ढ……ढ……..ढगांचा

बाराखडीच्या ओळीत येणारा ‘ ढ’…… हा वर्गातील ‘ढ’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुलाचा पण असतो हे कळण्याचे ते बोबडे वय नसते. आईने दाखवलेला ढ……..म्हणजे ढगाचा. आकाशात खूप दूर असणाऱ्या ढगाचा. आई, इतक्या दूरचे दाखवते कि, बाळाचा ढगा कडे बघताना ‘आ’ होतो आणि हातातला घास भरवला जातो. ‘ढ’ शब्द तसा लिहिण्यास सोप्पा आणि जेंव्हा चित्रकला सुरवात होते तेंव्हा तर ढगाचे चित्र ढगा सारखा कापूस बोळा घेऊन कागदावर धबाधब ढग काढणे सुरु होते. मग हात कालांतराने स्थिर होतो आणि आडव्या रेषेवरचे गोल गोल काढलेले ढग पानभर हसू लागतात. त्यांनाच चेहरे काढण्याचे शिकवले जाते आणि खेळ सुरु होतो ढगातून आकार शोधून काढण्याचा हा एक उद्योगच होतो.

ढग कसा निर्माण होतो हे शाळेत हळू हळू कळते. प्रत्येक आवडीला स्वःताचे एक वय असते. कुठल्या तरी वयात ढग बघण्याचे वेड लागते. नकळत गच्चीत, ग्यालरीत जाणे झाले तरी आकाशाकडे एक नजर टाकली जाते. अचानक भावंडाची हाकारी सुरु होते, लवकर या आणि बघा काय अफलातून आकार तयार झाला आहे. कधी ससा, तर कधी राक्षस, पऱ्या, पक्षी अशी विविध मनोरूपे ढगात दिसू लागतात.

बालपणीच्या राज्यात ढगात परी असते, देवबाप्पा तर ढगात असतो. चांदोमामा आणि ढग यांचा पाठशिवणीचा खेळ तर भल्या भल्या लोकांना सुद्धा मोहवितो. कधी एखादी सुरेल तान चंद्राचे ढगातून डोकावणे प्रेम व्यक्त करते तर, कधी तान्हुल्याला आनंदित करते. ‘कभी तनहाहियो मे हमारी याद आयेगी’…असे ढगातून नटी पृथ्वीकडे पाहते तेंव्हा ढग पण व्याकूळ दिसतो.

ढगाचा खेळ हा मनाच्या अनेक प्रक्रियांचा आलेख आहे. एखाद्याला एखादा आकार दिसला तर तोच शेजारी असलेल्याला दिसेल याची खात्री नाही. कधी ढग उडणारा पक्षी वाटतो तर तोच ढग क्षणात अक्राळविक्राळ रूप धारण करतो. या मध्ये सुद्धा पांढरा ढग हा छान आकार दाखवतो तर काळा ढग हा चंद्राला गोरे करतो आणि सूर्याला झाकून टाकतो. मन पण असेच काळे गोरे होते. संध्याकाळचे ढग तर सूर्यास्ताची मजा काही और करतात.

ह्या ढगांची तुलना आपण आपल्याबरोबर केली. ढगात गेला…..ढगासारखा दिसतोयस……..ढगात नेतो काय?…….ढगात जाऊन बैस…… ढगात तरंगू नकोस ह्नं…….ढगोब्बा आणि अग्गबाई!!!! ढग्गुबाई!!!!…….. ढगात वार करू नकोस…. ढगासारखे कपडे का आहेत….पोटात ढगासारखे गुडगुडते…. असे आणखी बरेच काही. मित्रांच्या यादीत एखादा तरी ‘ढग्या’ असतोच. तर मैत्रीणीत एक तरी अगदी ‘ढग्गुबाई’ असतेच. मोठ्यांची मजा मोठ्यांना आणि लहानपणाला मात्र ढग्गुबाई चे गीत ताल धरायला लावते. आहे? कि नाही? ह्या ढगांचे आणि आपले नाते.

काही दिवसापूर्वी मी भारतातून मस्कत ला परत आले. दरवर्षी पावसाळ्यात जाणे आणि येणे त्या मुळे ढगांच्या वरून विमान गेलेले कळत नाही पण ह्या वेळी मात्र मी विमानाच्या खिडकीतून खाली असलेले ढग मनसोक्त पहिले. ढगांच्या दुलईत उतरून गुढगाभर पाय रोवून चालावेसे वाटले. खाली डोकावून मला ढग दाखवणारी माझ्या घराची ग्यालरी शोधावी असे काहीसे झाले होते. जमिनीवर पावसाळी वातावरणात ढगातून खाली येणारे इंद्रधनुष्य मला ढगात आई कडे नेणारा जिना वाटतो.

मनाची पण गम्मत ढगासारखी आहे, कधी गोरी परीसारखी तर कधी काळ्याकुट्ट ढगांसारखी. हेच काळे ढग पाहून मात्र मोर आणि बळीराजा सुखावतो. कोणाला हे ढग दिलासा देत असतात तर कोणाला वादळाची भीती घालतात. ढगांचे हे गूढ पण रम्य नाते भारतातच पाहण्यास मिळते. वाळवंटात रात्री ढग हे कोरडे वाटतात आणि दिवसा उन्हामुळे हे दिसेनासे होतात.समुद्र किनाऱ्यावरून, किल्ल्यावरून आणि शेतातून शेतकऱ्याने ढग धुंडाळणे हे जावे त्या ढगांच्या गावा तेंव्हाच कळते.

ढगा मधला चंद्र ईद ला व्याकूळ करतो तर ढग दूर झालेला आणि दिसलेला चंद्र हा पती दर्शनाचे पुण्य विवाहितेला देतो. धार्मिक बाबतीत पण मौल्यवान असणाऱ्या चंद्राला ढगाला दूर होण्याची विनंती तर करावी लागत नसेल. असा हा ढग आयुष्याच्या कुठल्या तरी आकाशात दिसत असतो. ढग जेंव्हा विहार करतात तेंव्हा ते रिकाम्या पोटी असतील तर मनोरम्य वाटतात. मात्र काळ्याकुट्ट ढगांचे पाणी ओतप्रत भरून एकमेकांवर आपटणे हे विजेची ललकारी देते. कधी कधी हाच ढग फुटून हाःहाकार करतो. अनेकांचे प्राण घेतो, होत्याचे नव्हते करतो.

ढगांचे प्रकार भूगोलात शिकण्यास मिळतात. ढगांचे वर्गीकरण वातावरणाच्या टप्प्यानुसार केले जाते. शास्त्र विषयात सुद्धा फार मोठा व्यापक अभ्यास ढगांचा आहे. ढगांचा अभ्यास हा प्रकाश, हवा आणि तापमान ह्या घटकांशी जोडलेला आहे. प्रत्येकाचा मराठी शब्द नीटसा आठवत नाही म्हणून इंग्लिश मधील ढगांचे वर्गीकरण कल्पना यावी म्हणून देत आहे.

ढग न्याहाळणे हे प्रत्येकाने अनुभवलेले असतेच आणि हाच अनुभव आपल्याला मनातील विचारांचे ढग दूर करण्यास किंवा विचारांच्या ढगात नेमकेपणा बघण्यास शिकवतात.

ढगांचे आणि आपले नाते उलगडून दाखवण्यासाठी हे ढगू विचारांची हि पोस्ट आता मात्र ढगासारखी पसरू लागली आहे. तेंव्हा ढगांचा हा विहार येथेच थांबवते.