आईची स्पेस…

आईची स्पेस…

बऱ्याच  वर्षांनी मुलांना स्वावलंबन, जवाबदारी चे संस्कार पण त्याच बरोबर त्यांचे बालपण जपणारी माझ्या शेजारी प्रवासात होती. मी निरीक्षण करत होते. भारतीय संस्कारांचे पूर्ण मूल्य सांभाळणारी पण तिच्या मुलांना स्वतंत्र व्यक्ती म्हणून सन्मान देणारी अशी ती..तिचीच छोटी कहाणी

शाल्मली हि तिच्या आई वडिलांच्या लाडाकोडात  मोठी झाली.तिची आई शिक्षिका आणि वडील बँकेत कार्यरत होते. आई शाळेत निघाली कि पहाटे ती गपचूप रडत असायची, वडील बँकेत उशिरा पर्यंत असले तर त्यांची वाट पाहत नाराज होऊन झोपायची. सहज पणे तिने मला सांगितले. गरज म्हणून, करिअर म्हणून किंवा आवड म्हणून , उच्च शिक्षणामुळे सुद्धा घरटी अशी आई नोकरी करत असते. घरोघरी मुले अशीच  आई साठी रडत ,आणि आई पण  बाळाकडे पाहत दुःखी होऊन पाय ओढत नोकरी साठी निघते. एक तर घरीच राहणे हा एकच पर्याय असतो.

शाल्मली चे लग्न ठरले आणि तिने बाळाची चाहूल लागताच काही निश्चय केले.

मी माझ्या बाळाला , कधीच बागुलबुवा दाखवणार नाही, अंधाराची भीती त्याला सांगणार नाही, एक स्वतंत्र व्यक्ती म्हणून पूर्ण सन्मान देईन. तिची बाळ अगदी जन्मल्या पासून एकटी छान झोपतात. त्यांना अंधाराची भीती नाही .आई ऑफिस ला जाते हे त्यांनी उत्तम पणे स्वीकारलयं. बेबी सीटर कडे हसत जातात. 

माझे प्रश्न सुरू झाले, आईची कुशी, बाबां चे थोपटत झोपवणे हे आवश्यक आहेच.  होय म्हणाली, मुले झोपेपर्यंत आम्ही असतोच त्यांच्या सोबत मग मात्र त्यांच्या रूम मध्ये छान झोपतात. 

आई घरी असो किंवा बाहेर नोकरी साठी जावो .तिला तिची स्पेस असतेच.तिच्या कामाचा सन्मान तिनेच मुलांच्या संस्कारी मनावर बिंबवण्यास हवा. 

बाळा तू पण रडू नकोस, मी पण दुःखी होत नाही कारण आयुष्यात घाबरावे असे काहीच नसते.  आई तुझ्या सोबत आहेच हा विश्वास दृढ करणे काळाची गरज आहेच.

अग्गबाई मधील आई ते अंतराळात चंद्रावर काम करण्यास  जाणारी आई..प्रवास आपला आहे,  आपल्या बाळांना मानसिक रित्या सक्षम करून  हसत आईला टाटा करणारे बाळ ,आई आणि बाळाचे नाते असेच आहे जीवन आनंदी बनवणारे..

नवीन विचार, नवीन संस्कार.

नावे काल्पनिक, कथा हि मनातली..

 घरी आई काय करते, नोकरी साठी जाणारी असेल तर का करते ह्याचा खुलासा कोणीतरी  आपल्या मुलांना देण्यापेक्षा आईनेच बाळाला तयार करावे हा उद्देश. लिखाण नेहमी सारखेच छोटेसेच

अनुजा पडसलगीकर

सगळंच अवघड परि आहे सुंदर..

TUB GARDEN

सगळंच अवघड परि आहे सुंदर..

मुलाच्या शिक्षणाच्या निमित्ताने त्याची जेवणाची आबाळ व्ह्यायला लागली म्हणून मी हि त्याच्या जवळ राहण्यास आले. बॅचलर असल्याने त्याने एक रूम घेतली, रूम व्यवस्थित मोठी होती, पण एक खिडकी आणि त्या बाहेर कबूतराचे पाय मावतील एवढीच जागा. रूम करता माझी हरकत काहीच नव्हती पण खिडकीत जागा नाही म्हणून जरा खट्टू झाले.माझं लेकरू तरी जवळ आहे, जवळच्या शाळेत मी हि नोकरी करण्यास लागले. खिडकीत जागा नसल्याने शाळेतच मी मोठ्या प्रमाणात विद्यार्थ्यांच्या उपक्रमातून त्यांना कंपोस्ट शिकवले आणि शाळेत कंपोस्ट बनू लागले, हळू हळू भाजीपाला, फुलझाडे शाळेच्या माळ्याच्या मदतीने वाढू लागली.

उच्च तंत्रज्ञान असणाऱ्या विकसित देशात हिरवा कोपरा मनास आनंद देत होता. लॉक डाउन मुळे माझे आणि शाळेचे नाते लॅपटॉप वर मर्यादित झाले. आता सध्या मुलगा, मी आणि माझे मिस्टर ह्या लॉक डाउन च्या काळात वेगवेगळ्या राष्ट्रात आपआपल्या कामांमुळे राहत आहोत.

घराच्या खिडकीचा अरुंद बाहेरचा भाग मला अस्वस्थ करत होता. ऑन लाईन शाळेमुळे लॅपटॉप चा ताण मनावर, डोळ्यावर जाणवू लागला.रात्रीची झोप नाहीशी झाली.

खिडकीच्या बाहेर ग्रील करण्यास घर मालकाने नकार दिला कारण खालून बिल्डिंग चा रस्ता होता.झाडे खिडकीत नकोत हा नियम होता. परदेशी असे नियम खूप पाळतात. थोडे पाणी घालीन, खाली ट्रे ठेवीन सांगून पाहिले पण अरब देशाचे नियम च कठीण.असो पर्याय तर हवाच.

खिडकीतून येणारे ऊन वाळवंटी प्रदेशाचे असल्याने बाहेर अचानक येणारे वाळूचे वादळ, 50 ℃ पर्यंत ऊन झाडे काही टिकून देत नाहीत.

