घर……पर्यावरणाला साजेसे.

आपले संपूर्ण घर पूर्णपणे एका जागेवरून दुसरीकडे हलवता येते. अर्थात हे घर म्हणजे पोर्टा केबिन ची घरे. भारतात टेलिफोन चा बूथ नेहमी बघण्यात येतात, ऑफिस मध्ये पण पोर्टा केबिन दिसून येतात. परंतु अशी घरे असतात हे ऐकून माहिती होते. प्रत्यक्षात कधी जवळून बघणे किंवा त्यात राहणे असा योग जुळून आलेला नव्हता.

मस्कत मध्ये आल्यावर ट्रक वरून जाणारे हे घरासारखे काय आहे? ह्याची उत्सुकता वाढली. धनंजय नोकरीकरता काही काळ साईट वर होते तेंव्हा अशाच केबिन मध्ये राहत होते. ज्या ठिकाणी ते राहत होते त्या ठिकाणी जाण्याचा योग आला तर हजारो व्यक्ती बरेच महिने वास्तव्य करून राहत होत्या ह्याचा मागसुम नव्हता. कारण आख्खे शहर दुसऱ्या ठिकाणी हलवले गेले होते. जमीन पुन्हा पहिल्या सारखी होती कुठलीही हानी न पोहचता. अशा वसाहती म्हणजे एक परिपूर्ण शहर होते. सुख सुविधा ज्याच्या त्याच्या कामाच्या ग्रेड प्रमाणे त्यांच्या घरात उपलब्ध होत्या. अशी घरे पाहण्याची संधी इथे सहज मिळते.

कालच बातमी पहिली कि. पुण्यात अशा घराचे प्रदर्शन सुरु आहे. तेंव्हा पहिले तर हि तर पोर्टा केबिन ची घरे पण दोन कोन्क्रीट च्या स्ल्याब मध्ये इन्शुलीन म्हणून हार्ड असे थर्माकोल ठेवून ते पूर्णपणे संरक्षित केले होते. अशी घरे वादळात पडत नाहीत कि पुरात डूबत नाहीत.

इथे असेच काहीसे तंत्राद्यान वापरून आग, पाणी,प्रखर उन ह्या पासून पूर्णपणे असे संरक्षित अशी घरे नव्हे तर आख्खे एक शहर उभे असते. मस्कत मध्ये अशा प्रकारच्या वसाहती ज्या ठिकाणी काम सुरु असेल तिथे असतात. दुकाने, दवाखाने, क्लब हाउस, अगदी बाग सुद्धा इथे उभारली जाते. जवळ जाई पर्यंत खरेच वाटत नाही हि घरे कधीही हलवली जाऊ शकतात. सुरेख अशी बांधणी, आकर्षक अशी रंगसंगती आणि अशा घरात आपण दिनदर्शिका सुद्धा भिंतीवर खिळे ठोकून अडकवू शकतो. छोट्या छोट्या सोयीनी ह्या घराला त्याच्या भिंतीना हानी पोहचवू शकत नाही. अगदी छान अशा कोन्क्रीट च्या रस्त्यासकट.. सर्व सोई असतात.

जेंव्हा तिथला प्रोजेक्ट संपतो तेंव्हा हे शहर उचलून दुसरीकडे नेतात. जागा मोकळी होते. कुठलेही नुकसान नाही, खर्च नाही आणि किती आरामदायी घरे असतात. ह्या घरांचा खर्च हि आपल्या साध्या घर पेक्षा निश्चित कमी असतो. कायम स्वरूपी सुद्धा राहण्यासाठी अशी घरे परदेशात नव्हे तर भारतात सुद्धा उपलब्ध आहे. पिढ्यान पिढ्या टिकणारे हे घर असते.

सध्या फार्म हाउस बरीच दिसतात. कधीतरी विकांताला राहणे होते. प्रचंड खर्च करावा लागतो, त्यापेक्षा अशी टुमदार घरे आणली तर जागेवर कुठल्याही ठिकाणी हे घर सहज हलवता येते. जमिनीवर पण कायम स्वरूपी बंदिस्त करता येते. जमिपासून उंच अशा जागी पण ठेवता येते. पर्याय आहेत पर्यावरणाचे, पण अमलात आणण्यास हवेत. बिल्डर लोकांनी ह्या घरांना प्राधान्य देणे आवश्यक आहे. अगदी आशियाई वातावरणाला सुद्धा पूरक अशी घरे आहेत.

हि घरे प्लास्टिक चा अनुभव देत नाहीत. अत्तिशय सुंदर रंगात, उत्कृष्ट अशा फरशीच्या रंगसंगतीत हि घरे म्हणजे कोकण च्या कौलारू घरा इतकी छान वाटतात. दरवर्षीचा विकांताच्या घराचा देखभालीचा खर्च खूप प्रमाणात कमी होऊ शकतो. शिवाय हे घर पाहिजे तिथे सहज सोप्प्या पद्धतीने हलवू शकतो. आशियाई वातावरणाच्या बदलांपुढे हि पोर्टा केबिन ची घरे किती टिकाव धरू शकतील हि शंका प्रदर्शनात व्यक्त केली गेली. परंतु पर्यावरणाचा विचार केला तर असे प्रयोग निश्चितच उपयोगी पडतील. अजूनही भारतात अशी घरे सहज दिसत नाहीत. बरेच जण एखादे तरी शेतातले घर असावे ह्या साठी प्रयत्नशील असतो, बरेचसे बिल्डर अशी घरे उपलब्ध करून देत असतात. पुण्यात ह्या प्रदर्शनाला प्रतिसाद तरी भरघोस मिळाला पण एखाद्या बिल्डर ने जरी अशी संकल्पना प्रत्यक्षात आणली तर पर्यावरणाचा ह्रास कमी होईल असे स्वप्न बघायला हरकत नाही.

अशा घरांना वाळवी ते अन्य प्रकारच्या हानिकारक कीटकापासून सहज वाचवता येते. कौलारू छत पण देखभालीच्या प्रचंड काळजी ची काळजी न करता बसवता येते. टुमदार घर हे स्वप्न खूप कमी खर्चात आणि पिढ्यानपिढ्या जपून ठेवणे शक्य आहे हवाय फक्त असा बदल स्वीकारण्यासाठी मानसिकता आणि अशा घरांची सहज उपलब्धता. परिपूर्ण माहिती देणारी अशी उत्पादने आपला आणि धरतीचा ताण कमी करू शकतात.

मी जर कधी फार्म घेतले तर, सहज, सोपे, भक्कम, पूर्ण संरक्षित असेच पोर्टा केबिनचे टुमदार घर ठेवणार…. असा विचार करण्यासाठी अशा घराची हि छोटीशी पोस्ट

रुखवत……आठवणी मनातल्या

‘रुखवत’ हा जिव्हाळ्याचा कोपरा सामन्यपणे प्रत्येक घरात मुलीचे लग्न ठरले कि चर्चिला जातो. मुलीच्या नकळतपणे तिच्या आईने कधीचीच रुखवताची मांडणी मनात केलेली असते. स्टील ची भांडी…कळशी, घागर, पिंप पासून ते अगदी वाटी चमच्या पर्यंत मांडावे ह्या साठी आईची घालमेल होते. कलाकुसरीच्या वस्तू तर फारच उत्सुकतेने सर्व पाहत असतात. आई कडून मुलीला हा कला कौशल्याचा वारसा आलेला असतो.

माय लेकी, मावशी, आत्या, काकू असा सगळा समस्त स्त्री परिवार जातीने लक्ष घालून हा कोपरा लग्न ठिकाणी छान सजवून ठेवतात. माझ्या आईने तिच्या रुखवतात आणलेले भिंतीवरचे चंदेरी टिकल्यांचे , पोटात गुबगुबीत कापूस घालून दोन ससे, काळ्या अशा कापडावर अजूनही दिमाखदार विराजमान आहेत. अशीच मोराची जोडी, हरणाची जोडी थोडक्यात काय पण मर्यादित शृंगाराच्या फ्रेम्स संसार कसा उत्फुल्ल सदा बहार करावा हे आईचे रहस्य कन्येला हळूच सांगत असाव्यात.

