कातरवेळ, काहूर आणि सांजवात

हल्ली बऱ्याच वेळेला घडते. संगणकावर काम करत राहिले कि वेळेचे बंधन राहत नाही. अचानक लक्षात येते, घरात चारी बाजूनी अंधार आला आहे. विचारांचे काहूर काही संपत नाही. संध्याकाळ ची कातरवेळ मला खूप अपराधी बनवते. हुरहूर अधिक जाणवते. खिडकीतून आधार देणारी झाडे नकोशी वाटतात. खिडकीतून झाडां ऐवजी, माणसांचा आधार बरा वाटतो. थंड हवेच्या ठिकाणी, गर्द झाडातून मला मुंबईची आठवण खूप येते. घरात सुद्धा मनात कोंडलेले विचार आठवतात. घरी एकटे असले तर हे बरेच जाणवते. भित्रे मन नसून हि संवेदनाक्षम मनाची खुण आहे, ह्या खुणा मी खूप जपते. त्यातूनच मी मला पाहते. दूर गेलेली आपली माणसे घरी असावी असे जाणवते. त्यातूनच ” या चिमण्यानो परत फिरा रे, घराकडे अपुल्या, जाहल्या तिन्हीसांजा” हे गाणे हमखास आठवते.

काम संपून मी मी टीव्ही पाहावा म्हणून बाहेर येऊन बसले, घर चौथ्या मजल्यावर. बाहेर गुलमोहराचे झाड, त्याचा फांद्या न्याहाळत दुपारी चहा घ्यावा. हा क्रम नित्याचा, फांद्यांचे आणि माझे नाते जुळले होते. नवीन आलेला अंकुर पण मला ते आवडीने दाखवायचे. संध्याकाळ मात्र हे नाते गडद व्हायचे. डास येऊ नये म्हणून मी मला कोंडून बसायचे. असंख्य चिमण्या परत यायच्या. अशीच वेळ अचानक चिमण्यांचा फडफडाट व गलका ऐकू आला . मनात शंका आलीच की, काही तरी विपरीत होत असणार. खिडकी उघडली तोच अंधार दाटून आला. मी टोर्च आणली व फांद्यान मधून फिरवत राहिले. दोन दाहक डोळे, व सरपटणारे अंग दिसले. काय करू मी, हैराण झाले. तो जहरी पुढे पुढे सरकत होता. मी जोरात हुशः हुशः आवाज काढत ओरडत होते. मागची बाजू कोण असणार? साप, साप ओरडावे तर ऐकून काय होणार. अपराधी वाटत होते. सापाची अन्ना करता धडपड, चिमण्यांची पिल्लं करिता फडफड व खिडकीत मी, देवा वाचव यांना, म्हणून टाहो फोडत होते. त्याने गिळले काही तरी, कारण शांतता झाली. मी पाहीले तो, उतरत होता. काळाने घास घेतला

सकाळी पुन्हा चिवचिवाट ऐकू आला. जीवन सुरु झाले. मी रात्री जेवू शकले नाही. मुलाला घट्ट मिठीत घेऊन झोपले. तो ही गोंधळला होता. एकटा झोप म्हणणारी, आई एकदम बदलली कशी. मी मात्र काही करू न शकल्यामुळे चिमण्यांची अपराधी झाले. ह्या छोटाश्या चिमण्या मला अंधार कसा स्वीकारायचा, प्रकाश कसा बघायचा शिकवून गेल्या. देश सोडला इथे चिमण्या पुन्हा मिळाल्या. खिडकीतून पुन्हा झाड डोकावते आहे. चिमण्या करता मी पुन्हा खिडकीतून जीवन बघत आहे.

काहूर दाटले गुलमोहरी छटांचे, रंग सोनेरी सांज वेळेचे, अजूनही मी ह्या वेळी घरी, माझ्या भारतात परतते. कवी बी. रघुनाथ ह्यांच्या सांज ह्या कविता संग्रहा ची आठवण झाली. माझ्या मातीच्या मायेसाठी प्रत्येक सांज मी चंद्र केली. घरी परतणारी गुरे त्यांच्या खुरांनी उडलेली धूळ, सांजेलाही उदी रंग मिळाला, एक शाश्वत गहिरा रंग.

