नवरात्रीची लगबग सुरु झाली. कुठे गरबा, तर कुठे नव अंकुर चे घट मनात सजू लागले आहेत. वेध शक्तीच्या उपासनेचे, स्त्री शक्ती..आदिमाता. अशी कि आपल्या बरोबर आपल्या परिवाराचे, गावाचे, देशाचे सर्वांचे कल्याण करते. अष्टावधानी असेलेली स्त्री, नवरात्र साजरे करते. तमिळनाडूत पण नवरात्र बोम्माई ‘कोलू’ किंवा ‘गोलू’, ह्या नावाने नवरात्र साजरे करतात. ह्या कोलू चे वैशिष्ट्य म्हणजे साधारण पणे महाराष्ट्राच्या चैत्र नवरात्री सारखे असते. अनेक बाहुल्या, देवता सात, नऊ, अकरा अशा पायऱ्या करून त्यांच्या माना प्रमाणे विराजमान केल्या जातात.
मुलीच्या लग्नाच्या वेळेस तिची आई एक बाहुली, जी लाकडाची असते( औषधी लाकूड ) ती त्या मुलीकडे गोलू करता देते आणि त्या नंतर ती अनेक बाहुल्या गोळा करून स्वतःचे गोलू साजरे करू लागते. गोलू नऊ दिवस करतात किंवा शेवटचे तीन दिवस गोलू मांडतात. गोलू मांडायचे कसे ह्याचे पण एक शास्त्र आहे, पद्धत आहे. गोलू म्हणजे, बाहुल्यांची पायरी,टप्प्याच्या अनुषंगाने केलेली मांडणी. सर्वात वर कलश ठेवला जातो. त्याच्या आजूबाजूला देवींची अनेक रूपे, नंतर गणपती, विष्णू चे दशावतार च्या सुरेख , मुरगम, कृष्ण, राम सीता, हनुमान असे ३३ कोटी देवांचा जणू काही स्वर्ग उभारलेला असतो.
गोलू जेव्हढे समृद्ध तितके ते घर सुखी समाधानी होते. देवांच्या ह्या दरबारात व्यापारी, शेतकरी, वाणी, लोहार, कुंभार असे विविध जाती जमाती चा जणू काही मानवाच्या कौशल्याचा, मानवाने केलेला सन्मान म्हणून नम्रतेने देवाच्या दरबारात त्यांच्या नंतर पायरी- पायरी खालीखाली मांडतात. विशेष म्हणजे ह्या जाती जमातीच्या मायंदळीत प्राण्यांना विशेष आपुलकीने बाग, झु निर्माण करून एका बाजूला मांडतात. बाग नसेल ह्यांचा गोलू पूर्ण होत नाही. थोडक्यात भूमी पासून स्वर्ग पर्यंत सर्व काही सृष्टीचे आहे ते छान जपले पाहिजे हा संदेश जणू काही देतात.
रोज रात्री आरती केली जाते. सरस्वती च्या पूजनाचा विशेष थाटमाट असतो. स्त्रियांना विशेष मान देतात. कुंकू, विड्याचे पान त्यावर कच्ची अर्धी सुपारी, छोटीशी भेट दिली जाते. पूजनासाठी आलेल्या प्रत्येक स्त्री च्या मस्तकावर तेलाची दोन बोटे का होईना पण लावली जातात आणि केस फणीने थोडेसे सारखे करून देतात.
राजाराणी किंवा मारापची, सरस्वती ह्या मूर्ती विशेष महाग असून त्या पारंपारिक असतात. गोलू कसे मांडावे ह्या करता वेगवेगळ्या थीम ठरवून त्या प्रमाणे त्यांची मांडणी करतात. उदा. समजा कौलारू घर आणि गाव हि थीम असेल तर गावातील विविध व्यवसाय, त्या गावाची विशेष देवता ह्यांची मांडणी करतात. उगाचच सर्व गोलू आहेत म्हणून भारंभार मांडत बसत नाहीत.