कोणे एके काळापासून हि रुखवताची पद्धत पिढ्यानपिढ्या आहे. मुलीला चपखलपणे संसाराची गुपिते सांगणारा हा कोपरा केंव्हाही व्याकूळ होतो. जेवणाच्या ताटाची मांडणी धाग्यात गुंफून सुरेख असे ताट लेकीला सणावाराला निश्चितच मार्गदर्शक असे असायचे. सप्तपदीची पाऊले तिला सात पावलात तुला तुझे घर कसे अलगद सांभाळायचे आहे असेच सूचित करते. आईचे कौशल्य मुलीत पण आहे हे सांगणारा हा कोपरा मांडण्यासाठी माहेर आणि तो उचलून नेण्याची जवाबदारी मात्र सासरची.

आता तर ह्या रुखवताची दुकाने सजली आहेत. नेट वर रुखवताचे भरमसाठ फोटो आहेत. आईच्या माहेरचा चंद्र, तेच ससे, हरणे, तिने विणलेला रुमाल मात्र मला सापडला नाही. बाजाराच्या वस्तू ‘पावला पासून ते डोली पर्यंत’ सर्व काही सहज उपलब्ध आहे. अजूनही बऱ्याच घरातून ह्या जुन्या काळच्या फ्रेम्स आहेत. त्यात त्या घरचा जिव्हाळा आहे. बाजारातून वस्तू आणून टेबल सजवणे खरच गरजेचे आहे का? ह्या गोष्टीत आईचा पैसा खर्च होतो. हल्लीच्या आधुनिक राहणीच्या संकल्पनेत ह्या कौतुकाच्या गोष्टी ठेवायला जागा आहे का?

माझ्या लग्नात रुखवत नव्हते. कारण मला कलाकुसरीची आवड नव्हती. आईने खूप शिकवायचा प्रयत्न केला. तिचे भरतकाम चे शिकवणी वर्ग घरात असायचे. सगळे जण माझ्या कडे पाहून म्हणायचे अरेवा!! तुमच्या मुलीला सर्व काही येत असेल, मला हि बोलणी असह्य व्हायची, याचा परिणाम म्हणजे मी ह्या पासून मनाने दूर दूर जाऊ लागले.

खेळात तरबेज होते अगदी पारितोषिके पण मिळवली. गणपतीचे, दिवाळीचे सर्व सणांचे डेकोरेशन उत्तम करत असे. शास्त्र, भूगोल विषयंची मॉडेल्स पण राज्य स्तरावर नावाजली जात होती. माझी प्रमाणपत्रे, फोटो लावून आपण माझ्या लग्नात असे रुखवत मांडूया. हीच रुखरुख आईच्या मनात कायम होती. माझे घर थाटल्यावर तिने मी एका फ्रेम मध्ये किंचित असा सहभाग घेतला होता ती फ्रेम कौतुकाने जावयाच्या हातात दिली.

मुलींचे लग्न ठरेपर्यंत त्या शिकत असतात. स्वयंपाक करणे ह्याला सुद्धा वेळ मिळत नाही तर कलाकुसर तर कोसो दूर कि बात…. मुलीला जात्याच आवड असेल तर, कदाचित छंद म्हणून कलागुण संपन्न अशी वाग्दत्त वधू म्हणून सज्ज होईल. पण हे प्रमाण सध्या च्या युगात फारच अल्प आहे.

संसाराचा रथ मुलगा मोठा झाल्याने जरा स्थिरावला आहे. स्वतःकरता वेळ मिळू लागला आहे. अचानक मला नेट वर शोधाशोधीत बरीच कलाकुसर पाहायला मिळाली. स्वतःचा अंदाज घेत एकेक करून पाहावे असा धाडसी विचार मी अमलात आणला. आई, मी भरतकाम, विणकाम ह्यात लक्ष देत नसे म्हणून कधीही माझ्यावर नाराज झाली नाही. मी नक्कीच करेन हा विश्वास तिला होता. नातेवाईक जरी काही म्हणायचे तरी ती लक्ष द्यायची नाही. मला नेहमी प्रोत्साहन द्यायची, म्हणायची अग, हरकत नाही हे सर्व करण्यास तुला संसारात नक्की कधीतरी वेळ मिळेल. कॉलेज मध्ये तुझी स्वतःची ओळख केलीस हे हि मला आवडते.

कागदाच्या लगद्यापासून मी पूर्वी मॉडेल्स बनवत होते तेच तंत्र वापरून मी फ्रेम्स करू लागले. इतरही माध्यमे मला खुणावू लागली, तांब्याच्या पत्रा. क़्विलिन्ग, पंच आर्ट, वाळू, तैल रंग वापरून माझी घोडदौड सुरु झाली. माझ्या सारख्या इथे बऱ्याच माझ्या मैत्रिणी आहेत त्यांना एकत्र केले. मुलांचे हिवाळी सुट्टीचे वर्ग सुरु केले. नागाच्या काही मूर्ती करून नागपंचमीस विकण्यास ठेवून त्याचा नफा समाजाकरता पाठवतो. काही एन जी ओ मार्फत आमची कलाकुसर इथल्या मुलांना पण शिकवतो. आम्हा मैत्रिणींचा वेळ असा सत्कारणी व्यतीत होतो.

आईची इच्छा, माझे घरकुल सजलेले असावे, तेही माझ्या मेहनतीने काही अंशी तरी फलद्रूप झाले. आईला मांडू न दिलेले रुखवत, माझी कला, सुप्त राहिलेली आवड आज दिमाखदार पणे घराच्या आनंदात सामील आहे. अजिंक्य व धनंजय च्या प्रोत्साहना मुळे मी कला विश्वात रमले….

मनातले रुखवत मलाच सापडले..

(माझ्या कलाकुसरी करता ज्या साईट वरून कल्पना घेतल्या, त्या सर्व कलाकारांचे जाहीर आभार….राजस्थानी स्त्री कागदाचा लगदा वापरून तयार केली. फुलदाणी आणि फुले हि कणकेने तयार केले, मासे हे क्विलिंग ने तयार झाले. आणि फ्रेम हि तांब्याच्या पत्र्याने तयार केली. अजून हि अनेक माध्यमात मी काही कलाकृती तयार करण्याचा प्रयत्न करत आहे. आपणाला आवडल्या असतील तर जरूर कळवा…. )

बोम्माई कोलू…….

नवरात्रीची लगबग सुरु झाली. कुठे गरबा, तर कुठे नव अंकुर चे घट मनात सजू लागले आहेत. वेध शक्तीच्या उपासनेचे, स्त्री शक्ती..आदिमाता. अशी कि आपल्या बरोबर आपल्या परिवाराचे, गावाचे, देशाचे सर्वांचे कल्याण करते. अष्टावधानी असेलेली स्त्री, नवरात्र साजरे करते. तमिळनाडूत पण नवरात्र बोम्माई ‘कोलू’ किंवा ‘गोलू’, ह्या नावाने नवरात्र साजरे करतात. ह्या कोलू चे वैशिष्ट्य म्हणजे साधारण पणे महाराष्ट्राच्या चैत्र नवरात्री सारखे असते. अनेक बाहुल्या, देवता सात, नऊ, अकरा अशा पायऱ्या करून त्यांच्या माना प्रमाणे विराजमान केल्या जातात.

