खेळ अंधाराचे………वेध प्रकाशाचे.

परवा अजिंक्य ला सर्वपित्री म्हणजे काय ते सांगत होते. आकाशात आपले मृत्यू झालेले आप्त ह्या दिवशी मुक्त संचार करत असतात. ते ‘आत्मा’ ह्या स्वरुपात असतात. सर्वपित्रीला त्यांना जेवण ठेवतात. ह्या गोष्टीना पुरावा काही नाही परंतु ह्या दिवसा करता आमच्या लहानपणापासून भीती घातलेली होती. असे काही नसते, समजावून पण सांगत होते. कितीही न पटले तरी त्याचे चौदा वर्षाचे वय अशा गोष्टीत रमते. सध्या सी आय डी सारख्या सिरीज आमच्या कडे भक्तिभावाने बघणे होते. खून कसा झाला? का केला ह्या पेक्षा तो कसा शोधला हे खूप आवडते.

माझ्या लहानपणच्या गोष्टीत बाळ रमत गेले, बघता बघता रात्र झाली. जेवणे होतात न होतात तोच साडे आठ च्या सुमारास चक्क लाईट गेले. इथे हा अनुभव जवळ जवळ नाहीच. त्यामुळे घरात टोर्च पण एखादीच… सतत लाईट असल्याने इन्व्हरटर पण माहित नाही. मेणबत्ती चे दिवे गेल्या वर्षीचे दिवाळीचे घरात होते म्हणून बरे. हळू हळू अजिंक्य सोफ्यावर माझ्या जवळ जवळ सरकत होता.

आमच्या लहानपणीच्या अंधारात आम्ही कसे कसे वागायचो ह्या गोष्टीना सुरवात केली. घरात रात्री चिमणी, किंवा कंदिलाच्या उजेडात सर्व कुटुंब एकत्र बसायचो. आई रामरक्षा म्हणण्यास सुरवात करायची. आईचा शांत, अंधाऱ्या रात्रीतला एका लयीत येणारा गहिरा उच्चार पण किती आश्वासक असायचा.

‘चिमणी’ च्या उजेडात तिने केलेला गरमगरम स्वयंपाक. ताटात पोळी वाढताना मेणबत्तीचा तिच्या चेहऱ्यावर पडलेला प्रकाश, राजा रवी वर्मा च्या चित्रासारखा वाटायचा. तेंव्हाच्या काळात सारखे लाईट जात नसायचे पण एकदा गेले कि खूप वेळ येत नसत. मग सोसायटीच्या गच्चीत आपल्या गाद्या, उशा घेऊन घरातून प्रत्येक जण यायचा. आई कधी यायची नाही ती छोट्या बहिणीला घेऊन घरात. मी, भाऊ आणि बाबा गच्चीत.. सगळे जमत मग काय अंधाऱ्या गच्चीत पण चांदण्याच्या उजेडात भुतांच्या गप्पांना जोर येत असे. तेंव्हा आम्हाला पण सकाळची शाळा होती पण आठवत नाही कधी ह्या गोष्टीचा कोणी बाऊ केल्याचे.. कसे मस्त होते ते लाईट चे जाणे.

माझ्या लहानपणी ब्ल्याक आउट होत असे. पोलिसांचे सायरन वाजायचे… पाकिस्तानी हल्ले होत. अशा वेळी वडील मिलिटरी मध्ये इंजिनिअर म्हणून काही काळ होते, त्या जीवनाचा त्यांना अनुभव असल्याने लाकडी खिडकीच्या काचांना काळा कागद आमच्या कडे बरेच दिवस टिकून होता, भीती कधी वाटली नाही पण लाईट आले आणि संकट टळले म्हणून निदान निम्म्या ठाण्यातून तरी उत्साहाच्या आरोळ्या ऐकू येत.

भावाचा ‘राजू’ चा चेहऱ्यावर टोर्च चा उजेड पडून भुताचा चेहरा आम्हाला दाखवायचा हा उद्योग व्हायचा. धाकटी ‘अंजू’ किंचाळली कि, हा टोर्च फक्त बाबा सांभाळायचे. मग वडील कॅरम काढायचे. अहाहा, मेणबत्ती चा प्रकाश बोर्ड वर पडला कि, राणी सोंगटी पण कशी लाल व्हायची. मुद्दामहून कॅण्डल लाईट डिनर, असे अंधारात खेळणे ह्या करता कुठेलेही हॉटेल, किंवा क्लब लागत नव्हते कारण तेंव्हा इन्व्हरटर नव्हते. आज गावाकडे सुद्धा अशी धम्माल कमी होत आहे असे वाटते. पत्ते तर आई लवकर ये न….. अशी आरोळी ठोकून वाटण्यास सुरवात करायचो.

