खेळ अंधाराचे………वेध प्रकाशाचे.

परवा अजिंक्य ला सर्वपित्री म्हणजे काय ते सांगत होते. आकाशात आपले मृत्यू झालेले आप्त ह्या दिवशी मुक्त संचार करत असतात. ते ‘आत्मा’ ह्या स्वरुपात असतात. सर्वपित्रीला त्यांना जेवण ठेवतात. ह्या गोष्टीना पुरावा काही नाही परंतु ह्या दिवसा करता आमच्या लहानपणापासून भीती घातलेली होती. असे काही नसते, समजावून पण सांगत होते. कितीही न पटले तरी त्याचे चौदा वर्षाचे वय अशा गोष्टीत रमते. सध्या सी आय डी सारख्या सिरीज आमच्या कडे भक्तिभावाने बघणे होते. खून कसा झाला? का केला ह्या पेक्षा तो कसा शोधला हे खूप आवडते.

माझ्या लहानपणच्या गोष्टीत बाळ रमत गेले, बघता बघता रात्र झाली. जेवणे होतात न होतात तोच साडे आठ च्या सुमारास चक्क लाईट गेले. इथे हा अनुभव जवळ जवळ नाहीच. त्यामुळे घरात टोर्च पण एखादीच… सतत लाईट असल्याने इन्व्हरटर पण माहित नाही. मेणबत्ती चे दिवे गेल्या वर्षीचे दिवाळीचे घरात होते म्हणून बरे. हळू हळू अजिंक्य सोफ्यावर माझ्या जवळ जवळ सरकत होता.

आमच्या लहानपणीच्या अंधारात आम्ही कसे कसे वागायचो ह्या गोष्टीना सुरवात केली. घरात रात्री चिमणी, किंवा कंदिलाच्या उजेडात सर्व कुटुंब एकत्र बसायचो. आई रामरक्षा म्हणण्यास सुरवात करायची. आईचा शांत, अंधाऱ्या रात्रीतला एका लयीत येणारा गहिरा उच्चार पण किती आश्वासक असायचा.

‘चिमणी’ च्या उजेडात तिने केलेला गरमगरम स्वयंपाक. ताटात पोळी वाढताना मेणबत्तीचा तिच्या चेहऱ्यावर पडलेला प्रकाश, राजा रवी वर्मा च्या चित्रासारखा वाटायचा. तेंव्हाच्या काळात सारखे लाईट जात नसायचे पण एकदा गेले कि खूप वेळ येत नसत. मग सोसायटीच्या गच्चीत आपल्या गाद्या, उशा घेऊन घरातून प्रत्येक जण यायचा. आई कधी यायची नाही ती छोट्या बहिणीला घेऊन घरात. मी, भाऊ आणि बाबा गच्चीत.. सगळे जमत मग काय अंधाऱ्या गच्चीत पण चांदण्याच्या उजेडात भुतांच्या गप्पांना जोर येत असे. तेंव्हा आम्हाला पण सकाळची शाळा होती पण आठवत नाही कधी ह्या गोष्टीचा कोणी बाऊ केल्याचे.. कसे मस्त होते ते लाईट चे जाणे.

माझ्या लहानपणी ब्ल्याक आउट होत असे. पोलिसांचे सायरन वाजायचे… पाकिस्तानी हल्ले होत. अशा वेळी वडील मिलिटरी मध्ये इंजिनिअर म्हणून काही काळ होते, त्या जीवनाचा त्यांना अनुभव असल्याने लाकडी खिडकीच्या काचांना काळा कागद आमच्या कडे बरेच दिवस टिकून होता, भीती कधी वाटली नाही पण लाईट आले आणि संकट टळले म्हणून निदान निम्म्या ठाण्यातून तरी उत्साहाच्या आरोळ्या ऐकू येत.

भावाचा ‘राजू’ चा चेहऱ्यावर टोर्च चा उजेड पडून भुताचा चेहरा आम्हाला दाखवायचा हा उद्योग व्हायचा. धाकटी ‘अंजू’ किंचाळली कि, हा टोर्च फक्त बाबा सांभाळायचे. मग वडील कॅरम काढायचे. अहाहा, मेणबत्ती चा प्रकाश बोर्ड वर पडला कि, राणी सोंगटी पण कशी लाल व्हायची. मुद्दामहून कॅण्डल लाईट डिनर, असे अंधारात खेळणे ह्या करता कुठेलेही हॉटेल, किंवा क्लब लागत नव्हते कारण तेंव्हा इन्व्हरटर नव्हते. आज गावाकडे सुद्धा अशी धम्माल कमी होत आहे असे वाटते. पत्ते तर आई लवकर ये न….. अशी आरोळी ठोकून वाटण्यास सुरवात करायचो.

