून साठवलेले बरेच काही. अशी ट्रंक आजीच्या/आईच्या काळात मुली लग्न करून सासरी जाताना घरी घेवून जात असत. मग तर काय त्या ट्रंकेला बहुत सन्मान असणे स्वाभाविक आहे.

पूर्वी घराची छोटी छोटी दुरुस्ती घरीच करत असत. जेंव्हा गरज पडत असेल तेंव्हा खास रविवारी अशी ट्रंक माळ्यावरून वडील आमच्या कडून काढून घेत. मग काय त्या ट्रंक भोवती आम्ही भावंडे डोकावून पाहत राहायचो. आई, स्वयंपाक घरातून म्हणायची माहेरून आणली आहे हि ट्रंक…एकदा रंग द्या तिला. ह्या ह्या अपेक्षित वाक्यामुळे वडील मिस्कील हसत.

ह्या जादुई पेटीतून असंख्य खिळे, निरनिराळे नटस्, पाने, जुन्या जुन्या वायरींची भेंडोळी, वापरात असलेले पण नवीन पद्धतीचे बसविले म्हणून पेटीत गेलेले पंख्याचे बोर्ड, जुनट अशा प्लास्टिक च्या पिशव्यातून भरलेले, बरेचसे गंजलेले असे स्क्रू… सुतळी, नायलॉन दोरखंड, निरनिराळे कटर्स, बोल्ट्स, पीव्हीसी पाईप चे लहान मोठे तुकडे, लाकडाचे चोकोनी,गोल तुकडे, करवत असे खूप काही.. आमच्या कॅरम ला चारही कोपऱ्यात हेच गोल तुकडे बसवून वडिलांनी दिले.

ह्या सर्व हत्यारांची रीतसर माहिती आणि यातील कुठली गोष्ट आता लागणार आहे हे वडील समजावून सांगत. मग ती ट्रंक पुन्हा नीट लावण्याची आणि माळ्यावर चढून ठेवण्याची जवाबदारी पूर्ण होई पर्यंत आई चा रविवारी आंघोळी करून घ्या हा तगदा, आपसूकच पुढे ढकलला जायचा. हत्यारांची पेटी असे गोंडस नामकरण ह्या पेटीला कधीच नव्हते तर ह्या ट्रंकेत असे खास कप्पे हि नसत. पुरचुंड्या करून, वायरी गुंडाळून कसेबसे ह्या ट्रंकेचे झाकण बसत. झाकण मात्र आतून त्याला काही पॉकेट दिल्यामुळे त्या त नेहमी प्लास्टिक च्या पिशवीत गुंडाळी करून ड्रिलिंगमशीन चे ड्रिल बीट ठेवलेले असत. ट्रंकेच्या खाली तळाला वर्तमान पत्र दर वेळी बदलून ठेवत असू. पत्र्यावर रुबाबदार पट्ट्या त्यावर लावलेले सदाफुलीच्या फुलाचे सोल्डर अजूनही भक्कम आहेत.

ट्रंक उघडली कि एक प्रकारचा हत्यारांचा, गंजलेला वास येई. तिच्या कड्या पण कशा भक्कम वाटायच्या. ह्या ट्रंकेच्या आकारात पण एक गुबगुबीत असा भास होत असे. दोन आण्याची ट्रंक अगदी नातवंडा च्या काळापर्यंत सुद्धा व्यवस्थित आहे. अजूनही तिला रंग देवून कोणी फारसे कौतुक केले नाही.

ट्रंक म्हणजे एक पूर्ण विद्यापीठ आहे. कचऱ्याला सन्मान देउन त्यातील पुन्हा वापरात येणाऱ्या गोष्टी पासून नवीन काही तरी बनवता येते. हे छोटे विद्यापीठ पूर्वीच्या काळी माळ्यावर असायचे. आता मात्र काळाच्या ओघात हि ट्रंक नाहीशी होईल अशी सुप्त भीती वाटू लागली आहे. ट्रंक जपणे, त्यातील वस्तू गरजेच्या काळी आवर्जून बाहेर काढल्या जात असत. बच्चे मंडळीना हि ट्रंक म्हणजे भावी आयुष्याचे विद्यापीठ होते. ट्रंक सांभाळण्यात जिव्हाळा असायचा, आठवणी दडलेल्या होत्या आणि मुख्य म्हणजे वस्तू निकामी असतील तर लगेच बाहेर टाकायच्या आणि उपयोगी पडणार असल्या तर योग्य वेळी त्यांचा वापर करणे हि शिकवण होती. सध्या काय हा कचरा?? पुन्हा कोण असल्या जुन्या गोष्टी वापरणार, घराला माळा पण नाही. हत्यारे असतील तर मुलांपासून दूर ठेवलेली बरी, पण त्यांच्या विश्वातील आवडीच्या वस्तू, पण आपल्या दृष्टीने कचरा वाटत असल्या तरी फटकन फेकून देवूया असे बोलणे म्हणजे प्रयोगशील वृतीला आपणच खीळ घालणे होय.

