सहा वर्षांनी भारतात दीपावलीला असण्याचा योग जुळून आला. अजिंक्यने लहानपणी पाहिलेली दिवाळी विसरून गेला होता. पुण्यात राहणे म्हणजे किल्ले स्पर्धा पाहणे हे निश्चित केले होते. सोसायटीच्या अंगणात एक कोपरा कायम किल्ल्या करता राखून ठेवलेला असायचा. प्रथम किल्ला कुठला करायचा हे ठरवले जायचे. आमचं काळी काही नेट नव्हते ना झेरॉक्स चे मशीन होते. किल्ल्याचे चित्र इतिहासाच्या पुस्तकातून शोधून काढायचो. मग त्या नुसार दगडांची निवड, दगड दुसऱ्या ठिकाणाहून चोरून आणायचे, मग माती गोळा करून किल्ल्यावरची चित्रे गोळा करायचो.
ज्याच्या कडे शिवाजी असायचा त्याला काही काम नाही बाकीचे सर्व मावळे हा समजूतदार पणा मनात चिडचिड करत जपून ठेवायचे. मातीवर पेरण्यासाठी अळीव दुकानातून आणले जायचे. हात, पाय कसे मातीमुद्द होत असत. घरातील मोठ्यांकडून किल्ल्याचे परीक्षण केले जायचे. विहीर आणि शेत हा अविभाज्ज घटक त्या मध्ये असत. हि विहीर कोणी कशी केली आहे हे पाहण्यासाठी रात्री दुसऱ्या वाडीत किंवा सोसायटीत हळूच चोरून जात असू आणि आपली कशी अधिक चांगली करता येईल यावर फार मोठी खलबते होत.
विहिरी करता एक प्लास्टिक डबा प्रत्येकजण घरातून आणायचा त्यातील सर्वानुमते निवडून मातीत खड्डा करून डबा त्यात ठेवून पाणी भरले जायचे. सुई दोऱ्याच्या रिकाम्या रिळाचा उपयोग रहाट करण्यासाठी केला जात असे. प्रत्येक गोष्ट घरातून आणली जायची आणि त्याचा कल्पकतेने विचार करून किल्ला सजवला जायचा. हुबेहूब परिसर करण्यात जो तो मेहनत करत असे. तेंव्हा किल्ल्यांची कुठलीही स्पर्धा वैगरे नसायची. आम्ही सर्व जण एकमेकांचे किल्ले बघायला जात असू आणि मोकळेपणाने दुसऱ्या किल्ल्याचे कौतुक पण केले जायचे.किल्ल्यावरची भुयारे, चोर दरवाजे, शत्रू करता केलेले खंदक, किल्ल्यावर जंगलात असणारे प्राणी… यात वाघ, सिंह यांना वरचढ मान असे. हळूच डोकावणारे ससे… किती किती रचना ह्या शिवाजीमय बनवायच्या. चार फुटात महाराजांचा किल्ला बनवण्यासाठी सोसायटीतले चाळीस जण मावळे पण दमत असू. संध्याकाळ झाली कि उद्याच्या कामाचे वाटप ठरवत असू. झोप कधी लागायची पत्ताच लागायचा नाही.
किल्ला नंतर फटाके त्या मध्ये ठेवून उडविला जात असे मला हि कल्पना फार दुखःदायक असायची.पण सोसायटीतील टारगट मुले काही केल्या ऐकायची नाहीत. मग आई मला घरात ओढून नेत असे. तो दिवस किल्ला का मोडला??? म्हणून रडण्यात घालवला जायचा. पुढच्या वर्षी आपण आपल्या घराच्या ग्यालरीत किल्ला करू मग तू तो कायम ठेव असे वचन मला बाबा द्यायचे पण त्यात मज्जा ती काय?? सोबतच्या सर्वांसहित किल्ला करणे हेच तर खरे अप्रूप आणि सोहळा असायचा.
किल्ले म्हणजे दीपावली हे दृढ समीकरण होते. किल्ल्यांचा आणि दीपावलीचा काय सहसंबध असा प्रश्न मला अजिंक्य ने विचारला. ह्या गोष्टीचा कधी विचारच केला नाही. आम्ही लहानपणापसून करायचो म्हणून तुला पण हे समजावे ह्या करता आपण किल्ल्यांची स्पर्धा पाहायला जाऊया असे बळेबळे तयार केले.
