Which मोदक you like moooooossst——मोदक ललित

Which one you like moooooossst——I enjoyed both. मोदक बाप्पा करिता, हा प्रसाद हवाच, हं, पण तो कसा आपल्या घराची परंपरा राखणारा, आम्ही फक्त उकडीचेच मोदक करतो, कोकणातले नं आम्ही, आंम्ही तळणीचे करतो, आंम्ही देशावरचे राहणारे…. ह्या गप्पांना स्त्री आणि पुरुष ह्यांच्यात भेदभाव न बाळगता, मोदक कुठला करतो ह्या बद्धल हिरहिरीने बोलणे होते. जशी मध्य रेल्वे आणि पश्चिम रेल्वे ह्यांच्यातील वाद न संपणारा आहे अगदी तसेच.

उकडीवाले म्हणतात, कसे मऊ लुसलुशीत, कळीदार, पांढरे शुभ्र, तुपाच्या धारे बरोबर जिभेवर रेंगाळत, तोंडभर पसरत अगदी रसपूर्ण खावे असे असतात. तळणीवाले म्हणतात, खुसखुशीत तुपात तळलेले, खमंग सारणाचे असतात. मग ह्यात अंतर्गत बाबींचे खूप मुद्दे असतात. मोदकाला कळ्या कित्ती, त्याचा आकार कसा सुटसुटीत, देखणेपणा कसा…..कोणाचा अधिक वैगरे वैगरे..आणि पहावे तर कोकणप्रांत मंडळी आणि देशावरची मंडळी दोन्हीही मोदकांचा भरपूर आस्वाद घेतात.. ह्यालाच म्हणतात, बोलायचे मोदक आणि खाण्याचे मोदक.. दोन्हीही प्रकारचे मोदक खाण्यासाठीच तर बाप्पा आलाय नां!!!!!!!! आत्ता तर चौकलेट मोदक, पनीर मोदक, श्रीखंड मोदक खूप प्रकार बाजारात ठाण मांडून व्यवस्थित विकले जाऊन सर्वांना आनंद देतात,, तरीही हा मोदक प्रकार घरचा तो घराचा आणि जिव्हाळ्याचा.

मोदक तयार होताना घरभर पसरलेला सुगंध हा उकडीचे आणि तळणीचा असा भेदभाव न करता सर्वांना प्रसन्न करतोच. उकड करून चाळणीवर वाफेला गेले की, आपोआप जिभेवर पाणी सुटते, तळताना तुपाचा खमंग सुवास आला की, चटकन नकळत खुसखशीत पारी कधी फोडतो असे होते. हं, सारण पण नारळाचे हवे, नारळ खावला कसा गेला आहे ह्या वर त्याचा रसदार पणा बराचसा अवलंबून असतो. सारण तुपात परतत असताना, त्यात गुळ आणि वेलची पूड पडली की, अह्हा!!!!! गणपती बाप्पा मोरया!!!!!!

काही ठिकाणी मात्र पुरणाचे मोदक असतात, अहो!!!! कुठले का असेना!!!! खाणे आपले काम. कोकण काय किंवा देशावरचे काय भेदभाव मी तरी नाही करू शकत…. तुम्हीही दहा दिवसात जेव्हढे विविध प्रकारचे मोदक अवश्य खाऊन घ्या , मोदकांचा आस्वाद तो मोदकांचा आस्वाद त्यात डावे, उजवे नाहीच बर का!!!!

संपवते माझे मोदक ललित…. लिखाण मात्र आवडले का ते जरूर कळवा. मोदकांच्या गणपती बाप्पा मोरया!!!

हरतालिका पूजन…..मिळूनी साऱ्या जणी.


