My वॉकिंग फंडे आणि वारकरी..

My वॉकिंग फंडे आणि वारकरी….

वारकरी आणि दिंडी ह्यांचे फोटो काढण्याची हौस माझी. पुरती दमछाक झाली. कित्ती कित्ती भरभर चालतात. त्यांचे कॅमेरा कडे लक्षच नसते. अवघड झाले सगळे. मी रोजच्या चालण्यात अनेक वेगवेगळया पद्धतीने चालते…ब्रिस्क वॉक आणि काय काय प्रकारचे वॉक असतात ते सारे करते आणि वाटते आपले भरभर छान चालणे होते. वजन ही घटत असावे. पण वारकरी चाल म्हणजे ब्रिस्क वॉकिंग च्या वरताण….आणि मुखी अंखंड नाम… कुठून येतात आणि केवढ्या लांब चालत जातात. ग्रेटच… मी पण इंस्पयार झाले, म्हंटले, चालावी थोडी पाऊले त्यांच्या बरोबर तेवढाच थोडक्यात माझा शहरी इन्स्टन्ट नमस्कार. त्यांना विचारले चालू का थोडी पाऊले तुमच्या बरोबर …आपली फोर्मल परवानगी म्हणून विचारले. त्यांनी एक कटाक्ष टाकला, हसले आणि म्हणाले, चला, कि, ताई… आता मी काय चालण्याची का पळण्याची खेळाडू होते?? का शेतकरी होते. ठरवून पण कष्ट करू शकत नव्हते.

मी शेतकरी नाही पण हौसेने पुण्यात निसर्गात एक फार्म हाउस मात्र आहे. एक कुटुंब राहण्यास ठेवले आणि मी ऑर्गनिक शेतीचे कोर्स करून जैविक शेती करते. शेतकरी उगाचच रासायनिक खते टाकून पिके वाढवतात आणि जे आरोग्यास हानिकारक असतात. हे माझ्या मनावर पक्के बिंबले म्हणून शेती करते. रासायनिक खतांचा मोह त्यांना जलद अशा आमदानी करता आहे. तेही तेच खातात कारण पैश्यांचा प्रश्न आहे. जलद पिक तरच जगण्यास लवकर पैसा मिळणार हे क्रूर रासायनिक खतांचे वास्तव सत्य त्यांच्या हसऱ्या चेहऱ्या बरोबर आहे. पांडुरंगच समजू उमजू जाणे.

शेतकऱ्यांच्या जमिनीला भेगा पडल्या, कोरडा दुष्काळ झाला म्हणून माझे संवेदनशील मन सरकारवर ओरडते आणि शेतकऱ्यांना सहानभूती दर्शवते नां. महागाई झाली तर माझ्या शेतीत मी माझे कुटुंब खाऊ शकतो. एवढाच मर्यादित विचार मी महिन्याच्या ठराविक पगारात करू शकते. अनिश्चितत आयुष्यात अमर्यादित ठाम विश्वासाचा भक्तीभाव वारकरीच आणू शकतात.

मी एक शहरात थकून थकून दमणारी रहिवासी होते. बर, ते काय म्हणतात म्हणून टक लावून ऐकू लागले. ज्ञानेश्वर, तुकाराम ह्यांचे चित्रपट पाहिलेत. ज्ञानेश्वरी वाचायला वेळच मिळत नाही म्हणून हा पर्याय बरा… नेट वर सर्च केले. अभंग, ओव्या ऑडिओ करून चालताना इयर प्लग कानात अडकुवून ऐकते, तेवढेच आषाढी जवळ आली फक्त एका दिवशी पांडुरंगाचे स्मरण नको, पांडुरंगाबरोबर स्टे इन टच पाहिजे. चालताना बोलणे कसले होणार… दम लागून एनर्जी वेस्ट होते म्हणतात.