खिडकीतून येणाऱ्या टेबलावर पडत असलेल्या उन्हाचे तापमान चेक केले .20 ते 30 ℃ पर्यंत दोन तास तरी जवळपास असल्याची नोंद केली. कवडसे कुठून आणि कसे पडतात ह्याची आखणी टेबलवर करून घेतली.
घरातला एक टब घेतला, घरी थोडे कंपोस्ट होते. माती मला नकोच होती. टबात शेती करायची, तात्पुरता काळ का होईना पण मला सोबत हवी होती, माझ्या डोळ्यांना आराम हवा होता.

तीन दिवस धणे चुरून आणि मेथी ओल्या कपड्यात बांधून ठेवले. पातीचा कांद्याचे मुळांचे आणि थोड्या देठाचे भाग घरातल्या भाजीतून वेगळे केले, छोटा मुळा , लाल माठाच्या जाड काड्या,साधी मिरची , सिमला मिरची ह्याची आधी sapling तयार केले. नवीन पाहुण्यांच्या आगमनाची पूर्व तयारी केली. टबाच्या तळाशी खडूने श्री लिहिले आणि प्लस्टिक अंथरून वरून कंपोस्ट अन्नपूर्णे नमः म्हणत पसरविले. तीन दिवसात धणे ,मेथी कपड्यात अंकुरले ते अलगद पसरविले .

घरात 24 तास एसी आणि खिडकीतून येणारे ऊन ह्यावर बे भरवश्याची शेती पेरली. शेतकऱ्यांचे कष्ट, उगवताना लागणारा वेळ ह्याची जाणीव परमेश्वर करून देत होता. आज चार दिवस झाले, टब उन्हाच्या दिशेने फिरवत राहते. कंपोस्ट मधून कारले वेल ही उगवली.

कसे हे जगतील ह्या माझ्या काळजीचे उत्तर हे अलवार मऊसूत कोमल अंकुर देतात. छोट्या छोट्या पानांची दिशा उन्हाच्या दिशेने सतत बदलत राहते.माझ्या साठी ते ही संघर्ष करीत सकारात्मकता दाखवत आहेत.

सकाळी उठले कि, त्यांना हळुवार स्पर्श करणे, त्यांची विचारपूस करणे , हळू हळू पाणी घालणे. मूक साथ कशी म्हणावी, ही तर बोलकी साक्ष आहे. निसर्ग कधीतरी रुद्र होतो पण हे हिरवे हात मात्र आपल्याला वसुंधरेशी जोडून ठेवतात.

अनुजा पडसलगीकर

बऱ्याच वेळेला असं होतं असतं.

बऱ्याच वेळेला असं होतं असतं…

हाताशी असलेली गोष्ट सापडत नाही ,
पण बालपणीच्या गोष्टी मात्र विसरत नाही…

काल काय खाल्लं ते आठवत नसतं,
पण आईच्या पदार्थाची चव मन मात्र स्मरत असतं..

रोज पाहूनही नेट वर काय वाचलं विसरलं जात,
अंतू बर्वा पु लं चा आहे हे मात्र मनात ठसलेलं असतं…

काळ्याभोर डोई वरती पांढरा केस कधी डोकावला कळलेलं हि नसतं,
पण कृष्ण धवल चित्रपटातील यमुना जळी गीत मात्र मुखी कायम तरळत असतं…

पाहिलेलं कार्टून, विसरलं जातंच,
पण बोक्या सातबंडे बरोबर अजूनही मन खेळतं…

नववर्षाचे करताना स्वागत,
मागचं वर्ष मागच राहत,

पुढे जातानां..असंच काहीसं विसरत असतं…काही आठवत राहतं…

काव्यरचना लिखाण,
अनुजा पडसलगीकर 

खूप काही शिकण्यासारखे..

खूप काही शिकण्यासारखे पण सध्या विस्मरण झालेले
 
१ दूध तापविणे ते तूप कढवे पर्यंत आज्जी धेनु ऋण मंत्र म्हणत असे. धेनु मुळे माझा संसार आरोग्यदायी आहे असे म्हणायची.
 
२. कितीही श्रीमंती असली तरी शक्य असेल तर घेवडा वेल लावावा सांगत असे. असे का ह्याचे उत्तरही तयार, म्हणायची, श्रीमंती देवापुढे कधीच नसते, दत्तगुरु जेवण्यास येतात, घरची घेवडा भाजी गुरुवारी करावी. घेवडा कथा वाचावी, कमी असते ते वाढते.
 
३ अन्नाचे एक शीत तरी सैनिकासाठी पानात सुरवातीला बाजूला ठेवावे मग तुळशीत अर्पण करावे. देव त्यांना रोजचा घास पोहोचवतो, त्या लेकरांचे आयुष्य वाढते.
 
४ वाळवण घालताना आज्जी सूर्य मंत्र म्हणायची, काळजी घे म्हणायची माझ्या संसाराची.
 
५ रोज एकदा घरच्या झाडांना कुरवाळून यायची, कोरफडीचे पण लाड करायची, आम्हाला नवल वाटायचे, तर म्हणायची, स्वतः शुष्क दिसते वरून पण अंगी खूप गुण आहेत. एखाद्याला फक्त वरअंगी, रूपावर तपासू नये.
 
६. मुंग्यांना साखर ठेवायची, म्हणत असे मी दिलेल्या मार्गावरूनच जा गं बायांनो, सुखात राहा,माझ्या लेकरांना डसू नका.
 
७ तुळशीला दिवा लावायची, चिलटे,किडे नष्ट होऊन घरात येत नाही.ती माझ्या घशाला अाराम देते मी तुळशीच्या पानांना उब देते.
 
६ लाईट असूनही महिन्यातला एक दिवस रात्रीचे जेवण कंदील आणि चिमणी च्या उजेडात असावे आग्रह असे.
भाकरी पण चंद्रासारखी वाटते ,
सावल्यांची भीती जाते, खेळ करताना मौज असते, अंधाराची सवय असावी, भुमातेला पण शांतता मिळते म्हणायची.
 
७ दारातल्या रांगोळीने सरपटणारे प्राणी लांब राहतात. त्यांच्या कातडीला रांगोळी चिकटते म्हणायची.
 
८ झोपताना तांब्याच्या धातुतील तांब्या पाणी भरून डोक्याशी ठेवायची, चांगले असतेच पण तापलेल्या ‘भु’चा तप्त असा भार किंवा स्पंदने तांबे घेते आणि आपल्याला शांती देते.
 
