हरवले…….सापडले ह्या मधील अंतर मी शाळेत शिक्षिका असे पर्यंत कधी फार लक्षात आले नाही. शाळेतील मुलांच्या कंपास, डबे, पाण्याच्या बाटल्या ह्यांचे नेहमीच ढिगारे लटकत ठेवलेले असत. प्रत्येक वर्गात हरवले सापडले चा प्रतिनिधी शोध घेऊन वस्तू सुपूर्त करत. मध्यंतरी च्या काही काळात काही शुल्क दंड म्हणून ठेवली गेली तरी सुद्धा विसरभोळी मुले कधीही काम नाही असे ठेवत नसत. वस्तू मिळाल्यावर त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद समाधान देत असे. बहुतेक वेळी मात्र पालक लगेच वस्तू आणून देत असल्याने विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरचा बेदरकारपणा सुद्धा प्रकर्षाने जाणवायचा हे संमिश्र भावानुभव मिळत असल्याने हरवले……सापडले चे फारसे लक्षात कधीच घेतले नाही. शारीरिक शिक्षण शिक्षकांकडे हे खाते असल्याने दरोरोजची हजेरी घेतली कि, ह्या खात्याचे विद्यार्थी प्रतिनिधी वर्गात यायचे त्यामुळे हजेरी पटाची गोळा बेरीज करण्यास हक्काचा वेळ मिळायचा हाच काय तो क्षणिक दुरान्वये सहसंबध वर्गशिक्षक म्हणून लक्षात आहे.
शाळेतील आठवणी जशा विद्यार्थी म्हणून कायमच्या मनावर कोरल्या जातात तसेच शिक्षक म्हणून सुद्धा शाळेतील विद्यार्थ्याचा चेहेरा मोहरा बदलला तरी त्या विद्यार्थ्याचा स्वभाव सहसा शिक्षक विसरत नाहीत. शाळेत नोकरी केली म्हणण्यापेक्षा शाळा आमचे घर होते. शाळेतील कोपरा न कोपरा आठवतो. असाच एक कोपरा हरवले……सापडले चा प्रत्येक शाळेत असतोच.आपले काहीही हरवले नसले तरी एक वेळा तरी हा कोपरा प्रत्येक जण न्याहाळून पुढे जातो.
मध्यंतरी पुण्यात एका मॉल मध्ये फिरताना माझ्या शेजारी एक आजी पण काही वस्तू घेत होत्या, अचानक त्यांना अस्वस्थ वाटून त्या पटकन जमिनीवर बसल्या. बिपी ची गोळी विसरल्या होत्या. गोळी त्यांच्या कडे होती पण त्या पाण्याची बाटली विसरल्या होत्या. माझ्याकडे पाण्याची बाटली होती मी त्यांना दिली. हे सर्व काही मिनिटात झाले, मी पण तिकडून लगेच निघाले. पैसे भरण्यास रांगेत उभे राहिले.
एक तिशीतली संसारी तरुणी माझ्याकडे पाहून हसली. मी पण उगाचच हसले, पुढे येऊन म्हणाली, मला ओळखले नाही का? कोणीतरी विद्यार्थिनी नक्कीच असणार. कशी ओळखू मी? कसेनुसे हसून म्हणाले, नाही ग. मला दुसरा काहीही संदर्भ ती देत नव्हती. मी अजून गोंधळून गेले. पुढे तीच म्हणाली, मी तुम्हाला ओळखले आणि पाण्याची बाटली पण अजूनही तुमच्या पाशी कायम असेलच ह्याची पण खात्री आत्ताच पटली. आत्ता हा काय पाण्याचा सहसंबध? मी दर महिन्याला पाण्याची बॉटल शाळेत विसरयाची आणि हरवले मध्ये शोधायची. तुम्ही पाणी नेहमी जवळ ठेवावे असे सांगायच्या. आज तुम्ही पाणी दिलेत म्हणून माझ्या सासूबाईना त्रास झाला नाही. पुन्हा कधीही विसरणार नाही. हरवले चा कोपरा आज मला काही देता झाला
भारताच्या रम्य आठवणी मनात ठेऊन परतीच्या प्रवासाकरता मुंबई विमानतळ गाठले. सामान ट्रोली वर टाकून मी स्कॅनिंग साठी मशीन शोधत होते. स्कॅनिंग बंद केले आहे असे सांगितले. काळजाचा एक ठोका चुकला. सर्व प्रवाशांकडे हे पण नक्कीच संसारी असतील व त्यांच्या सामानात वावगे काहीच नसेल. असे मनाला पटवत सामान चेक इन वर टाकले. मस्कत ला उतरल्यावर एक ब्याग येईनाच. सर्व प्रवासी गेले. मुलाचा चेहरा पार बदलला, घाबरा झाला. ते सामान त्याचे होते. आई, बहुतेक ब्याग हरवली!!!!! अरे, शुभ बोल रे!! म्हणून त्याला दटावले. थोड्याच वेळात सत्याला सामोरे जावे लागले कि, सामान हरवले!!!!!
