गाडीत घर घेऊन फिरतात. हे त्या गाडीत बसल्यावर लक्षात येते. मी ही ह्याच कुळातील आहे. गाडी म्हणजे चारचाकी होय. आमचा परिवार एकाच मुलाचा, टपरवेअर मध्ये घेतलेलं खाण, त्या खाण्याचे विविध डबे.. उदा. पोळी भाजीचा, हलकासा नाश्ता, बिस्कीट, गोळ्यांचा. असे. हे पण कमी काय म्हणून बाळ, मुंबई-पुण्या पर्यंतच्या प्रवासात झोपायचे म्हणून मागच्या सीट वर त्याची छोटी उशी, चादर. वाटेत गाडी अडकली तर…..तेंव्हा जलद गती मार्ग नव्हता. जुन्या घाटात हमखास वाहन कोंडी अनेक तासांची पण होत असे. नंतर जेंव्हा द्रुतगती मार्ग तयार झाला तरी पण अकारण गाडी भरण्याची माझी जुनी सवय काही गेली नाही.
प्रवास अनेक तासांचा झाला तर काय त्रास होऊ शकतो म्हणून अनेक कोरडे खाण्याचे प्रकार, औषध पेटी, माझी गाडी चार दिवस जरी अडकून पडली तरी काहीही अडणार नाही इतकी जय्यत तयारी करण्याची माझी खोड आहे. हि झाली गाडीच्या आतील तयारी, पुण्याहून किंवा कुठून हि परत येताना तेथील काही रोपटी, आकर्षक वस्तू ह्यांनी गाडी खचाकच भरत असे. माझा सहनशील नवरा संसारात पडल्याने हतबल होऊन जायचा. माझे आपले एकच म्हणणे असायचे हातात थोडीच घ्यायचे आहे, डिकीत ठेवायचे. जर काही इमर्जन्सी झाली तर मुल लहान आहे.
भारतात माझ्याकडे तेंव्हा ‘पोमेरीअन’ होता. ‘पोमेरीअन’ चे सर्व सामान खाण्याचे, पाण्याचे भांडे, पट्टा, त्याची खेळणी, कुत्र्याची पण औषधे, ते घरतील लहान मुलच होते.. कुत्र्याला ठेवण्याची सोय नव्हती असे नव्हते तर मला त्याच्या शिवाय चैन पडायचे नाही, म्हणून त्याच्या सकट जमेल तसा प्रवास. कोणाचे कशापासून अडू नये. चारही दिवस प्रवासाचे मजेत असावेत म्हणून माझा कोण आटापिटा असायचा. ह्यांना असला फाफट पसारा करून प्रवासाची आवड नाही.
‘मारुती ८००’ आणि ‘अल्टो’ ह्या आमच्या गाड्या घर च होत्या. गाडीत एव्हढे सामान असणे म्हणजे काही सुटसुटीत प्रवास नाही. गाडीची शान राखा. लहान मुला बरोबर प्रवास कोणी करत नाही का? ते कसे इतके सुटसुटीत प्रवास करतात. इतके जपलेस तर अजिंक्य बाहेर कसे शिकणार? इतकी बोलणी बसायची, पण प्रवासात आईकडे खाण्यासाठी काहीच नसल्याने हतबल झालेली बाळे मी पहिली आहेत. मुल लहान असेल तर बरोबर एखादा बिस्कीट चा पुडा आणि पाणी तरी निदान बरोबर असावे ह्या ठाम मताची मी आहे. मग प्रवास दहा मिनिटाचा असला तरी, तो कधीही जास्त होऊ शकतो हि शक्यता आईने नेहमीच लक्षात घ्यावी. माझा प्रवास चार दिवसाचा असला तर, सगळीकडे घर करून टाकले आहे असे म्हणत, ‘हे’ सर्व सामान घेत. अजिंक्य कधी एकदा माझ्या दृष्टीने मोठा होतो असे ह्यांना झाले होते.
लांबचा प्रवास असेल तर परतीच्या प्रवासात छोट्यांचे कपडे सीट च्या चहुबाजूनी वाळत घातलेल्या गाड्या पहिल्या कि, हे तर माझ्या पठडीतले आहेत. असे माझे मन भरून येते. घर आणि गाडी असा भेदभाव न करता मजल दर मजल प्रवास करत माझे बाळ मोठे झाले. आता सुद्धा मस्कत वरून येता, जाता, मी किती नको ते सामान घेऊन प्रवास करते हि, चिडचिड ह्यांची सुरु असते मस्कत मध्ये आलो तेंव्हा आमच्या प्रवासाचा पूर्व अनुभव असल्याने, मला आणि अजिंक्यला ‘ह्यांनी’ बऱ्याच गोष्टी गाडी करता समजावून सांगितल्या.
