मरहब्बा… आपले स्वागत
पोर्तुगीज राजवटीला कळून चुकले होते कि, भारताच्या मसाल्याच्या व्यापाराकरता ओमान हे एक चांगले बंदर म्हणून उपयोगात येईल. पोर्तुगीज राजवटीच्या अमलाखाली ओमान होते. कालांतराने १६४६ मध्ये ब्रिटीश इस्ट इंडिया कंपनीने ओमान च्या संस्कृतीला आणि धर्माला जपले जाईल असे आश्वासन दिले आणि १८ नोहेंबर १६५० मध्ये ओमान स्वतःच्या हक्कासकट स्वतंत्र झाले. सद्य आदरणीय सुलतान ह्यांनी चाळीस वर्षापूर्वी ह्या दिनाची सुरवात केली आणि तेंव्हा राज्य कारभाराला सुरवात केली तेंव्हा पासून राष्ट्रीय दिन साजरा केला जातो. sultan, Qaboos बिन सैद यांचा १९ तारखेला येणारा वाढदिवस म्हणून पण हा दिवस या दुहेरी आनंदा करता राष्ट्रीय दिवस म्हणून साजरा केला जातो. हा दिवस म्हणजे एक सोहळा असतो आणि तो साधारण पणे महिना भर तरी चालतो.
रस्त्यांच्या दुतर्फा फुलांची झुडुपे लावून गालीच्या तयार करतात, रस्त्यावर आकर्षक अशी रोषणाई असते. अत्यंत नयनरम्य असे वातावरण असते. विविध स्पर्धांचे आयोजन केले जाते. राष्ट्रीय असा फटाक्यांच्या आतषबाजीचा पण आवाज विरहीत असा सोहळा रात्री उशिरा पर्यंत देशाच्या अनेक भागात आयोजित केला जातो. रस्त्याच्या दुतर्फा आणि अनेक ठिकाणी राजाचे म्हणजे सुलतान चे मोठे मोठे फोटो अत्यंत आदराने लावले जातात.
ओमान मध्ये सुलतान हे खूपच लोकप्रिय आहेत. बराचसा कारभार मंत्रीगण पाहतात. ओमान हा एक निसर्ग सौंदर्याने परिपूर्ण, स्वतःची संस्कृती, परंपरा असलेला देश आहे. इतर देशांच्या संकृतीचा आदर केला जातो. ओमान चा झेंडा आणि त्यावरचे रंग यांची आकर्षक अशी उत्पादने येथे मिळतात. पारंपारिक खेळ आणि आधुनिक खेळ यांचा सुरेख कार्यक्रम येथील वैशिष्ट्य आहे. बर्फाचे स्केटिंग येथे उपलब्ध आहे तसेच उंटाच्या शर्यती पण बघण्यासारख्या असतात .
अतिशय शांत, प्रदूषण विरहित आणि नयनरम्य असे ओमान अनेकांचे लाडके ठिकाण पर्यटनासाठी आहे. मस्कत मध्ये १८ नोव्हेंबर नावाचा स्ट्रीट पण आहे. तेल व्यवसाय हा प्रमुख आहे. येथे दुबई सारखी जीवघेणी स्पर्धा नाही. ओमान च्या नागरिकांसाठी येथे नोकरीत आणि व्यवसायासाठी खास आरक्षण आहे त्यामुळे घरचे बेकार अशी परिस्थिती येथे नाही. आज ओमान मध्ये ब्रिटन ची राणी भेट देण्यास येत आहे. ब्रिटन बरोबर ओमान चे व्यावसायिक संबंध आणि मैत्री खूपच सलोख्याची आहे.
येथील करन्सी रियाल आहे. ह्या वर्षी वीस रियाल च्या नोटेचा रंग पूर्वी लाल होता तो निळ्या रंगात बदलला. ओमान ने आपली स्वतःची अशी संस्कृती टिकवली आहेच आणि ती छान जपली पण आहे.
राष्ट्रीय दिनानिमित्त येथे सरकारी सुट्टी दिली जाते. येथे ह्या दिवसाची सुट्टी नंतर पण दिली जाते. गुरवार आणि शुक्रवार ह्या वीकांत च्या सुट्टी ला जोडून हि सुट्टी घेतली जाते. राजाने झेंडा फडकवण्याचे किंवा मिलिटरी ची परेड हि सामन्यांना पाहण्यास मिळत नाही. राष्ट्रीय गीत येथे जाहीरपणे ऐकवले जात नाही. विमान कौशल्य सर्वाना पाहण्यास मिळते ते पण तुम्ही समुद्र किनारी जाऊन बसायचे. प्रत्यक्ष त्या ठिकाणी कोणालाही जाता येत नाही. मिलिटरी चे जाहीर प्रदर्शन येथे नाही.
ओमान चे सर्वच देशांशी सौहार्द्य पूर्ण संबंध आहेत. मुळात अतिशय शांत वृत्ती येथील लोकांचा मूळ गाभा आहे. रस्त्यांच्या दुतर्फा अत्यंत योजना पूर्व दिव्यांच्या माळांचे आणि विविध आकाराचे नयनरम्य सजावट केली जाते. ह्या सजावटी करता प्रत्येक वर्षी एक थीम असते. ह्या वर्षी फुले आणि वाद्ये यांचा सुरेल सुवासिक मेळ विद्युत रोषणाईत दिसून येतो. विद्युत रोषणाई हि मोहक असते डोळ्यांना अजिबात दुखापत पोहचत नाही.
भारताशी तर फार पूर्वी पासून व्यापार उदीम चालत असे. बटाटा, बाबा, तवा, आंबा, असे अनेक शब्द भारत आणि ओमान च्या मैत्री चे द्योतक आहेत कारण इथे बरेचसे शब्द समान आहेत. भारताच्या संस्कृती बद्धल आदर आहे. येथे सर्व धर्मांची प्रार्थना स्थळे, मंदिरे वैगरे आहेत. निसर्गाने परिपूर्ण, शिक्षणाच्या आंतरराष्ट्रीय संस्था, शांत, काटेकोर सुरक्षा व्यवस्था, सर्वांच्या धर्माबद्धल आदर , ईत्यादी गुणांनी संपूर्ण असेलेले ओमान हे इथे येणाऱ्या सर्वांचे लाडके होते.
ओमान ने आपला चाळीसावा राष्ट्रीय दिन साजरा केला त्या बद्धल कर्मभूमी असल्याने माझे हि हे थोडेसे योगदान ओमान साठी….. आपल्या सर्वांसाठी.
शुक्रान…..धन्यवाद