रात्री ‘रम्मी’ खेळण्यास खूप मजा असते, दुपारी बदाम सात ठीक असे माझे पत्त्यांच्या खेळाबाबत काही ठोकताळे आहेत. ‘रम्मी’, ‘गाढव डाव’… खेचा खेचीचे,अडवणुकीचे खेळ खेळताना लबाड, चिंता हे भाव मेणबत्तीत अधिक ठळक उठून दिसतात. ‘बदाम सात’ कसा वामकुक्षीचा खेळ दुपारीच बरा असो, असा डाव रंगत जात असे. मेणबत्ती च्या उजेडात सावल्यांचा खेळ तर जोशात यायचा.

घरातील सर्व सदस्य निरनिराळे आकार भिंतीवर करून दाखवायचे. दिसते तसे नसते…भासमान खेळ आहे ह्या जाणीवे बरोबर हि पण एक कला आहे हे हि आवर्जून वडिलधाऱ्या कडून सांगितले जात असे. ह्या खेळात कुत्रा. हरण, ससा असे आकार भिंतीवर खूप छान दिसतात.

जस जशी रात्र रंगत जात असे तसा दिवसा आणि रात्री चालणारा गुढमय खेळ प्लांचेट मांडले जायचे. अर्थात त्याला हि सभ्यता असायची रात्री म्हणे आत्म्यांना बोलवायचे नसते, ते परत जात नाही. मला स्पष्ट आठवते, कि कोणीतरी मुल खाणारी हडळ घरी येते, म्हणून दारावर श्रीराम हे आम्ही त्या अफवेला घाबरून लिहिले होते. वडील आणि आई हे खोडून काढत पण वातावरण असेच असल्याने आम्हीही भरकटले जात असू.

अंधारात गच्चीच्या सज्जात हळूच सटकत असू, आधीच चमूची टोळी जमलेली असायची, मग तो काचेचा ग्लास, कोरा कागद. त्यावर ‘हो’ ‘नाही’ असे दोन वर्तुळे…सर्व काही दाखवून लहान भावंडाना थरथर करायला लावत असू……मग आमची आठवडाभर कामे कशी अलगद त्यांच्या कडून पूर्ण केली जायची. कामे कसली तर….. पेन्सिलीना टोक करून ठेवणे, पेनात शाई भरून ठेवायची…. तेंव्हा रविवारी अंघोळ करताना केस धुणे हा कार्यक्रम प्रत्येक घरी होत असे.. त्याच रविवारी पेन साफ करून ठेवणे हे काम प्लांचेट पहिल्याने भावंड करत . आईच्या लक्षात आले कि, काय बोलणी बसत असत. अंधारात कशाला कडमड करता? अशी दटावणी पण मिळे . तरी पण हे उद्योग काही थांबविले नाहीत. बर रात्री खरे प्लांचेट कधीच करत नसू कारण मनात आम्ही पण टरकलेले असायचो आत्मा परत गेलाच नाही तर… त्यातल्या त्यात आजीला बोलवायचो ती काही त्रास नाही देणार म्हणून..पण लाईट गेले कि खोटे प्लांचेट मांडून कोणी ताईगिरी, दादागिरी करण्याची संधी म्हणजेच अंधार…

आता लाईट गेले कि, एका मिनिटात इन्व्हरटर घर पुन्हा प्रकाशमान होते. अजूनही गावी कंदिलाची मजा, कंदील, चिमणी साफ करणे केरोसीन घालून नीट ठेवणे किती होते कोणास ठावूक कारण घरोघरची अंधाराची मजा आता इन्व्हरटर ने घालवली. घरात सदस्य कमी झाले. बिल्डींग मधले सगळेच माहित असतात असे नाही. ह्या शोधामुळे फायदे हि खूप झाले पण अंधारातले लहानपण कुठेतरी हरवत चालले.

अंधारात जाणवलेला वेध प्रकाशाचा… त्या जाणीवेत अनुभवलेले सात्विक भाव, खोडसाळपणा आमच्या ह्या छोट्या पिढीला समजावून सांगावा लागतो. अजिंक्यला सर्व धम्माल सांगताना हि पोस्ट तयार झाली कदाचित… हेच वाचून हि पिढी निदान व्हर्चुअल आनंद तरी घेईल.