मुलीच्या लग्नाच्या वेळेस तिची आई एक बाहुली, जी लाकडाची असते( औषधी लाकूड ) ती त्या मुलीकडे गोलू करता देते आणि त्या नंतर ती अनेक बाहुल्या गोळा करून स्वतःचे गोलू साजरे करू लागते. गोलू नऊ दिवस करतात किंवा शेवटचे तीन दिवस गोलू मांडतात. गोलू मांडायचे कसे ह्याचे पण एक शास्त्र आहे, पद्धत आहे. गोलू म्हणजे, बाहुल्यांची पायरी,टप्प्याच्या अनुषंगाने केलेली मांडणी. सर्वात वर कलश ठेवला जातो. त्याच्या आजूबाजूला देवींची अनेक रूपे, नंतर गणपती, विष्णू चे दशावतार च्या सुरेख , मुरगम, कृष्ण, राम सीता, हनुमान असे ३३ कोटी देवांचा जणू काही स्वर्ग उभारलेला असतो.

गोलू जेव्हढे समृद्ध तितके ते घर सुखी समाधानी होते. देवांच्या ह्या दरबारात व्यापारी, शेतकरी, वाणी, लोहार, कुंभार असे विविध जाती जमाती चा जणू काही मानवाच्या कौशल्याचा, मानवाने केलेला सन्मान म्हणून नम्रतेने देवाच्या दरबारात त्यांच्या नंतर पायरी- पायरी खालीखाली मांडतात. विशेष म्हणजे ह्या जाती जमातीच्या मायंदळीत प्राण्यांना विशेष आपुलकीने बाग, झु निर्माण करून एका बाजूला मांडतात. बाग नसेल ह्यांचा गोलू पूर्ण होत नाही. थोडक्यात भूमी पासून स्वर्ग पर्यंत सर्व काही सृष्टीचे आहे ते छान जपले पाहिजे हा संदेश जणू काही देतात.

रोज रात्री आरती केली जाते. सरस्वती च्या पूजनाचा विशेष थाटमाट असतो. स्त्रियांना विशेष मान देतात. कुंकू, विड्याचे पान त्यावर कच्ची अर्धी सुपारी, छोटीशी भेट दिली जाते. पूजनासाठी आलेल्या प्रत्येक स्त्री च्या मस्तकावर तेलाची दोन बोटे का होईना पण लावली जातात आणि केस फणीने थोडेसे सारखे करून देतात.

राजाराणी किंवा मारापची, सरस्वती ह्या मूर्ती विशेष महाग असून त्या पारंपारिक असतात. गोलू कसे मांडावे ह्या करता वेगवेगळ्या थीम ठरवून त्या प्रमाणे त्यांची मांडणी करतात. उदा. समजा कौलारू घर आणि गाव हि थीम असेल तर गावातील विविध व्यवसाय, त्या गावाची विशेष देवता ह्यांची मांडणी करतात. उगाचच सर्व गोलू आहेत म्हणून भारंभार मांडत बसत नाहीत.

छोट्या छोट्या पोत्यातून किंवा भांड्यामधून धान्य ठेवले जाते. जर पाण्याची थीम घेतली असेल तर शंख, शिंपले सुरेखसा असा शांत निळा प्रकाश सर्व खोलीत असेल ह्याचे भान ठेवतात. जंगलाची थीम असेल तर प्राणी, पक्षी, विविध झाडे आवर्जून काळजीपूर्वक मांडली जातात. ह्या सर्व थीम करता स्थानिक तमिळ संस्था कडून स्पर्धा ठेऊन बक्षिसे दिली जातात. सहसा गोलू नाही असे घर नसते. दसऱ्याला कलश जागेवर हलवून, पुन्हा पुढच्या वर्षी करता ह्या सर्व दरबाराची रवानगी बंद खोक्यात केली जाते. अतिशय काळजीपूर्वक ह्यांना सांभाळतात.

‘सुंडल’ प्रसाद देतात, हा छोले, हिरवे मुग किंवा चवळी पासून बनवतात. ओले खोबरे, उडीद डाळ, कढीपत्ता, ह्यांची चटपटीत फोडणी दिलेली असते. नुसता पण खावासा वाटतो आणि शिवाय पौष्टिक पण असतो. अनेकविध गोड पदार्थ असतात पण ‘सुंडल’ हा विशेष मानाचा प्रसाद असतो.

सामाजिक रचना, पर्यावरणाचे महत्व आणि पौराणिक आधार ह्यांचा मनोहारी दरबार म्हणजे गोलू…… बोम्माई कोलू. सर्वाना आधार स्तंभ असणारी विश्व देवता ते गृह देवता ह्यांचा सोहळा म्हणजे तामिळनाडू चे नवरात्र. दरवर्षी मला ह्या नवरात्रीला भेट देण्यास मिळते,

नवरात्रीत माझा पोस्टद्वारा केलेला आई अंबामातेस नमस्कार!!!

नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा !!!!!!

हुक्का….शिशा…..आरोग्यास घातक.

नवाबी चित्रपटात, मुघल गोष्टीत नेहमी हुक्का किंवा शिशा डोकावायचा. तंबाखू च्या व्यसनाचा हा पण एक घातक प्रकार आहे. मस्कत मध्ये आल्यावर शिशा दिसू लागला. जगात सिगारेट सगळीकडे मुबलक आहे. इथे सिगारेट चे प्रमाण भर रस्त्यावर त्या प्रमाणात कमी आहे. कदाचित काही नियम असतील बहुतेक… किंवा मॉल मध्ये तर जाहीर धुम्रपान करण्याची सवय मी पहिली नाही. नक्कीच कायदा असणार.

ओमान मध्ये किंवा हल्ली बऱ्याच आखाती देशात सरकारने हुक्का संदर्भात कायदे केले आहेत. लोकांमध्ये व्यसनाची भयानकता जाणवून देण्याचे काम सरकार आणि अनेक अन्जिओ संस्था करत आहेत. ह्या घातक हुक्का किंवा शिशा ओढण्याकडे बंधने घातली जात आहेत.

वाळवंटातील रात्र अनुभवणे हि इथली परंपरा आहे. तंबू, बार्बेक्यू , कॉफी, नृत्य, संगीत अशा वातावरणात इथल्या सुट्टीच्या रात्री चा आनंद त्यात असणारा हा शिशा…. साध्या हॉटेल पासून ते पंचतारंकित पर्यंत, वाळवंटापासून ते समुद्र किनाऱ्यावर कुठेही विशेषतः रात्री हा शिशा घेऊन बसलेले काही ओमानी, लेबनीज , इस्रायली , युरोपिअन अशी लोक प्रामुख्याने दिसतात. ओमान मध्ये ओमानी स्त्रिया धुम्रपान किंवा शिशा ओढताना बाहेर दिसत नाहीत. इतर देशीय स्त्रिया दिसून येतात.

शिशा ओढणे हि परंपरा पूर्ण बंद करणे शक्य नाही परंतु जागरूकता आणण्याचे काम सरकार करत असते. शिशा च्या तळातील भागात पाणी घातले जाते, त्यावर भांडे ठेवून त्यात तंबाखू ठेवला जातो आणि वरती जळणारा कोळसा असतो. तंबाखू एकदम जळून खाक न होता धुराच्या रुपात नळीतून ओढला जातो. हा धूर सुद्धा आरोग्य नष्ट करतो.

भारतात पण जिथे मुघल जीवन शैलीचा अंमल अजूनही आहे त्या ठिकाणी कदाचित असेलही पण माझा अशा राज्यांशी फारसा संबंध आलेला नाही. चित्रपटात पाहिलेला, गोष्टीत वाचलेला हा शिशा नजरेस पडला. एक घातक पण फार पूर्वीची परंपरा म्हणून लिहिले.

जरूर लक्षात ठेवा——- तंबाखू हा आरोग्यास घातक आहे.

