हॉटेल राजधानी, भारतभर आणि परदेशात हि त्यांच्या शाखा आहेत. पूर्णतः शाकाहारी गुजराथी आणि राजस्थानी थाळी हे जेवणाचे वैशिष्ट्य. अत्यंत अदबशीर, हसतमुख कर्मचारी वर्ग आणि सुबक पद्धतीने जेवणाचे पदार्थ अर्धगोलाकार थाळीत वाढले जातात. थाळीत एकंदरीत बत्तीस प्रकारचे विविध पदार्थ जेवणाची रंगत वाढवतात.
अनेक मानांकने, पुरस्कार राजधानीला प्राप्त आहेत. भारत आणि परदेशात जेव्हढ्या शाखा आहेत तिथले मेनू हे एकाच पद्धतीचे आणि सतत बदलत राहणारे असले तरी पदार्थ सगळीकडे सारखेच असतात. आतापर्यंत २२,४६४ पदार्थ, बहात्तर मेनूमधून जगभर राजधानीत देण्यात आले आहेत.
मस्कत मध्ये साधारण पणे दीड वर्षापूर्वी राजधानीने आपली शाखा उघडली. अडीचशे ते तीनशे थाळी रोजची आणि गुरवार, शुक्रवारी तर चारशे च्या वरती ह्या थाळीचा आस्वाद मस्कतीय घेतात. पूर्ण थाळी किंवा छोटासा मिल बॉक्स सुद्धा घरी, ऑफिस मध्ये पाठविला जातो. अशा छान रेस्टॉरंट मुळे इथेही परदेशी पर्यटक भारताची शाही जेवणाची लज्जत घेण्यासाठी गर्दी करतात. अनेक नामवंत व्यक्तीनी इथे आवर्जून भेट दिली आहे. सणावारी किंवा सप्ताहाच्या सुट्टीला वेटर चा दंगा, आवाज, गलका नसलेले हे रेस्टॉरंट जणू काही ‘वदनी कवळ घेता……,ची प्रचीती देते.
आपले आगमन झाल्यावर हसत मुख कर्मचारी वर्ग अदबीने समोर येतो. प्रवेश दारापाशी ठेवलेल्या फुलांची आरास स्वागत पण सुगंधी करते. जेवण करण्याआधी, हात धुण्यासाठी पण राजेशाही थाट आहे. चकचकीत अशा पितळी सुरईतून उबदार पाण्याची धार आपल्या हातावर सोडण्यात येते. हात धूत असताना पाणी तबक सदृश भांड्यात आपल्या अंगावर न उडता गोळा होते. हात पण कसा राजधानीच्या डामडौलात धुतला जातो. पाण्याला पण सुगंधित केलेले असते.
जेवणात थेपला, छोटीशी भाकरी, फुलका, रोटला, पुरी आणि त्यावर अलगद विरघळणारे लोणी, अनेक प्रकारची फरसाण, विविध भाज्या, कोशिंबीरी, डाळ, कढी, खिचडी, साधा भात, दहीवडे,पॅटीस आणि मधुर चवीचे थंडगार ताक असा परिपूर्ण जेवणाचा छानसा मेनू खूप दिवस जिभेवर रेंगाळत राहतो. एव्हढे पदार्थ वाढताना आणि आपल्या थाळीतलं जे काही संपत ते नेमके एका मिनिटात आपल्या समोर पुन्हा वाढण्यासाठी अदबीने हजर केल जात. आपण तर काहीही सांगितले नाही आणि कोणाचा आवाज हि ऐकला नाही मग असे कसे काय एकदम आले. असा विचार करताना आजूबाजूला पहिले तर रेस्टॉरंट मध्ये आवाजच नव्हता. जो तो आपल्यात किंवा आपल्या कुटुंबात, मित्र मैत्रिणीत रमला होता, तेव्हढाच आवाज होता.