सखी पार्वतीच्या आगमनाची वाट पहाते. हातावर सुरेख रेखीयेली मेहंदी, झोपाळ्याचे मस्त झोके, साऱ्या मैत्रिणी मिळूनी शिव शंकराची केलेली पत्री पूजा… आई म्हणत असे लेकीनो, पूजा छान करा बर का…. चांगला नवरा मिळतो, मग आमचे साऱ्या जणींचे खुसुखुसू हसणे, नवीन ड्रेस, भावाला मनसोक्त पूजेच्या जागेवर बसून पूजेकरिता , मदती करिता दिलेले हुकुम, त्याचे घरातून वैतागून निघून जाणे, पण हळूच प्रसादासाठी येणे..
प्रसादा साठी केलेल्या खुसखुशीत करंज्या, लाडू सारे कसे फस्त करायचे, आई च्या पदराला हात पुसत खेळण्यासाठी धुम्म ठोकायची, बाहेर पडताना त्या दोघींकडे पटकन डोकावून पहायचे आणि आई च्या हाकेसरशी घरात धपकन येऊन आदळायचे, भावाकडे पाहत, आईच्या दटावणीत नैवैद्य जेवण डोळ्यावर आले की, आईच्या दुलईत जाऊन मस्त पैकी ताणून झोपणे सार सार काही आठवते ह्या दोघींना पहिले की…..
दुसऱ्या दिवशी बाबांची आणि भावाची गणपती पूजेची लगबग असायची, तेंव्हा भाऊ आदल्या दिवशी आम्ही साऱ्या जणींनी त्याला खूप कामाला लावले म्हणून उट्टे काढणार हे ठरलेले असायचे, आदला दिवस सखी पार्वतीचा आमच्या हक्काचा म्हणूनच आठवणींचा माहेरचा झोका सखी पार्वतीचा नेहमी उंच असतो.

आम्ही हरतालिकेची फुले, आणि पत्री गोळा करीत हरतालिकेच्या आदल्या दिवशी अख्ख्या गल्लीत, वाड्यांमधून, गल्ली बोळातून फिरायचो, तेंव्हाही साऱ्या जणी मिळूनी जायचो. कोणी तरी काकू स्वताहून पत्री आणि फुले तोडून घेऊन जा असे म्हणायची, पण न विचारता हरतालिकेची पत्री घेतली तरी कोणी रागवायचे नाही. कारण एकच असावे, प्रत्येक लेकीला चांगला नवरा मिळावा म्हणून प्रत्येक घरातील आई, आजी पत्री नेण्याकडे कानाडोळा करीत असावी. मजा यायची कारण मिळूनी साऱ्या जणी…

नंतर ह्याच सख्या आणि पार्वती लग्नाच्या आधी आम्हांला गौरी हार पूजनाला भेटते आणि हळूच म्हणते, लबाडे, छान केली होतीस, लहानपणी पूजा शिव शंकर मिळावा म्हणून….आणि आम्ही सखीला मागे ठेवून पार्वती प्रमाणे माहेरचा उंबरा ओलांडतो आणि दुसऱ्या घरी गृहप्रवेश करतो…..

वाळवंटी जीवनशैलीच्या संग्रहणीय कलाकृती…….

गडकोट किल्यांचा महाराष्ट्र माझा, कौलारू घरांचा, शेतात डोलणारा महाराष्ट्र माझा, मिळेल का पहावयास पुढच्या पिढीस असा महाराष्ट्र माझा, घराच्या शोकेस मध्ये ठेवण्यास शोधते महाराष्ट्र माझा…. इथे अशा प्रतिकृती पाहून आठवलं ते महाराष्ट्रच असीम सौंदर्य, भक्कम किल्ले, आदिवासी जीवन…..कोल्हापूरला ग्रामीं जीवन शैलीच संग्रहालय पाहण्यास आहे. आपण दीपावलीत किल्ले करतो आणि मोडून पण टाकतो. बाजारात जे तयार किल्ले मिळतात त्या प्रतिकृती तंतोतंत नसतात. अशा काही प्रतिकृती मराठी तरुणानी बनवल्या तर एक आगळावेगळा व्यवसाय निर्माण होवू शकतो. घरात आपल्यालाला कायम स्वरूपी असा छोटेखानी संग्रह ठेवण्यास मिळाला तर निश्चित अभिमान वाटेल. संकृती साहित्यांनी, प्रत्यक्ष पाहून पुढच्या पिढीस संक्रमित निश्चित करता येते. पण कदाचित चीन अशी मॉडेल्स आणून आपल्यालाच विकतील…. इतिहासाच्या गाढ अभ्यासकांनी मनावर घेतले तर तंतोतंत किल्ले बनवणे अशक्य नाही…मला सुचले, इथे पाहून आपल्या करता काही करता येईल का? कोणाला कल्पना सुचवली तर??? माझ्या कडून हा अल्पसा प्रयत्न…. ग्राम विकास साठी पण निश्चित विचार करता येईल.. अभिप्राय जरूर कळवा…….