विमानातून दिसलेली मुंबई………

एरिअल फोटोग्राफी हि संकल्पना नवीन नाही. प्रत्येक वर्षी जून महिन्याच्या सुट्टी ची आवर्जून वाट पाहत असतो कारण भारतात यायचे असते. विमानाची खिडकी मागणे हे तर माझ्या मुलाचेच म्हणणे नसते तर मला हि खिडकी ची जागा हवी असते. खर तर तीन सीट ची रचना विमानात असते. तरी पण खिडकीजवळच्या दोन जागा मागून घेतो. काही वेळानंतर अस्पष्ट दृश होते , नंतर ढगातून विमान वर वर उंची गाठू लागते आणि अवकाशात तरंगू लागतो. असे असताना खिडकीचा आग्रह कशाला? तीच तर ओढ आहे…..

मुंबई जशी जशी जवळ येऊ लागते तस तशी नजर जमिनीचा खिडकीतून वेध घेऊ लागते. एव्हढासा जमिनीचा तुकडा दिसला तरी नजर आणि मन भरून येते. आतापर्यंत कधी फोटो काढले नव्हते, हे हि फोटो मोबाईल वरून काही सेकंदात काढले आहेत.

मुंबईचा हा भाग कुठला आहे हे समजले नाही परंतु हीच माझी मुंबई……. अजिंक्य ने मोबाईल वरून टिपून घेतली…..

हात जोडून मातृभूमी ला वंदन करतो आणि सुजलाम सुफलाम……. आठवून डोळे भरून येतात.

पुन्हा पुढच्या सुट्टीची वाट पाहतो………

गणपती बाप्पा मोरया…..

गणपती बाप्पा मोरया …..गणेश उत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा…
या वर्षी चे गौरी गणपतीचे फोटो….
दर्शनाला नक्की या….

भेसळ……..

सध्या टीव्ही वर बातम्या पहिल्या कि भेसळीची बातमी हटकून असतेच. प्रत्येक पदार्थात भेसळ करण्याचे प्रमाण वाढतच चालले आहे. दिवस सुरु होतो तोच भेसळीच्या चहाने, दुधाने… नायाहारीला सांजा, उपमा करण्याचे ठरवले तर रव्याच्या शुद्धतेची खात्री नाही. जेवणास भाजी हा तर अपरिहार्य घटक आहे. हीच भाजी रंगाच्या इंजेक्शन ने छान टवटवीत केलेली आहे का?? हाच संशय मनात येत राहतो. फळांची वाढ, त्यांचे पिकवणे हे रसायनाच्या मदतीने तर झाले नसेल न? किती किती म्हणून अस्वथता झेलायची? कुटुंबाचे, आपले स्वतःचे आरोग्य असेच उधळून टाकायचे? अनेक प्रश्नांनी मनात काहूर माजवले. स्वयंपाक घरात जाण्याचे मनच होईना.

प्रत्येक वेळी भेसळ पकडली जाते. गुनेह्गाराना अटक होते. आपण हळहळत बसतो कि कशातच आता शुद्धता राहिली नाही. असेच फक्त विचार करतो, ह्यावर चर्चा होते, परिसंवाद होतात. पुन्हा पहिले पाढे पन्नास ह्या उक्ती प्रमाणे पुन्हा भेसळीची बातमी येत राहते. ज्या गोष्टी आहार म्हणून घेतो त्यात अशी भेसळ म्हणजे आयुष्य कमी करून घेणे होय. ज्या गोष्टी आपल्या कडून हाताळल्या जातात त्यात पण भेसळ असली तर स्पर्शाने पण आपल्याला कातडीचे आजार उद्भवतात. दिवाळीचे रंग. होळीचे रंग. कुंकू, बुक्का इत्यादी घटक आपल्या सणाचे व संस्कृतीत असतातच. ह्या सर्व गोष्टी तर हानिकारक ठरतातच.

आपण काही करू शकत नाही का? हा अत्यंत प्रारंभीचा विचार आला. आपले स्वतःचे ह्या मध्ये काही योगदान होऊ शकत नाही का? नुसती चर्चा करून उपयोगाचे नाही. प्रत्येक गोष्टीची भेसळ आपण नाही थांबवू शकत. भेसळीला अटकाव करणे हे तर पोलिसांचे काम आहे. मी घरातून काय म्हणून यात सहभाग घेऊ शकेन. ह्या प्राथमिक विचारांनी हैराण झाले. माझी, माझ्या कुटुंबाची. समाजाची आरोग्य व आहार सुरक्षा अशी वेशीवर टांगलेली सहन करण्या पेक्षा काही विचार मला सुचले. इथे हि मस्कत मध्ये मॉल मधून हायब्रीड असलेल्या भाज्या मिळतात. त्यांना विशेष अशी रुची म्हणजे चव नसते. चकचकित भाज्या, फळे अत्यंत आकर्षक पद्धतीने ठेवलेल्या असतात. ह्या फळ भाज्यांची शुद्धता म्हणजे त्यांची वाढ हि रसायनाच्या मदतीशिवाय झाली आहे हे ओळखण्याचे मापदंड कोणते आहेत?

नेट वर शोधाशोध केली, काही जणाकडे चौकशी केली तर घरच्या घरी पण आपण भेसळ शोधू शकतो. हे उपाय आहेत तरी मुळ प्रश्न कायम राहिला कि शोध घेण्याची रसायने सहज उपलब्ध आहेत का? ह्या उपायाच्या मदतीने भेसळ ओळखणे प्रत्येक वेळी लक्षात राहिल का? माझ्या घरच्या वयस्कर मंडळीना हे जमेल का? असे अनेक उप प्रश्न पण निर्माण झाले. कठीणच वाटले. ह्या चा स्वंतंत्र अभ्यास करावा लागेल का? आधीच रोज काय नाविन्य पूर्ण बनवायचे हा महिला वर्गाचा अत्यंत जिव्हाळ्याचा प्रश्न आहेच, त्यात आत्ता भर पडली भेसळीची परीक्षा करत स्वयंपाक बनवायचा.

जाऊ दे काय होईल ते होईल, कशाला डोक्याला ताप करून घ्या. चांगल्या कंपनीचे उत्पादन घेऊया आणि मनस्ताप कमी करूया. सध्याच्या काळात आयुष्याची काय भ्रांत आज आहोत तर पुढच्या क्षणाला नसू. इथ पर्यंत विचाराची मजल जाऊ लागली. शेती उत्पादना करता मोजमापे, कायदे आहेत का? शेती अधिकाऱ्यांकडून तपासून पहिली जाते का? ह्या बाबत घरात बसून शोध घेणे अवघड आहे. शेती खात्यात पण भ्रष्टाचार बोकाळला असेलच. शेतीत आपल्या उत्पादनाकरता रासायनिक खतांचा वापर केला जातोच पण फळांवर, भाज्यावर इंजेक्शने दिली जात आहेत का ह्याचा पाठपुरावा करणे म्हणजे समुद्रातून सुईचा शोध घेण्यासारखे होईल.

भेसळ हि शेतातून आणि विक्रीच्या माध्यमाद्वारे होत असते. आयुर्वेदिक औषधे पण ह्या भेसळीच्या तडाख्यात सापडली आहेत. बाहेरचे शत्रू बरे पण हे भेसळ करणारे अस्तनीतले निखारे रोजच्या जीवनात पण मृत्यू सापळ्यात प्रत्येकाला नेत आहेत. कुठून आणि कसा बंदोबस्त ह्या भेसळीच्या किडीचा करायचा हा पुरून उरणारा गहन प्रश्न बनला आहे. प्रत्येक बाबत जागरूक राहणे हे धकाधकीच्या जीवनात सहज सोप्पे नाही. जागरूक राहून व्यवहार जरी केला तरी पोटाकरता निवांत खाणे हे हि महत्वाचे आहे. इथेही भेसळ आहेच मग अस्वस्थता आलीच.

१) शाळेत भेसळ ओळखण्याचा तास ठेवला तर?

२) ज्या प्रमाणे गलोगल्ली वैद्यकीय तपासण्या करणाऱ्या प्रयोगशाळा आहेत त्याच प्रमाणे भेसळीच्या पण प्रयोगशाळा असाव्यात. आपल्याला जर शंका आली तर त्वरित तो पदार्थ तपासणी साठी नेता आला पाहिजे.