रात्री ‘रम्मी’ खेळण्यास खूप मजा असते, दुपारी बदाम सात ठीक असे माझे पत्त्यांच्या खेळाबाबत काही ठोकताळे आहेत. ‘रम्मी’, ‘गाढव डाव’… खेचा खेचीचे,अडवणुकीचे खेळ खेळताना लबाड, चिंता हे भाव मेणबत्तीत अधिक ठळक उठून दिसतात. ‘बदाम सात’ कसा वामकुक्षीचा खेळ दुपारीच बरा असो, असा डाव रंगत जात असे. मेणबत्ती च्या उजेडात सावल्यांचा खेळ तर जोशात यायचा.

घरातील सर्व सदस्य निरनिराळे आकार भिंतीवर करून दाखवायचे. दिसते तसे नसते…भासमान खेळ आहे ह्या जाणीवे बरोबर हि पण एक कला आहे हे हि आवर्जून वडिलधाऱ्या कडून सांगितले जात असे. ह्या खेळात कुत्रा. हरण, ससा असे आकार भिंतीवर खूप छान दिसतात.

जस जशी रात्र रंगत जात असे तसा दिवसा आणि रात्री चालणारा गुढमय खेळ प्लांचेट मांडले जायचे. अर्थात त्याला हि सभ्यता असायची रात्री म्हणे आत्म्यांना बोलवायचे नसते, ते परत जात नाही. मला स्पष्ट आठवते, कि कोणीतरी मुल खाणारी हडळ घरी येते, म्हणून दारावर श्रीराम हे आम्ही त्या अफवेला घाबरून लिहिले होते. वडील आणि आई हे खोडून काढत पण वातावरण असेच असल्याने आम्हीही भरकटले जात असू.

अंधारात गच्चीच्या सज्जात हळूच सटकत असू, आधीच चमूची टोळी जमलेली असायची, मग तो काचेचा ग्लास, कोरा कागद. त्यावर ‘हो’ ‘नाही’ असे दोन वर्तुळे…सर्व काही दाखवून लहान भावंडाना थरथर करायला लावत असू……मग आमची आठवडाभर कामे कशी अलगद त्यांच्या कडून पूर्ण केली जायची. कामे कसली तर….. पेन्सिलीना टोक करून ठेवणे, पेनात शाई भरून ठेवायची…. तेंव्हा रविवारी अंघोळ करताना केस धुणे हा कार्यक्रम प्रत्येक घरी होत असे.. त्याच रविवारी पेन साफ करून ठेवणे हे काम प्लांचेट पहिल्याने भावंड करत . आईच्या लक्षात आले कि, काय बोलणी बसत असत. अंधारात कशाला कडमड करता? अशी दटावणी पण मिळे . तरी पण हे उद्योग काही थांबविले नाहीत. बर रात्री खरे प्लांचेट कधीच करत नसू कारण मनात आम्ही पण टरकलेले असायचो आत्मा परत गेलाच नाही तर… त्यातल्या त्यात आजीला बोलवायचो ती काही त्रास नाही देणार म्हणून..पण लाईट गेले कि खोटे प्लांचेट मांडून कोणी ताईगिरी, दादागिरी करण्याची संधी म्हणजेच अंधार…

आता लाईट गेले कि, एका मिनिटात इन्व्हरटर घर पुन्हा प्रकाशमान होते. अजूनही गावी कंदिलाची मजा, कंदील, चिमणी साफ करणे केरोसीन घालून नीट ठेवणे किती होते कोणास ठावूक कारण घरोघरची अंधाराची मजा आता इन्व्हरटर ने घालवली. घरात सदस्य कमी झाले. बिल्डींग मधले सगळेच माहित असतात असे नाही. ह्या शोधामुळे फायदे हि खूप झाले पण अंधारातले लहानपण कुठेतरी हरवत चालले.

अंधारात जाणवलेला वेध प्रकाशाचा… त्या जाणीवेत अनुभवलेले सात्विक भाव, खोडसाळपणा आमच्या ह्या छोट्या पिढीला समजावून सांगावा लागतो. अजिंक्यला सर्व धम्माल सांगताना हि पोस्ट तयार झाली कदाचित… हेच वाचून हि पिढी निदान व्हर्चुअल आनंद तरी घेईल.

गोष्टी सांगताना रात्र खूप झाली, वेध लागले होते सर्वापित्रीच्या गूढ रात्री नंतरच्या येणाऱ्या….. जागून काढलेल्या पुढच्या प्रकाशाच्या नऊ रात्रींचे.