घरात एक कोपरा विहिरीचा असावा.ओमान मध्ये बऱ्याच आधुनिक सुखसोईच्या अद्यावत बंगल्यांच्या बाहेरील अंगणात छोटेसे गाव साकारलेले असते. अशा विहिरी ह्या त्यांचा अभिमान आहे म्हणून त्यांना खास उभारलेले असते.

मध…मधुमक्षिका पालन ओमानचे.

अरब देशांमध्ये मधाचा वापर स्वयंपाक ते आरोग्य यासाठी अधिक केला जातो. ओमान चा मध हा अत्यंत पारंपारिक पद्धतीने बनवलेला असतो. निसर्गात जे उपलब्ध आहे त्याचा वापर प्रामुख्याने असतो. मधुमक्षिका पालन येथे वेगळ्या पद्धतीने केले जाते. येथे प्रामुख्याने खजुराची झाडे प्रंचंड प्रमाणत लावली जातात. खजुराच्या झाडाचे आयुष्य संपल्यानंतर त्याचा बुंध्याचा वापर मधुमक्षिका पालनासाठी केला जातो. बुंधा आतून पोकळ केला जातो. त्यात मधुमक्षिका पालन करतात. नारळ , पपया, पाम, आणि अनेक सुवासिक झाडांचे बुंधे वापरून मधाचे उत्पन्न घेतात. वेगवेगळ्या झाडानुसार सुवासाचा आणि चवीचा मध येथे उपलब्ध आहे. मध प्रक्रियेत मधाला त्या विशिष्ट झाडाचा सुवास लाभतो. असा फ्लेवर्ड मध इथे खूप लोकप्रिय आहे.

Apis millifera and Apis florea. ह्या दोन जातीच्या मक्षिका येथे पालनासाठी उत्तम मानल्या जातात. परदेशी जातीच्या माशा पाळणे इथे कायद्याने बंदी आहे. ह्या जातीच्या माशा इथल्या जातीय आहेत. माऊंटन बी म्हणून ह्या इथल्या हवामानास पोषक मानल्या जातात. ह्या जातीच्या माशा आकाराने छोट्या परंतु खूप कामसू असतात आणि उच्च प्रतीचा मध गोळा करून आणतात. रुस्ताक आणि सलाला ह्या भागात अनेक फळ झाडे आणि फुल झाडे , शेती हि विस्तृत प्रमाणात आहे. ह्या ठिकाणी अशा मधुमक्षिका कॉलोनी खूप आढळतात. तसेच अति डोंगराळ भागात रानटी झुडुपे फुलांची दिसतात. अशा अति उन्हाळी भागात ह्याच माशा अनुकूल आहेत. ह्या जातीच्या मधू मक्षिका राष्ट्रीय संरक्षण प्राप्त आहेत. ओमानला ह्या जातीच्या माक्षिकांचा अभिमान आहे. संपूर्ण आखाती देश ओमान मध्ये येवून मध घेऊन जातात.

खजुराचा बुंधा पोकळ केला जातो त्यास ‘tubl’ असे संबोधतात. अशा टूबल एकमेकावर रचून मक्षिका पालनाच्या विस्तृत अशा मधू मक्षिका कॉलनी येथे आहेत. मध काढून घेण्यासाठी हा बुंधा मागच्या बाजूने उघडत्तात. मधुमक्षिका पालनासाठी सरकार कडून खास मदत दिली जाते. मक्षिका करता येथे डॉक्टर पण आहेत. स्वतःचा व्यवसाय असला तरी हा खूप सन्मानीय येथे मानला जातो. सरकारकडून मटेरिअल, सर्विस उत्पादनाकरीता दिली जाते.

