श्रावण मासी हर्ष मानसी…………

अजूनही आठवणारी हि छान कविता!!! कविता म्हणायचे का? निसर्गाचे गाणे का? मनाचा आवाज!!! हा संभ्रम कधी पडलाच नाही. शाळेत ओळख झाली आणि जीवनाचे गाणे हे प्रत्येक टप्प्यावर जाणवू लागले. बालपणीचा रम्य काळ हा ह्या श्रावणाच्या अनेक दिवसांशी घट्ट पणे अजूनही नाते जोडून आहे. श्रावण हा सर्वांशी निगडीत असा आहे. चातुर्मासाच्या ह्या कहाण्या आज्जी च्या भोवती रुंजी घालू लागतात. नात का नातू हा भेदभाव नाही, श्रावणात आजी चे राज्ज्य असायचे आणि आई सर्व गोष्टी काटेकोरपणे अमलात आणायची.

श्रावण महिन्याचा पहिला दिवस कोणत्या वारी येतो ह्या करता कालनिर्णय पाहत नव्हते तर श्रावण प्रथम दिवसा ची चर्चा, हितगुज घरी केंव्हाच सुरु झालेले असायचे. आषाढ महिन्याचा प्रथम दिवस हा ‘मेघदूत’ म्हणून साहित्यात बराच परिचित आहे. आषाढी एकादशी, आषाढ अमावस्या ह्या पुढे घरी फारसा सहसंबंध आषाढ महिन्याशी नव्हता. कौतुकाचा, मायेचा, व्रतवैकल्याचा, देवळात खूप वेळा जाण्याचा हा एकमेव महिना म्हणजे श्रावण आला….श्रावण आला.

श्रावणात जेवणाची गम्मत काही औरच असायची. रोज कुठल्यातरी देवाचा वर असतो आणि त्या प्रमाणे जेवण केले जायचे. सोमवारी शंकर देव ते शनिवारी हनुमान इथपर्यंत चंगळ, रविवारी काय बेत असायचा ते मात्र आता अंधुकसे पण आठवत नाही. परिचित, नातेवाईक , स्वतःच्या घरी नेहमी पूजा असत. नवीन कपडे, नटणे, सजणे म्हणजे धम्माल!! असे समीकरण दृढ होते. हा महिना म्हणजे होली मंथ का? असे आताच्या पिढीला समजावून सांगावे लागते.

निसर्गाच्या बदलाप्रमाणे आहार, विहार, विचार ह्यांना सुसंगत अशी जीवन शैली बनविणे म्हणजे श्रावण. हा महिना बऱ्याच जणांकडून मांसाहार , आणि मद्य वर्जित करून पाळला जातो. खूप जणांना हा महिना जवळ आला कि धस्स होते कारण महिनाभर भाजीपाला खाऊन दिवस ढकलणे कठीण होते.

श्रावणातील जिवत्या, घरातील पूजेचा मस्त सुगंध, पुरणपोळी, पापड कुरडया,अळूवड्या ह्या ह्याच दिवसात छान वाटतात. जसे दिवाळीतील फराळ दिवाळीतच मस्त वाटतो. असा हा श्रावण कोणाला हवासा, कोणाला नकोसा वाटतो. आता ह्याच दिवसात फक्त देव असतो का? तो आपल्या मनात कायम असावयास हवा तरच मनाचा श्रावण सगळीकडे हिरवळ दाटे चोहीकडे असा निसर्गाने परिपूर्ण असलेला अनुभव देता होईल.

श्रावणाची प्रकर्षाने आठवण होण्याचे कारण कि मस्कत मध्ये होली मंथ ‘रमादान’ च्या खुणा जाणवायला लागल्या आहेत. आपल्या भारतीय शाळा सुद्धा एक तास आधी सोडतात. अरेबिक शाळांना तर सुट्टीच असते. ऑफिस मध्ये ओमानी लोकांना सुट्टी नाहीतर अर्धा दिवस काम ठेवतात. दिवसभर बाहेर कुठे हि खाण्यास मिळत नाही. काही हॉटेल मध्ये पार्सल दिले जाते पण तिथे बसून खाण्यास बंदी आहे. येथे दिवसा मोकळ्या जागी तुम्ही खात असाल तर तुम्हाला कायद्याने शिक्षा आहे. संध्याकाळी ‘अजान’ म्हणजे प्रार्थना झाल्यावर मात्र जवळ जवळ रात्रभर ओमानी कुटुंबीय समुद्र किनारे, बागा इत्यादी ठिकाणी जमून एकत्रितपणे होली मंथ चा आहार घेतात. मॉल मधून फार मोठ्या प्रमाणात सेल असतात, ते सुद्धा रात्री खूप वेळ चालू असतात.

दिवसभर प्रचंड शांतता जाणवते. येत असतो तो फक्त दिवसभरच्या त्यांच्या प्रार्थनेचा आवाज, तो पण ऐकावासा वाटतो कारण आंम्ही सुद्धा त्यांच्या देवाला सुद्धा मनोमन नमस्कार करतो. ओमानी संस्कृती भारतीय संस्कृतीला आदर व्यक्त करते. होळी, गणपती सार्वजनिक पणे साजरा करण्यासाठी इथे खिमजी कुटुंबीयांनी मोठी मोठी दोन देवळे बांधलेली आहेत. त्या ठिकाणी मनसोक्त सण साजरा करता येतो. परिचयात नवविवाहित जोडपे असल्यास आम्ही येथे मंगळागौर सुद्धा मैत्रिणी एकत्रित पणे येऊन साजरी करतो. शंकराच्या मंदिरात आवर्जून जातो.

भारता पासून दूर राहूनही जेव्हढे म्हणून करता येईल तेव्हढे मनापासून सण मनापासून साजरे करतो. कालनिर्णय पाहत बेत बनवतो. आईच्या घरातील ‘तो तिच्या पदराचा’ श्रावणी दरवळ इथून मिळतो का याचा खटाटोप करतो. पण मन मात्र हिरवळ होऊन कधीच सैह्यांद्री च्या कुशीत सामावले गेले असते.

निसर्गातील ताजेतवाने पणा, मनाची प्रसन्नता, आणि संयमित आहार विहार म्हणजे सदा सर्वकाळ श्रावण असणे होय. समुद्रावर जाण्यासाठी कोळी बांधव नारळी पुनवेची वाट पाहत असतात. माशांचा प्रजोत्पादन काळ व माशांची सशक्त पैदास होण्या करता तसेच निसर्गाचा पूर्णपणे आस्वाद घेण्याकरता जणू काही सृष्टीने मानवाला एक छोटासा ब्रेक दिला आहे. विविध रान वनस्पती ह्या निरनिराळे रसस्वाद देतात त्यांचा हि पोषक पणा शरीरास मिळणे जरुरीचे असते. शेतकऱ्याला सन्मान व प्राण्यांना आराम मिळण्यास जणू काही श्रावण येत राहतो.

असा श्रावण पोथ्यात शोधून त्याची पारायणे करण्या पेक्षा आधुनिक जीवनाशी सांगड घालून जीवनभर नुसता………. आला ग वनी, असे न म्हणता ………आला ग मनी असे झाले तर श्रावण वाळवंटात पण अनुभवता येतो. घराघरातील दरवळ समुद्रा पलीकडे पण पोहचवतो.