ओमान ची गुहा…….

डोंगरात लुप्त असे असंख्य पाण्याचे स्त्रोत असतात. खडका मध्ये जिथे कमकुवत जागा असेल तिथून ते खाली झिरपत येतात. खडकात जर चुनखडीचे प्रमाण जास्त असेल तर त्या चुनखडीत पाणी शोषले जाते. कालांतराने तिथे जमिनी पासून वर चढत जाणारे ‘ऊर्ध्वमुखी’ व छतापासून खाली झेपावणारे ‘अधोमुखी’ लवणस्तंभ तयार होतात. ही प्रक्रिया वर्षानुवर्षे चालू असते. शेंदरी,पांढरा,सोनेरी, करडा, गुलाबी, बेज असे रंग येथील निसर्गाच्या कलाकारीत पाहण्यास मिळतात. अशाच प्रकीयेमुळे त्या ठिकाणी मोठ्या मोठ्या गुहा तयार होतात.

‘अल हुता केव्ह’. Al Hoota Cave लवण स्तंभांची प्रेक्षणीय गुहा. मस्कत पासून ‘निझवा’ ह्या ठिकाणी ‘जबल अल शम्स’ म्हणून डोंगरांची रांग आहे त्याच्यातील ‘अल हजर’ डोंगरात ही गुहा पाहण्यास मिळते. एका मेंढपाळा ने शोधली आहे. दोन मिलिअन वर्ष जुनी आहे. साडे चार किलोमीटर चा परिसर ह्या गुहेत फिरण्यास मिळतो. ही गुहा पाहण्यासाठी ओमान ची पहिल्या ट्रेन ची सुरवात करण्यात आली. ही ट्रेन बऱ्याच वेळेला बंदच असते. चालण्याची तयारी ठेवावी लागते. गुहा पाहण्यासाठी आतमध्ये पायऱ्या बांधण्यात आलेल्या आहेत. २३० पायऱ्या चढल्यावर आपण गुहेच्या सर्वात उंच ठिकाणी म्हणजे ६५ मीटर उंची पर्यंत वर येतो. पुन्हा २०० पायऱ्या उतरून खाली यावे लागते. गुहा पूर्णपणे थंड असून हवेचा पुरवठा गुहेत खेळवला आहे. वाळवंटी परिसरात, विशेषतः डोंगरावर एकही झाड सुद्धा नसते. अशा ठिकाणी एवढ्या मोठ्या प्रमाणात लुप्त असे पाणी असेल ह्यावर परिसर पाहून मुळीच विश्वास बसत नाही.

ह्या संदर्भातले एक उत्कृष्ट असे संग्रहालय प्रवेश द्वारापाशी आहे. अशा खडकात सापडणारी स्फटिके, खडकांचे विविध नमुने, येथील कीटक, असा संग्रह आहे. २.७ किलोमीटर लांब असे टनेल म्हणजे बोगदा आहे. नंतर आपण प्रत्यक्ष गुहेत प्रवेश करतो.
आद्रतेचे प्रमाण ९०% आहे. पाणी झिरपून अत्यंत नयनरम्य असे विविध आकार तयार झालेले आहेत. सिंह, जॉर्ज वाशिंग्टन ह्यांची चेहेरे पट्टी, माश्याचा आकार, मला तर तेथे गणपतीचा आकार सुद्धा स्पष्ट दिसला. आपण आपापल्या संस्कृती नुसार नजरेने पाहत असतो.
गल्फ मधील सर्वात मोठी केव्ह आहे. १८ डिसेंबर २००६ ला लोकांकरिता ओपन केली गेली. दरोरोज ७५० लोक भेट देतात. फोन करून तुम्हाला उपलब्ध वेळ व दिवस सांगितला जातो. प्रत्येकाचे रेकॉर्ड असते. गुहेतील ईको सिस्टीम बिघडू नये म्हणून ही खबरदारी काटेकोर पणे सांभाळली जाते.१०० लोक एका वेळेला पाठवले जातात. उच्छ्वासाचे चे प्रमाण वाढेल म्हणून ही खबरदारी घेतली जाते. तुम्हाला येथे बुकिंग करूनच जावे लागते. अचानक गेलात तर भेट करून देतील याची खात्री नाही.

येथे ८०० मीटर लांब व्याप्तीचे २३ डिग्री उष्ण तापमानाचे तळे आहे. तिथे अशा गुहेतल्या पाण्यात राहणारे आंधळे मासे आहेत. (Garra barreimiae) अशी जात त्यांची आहे. डोळ्याचे आकार आहेत पण डोळे अविकसित अवस्थेत असतात हे मासे अशाच प्रकारच्या जैव परिस्थितीत गडद अंधाराच्या पाण्यात असतात. विजेरीच्या साह्याने ह्यांना पाहावे लागते. संपूर्ण गुहा गाईड दाखवीत असतो. शांत गूढ हिरवे पाणी पाहून हे मासे बिन डोळ्यांचे खाणे कसे शोधत असतील असा प्रश्न मला पडला. ते बारीक जीव शोधून खातात असे गाईड ने सांगितले. पाण्यात नेहमीच ताज्या पाण्याचा पुरवठा सतत सुरु आहे. तसेच हे पाणी पुन्हा झिरपून दुसरीकडे जाते व पुढे कुठेतरी 'वादी' म्हणजे पाण्याचे अस्तित्व असलेली जागा तिथे बाहेर पडते.

इथे फोटो काढायला पूर्ण बंदी आहे. मोबाईल किंवा कॅमेराचा फ़्लॅश चालत नाही. ओमान गव्हर्मेंट ने काही फोटो उपलब्ध करून दिले आहेत. तसेच विशिष्ट परवानगी काढून असे शूटिंग केले जाते. त्यातीलच काही उपलब्ध अशा संग्रहातून काही फोटो मिळाले. ते इथे पोस्ट करीत आहे.

आवर्जून बघून यावी अशी ओमान ची अल हुता केव्ह आहे. वाळवंटी शुष्क भागात पाण्याचे दुर्भिक्ष जाणवत असताना पाणी मात्र जमिनीच्या अंतर्गत भागातून वाहत असते. पाण्याने तयार झालेली ही भव्य दिव्य गुहा बघणे म्हणजे शांत, थंड, गूढ वातावरणातील हा विसरू न शकणारा अनुभव निश्चितच आहे.