आमच्या काळी अशी विद्यापीठे नव्हती घर आणि घरातील सामन हे घरच्या सदस्य प्रमाणे जपले जात असत. हल्लीच्या विसाव्या शतकातील मुलांना असे प्रयोग शिकवणारे विविध माध्यमे सहज उपलब्ध आहेत. आपणही त्यात सहभागी झालो तर विरंगुळा आणि समाधान दोन्ही सहज मिळेल. आम्हाला आमची ट्रंक हेच विद्यापीठ होते. आयुष्य हे आव्हानात्मक आहे असे न मानता ते एक प्रयोगशील आहे हे सकारात्मक करून घेण्यासाठी महिन्यातून माळ्यावरून काढलेली ट्रंक अजूनही आधार देत आमचीच वाटते. बल्ब बदलणे, खिळा घरीच ड्रिल करून बसवणे, आईचा लाकडी पोळपाट, विळी घरीच दुरुस्त करणे, वडिलांना स्वीच बदलण्यास मदत करणे ह्यासाठी प्रयोग शाळा म्हणजे घर होते आणि साधने म्हणून ट्रंक होती. वडीलधाऱ्या व्यक्तींचे मार्गदर्शन तर असायचे पण ह्या गोष्टी करता बाहेरच्या मदती वाचून अडले नाही.

प्रत्येक मुलाची स्वताच्या आवडीच्या काही वस्तू असतात. रंगीत दोरे, गोट्या, मणी, प्लास्टीक चे आकर्षक आकार….इत्यादी अनेक अनेक. ह्या गोष्टीना पण त्यांच्या जवळ त्या वस्तूंची अशी खास ठिकाणे मुले तयार करतात. खेळता खेळता प्रयोगशील वृत्ती तयार होते आणि एखादा भावी काळातील संशोधक पण कदाचित जगाला मिळतो.

परदेशात गॅरेज अशी खास संकल्पना आहे जिथे फक्त कार करता सामान नसून ते घरातील अडगळीच्या पण लागणाऱ्या वस्तूंचे ठिकाण असते. ह्या ठिकाणी मुले खूप रमतात. आपण निदान त्यांच्या टेबल पाशी तरी अशी खास जागा करून दिली तर, त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद अवर्णनीय असेल.

माळ्यावरची ट्रंक ते जरा व्यापक स्वरूप म्हणून बोहरी आळी पर्यंत शास्त्र दडले आहे. मोडतोडीच्या सामनामधून एखादा अविष्कार पाहायला मिळू शकतो. ट्रंक आणि तिची माळ्यावरची जागा हा अविभाज्य घटक आठवणीचा आहे. आज विद्यापीठ म्हणून पुढच्या पिढी कडे ट्रंक सोपविली आहे.

एक जिव्हाळा, अतूट बंध आणि….माळ्यावरची ट्रंक

ओमान मधील आंतरराष्ट्रीय आतिषबाजी…….


चाळीसाव्या राष्ट्रीय दिनानिमित्त सहा डिसेंबर ते सतरा डिसेंबर पर्यंत वीस मिनिटे आंतर राष्ट्रीय फायर वर्क्स ठेवण्यात आली होती. अमेरिका, इटली, युके, ऑस्ट्रेलिया, फ्रेंच, होंगकॉग अशा सहा देशांनी सहभाग घेतला होता. प्रत्येकाला आपली तारीख दिली होती. रात्री आठ वाजता हि आतिषबाजीची कोट्यवधी रुपयांची स्पर्धा वीस मिनिटे ठेवण्यात आलेली होती. इथे हा एक मोठा सोहळा होता. रोझ गार्डन च्या मागच्या बाजूस डोळ्यांचे पारणे फिडणारी हि नयनरम्य फटाक्यांची आतिषबाजी पाहण्यासाठी देव लोकांतून ३३ कोटी देव पण डोकावून पाहत असावे इतकी सुंदर!!! आणि विलक्षण अनुभव देणारी अशीच होती.