अजब अशा गोष्टी आणि त्या मागचा अभ्यास, अनुभव आणि ज्ञान कधी लक्षातच घेतले नाही.
 
लिखाण —अनुजा पडसलगीकर.

मातीचे गोकुळ…

मातीचे गोकुळ…

gokul1

“आज गोकुळात सखे खेळतो हरि….. प्रत्येक मराठी मनाच्या कोपऱ्यात हे गाणे असतेच. कुठे आहे हे गोकुळ, कसे आहे, असे अनेक प्रश्न मनात येत असताना, आज्जी म्हणते, बाळा तुला एक गमंत दाखवते. देवघरात नक्षीदार पटाच्या भोवती सुबक अशी महिरप काढलेली असते. पाटाच्या बाजूस एक तेलवात तेवत असते. आज्जी हाताला  धरून बसवते आणि म्हणते चल, आपण गोकुळ करूया. अनेक घरात स्मरत असलेली परंतु आता धुसर आठवणीत असणारी हि कोणे एके काळी अशी कथा झालीय.

काळ्याशार मऊसुत मातीचा मऊ गोळा. ज्वारीचे पुष्कळ दाणे, कापसाचे वस्त्र, हळद कुंकु आणि मंजिऱ्या असलेला तुळशीचा पानांचा झुबका आणि खूप सारी कृष्ण रंगांची गोकर्ण फुले. इथेच घराचे गोकुळ आज्जी च्या प्रेमळ आशीर्वादानी भरून जात असते.

उदबत्तीच्या सुवासात, वसुदेवं सुतं देवं कंस चाणूर मर्दनम ….एकेक शब्द मंत्रांचा उच्चारत, बाळ कृष्णाला आमंत्रण दिले जाते. घनगंभीर मंत्रोच्चारात खट्याळ कृष्णलीला साकारत असते. मातीचा छोटा गोळा हातावर घेऊन प्रथम तुळशी वृंदावन आकार घेते. त्यात प्रेमाने तुळशीचा गुच्छ ठेवला जातो. जेथे तुळशी तेथे पावित्र्य आणि तेथेच हरिचा निवास. मग साकारले जातात एकेक आकार, आख्खे गोकुळ गाव बनविले जाते. आपला लंगडा, दूडदुड धावणारा बाळ कृष्ण आणि बलराम सुद्धा बनवून बाजूला ताटलीत ठेवले जातात कारण संपुर्ण गोकुळ नगरी जेंव्हा तयार होऊन सजते तेंव्हा बाळ कृष्ण आणि बलराम ह्यांच्या स्वागतासाठी गोकुळ साजूक तुपाच्या शांत निरांजनात उजळून जाते.

गाय, गाढव, कावळा, उखळ, जातं, चूल गवळी गवळणी, असं गोकूळ मातीचं तयार करायचं. कृष्ण पाळणा बनवायचा.  पुतना, कंस ह्यांच्या संहाराच्या कथा चित्रे पण साकारायची. सगळे आकार मातीचे, सावळ्याची बासरी सुद्धा येथे काळीच असते. सर्व काही एकाच काळ्या रंगांचे कारण शामल सुंदर होऊनी कान्हा येतो, तेंव्हा साऱ्यांनाच आपल्या रंगांत मिसळून घेतो.

कान्हा, बलरामचे दागिने ज्वारीचे दाणे खोचुन घडवायचे आणि साऱ्यांचे डोळे सुद्धा ज्वारीच्या दाण्यांचेच बनवायचे. खूप काही मांडता येते. घरातील आज्जी यशोदा मैया च्या भूमिकेतुन तिच्या छोट्या कान्हाला तिच्या घराच्या गोकुळात येण्यासाठी मंत्रोचारांच्या सुरावटीत त्याचीच कथा कच्च्या मातीत बनवत असते.

कच्च्या मातीचा काळाशार मऊसुत गोळा अलवार भावनात, कोमलपणे, हळुवार असा प्रत्येक आकारात बनतो आणि बघता बघता पाटावर गोकुळ साकारते. मायमाऊली भूमातेची पूजा येथे कृष्ण रुपात केली जाते. आपल्याला सुजलाम सुफलाम बनवणारी हि काळी माती देवघरात पुजली जाते. ह्याच पावसाळी दिवसात हि माती भक्तीचे नवांकुर सृजनतेने उमलवत असते. कृष्ण कथेला मृत्तिका चित्र रुपात साजरे करण्याचा श्रावण असतो. स्त्री च्या कोमल भावना अशा रूपाने कौशल्य दाखविणाऱ्या असतात.

ज्वारीच्या दाण्यांनी काळ्या काळ्या गोकुळाचे राधेचा गौर रूपासारखे वृंदावन होते. जीवनाचे दोन्ही रंग सहज एकमेकात मिसळून गेले तर असे सुरेख गोकुळ जीवनाचे बनते. घरची मोठी स्त्री लहान लहान बाळांना एकत्र करून गोकुळ साकारून घेते. जात्यावरून हात कसा फिरवावा, धान्याचे उखळ गोलाकार बनविताना त्यात ज्वारीचे दोन दाणे नित्य असावे. मातीच्या चुलीची कशी रचना असावी ह्याचे जणु काही नकळतपणे संस्कार घडवत असते.

कंस आणि पुतना ह्यांना जीवनाच्या पाटावर कोपऱ्यात कसे मांडावे. अनेक गोष्टी प्रत्येक कथेत खूप काही शिकवणाऱ्या असतात. मंत्र म्हणताना, हात सुद्धा मातीत आकार घडवत असतात. एकाच वेळी अनेक कामे कशी करावी ह्याचा जणु परिपाठच होतो. मातीत खेळताना आनंद मिळतो तो शब्दात मांडणे शक्यच नाही.

मातीचे गोकुळ जेंव्हा जांभळ्या, निळ्या गोकर्ण फुलांनी सजते, पाटाच्या चारही कोपऱ्यात मातीच्या खळग्यात रान भाज्यांचे तुरे खोचले जातात आणि सभोवताली दुर्वा खोचल्या जातात तेंव्हा मनात गोकुळ कुठे आहे ह्या प्रश्नांचे उत्तर सुंदर होऊन सामोरी साकारते. बाळाच्या गालाच्या खळग्यात बाळकृष्ण खुदकन हसतो.