मध पालनाची परंपरा कुराण काळा पासून प्रचलित आहे. पूर्वीच्या इथल्या राजमहालात मध असलेली खजुराची झाडे ठेवण्यासाठी खास खोल्या होत्या. ह्या खोल्या मधून एकेका खळगीत एकेक झाड ठेवून, ते नंतर प्रेस करत त्यातील मध पन्हाळी मार्फत गोळा केला जात असे. अशा खोल्या आजही किल्ले, महाल यांना भेट दिली कि उत्तम स्थितीत बघण्यास मिळतात.

ओमान मध्ये एकंदरीत ३५००० मधुमक्षिका कॉलनी आहेत. जून ते नोव्हेंबर काळात उत्पन्न घेतले जाते. २००८ मध्ये ९६,०२६ किलो मधाचे उत्तपन शेती खात्यात जमा झाले. संपूर्ण आखाती देशात ओमान चा मध निर्यात केला जातो. उच्च प्रतीचा मध तेही सुवासाचा हे मधाचे वैशिट्य…

मधू मक्षिका पालनाची अशी पद्धत वेगळी असल्याने लिहिली.

जागतिक महिला दिन…..

महिला दिन जस जसा जवळ येउ लागतो तसे अनेक लेख महिलांच्या प्रगतीचा आढावा घेणारे वाचण्यास मिळतात. क्षेत्र कुठलेही असो तिने तिच्या जबाबदारीची, कर्तुत्वाची छाप पाडलेली दिसते. घर, शेती, विविध तंत्रद्यान तिने सहज काळाप्रमाणे आणि तिच्या गरजेप्रमाणे आत्मसात केले. तिच्या आवडीप्रमाणे तिचे कामाचे, आवडीचे क्षेत्र पण वेगळे असते. कोणाला घराची चौकट…पती, मुले आणि संसार तर कोणाला आकाशाची भरारी….एव्हढी अफाट कुवत तिच्यात आहे.

आकाशात भरारी घेणारी एखादी पायलट, शेजारच्या गृहिणीची जवाबदारी पार पडणाऱ्या आपल्या मैत्रिणी बरोबर पण रमते, त्यांच्या मैत्रीमध्ये कर्तुत्व आड येत नाही. घराचा उंबरा, पारंपारिक चौकट पण तिला हवीशी असते आणि आकाशात झेप घेणाऱ्या पंखाची पण तिला ओढ असते. हा सहज स्वभावातला बदल स्वीकारणे हे स्त्री च्या रक्तातच आहे. तिच्या प्रकृतीत आहे. जशा संधी येतील, तशा स्वीकारत आपली जवाबदारी पार पडणे आणि तेही हसत मुख राहून, हे वैशिष्ट्य. असे लेख म्हणजे प्रोत्साहन देणारे, कर्तुत्वाला सलाम करणारे, अंतर्मुख करणारे ठरतात. अनेक दिवस मनात ठाण मांडून बसतात. स्त्रीच्या प्रगतीच्या ह्या आलेखात तिला कधी कोणाची साथ मिळते तर कधी ती एकाकी असते. घर ते आकाश ती स्वतः भोवती फिरवत राहते. त्यातच ती आनंदी राहते. जेव्हढे मिळाले त्या संधीचा पुरेपूर मनसोक्त आस्वाद घेण्याची कला तिज जवळ निश्चितच आहे.