छोट्या छोट्या पोत्यातून किंवा भांड्यामधून धान्य ठेवले जाते. जर पाण्याची थीम घेतली असेल तर शंख, शिंपले सुरेखसा असा शांत निळा प्रकाश सर्व खोलीत असेल ह्याचे भान ठेवतात. जंगलाची थीम असेल तर प्राणी, पक्षी, विविध झाडे आवर्जून काळजीपूर्वक मांडली जातात. ह्या सर्व थीम करता स्थानिक तमिळ संस्था कडून स्पर्धा ठेऊन बक्षिसे दिली जातात. सहसा गोलू नाही असे घर नसते. दसऱ्याला कलश जागेवर हलवून, पुन्हा पुढच्या वर्षी करता ह्या सर्व दरबाराची रवानगी बंद खोक्यात केली जाते. अतिशय काळजीपूर्वक ह्यांना सांभाळतात.
‘सुंडल’ प्रसाद देतात, हा छोले, हिरवे मुग किंवा चवळी पासून बनवतात. ओले खोबरे, उडीद डाळ, कढीपत्ता, ह्यांची चटपटीत फोडणी दिलेली असते. नुसता पण खावासा वाटतो आणि शिवाय पौष्टिक पण असतो. अनेकविध गोड पदार्थ असतात पण ‘सुंडल’ हा विशेष मानाचा प्रसाद असतो.
सामाजिक रचना, पर्यावरणाचे महत्व आणि पौराणिक आधार ह्यांचा मनोहारी दरबार म्हणजे गोलू…… बोम्माई कोलू. सर्वाना आधार स्तंभ असणारी विश्व देवता ते गृह देवता ह्यांचा सोहळा म्हणजे तामिळनाडू चे नवरात्र. दरवर्षी मला ह्या नवरात्रीला भेट देण्यास मिळते,
नवरात्रीत माझा पोस्टद्वारा केलेला आई अंबामातेस नमस्कार!!!
नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा !!!!!!
ऑक्टोबर 07, 2010 @ 15:20:32
तायडे, मस्त माहिती दिलीस…
नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा..बोलो अंबे माता की जय
ऑक्टोबर 07, 2010 @ 17:40:52
धन्यवाद !!! धन्यवाद !!! नवरात्रीच्या धम्माल मस्तीची तुझ्या पोस्ट ची वाट पाहत आहे.
ऑक्टोबर 07, 2010 @ 19:36:24
धन्स,नवीन माहिती मिळाली…
नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा..बोलो अंबे माता की जय…!!!
ऑक्टोबर 08, 2010 @ 08:24:17
मलाही हे सर्व नवीनच होते म्हणून लगेच पोस्टले……..
ऑक्टोबर 07, 2010 @ 22:01:05
खुपंच छान नोंद झाली. आणि तुम्हाला देखील नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा!!!
ऑक्टोबर 08, 2010 @ 08:22:49
हेमंत,
इथे तमिळ, मल्याळी लोक आपल्या प्रमाणात खूप जास्त आहेत, त्यामुळे ह्यांच्या परंपरा आवर्जून बघण्यास जाते आणि पोस्ट करता विषय मिळाला…….
ऑक्टोबर 07, 2010 @ 22:10:04
नेहमीप्रमाणेच मस्त माहिती!
नवरात्रीच्या शुभेच्छा तुला!!
ऑक्टोबर 08, 2010 @ 08:19:49
मुंबईत असताना खरतर इतर संस्कृती खूप जवळच रहात असते पण कधी असे नवरात्र पहिले नव्हते. इथे आल्यावर हे नवरात्र पाहत आले आणि लिहिले …….धन्यवाद.
ऑक्टोबर 13, 2010 @ 14:20:07
खूप छान व सखोल माहिती गोळा करून मांडल्याबद्दल कौतुकास पात्र !
ऑक्टोबर 14, 2010 @ 11:44:50
धन्यवाद!!! काका, लगेचच आवडले म्हणून कळवलेत. एकाच स्वभावाचे आपण दोघेही (काका आणि पुतणी) आहोत, त्यामुळे हा सर्व बाडबिस्तरा गोळा करत असते, मांडत राहते…. असे आहे. मुंबईत असताना कधी इतर परंपरा एव्हढ्या जवळून पाहायला मिळाल्या नाहीत, इथे अशी संधी आली तर मस्तच वाटते.