निरांजनाच्या ताम्हणाने गोकुळाचे औक्षण केले जाते. गोकुळाला हळदी कुंकवाचे बोट लावले जाते आणि समोरच्या वाटीत झाकून ठेवलेले पांढरे शुभ्र लोणी कान्हा करिता ठेवत, आज्जी आपल्या लाडूल्याला त्यातील लोणी बोटाने हळुच ओठावर टेकवते. आज्जीच्या कुशीत कृष्ण बलरामाची गोष्ट ऐकताना तिच्या बाळ कृष्णाला झोप लागते.

दुसऱ्या दिवशी हे गोकुळ झाडाच्या बुंध्यात समर्पित केले जाते. त्यातील ज्वारीच्या दाणे अंकुरित होऊन पुन्हा कणसे लागतात आणि त्यावरी चिऊताई येते आणि अंगणात आज्जीची गोष्ट पुन्हा सुरु होते. चातुर्मास असाच येतो, विठु माऊली च्या नाम गजरातून पुन्हा बाळ कृष्ण होऊन कान्हा येतच राहतो.

एक विसरत चाललेली आणि पुरातन अशी एक परंपरा आज फेसबुक वर माझ्या मित्र मंडळीनी त्यांच्या घरच्या मातीच्या गोकुळाच्या फोटोतून मनात पुन्हा उजळती झाली. आज्जी मातीत खेळते पाहून खुदकन हसणारी श्री अमित कुलकर्णी ह्यांची छोटीशी कन्या अजूनही मातीच्या गोकुळात रमते. आत्ताच्या पिढीला परंपरेचा वारसा समजावा आणि तो नित्य असावा म्हणून मैत्रीण सुरेखा कुलकर्णी आपली परंपरा अतिशय प्रेमाने साकारतात. ह्या दोघांचे सहकार्य आणि फोटोसाठी विशेष आभार.

लिखाण–अनुजा पडसलगीकर.

 

gokul 2

श्रावण मासी, हिरवळ दाटे चोहीकडे..

moringa-leaf-powder-250x250श्रावण मासी, हिरवळ दाटे चोहीकडे…
श्रावणात प्रत्येक पान स्वतःचे अनोखे पण घेऊन नवीन ओळख देते. सणवार पण खूप असतात, मनसोक्त फुला पानाची आरास करता येते, देव सजवता येतात. विविध पत्री मधला देव हा लोभस दिसतो. विविध पत्री मधुन असणारा अनवट सुवास हा नकळत पणे आपल्या चेतना उत्साहित करतो. ह्या करता श्रावण आणि पत्री ह्यांचा सह संबध नक्कीच असणार.
निसर्ग ह्या श्रावणात भरभरून देत राहतो. कालांतराने श्रावणातल्या खास पत्री नाहीश्या होतात. सगळीकडे पाना फुलांचे  आरोग्यदायी उपयोग सतत वाचनात येतात. गच्चीवरील बाग सर्व प्रकारच्या झाडांनी भरून असते.
आंब्याची कोवळी पाने, शरीराचा दुर्गंध घालवतात. पेरूच्या पानाची पुड दंतदुखी आणि हिरड्यांच्या मजबुती करता, दातांवरील पांढरे, पिवळे येणारे आवरण दुर करते.अगदी ह्या दिवसात असलेला आघाडा सुद्धा सुकवून वापरता येणे शक्य होऊ शकते. रस्त्यावर दुर्लक्षलेली टणटणी सुद्धा जखमेवरती उत्तम खपली धरते… हे सगळ कसं करायचं, काय काय उपयोग आहेत? प्रशन पडणे स्वाभाविकच आहे पण इच्छा तेथे मार्ग मिळतोच.
वाचत सारेच असतो, पटत हि असते, कधीतरी नक्कीच वापरु.. असे निश्चय केलेले असतात. प्रत्यक्ष वेळ येते तेंव्हा सुचत नाही,सापडत नाही. लिहुन ठेवू, सेव्ह करु, आयत्या वेळी विचारु… अशा विचारात निसर्गाचा अनमोल साठा करणेच राहून जाते.
जश्या लोणच्याच्या, चटणी च्या बाटल्या केलेल्या असतात तशाच ह्या अशा नानाविध पानांच्या पावडरी, किंवा असा कोरडा साठा करुन ठेवावयास हव्यात. ज्यांना बागकामाची आवड आहे अशांच्या घरी तर असे करणे सोप्पे आहे. आपली बाग आनंदाने दाखवतोच पण एखादी अशी छोटीशी पानांच्या उपयोगाची बाटली छानशी भेट देता येऊ शकते.
निदान महिन्यातून एकदा तरी पेरूच्या पानाची पूड दातास चोळावी, दहा मिनिटांनी चूळ भरावी. आंब्याची कोवळी  पाने थोड्या कोमट पाण्यात घेऊन मऊ करून अंगास लावावी. अजूनही खुप  वनस्पतींचे उपयोग माहिती असताच फक्त ते आपल्या हाताशी प्रसंगात मिळणे आवशयक आहे आणि अशी वेळ येऊ नये म्हणून दैनदिन आयुष्यात काही उपाय तर नियमित करता येणे शक्य आहेच.
अति थंड किंवा अति उष्ण प्रदेशात निसर्गाचा ठेवा जतन करून ठेवला जातो. पूर्वी आपल्या घरी सुद्धा कोवळ्या हरबरा पाला, शेवगा पाला, तुळस पानाची पुड, बेल पाने पुड  असा साठा फडताळात असायचाच. घरातील अनुभवी
जेष्ठ मंडळी घरचाच उपाय चटकन करायची. आता तर इंटरनेट मुळे तर जग  माहिती घेण्यासाठी जवळ आले आहेच पण घरातील फडताळातील निसर्ग मात्र दुर गेलाय.
कशाला हवेत केमिकल चे डिओ. वेगवेगळ्या  शोभेच्या वस्तूंनी बाथरूम सुद्धा सुशोभित करतो तिथे असे छोट्या बाटल्यांचा एक तरी कप्पा हवाच जो आपल्या शरीरास, मनास उत्तमच ठेवतो. वेगवेगळी फुले अंघोळीच्या पाण्यात थोड्यावेळ ठेवावीत, सुगंधित आनंद मिळतो. मी नेट वर काही माझ्या मित्र परदेशी मंडळींच्या पोस्ट वाचत असते. जवळ जवळ सर्वांची एकच लगबग दिसून येते. हार्वेस्ट आहे म्हणजे तेथील फळे, फुले आणि पाने ह्यांचा मौसम आहे. कालांतराने तिकडे बर्फ येणार आहे म्हणून निसर्गातील जमतील तेवढी पाने, फुले आणि फळे कॅनिंग करून साठवणूक करण्याची लगबग माझ्या मैत्रिणींची आहे. आपण सहज मिळते म्हणून किती नशीबवान आहोत. जतन करून ठेवणे हा दृष्टीकोन असणे आवश्यक आहे.
नेटवर, वाचनात येणारे पानांचे ,फुलांचे उपयोग आणि त्याचा वापर कसा करणे ह्या बद्धल येणाऱ्या महितीमधून असा विचार प्रत्यक्षात आणणे शक्य करता येते.  बाजारात पण आयुर्वेदिक पावडरी खूप मिळतात पण घरीच जर सहज उप बिन पैश्याचे उपलब्ध होत असेल तर बाजारावर तरि अवलंबून का राहायचे?  स्वतःचे ज्ञान तर वाढतेच पण, स्वः निर्मितीचा आनंद हि मिळतो.
जसे रासायनिक भाजी नको तसेच रासायनिक उपाय पण नकोत. आपल्याच गच्चीत, घराच्या एखाद्या कुंडीत किंवा आजूबाजूला असलेल्या निसर्गाला खऱ्या अर्थाने आपल्या जीवनात आणणे हाच खरा नित्य प्रफुल्लित करणारा श्रावण ठरेल.
ह्या पोस्ट च्या कॉमेंटस द्वारे विविध पानांचे उपयोग आणि त्यांचा वापर  कळवावेत. नोंद करून ठेवुन, त्याचा प्रत्यक्ष वापर करण्यास श्रावण आपल्यासाठी फुलपाने घेऊन आलाय… स्वागत करूया.
लिखाण– अनुजा पडसलगीकर.
२७ जुलै २०१७.