३) दुकानदार करता कडक कायदे केले पाहिजेत. काही काळा करता त्यांचा विक्री परवाना रद्द केला पाहिजे. दुकानाला इथे भेसळ सापडली आहे असे सील लावले गेले पाहिजे.

४) घरगुती स्वरुपात जर पदार्थाच्या तपासण्या करता येत असल्या तर त्याला लागणारी रसायने जवळच्या औषधाच्या दुकानात उपलब्ध असली पाहिजेत.

५) जनजागृती करावयास हवी.

६) स्थानिक पक्षाकडून नागरिकांसाठी अशी केंद्रे उघडली पाहिजेत.

७) भेसळ ओळखण्याची व्यवसायभिमुख प्रशिक्षण केंद्रे सरकार कडून सुरु व्हावीत.

८) भेसळीच्या तक्रारीसाठी ग्राहक निवारण मंच ची विशेष त्वरित न्याय प्रणाली असावी.

९) भेसळी मुळे नुकसान झाले तर त्याची जलद भरपाई मिळावी.

१०) धाडी मोहिमा करून, प्रत्येक वेळी तक्रार असली तरच कारवाई होईल इथपर्यंत प्रकरणे विलंबित ठेवू नयेत.

असे अनेक पर्याय आहेत पण सुरवात कोण करणार?’ शिवाजी जन्माला यावा पण शेजारच्या घरात’, हि वृतीच फक्त वैचारिक खल, निष्कर्ष पर्यंतच मजल करते. पण आशावाद अजूनही संपला नाही मी माझ्या कडून छोटीशी सुरवात केली आहे. इथल्या शेती चे भारतीय मान्यवर अधिकारी ह्यांच्याशी विचारविनिमय सुरु केला आहे. ह्या बद्धल जनजागृती आणि माहितीच्या अधिकार करता लवकरच सर्वांशी भेट घडवून आणण्याचे प्रयत्न सुरु केले आहेत. इथे पण खूप शेती आहे त्याबद्धल पण माहिती मिळवता येईल. सेंद्रिय शेती हा एक पर्याय आहे पण त्याची उत्पादने इतर उत्पादनाच्या तुलनेत महाग मिळतात.

इथले एकच उदाहरण देते कि, जे मी नेहमी पाहते मग घेते. रोज लागणारी अंडी. आपण दुकानात जातो आणि घेतो. इथे मिळणाऱ्या प्रत्येक अंड्यावर उत्पादन कधी घेतले आहे त्याची तारीख आणि कुठल्या तारखेपर्यंत ते वापरावे ह्याचा छाप असतो. तसेच क्रेट मधल्या अंड्यांचा जन्म म्हणजे कोंबडीचे खाणे सेंद्रिय आहे का ह्याचा उल्लेख सरकारी नोंदिनिशी प्रत्येक क्रेट वर असतो. काही वेळेला कोंबडीला काही औषधे दिले जातात त्याचा उल्लेख पण इथे बंधनकारक आहे. प्रत्येक उत्पादनासाठी सरकारकडून नियंत्रक असतो आणि आंतरराष्ट्रीय परिमाणे काटेकोर पणे अमलात आणली जातात.

सेंद्रिय उत्पादने घरच्या घरी घेऊ शकता. अनेक विद्यापीठांनी किवा खाजगी संस्थांनी उद्यान कला, बागकाम असे प्रशिक्षण वर्ग सुरु केले आहेत. आम्हाला गच्ची नाही. असली तर ती सगळ्यांची आहे. तिथे परसबाग केली तर नियंत्रण कोण ठेवणार? घरी ग्यालरीत लावली तर उपद्व्याप कोण वाढवणार? रोजचे काम करायला वेळ मिळत नाही. अशी अनेक कारणे समोर येतात. हि कारणे पण वस्तुस्थिती दर्शवणारी आहेत. जेष्ठ नागरिकांनी जर अशा बागांचे व्यवस्थापन पहिले तर…… सोसायटीची गच्चीची चावी त्यांच्या कडे ठेवू. काही सभासदांच्या मदतीने गच्चीत घेतलेले उत्पादन घरोघरी वाटप केले जाईल. निदान काही अंशी तरी भेसळीच्या भाज्या खाण्याचे टाळता येईल. असे अनेक पर्याय आहेत……

सुरवात तर करायला हवी. कोणाची कशाला वाट पहायची?? शिवाजीचा जन्म शेजारच्या घरी झाला तरी निदान एक मावळा तरी आपल्या घरचा असेल हा दृष्टीकोन ठेवला तर भेसळीची सरमिसळ कमी कमी होत त्याला कायमचा आळा घालता येईल.

सलाला………….ओमान मधील निसर्ग.

‘हिरवे हिरवे गार गालिचे……..’ अस म्हंटल कि डोळ्यासमोर येतो तो नितांत सुंदर असा निसर्ग. भारतातील पावसाळी अनुभव घ्यायचा असेल तर ओमान मध्ये पण निसर्ग आहे. हिरवा कच्च….. डोंगरावरून धोधो पडणारे धबधबे…….अगदी आपल्यासारखी लाल माती सगळे कसे जणू काही फार पूर्वी भारताशीच भूमी म्हणून जोडले असावे. इथे जून ते सप्टेंबर’ खरीप हंगाम’ असतो. येथील लोक खरीप सिझन असेच म्हणतात. रब्बी आणि खरीप ह्या दोन हंगामाची भूगोलात घट्टपणे साथ असतेच. ह्या हंगामात आपल्यासारखा मान्सून पण आहे.

मस्कत शहरानंतर ओमान मधील हे दुसरे मोठे शहर. मस्कत पासून दक्षिणेला आहे. साधारण पणे रात्री बस मध्ये बसले तर पहाट उजाडे पर्यंत सलाला येते. वाळवंटाची टेकाडे, वादळे, शुष्क आणि कोरडे हवामानात प्रवास करताना छान लाल माती व हिरव्या निसर्गाचा दरवळ आपल्याला ‘ने मजसी ने……ची आठवण करून देतो.

हा निसर्ग पाहताना लक्षात येते कि, आपण कोकणच्या भूमीत जणू काही प्रवेश करत आहोत. इथल्या पावसाळी पर्यटन करता अतिशय लोकप्रिय आहे. विमान व रस्ता दोन्ही मार्गे येथे पोहचता येते. अरेबिक राष्ट्रातून ह्या पर्यटन स्थळा करता फार मोठा ओघ असतो. रस्त्याच्या दुतर्फा व नजर जाईल तिथ पर्यंत हिरवळ, जंगल आणि पाऊस.

ईद च्या सुट्टीत सलाला येथे भेट म्हणजे उपवास संपलेला आणि हिरव्या निसर्गात ताजेतवाने होऊन मस्त पैकी वातावरण आणि खाणे आणि आराम करणे हे प्रमुख आकर्षण आहे. केळीच्या बागा, नारळ, पानाचा मळा(विड्याची पाने) फक्त सलालात पाहण्यास मिळतात. विड्याच्या पानांना मस्कत मध्ये बंदी आहे. सर्व प्रकारची फळझाडे, विविध फुलझाडे आणि येथेच ओमान चे प्रसिद्ध बखुर म्हणजे धुपाचे झाड पाहण्यास मुबलक मिळते.

पर्यटन स्थळे म्हणजे गुरुत्वाकर्षणाच्या विरोधात टेकडी वर चढणारी कार. अर्थात गाडी न्युट्रल ला करून फक्त स्पीड नियंत्रित करावा लागतो. येथे गाडीचा स्पीड ४० च्या हि पुढे जातो. ह्या ठिकाणावर पण खूप गर्दी असते.

