रुखवत……आठवणी मनातल्या

‘रुखवत’ हा जिव्हाळ्याचा कोपरा सामन्यपणे प्रत्येक घरात मुलीचे लग्न ठरले कि चर्चिला जातो. मुलीच्या नकळतपणे तिच्या आईने कधीचीच रुखवताची मांडणी मनात केलेली असते. स्टील ची भांडी…कळशी, घागर, पिंप पासून ते अगदी वाटी चमच्या पर्यंत मांडावे ह्या साठी आईची घालमेल होते. कलाकुसरीच्या वस्तू तर फारच उत्सुकतेने सर्व पाहत असतात. आई कडून मुलीला हा कला कौशल्याचा वारसा आलेला असतो.

माय लेकी, मावशी, आत्या, काकू असा सगळा समस्त स्त्री परिवार जातीने लक्ष घालून हा कोपरा लग्न ठिकाणी छान सजवून ठेवतात. माझ्या आईने तिच्या रुखवतात आणलेले भिंतीवरचे चंदेरी टिकल्यांचे , पोटात गुबगुबीत कापूस घालून दोन ससे, काळ्या अशा कापडावर अजूनही दिमाखदार विराजमान आहेत. अशीच मोराची जोडी, हरणाची जोडी थोडक्यात काय पण मर्यादित शृंगाराच्या फ्रेम्स संसार कसा उत्फुल्ल सदा बहार करावा हे आईचे रहस्य कन्येला हळूच सांगत असाव्यात.

कोणे एके काळापासून हि रुखवताची पद्धत पिढ्यानपिढ्या आहे. मुलीला चपखलपणे संसाराची गुपिते सांगणारा हा कोपरा केंव्हाही व्याकूळ होतो. जेवणाच्या ताटाची मांडणी धाग्यात गुंफून सुरेख असे ताट लेकीला सणावाराला निश्चितच मार्गदर्शक असे असायचे. सप्तपदीची पाऊले तिला सात पावलात तुला तुझे घर कसे अलगद सांभाळायचे आहे असेच सूचित करते. आईचे कौशल्य मुलीत पण आहे हे सांगणारा हा कोपरा मांडण्यासाठी माहेर आणि तो उचलून नेण्याची जवाबदारी मात्र सासरची.

आता तर ह्या रुखवताची दुकाने सजली आहेत. नेट वर रुखवताचे भरमसाठ फोटो आहेत. आईच्या माहेरचा चंद्र, तेच ससे, हरणे, तिने विणलेला रुमाल मात्र मला सापडला नाही. बाजाराच्या वस्तू ‘पावला पासून ते डोली पर्यंत’ सर्व काही सहज उपलब्ध आहे. अजूनही बऱ्याच घरातून ह्या जुन्या काळच्या फ्रेम्स आहेत. त्यात त्या घरचा जिव्हाळा आहे. बाजारातून वस्तू आणून टेबल सजवणे खरच गरजेचे आहे का? ह्या गोष्टीत आईचा पैसा खर्च होतो. हल्लीच्या आधुनिक राहणीच्या संकल्पनेत ह्या कौतुकाच्या गोष्टी ठेवायला जागा आहे का?

माझ्या लग्नात रुखवत नव्हते. कारण मला कलाकुसरीची आवड नव्हती. आईने खूप शिकवायचा प्रयत्न केला. तिचे भरतकाम चे शिकवणी वर्ग घरात असायचे. सगळे जण माझ्या कडे पाहून म्हणायचे अरेवा!! तुमच्या मुलीला सर्व काही येत असेल, मला हि बोलणी असह्य व्हायची, याचा परिणाम म्हणजे मी ह्या पासून मनाने दूर दूर जाऊ लागले.

खेळात तरबेज होते अगदी पारितोषिके पण मिळवली. गणपतीचे, दिवाळीचे सर्व सणांचे डेकोरेशन उत्तम करत असे. शास्त्र, भूगोल विषयंची मॉडेल्स पण राज्य स्तरावर नावाजली जात होती. माझी प्रमाणपत्रे, फोटो लावून आपण माझ्या लग्नात असे रुखवत मांडूया. हीच रुखरुख आईच्या मनात कायम होती. माझे घर थाटल्यावर तिने मी एका फ्रेम मध्ये किंचित असा सहभाग घेतला होता ती फ्रेम कौतुकाने जावयाच्या हातात दिली.

मुलींचे लग्न ठरेपर्यंत त्या शिकत असतात. स्वयंपाक करणे ह्याला सुद्धा वेळ मिळत नाही तर कलाकुसर तर कोसो दूर कि बात…. मुलीला जात्याच आवड असेल तर, कदाचित छंद म्हणून कलागुण संपन्न अशी वाग्दत्त वधू म्हणून सज्ज होईल. पण हे प्रमाण सध्या च्या युगात फारच अल्प आहे.