.

रुखवत……आठवणी मनातल्या

‘रुखवत’ हा जिव्हाळ्याचा कोपरा सामन्यपणे प्रत्येक घरात मुलीचे लग्न ठरले कि चर्चिला जातो. मुलीच्या नकळतपणे तिच्या आईने कधीचीच रुखवताची मांडणी मनात केलेली असते. स्टील ची भांडी…कळशी, घागर, पिंप पासून ते अगदी वाटी चमच्या पर्यंत मांडावे ह्या साठी आईची घालमेल होते. कलाकुसरीच्या वस्तू तर फारच उत्सुकतेने सर्व पाहत असतात. आई कडून मुलीला हा कला कौशल्याचा वारसा आलेला असतो.

माय लेकी, मावशी, आत्या, काकू असा सगळा समस्त स्त्री परिवार जातीने लक्ष घालून हा कोपरा लग्न ठिकाणी छान सजवून ठेवतात. माझ्या आईने तिच्या रुखवतात आणलेले भिंतीवरचे चंदेरी टिकल्यांचे , पोटात गुबगुबीत कापूस घालून दोन ससे, काळ्या अशा कापडावर अजूनही दिमाखदार विराजमान आहेत. अशीच मोराची जोडी, हरणाची जोडी थोडक्यात काय पण मर्यादित शृंगाराच्या फ्रेम्स संसार कसा उत्फुल्ल सदा बहार करावा हे आईचे रहस्य कन्येला हळूच सांगत असाव्यात.

कोणे एके काळापासून हि रुखवताची पद्धत पिढ्यानपिढ्या आहे. मुलीला चपखलपणे संसाराची गुपिते सांगणारा हा कोपरा केंव्हाही व्याकूळ होतो. जेवणाच्या ताटाची मांडणी धाग्यात गुंफून सुरेख असे ताट लेकीला सणावाराला निश्चितच मार्गदर्शक असे असायचे. सप्तपदीची पाऊले तिला सात पावलात तुला तुझे घर कसे अलगद सांभाळायचे आहे असेच सूचित करते. आईचे कौशल्य मुलीत पण आहे हे सांगणारा हा कोपरा मांडण्यासाठी माहेर आणि तो उचलून नेण्याची जवाबदारी मात्र सासरची.

आता तर ह्या रुखवताची दुकाने सजली आहेत. नेट वर रुखवताचे भरमसाठ फोटो आहेत. आईच्या माहेरचा चंद्र, तेच ससे, हरणे, तिने विणलेला रुमाल मात्र मला सापडला नाही. बाजाराच्या वस्तू ‘पावला पासून ते डोली पर्यंत’ सर्व काही सहज उपलब्ध आहे. अजूनही बऱ्याच घरातून ह्या जुन्या काळच्या फ्रेम्स आहेत. त्यात त्या घरचा जिव्हाळा आहे. बाजारातून वस्तू आणून टेबल सजवणे खरच गरजेचे आहे का? ह्या गोष्टीत आईचा पैसा खर्च होतो. हल्लीच्या आधुनिक राहणीच्या संकल्पनेत ह्या कौतुकाच्या गोष्टी ठेवायला जागा आहे का?

माझ्या लग्नात रुखवत नव्हते. कारण मला कलाकुसरीची आवड नव्हती. आईने खूप शिकवायचा प्रयत्न केला. तिचे भरतकाम चे शिकवणी वर्ग घरात असायचे. सगळे जण माझ्या कडे पाहून म्हणायचे अरेवा!! तुमच्या मुलीला सर्व काही येत असेल, मला हि बोलणी असह्य व्हायची, याचा परिणाम म्हणजे मी ह्या पासून मनाने दूर दूर जाऊ लागले.

खेळात तरबेज होते अगदी पारितोषिके पण मिळवली. गणपतीचे, दिवाळीचे सर्व सणांचे डेकोरेशन उत्तम करत असे. शास्त्र, भूगोल विषयंची मॉडेल्स पण राज्य स्तरावर नावाजली जात होती. माझी प्रमाणपत्रे, फोटो लावून आपण माझ्या लग्नात असे रुखवत मांडूया. हीच रुखरुख आईच्या मनात कायम होती. माझे घर थाटल्यावर तिने मी एका फ्रेम मध्ये किंचित असा सहभाग घेतला होता ती फ्रेम कौतुकाने जावयाच्या हातात दिली.