एका क्षणात आपणाला रिमझिम अशा पावसाचा अनुभव तर दुसऱ्या मिनिटाला कोसळणाऱ्या धारा दिसाव्यात असे आकाश, कधी प्रेमाचा अविर्भाव तर कधी जंगलाचा भास अशा विविध कल्पना साकारत डोळे फक्त आकाशाकडे विस्मयतेने पाहत, बोलण्याचे पण सुचत नाही.

लाखो जनसमुदायाच्या साक्षीने रिमोट वर फटाके नव्हे तर स्वर्गीय कल्पना प्रत्यक्षात जमिनीवरून आकाशाकडे झेप कधी घेत होत्या हे कळत पण नव्हते. प्रत्येक देशाकरता लोकांना वोटिंग करण्यास सांगितले होते. ह्या स्पर्धेत फ्रेंच देशाने प्रथम क्रमांक मिळवला.

ह्या स्पर्धे करता वातावरणाचे प्रदूषण किती होते ह्या वर पण मीटर बसवले होते. कमीत कमी प्रदूषण करणारे पण विलक्षण नयन सुख आणि विविध थीम सुयोग्य पद्धतीने आकाशात मांडणारे म्हणून फ्रेंच अग्रसेर ठरले. स्पर्धा खूपच अटीतटीची होती, प्रत्येक देशाने त्यांच्या कंपनीने सर्व कौशल्य पणास लावले होते. यु ट्यूब वर व्हीडीओ आहेत त्याची हि लिंक

अहाहा!!!! अप्रतिम!!!!! विलक्षण सुंदर…….असे काही अनुभव फोटोच्या रुपात ह्या पोस्ट साठी.

न बोलणारे, मस्त जेवणाचे…….मस्कतचे रेस्टॉरंट ‘राजधानी’.

हॉटेल राजधानी, भारतभर आणि परदेशात हि त्यांच्या शाखा आहेत. पूर्णतः शाकाहारी गुजराथी आणि राजस्थानी थाळी हे जेवणाचे वैशिष्ट्य. अत्यंत अदबशीर, हसतमुख कर्मचारी वर्ग आणि सुबक पद्धतीने जेवणाचे पदार्थ अर्धगोलाकार थाळीत वाढले जातात. थाळीत एकंदरीत बत्तीस प्रकारचे विविध पदार्थ जेवणाची रंगत वाढवतात.

अनेक मानांकने, पुरस्कार राजधानीला प्राप्त आहेत. भारत आणि परदेशात जेव्हढ्या शाखा आहेत तिथले मेनू हे एकाच पद्धतीचे आणि सतत बदलत राहणारे असले तरी पदार्थ सगळीकडे सारखेच असतात. आतापर्यंत २२,४६४ पदार्थ, बहात्तर मेनूमधून जगभर राजधानीत देण्यात आले आहेत.

मस्कत मध्ये साधारण पणे दीड वर्षापूर्वी राजधानीने आपली शाखा उघडली. अडीचशे ते तीनशे थाळी रोजची आणि गुरवार, शुक्रवारी तर चारशे च्या वरती ह्या थाळीचा आस्वाद मस्कतीय घेतात. पूर्ण थाळी किंवा छोटासा मिल बॉक्स सुद्धा घरी, ऑफिस मध्ये पाठविला जातो. अशा छान रेस्टॉरंट मुळे इथेही परदेशी पर्यटक भारताची शाही जेवणाची लज्जत घेण्यासाठी गर्दी करतात. अनेक नामवंत व्यक्तीनी इथे आवर्जून भेट दिली आहे. सणावारी किंवा सप्ताहाच्या सुट्टीला वेटर चा दंगा, आवाज, गलका नसलेले हे रेस्टॉरंट जणू काही ‘वदनी कवळ घेता……,ची प्रचीती देते.


आपले आगमन झाल्यावर हसत मुख कर्मचारी वर्ग अदबीने समोर येतो. प्रवेश दारापाशी ठेवलेल्या फुलांची आरास स्वागत पण सुगंधी करते. जेवण करण्याआधी, हात धुण्यासाठी पण राजेशाही थाट आहे. चकचकीत अशा पितळी सुरईतून उबदार पाण्याची धार आपल्या हातावर सोडण्यात येते. हात धूत असताना पाणी तबक सदृश भांड्यात आपल्या अंगावर न उडता गोळा होते. हात पण कसा राजधानीच्या डामडौलात धुतला जातो. पाण्याला पण सुगंधित केलेले असते.