जागोजागी वेटर उभे असूनही तत्परतेने नेमके पदार्थ जात येत होते. टेबलाच्या भोवती वेटर ना कोणीतरी व्यक्ती काहीतरी बोटाच्या, हाताच्या खाणाखुणा करत सर्व ठिकाणी फिरत होती. ह्या खुणा म्हणजेच न बोलणारे, आपल्याला चटकन पदार्थ आणून देणारी राजधानीची खासियत आहे. हि प्रमुख व्यक्ती इथली कप्तान असते. ह्या व्यक्तीने टेबल पासून विशिष्ट अंतर ठेवून, जेवण करत असणाऱ्या व्यक्तीची समाधी भंग न करता वाढपी लोकांना अचूक संपलेले पदार्थ सांगणे हे अथीति देवो भव……….असेच वाटते. पदार्थ वाढताना वाढपी हातात प्लास्टिक चे ग्लोज घालतात. पदार्थ अत्यंत स्वछतेत बनविले जातात
उजव्या हाताचे पहिले बोट तिरके ठेवून चक्राकार पद्धतीने फिरवले कि चटणी. अंगठा दुमडून चार बोटे सरळ धरली कि भाजी, अंगठा दुमडून तर्जनी आणि मधले बोट दाखवले कि खिचडी किंवा पुलाव, पहिले बोट सरळ धरून मागे पुढे फिरवले कि साधा भात. चारी बोटे दुमडून अंगठा खाली झुकवला कि फिल्टर थंड पाणी, अंगठा मागे वळवला कि सामान्य तापमानाचे पाणी, अंगठा तिरका धरला कि मिनरल पाणी, तर्जनी आणि अंगठा जुळवून तीन बोटे सरळ ठेवली कि बिल, अंगठा झुकवून पहिल्या बोटाने वाकुली दाखवणे म्हणजे गोडाचे वाढप आणा, पाचही बोटांचा वर्तुळाकार आकार म्हणजे दही वाटी, पहिल्या बोटाचे फक्त पहिले पेर दाखवणे म्हणजे ग्राहकाला इथल्या टेबलवर तूप अजून वाढणे, अशा अनेक खाणाखुणा अत्यंत शिस्तीने रेस्टॉरंट चा कप्तान वाढप्यांना करत असतो.
स्वागत ते निरोप अशा बोटांच्या भाषेत बघताना काहीसे वेगळे पण जपले आहे हे जाणवते. तब्बल चाळीस च्या वर त्यांची कोड लँग्वेज आहे. अशा रेस्टॉरंट मध्ये नोकरी करायची झाल्यास हा अभ्यास करणे आवश्यक आहे. वाढपी लोकांचे कप्तान खाणाखुणांची उजळणी कायम घेत असतात.
हा खाणा खुणांचा तक्ता अभ्यासून त्या प्रमाणे जेवणासाठी आलेल्या ग्राहका पर्यंत तत्परतेने तो पदार्थ मिनिटात आणून देणे हे खरच कौशल्याचे काम आहे. जेवताना एखादी व्यक्ती कुठला पदार्थ तन्मयतेने समाधानाने पटकन संपवते हे लक्षात घेवून त्याप्रमाणे जर तोच पदार्थ अजून घ्यावा हा विचार मनात येतोच तोच पदार्थ हजर. मन कवडे खवय्ये यांना तर पर्वणीच असते.
इतके खुश झाल्यावर जर उत्तम सेवा ह्या साठी जर टीप देण्याची झाल्यास ती तिथल्या पेटीत जमा केली जाते. अदबशीर आणि हसत मुख स्टाफ लक्षात राहतो. इथला कर्मचारी वर्ग हा विविध भाषांमध्ये पारंगत आहे. मस्कत ची भाषा अरेबिक, फ्रेंच, सारख्या परदेशी भाषांबरोबर मराठी, मल्याळी, कन्नड, पंजाबी अशा भाषा इथले कप्तान सहज बोलतात. जेवणाची लज्जत हि भाषा माध्यमे अधिक वाढवतात. राजधानीचे हे अप्रूप अनुभवत लज्जतदार राजस्थानी, गुजराथी जेवण घेण्यास गर्दी वाढतच आहे.
मस्कत मध्ये MBD, OPP. KHIMAJI RAMDAS, BAIT AL AHLAM, RUWI.
TELE…..24811888. असा पत्ता राजधानी रेस्टॉरंट चा आहे.
राजधानी…. एक खानदानी परंपरा. मस्कत मध्ये भारताची परंपरा दिमाखाने जपत आहे.
खास आभार…..मस्कत च्या राजधानीचा कर्मचारी वर्ग. धन्यवाद.