मुलींचे लग्न ठरेपर्यंत त्या शिकत असतात. स्वयंपाक करणे ह्याला सुद्धा वेळ मिळत नाही तर कलाकुसर तर कोसो दूर कि बात…. मुलीला जात्याच आवड असेल तर, कदाचित छंद म्हणून कलागुण संपन्न अशी वाग्दत्त वधू म्हणून सज्ज होईल. पण हे प्रमाण सध्या च्या युगात फारच अल्प आहे.

संसाराचा रथ मुलगा मोठा झाल्याने जरा स्थिरावला आहे. स्वतःकरता वेळ मिळू लागला आहे. अचानक मला नेट वर शोधाशोधीत बरीच कलाकुसर पाहायला मिळाली. स्वतःचा अंदाज घेत एकेक करून पाहावे असा धाडसी विचार मी अमलात आणला. आई, मी भरतकाम, विणकाम ह्यात लक्ष देत नसे म्हणून कधीही माझ्यावर नाराज झाली नाही. मी नक्कीच करेन हा विश्वास तिला होता. नातेवाईक जरी काही म्हणायचे तरी ती लक्ष द्यायची नाही. मला नेहमी प्रोत्साहन द्यायची, म्हणायची अग, हरकत नाही हे सर्व करण्यास तुला संसारात नक्की कधीतरी वेळ मिळेल. कॉलेज मध्ये तुझी स्वतःची ओळख केलीस हे हि मला आवडते.

कागदाच्या लगद्यापासून मी पूर्वी मॉडेल्स बनवत होते तेच तंत्र वापरून मी फ्रेम्स करू लागले. इतरही माध्यमे मला खुणावू लागली, तांब्याच्या पत्रा. क़्विलिन्ग, पंच आर्ट, वाळू, तैल रंग वापरून माझी घोडदौड सुरु झाली. माझ्या सारख्या इथे बऱ्याच माझ्या मैत्रिणी आहेत त्यांना एकत्र केले. मुलांचे हिवाळी सुट्टीचे वर्ग सुरु केले. नागाच्या काही मूर्ती करून नागपंचमीस विकण्यास ठेवून त्याचा नफा समाजाकरता पाठवतो. काही एन जी ओ मार्फत आमची कलाकुसर इथल्या मुलांना पण शिकवतो. आम्हा मैत्रिणींचा वेळ असा सत्कारणी व्यतीत होतो.

आईची इच्छा, माझे घरकुल सजलेले असावे, तेही माझ्या मेहनतीने काही अंशी तरी फलद्रूप झाले. आईला मांडू न दिलेले रुखवत, माझी कला, सुप्त राहिलेली आवड आज दिमाखदार पणे घराच्या आनंदात सामील आहे. अजिंक्य व धनंजय च्या प्रोत्साहना मुळे मी कला विश्वात रमले….

मनातले रुखवत मलाच सापडले..

(माझ्या कलाकुसरी करता ज्या साईट वरून कल्पना घेतल्या, त्या सर्व कलाकारांचे जाहीर आभार….राजस्थानी स्त्री कागदाचा लगदा वापरून तयार केली. फुलदाणी आणि फुले हि कणकेने तयार केले, मासे हे क्विलिंग ने तयार झाले. आणि फ्रेम हि तांब्याच्या पत्र्याने तयार केली. अजून हि अनेक माध्यमात मी काही कलाकृती तयार करण्याचा प्रयत्न करत आहे. आपणाला आवडल्या असतील तर जरूर कळवा…. )

बोम्माई कोलू…….

नवरात्रीची लगबग सुरु झाली. कुठे गरबा, तर कुठे नव अंकुर चे घट मनात सजू लागले आहेत. वेध शक्तीच्या उपासनेचे, स्त्री शक्ती..आदिमाता. अशी कि आपल्या बरोबर आपल्या परिवाराचे, गावाचे, देशाचे सर्वांचे कल्याण करते. अष्टावधानी असेलेली स्त्री, नवरात्र साजरे करते. तमिळनाडूत पण नवरात्र बोम्माई ‘कोलू’ किंवा ‘गोलू’, ह्या नावाने नवरात्र साजरे करतात. ह्या कोलू चे वैशिष्ट्य म्हणजे साधारण पणे महाराष्ट्राच्या चैत्र नवरात्री सारखे असते. अनेक बाहुल्या, देवता सात, नऊ, अकरा अशा पायऱ्या करून त्यांच्या माना प्रमाणे विराजमान केल्या जातात.