जेवणात थेपला, छोटीशी भाकरी, फुलका, रोटला, पुरी आणि त्यावर अलगद विरघळणारे लोणी, अनेक प्रकारची फरसाण, विविध भाज्या, कोशिंबीरी, डाळ, कढी, खिचडी, साधा भात, दहीवडे,पॅटीस आणि मधुर चवीचे थंडगार ताक असा परिपूर्ण जेवणाचा छानसा मेनू खूप दिवस जिभेवर रेंगाळत राहतो. एव्हढे पदार्थ वाढताना आणि आपल्या थाळीतलं जे काही संपत ते नेमके एका मिनिटात आपल्या समोर पुन्हा वाढण्यासाठी अदबीने हजर केल जात. आपण तर काहीही सांगितले नाही आणि कोणाचा आवाज हि ऐकला नाही मग असे कसे काय एकदम आले. असा विचार करताना आजूबाजूला पहिले तर रेस्टॉरंट मध्ये आवाजच नव्हता. जो तो आपल्यात किंवा आपल्या कुटुंबात, मित्र मैत्रिणीत रमला होता, तेव्हढाच आवाज होता.

जागोजागी वेटर उभे असूनही तत्परतेने नेमके पदार्थ जात येत होते. टेबलाच्या भोवती वेटर ना कोणीतरी व्यक्ती काहीतरी बोटाच्या, हाताच्या खाणाखुणा करत सर्व ठिकाणी फिरत होती. ह्या खुणा म्हणजेच न बोलणारे, आपल्याला चटकन पदार्थ आणून देणारी राजधानीची खासियत आहे. हि प्रमुख व्यक्ती इथली कप्तान असते. ह्या व्यक्तीने टेबल पासून विशिष्ट अंतर ठेवून, जेवण करत असणाऱ्या व्यक्तीची समाधी भंग न करता वाढपी लोकांना अचूक संपलेले पदार्थ सांगणे हे अथीति देवो भव……….असेच वाटते. पदार्थ वाढताना वाढपी हातात प्लास्टिक चे ग्लोज घालतात. पदार्थ अत्यंत स्वछतेत बनविले जातात


उजव्या हाताचे पहिले बोट तिरके ठेवून चक्राकार पद्धतीने फिरवले कि चटणी. अंगठा दुमडून चार बोटे सरळ धरली कि भाजी, अंगठा दुमडून तर्जनी आणि मधले बोट दाखवले कि खिचडी किंवा पुलाव, पहिले बोट सरळ धरून मागे पुढे फिरवले कि साधा भात. चारी बोटे दुमडून अंगठा खाली झुकवला कि फिल्टर थंड पाणी, अंगठा मागे वळवला कि सामान्य तापमानाचे पाणी, अंगठा तिरका धरला कि मिनरल पाणी, तर्जनी आणि अंगठा जुळवून तीन बोटे सरळ ठेवली कि बिल, अंगठा झुकवून पहिल्या बोटाने वाकुली दाखवणे म्हणजे गोडाचे वाढप आणा, पाचही बोटांचा वर्तुळाकार आकार म्हणजे दही वाटी, पहिल्या बोटाचे फक्त पहिले पेर दाखवणे म्हणजे ग्राहकाला इथल्या टेबलवर तूप अजून वाढणे, अशा अनेक खाणाखुणा अत्यंत शिस्तीने रेस्टॉरंट चा कप्तान वाढप्यांना करत असतो.

स्वागत ते निरोप अशा बोटांच्या भाषेत बघताना काहीसे वेगळे पण जपले आहे हे जाणवते. तब्बल चाळीस च्या वर त्यांची कोड लँग्वेज आहे. अशा रेस्टॉरंट मध्ये नोकरी करायची झाल्यास हा अभ्यास करणे आवश्यक आहे. वाढपी लोकांचे कप्तान खाणाखुणांची उजळणी कायम घेत असतात.

हा खाणा खुणांचा तक्ता अभ्यासून त्या प्रमाणे जेवणासाठी आलेल्या ग्राहका पर्यंत तत्परतेने तो पदार्थ मिनिटात आणून देणे हे खरच कौशल्याचे काम आहे. जेवताना एखादी व्यक्ती कुठला पदार्थ तन्मयतेने समाधानाने पटकन संपवते हे लक्षात घेवून त्याप्रमाणे जर तोच पदार्थ अजून घ्यावा हा विचार मनात येतोच तोच पदार्थ हजर. मन कवडे खवय्ये यांना तर पर्वणीच असते.