अशा कातर वेळी सुखी मन पण तरल होते. मन भटके होते. मनाच्या स्थिरते करिता मी सांजवात लावते. छोटासा पण प्रकाश मला मनाने काय घेतले, ते मलाच परत करण्यासाठी शुभंकरोती म्हणून समर्पित करण्याचे शिकवून जातो. पुन्हा मी घरात रमू लागते, दूर असलेल्या भावनांना घरचा मार्ग स्पष्ट दिसावा म्हणून प्रकाश पणती दारात लावते. तन- मना च्या जोडीची ही सांजवात, तिळा सारख्या उबदार भावनेत रात्रभर तेवती राहू दे.

आई, गृहिणी म्हणून घरासाठी,तुळशीपाशी विश्वासाठी प्रार्थना ची परंपरा अजूनही चालू आहे. प्रत्येकाच्या मनाला अशी सांज आठवण ठेवून गेलेली असते. लेखन, कविता, ह्यासाठी तर ही खूप आवडती आहे. जे अनुभवू पाहतात त्यासाठी सांज अनुभूती देते.

चंद्राचा शांत, शीतल प्रकाश सांजेलाही उजळ करून गेला म्हणून माझी सांज मी चंद्र केली. अशा कातरवेळी प्रकाश निसटू पाहतो, अंधार अंगावर येऊ लागतो ह्या सीमा रेषेवर, मी सांजवातीचा आधार शोधते. ह्या काजोल वेळी उद्याचा येणारा पितांबरी रंगाचा प्रकाश मनाला नकळत पणे उदी रंग लेऊन जातो. पितांबरी सोनसळी रंगाने मी पुन्हा भरून जाण्याकरता सांज मी स्वीकारते. चिमणीरुपी दूर गेलेल्या मनाची आवर्तने रोखण्यासाठी पुनश्च एकदा सांज प्रकाश भरून मनात व्यापून राहिली.

कुठल्याही उत्सवात संध्याकाळी मन कसे तृप्त असते. गणपती बाप्पाच्या विसर्जन नंतर हि संध्याकाळ अशीच एकटी वाटते. बाप्पाच्या सहवासाने घर कसे भरून पावते तीच पोकळी कातर वेळ म्हणून जाणवायला लागते. माझ्या मनाला तरी असा आधार लागतो. मग दुसऱ्या दिवशी संध्याकाळी लावलेली तीच सांजवात बाप्पा असताना उत्साहाची वाटत होती, आता मात्र शांत निरामय अशी होते. शुभंकरोती चे आपलेच स्वर , बाहेर मस्जिद मधून कानावर पडणारी अल्लाची पुकार ह्यांचा एकत्रित नाद घरात गुंजन करू लागतो. भारताच्या बाहेर पडल्यावर हि वेळ फार जाणवायला लागली. बाप्पा नंतर येणारी नवरात्र पुन्हा एकदा संध्याकाळ उजळून टाकेल आणि नंतर येणारी दीपावली हि तर दिव्याची सम्राज्ञी… एकेक सणांनी पाठोपाठ सांज सजवली आहे.

संध्याकाळची अशी आवर्तने मनास पुन्हा पुन्हा मायदेशी….. आईच्या घरच्या उंबरठ्यावर अलगद नेतात. सांजेच्या ह्या दोलायमान विचारास एक दिशा नाही, एक विचार नाही कारण काहूर साठवून आले ते आजच्या दिवशी, मी आईकरता अजूनही लहानच असते, आज संध्याकाळी तिने मज साठी केलेले सांज औक्षण माझे वय लहानच ठेवते. आकाशात पसरणाऱ्या सांजेत चंद्र डोकावत असताना लेकीचे कौतुक चंद्रात सामावून जाते. प्रत्येक सांज अशी वेगवेगळ्या विचारांनी प्रकट होत असते.

विचारांची आवर्तने आणि सांज वेळ याची भूल मला हि पडली आणि जाणवली काहूर… कातरवेळ आणि सांजवात मनातली…..