हरतालिका पूजन…..मिळूनी साऱ्या जणी.


सखी पार्वतीच्या आगमनाची वाट पहाते. हातावर सुरेख रेखीयेली मेहंदी, झोपाळ्याचे मस्त झोके, साऱ्या मैत्रिणी मिळूनी शिव शंकराची केलेली पत्री पूजा… आई म्हणत असे लेकीनो, पूजा छान करा बर का…. चांगला नवरा मिळतो, मग आमचे साऱ्या जणींचे खुसुखुसू हसणे, नवीन ड्रेस, भावाला मनसोक्त पूजेच्या जागेवर बसून पूजेकरिता , मदती करिता दिलेले हुकुम, त्याचे घरातून वैतागून निघून जाणे, पण हळूच प्रसादासाठी येणे..
प्रसादा साठी केलेल्या खुसखुशीत करंज्या, लाडू सारे कसे फस्त करायचे, आई च्या पदराला हात पुसत खेळण्यासाठी धुम्म ठोकायची, बाहेर पडताना त्या दोघींकडे पटकन डोकावून पहायचे आणि आई च्या हाकेसरशी घरात धपकन येऊन आदळायचे, भावाकडे पाहत, आईच्या दटावणीत नैवैद्य जेवण डोळ्यावर आले की, आईच्या दुलईत जाऊन मस्त पैकी ताणून झोपणे सार सार काही आठवते ह्या दोघींना पहिले की…..
दुसऱ्या दिवशी बाबांची आणि भावाची गणपती पूजेची लगबग असायची, तेंव्हा भाऊ आदल्या दिवशी आम्ही साऱ्या जणींनी त्याला खूप कामाला लावले म्हणून उट्टे काढणार हे ठरलेले असायचे, आदला दिवस सखी पार्वतीचा आमच्या हक्काचा म्हणूनच आठवणींचा माहेरचा झोका सखी पार्वतीचा नेहमी उंच असतो.

आम्ही हरतालिकेची फुले, आणि पत्री गोळा करीत हरतालिकेच्या आदल्या दिवशी अख्ख्या गल्लीत, वाड्यांमधून, गल्ली बोळातून फिरायचो, तेंव्हाही साऱ्या जणी मिळूनी जायचो. कोणी तरी काकू स्वताहून पत्री आणि फुले तोडून घेऊन जा असे म्हणायची, पण न विचारता हरतालिकेची पत्री घेतली तरी कोणी रागवायचे नाही. कारण एकच असावे, प्रत्येक लेकीला चांगला नवरा मिळावा म्हणून प्रत्येक घरातील आई, आजी पत्री नेण्याकडे कानाडोळा करीत असावी. मजा यायची कारण मिळूनी साऱ्या जणी…

नंतर ह्याच सख्या आणि पार्वती लग्नाच्या आधी आम्हांला गौरी हार पूजनाला भेटते आणि हळूच म्हणते, लबाडे, छान केली होतीस, लहानपणी पूजा शिव शंकर मिळावा म्हणून….आणि आम्ही सखीला मागे ठेवून पार्वती प्रमाणे माहेरचा उंबरा ओलांडतो आणि दुसऱ्या घरी गृहप्रवेश करतो…..