गोष्टी सांगताना रात्र खूप झाली, वेध लागले होते सर्वापित्रीच्या गूढ रात्री नंतरच्या येणाऱ्या….. जागून काढलेल्या पुढच्या प्रकाशाच्या नऊ रात्रींचे.

.

15 प्रतिक्रिया (+add yours?)

 1. विद्याधर
  ऑक्टोबर 12, 2010 @ 11:16:17

  हो गं… आता तर लाईट गेले रे गेले की येतात कधी ह्यासाठी जीव कासावीस होतो…
  मस्त आठवणी एकदम!

  उत्तर

  • anukshre
   ऑक्टोबर 12, 2010 @ 16:56:27

   विद्याधर,
   आठवल्या कि नै, आपल्या पण गमती जमती…. मला तर रस्त्यावरचे खड्डे, लाईट जाणे, पावसाने जाम झालेला ट्राफिक अजूनही आवडतो, कसे ठणठणीत राहता येते…मनाने, स्वभावाने. पटले नं. मज्जा असते रे अशी हि एक.

   उत्तर

 2. Jayendra Gholap
  ऑक्टोबर 12, 2010 @ 13:46:54

  Ek Number……….

  Dole Panavale he vacchuuunnnn….

  Mi pan ha anubhav ghetla aahe….Pan aata
  gele te divas..
  gele te divas…..
  gele te divas……..

  उत्तर

  • anukshre
   ऑक्टोबर 12, 2010 @ 16:50:13

   जयेंद्र घोलप,
   नमस्कार! आपले सस्नेह स्वागत!! छान आहे आपली प्रतिक्रीया… खरच गेले ते दिवस…. अनुभव मांडत राहूया संगणकावर… उजाळा देत राहू रम्य आठवणीना.
   माझे हि डोळे अलगद पाणावत होते. आपल्या भावना आवडल्या. धन्यवाद!!!

   उत्तर

 3. rajiv
  ऑक्टोबर 13, 2010 @ 19:59:37

  खेळ अंधाराचे ………
  एकदम जिवंत वर्णन. माझ्या नजरेसमोर एकदम ७० च्या दशकातील ठाणे उभे राहिले.
  ते खिडक्यांच्या काचांवरील, वाहनांच्या दिव्यांवरील काळे कागद, `मॉक ड्रिलस’ , इ.
  मोठ्यांचे दबकत बोलणे व मुलांचे ओरडणे……..
  धन्यवाद ..! खूपच छान लिहिले आहेस.
  आवडले एकदम. आता पूर्वलिखित ब्लोग कधी वाचतो असे झालेय. २-३ दिवसांत वाचू शकेन बहुतेक.
  मग त्यावर अभिप्राय लिहीन. काही हरकत ..?

  उत्तर

  • anukshre
   ऑक्टोबर 14, 2010 @ 11:36:44

   राजीवजी,
   आपल्या अभिप्रायांचे नेहमीच आनंदाने स्वागत असेलच, अभिप्राय हे अजून लिहिण्यासाठी पण प्रेरक असतात. शाबासकी मिळते आणि सुधारणा पण करता येतात. आपण आवर्जून भेट द्या. मी नेहमीच गप्पा करण्यास उत्सुक असतेच. १९७० ला आम्ही ठाणेवासीय झालो, तत्पूर्वी विद्याविहार ला राहत होतो. वडील रेमंड कंपनीत होते त्यामुळे जुने ठाणे हे अजूनही आठवते…. आपल्या पुढच्या अभिप्राय ची वाट पाहत आहे. मनापासून आभारी आहे, असाच ऋणानुबंध वाढता राहो…हीच सदिच्छा.

   उत्तर

 4. rajiv
  ऑक्टोबर 14, 2010 @ 14:51:09

  मी तर पक्का ठाणेकर आहे. जन्माशिवाय सबकुछ ठाणे …

  उत्तर

 5. आनंद पत्रे
  ऑक्टोबर 22, 2010 @ 06:41:58

  मस्तंच…. पण आता विजेशिवाय राहणं खुप अवघड आहे….

  उत्तर

 6. Asha Joglekar
  नोव्हेंबर 09, 2010 @ 09:40:56

  Nuste light gele tar kevadhya atwani kadhlyas ga. Man bhoot kalat gele an ramoon gele.