भारत माझ्या दरवाज्यात……

भारत माझ्या दरवाज्यात……

काल बेल वाजली, दुपारचा वेळ होता, दरवाजा उघडून पहिले तर एक परदेशी स्त्री दारात उभी होती. मला म्हणाली मी तुमची शेजारी, आय एम एलिझाबेथ फ्रॉम ऑस्ट्रिया. मी या, या, घरी या  म्हणत, तिला आत घेऊन आले. मला म्हणाली, मला इंडियन शेजारी हवेच होते. आय लाईक इंडिया. भरकन माझा चेहरा जणु माझी मावशी आल्याचा आनंद घेत खुश झाला.

एलिझाबेथ म्हणाली, मला तुमचे स्पायसेस खूप आवडतात. दोनच दिवसापूर्वी लखः घासलेला आपलाच मिसळणाचा डब्बा कौतुकाने दाखविला. तिने  डब्यातल्या वाट्या मोजल्या आणि मला म्हणाली, सो मच लेस स्पायसेस.. भारत मसाल्यांचा व्यापार करीत असे हे इतिहासात घोकलेले वाक्य आठवले.  लगेच मी म्हणाले,छे छे, आमचा भारत खूप मोठ्ठा आहे. प्रत्येक राज्यानुसार, राज्यातील भागानुसार मसाले पण खूप वेगळे आहेत. माझ्यातील शिक्षिका उफाळून आली. तेंव्हा कुठे तिच्या चेहऱ्यावर मी खरंच भारतीय असल्याचा विश्वास उमटला. अचानक  ती म्हणाली, शो मी ऑल…

माझ्या डोळ्यासमोर संपुर्ण भारत माझ्या दरवाज्यात दिसला. कुठे असतो हा मसाल्यांचा व्यापार, दक्षिणेकडे का उत्तरेकडे….नव्हे माझ्या फ्रिज च्या दारात.

साधारणपणे निरीक्षण केल्यास प्रत्येकाच्या घरचे फ्रिजचे दार मसाल्यांच्या पुड्क्यानी ठासून भरलेले असते. माझे हि असतेच. काय करणार काळाची गरज झाली आहे. ह्या शिवाय वेगवेगळे मसाला कीपर ओट्यावर ठाण मांडून असतातच. मी जशी नेट वर खाद्य प्रकार शोधत असते तसेच घरचे पण नेट वर असतातच कि, त्यांच्या हि नेट वरच्या फर्माईशी असतात त्या नुसार अनेक खाद्य संस्कृतीची ताळमेळ घालताना माझा फ्रिज चा दरवाजा भरून जातो.

महाराष्ट्र म्हंटले तरि केवढे मसाले असतात. कोल्हापुरी पदार्थाला तोच मसाला लागतो, कोकणी पदार्थांना त्यांचाच मसाला लागतो, सी के पी, मालवणी, साताऱ्याकडचा, नागपुरी अशा सर्व महाराष्ट्राची चव पावलो पावली निराळीच असते. त्या पुढे मग दक्षिणेकडचे, पंजाबचे, आसामचे, बंगालचे कित्ती आणि काय काय असतात. एवढे सगळे थोडक्यात कसे सांगु मी माझ्या शेजारणीला असे झाले. पुन्हा म्हणाली शो मी , आय लाईक टू सी.

मसाले वाढतात तसा फ्रिज हि लहान पडू लागतो, मोठ्ठा दाराच्या कप्यांचा फ्रिज असावाच लागतो. छोले करायचे झाले तर आपल्या काळ्या वाटाण्याचा मसाला कसा बर चालेल? काय सांगु मी? माझ्या विचारातच मी गुरफुटून गेले. तेव्हढ्यात माझा मुलगा आला, त्याला म्हंटले कि, ह्यांना जरा इंटरनेट वर आपले मसाले दाखव तो पर्यंत मी फ्रिज चा दरवाजा नीट करते. एलिझाबेथ नेट वरचा भारत बघू लागली. मी पटकन माझ्या हिमालायची आठवण यावी अशा उत्तुंग फ्रिजपाशी गेले.