मगाशी घाबरा झालेला, धिटाईने तक्रार करण्यास गेला. सामान कुठे गेले? हे एक मोठे प्रश्न चिन्ह आमच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होते. दोन दिवस मुंबईला विमानतळावर फोन लावणे, मस्कत विमानतळावर सतत संपर्क साधणे. ह्यातच मला फारसा सहसंबध नसलेला हरवलेला शाळेतील कोपरा आठवला. अमिताभ चे सामान हरवले होते हा उगाचच काडीचा आधार वाटत होता. दोन दिवसांनी मस्कत विमानतळावरून मेसेज आला, तुमची ब्याग कराचीला गेली होती. आमच्याकडे पाठवली गेली आहे येऊन घेऊन जा. सापडले……सापडले!!!!!
भारतीय विमानतळावरच्या त्रुटी, हलगर्जी पणा प्रकर्षाने जाणवला. स्कॅनिंग नाही. ज्यांनी त्यांनी आपलेच सामान घेतले आहे ह्याची तपासणी नाही. जाताना नाही व परत येताना हि नाही. मस्कत ला काटेकोरपणे स्कॅनिंग आहे. पण प्रामाणिकपणा आणि कायदा कडक असल्याने चुकुनही दुसऱ्यांच्या सामानाला हातसुद्धा लावला जात नाही.
भारतीय विमानतळावर नियम बदलतात. आमचे सामान सहज बाहेर पडते म्हणून क्षणिक आनंद कधीतरी अतिरेकी हल्ला पण घडवून आणू शकतो. मग असे विदारक, बेदरकार अनुभव मन विषण्ण करतात. आम्ही पण निवांत सगळे सुरळीत पार पडले म्हणून साधा हरवले…..सापडले चा कोपरा फारसा लक्ष न देता नुसती नजर टाकून बाहेर पडतो.
मस्कत ला हरवल्याचा अनुभव घेतल्यावर असे लक्षात आले कि, मुंबई विमानतळावरचा ह्या खात्याचा साधा फोन नंबर पण टिपून घेतलेला नाही. खरतर आमची जवाबदारी नाही हे काम मस्कत चे विमानतळ चोख पणे पार पडते. मग आपण निदान सामानाचे टोकन स्लीप वरचा आकडा मुंबई विमान तळावर फोन करून तरी कळवू शकतो. आमचा बेदरकारपणा हरवले……सापडल्याच्या कोपऱ्याकरता असेलला आम्हालाच लाजवतो. पाण्याची बाटली कधीच विसरणार नाही असे वचन घेऊन सुखावणारी मी!!!!! शाळेतील एक छोटासा कोपरा हरवले ….सापडले चा माझ्याकडून दुर्लक्षिला कसा गेला? अनुभवाच्या पटावर गोळा बेरीज पूर्ण होण्यास अजून वेळ हवा आहे. हेच खरे आहे.
आज महत्व कळले कि, प्रत्येक कोपरा हा आपल्या आयुष्यात हरवले……सापडले चा अनुभव देणारा आहे.