समुद्र किनारी ‘सिंक होल’ आहेत. खडकातून समुद्राच्या लाटे बरोबर पाणी फार मोठ्या तुषार स्वरुपात वर येते. सिंक होल चे वैशिष्ट्य म्हणजे खूप खोल अशी विवरे आहेत. लाटेची गाज धीरगंभीर आवाजात आपल्या अंगावर प्रचंड प्रमाणात पाणी उधळून आपले सामर्थ्य प्रकट करते.ह्या सिंक होल च्या भोवती भक्कम असे ग्रील आहे बऱ्याच अंतरावरून आपल्याला उभे राहावे लागते. पाण्याचा खळखळ आवाज माधुर्य निर्माण करतो पण हा आवाज म्हणजे शरीरास व मनास देखील कापरे भरवतो. जीवन क्षणभंगुर आहे तसेच सुंदर हि आहे ह्या दोन टोकाच्या परिसीमा अनुभवायच्या असतील तर ह्या सिंक होल शिवाय सलाला पाहणे म्हणजे अपूर्ण ठरेल. चुनखडी चे प्रमाण लक्षणीय असल्याने खडकात विविध आकार. रंग छटा पाहण्यास मिळतात.

येथेच शहरात एक मुस्लीम पीर दर्गा आहे. त्यांची उंची चाळीस फुट होती. हा दर्गा सर्व पर्यटकांसाठी पाहण्यास ठेवला आहे. हा टोम्ब मेरी म्हणजे जिझस ची आई तिच्या वडिलांचा आहे. ह्याचा कुराणात उल्लेख आहे असे कळले. ‘टोम्ब ऑफ नबी इम्रान’ गर्दी नेहमीच असते.

येथीलच पण काहीसा दूर असणारा दुसरा दर्गा म्हणजे ‘जॉब्स टोम्ब’ ह्यांची पण उंची सर्वसाधारण उंची पेक्षा जास्तच आहे. ह्यांच्या पावलाचे ठसे दर्ग्या समोर खडकात उमटलेले आहेत. आकाराने बराच मोठा असा हा ठसा आहे.प्रत्येक धर्मात असे ‘अजानबाहू’ गुरु किंवा धर्मोपदेशक आहेत हे मनोमन पटले.

रस्त्यावरून जाताना किंवा बाजूला हिरवळीत आपल्यासारखीच गाई, गुरेढोरे, मेंढ्या चरताना दिसतात जणू काही भारतातून स्थलांतरित झाल्या असाव्यात. पण त्यांच्या बरोबर गवत चारणारे उंट पहिले कि मात्र मन भानावर येते. आजूबाजूला आपल्यासारखी कौलारू घरे फारशी नाहीत, तेथून धुरांड्यातून येणारा भाकरीचा दरवळ मात्र आसमंतात नाही. दुधाची तहान ताकावर भागवावी लागते हे हि काही प्रमाणात तथ्य नक्की आहे. येथे येणारे युरोपिअन, सौदी लोक मात्र ह्या वातावरणावर खूप खुश होतात. जर पावसाळ्यात भारतात जाणे झालेच नाही तर इथेच हा जवळ प्रती भारत आहे. अर्थात सलाला मस्कत सोडण्याआधी नक्की बघावे. असेही फिरण्यास खूपच छान आहेच.

रस्त्याची वाट हि गच्च अशा आमराईतून, केळीच्या पोपटी बागामधून, विड्याच्या पानाच्या मळ्यातून जाते. झुळझुळ वाहणारे पाटाचे पाणी आहे, नाही ती मराठी वाहिनी बाय……मालकी हक्क फक्त ओमानी लोकांकडे आहे आणि हे सर्व सांभाळणारे आपले मल्याळी….. शहाळी, ताजी ताजी फळे अगदी बागामधून झाडावरून काढून पण देतात. अशा टपरी रस्त्याच्या दुतर्फा आहेत. गोवा पण आपल्याच जवळ आहे असे वाटते

पुरातन काळात एक गाव होते, त्या गावात एक धर्म गुरु राहत असे. लोकांचे स्वैराचार वाढले होते. वारंवार सांगून देखील लोकांनी आपले वर्तन सुधारले नाही म्हणून गावातील लोकांना व सर्व गावाला त्याने शाप दिला कि तुमची सर्वांची घरे उलटी होतील. घराचे छत खाली, दरवाजा पण उलटा आणि घराचा चौथरा वरती होईल. असे एक आख्खे गाव आज पुरातन जागा म्हणून पाहण्यास मिळते. हि गोष्ट आम्हाला तिथल्या गाईड ने सांगितली आणि ह्या गावचा असा उल्लेख कुराणात आहे. सध्या पूर्ण पणे ढासळत हे उलटे गाव चालले आहे. ह्या जागी फिरण्यास आपल्याला एक छोटी गाडी घेऊन फिरते. त्याच प्रमाणे कालौघात नष्ट झालेली पण खांबाचा पुरावा ठेवलेले असे अल बलिद सारखी पण गावे उत्खानात सापडलेली दिसतात.

असे हे निसर्गरम्य आणि प्रदूषण विरहित सलाला म्हणजे ओमान मधील आशिया होय. हिरवा निसर्ग हा भोवतीने……. राजस्थान मधील वाळवंट आणि सह्याद्रीची आठवण आल्याशिवाय राहत नाही. salalah हा शब्द अरेबिक सूची मध्ये आहे. वाढ होणारे बी किंवा आर्च ऑफ द वूड असा अर्थ आपण घेऊ शकतो. जिथे निसर्ग मुक्त पणे बहरतो ते सलाल्लः होते.

.

पन्नासावी ओवाळणी………….डॉ. मंजिरी नानिवडेकर.

डॉ. मंजिरी नानिवडेकर. माझी सख्खी नणंद. माझे लग्न झाले तेंव्हा काहीशी अबोल मला वाटत होती कदाचित मी जास्तच बडबडी असल्याने असेल हि…. पण हळू हळू सहवास वाढत गेला. अबोल वाटणारी मंजिरी प्रसन्न हसली कि तिच्या हसण्यानेच बोलण्याचे काम कमी केले असायचे. अभ्यासू असणारी मंजिरी कुठल्याही विषयवार अत्यंत समग्र पणे मत प्रदर्शित करत असे.

१६ ऑगस्ट ला भारतातून रात्री १२ वाजता दिराचा फोन आला. फोन घेण्याची हिम्मत होत नव्हती. माझी सख्खी नणंद व माझी सर्वात जवळची मैत्रीण म्हणजे कराड च्या डॉ. मंजिरी नानिवडेकर हिचा संध्याकाळी पाठीमागून स्कोर्पिओ ने धडक मारल्यामुळे मृत्यू झाला आहे. तिच्या बरोबर असणाऱ्या दोन डॉ. मैत्रिणी पैकी एकीचा डॉ. शामल जोग ह्यांच्यावरहि काळाने घाला केला.

१७ वर्षाचा मुलगा वडिलान बरोबर बसून गाडी शिकत होता. हलगर्जी पणा, बेजवाबदार वृत्ती आणि नियमांचे उल्लघन ह्या मुळे आज आमच्या कुटुंबावर तर अवकळा आली पण कराड शहराला हि दोन डॉ चा मृत्यू हि लाजिरवाणी बाब आहे. कृष्णा मेडिकल कॉलेज चे अपरिमित नुकसान ह्यांच्या मृत्यू मुळे झाले आहे.

माझी नणंद डॉ. मंजिरी नानिवडेकर हिचे अनेक थिसीस आज नेट वर उपलब्ध आहेत. दहावी पासून ते मेडिकल पर्यंत सर्व शिक्षण गोल्ड मेडल घेऊन पूर्ण केले होते.

http://www.ojhas.org/issue31/2009-3-14.htm हि एक लिंक मी देत आहे.

