घरोघरचे न्यूटन………

‘न्यूटन’ हा नामवंत प्रख्यात शास्त्रज्ञ, ‘गुरुत्वाकर्षणचा’ जगविख्यात शोध लावला.पण गाजला त्याच्या मांजरामुळे… कथा साधीच त्याच्या कडे मांजर होती. तिला पिल्ले झाली, ती पिल्ले आणि मांजर घरात ये जा करू लागली कि, त्याला कामात व्यत्यय येऊ लागला . मोठ्या मांजरीची उडी मारण्याची क्षमता पाहून त्याने दाराला मांजरी करता एक मोठा , आणि छोट्या मांजरी करता छोटा गोलाकार आकार केला. मांजरीने आणि तिच्या पिल्लांनी दार बंद असले तरी गोलातून त्याला व्यत्यय न आणता सहज ये, जा करावी. मांजरांचा आकार आणि त्यांची शारीरिक उडी मारण्याची ताकद ह्यांचे निरीक्षण करून आपला उद्देश पूर्ण केला.

तेंव्हा पासुन न्यूटन गाजला कारण मोठ्या आकारातून लहान मांजर पण गेले असते, अशा हास्यापद कोटया केल्या गेल्या आणि त्या तहहयात त्याला ऐकाव्या लागल्या असतील. नंतर हि ह्या कोटया जो पर्यंत पृथ्वी आहे तो पर्यंत राहतील असेच खेदाने म्हणावेसे वाटते. खर तर मांजरांच्या उडी मारण्याच्या क्षमते नुसार त्याने दोन उपाय केले.

आपण बऱ्याच वेळेला ज्या गोष्टी मोठ्या क्षमतेच्या पण लहानांना चालू शकतील, असे असले तरी त्यांच्या करता लहान गोष्टी घेतो. सगळ्या बाबतीत असे म्हणता येणार नाही पण कधीतरी न्यूटन कुठूतरी हसत असेल. असे न्यूटन हे घरोघरी असतातच. लहानांना आणि मोठ्यांना हि न्यूटन ची बिरुदावली लावली जाते.

साधारण पणे घराचा पुरुष वर्ग ह्या बाबतीत स्त्रियां कडून भूषविला जातो. घरी जर इंजिनीअर असले तर, हे प्रमाण अधिकच असते. कंपनी मध्ये ज्या व्यक्ती मोठ्या पदांवर कामे करत असल्या तरी घरी मात्र जी गृहिणी असेल तिच्या कडून, एव्हढे साधे काम पण कसे अवघड करून ठेवतात असे बोलताना मनात, आणि हमखास मैत्रिणी बरोबर हे म्हणजे अगदी न्यूटन आहेत, असे नक्कीच बोलतात. मग तिच्या घराचा न्यूटन पण बोलण्यात कधीच ओढला जातो.

ह्या न्यूटन ची परंपरा आजी च्या पिढी पासून चालत आलेली असावी, कारण आजोबांच्या फजित्या सांगताना, आजोबांचा न्यूटन म्हातारपणी पण तरुण भासे. कधीतरी आईला गप्पा करण्याचा किंवा खट्याळ पण करण्याचा मूड आला तर बाबांचा किस्सा ऐकताना आम्ही मुले पण रमून जायचो. जणू काही रक्तातला गुणधर्म असल्यासारखा हा न्यूटन प्रत्येकाच्या आयुष्यात डोकावून जातो.

जेंव्हा मुलाला शाळेत न्यूटन शिकवला गेला पण नसतो त्या काळात त्याला हा, न्यूटन होईल असेच वाटते अशी कोणीतरी सहज गंमत करून जाते. ज्या ठिकाणी डोके चालवून युक्तीने काम करावयाचे असते तेथे हा न्यूटन फजिती झाल्यास सगळ्यांना हसवतो. जगमान्य हा शास्त्रज्ञ मूर्खपणा पण हसत पचवतो आणि पुन्हा ह्यातून काहीतरी शिका असा नकळत संदेश देऊन जातो.

ह्या न्यूटन चा परिवार हा इंजीनियर पुरता सीमित राहिलेला नाही तर तो काळाच्या ओघात सर्व शिक्षणात पसरला. काय तुम्ही वकील हो, तुम्हाला कधी फसवले हे कळले पण नाही, अशा युक्तिवादापुढे हा वकील घरच्या कोर्टात हरतो. डॉक्टर ला मुलांच्या पोटातील कळ हे चाचपडून पहावी लागते पण, आईला ती खाण्यामुळे झाली का? किंवा अभ्यासामुळे आली का हे पटकन समजते. अशा दुखण्याने घरातील डॉक्टर हतबल होतो. लबाडी, मूर्खपणा, फसणे ह्या नकारात्मक घटना सकारात्मक कशा घ्याव्यात हे शेवट हसण्यात करून न्यूटन पण खुश होतो.