पिटी उषा जी होती ना पूर्वीची तिच्या पाळण्याला ही वारकरी चालून साथ देतील असेच मला वाटू लागले. सकाळचा वॉक म्हणजे कसा इकडे तिकडे बघत बघत, पायाखालचे खड्डे, शेजारून चालणाऱ्यांचे फंडे, वाटेतले कुत्रे, रस्त्यावरचा कचरा पालिकेने उचलला आहे का नाही ते ही हळूच पाहणे, घरी परताना वाटेवरची स्वस्त भाजी घेणे… एक ना दोन भारंभार गोष्टींचे व्यवधान राखावे लागते.
बागेत चालावे तर, बागेतल्या झाडांवर बेताचेच पक्षी असतात त्यामुळे पक्षांची लगबग आणि किलबिलाट दुर्मिळच आहे. चालताना लोकच पहावी लागतात. दरोरोज वर्षभर चालणारी लोक कशी अजिबात बारीक काही दिसत नाहीत म्हणून त्यांच्या पेक्षा मीच बरी, असा विचार येतच राहतो नां. मुखी भरभर पांडुरंग पांडुरंग असे काही स्पीडली म्हणणे काही जमत नाही. डोळे बंद करून तर चालता येत नाही.

वारकरी आणि मी ही काही तुलना होऊच शकत नाही. त्यांची वारी हा त्यांचा बाय चौईस आहे. मी शहरात जन्मले, वाढले आणि राहिले त्यामुळे कशी भरकन ट्रेन मात्र पकडते. ट्रेन मध्ये चढतांना अरे देवा!! असे म्हणते उतरल्यावर हुश्श देवा!! असे म्हणते हाच काय तो जप.. हे लाईफ आहे. मग तुलनाच नाही. तरीही मला वारी करण्याची इच्छा आहे. रोजचे व्यायामाचे चालणे इमारतीच्या बेसमेंट ला असलेल्या छोट्याश्या पांडुरंगाला अर्पण करावे हेच बरे असे वाटू लागले होते. रक्तदाब पण नियंत्रित राहील आणि पुण्य ही मिळते असा दुहेरी फायदा शहरात झटपट मिळवता येतो हे आपल्याकरता छानच आहे
हा विश्वास मात्र पक्का झाला.

walking करताना माझे विशेष व्यायामाचे कपडे परिधान करण्यावर माझे फारच लक्ष असते म्हणजे मूड कसा छान येतो.. वारकरी मात्र पांढऱ्या शुभ्र पोशाखात , स्त्रिया तर चक्क नऊवारीत!!! Hat’s off to them…एवढेच इंग्लिश मध्ये म्हणू शकते. कपडे मळतात असे काहीच नसते. पांढऱ्या शुभ्र वेशातले, गळ्यात तुळशीची माळ, कपाळी अष्टगंधाचा नाम त्यामध्ये काळ्या बुक्क्याचा टिळा…परफेक्ट कलरफुल कॉम्बिनेशन. वारकरी स्त्रिया नऊवारीत चालत असतात तेही डोक्यावर तुळशी वृंदावन घेऊन, तर माऊलींची मूर्ती, विठूरायाची मूर्ती घेतात. चालताना तोल सावरत चालायचं तेही भरभर. डोक्यावर देव आणि मुखी पसाभर हसू. मी जेंव्हा सकाळी वॉक ला जाते तेंव्हा मोबाईल सांभाळायला खांद्यावर माझी डुलणारी पर्स सुद्धा जड होते.

वारकरी जेंव्हा मार्गस्थ होतात तेंव्हा एक आख्खे गाव त्यांच्या बरोबर चालत असते. त्यात बारा बलुतेदार ह्यांचाही समावेश असतो. कोणाची कोणाची अडचण होत नाही. एवढ्या प्रचंड गर्दीत सुद्धा चालताना कुठलीही तक्रार नसते. वारीत जेंव्हा मी चालले तेंव्हा जीवन सरळ सोप्पे कसे करता येते ते समजले. मुखी असलेले नाम ते कपाळी असलेले नाम, नमस्काराचे प्रकार, भक्ती सेवा नियमन ह्यांचा जणू काही प्रात्यक्षिक अभ्यास झाला. किंतु परंतु कधी कशाला कसे इतके अवघड करून ठेवलेले प्रश्न सोपे झाले. हे ज्या क्षणाला उमगले त्याच क्षणी फोटो काढून भाव टिपण्याची होसे भागली. एक जिवंत रसरशीत भावविश्व पांडुरंगमय झालेलं अनुभवलं आणि शहरी थाटमाट ढकलून जमीनीवर साष्टांग लोटांगण माऊली समोर घातलं गेल. वॉक चे नवीन आयाम मांडता आले. प्रगल्भ असा दृष्टीकोन समोर आला. आणि मुखातून एकच गजर आला…. जय जय पांडुरंग हरि…..जय जय पांडुरंग हरि|||