किल्ल्यांचे सादरीकरण हे मुळी एक प्रोजेक्ट होते. त्याची मोजमापे, त्यावरची हुबेहूब रचना दरवर्षी आम्ही हातानी केली त्यामुळे आम्हाला इतिहासाचा कंटाळा येत नाही आणि अजूनही जसेच्या तसे आठवते. आम्ही शिवाजी राजे आणि मावळे वर्षानुवर्षे कागदात फक्त पुढच्या वर्षीच्या किल्ल्या करता जपले नाहीत तर आम्ही प्रत्यक्ष किल्ले जगलो. असे लंबे चौडे भाषण मी अजिंक्य ला सुनावले. शेवटी नको नको करत आमची जोडी किल्ले स्पर्धा बघण्यास गेली.
पुणे आणि किल्ले यांचे समीकरण आहेच त्यात हि स्पर्धा सकाळ समूहाने ठेवली होती. पालकांचा पण क्रियाशील सहभाग असायला परवानगी होती. नवीन मराठी शाळेत हि स्पर्धा होती. शाळेच्या दरवाजावरच छान असा शिवकालीन दिंडी दरवाजा केला होता. ढाल, तलवार यांच्या द्योताकासाहित भव्य अशी भवानी माता पाहून मन कधीच शिवरायान पाशी पोहचले. अजिंक्य हि ते वातावरण पाहून रमला होता. मला सार्थकी वाटले.
पुढे छान अशा मेण्यात शिवाजी राजे बैठक करून बसले होते. पारावर मेणा होता. त्यापाशी आई वर्ग ठिय्या ठोकून बसला होता, आम्ही विनंती केली, आम्हाला फोटो काढायचे आहेत जरा उठता पण आमचे म्हणणे त्यांच्या कानावर पडले नाहीच शेवटी तसेच फोटो काढले. मी अजिंक्यच्या चेहऱ्याकडे पाहण्याचे टाळले. पण त्याने विचारले, आई ह्यांना रिस्पेक्ट देता येत नाही का?? माझ्या मागे परदेशी नागरिक होते, मी मागे वळून पहिले तर ते त्रस्त चेहऱ्यानी पुढे निघून गेले.
मैदानात सहभागी किल्ल्यांचा लक्षणीय आकड्यात प्रतिसाद होता. जणू काही शिवरायांचे किल्ले अंगण लुटुपुटूची लढाई, मोहिमा पार पडण्यास सज्ज झाले असावे. रायगड, राजगड, जंजिरा….. अनेक किल्ले आपापली जागा लक्ष वेधून घेत होते. कोणाचा खापरी लाल रंग, कोणाचा कडक शिष्तीचा करडा रंग, तर काळाकभिन्न रंग कणखर महाराष्ट्राचे वैभव लेऊन खाणाखुणा जपत होता. गडावर बाजारात मिळणारे मातीचे मावळे आणि आजूबाजूची गावठाणे खूपच छान वाटत होती. छोट्या छोट्या किल्लेदारांची उपस्थिती दुसऱ्या दिवशी नव्हती त्यामुळे मालक किल्लेदारविणा परिसर सुना सुना वाटत होता.
किल्ले बनण्यासाठी प्रसिद्ध इतिहास संशोधकांचे मार्गदर्शन मुलांना दिले गेले होते. कल्पना खरच चांगली होती पण दोन दिवसांनी त्या किल्ल्याच्या रचनेला तडे जातात, त्यावर परिसराचा कचरा पडतो. प्रदर्शनाच्या वेळी तेथील मुलांचे समालोचन असावयास हवे, आम्ही आळीपाळीने वेळा वाटून आमच्या किल्ल्याचे संरक्षण करत असू. पानिपतची लढाई त्याचा लाईट आणि म्युझिक शो पण ठेवला होता. मग जी स्पर्धा आपण मांडली त्याचे चित्रीकरण दाखवावे. एखादे मूल हे पाहून प्रेरणा निश्चित घेवू शकेल.
सध्याच्या काळात रेडीमेड किल्ले मिळतात. त्यावर मातीचे तयार असलेले मावळे, भाजीवाली, पाण्याला जाणारी स्त्री, विहीर, संत मंडळी, सैनिक सर्व काही तयार मिळते. काहीच माहिती नसण्यापेक्षा हे हि चांगलेच आहे असा जरी सकारात्मक विचार केला तरी, मोठे झाल्यावर एकदा तरी स्वतःच्या हातानी किल्ला मुलां बरोबर बनवायला हवाच. स्वतःच्या हाताने बनवलेले किल्ले जेंव्हा जपले जातील तेंव्हाच खऱ्या किल्ल्यावर गेल्यावर आपण आणि पुढची पिढी पण ऐतिहासिक वारसा निश्चित जपेल.
