मार्गशीर्ष महिना………

प्रत्येक घरात, प्रत्येक मनात एक कोपरा असा असतो की, जेथे आपणच आपल्याला अजमावत असतो. हे स्थान आदराचे, प्रेमाचे तर कधी भक्तीचे असते. घरातल्या ह्या कोपऱ्याला आपण देवघर जागा असे संबोधतो. मनातील ह्या कोपऱ्यात स्वता:चे प्रतिबिंब आपण पाहतो. भारतीय संस्कृतीत प्रत्येक धर्मात अशा जागांना काही महत्व दिले गेले आहे. भक्ती, प्रेम , आदर, आदर्श, संस्कृती, परंपरा, अभिमान ह्यापूर्णपणे व्यैयाक्तिक बाबी आहेत.मनुष्याचे दिनक्रमण व्यावहारिक, सामाजिक, आर्थिक, अध्यात्मिक, वैगरे दृष्ट्या सुलभ व्हावे म्हणून काळ क्रम गणना आहे. वर्षाचे महिने हे सुद्धा ह्या करिता द्योतक आहेत. श्रावण महिना हा व्रतवैकल्यांचा म्हणून ओळखला जातो. मार्गशीर्ष हा महिना ‘गुरु’भक्तीचे समर्थन करतो.

देव किंवा गुरु हे मानावेत का नाही हे मी पुन्हा नमूद करते की, ह्या व्यैयाक्तिक बाबी आहेत. प्रत्येक मताचा मी आदरच करते. मी देव मानते, मी गुरूही मानते. मार्गशीर्ष महिना हा जे दत्तगुरू मानतात त्यां साठी खूप महत्त्वाचा आहे. सर्व महिन्यांचा मार्ग दाखविणारा हा महिना.आपण जे काही अनुभवले त्याची पुन्हा उजळणी करून देणारा हा गुरु तत्वाचे अधिष्ठान जपणारा महिना. श्रावणात गुरवार हा दत्ताचा वार असल्याने बरेच जण हाही दिवस मोठ्या श्रद्धेने जपतात. पण मार्गशीर्ष महिना पूर्ण पणे जे काही घडले, जे काही अपूर्ण राहिले, असा सर्व विचार करावयास लावणारा आहे. वर्षभर नाही तर जीवनभर गुरूंचा आदर्श ठेवावयास हवा.

गुरु असे असावेत की, जे आपल्याला प्रारब्ध सोसण्याचे बळ देतील, चांगल्या कृती घडवून आणतील. सकारात्मक विचार करावयास शिकवतील. संत परंपरा ही विठू माउली भक्तीकडे आकर्षित करते. शिवाजीराजे, राणा प्रताप, झाशीची राणी हे राज्यकर्ते पण गुरु स्थानीच आहेत. विवेकानंद, कबीर, अगदी आताच्या काळातले पु. ल. ह्यांचे विचार,लिखाण आपल्या मनात एक कोपरा व्यापून असते. थोडक्यात काय तर जे आपल्याला भावते, पटते, कळते, योग्य वाटते, त्यात आपले मन सुद्धा गुरुस्थानीच आहे. दत्तगुरुनी सुद्धा टिटवी पासून ते पिंगला पर्यंत २४ गुरु स्वीकारले आहेत. आपले आदर्श कोण असावेत? प्रत्येक अनुभवातून शिकायला मिळते, त्याचीच उजळणी म्हणजे मार्गशीर्ष होय.

भारंभार पोथ्या न समजता वाचणे ही भक्ती परिपक्व नाही. जे काही वाचाल ते प्रेमाने वाचा त्यातील अर्थ जीवनाशी साधर्म्य करून समजून वाचा. भले तुमच्या आवडत्या लेखकाचे पुस्तक पण असेल ते सुद्द्धा नकळतपणे जीवनात आदर्श संस्कार करत असते. गुरु तत्व स्वीकारणे म्हणजे कायम आपल्याबरोबर त्यांच्या विचारांचा आदर्श घेणे होय व त्या नुसार वर्तन परिवर्तन करून घेणे ही गुरु भक्ती. चांगला शिष्य लाभणे तसेच गुरु ही मिळणे हे प्रत्येकाचे भूत, भविष्य व वर्तमान परिस्थिती प्रमाणे असते. मानवी गुरु एव्हढ्या पुरतेच ह्या कक्षा सीमित न ठेवता,जीवनाच्या प्रत्येक जडण घडणीवर, अनुभवावर पण अवलंबून असते.

गुरूंचा पुरस्कार करण्या साठी मार्गशीर्ष नाही तर त्या मागच्या भावना, आदर, विचार ह्यांचा समन्वय साधण्यासाठी हा महिना. गुरु प्रत्यक्षात आहेत किंवा नाहीत तर ह्या हून ही अधिक आपण काय शिकलो हे महत्वाचे आहे. माझ्या गुरुनी मला व्यैयाक्तिक स्वरुपात काही अनुभव दिलेत. हे चमत्कार नाहीत तर ते अनुभव आहेत. मासिकात छापून आलेत. आज लाखो लोकांनी ह्या महिन्यात माझे अनुभव वाचले. ते माझे अनुभव आहेत, मी मानते, जे सदगुरूना मानतात त्यांच्यासाठी आहेत. जे मानत नसतील तर मला काहीच फरक पडत नाही. प्रत्येकाला मतांचे स्वातंत्र्य आहे. अनुभव हे मार्गदर्शक असतात. सकारात्मक घ्यायचे, का अर्थ नाही म्हणून सोडून द्यायचे हा माझा विषय नाही.मार्गशीर्ष महिना हा दत्तगुरू जयंती चा महिना ज्याप्रमाणे त्यांनी साध्या वाटणाऱ्या घटनांतूनही गुरु म्हणून तत्व जीवना करिता स्विकारीले. ही भक्ती, ही श्रद्धा होय. हा आदर्श. हे जीवनावर केलेले प्रेम आहे.

रोजच्या धकाधकीच्या जीवनात कुठे वेळ आहे? दिवस जसा समोर येईल तसा स्वीकारतो. पण कधी कधी खूप अस्वस्थ वाटते. किंवा माझ्याच बाबतीत असे का घडते? म्हणावे तसे यश, समाधान, शांती मिळत नाही. अश्या प्रश्नाकरिता उत्तरे मिळवण्यासाठी आपण आपल्या मनातील कोपरा चाचपला पाहिजे. आपल्याला जे कोणी आदर्श आहेत त्यांचा विचार, त्यांचे मार्गदर्शन आठवून बदल करावयास हवेत. शरीराच्या स्वास्थ्य करिता मानसिक शांती, समाधान आवश्यक आहे. अध्यात्म ही म्हातारपणी गात्र शिथिल झाल्यावर करण्याची योग्य वेळ नाही. तरुणपणीच खूप ताण शरीरावर, मनावर येतो त्याचा परिणाम आपल्या आरोग्यावर होतो. योग अभ्यास मानसिक, शारीरिक स्वास्थ्य देतात पण सदगुरू प्रारब्ध झेलण्यास मन, शरीर कलुषित होवून देत नाहीत. गुरूंच्या मार्गदर्शन मुळे मी पूर्णपणे ताणविरहित आहे.

आज दत्त जयंती सदगुरूना प्रणाम!