एकात एक अशा मावणाऱ्या बाहुल्यांच्या मध्ये पण तिला द्वितीय स्थान असते. प्रथम दर्शनी असते हि पुरुषाची बाहुली. कदाचित हेच दृढ असे जीवनाचे सत्य सर्वसंमत असावे. घरातील सदस्य तिचा सहज आधार घेतात.आतल्या कोशात राहूनही तिच्या आत्मबला मुळे सहज सर्व जवाबदारीवर पूर्णतः यशस्वी होते. ग्राम स्तरावर आणि शहरी वातावरण ह्या प्रमाणे स्त्री च्या व्यक्तीमत्वात, जवाबदारीवर फरक असतो पण कुठेही ती घर दारासाहित सर्वाना सांभाळून घेते. जसा हा सकारात्मक बदल अनुभवास येतो तसेच काही प्रमाणात अजूनही तफावत हि आढळते. उदा. घरचे कितीहि शिकवायला तयार असले तरी ( मागच्या पिढीतील )आई… संगणक चटकन शिकण्यास राजी होत नाही. स्वतःचा इमेल आयडी हि पूर्णतः अगदी घरगुती स्वरूपावर असला तरी सुद्धा प्रत्येकाची वैयातिक बाब आहे. समजा ती गृहिणी असली तर इमेल आयडी चा पासवर्ड सुद्धा ती अतिशय प्रामाणिक पणे मुलां कडून किंवा पतीला तयार करून देण्यास सांगते. पतीचा, मुलांचा आयडी आमचे अतिशय महत्वाचे काम असते उगाच डिलीट काहीतरी होईल म्हणून ते तिला सांगत नाहीत. खरे तर घरात असे काहीच नसते.तिला तिच्या सर्व वैयक्तिक बाबी सुद्द्धा कुटुंबा बरोबरच आवडतात. माझ्या ह्या पिढीतल्या बऱ्याच मैत्रिणी ह्या अशा आहेत. अजूनही असे वातावरण पाहून आश्चर्य वाटते. घरची आणि आजूबाजूची परिस्थिती शिकवण्यास सकारात्मक असेल तरीही हि स्वतः भोवती कुंपण आखून घेते. पासवर्ड न सांगण्याचा घरच्यांचा मुद्दामहून खोडसाळ नसतो. मी व्यवस्थित पाहू शकते हा तिचाच आत्मविश्वास कुठेतरी अजून वाढण्यास हवा. स्त्री ला स्व:ताची झेप ओळखता येते. पूर्णतः आत्मनिर्भर होण्यासाठी अधिक आत्मबल ओळखण्याची गरज अजूनही कुठेतरी जाणवत रहाते. अर्थात सर्व ठिकाणी असे विरोधाभास दिसत नाहीत हि जमेची बाजू.

ज्या प्रमाणे संगणक माहिती करून घेणे हे आजच्या युगात चटकन संपर्क साधण्याकरता खूप गरजेचे आहे तसाच मोबाईल सुद्धा महत्वाचा आहे. माझी आई तर ७० वर्षाची होती. मोबाईल नीट राहावा म्हणून डब्यात घेऊन जात असे मग कुठले कनेक्शन मिळणार?? रस्त्यावर जात असे घरात आम्हाला मात्र ती सुखरूप दिसे पर्यंत चैन पडत नसे. मागच्या पिढीला हे तंत्रज्ञान नवीन होते. माझ्या गृहिणी मैत्रिणी घरात त्यांचा मोबाईल कुठे आहे? तो चार्ज आहे का नाही ह्याचा काहीही थांगपत्ता त्यांना नसतो. नेहमीचे बोलणे ऐकवतात तू नोकरी करतेस म्हणून तुला सवय आहे ह्या गोष्टींची, आम्ही काय घरातच..घरचा न आहे, मग कशाला उगाचच मोबाईल चा त्रास सहन करायचा. हे आणि मुल ठेवतात लक्ष. कमाल वाटते मला अशा बोलण्याची, घरात सर्व सोई उपलब्ध करून दिल्या आहेत न, मग त्या आत्मसन्मानाने स्वीकारायला शिका!!!! काळाची गरज म्हणून तरी निदान!!!

दागिने हा स्त्री चा अतिशय जिव्हाळ्याचा मुद्दा असतो अर्थात आवड असेल तर. बाजारातले भाव मधले चढ, उतार ह्याची तिला अद्यावत माहिती असते. अनेक प्रसंगाच्या निमित्ताने दागिने घेतले जातात. ते कधी घेतले?? त्याचा तेंव्हाचा भाव काय होता?? ते किती वजनाचे आहेत ह्या सर्व गोष्टी तिच्या मनात कधीही विचारल्या तरी अचूक माहितीनिशी तयार असतात. ह्या दागिन्याचा कागदावर हिशोब, किवा संगणकावर नोंद, बँक च्या लॉकर मध्ये एक प्रत तिने तयार करून ठेवली तर…तिलाही आणि पुढच्या पिढीलाही उपयोगी पडेल.