आपल्यापैकी जे कोणी डॉ. होत असतील त्यांना तिचे लिखाण नक्की उपयोगी पडेल म्हणून हा बझ्झ तिच्या साठी केवळ तिच्या रक्षाबंधनाच्या ओवाळणी साठी…….

आजचा माझा बझ्झ वरचा ‘बझ्झ परिवार’ बरोबर झालेला संवाद मी येथे पोस्ट मध्येच देत आहे. सर्वांच्या सदभावना ह्या मनास उभारी देणाऱ्या आहेत.
धन्यवाद!!!!

सुहास झेले – ओह्ह्ह खूप वाईट झाल

झम्प्या झपाटलेला – खरंच खूप लाजिरवाणी गोष्ट आहे.. गाडी शिकण्यासाठी ह्या माजखोराना मुख्य रस्तेच मिळतात का? आणि हे आर टी ओ वाले १७ वर्षांचा मुलगा गाडी चालवत असतो तेंव्हा काय झोपा काढतात काय… हलगर्जीपणामुळे आपल्या समाजाचे, देशाचे किती नुकसान आपणच करत असतो… आणि फक्त १५ ऑगस्टला म्हणतो” मेरा भारत महान”

आ का – देव त्यांचा आत्म्यास शांती देवो..

@सुहास खरोखर भयंकर मानसिक धक्का आम्हाला आहे.
@झम्प्या झपाटलेला…..आपण म्हणता तशीच प्रतिक्रिया आमची पण झाली. आज आख्खे कराड तीव्र प्रतिक्रया देत आहे. असल्या माजोरड्यांना शिक्षा व्हायलाच हवी.
@ आका…..काय लिहू रे!!!! ८५ वर्षाचे सासू सासरे अखंड अश्रू ढाळत स्वतःचा मृत्यू मागत आहेत… सगळे भारतात सोडून आले आणि धाव घेतली बझ्झ वर आपल्यांसाठी…. –

Vidyadhar Bhise – ताई… खूपच दुःखद घटना आहे गं! आम्ही तुझ्या दुःखात सहभागी आहोत!

विद्या…… संध्याकाळी रोजचे चालण्यासाठी अगदी जवळच्या आणि आतील रस्त्यावर नेहमी ह्या तिन्ही मैत्रिणी जायच्या……..अशाच निघाल्या आणि दोघी घरी परत आल्याच नाहीत..एक मात्र बचावली ती पण मानसिक धक्क्यातून सावरली नाही. पोलीस खटल्यातून त्यांना कधी शिक्षा मिळणार???? रस्त्याच्या कडेने गटाराच्या बाजूने चालत होत्या मागून गाडी आली ब्रेक च्या ऐवजी ऐक्सिलेटर केला आणि दोघेही पळून गेले. गाडी पलटी होऊन गटारात पडली. बाहेरून काहीही जखम नव्हती. बरगड्या तुटून शरीराच्या आतील बाजूस घुसल्या त्यामुळे अंतर्गत रक्तस्त्राव होऊन……

आनंद पत्रे – ताई… आम्ही तुझ्या दुःखात सहभागी आहोत!

सा बा – आम्ही तुझ्या दुःखात सहभागी आहोत!

Kanchan Karai – ताई, आम्ही तुझ्या दु:खात सहभागी आहोत

महेंद्र कुलकर्णी – वाईट झालं. देव त्यांच्या आत्म्यास शांती देवो.

हो रे आनंदा, आज तुमच्या साठीच बझ्झ वर आले. धनंजय ला धीर देताना मी मात्र एकटी पडते म्हणून बझ्झ वर सगळ्यांना भेटण्यासाठी आले… कोणी कोणाची कशी समजूत काढायची??? तिची मुलगी अदिती अमेरिकेत एम डी करत आहे. आज मला मामी ची भूमिका पार पडताना तारांबळ उडते…. नणंदेचे मिस्टर डॉ. रवींद्र पण सर्जन असल्याने लेक व वडील खूपच समजूतदार आहेत. हि घटना कोणाच्या तरी गाडी वर हात साफ करण्याच्या हट्टापाई……..आम्ही सर्व भोगतो आहोत.

सारिका खोत – खुप वाईट झालं.

महेंद्रजी, तुमची मच्छर दाणीतील कुजबुज तिला फार आवडलेली पोस्ट होती. आताच्या सुट्टीत पण तिने भेटल्यावर मला सर्व ब्लॉग परिवार बद्धल आवर्जून विचारले होते. ती आपल्या सर्व ब्लॉग्स ची नियमित वाचक होती. तिच्या प्रतिक्रिया कधीही मला हि नव्हत्या मी विचारले तर म्हणाली होती…… ब्लॉग मित्र मैत्रिणी इतके छान लिहितात कि मी एकेक पोस्ट सर्वांच्या वाचत असते.

योगेश मुंढे – अनुजा ताइ…खुप वाईट झालं…देव त्यांच्या आत्म्यास शांती देवो….आपल्या सर्वांच्या दुःखात आम्ही सामील आहोत….परमेश्वर आपणास हे दुःख सहन करण्याची शक्ती देवो हीच प्रार्थना.

Akhil Joshi – ध्यानीमनी असा काही नसताना असा आघात पचवण किती कठीण असत नाही? तुमचे दु:ख तर फारच आकस्मिक आहे… त्यांच्या आत्म्यास शांती लाभो हीच ईश्वर चरणी प्रार्थना…

सारिका, कांचन, साबा, योगेश….
आपल्या सर्वांच्या भावना ह्या आम्हाला निश्चितच खूप आधाराच्या आहेत. आपण सर्वाना भेटण्यासाठीच आज आले. आनंदात तर आपण एकत्र आहोतच पण एकमेकांचे दुखः सुद्धा वाटून घेतो. हीच भावना आपल्याला एकमेका करता ओढीने सतत एकत्र ठेवते.
श्रेया रत्नपारखी – हे फारच भंयकर आहे. काय लिहावे कळत नाही. तुमच्या संपूर्ण कुटुंबाला यातून लवकरात लवकर सावरण्याची शक्ती मिळावी ही सदिच्छा.

श्रेया,अखिल,

वाहतुकीच्या गलथान कारभार मुळे, रस्त्यांच्या दुरवस्थेमुळे, नियमांचे सहज उल्लघन ह्या मुळे जीवित हानी होऊन व्यक्ती, कुटुंब व समाज ह्यांचे अपरिमित नुकसान होते. पुणे, कोल्हापूर. कराड च्या सर्व मुख्य वर्तमान पत्रात हि बातमी आलेली होती. आजची माझी पन्नासावी पोस्ट हि असणार…. असे वाटले पण नव्हते. बझ्झ वर तर आहेच पण पोस्ट पण टाकते कारण तिच्या अनेक थिसीस चा उपयोग अभ्यासाकरता कोणाला तरी झाला तर खरी ओवाळणी झाली.

आजचा बझ्झ म्हणजे पोस्ट म्हणून टाकणार आहे. पुन्हा हे सर्व टाईप करणे शक्य नाही. तिच्या थिसीस ची लिंक अभ्यासूना, विद्यार्थ्यांना…..जरूर पाठवा. हीच आपल्या सर्वांकडून डॉ न सदभावना ठरेल. मंजीरीचे थिसीस परिपूर्ण ज्ञान आहे जे कधीच व्यर्थ जाणार नाही…

माझी पन्नासावी पोस्ट तिच्या साठीच……

नाच रे मोरा……..मस्कत च्या पावसाळी वनात.

पावसाळी दिवस जवळ आले कि, आषाढी मेघ व मोरांचे नृत्य जसे ह्या गाण्यातून मनात रुंजी घालू लागते तसे मन हि मोररंगी होऊन प्रफुल्लीत होते. भारतात हे सहज शक्य आहे कारण पाऊस व भारतीय मनाचे दृढ असे नाते आहे. मस्कत मध्ये सुद्धा हा अनुभव घेता येतो. पाऊस नाही, वाळवंटी देश सर्वसाधारण तापमान हे ४५ ते ५५ पर्यंत असतेच मग हे कसे शक्य आहे? जिथे प्रतिकूल परिस्थिती असते तिथे मानवी श्रम, बुद्धी, आणि उपलब्ध पैसा असेल तर शक्य करता येते. पावसाळी वनाचे म्हणजे ज्याला रेन फोरेस्ट असे म्हंटले जाते ते वन इथे आहे.

