कशासाठी एव्हढे……………..हे तर प्रेमासाठी.

”आई, आत्या, काकू, मावशी…………आम्ही भारतात येतोय”

सुट्टी अजूनही मस्तच असते. आम्ही दरवर्षी जून महिन्यात भारतात जातो. हा निरोप फोन वर देवून झाला की इकडे व तिकडे दोन्ही ठिकाणी लगीनघाई सुरु होते. साधारणपणे मे महिन्यात परीक्षांचे व ह्यांच्या सुट्टीचे नियोजन करावे लागते. मग लगबग सुरु होते प्रथम खरेदीची, दरवर्षी ही भलीमोठ्ठी यादी होते.

वयस्कर व्यक्तींची नावे निदान दहा तरी जण जवळचे असतात. घरचे तीन ते चार, आमचे काका, आत्या, मावशी हे मागच्या पिढीचे जेष्ठ नागरिक, त्यात शेजारचे आजी, आजोबा, मित्र मैत्रिणींचे आईवडील असे मिळून साधारण वीस पर्यंत होतात. त्यांच्या वयानुसार सुकामेवा, गरम कपडे, बी. पी. मोजायचे यंत्र वैगरे. आई व सासूबाई ह्यात एखाद दोन व्यक्ती आवर्जून सांगतात. कोणाची पंचाहत्तरावी तर कोणाची साठी झाली असते. मग त्या नुसार जरा वेगळा विचार करून खास खरेदी करायची. जेष्ठ नातेवाईक पासून सुरवात होते.

सुकामेवा पण मऊ असा बेदाणे, काजू, अंजीर घ्यायचा उगाच जर्दाळू, बदाम असे कडक प्रकार टाळायचे. गरम कपडे पण हलके व उबदार हवेत. इकडे खर तर उन्हाळा खूप पारा पन्नास अंश पर्यंत जातो, तशीच थंडी पण बोचरी कारण मूळ वाळवंटी देश आहे. अनेक देशातील वस्तू मिळतात. त्यामुळे अमेरिका ते आफ्रिका सर्व आहेच. चीन तर कुठे ही असतोच. असो ह्या परदेशी वस्तूंचे आकर्षण अजूनही आहे. त्यामुळे आजी आजोबांची खरेदी प्रथम करणे.

नंतर खरेदी करणे मधली पिढी सर्वांची खरेदी एकाच पद्धतीची करायची. ड्रेस कापड, पर्सेस, परफ्युम, मेकपचे सामान सर्व काही नामवंत देशांचे.मैत्रिणी, मित्र, त्यांचा परिवार. शेजारच्या सख्या, सोसायटीचे काही खास लोक की जे आमच्या घरावर लक्ष ठेवतात. दीर, भाऊ, पुतण्या, भाचे,त्यांचे काही जवळचे आहेत त्यांच्या करिता पण घ्या असा फोन भारतातून हमखास येतो. ह्या वयोगटाची यादी खूप विस्तारत जाते.

मोबाईल ते लॅपटॉप, घड्याळे, कॅमेरा काय काय घ्यायचे? भारतात घेणे चांगले कारण नंतर त्याची सर्विस मिळते. शक्य तिथे पटवून सांगतो. तरीही यादी असतेच. आता तर विमानतळावर खूप त्रास होतो. स्मगलर आरामात बाहेर पडत असतील, पण सामान्य वर्ग चेहेरे पट्टी असूनही अडवणूक होते.त्यात आता तापाचे फॉर्म भरावे लागतात. खूप वेळ जातो. वैताग येतो. आम्ही मुंबईत अजूनही टपरींवर पण खातो. कसे ठणठ्णीत आहोत. पण ती वेळ नसते हे पटवून देण्याची मुकाट्यानी तासंतास वेळ जातो.

नंतर नंबर असतो बच्चे मंडळींचा. इथे नुकताच जन्म घेतलेला सर्वात छोटा नातेवाईक ते कॉलेज ला जाणारे युवक इतका मोठा विस्तार असतो. आता ह्यांच्या सर्व गोष्टी भारतात छानच मिळतात पण आम्ही परदेशावून येत असल्याने घरा समोरच्या दुकानातून विकत घेणे विचार सुद्धा करता येत नाही. मस्कत वरून येतात आम्ही म्हटलेच, घरात फॉरेन च्या वस्तू येतील. आम्ही इकडूनच घेवून जातो. अपेक्षा भंग करणे जीवावर येते. चॉकलेट ते जर्किन.परफ्युम, मनगटा वरची घड्याळे, इत्यादी वयाचा विचार करून घेतो.