एकाच वेळेला अनेक गोष्टींचे भान ठेवून सर्व बाबी पूर्ण करण्याची तिला जन्मतःच क्षमता आहे. अनेक टप्प्यातून ती प्रत्येक वेळेला काहीतरी नवीन शिकत असते. स्वतःकडे बघण्याचा दृष्टीकोन तिने तिच्या करता व्यापक करण्यास हवा. ह्या सर्व तारेवरच्या कसरती करताना ती सुपर वूमन बनण्याचा अट्टाहास करत असते. सर्व गोष्टी मीच माझ्या हातानीच पूर्ण करणार. अशा हाताने केलेल्या गोष्टी नेहमीच नीट नेटक्या होतातच पण तिच्या स्वतःच्या बाबी कडे दुर्लक्ष होते. ज्या गोष्टी यंत्राच्या मदतीने करता येणाऱ्या असतील तेंव्हा आधुनिक मशीन ची मदत घ्यावी. सर्व कामे मीच करणार ह्या मध्ये दमणूक मात्र होते. ह्या सर्वाचा परिणाम तिच्या शारीरिक स्वास्थ्यासाठी खूप महत्वाचा ठरतो. स्त्री ची वैद्यकीय तपासणी नियमित करून घेणे खूप गरजेचे आहे. अकारण जीवतोड मेहनत केल्या मुळे शारीरिक त्रास लवकर सुरु होतो. दर्जेदार आयुष्य जगण्यासाठी ह्या तिच्या यंत्रे किंवा कोणाच्या मदतीने काम करून घेणे पण आज काळाची गरज आहे. अनेक गोष्टी करताना ती स्वताकडे पण तेव्हढेच लक्ष ठेवत असेल तर उत्तमचं परंतु अजूनही अशा मैत्रिणी आहेत. जमेल तेव्हढे समजावून सांगावे.

स्त्री च्या अफाट कर्तुत्वाला एकाच पोस्ट मध्ये सामावणे शक्य नाही. आजच्या युगात आपल्या आजूबाजूला असलेल्या आपल्या मैत्रिणीना माझे विचार सांगावेत म्हणून आजची पोस्ट……..स्वःताचे आत्मबल वाढवा…आजच्या युगात आपल्या घरच्या स्त्रीला आपल्या बरोबर ठेवा. तिने स्वतः भोवती कोश गुंडाळला असला तरी एक व्यक्ती म्हणून सर्वानी निदान घरापासून तरी सुरवात केली तरी माझ्या संगणकावर नियमित येणाऱ्या कोणातरी घरच्या बहिणी, आई, आजी मला आवर्जून सांगेल…बयो..माझ्या मुलाने, नातवंडाने मला तुझ्याशी बोलण्यासाठी तयार केले. तुझी पोस्ट मला वाचण्यास दिली. बस्स….अजून काय हवे??? हि छोटीशी विंनती संगणकावर नियामित् येणाऱ्या वाचक वर्गासाठी….

स्त्री भोवती विश्व सामावलेले असते. आध्यत्मिक प्रांतात पण आईला म्हणजे देवेतेला अग्रस्थान आहे. ती माता….जगन्माता आहेच. ती शक्ती आहे, प्रेरणा आहे….ती मोठी आई आहे.. माझ्या आईला, मोठ्या जगन्मातेला माझ्या गुरु माऊलीला, माझ्या सखींना त्यांच्या भोवतीच्या त्यांच्या जगाला माझा प्रणाम आणि खूप खूप शुभेच्छा!!!!!!!

एकच प्रार्थना….स्त्री च्या शक्ती रुपासाठी..

||जयंती, मंगला, काली, भद्रकाली, कपालिनी,
दुर्गा, क्षमा, शिवा, धात्री, स्वाहा सुधा नमोस्तुते||

शेतकऱ्यांचा मित्र……. जी.पी.एस.