गच्च भरलेला माझा फ्रिज, संपुर्ण आसेतु हिमाचल त्याच्या पोटात सामावून घेत होता. बर, ह्या मसाल्यांच्या पुड्क्यांच्या जागा हि नेहमी साधारण पणे ठरलेल्या असतात. पंजाबी, सांबार, चहाचा असे एका ठिकाणी, कधीतरी लागणारा रस्सम मसाला हा जरा मागे, खूप काही जागा अशी दरवाज्यात नसतेच. दोन दोन ओळीच बसतात त्या मोजक्या दोन ओळीच्या अनेक डब्यात  माझ्यातील अन्नपूर्णा चे रहस्य दडलेले असते. कितीही व्यवस्थित ठेवले तरि, भारतीय संस्कृती कधी एकमेकांशी मिळून मिसळून जातात आपल्यालाही पत्ता लगत नाही. व्हेज, नॉन व्हेज मसाले हा हि सवतासुभा एकत्र नांदत असतो. त्यात भार म्हणजे चायनीज, रशियन आणि कुठल्या कुठल्या सलाड ड्रेसिंग, मसाल्यांच्या बाटल्या ह्याच दारात ठेव्याव्या लागतात. एकंदरीत काय विविधतेत पण सुजलाम सुफलाम असतेच.

बाहेरून मुलाचा आवाज आला, आई नेट वरती फ्रिज चे कप्पे छान दाखवलेत. भरभर इकडे तिकडे दाटुन भरलेले सामान म्हणजे वेगवेगळी लोणची आणि चटण्या आवरत बसले. इतकं सार भारतीय पोटाकरता लागतं, हे पटवून सांगायचय मला हा प्रश्न उभा ठाकला. नेट वरती घरच खा, आपलंच जेवण करा, न्याहारी करा कशाला परदेशी बाबी अनुकरण करता  अश्या सल्यांने माझे परिवर्तन होताच असते. म्हणजे ओघाने थालीपीठ, घावन, डोसे, अशी सगळी पीठे फ्रिज मधेच असतात. काय काय सांगु, आणि कुठे काय आवरू…

मी शाळेत शिक्षिका आहे त्या मुळे साहजिकच आठवडी सुट्टीला नेट जास्त पाहणे होते त्या मुळे आठवड्याचा बेत , त्याची तयारी ठेवायला फ्रिज आहेच. अनेक विचारातून, सहज लीलया हाताने आवरत होते. कशाला एवढे मसाले लागतात, एक बेसिक मसाला करायचा बस्स झालं. असे मत पण सर्वांच्या प्रभावाने होतेच. बेसिक तरि का करा, साधा डाळ भात आणि भाकरी, भाजीने आत्तापर्यंत तब्येत उत्तम ठेवलीच आहे कि, पुन्हा माझे लक्ष मिसळणाच्या डब्याकडे गेलंच.

एव्हाना मुलाने बाहेरून आरोळी ठोकली, त्या किचन मधे येत आहेत ग…… माझा फ्रिज बघून म्हणाली, टू मच बिग, उघडून म्हणाली, आहा! फुल्ली लोडेड…. मी येस म्हंटल, वुई लाईक इट ऑल. एलिझाबेथ येस, येस म्हणाली… मग मला म्हणाली, तिची होणारी सुन इंडिया ची आहे. ते दोघे तिकडेच आहेत. ते हि मोठा फ्रिज शोधत आहेत. तरिच हि सासुबाई चौकशा करण्यास आली. घेऊ देत, घेऊ देत, भरल्या फ्रिज चा तोंड भरून आशीर्वाद दिला. तिचाही संसार असाच भरून राहु देत.

आपला आल्याचा, दुधाचा चहा घेऊन ती निघाली. पुढच्या आठवड्यात ती आणि तिचा नवरा त्यांची जागा सोडून दुसऱ्या देशात जाणार आहेत. तो पर्यंत भारत मसाल्यांचा व्यापार करीत असे हा इतिहासातला प्रश्न मी  फ्रिज च्या मदतीने सोडवत राहणार हे निश्चित्त आहेच. आपला वैभवशाली इतिहास असाच सर्व दुर पसरो अशी प्रार्थना करत अन्नपूर्णे पाशी सांजवात लावली आणि साध्या दही भाताचा बेत रात्री करता ठरवून टाकला..

फ्रिज

ती होतीच अशी , 

1mother-and-baby-pencil-drawings-2925853

ती होतीच अशी ,

अजूनही कुशीतली तिच्या ,

आठवण ठेवते जागी ..

औक्षण करताना पाही मला,
असे इकडे तिकडे माझा डोळा,
उब त्या ताम्हणाची असे माझ्या करता….

वाट पाहे दारी माझ्या येण्याची,
उपाशी असुनही दिसे समाधानी,
भरल्या पोटी मी येई परतुनी….

दृष्ट माझी काळजीने काढी नेहमी,
मी हि हसत असे जुन्या अंधश्रद्धा नी ,
हात जोडे माझ्यासाठी देवापाशी….

येताच मी दारी हास्य तिच्या अंतरी,
माझे सामान मी माहेरी शोधत राही,
गरम घास माझ्या मुखी ती घालत राही…

निघताना माहेरहुनी मी झडकरी,
डोळे तिच्या दाटे प्रेम पाणी,
भरुनी जाई माझी ओटी तिच्या नजरेनी…

माझ्या श्वासासाठी उच्छ्वास झाली ती,
हसणे होते माझे कारण ती होती,
आई होती म्हणुनी मी सानुलीच राहिली ..

आठवण न आली दिस सरेना कधीही,
कळले सारे ती दुर गेल्यावरती,
देवा बाप्पा च्या घरातुनी पाहते मलाच ती…..

काव्य रचना…
अनुजा पडसलगीकर.

 

ह्या सम हाच….

images (15)

कित्ती येतील आणि जातील..पण वर्षानुवर्षे, पिढ्यानपिढ्या जपला जाणारा, आपुलकीचा, भरल्या संसाराचा तो हाच.. स्टील चा गोल आकाराचा मसाल्यांचा डब्बा. कोणी ह्याला मिसळणांचा डबा म्हणत, तर कोणी तिखटा मिठाचा डबा म्हणत. काहीही म्हणा पण प्रत्येक घरात असणारा हा स्वयंपाक घराचा अविभाज्य डबा आहे. हा डबा जर माहेरून रुखवतात आला असेल तर त्याची बडदास्त असतेच. आईने मसाल्यांची ओळख करून दिलेले काही भावपूर्ण क्षण ह्यात गुंतलेले असतात.