गुरुत्वाकर्षणाचा आकर्षित करण्याचा नियम, हा मानवी जीवनात पण फजितीला हसण्याकडे आकर्षित करतो. एकदा न्यूटन हि बिरुदी चिकटली कि, कायम कुठलीही गोष्ट करण्यास घेतली कि, सतर्क राहण्यास भाग पाडते आणि पूर्ण व्यवधानाने काम होऊन मन आणि बुद्धी ह्यांची फारकत होण्याचे टळले जाते. उत्तेजन जसे मिळते तशी न्यूटन ह्या नामांकनाची चीड पण कायम तयार होण्याची भीती पण मनाच्या कोपऱ्यात ठाण मांडून बसलेली असते. मुलां पुढे न्यूटन अशा पद्धतीने समोर आणू नका. न्यूटन च्या आयुष्यात ह्या मांजरी मुळे किती प्रवाद निर्माण झाले असतील हे त्यालाच माहिती असेल पण आपले मन मांजरी सारखे न्यूटन च्या गोष्टी मुळे होऊ शकते.

न्यूटन हा पुरुष वर्गाला सहज संबोधला जातो. पण स्त्रिया करता अशी ‘न्यूटनि’ ऐकिवात नाही. स्त्रियांना एकावेळी अनेक व्यवधाने हुशारीने पार पडण्याचे जन्मतःच कौशल्य प्राप्त असते. शक्ती पेक्षा युक्तीच्या बाबतीत ती निसर्गतःच अग्रसेर आहे. तरीही तिला, एव्हढे साधे पण कळले नाही असे ऐकायला लागते. कारण समाजातला न्यूटन हा स्वतःचा इगो सांभाळत असतो.

पुरुष आणि स्त्री ह्यांच्यात कोण न्यूटन आहे हे महत्वाचे नाही तर आपल्यातला न्यूटन, आपल्या मनातला न्यूटन, हा वरकरणी हास्यास्पद कोट्या करून हसवत हसला तरी, नकारात्मक घटनांना सकारात्मक करून घेण्याचे मन तयार करायला मदत करतो. मांजरी आणि न्यूटन ची हि घटना पूर्ण संदर्भ सहित मुलांना सांगा कारण त्यांच्यातला न्यूटन हा सशक्त मनाच्या बांधणी करता खूप गरजेचा आहे. न्यूटन च्या मृत्यू नंतर हि हा असा न्यूटन कालांतरित अबाधित राहून जीवनाचे आकर्षण कायम ठेवेल.

.

6 प्रतिक्रिया (+add yours?)

  1. ravindra
    डिसेंबर 06, 2010 @ 20:38:02

    हे मात्र खरे आहे कि बाहेर इंजिनिअर असलेला मनुष्य घरी …….

    उत्तर

    • Anukshre
      डिसेंबर 06, 2010 @ 21:32:35

      रविन्द्र्जी,
      हे मात्र माझ्या घरासारखेच….. आणि घरोघरचेच असावे असे वाटले म्हणून तर पोस्टले. मनापासून दाद दिलीत म्हणून खूप बरे वाटले.

      उत्तर

  2. विद्याधर
    डिसेंबर 12, 2010 @ 21:27:32

    मस्त लिहिलंयस गं ताई!

    उत्तर

    • Anukshre
      डिसेंबर 12, 2010 @ 21:47:21

      अरे व्वा, विद्याधर… भारतात खूप खूप स्वागत!! माझी भेट होणार नाही पण, जाताना मस्कत करून जातोस…. तुझी प्रतिक्रिया नव्हती म्हणून विचारात पडले होते कि बरे लिहिले आहे का नाही? मस्त वाटले, सुट्टी करता खूप खूप धम्माल कर, काही बातमी असेल तर कळव बाबा.

      उत्तर

  3. देवेंद्र चुरी
    डिसेंबर 20, 2010 @ 11:27:46

    >>>आपल्या मनातला न्यूटन, हा वरकरणी हास्यास्पद कोट्या करून हसवत हसला तरी, नकारात्मक घटनांना सकारात्मक करून घेण्याचे मन तयार करायला मदत करतो.

    छान पोस्ट,आवडली …

    उत्तर

    • Anukshre
      डिसेंबर 20, 2010 @ 15:34:13

      देवेन,
      छान वाटल तुला इथे पाहून..बऱ्याच दिवसांनी आलास!!! आभारी म्हटले तर तुला आवडत नाही…. न्युटन आवडला… मस्त वाटले, भेटूच असे.

      उत्तर

यावर आपले मत नोंदवा