आधुनिक तंत्रज्ञान हे नेहमीच उपयोगी असते. ओमान चा शेतकरी तंत्राद्यानाची मदत घेऊन आपले शेतीचे उत्पन्न नुकसानीत होऊन देत नाही. इथे सरकार दरबारी शेतकरी खूप सन्मानित केला जातो आणि सरकारकडून सर्व मदत दिली जाते. खजुराच्या लाखोंच्या संख्येत असणाऱ्या झाडांवर, शेतीवर दुबास किडीचा प्रादुभाव खूप वाढला आहे. खेडोपाड्यातील शेती ची किडी करता मोजदाद करण्यासाठी शेती विभागाकडून शेतकऱ्यांना जी. पी. एस. सेवा उपलब्ध करून देण्यात आली आहे.

अति अंतर्गत भागात किंवा दुर्गम भागात सरकारी अधिकारी पोहचे पर्यंत शेतकऱ्याचे अपरिमित नुकसान होते. तसेच कागदोपत्री अशी मोजदाद ठेवणे पण अवघड होऊन बसते. अशा अडचणी येथे पण आहेत. ओमान च्या शेतीचा मुख्य आधार म्हणजे खजुराची झाडे होत. येथील सरकारने त्वरित शेतकऱ्यापर्यंत किंवा किडीचा पादुर्भाव असलेल्या भागापर्यंत योग्य ती उपाय योजना जलद मिळण्यासाठी हि आधुनिक सेवा शेतकऱ्यांना दिली आहे.

लाखोंच्या संख्येत झाडे आहेत आणि किडीचा प्रभाव, वाढ पण तितक्याच संख्येत आहे. हि कीड येथे ‘दुबास’ नावाने संबोधिली जाते. प्रत्येक भागात अगदी रस्त्याच्या दुतर्फा असलेल्या खजुराच्या झाडांची पण मोजणी काटेकर पणे केली जाते. हि कीड झाडातील रस शोषून घेते आणि झाड शेवटी मृत्युमुखी पडते. संपूर्ण देशात युद्धपातळीवर योजना अमलात आणली जात आहे. येथील शेतकरी हे राष्ट्र करता सन्मानीय आहेत.

पिवळसर असलेल्या ह्या किडीची मोजदाद नजरेस पडली आणि येथील वृत्तपत्रातून त्वरित शेतीवर आलेले अस्मानी संकट आणि उपाय योजना सविस्तर सर्वाना जाणवून दिली. अनेक संस्था येथे सरकारच्या बरोबरीने मदत करत आहेत.

प्रत्येक वेळी कीटकनाशके फवारणी हि मार्गदर्शनाने केली जाते तसेच अजूनही काही उपाय आहेत का ह्याची चाचपणी केली जाते. कीटके एकत्र गोळा करण्यासाठी बादली सदृश असा एक वेगळ्या प्रकारचा फासा झाडाच्या बुंधापाशी ठेवण्यात येत आहे. कीटके आतच पकडली जातात आणि आतील विशिष्ट प्रकारच्या वासामुळे आकर्षित होऊन बादलीच्या आतच मरतात.

सरकारने दिलेल्या जी पी एस वर त्या त्या भागाच्या शेतकऱ्यांनी किडीचा पादुर्भाव किती प्रमाणात आहे ह्याची नोंदणी करायची असते त्या साठी हे तंत्रज्ञान त्यांना शिकवण्यात आले आहे. एकत्र येवून आपल्या भागाची चोख पाहणी करणे आणि डेटा एन्ट्री करणे. लगेच तिथपर्यंत
सरकारी अधिकारी आणि शेती तज्ञ पोहचतात. किडीचा पादुर्भाव प्रखर असलेल्या भागाची नोंद मिळत राहते आणि देशभर पसरलेल्या लाखो शेतकऱ्यांना नुकसानी पासून वाचविले जाते.

अनेक संस्था शेतीच्या कामाकरता पुढे येवून, काही शेतकरी जर दत्तक घेऊन त्यांना आपली अशी खाजगी सेवा देवून काही प्रमाणात तरी शेतीच्या समस्या कमी करण्यास मदत होईलच आणि शेतकऱ्यांना फार मोठा आधार मिळेल.