इतके खुश झाल्यावर जर उत्तम सेवा ह्या साठी जर टीप देण्याची झाल्यास ती तिथल्या पेटीत जमा केली जाते. अदबशीर आणि हसत मुख स्टाफ लक्षात राहतो. इथला कर्मचारी वर्ग हा विविध भाषांमध्ये पारंगत आहे. मस्कत ची भाषा अरेबिक, फ्रेंच, सारख्या परदेशी भाषांबरोबर मराठी, मल्याळी, कन्नड, पंजाबी अशा भाषा इथले कप्तान सहज बोलतात. जेवणाची लज्जत हि भाषा माध्यमे अधिक वाढवतात. राजधानीचे हे अप्रूप अनुभवत लज्जतदार राजस्थानी, गुजराथी जेवण घेण्यास गर्दी वाढतच आहे.

मस्कत मध्ये MBD, OPP. KHIMAJI RAMDAS, BAIT AL AHLAM, RUWI.
TELE…..24811888. असा पत्ता राजधानी रेस्टॉरंट चा आहे.

राजधानी…. एक खानदानी परंपरा. मस्कत मध्ये भारताची परंपरा दिमाखाने जपत आहे.

खास आभार…..मस्कत च्या राजधानीचा कर्मचारी वर्ग. धन्यवाद.

घरोघरचे न्यूटन………

‘न्यूटन’ हा नामवंत प्रख्यात शास्त्रज्ञ, ‘गुरुत्वाकर्षणचा’ जगविख्यात शोध लावला.पण गाजला त्याच्या मांजरामुळे… कथा साधीच त्याच्या कडे मांजर होती. तिला पिल्ले झाली, ती पिल्ले आणि मांजर घरात ये जा करू लागली कि, त्याला कामात व्यत्यय येऊ लागला . मोठ्या मांजरीची उडी मारण्याची क्षमता पाहून त्याने दाराला मांजरी करता एक मोठा , आणि छोट्या मांजरी करता छोटा गोलाकार आकार केला. मांजरीने आणि तिच्या पिल्लांनी दार बंद असले तरी गोलातून त्याला व्यत्यय न आणता सहज ये, जा करावी. मांजरांचा आकार आणि त्यांची शारीरिक उडी मारण्याची ताकद ह्यांचे निरीक्षण करून आपला उद्देश पूर्ण केला.

तेंव्हा पासुन न्यूटन गाजला कारण मोठ्या आकारातून लहान मांजर पण गेले असते, अशा हास्यापद कोटया केल्या गेल्या आणि त्या तहहयात त्याला ऐकाव्या लागल्या असतील. नंतर हि ह्या कोटया जो पर्यंत पृथ्वी आहे तो पर्यंत राहतील असेच खेदाने म्हणावेसे वाटते. खर तर मांजरांच्या उडी मारण्याच्या क्षमते नुसार त्याने दोन उपाय केले.

आपण बऱ्याच वेळेला ज्या गोष्टी मोठ्या क्षमतेच्या पण लहानांना चालू शकतील, असे असले तरी त्यांच्या करता लहान गोष्टी घेतो. सगळ्या बाबतीत असे म्हणता येणार नाही पण कधीतरी न्यूटन कुठूतरी हसत असेल. असे न्यूटन हे घरोघरी असतातच. लहानांना आणि मोठ्यांना हि न्यूटन ची बिरुदावली लावली जाते.

साधारण पणे घराचा पुरुष वर्ग ह्या बाबतीत स्त्रियां कडून भूषविला जातो. घरी जर इंजिनीअर असले तर, हे प्रमाण अधिकच असते. कंपनी मध्ये ज्या व्यक्ती मोठ्या पदांवर कामे करत असल्या तरी घरी मात्र जी गृहिणी असेल तिच्या कडून, एव्हढे साधे काम पण कसे अवघड करून ठेवतात असे बोलताना मनात, आणि हमखास मैत्रिणी बरोबर हे म्हणजे अगदी न्यूटन आहेत, असे नक्कीच बोलतात. मग तिच्या घराचा न्यूटन पण बोलण्यात कधीच ओढला जातो.