स्वयंपाक सुरवात करण्यापूर्वी, आईने हा डबा कसा हळुवार पणे हाती घ्यावा ह्याचे धडे गिरवून घेतलेले असतात. डब्याची हाताळणी हि अगदी काळजीपूर्वक करावी लागते. डबा कपाटात हाती सहज असावा. शक्यतो उजव्या बाजूस जवळच्या कप्यात तो असतोच. तेल गरम होताना, सराईत पणे अलगद आडवाच धरून बाहेर काढूणे आणि मसाले एकमेकात मिसळणार नाहीत ह्याची खबरदारी हि गृहीतच असते. जर काही गडबड झाली तर आईचे वैतागणे ,कसा संसार करशील? किती तो धांदरटपणा? अशी गोंधळात भर टाकणारी हमखास काळजी व्यक्त होतेच. प्रत्येक मुलीने ह्याचा अनुभव एकदातरी घेतेलेला असतोच.

ह्याच डब्यात नियम तरि किती, जणु काही सासरी काटेकोरपणे राहावे म्हणून असलेला सराव असावा. हळदीचा चमचा, तिखटात घालयचा नसतो. मोहरीचे स्थान केंद्र स्थानीच हवे. जिरे मग तिखट, हळद ह्यांच्या मध्ये गोडा मसाला असणे क्रमप्राप्तच असते. हळदी नंतर धणेजीरे पुड, नंतर मेथ्याचे दाणे, कोणी मीठ मध्यभागी ठेवतात. नंतर इतर मसाले जे नेहमी लागतात.

गृहिणींचे वैतागणे हे धुसमुसत ह्या डब्यांच्या झाकणावर निघते. झाकण हे सासर आणि डबा म्हणजे जणु काही माहेर असे एकंदरीत सात वाट्यांचा हा सरंजाम सात पिढ्यांचे नाते जपत असतो. सात जन्मांचे नाते उलगडून देत असतो. अलगद, हळुवार पणे संसाराच्या स्वयंपाकात रंगीबेरंगी, सर्व चवींची लज्जत जपणे ह्याचे समर्पक उदाहरण म्हणजे हा मसाल्यांचा गोल डबा होय.

हाच डबा त्या गृहिणीचे, पण उत्तम राखतो. जिरे ,मोहरी सारखा छोटा पदार्थ सहज पणे निदान आठवड्यात एकदा तरि चिमुटभर तोंडात टाकला तरि  नकळत पणे मोठ्या व्याधींना प्रतिबंध करतो. तसेच त्या घराचे आरोग्य सुद्धा योग्य प्रमाणात मसाले असल्याने उत्तम राखतो.

पत्नी माहेरी जाताना आठवणीने सांगते, मसाल्याच्या डब्यात सर्व काही भरून ठेवले आहे,त्या चमच्याच्या प्रमाणात मसाले वापरा. आणि हो डबा नीट उघडा आणि नीट ठेवा.

हा डबा हाताच्या स्पर्शाने कधीतरी खराब होतो लगेच त्याच्या वाट्या रिकाम्या करून स्वच्छ केला जातो. बरबटलेला डबा आणि त्याचे झाकण लक्ख म्हणजे नीटनेटका संसार असे ओळखण्याचा एक अबोल पुरावा असतो. डबा कसा नेहमी भरल्या संसारा सारखा असावा. फ्रिज मध्ये दरवाजा भरून मसाल्यांची भारंभार पुडकी असली तरि, पहिला हाच डबा उघडला जातो.

काळाची आधुनिकता म्हणून, निरनिराळ्या आकाराचे, निरनिराळ्या धातूचे मोहक असे मसाला डबे आले तरि, गोल आकाराचा स्टील चा डबा हा अबाधित अस्तित्व राखून राहणार. आईच्या स्पर्शाचा, तिच्या आठवणींचा हा डबा लेकीच्या संसारात सदैव रंगत आणतच राहणार. ह्या सम हाच…

कोवळी हिरवाई…

 

 

images-11

कोवळी हिरवाई…

हिरवाई नेहमीच मनास भावते. आधुनिक जगाच्या स्पर्धेत लहान मुलेच काय पण अनेक मोठ्ठी माणसे देखील मोबाईल वर शेतीचा खेळ खेळताना दिसतात. प्रत्येकाला हिरवी जमीन लाभते असे नाही. मनात दडलेली सुप्त अशा हिरवाईची आवड हि अनेक ताण तणावातून मोकळा श्वास घ्यायला शिकवते.

हल्ली प्रत्येक शाळा हि अत्याधुनिक होत असताना दिसते. मुलांच्या हातात TAB संगणक, स्मार्ट बोर्ड, वर्ग सुद्धा वातानुकुलीत, सुट्टीचा डब्बा सुद्धा ब्रेड, पिझ्झा, बर्गर असा पटकन संपणारा, भरमसाठ फी आणि वर्गात मुल सुद्धा मर्यादित असे साधारणपणे चित्र दिसते. एकच गोष्ट अजून फारशी बदलली नाही ती म्हणजे मुलांच्या बसण्याच्या लाकडी खुर्च्या, ह्या सुद्धा बदलून गुबगुबीत खुर्च्या येण्यास वेळ लागणार नाही.

अशा वर्गात निसर्ग असतो स्मार्ट बोर्ड वर, त्यांच्या हातातील TAB वर, खेळाची मैदाने पण सुंदर अशा गवताने आच्छादलेली असतात. मातीचा स्पर्श नाही, धुळीचा अनुभव नाही. कसं वाढणार निकोप मन, सुदृढ शरीर आणि मोकळा स्वभाव. पालक म्हणून आपण अशाच शाळा निवडतो कारण जगाच्या स्पर्धेत मुलांना जगायचे आहे. इतक्या कृत्रिम परिस्थितीत सुद्धा पालक म्हणून आपल्या बाळाचे आयुष्य छान घडवता येते.