लग्न होवून बरीचशी भावंडे आईबाबा झालेली असतात. मग अशा वेळी त्यांच्या धर्मपत्नी किंवा नवीन पती व त्यांचे छोटेसे बाळ ह्या बातम्या आधीच दोन्ही आईनी कानावर घातलेल्या असतात. मग वेगळे पॅकेज करावे लागते. कारण काका, मावशी, आत्या, अशा नवीन नात्यांनी ओळखले जाणार असतो. कधी कधी पूर्ण घराकरिता केशर डबी ते कधी सोन्याची पण मागणी होते. घरचे नातेवाईकात लग्न होणार असते मग इकडचे सोने म्हणजे चकाचक. इथे या व आपल्या पसंतीने घ्या. अशी नम्र विनंती करावी लागते.

दारातला गुजराथी दुकानदार तर अंगावरच्या वस्तू, रोख पैसे देतो पण मला देवून जा. असा वाणी हिशोब मांडत असतो. पूर्वीची कामवाली, गेटमन जाता येता अकारण सलाम ठोकतो त्याच्या हातावर पैसे ठेवावे लागतात कारण आम्ही दिवाळीत नसतो व अधिक त्याच्या मुलांकरिता कॅड्बरी परदेशाची ठेवावी लागते.पूर्वीचा दुधवाला, कचरेवाला, अगदी भाजीवाला सुद्धाघराची खिडकी उघडी दिसली म्हणून विचारपूस करायला आवर्जून येतो. त्याच्या नातवंडाची माहिती देतो. एक छोटे का होईना चॉकलेट द्यावे लागते.

एवढा उपद्व्याप कोणी सांगितला? नाही घ्यायचे असे दरवर्षी ठरवतो. पण मायेचे पाश इतके असतात की त्रास झाला तरी आनंदच मिळतो. दोन्ही आई सारख्या सांगतात तुमच्या भल्या मोठ्ठ्या बॅगा भरून काहीही आणू नका. तुम्ही दिसता, भेटता हेच खूप आहे. पण महिनाभर पायाला चक्र लागलेली असतात. प्रत्येक नातेवाईक भेटणे शक्य होत नाही.एकतर पाऊस आम्हाला दमवतो. तरी पण काही घरे करावीच लागतात.

वयस्कर मंडळी आम्ही पुढच्या वर्षी आहोत का नाही असे म्हणून गहिवर देतात. नवीन लग्न झालेल्या भावंडाना खूप उत्साह असतो. एखादी भाची, पुतणी, बहिण शिक्षणाला अमेरिकेत जाणार असते. तिला भेटणे सहज शक्य नाही म्हणून तिकडे ही जातोच. जुने शाळकरी मित्र परिवार, एक ना दोन खूप कारणे असतात. परदेशाहून येणे सोप्पे होते पण प्रत्येक वेळी पाणी, खाणे, झोपेच्या सवई, वातावरण बदल्यामुळे आजारी पडतोच.

खरेदीत पैसा एव्हढा खर्च होतो की वर्षातून एकदा कंपनी तिकीट देते म्हणून बचत करून एकदाच जातो. त्या खरेदीच्या पैशात भारतात दोनदा येवून गेलो असतो. पण दारात उभी असलेली आई, आवडीचा पदार्थ करून जेवायला बोलावणारी मावशी, थरथरणारा हात चेहऱ्यावरून फिरवणारी आत्या, धावत बिलगणारी बच्चे कंपनी, खुश होणाऱ्या बहिणी, मागे मागे फिरणारे भाऊ, आवर्जून बोलावणारा मित्रपरिवार, साध्या स्वभावाची भेटणारी रोजची मंडळी, दारातले मी लावलेले झाड जपणारा गेटमन, कोणा कोणाची नाती सांगू? सर्व आपुलकीने विचारपूस करतात.

ह्याच आपुलकी साठी, जिव्हाळ्यासाठी हा सोस. परत येताना असतात बाबांची घट्ट मिठी, आईचे अश्रू, बहिणींचे दुखी: चेहरे, भावांची काळजी, मित्र परिवाराचे हातात हात घातलेले स्पर्श, साध्या स्वभावानी दिलेली मूक परवानगी, वयस्करांचे आशीर्वाद, बच्चे कंपनीची जावू नका म्हणून घातलेली गळ. सोडवत नाही म्हणून परतांना हे सामान बरोबर परदेशी माघारी घेवून येतो.

पुन्हा मोठी बॅग भरते ती लाडू, घरचे मसाले, मुरांबे, मेतकुट मिरगुंड, घरी केलेली लोणची, बटाटा कीस, चितळे बाकरवडी, केप्र उत्पादने पुन्हा खूप सामान होते. ठराविक वजन नेता येते म्हणून काही शिल्लक राहते. आईचा गलबललेला चेहरा आठवतो. वर्षभर पुरणार नाहीच. बरेचेसे परदेशी मिळते पण त्यात माया, प्रेम नसते. पुरवून पुरवून वापरायचे. कारण पुढच्या जून पर्यंत वाट पहायची असते. कशासाठी एव्हढे तर ह्या प्रेमासाठी. आंम्ही परत परत बॅग भरत असतो भारतासाठी, आपल्यांसाठी…….