‘लॅण्ड क्रुझर प्राडो’ म्हणजे ह्यांचे खूप काळापासून जपलेले स्वप्न होते. आम्ही अनेक गाड्यांच्या शोरूम मध्ये जाऊन आलो. पण ह्यांचे प्रेम ह्या गाडीवर इतके आहे कि, ह्या गाडीला जपणे म्हणजे ह्यांना अजून एक बाळ झाले अशीच भावना माझी व अजिंक्यची आहे. वर्षानुवर्षे जपलेले ‘ लॅण्ड क्रुझर प्राडो’ चे स्वप्न प्रत्यक्षात अवतरले. सध्या असलेली आता असलेली ‘निसान सनी’ हि गाडी पण आम्ही बरीच वापरली आहे म्हणून गाडी बदलून ह्यांनी त्यांची ‘ लॅण्ड क्रुझर प्राडो’ घेण्याची इच्छा पूर्ण केली.
माझ्या वाढदिवसाच्या निमित्ताने मला २०१० ची ‘लॅण्ड क्रुझर प्राडो’ हि गाडी ह्यांच्या कडून भेट देण्यात आली. आम्ही दोघांनी गाडीत कसे बसावे ह्या करता ‘ह्यांनी’ शिकवणी घेतली….. नियमावली अशी आहे……..
१) दरवाजा हळू लावायचा.
२) गाडीत खाणे बंद.
३) पाय वर करून मांडी घालून बसायचे नाही.
४) अकारण बोलणे बंद.
५) पेपर चा कचरा करायचा नाही.
६) डिकी मोठी आहे म्हणून उगाचच सामान भरायचे नाही.
७) गाडी पूर्णपणे स्वयंचलित असल्याने, हे काय, ते काय, असे मध्ये मध्ये विचारायचे नाही.
८) गाडीत सीट मोठी आहे म्हणून लोळायचे नाही.
९) पाणी पिताना सांडायचे नाही.
१०) डोक्याला जास्त तेल लावुन गाडीत बसायचे नाही.
११) लांबच्या प्रवासाल गेलो तरी उशी, चादर घेऊन पसरायचे नाही.
१२) वाटेत मिळेल ते खाणे करायचे. खाण्याचा डबा बरोबर घेतला असेल तर शिस्तीत वाटेत थांबून खाऊन मग गाडीत बसायचे.
१३) गाडी मोठी असल्याने कुठे हि पटकन थांबा असे म्हणायचे नाही
१४) वेफर्स चे पुडे कारण नसताना गाडीत फोडून सांडासांड करायची नाही.
१५) सामान गरजेचे घेणे झाल्यास व्यवस्थित डिकीत ठेवणे.
अशा अनेक नियमांची पारायणे आमची होत आहेत. खूप जपलेले स्वप्न ‘धनंजय’ यांना मळके करायचे नाही, आपल्या स्वप्नाच्या पूर्ततेचा सन्मान आपणच ठेवायचा असतो. अजिंक्य पण मोठा झाला आहे. आता प्रवासात मला काहीच काळजी करावी लागत नाही. हीच योग्य वेळ आहे अशी मोठी गाडी घेण्याची असे मलाही पटले.
अजिंक्य ला ‘ह्यांनी’ वेगवेगळ्या गाड्याच्या शोरूम मध्ये नेऊन आपल्या बजेट मध्ये हि गाडी कशी बसते, आणि आपली गरज कशी पूर्ण होते . हि बाब पूर्णपणे समजावून सांगितली. मोठ्या होणाऱ्या मुलाकरता योग्य वेळी काही गोष्टी समजावून सांगणे म्हणजे आपल्याच स्वप्नाचा आनंद मिळतो. गाडीत अनेक सोई सुविधा आहेत. गाडी सांभाळून कशी ठेवायची हे पित्याचे कर्तव्य आजच्या ह्या फास्ट पिढी करता सांगणे खूप गरजेचे आहे. ह्या पिढीला अनेक गोष्टी सहज मिळतात पण आई- वडिलांनी त्या केंव्हा, कशा आणि कोणत्या वेळी सांगणे म्हणजेच सुरक्षित जीवन आणि आई वडिलांचे वर्तन सन्माननीय आदर्श ठरते.
माझा वाढदिवस म्हणून ह्यांनी ‘२०१० ची ‘लॅण्ड क्रुझर प्राडो’ घेण्याचे स्वप्न प्रत्यक्षात आणून मला बहाल केले. खरच!! ह्यांच्या ‘ह्या’ नवीन बाळाचा लळा आंम्हाला पण लागला आहे. आम्ही ‘ह्यांचे’ स्वप्न नीटपणे जपून खूप वर्ष पुन्हा नवीनच आहे असा अनुभव घेऊ.
गाडीतले घर किंवा घरा एव्हढी गाडी असली तरी ध्येयाने पाहिलेल्या स्वप्नाची पूर्तता होणे आणि त्यांचा आदर करणे हेच खरे घरपण आहे.
मला वाढदिवसाची ‘२०१० ची ‘लॅण्ड क्रुझर प्राडो’ हि अनोखी भेट खूप आवडली आहे.