
श्रावणात प्रत्येक पान स्वतःचे अनोखे पण घेऊन नवीन ओळख देते. सणवार पण खूप असतात, मनसोक्त फुला पानाची आरास करता येते, देव सजवता येतात. विविध पत्री मधला देव हा लोभस दिसतो. विविध पत्री मधुन असणारा अनवट सुवास हा नकळत पणे आपल्या चेतना उत्साहित करतो. ह्या करता श्रावण आणि पत्री ह्यांचा सह संबध नक्कीच असणार.
निसर्ग ह्या श्रावणात भरभरून देत राहतो. कालांतराने श्रावणातल्या खास पत्री नाहीश्या होतात. सगळीकडे पाना फुलांचे आरोग्यदायी उपयोग सतत वाचनात येतात. गच्चीवरील बाग सर्व प्रकारच्या झाडांनी भरून असते.
आंब्याची कोवळी पाने, शरीराचा दुर्गंध घालवतात. पेरूच्या पानाची पुड दंतदुखी आणि हिरड्यांच्या मजबुती करता, दातांवरील पांढरे, पिवळे येणारे आवरण दुर करते.अगदी ह्या दिवसात असलेला आघाडा सुद्धा सुकवून वापरता येणे शक्य होऊ शकते. रस्त्यावर दुर्लक्षलेली टणटणी सुद्धा जखमेवरती उत्तम खपली धरते… हे सगळ कसं करायचं, काय काय उपयोग आहेत? प्रशन पडणे स्वाभाविकच आहे पण इच्छा तेथे मार्ग मिळतोच.
वाचत सारेच असतो, पटत हि असते, कधीतरी नक्कीच वापरु.. असे निश्चय केलेले असतात. प्रत्यक्ष वेळ येते तेंव्हा सुचत नाही,सापडत नाही. लिहुन ठेवू, सेव्ह करु, आयत्या वेळी विचारु… अशा विचारात निसर्गाचा अनमोल साठा करणेच राहून जाते.
जश्या लोणच्याच्या, चटणी च्या बाटल्या केलेल्या असतात तशाच ह्या अशा नानाविध पानांच्या पावडरी, किंवा असा कोरडा साठा करुन ठेवावयास हव्यात. ज्यांना बागकामाची आवड आहे अशांच्या घरी तर असे करणे सोप्पे आहे. आपली बाग आनंदाने दाखवतोच पण एखादी अशी छोटीशी पानांच्या उपयोगाची बाटली छानशी भेट देता येऊ शकते.
निदान महिन्यातून एकदा तरी पेरूच्या पानाची पूड दातास चोळावी, दहा मिनिटांनी चूळ भरावी. आंब्याची कोवळी पाने थोड्या कोमट पाण्यात घेऊन मऊ करून अंगास लावावी. अजूनही खुप वनस्पतींचे उपयोग माहिती असताच फक्त ते आपल्या हाताशी प्रसंगात मिळणे आवशयक आहे आणि अशी वेळ येऊ नये म्हणून दैनदिन आयुष्यात काही उपाय तर नियमित करता येणे शक्य आहेच.
अति थंड किंवा अति उष्ण प्रदेशात निसर्गाचा ठेवा जतन करून ठेवला जातो. पूर्वी आपल्या घरी सुद्धा कोवळ्या हरबरा पाला, शेवगा पाला, तुळस पानाची पुड, बेल पाने पुड असा साठा फडताळात असायचाच. घरातील अनुभवी
जेष्ठ मंडळी घरचाच उपाय चटकन करायची. आता तर इंटरनेट मुळे तर जग माहिती घेण्यासाठी जवळ आले आहेच पण घरातील फडताळातील निसर्ग मात्र दुर गेलाय.
कशाला हवेत केमिकल चे डिओ. वेगवेगळ्या शोभेच्या वस्तूंनी बाथरूम सुद्धा सुशोभित करतो तिथे असे छोट्या बाटल्यांचा एक तरी कप्पा हवाच जो आपल्या शरीरास, मनास उत्तमच ठेवतो. वेगवेगळी फुले अंघोळीच्या पाण्यात थोड्यावेळ ठेवावीत, सुगंधित आनंद मिळतो. मी नेट वर काही माझ्या मित्र परदेशी मंडळींच्या पोस्ट वाचत असते. जवळ जवळ सर्वांची एकच लगबग दिसून येते. हार्वेस्ट आहे म्हणजे तेथील फळे, फुले आणि पाने ह्यांचा मौसम आहे. कालांतराने तिकडे बर्फ येणार आहे म्हणून निसर्गातील जमतील तेवढी पाने, फुले आणि फळे कॅनिंग करून साठवणूक करण्याची लगबग माझ्या मैत्रिणींची आहे. आपण सहज मिळते म्हणून किती नशीबवान आहोत. जतन करून ठेवणे हा दृष्टीकोन असणे आवश्यक आहे.
नेटवर, वाचनात येणारे पानांचे ,फुलांचे उपयोग आणि त्याचा वापर कसा करणे ह्या बद्धल येणाऱ्या महितीमधून असा विचार प्रत्यक्षात आणणे शक्य करता येते. बाजारात पण आयुर्वेदिक पावडरी खूप मिळतात पण घरीच जर सहज उप बिन पैश्याचे उपलब्ध होत असेल तर बाजारावर तरि अवलंबून का राहायचे? स्वतःचे ज्ञान तर वाढतेच पण, स्वः निर्मितीचा आनंद हि मिळतो.
जसे रासायनिक भाजी नको तसेच रासायनिक उपाय पण नकोत. आपल्याच गच्चीत, घराच्या एखाद्या कुंडीत किंवा आजूबाजूला असलेल्या निसर्गाला खऱ्या अर्थाने आपल्या जीवनात आणणे हाच खरा नित्य प्रफुल्लित करणारा श्रावण ठरेल.
ह्या पोस्ट च्या कॉमेंटस द्वारे विविध पानांचे उपयोग आणि त्यांचा वापर कळवावेत. नोंद करून ठेवुन, त्याचा प्रत्यक्ष वापर करण्यास श्रावण आपल्यासाठी फुलपाने घेऊन आलाय… स्वागत करूया.
लिखाण– अनुजा पडसलगीकर.
२७ जुलै २०१७.