संसाराचा रथ मुलगा मोठा झाल्याने जरा स्थिरावला आहे. स्वतःकरता वेळ मिळू लागला आहे. अचानक मला नेट वर शोधाशोधीत बरीच कलाकुसर पाहायला मिळाली. स्वतःचा अंदाज घेत एकेक करून पाहावे असा धाडसी विचार मी अमलात आणला. आई, मी भरतकाम, विणकाम ह्यात लक्ष देत नसे म्हणून कधीही माझ्यावर नाराज झाली नाही. मी नक्कीच करेन हा विश्वास तिला होता. नातेवाईक जरी काही म्हणायचे तरी ती लक्ष द्यायची नाही. मला नेहमी प्रोत्साहन द्यायची, म्हणायची अग, हरकत नाही हे सर्व करण्यास तुला संसारात नक्की कधीतरी वेळ मिळेल. कॉलेज मध्ये तुझी स्वतःची ओळख केलीस हे हि मला आवडते.

कागदाच्या लगद्यापासून मी पूर्वी मॉडेल्स बनवत होते तेच तंत्र वापरून मी फ्रेम्स करू लागले. इतरही माध्यमे मला खुणावू लागली, तांब्याच्या पत्रा. क़्विलिन्ग, पंच आर्ट, वाळू, तैल रंग वापरून माझी घोडदौड सुरु झाली. माझ्या सारख्या इथे बऱ्याच माझ्या मैत्रिणी आहेत त्यांना एकत्र केले. मुलांचे हिवाळी सुट्टीचे वर्ग सुरु केले. नागाच्या काही मूर्ती करून नागपंचमीस विकण्यास ठेवून त्याचा नफा समाजाकरता पाठवतो. काही एन जी ओ मार्फत आमची कलाकुसर इथल्या मुलांना पण शिकवतो. आम्हा मैत्रिणींचा वेळ असा सत्कारणी व्यतीत होतो.

आईची इच्छा, माझे घरकुल सजलेले असावे, तेही माझ्या मेहनतीने काही अंशी तरी फलद्रूप झाले. आईला मांडू न दिलेले रुखवत, माझी कला, सुप्त राहिलेली आवड आज दिमाखदार पणे घराच्या आनंदात सामील आहे. अजिंक्य व धनंजय च्या प्रोत्साहना मुळे मी कला विश्वात रमले….

मनातले रुखवत मलाच सापडले..

(माझ्या कलाकुसरी करता ज्या साईट वरून कल्पना घेतल्या, त्या सर्व कलाकारांचे जाहीर आभार….राजस्थानी स्त्री कागदाचा लगदा वापरून तयार केली. फुलदाणी आणि फुले हि कणकेने तयार केले, मासे हे क्विलिंग ने तयार झाले. आणि फ्रेम हि तांब्याच्या पत्र्याने तयार केली. अजून हि अनेक माध्यमात मी काही कलाकृती तयार करण्याचा प्रयत्न करत आहे. आपणाला आवडल्या असतील तर जरूर कळवा…. )

17 प्रतिक्रिया (+add yours?)

  1. vikram
    ऑक्टोबर 09, 2010 @ 18:40:07

    ग्रामीण भागात हि पद्धत खूप हौसेने केली जाते परंतु शहरी भागात आजकाल सगळच रेडीमेड लागत अगदी ‘रुखवत’हि

    उत्तर

    • anukshre
      ऑक्टोबर 09, 2010 @ 18:45:53

      अगदी खरय, शहरी भागात सगळाच दिखावाच जास्त झालाय…. अशा रुखवत मांडण्याला काय अर्थ आहे?? सगळ्या गोष्टी म्हणत नाही कि वधू ने केलेल्या असाव्यावत पण…बाजारी वस्तूंचा
      भरणा…. पूर्वीचे दिवस आठवणीत राहिले.

      उत्तर

  2. आका
    ऑक्टोबर 09, 2010 @ 22:04:24

    हिने तर अझुन सगळं रुखवताच ठेवलेलं आहे… 😉
    माहेरची सुपारीही सोडत नाही ही…

    उत्तर

  3. देवेंद्र चुरी
    ऑक्टोबर 12, 2010 @ 00:01:35

    हो विक्रम आजकाल पुर्ण पॅकेजच विकत मिळते रुखवतीच…रेडीमेड असो वा घरी तयार केलेल पण छान वाटते बघायला ती सजावट.ही कला अशीच जोपास ग…शुभेच्छा..

    उत्तर

    • anukshre
      ऑक्टोबर 12, 2010 @ 08:10:36

      बरोबर बोललास देवेंद्र… तुमची पिढी लग्नाकरता सज्ज आहे, अशा वेळी भावी पत्नीला तिच्या करिअर किंवा काही कारणा मुळे जर हि कला जोपासता आली नसेल तर… नंतर जरूर प्रोत्साहन देऊन सहकार्य करा. हेच तर मला म्हणायचे होते. छान वाटते अशा गोष्टी पाहायला पण लग्नानंतर पण असे सहकार्य मिळाले तर कलेला वय नाही….. मी केलेल्या फ्रेम्स आवडल्या कि नाही?? ते तर कळवले नाहीस..