  उत्तर

  • anukshre
   नोव्हेंबर 20, 2010 @ 11:33:02

   नमस्कार आशा ताई,

   आपल्या प्रतिसादाला उत्तर द्यायला उशीर झाला कारण मी भारतात कामानिमित्त गेले होते म्हणून नेट च्या संपर्कात फारशी नव्हते. हो लाईट गेल्यावर आठवणी जाग्या झाल्या हे खर,आठवणी उजाळा देतात आणि मन रमून जाते. खूप छान अभिप्राय आहे आपला. मनापासून धन्यवाद आणि उशीर झाला म्हणून दिलगिरी व्यक्त करते. अशीच भेट होत राहू दे हि सदिच्छा….

   उत्तर

 7. सुरेश पेठे
  नोव्हेंबर 25, 2010 @ 20:50:24

  पुन:प्रत्ययाचा अनुभव मिळाला ! आभारी आहे

  उत्तर

 8. रवींद्र दंतकाळे (सोलापूर)
  एप्रिल 29, 2011 @ 10:57:37

  आपले खेळ अंधाराचे वेध प्रकाशाचे नुकतेच वाचण्यात आले. या वाचण्यात काही काळ मी भूतकाळात नकळतपणे रमून गेलो होतो. तुम्ही तुमचे जे अनुभव शेअर केले आहेत, त्या अनुभवाचा मीदेखील थोड्याफार प्रमाणात साक्षीदार आहे. खरंच भाग्यवान म्हणायला पाहिजे. त्याकाळचे जीवन आपण खऱ्या अर्थाने जगलो. गावाकडील सकाळ, शेतातील विहिरीत मारलेला मुटका, उसाच्या फडात बिनदिक्कीत फिरणे, सायंकाळी मैदानात किंवा मित्रांच्या घरी धिंगाणा घालणे, सकाळी दुपारी गोट्या खेळणे, मातीत बसून धुळीने माखलेले अंगाचा, किंवा शर्टाचा बाऊही करत नसू. खरंच खूप बदललं आहे. आत्ता कुठे मातीत बसलं शीऽऽऽ मातीत काय बसलास ऊठ आधी… अशा मॉडर्न आई-वडीलांच्या सूचना येतात. गावात वर्गात धिंगाणा घातला तर बदडून काढा म्हणणारे आई-बाबा आता मॉडर्न जमान्यातील डॅडी-मम्मीला अपमानित करणारे ठरताहेत. असो, खूप अशा गोष्टीला आता आपण मुकलो आहोत. पण त्याच्या आठवणी मात्र निरंतर असतील आणि मनाला सात्विक समाधान देणारी आहेत हे मात्र नक्की…!
  रवींद्र दंतकाळे (सोलापूर)
  8888 45 1857

  उत्तर

  • Anukshre
   एप्रिल 30, 2011 @ 11:11:57

   नमस्कार, श्री. रविंद्र दंतकाळे,
   आपले स्वागत!! आपण खुपच छान अभिप्राय लिहिलात. खरंय, अशा बालपणीच्या गमती जमती आत्ता दुर्मिळ झाल्यात, मलाही हे जाणवले म्हणून लिखाण केले. आपला अभिप्राय देखील मला सुद्धा पुन्हा एकदा भूतकाळात गेवू

   नमस्कार, श्री. रविंद्र दंतकाळे,
   आपले अनुक्ष्ररे मध्ये स्वागत!!

   आपण खुपच सविस्तर छान अभिप्राय लिहिलात, आपली आभारी आहे. खरंय आत्ता अशा बालपणीच्या गमती जमती दुर्मिळ झाल्यात. आपल्या अभिप्रायाने पुन्हा एकदा भूतकाळात रमवले. मातीत खेळण्याची मजा सिमेंट च्या फरशीवर येणारच नाही. पोहण्याचा दंगा, धाडस स्वीमिंग च्या शहरी धड्यात नसतेच. गाव पण दुर्मिळ झालाय आणि आपल्याला निदान ह्या आठवणी तरी आहेत परंतु पुढील पिढीला फक्त असे लेख वाचूनच समाधान मिळवावे लागणार असाच भविष्य काळ आहे……जुने ते सोनेच असते पण नवीन पण हवेसे वाटते हा संघर्ष करतच भावी पिढी अनुभवणार…कालाय तस्मे नमः||

   आपल्या अतिशय सुंदर अशा अभिप्राय करता पुनःश्च आभार व्यक्त करते.

   उत्तर

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s

%d bloggers like this: