माळ्यावरती एक ट्रंक कायम असते. तिचा रंग उडून गेलेला असतो तरी पण तिच्यावर प्रेम कायम असतेच. घरातील बच्चे मंडळीची उत्सुकता कायम ह्याच ट्रंक भोवती रुंजी घालत असते. असत काय ह्या ट्रंकेच्या पोटात??? म्हणण्यास निरर्थक पण कधीतरी उपयोगी पडेल म्हणून साठवलेले बरेच काही. अशी ट्रंक आजीच्या/आईच्या काळात मुली लग्न करून सासरी जाताना घरी घेवून जात असत. मग तर काय त्या ट्रंकेला बहुत सन्मान असणे स्वाभाविक आहे.
पूर्वी घराची छोटी छोटी दुरुस्ती घरीच करत असत. जेंव्हा गरज पडत असेल तेंव्हा खास रविवारी अशी ट्रंक माळ्यावरून वडील आमच्या कडून काढून घेत. मग काय त्या ट्रंक भोवती आम्ही भावंडे डोकावून पाहत राहायचो. आई, स्वयंपाक घरातून म्हणायची माहेरून आणली आहे हि ट्रंक…एकदा रंग द्या तिला. ह्या ह्या अपेक्षित वाक्यामुळे वडील मिस्कील हसत.
ह्या जादुई पेटीतून असंख्य खिळे, निरनिराळे नटस्, पाने, जुन्या जुन्या वायरींची भेंडोळी, वापरात असलेले पण नवीन पद्धतीचे बसविले म्हणून पेटीत गेलेले पंख्याचे बोर्ड, जुनट अशा प्लास्टिक च्या पिशव्यातून भरलेले, बरेचसे गंजलेले असे स्क्रू… सुतळी, नायलॉन दोरखंड, निरनिराळे कटर्स, बोल्ट्स, पीव्हीसी पाईप चे लहान मोठे तुकडे, लाकडाचे चोकोनी,गोल तुकडे, करवत असे खूप काही.. आमच्या कॅरम ला चारही कोपऱ्यात हेच गोल तुकडे बसवून वडिलांनी दिले.
ह्या सर्व हत्यारांची रीतसर माहिती आणि यातील कुठली गोष्ट आता लागणार आहे हे वडील समजावून सांगत. मग ती ट्रंक पुन्हा नीट लावण्याची आणि माळ्यावर चढून ठेवण्याची जवाबदारी पूर्ण होई पर्यंत आई चा रविवारी आंघोळी करून घ्या हा तगदा, आपसूकच पुढे ढकलला जायचा. हत्यारांची पेटी असे गोंडस नामकरण ह्या पेटीला कधीच नव्हते तर ह्या ट्रंकेत असे खास कप्पे हि नसत. पुरचुंड्या करून, वायरी गुंडाळून कसेबसे ह्या ट्रंकेचे झाकण बसत. झाकण मात्र आतून त्याला काही पॉकेट दिल्यामुळे त्या त नेहमी प्लास्टिक च्या पिशवीत गुंडाळी करून ड्रिलिंगमशीन चे ड्रिल बीट ठेवलेले असत. ट्रंकेच्या खाली तळाला वर्तमान पत्र दर वेळी बदलून ठेवत असू. पत्र्यावर रुबाबदार पट्ट्या त्यावर लावलेले सदाफुलीच्या फुलाचे सोल्डर अजूनही भक्कम आहेत.
ट्रंक उघडली कि एक प्रकारचा हत्यारांचा, गंजलेला वास येई. तिच्या कड्या पण कशा भक्कम वाटायच्या. ह्या ट्रंकेच्या आकारात पण एक गुबगुबीत असा भास होत असे. दोन आण्याची ट्रंक अगदी नातवंडा च्या काळापर्यंत सुद्धा व्यवस्थित आहे. अजूनही तिला रंग देवून कोणी फारसे कौतुक केले नाही.
ट्रंक म्हणजे एक पूर्ण विद्यापीठ आहे. कचऱ्याला सन्मान देउन त्यातील पुन्हा वापरात येणाऱ्या गोष्टी पासून नवीन काही तरी बनवता येते. हे छोटे विद्यापीठ पूर्वीच्या काळी माळ्यावर असायचे. आता मात्र काळाच्या ओघात हि ट्रंक नाहीशी होईल अशी सुप्त भीती वाटू लागली आहे. ट्रंक जपणे, त्यातील वस्तू गरजेच्या काळी आवर्जून बाहेर काढल्या जात असत. बच्चे मंडळीना हि ट्रंक म्हणजे भावी आयुष्याचे विद्यापीठ होते. ट्रंक सांभाळण्यात जिव्हाळा असायचा, आठवणी दडलेल्या होत्या आणि मुख्य म्हणजे वस्तू निकामी असतील तर लगेच बाहेर टाकायच्या आणि उपयोगी पडणार असल्या तर योग्य वेळी त्यांचा वापर करणे हि शिकवण होती. सध्या काय हा कचरा?? पुन्हा कोण असल्या जुन्या गोष्टी वापरणार, घराला माळा पण नाही. हत्यारे असतील तर मुलांपासून दूर ठेवलेली बरी, पण त्यांच्या विश्वातील आवडीच्या वस्तू, पण आपल्या दृष्टीने कचरा वाटत असल्या तरी फटकन फेकून देवूया असे बोलणे म्हणजे प्रयोगशील वृतीला आपणच खीळ घालणे होय.