मुलीच्या लग्नाच्या वेळेस तिची आई एक बाहुली, जी लाकडाची असते( औषधी लाकूड ) ती त्या मुलीकडे गोलू करता देते आणि त्या नंतर ती अनेक बाहुल्या गोळा करून स्वतःचे गोलू साजरे करू लागते. गोलू नऊ दिवस करतात किंवा शेवटचे तीन दिवस गोलू मांडतात. गोलू मांडायचे कसे ह्याचे पण एक शास्त्र आहे, पद्धत आहे. गोलू म्हणजे, बाहुल्यांची पायरी,टप्प्याच्या अनुषंगाने केलेली मांडणी. सर्वात वर कलश ठेवला जातो. त्याच्या आजूबाजूला देवींची अनेक रूपे, नंतर गणपती, विष्णू चे दशावतार च्या सुरेख , मुरगम, कृष्ण, राम सीता, हनुमान असे ३३ कोटी देवांचा जणू काही स्वर्ग उभारलेला असतो.

गोलू जेव्हढे समृद्ध तितके ते घर सुखी समाधानी होते. देवांच्या ह्या दरबारात व्यापारी, शेतकरी, वाणी, लोहार, कुंभार असे विविध जाती जमाती चा जणू काही मानवाच्या कौशल्याचा, मानवाने केलेला सन्मान म्हणून नम्रतेने देवाच्या दरबारात त्यांच्या नंतर पायरी- पायरी खालीखाली मांडतात. विशेष म्हणजे ह्या जाती जमातीच्या मायंदळीत प्राण्यांना विशेष आपुलकीने बाग, झु निर्माण करून एका बाजूला मांडतात. बाग नसेल ह्यांचा गोलू पूर्ण होत नाही. थोडक्यात भूमी पासून स्वर्ग पर्यंत सर्व काही सृष्टीचे आहे ते छान जपले पाहिजे हा संदेश जणू काही देतात.

रोज रात्री आरती केली जाते. सरस्वती च्या पूजनाचा विशेष थाटमाट असतो. स्त्रियांना विशेष मान देतात. कुंकू, विड्याचे पान त्यावर कच्ची अर्धी सुपारी, छोटीशी भेट दिली जाते. पूजनासाठी आलेल्या प्रत्येक स्त्री च्या मस्तकावर तेलाची दोन बोटे का होईना पण लावली जातात आणि केस फणीने थोडेसे सारखे करून देतात.

राजाराणी किंवा मारापची, सरस्वती ह्या मूर्ती विशेष महाग असून त्या पारंपारिक असतात. गोलू कसे मांडावे ह्या करता वेगवेगळ्या थीम ठरवून त्या प्रमाणे त्यांची मांडणी करतात. उदा. समजा कौलारू घर आणि गाव हि थीम असेल तर गावातील विविध व्यवसाय, त्या गावाची विशेष देवता ह्यांची मांडणी करतात. उगाचच सर्व गोलू आहेत म्हणून भारंभार मांडत बसत नाहीत.

छोट्या छोट्या पोत्यातून किंवा भांड्यामधून धान्य ठेवले जाते. जर पाण्याची थीम घेतली असेल तर शंख, शिंपले सुरेखसा असा शांत निळा प्रकाश सर्व खोलीत असेल ह्याचे भान ठेवतात. जंगलाची थीम असेल तर प्राणी, पक्षी, विविध झाडे आवर्जून काळजीपूर्वक मांडली जातात. ह्या सर्व थीम करता स्थानिक तमिळ संस्था कडून स्पर्धा ठेऊन बक्षिसे दिली जातात. सहसा गोलू नाही असे घर नसते. दसऱ्याला कलश जागेवर हलवून, पुन्हा पुढच्या वर्षी करता ह्या सर्व दरबाराची रवानगी बंद खोक्यात केली जाते. अतिशय काळजीपूर्वक ह्यांना सांभाळतात.

‘सुंडल’ प्रसाद देतात, हा छोले, हिरवे मुग किंवा चवळी पासून बनवतात. ओले खोबरे, उडीद डाळ, कढीपत्ता, ह्यांची चटपटीत फोडणी दिलेली असते. नुसता पण खावासा वाटतो आणि शिवाय पौष्टिक पण असतो. अनेकविध गोड पदार्थ असतात पण ‘सुंडल’ हा विशेष मानाचा प्रसाद असतो.

सामाजिक रचना, पर्यावरणाचे महत्व आणि पौराणिक आधार ह्यांचा मनोहारी दरबार म्हणजे गोलू…… बोम्माई कोलू. सर्वाना आधार स्तंभ असणारी विश्व देवता ते गृह देवता ह्यांचा सोहळा म्हणजे तामिळनाडू चे नवरात्र. दरवर्षी मला ह्या नवरात्रीला भेट देण्यास मिळते,

नवरात्रीत माझा पोस्टद्वारा केलेला आई अंबामातेस नमस्कार!!!

नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा !!!!!!