आपण नेहमी हॉटेल मध्ये जातो एखादा धबधबा, बागेत फिरणारी बदके, छोट्याशा तळ्यात उमलेली कमळे हे सर्व साधारण रिसोर्ट चे रूप असते. जेवण्यास, गप्पा करण्यास निसर्गाच्या सानिध्यात असणे आता अप्रूप राहिले नाही. मस्कत मध्ये बरका म्हणून एक भाग आहे अत्यंत रुक्ष आहे असे म्हणणे आता योग्य होत नाही कारण इथे अल नाधा रिसोर्ट च्या मागे हे पावसाळी वन उभारलेले आहे हे वन आच्छादित आहे. इथले ‘श्री ददवाल’ आडनावाचे गृहस्थ हे भारतात्तून वीस वर्षापूर्वी सुगंधी वनस्पती संशोधनासाठी आले होते. त्यांची हुशारीव चिकाटी, संशोधन वृत्ती ह्यामुळे आज हे वन निर्माण झाले आहे. दोन ते चार व्यक्ती हाताशी घेऊन सुरवातीला काकडी, लिंबू, काही फळभाज्या असे उत्पादन केवळ छोट्याशा ग्रीन हाउस मध्ये घेतले.

अथक परिश्रम करून आज विस्तृत असे रेन फोरेस्ट झाले आहे. घनदाट जंगल, पावसाळी वातावरण, जंगलातून जाणाऱ्या छोट्या पायवाटा मध्ये मध्ये अंगावर उडणारे पावसाचे तुषार हे खरोखरी जंगलाचा आनंद मिळवून देतात. बाहेर तापमान ४५ असताना आत मध्ये जंगलात केवळ २५ डिग्री सेल्सिअस तापमान असते. संगणकावर एक रेन फोरेस्ट चा स्क्रीन आहे अगदी तसाच फील येतो.

पावसाचे तुषार व पावसाळी कुंद, थंड अशी वेगळीच हवा मनावरचे सगळे ताण चटकन नष्ट करते. नुसते जंगल नाही तर तुम्ही प्रवेश केल्यावर प्रथम एक नाद ऐकू येतो जंगलातील पक्षांचे किलबीलणे, हळूहळू येणारा असा ढगांचा आवाज व नंतर पानांवरून ओघळणारे व अंगावर उडणारे पावसाचे तुषार सर्व अकृत्रिम आहे ह्या वर विश्वास बसत नाही. खंडाळ्याच्या घाटाचा, केरळच्या जंगलाचा असा प्रत्येकाला जसा परिचित तसा भास नव्हे तर खरच अनुभव येतो.

आज दद्वालजीना रेनमॅन म्हणून ओळखले जाते. सदाहरित घनदाट जंगल तर आहेच पण इथे जगातल्या सर्व प्रकारच्या आंब्याची झाडे आहेत. काही जातींना वर्षभर आंबा मिळतो. २००० आंब्याची झाडे आहेत. एका जातीला दीड ते दोन किलोचा एकेक आंबा लागतो. ५०० ते १००० किलो आंबा दरोरोज इथल्या बाजारात विकण्यास पाठवतात. ७५ एकरवर लिंबू व सफरचंदाची झाडे आहेत. प्रत्येक फळझाड इथे विस्तृत प्रमाणात आहेत. श्री दद्वालजी व स्टीफन यांनी ग्रीन हाउस मध्ये विविध ओर्चीड पण यशस्वीरीत्या वाढवली आहेत त्यात कीटक खाणारे पिचर ओर्चीड पण आहे.

आंब्याच्या वनात नाचणारे सुमारे ६० मोर आहेत. विस्तृत असे तळे त्या मध्ये विहार करत असलेली बदके. असंख्य जातीचे पक्षी इथल्या पावसाळी वनात सुखाने मनसोक्त घरटी करून आहेत. केळ्याचे अफाट असे उत्पादन आहे. एव्हढेच काय पण द्राक्ष मळे, उसाची शेती पण इथे आहे. ३५० एकर जमिनीने त्यांना साथ दिली व भरघोस उत्पादन देऊ लागली. पावसाळी वन हे इनडोअर आहे पण बाकीची शेती हि केवळ मोकळ्या जमिनीवर हिरवे हिरवे गडद गालीच्या चे नेत्रसुख देऊन तप्त अशा ओमानी वातावरणात शांतता निश्चित देते.

अत्यंत आकर्षक अशी फुलझाडे, ग्रीन हाउस मध्ये फुलझाडांवर उडणारी फुलपाखरे, ससे, हरीण, कुत्रे, अनेक जातीचे पक्षी असा छान झु येथे आहे. अजूनही फक्त ३० टक्के काम झाले आहे ७० टक्के बाकी आहे अशी नम्र भावना श्री. दाद्वाल्जींची आहे. ह्या सर्वाचे श्रेय ते इथल्या निसर्गाला, परिश्रम करणाऱ्या फार मोठ्या अशा कर्मचारी वर्गाला देतात. पाण्याचे योग्य नियोजन, खताचे प्रमाण योग्य ठेवून नैसर्गिक खत ते वापरतात. त्याकरता जमिनीचा काही भाग खत निर्मितीसाठी ठेवला आहे. इथे पाऊस नसताना उस, कापूस, तांदूळ पासून ते ओर्चीड पर्यंत इथे निर्माण केले आहे. सतत प्रयोगशील वृत्ती व नम्र पणा इथे पर्यटकांना नेहमीच आकर्षित करतो. आखाती देशाचे, युरोपिअन, ओमानी लोक पावसाळी वनात नेहमीच येतात.

असा हा रम्य पावसाळी वनाचा अनुभव, आंब्यांचे वन नृत्य करणारे मोर, अनेक पक्षी, विविध फळे, फुलझाडे यांनी आकर्षित केलेला परिसर, तेथील वास्तव्य संपूच नये असे वाटते. ह्या निसर्ग समवेत भारतीय लाझीझ अशा पदार्थापासून ते अनेक देशांचे पदार्थ आपली भूक व रसना तृप्त करतात. अर्थात मुख्य आकर्षण आहे ते इथले रेन फोरेस्ट म्हणजेच पावसाळी सदाहरित जंगल.

भारताची आठवण आली कि सरळ जावे ह्या वनात व मनाच्या मोराचा पिसारा अलगद फुलवून ताण विसरून ओमानी वनात रमावे . प्रसन्न करणारा एखादा दिवस पण सकारातमक ठरतो. वनाचा आनंद व त्यामागचे परिश्रम व हरित पृथ्वीचा दिलेला संदेश मला रिसोर्ट मध्ये भावला व तो आपल्यापर्यंत पोहचवला.

रिसोर्ट मध्ये असणारी ट्री हाउसेस, २१ मीटर लांबीचा सोना टनेल, जोजोबा गार्डन, स्पा, रोझ गार्डन, सोलर, शेती असा विस्तृत आवाका ह्या रिसोर्ट चा आहे. केवळ व्यवसाय म्हणून नव्हे तर प्रतिकूल परिस्थितीत पण निसर्ग निर्माण केला जाऊ शकतो. कल्पकता व हिरवाईची आवड हि मुख्य प्रेरणा आहे. ओमान मध्ये का शक्य नाही म्हणून घेतलेला ध्यास हा बुद्धीजीवी तर आहेच पण निसर्ग निर्माण करून गो ग्रीन करता केलेला यशस्वी असा प्रकल्प ठरतो.

Previous Older Entries Next Newer Entries