कदाचित आपल्या ग्रामीण विकासाकरता आपले हे योगदान म्हणजे राष्ट्राचा विकास ठरेल.

मला हि योजना पटली फक्त गरज आहे अशा प्रकारच्या संस्थांची आणि आपल्या शहरी नागरिकांची शेतकरी आणि शेती करता असलेल्या जबावाबदरीच्या जाणीवेची…..कोणी तरी, कुठली तरी संस्था ह्या लेखातून प्रेरणा घेऊन अशी सुरवात करेल हीच अपेक्षा आणि एक चांगली योजना आपण माहिती करून घेण्यासाठी….

ओमान चे प्रसिद्ध गुलाबपाणी …….

ओमान मध्ये जबल अख्तर म्हणून बारा महिने सदा हरित अशी डोंगर रांग आहे. येथेच डिसेंबर महिन्यात बर्फ वृष्टी होते. गुलाबी रंगांची विलक्षण मधुर सुवासाची ओमानी गुलाब शेती येथे प्रसिद्ध आहे. साधारणपणे किंबहुना त्यापेक्षा अधिकच पण ७००० ते ९००० एवढी गुलाबाची झाडे आहेत, ते सुद्धा तेव्हढ्याच समुद्र सपाटी उंचीवर…..मार्च मध्यापासून ते मे अखेरी पर्यंत पूर्ण परिसर हा गुलाबी आसमंताचा होतो. गुलाबाच्या पाकळ्यांचा अर्क काढणे म्हणजे गुलाब पाणी हि प्रक्रिया असली तरी ती येथे सहज पाहण्यास मिळाली म्हणून जरा वेगळी वाटली. असे गुलाब पाणी म्हणजे ऊर्ध्व पतन प्रक्रिया करून मिळवलेला गुलाबाचा अर्क असतो पण इथल्या पारंपारिक पद्धतीत बघण्यास अनेक पर्यटक मुद्दामहून येतात.

गुलाबाच्या झाडापासून ह्या मोसमात १५ ते २० किलो पाकळ्या मिळतात. दोन किलो पाकळ्या पासून ७५० मिलीलीटर अर्क मिळतो. गुलाबाची फुले भल्या पहाटे तोडली जातात आणि ती स्वच्छ असा पांढरा रंग वस्त्राचा घेऊन त्यात फुले ठेवली जातात. अल दुहाजान म्हणून मातीची बनवलेली चूल असते, त्यावर अल बुरमः म्हणून मातीची सुरई सदृश भांडे असते त्यामध्ये गुलाबाच्या पाकळ्या रचल्या जातात. ह्या पाकळ्यांवर तांब्याचे खास बनवलेले भांडे ठेवून, चुलीवर मातीचे भांडे ठेवून त्यामध्ये थंडगार पाणी भरले जाते पाणी भरलेले मातीचे भांडे मातीने सील ( मातीचे लिंपण करून हवाबंद करणे ) केले जाते. जवळ जवळ चार तास मंद चुलीवर फुले ऊर्ध्व पतन केली जातात. नंतर अल करास म्हणून मातीच्या मोठ्या उभट भांड्यात तीस दिवस झाकून ठेवतात. मग ते पाणी गुलाब पाणी म्हणून तयार होते.

जशी मातीची चूल गरम होऊ लागते तसे अल बुरमः गरम होण्यास सुरवात होऊन आतील तांब्याचे भांडे गरम होते आणि तांब्याच्या भांड्यात पाकळ्यांचा अर्क गोळा होऊ लागतो. एका गुलाबाच्या झाडापासून मोसमात पंधरा ते वीस किलो पाकळ्या मिळतात. दोन किलो पाकळ्या पासून सातशे मि. ली. अर्क मिळतो. जवळ जवळ सर्व अरबी पदार्थात गुलाब जल हे प्रामुख्याने असतेच.

इथे गुलाब जल बनवण्याची प्रक्रिया जबल अक्थर येथे सहज बघण्यास मिळते. ह्या व्हीडीओ मध्ये गुलाब पाण्याची प्रक्रिया दाखवली आहे……..

Previous Older Entries Next Newer Entries