सगळंच अवघड परि आहे सुंदर..

TUB GARDEN

सगळंच अवघड परि आहे सुंदर..

मुलाच्या शिक्षणाच्या निमित्ताने त्याची जेवणाची आबाळ व्ह्यायला लागली म्हणून मी हि त्याच्या जवळ राहण्यास आले. बॅचलर असल्याने त्याने एक रूम घेतली, रूम व्यवस्थित मोठी होती, पण एक खिडकी आणि त्या बाहेर कबूतराचे पाय मावतील एवढीच जागा. रूम करता माझी हरकत काहीच नव्हती पण खिडकीत जागा नाही म्हणून जरा खट्टू झाले.माझं लेकरू तरी जवळ आहे, जवळच्या शाळेत मी हि नोकरी करण्यास लागले. खिडकीत जागा नसल्याने शाळेतच मी मोठ्या प्रमाणात विद्यार्थ्यांच्या उपक्रमातून त्यांना कंपोस्ट शिकवले आणि शाळेत कंपोस्ट बनू लागले, हळू हळू भाजीपाला, फुलझाडे शाळेच्या माळ्याच्या मदतीने वाढू लागली.

उच्च तंत्रज्ञान असणाऱ्या विकसित देशात हिरवा कोपरा मनास आनंद देत होता. लॉक डाउन मुळे माझे आणि शाळेचे नाते लॅपटॉप वर मर्यादित झाले. आता सध्या मुलगा, मी आणि माझे मिस्टर ह्या लॉक डाउन च्या काळात वेगवेगळ्या राष्ट्रात आपआपल्या कामांमुळे राहत आहोत.

घराच्या खिडकीचा अरुंद बाहेरचा भाग मला अस्वस्थ करत होता. ऑन लाईन शाळेमुळे लॅपटॉप चा ताण मनावर, डोळ्यावर जाणवू लागला.रात्रीची झोप नाहीशी झाली.

खिडकीच्या बाहेर ग्रील करण्यास घर मालकाने नकार दिला कारण खालून बिल्डिंग चा रस्ता होता.झाडे खिडकीत नकोत हा नियम होता. परदेशी असे नियम खूप पाळतात. थोडे पाणी घालीन, खाली ट्रे ठेवीन सांगून पाहिले पण अरब देशाचे नियम च कठीण.असो पर्याय तर हवाच.

खिडकीतून येणारे ऊन वाळवंटी प्रदेशाचे असल्याने बाहेर अचानक येणारे वाळूचे वादळ, 50 ℃ पर्यंत ऊन झाडे काही टिकून देत नाहीत.

खिडकीतून येणाऱ्या टेबलावर पडत असलेल्या उन्हाचे तापमान चेक केले .20 ते 30 ℃ पर्यंत दोन तास तरी जवळपास असल्याची नोंद केली. कवडसे कुठून आणि कसे पडतात ह्याची आखणी टेबलवर करून घेतली.
घरातला एक टब घेतला, घरी थोडे कंपोस्ट होते. माती मला नकोच होती. टबात शेती करायची, तात्पुरता काळ का होईना पण मला सोबत हवी होती, माझ्या डोळ्यांना आराम हवा होता.

तीन दिवस धणे चुरून आणि मेथी ओल्या कपड्यात बांधून ठेवले. पातीचा कांद्याचे मुळांचे आणि थोड्या देठाचे भाग घरातल्या भाजीतून वेगळे केले, छोटा मुळा , लाल माठाच्या जाड काड्या,साधी मिरची , सिमला मिरची ह्याची आधी sapling तयार केले. नवीन पाहुण्यांच्या आगमनाची पूर्व तयारी केली. टबाच्या तळाशी खडूने श्री लिहिले आणि प्लस्टिक अंथरून वरून कंपोस्ट अन्नपूर्णे नमः म्हणत पसरविले. तीन दिवसात धणे ,मेथी कपड्यात अंकुरले ते अलगद पसरविले .

घरात 24 तास एसी आणि खिडकीतून येणारे ऊन ह्यावर बे भरवश्याची शेती पेरली. शेतकऱ्यांचे कष्ट, उगवताना लागणारा वेळ ह्याची जाणीव परमेश्वर करून देत होता. आज चार दिवस झाले, टब उन्हाच्या दिशेने फिरवत राहते. कंपोस्ट मधून कारले वेल ही उगवली.

कसे हे जगतील ह्या माझ्या काळजीचे उत्तर हे अलवार मऊसूत कोमल अंकुर देतात. छोट्या छोट्या पानांची दिशा उन्हाच्या दिशेने सतत बदलत राहते.माझ्या साठी ते ही संघर्ष करीत सकारात्मकता दाखवत आहेत.

सकाळी उठले कि, त्यांना हळुवार स्पर्श करणे, त्यांची विचारपूस करणे , हळू हळू पाणी घालणे. मूक साथ कशी म्हणावी, ही तर बोलकी साक्ष आहे. निसर्ग कधीतरी रुद्र होतो पण हे हिरवे हात मात्र आपल्याला वसुंधरेशी जोडून ठेवतात.

अनुजा पडसलगीकर