मानसिक शास्त्राच्या अभ्यासानुसार मुलांना नेहमी वाढणाऱ्या रोपट्याचे मित्र बनवा. घरात, घराच्या गच्चीवर अगदी घरात सुद्धा त्यांच्यासाठी, त्यांच्याकरता छान छोटी छोटी अशी रोपे लावा. मुल झाडाबरोबर मनाने, डोळ्याने, स्पर्शाने संवाद साधते. जगदीश चंद्र बोस ह्या शास्त्रज्ञानी झाडांना संगीत समजते असा प्रसिद्ध सिद्धांत मांडला आहेच. जशी झाडे प्रतिसाद देतात तशीच मुलांची कोवळी मने निसर्गाच्या समवेत सुखावतात. मोठ्या माणसांना पण हि प्लांट थेरेपी खूप उपयोगी पडते. एक तरी झाड मुलांकडून घरात लावा, मुल त्याची काळजी घेतील. संगणकावर अधिक माहिती मिळवतील. मुलांना छान घडवण्याचा अगदी सहज सोप्पा हा उपाय आहे.

शाळेत शिक्षकांनी निसर्ग क्लब बनवून मुलांनी वाढवलेली झाडे, रोपटी ह्यांचे छानसे प्रदर्शन भरवुन, उत्तम झाडांसाठी स्पर्धा ठेवावी. शाळेच्या जागेत, गच्चीत फळबाग, परसबाग फुलवावी. ह्या उपक्रमाच्या उत्पादनाची विक्री ठेवावी म्हणजे बाजारपेठ, हिशोब आपोआपच विद्यार्थ्यांना समजतील.

एका झाडाचा अभ्यास म्हणजे  जवळ जवळ सर्व विषय समावेशक अभ्यास असतो. झाडाचा इतिहास, आवश्यक असणारी भौगोलिक परिस्थिती, झाडांवर होणारे रसायनाचे दुष्परिणाम, जीवशास्त्र म्हणजे झाडाचा इतिहास म्हणजे मुळ स्थान कुठले, जीवशास्त्रीय नाव वैगरे अशा अनेक विषयांचा अभ्यास करणे होय.

Post-Traumatic Stress Disorder (PTSD) म्हणजे अत्यंत क्लेशकारक मानसिक ताण, कधीकधी घरातील वातावरण आणि आर्थिक अडचणी, पालकांच्या अवास्तव अपेक्षा, मुलांच्या भोवतालची त्यांना त्रासदायक वाटणारी अशी परिस्थिती या सर्व गोष्टींमुळे विद्यार्थ्यांच्या मनावर खूप ताण येतो. (PTSD) अशी क्लेशकारक घटना घडण्यापूर्वीची ही काळजी एखादे छोटेसे झाड घेते. झाडांच्या जवळ मुल असल्यास अति ताण त्यांच्या मनावर येत नाही.

घरातील कुंडीतील रोपटे वाढताना त्याची वाढ नोंद करण्यास शिकवावी, त्यांचे आजार, रोग ह्यावर उपाय सांगावेत, घरी आपण नसल्यास झाडांना पाणी कसे पुरवावे ह्या साठी घरगुती ठिबक सिंचन समजावुन सांगावे. परसबाग अभ्यासक्रमाची ओळख मुलांना सुद्धा करून द्यावीत. सेंद्रिय भाजीपाला स्वतः लावल्याने त्याचे आरोग्यदायी महत्व हि मुलांना कळते. झाडाचे पान आपण तोडु शकतो पण परत जसेच्या तसे झाडाला जोडू नाही शकत अशी पर्यावरणपुरक मनोधारणा मुलांची तयार होते.

अगदी छोट्या वयापासून सुरवात करावी, मोठ्या मुलांसाठी जशी जागा उपलब्ध असेल तसे त्यांनाच इंडोअर किंवा आउटडोअर गार्डन प्लान करावयास सांगावा. असे अनेक पर्याय आहेत पुन्हा निसर्गाकडे वळण्याचे आणि ह्या मुळे मन,शरीर आरोग्यपूर्ण राहतेच. भाजीपाला, फळझाडे, फुलझाडे लावण्याचे अनेकविध प्रकार सध्या विकसित झालेले आहेत त्यांचीही ह्या निमित्ताने माहिती घेता येईल.

एकच छोटेसे झाड मुलांच्या विकसित होण्याच्या प्रक्रियेत मदत करते. मुलांना आपल्या घरातील बाग हि नेहमीच आवडत असते. शेती बघण्यासाठी, एक दिवस निसर्गात रमण्यासाठी हल्ली बरेच जण शेती सहल करत असतात. अशा भेटी देऊन मुलांचे ज्ञान वाढते. त्यातलाच एखादे रोपटे घरी लावले तर मुलांच्या मनात ममत्व निर्माण वाढीस लागते. शाळेच्या गृहपाठ साठी किंवा खेळण्यासाठी मुळे सतत इलेक्ट्रोनिक्स किंवा इंटरनेट च्या माध्यमात सतत असतात. कृत्रिम जगापेक्षा अधिक सुंदर बाहेर जग आहे ह्याची जाणीव त्यांना होत नाही. अशा वेळी आलेला ताण हा कमी करण्यासाठी घराच्या झाडांजवळ गेल्यास खूप बरे वाटते.

आपल्या घरातील बाग समजा घराच्या खिडकीत असेल तर तिथे मुलांशी झाडांबद्धल संवाद साधा. मुलांनी कशी उत्तम काळजी घेतली आहे ह्याचे कौतुक आवर्जून करा तसेच मार्गदर्शन हि करा. छंद म्हणून लावलेले छोटेसे रोपटे मुलांनां सकारात्मक बनवते. हसरे बनवते. आनंदी ठेवते. एक तरि छोटे झाड आपल्या मुलांना त्यांचे स्वःताचे म्हणून भेट द्या. मुलांना सांगुन त्यांचा असा एक बागेकरता ग्रुप बनवा. एकमेकांच्या घरी ह्या कारणांसाठी एकत्र येणे मुलांचे होईल. विचारांची देवाणघेवाण होईल. छंद गटात त्यांची अधिक जाणून घेण्याची जिज्ञासा वाढीस लागेल.

छोट्याश्या इवल्याश्या पानातील कोवळी हिरवाई आपल्या मुलांची कोवळी मने निश्चीत्तपणे जपते. आधुनिक जगात हरवत चाललेला मोकळा श्वास मुलांना सहज मिळेल आणि पालक मुलांचा संवाद हि वाढेल. एक तरि झाड मुलांसाठी निश्चित्त लावा.

अनुजा पडसलगीकर.शारजाह     More

Previous Older Entries