      उत्तर

  4. सुहास
    ऑक्टोबर 12, 2010 @ 09:59:43

    मस्त ह्या रुखवताची ओढ त्या मुलीला असण स्वाभाविकच आहे म्हणा..माहेरच्या सगळ्या आठवणींच छोट प्रतिरुप म्हणता येईल ह्याला नाही, तायडे? 🙂

    उत्तर

    • anukshre
      ऑक्टोबर 12, 2010 @ 10:06:23

      होय रे!!! लग्नाच्या मांडवात तुम्ही तयार आहात, माझ्या वाहिनीला, तिच्या माहेरच्या गोष्टीना कसे जपायचे, हे तर सांगण्याचा हा आटापिटा…सर्व लग्नाळू भाऊ…बहिणीसाठी. एक आठवण.

      उत्तर

  5. विद्याधर
    ऑक्टोबर 12, 2010 @ 11:02:26

    >>माहेरच्या सगळ्या आठवणींच छोट प्रतिरुप म्हणता येईल ह्याला नाही, तायडे?
    हेच म्हणायचं होतं मला! 🙂

    उत्तर

    • anukshre
      ऑक्टोबर 12, 2010 @ 16:58:42

      विद्याधर,
      पटलं रे बाबा तुझ एकदम!!! लग्न झाल्यावर रुखवत पाहिलेस कि येईलच ताई ची आठवण….दुवा मिळवती आहे रे मी माझ्या येणाऱ्या वाहिनीची.

      उत्तर

  6. सुरेश पेठे
    ऑक्टोबर 13, 2010 @ 14:16:32

    व्वा सुरेख काम आहे, पण मला आवडले फुलांचा गुच्छ व मासे !

    रुखवत हा खरंच माझ्या अगदि अत्यंत जिव्हाळ्याचा विषय ! त्यात मला कलाकुसरीची व हस्त व्यवसायाची प्रथम पासून आवड त्यामुळे ह्या बायकी उलाढालीत माझी नेहमीच लुडबुड असायची व चालायची पण ! विशेषत: साखरेच्या वस्तू, गोळ्यां-चॉकलेटचे बंगले, बिस्कीटाच्या वस्तू हे तर फायद्याचे आयटेम ! तूट फूट गट्टम !!

    आजही कुठल्याही समारंभाला गेलो की मी प्रथम भेट देतॊ व रमतो रुखवत मांडलेल्या जागी !

    फोटॊ जरा अजून शार्प हवेत.

    उत्तर

    • anukshre
      ऑक्टोबर 14, 2010 @ 12:09:58

      काका,
      फोटो अद्यावत करून शार्प करण्याचा प्रयत्न केला आहे. सध्या एक म्युरल करावयास घेतले आहे, ऑर्डर आहे त्यामुळे पूर्ण झाले कि तुम्हाला मेल फोटो पाठवते. प्रयत्न करते, इथे बहुतेकांना आवडते आणि मला ऑर्डर देतात , जमेल तसे पूर्ण करते. आपल्याकडून हि प्रेरणा मिळाली. आपल्याला भेटले आणि मलाही जन्मजात हे गुण आहेत कि नाहीत हे माहीतही नव्हते पण जिद्दीने करण्यास घेतले. आपल्याला वंदन, नकळतपणे आपण माझे गुरु आहात. आपण केलेल्या कौतुकामुळे अजून उत्साह वाढला… अनेक आभार काका.

      उत्तर

  7. apurva gadhaokar
    मे 09, 2011 @ 15:02:34

    your work is very nice.

    उत्तर

  8. SANDEEP PRAKASH PARANJPE
    फेब्रुवारी 06, 2012 @ 14:15:05

    मी बनवलेले लग्नाचे रुखवत स्वतः हातानी बनवले आहे FACEBOOK वर अपलोड केले आहे

    उत्तर

  9. suhasini sagare
    जून 07, 2012 @ 14:25:57

    mala karayala awadhata pan kai juna vastuna navin akar deta yato please mala kalwa

    उत्तर

  10. Lalit
    जानेवारी 16, 2013 @ 15:50:54

    khup chaan, me saddhya aamchya friend chya lagnaach’a rukhvat banavnyaach’a kaam haati ghetlay, lagn’a tas’a next month madhye aahe, pan aata pasun milel tyanusar vel det aahot..
    uprokt’a notes mule baryach kalpana manaat ghar karun rahilya aahet..
    tyamule aaple aabhar maanto….

    उत्तर

Leave a reply to Lalit उत्तर रद्द करा.