ह्या न्यूटन ची परंपरा आजी च्या पिढी पासून चालत आलेली असावी, कारण आजोबांच्या फजित्या सांगताना, आजोबांचा न्यूटन म्हातारपणी पण तरुण भासे. कधीतरी आईला गप्पा करण्याचा किंवा खट्याळ पण करण्याचा मूड आला तर बाबांचा किस्सा ऐकताना आम्ही मुले पण रमून जायचो. जणू काही रक्तातला गुणधर्म असल्यासारखा हा न्यूटन प्रत्येकाच्या आयुष्यात डोकावून जातो.

जेंव्हा मुलाला शाळेत न्यूटन शिकवला गेला पण नसतो त्या काळात त्याला हा, न्यूटन होईल असेच वाटते अशी कोणीतरी सहज गंमत करून जाते. ज्या ठिकाणी डोके चालवून युक्तीने काम करावयाचे असते तेथे हा न्यूटन फजिती झाल्यास सगळ्यांना हसवतो. जगमान्य हा शास्त्रज्ञ मूर्खपणा पण हसत पचवतो आणि पुन्हा ह्यातून काहीतरी शिका असा नकळत संदेश देऊन जातो.

ह्या न्यूटन चा परिवार हा इंजीनियर पुरता सीमित राहिलेला नाही तर तो काळाच्या ओघात सर्व शिक्षणात पसरला. काय तुम्ही वकील हो, तुम्हाला कधी फसवले हे कळले पण नाही, अशा युक्तिवादापुढे हा वकील घरच्या कोर्टात हरतो. डॉक्टर ला मुलांच्या पोटातील कळ हे चाचपडून पहावी लागते पण, आईला ती खाण्यामुळे झाली का? किंवा अभ्यासामुळे आली का हे पटकन समजते. अशा दुखण्याने घरातील डॉक्टर हतबल होतो. लबाडी, मूर्खपणा, फसणे ह्या नकारात्मक घटना सकारात्मक कशा घ्याव्यात हे शेवट हसण्यात करून न्यूटन पण खुश होतो.

गुरुत्वाकर्षणाचा आकर्षित करण्याचा नियम, हा मानवी जीवनात पण फजितीला हसण्याकडे आकर्षित करतो. एकदा न्यूटन हि बिरुदी चिकटली कि, कायम कुठलीही गोष्ट करण्यास घेतली कि, सतर्क राहण्यास भाग पाडते आणि पूर्ण व्यवधानाने काम होऊन मन आणि बुद्धी ह्यांची फारकत होण्याचे टळले जाते. उत्तेजन जसे मिळते तशी न्यूटन ह्या नामांकनाची चीड पण कायम तयार होण्याची भीती पण मनाच्या कोपऱ्यात ठाण मांडून बसलेली असते. मुलां पुढे न्यूटन अशा पद्धतीने समोर आणू नका. न्यूटन च्या आयुष्यात ह्या मांजरी मुळे किती प्रवाद निर्माण झाले असतील हे त्यालाच माहिती असेल पण आपले मन मांजरी सारखे न्यूटन च्या गोष्टी मुळे होऊ शकते.

न्यूटन हा पुरुष वर्गाला सहज संबोधला जातो. पण स्त्रिया करता अशी ‘न्यूटनि’ ऐकिवात नाही. स्त्रियांना एकावेळी अनेक व्यवधाने हुशारीने पार पडण्याचे जन्मतःच कौशल्य प्राप्त असते. शक्ती पेक्षा युक्तीच्या बाबतीत ती निसर्गतःच अग्रसेर आहे. तरीही तिला, एव्हढे साधे पण कळले नाही असे ऐकायला लागते. कारण समाजातला न्यूटन हा स्वतःचा इगो सांभाळत असतो.

पुरुष आणि स्त्री ह्यांच्यात कोण न्यूटन आहे हे महत्वाचे नाही तर आपल्यातला न्यूटन, आपल्या मनातला न्यूटन, हा वरकरणी हास्यास्पद कोट्या करून हसवत हसला तरी, नकारात्मक घटनांना सकारात्मक करून घेण्याचे मन तयार करायला मदत करतो. मांजरी आणि न्यूटन ची हि घटना पूर्ण संदर्भ सहित मुलांना सांगा कारण त्यांच्यातला न्यूटन हा सशक्त मनाच्या बांधणी करता खूप गरजेचा आहे. न्यूटन च्या मृत्यू नंतर हि हा असा न्यूटन कालांतरित अबाधित राहून जीवनाचे आकर्षण कायम ठेवेल.

.