सकाळ समूहाने किल्ले करणे ह्या संस्कृतीला इतक्या मोठ्या प्रमाणावर पाठींबा आणि स्पर्धा आयोजित करून परंपरा जपली आहे. अशा स्पर्धेच्या काळात मुलांनी जास्ती वेळ तेथे उपस्थित असावयास हवे असे निश्चित पणे सांगितले असणार. मुलांची आणि पालकांची पण जवाबदारी आहेच. आपल्याला जर उत्तेजन दिले जात आहे तर त्याचा सर्वंकष बाजूने विचार सर्वांनी करावयास हवा. प्रयत्न स्तुत्य आहेच गरज आहे अधिक नियोजनाची.
सकाळ समूह दरवर्षी अशा विविध स्पर्धा आयोजित करून सर्वाना सहभागी करून घेतात त्या बद्धल अभिनंदन आणि धन्यवाद कारण आमच्या सारख्या भारता बाहेर दूर गेलेल्यांना आपला समृद्ध वारसा पुढच्या पिढीला दाखवता तरी येतो. हि माहिती मी इथल्या सर्वाना कळावी आणि त्यायोगे किल्ले सर्वांपर्यंत पोहोचावे. काही माफक अपेक्षा ठेवून आणि आपले कौतुक ह्या पोस्ट द्वारे …. शिवरायांपाशी समर्पित.
नोव्हेंबर 28, 2010 @ 17:12:27
अप्रतिम..किल्ले बनवण्याची ही परंपरा अशीच राहो. मुंबईत तर ती कधीच लोप पावली आहे..छान वाटत हे किल्ले बघून. 🙂
नोव्हेंबर 29, 2010 @ 03:47:22
सुहास,
एव्हढे किल्ले सर करता तर कधीतरी असाही किल्ला तुम्हीही तुमच्या पुढच्या पिढी बरोबर बनवाल अशी अपेक्षा ठेवून आहोत. कालाय तस्मै नमः…. आणि काय?? पण हा वारसा तुमच्या कडून जपला जाईल ह्या यावर विश्वास आहे.
नोव्हेंबर 28, 2010 @ 18:30:06
मस्त झाली स्पर्धा असं दिसतंय…फोटो मस्त आहेत! 🙂
नोव्हेंबर 29, 2010 @ 03:44:02
विद्याधर,
आपले किल्ले करणे आठवले आणि अजिंक्यला घेऊन सरळ स्पर्धेला गेले. मस्तच होती स्पर्धा.
नोव्हेंबर 28, 2010 @ 22:29:29
इथे तर नावाला ही राहिलेल नाही हे किल्ले बनवण वैगेरे…फ़ोटो आणि पोस्ट मस्तच..सकाळचे पण खरच कौतुक करावेसे वाटते ह्याला उत्तेजन दिल्याबद्दल…
नोव्हेंबर 29, 2010 @ 03:41:55
देवेंद्र,
मलाही जाणवले कि किल्ला बनवणे हल्ली कमी होतंय. म्हणूनच हि पोस्ट लिहिली. तेव्हढीच आठवणीत राहील. काही काळा नंतर वर्चुअल आनंद घ्यावा लागेल असेच वाटते…
नोव्हेंबर 29, 2010 @ 07:20:35
लहानपणची आठवण झाली. आम्ही पण किल्ले वगैरे बनवायचो, हल्ली फार कमी झालंय ते प्रमाण. पुढल्या वर्षी प्रतापगड बनवायची इच्छा आहे ,बघू या कसे काय जमते ते.
नोव्हेंबर 29, 2010 @ 13:56:15
महेंद्रजी,
लहानपणच्या आठवणी अजिंक्य ला समजावून सांगताना गोळ्या झाल्या, ह्या वर्षी मात्र मी आणि लेकाने किल्ला उभारला. पुण्यात मनसोक्त दीपावली अनुभवली. असा आमचा योग फारच दुर्मिळ आहे त्यामुळे पोस्ट तयार झाली …. ह्या वर्षी शिवाजी महाराजांपासून सर्व गाव आणि मावळे मस्कत ला परत येताना बरोबर घेवून आले आता पुढच्या वर्षी इथेच बनवणार हे नक्की केले.
ऑक्टोबर 23, 2011 @ 13:59:44
mala sudhha athwan jhaali killyanchi..khup banavle.chatadishi sagal baalapaN DoLyasamorun gele…mast zaaliye post.