आमच्या काळी अशी विद्यापीठे नव्हती घर आणि घरातील सामन हे घरच्या सदस्य प्रमाणे जपले जात असत. हल्लीच्या विसाव्या शतकातील मुलांना असे प्रयोग शिकवणारे विविध माध्यमे सहज उपलब्ध आहेत. आपणही त्यात सहभागी झालो तर विरंगुळा आणि समाधान दोन्ही सहज मिळेल. आम्हाला आमची ट्रंक हेच विद्यापीठ होते. आयुष्य हे आव्हानात्मक आहे असे न मानता ते एक प्रयोगशील आहे हे सकारात्मक करून घेण्यासाठी महिन्यातून माळ्यावरून काढलेली ट्रंक अजूनही आधार देत आमचीच वाटते. बल्ब बदलणे, खिळा घरीच ड्रिल करून बसवणे, आईचा लाकडी पोळपाट, विळी घरीच दुरुस्त करणे, वडिलांना स्वीच बदलण्यास मदत करणे ह्यासाठी प्रयोग शाळा म्हणजे घर होते आणि साधने म्हणून ट्रंक होती. वडीलधाऱ्या व्यक्तींचे मार्गदर्शन तर असायचे पण ह्या गोष्टी करता बाहेरच्या मदती वाचून अडले नाही.
प्रत्येक मुलाची स्वताच्या आवडीच्या काही वस्तू असतात. रंगीत दोरे, गोट्या, मणी, प्लास्टीक चे आकर्षक आकार….इत्यादी अनेक अनेक. ह्या गोष्टीना पण त्यांच्या जवळ त्या वस्तूंची अशी खास ठिकाणे मुले तयार करतात. खेळता खेळता प्रयोगशील वृत्ती तयार होते आणि एखादा भावी काळातील संशोधक पण कदाचित जगाला मिळतो.
परदेशात गॅरेज अशी खास संकल्पना आहे जिथे फक्त कार करता सामान नसून ते घरातील अडगळीच्या पण लागणाऱ्या वस्तूंचे ठिकाण असते. ह्या ठिकाणी मुले खूप रमतात. आपण निदान त्यांच्या टेबल पाशी तरी अशी खास जागा करून दिली तर, त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद अवर्णनीय असेल.
माळ्यावरची ट्रंक ते जरा व्यापक स्वरूप म्हणून बोहरी आळी पर्यंत शास्त्र दडले आहे. मोडतोडीच्या सामनामधून एखादा अविष्कार पाहायला मिळू शकतो. ट्रंक आणि तिची माळ्यावरची जागा हा अविभाज्य घटक आठवणीचा आहे. आज विद्यापीठ म्हणून पुढच्या पिढी कडे ट्रंक सोपविली आहे.
एक जिव्हाळा, अतूट बंध आणि….माळ्यावरची ट्रंक
डिसेंबर 23, 2010 @ 10:55:47
सुरेख लेख 🙂
डिसेंबर 28, 2010 @ 21:09:33
धन्यवाद!! विशाल कुलकर्णी, आपले स्वागत.
डिसेंबर 23, 2010 @ 22:17:18
मस्त…आवडली पोस्ट 🙂
डिसेंबर 28, 2010 @ 21:15:09
धन्स रे सुहास, खूप दिवसांनी उत्तर देते म्हणून दिलगिरी व्यक्त करते. मी पण बर्याच दिवसांनी ब्लॉग वर आले. कारण नेहमीचेच….. ऑफिस.
डिसेंबर 23, 2010 @ 23:33:24
आमच्या कडेही आधी बर्याच गोष्टी आत सामावून घेतलेली अशी एक जादुई पेटी होती….
लेख मस्तच…
डिसेंबर 28, 2010 @ 21:21:44
देवेंद्र,
खूप दिवसा पासून हा विषय घोळत होता, साधारण पणे प्रत्येक घरात अशी ट्रंक असतेच म्हणून आठवणीना उजाळा…….
जानेवारी 04, 2011 @ 11:04:51
मस्तच, पहिले दोन शब्द वाचूनच आठवणी ताज्या झाल्या आणि डोळ्यासमोर आमची हिरवी ट्रंक आली… सुरेख लिहिला आहेस …
जानेवारी 04, 2011 @ 12:33:07
धन्यवाद, श्री. मनराव.
आमच्या घराची पण अशीच हिरवी ट्रंक मनात घोळत होती म्हणून हि पोस्ट…..
सप्टेंबर 06, 2013 @ 17:52:05
मस्त,सुंदर जुन्या आठवणी