दिनू चे आई बाबा नेहमीच का दमतात?

गेले काही दिवस मी दमलेले बाबा चे विरोप न वाचता डिलीट करीत आहे. त्या पूर्वी दिनू च्या आईने मला सतावले होते. एखादा भावना प्रधान विषय एकदाच बरा वाटतो. सतत तोच विषय पुनुरावृती झाला की भावनिक काळे विरोप म्हणजे भावनेचे दबाव तंत्र सुरु होते. त्यातून बाहेर पडावेसे वाटत नाही. खूप जणांनी हे दोन विरोप पाठवले. आई वडिलांच्या भावना, त्यांचे कष्ट ह्याची जाणीव मुलांना असणे गरजेचे आहे. पण आईवडील म्हणून आपणच त्यांना भावनिक दबाव तंत्राने स्वतःला त्यांच्या पुढे आपण किती थोर आहोत हे सांगत असतो. मुलांच्या मानसिक वाढीसाठी पालकांचे हे दबाव तंत्र घातक ठरते. मी आतापर्यंत हे दोन्ही विरोप अजिंक्य ला दाखवले नव्हते. काल सहज त्याने मी काय डिलीट करते म्हणून पहिले तर ही गोष्ट मी वाचतो असे म्हणाला तर मी म्हंटले ठीक आहे वाच पण तुझे मत मला जाणून घ्यायला आवडेल. त्याने त्याची जी काही मते सांगितली त्यावरून आजची पोस्ट तयार झाली.

प्रथम म्हणाला दिनूची आई बद्धल सांगतो. आई अशी किती तरी घरे मी पहिली आहेत की जिथे आईचे काम केले की आई पैसे देते. त्यांचे बाबा संध्याकळी घरी आले की त्यांचा मुलगा पाणी देतो. वडील त्याला घरचा नियम म्हणून पैसे देतात. अभिमानाने सांगतात की तो बचत करतो. मग दिनूने स्वतःहून पैसे मागितले काय बिघडले? पालकच अशी शिकवण देतात तर मग आई किती थोर आहे ह्याला काहीच अर्थ उरत नाही. ह्या गोष्टी मी पण जवळच्या काही घरातून पहिल्या आहेत. आई दमते, रात्री खस्ता काढून मुलांची दुखणी काढते. असे मी म्हंटले तर जन्म तुम्हीच दिलात न. मग आई म्हणून बाळा करिता केले तर ते छोटे बाळ मोठे झाल्यावर त्याला हेच ऐकवणार का?

दिनू ची आई दिनूच्या चांगल्या भविष्य करिता कष्ट करते. पण आई ह्याचा अर्थ असा होत नाही न दिनू चुकला आहे. दिनूने माझ्या सारखेच असे पैसे पालकांनी दिलेले पहिले असतील. कदाचित त्याची आई पैसे देत ही नसेल म्हणून आपले मुल चुकले हे दाखवून देण्या करिता पालकांनी काय काय मुलांकरिता केले हे दाखवण्या पेक्षा दुसरा पर्याय नाही का? आई तूच सांगते न तुला वाढवण्यात मला काहीही त्रास झाला नाही. अशीच वयस्कर लोकांची पण सेवा करायची असते. आपण तुमचे करून दमलो किंवा आम्ही खूप काही करतो हे सांगत बसायचे नसते.

आम्हालाही समजते की आमच्या काळजीने तुम्ही किती करता आमच्या करता पण हेच सकारात्मक करून घेता येईल का? आई दिनू ची आई तिने त्याच्या करता काय केले ते सांगूनही बिल मात्र शून्य लावते ह्याचा अर्थ दिनूने मोठेपणी ते बिल भरायचे का? का ह्याच दबावात बसायचे की तिने किती किती काय केले. आई, मुलांकडून चुका होतातच पण ह्याचा अर्थ त्यांना भावनिक दबाव आणून सांगणे का त्यांच्याशी नीट शेअर म्हणजे गप्पा करून त्यांना समजावून सांगणे. तूच सांग तुला काय पटते. आई तू अशी चिठ्ठी माझ्या करता ठेवली असतीस का?

आता माझ्या कौशल्याची वेळ आली. मी नसती अशी चिठ्ठी ठेवली कारण तुला योग्य वेळी समजावून सांगितले असते. घरच्या कामाचे पैसे नसतात किंवा आईने मुलाकरता करणे पण तिची आई म्हणून जवाबदारी आहे. कारण बाळ पाहिजे हा निर्णय आई वडिलांचा असतो तेंव्हा पुढील जवाबदारी त्यांना पेलावता यायला पाहिजे तरच ते पालक होतील. आम्ही मोठी माणसे पण चुकतो. पण चुकातून शिकायचे असते.

मला माझ्या वडिलांनी १९७० साली माझे स्वतःचे खाते बँकेत उघडून दिले होते. महिना १० रुपये दर महिन्याला भरायचे होते. ते दर महिन्याला रक्कम देत असत व मी जाऊन भरत असे. अजिंक्यला पण त्याच्या पहिल्या वाढदिवसाला आम्ही त्याचे खाते उघडून दिले. तो स्वतः त्यात आम्ही दिलेली रक्कम भरतो. त्यातूनच त्याच्या आवडीचे घड्याळ व आम्हाला, आजी आजोबाना. मित्रांना, भेट वस्तू देत राहतो. असे पैशाचे महत्व व त्याचा हिशोब कुठे ठेवायचा हे आपल्याला त्यांना शिकवता येतो. मग आईचे बिल व दिनूचे बिल असे मानसिक द्वंद उभे ठाकत नाही.

मुल चुकले तर त्याला त्याच्याच पद्धतीने उत्तर देणे सर्वस्वी चुकीचे आहे. मुलाने आपल्याला, “सॉरी मी चुकलो” म्हणणे हे ह्याचे उत्तर नाही तर मुलांच्या मानसिकतेशी हा खिलवाड आहे. आई तू काम करून दमतेस, माझे सर्व कौतुकाने करताना तू थकतेस तरीही करत राहतेस, माझ्या साठी तू रात्रभर जागून माझी दुखण्यात सेवा करतेस. आई तुला बरे नसले की मी पण तुझी काळजी घेतोच तू दमतेस म्हणून मला वेळ मिळाला की तुला मदत ही करतो. आई आयुष्य हे एकमेकांकरता असते त्यात समजावून घेणे हे जास्त महत्वाचे आहे. असे माझा लेक मला सांगत होता. दिनू ची आई मी नाही म्हणून मला खूप आनंद झाला. एक चांगला माणूस म्हणून माझा लेक आयुष्यात कधीही मागे पडणार नाही. मोठ्या बाळाची मी चटकन पापी घेतली.

आता लेकाने दमलेले बाबा वाचण्यास सुरवात केली. आई बाबांना ऑफिसचे टेन्शन, पगारात काय काय करायचे हा मोठा प्रश्न? मुलांची शिक्षणे. घरची जवाबदारी हे सर्व आम्हालाही समजते, आई वडिलाचे होणारे वाद, त्यांचे जास्तीचे काम करणे, रात्री दमून घरी येणे ह्या मुळे मुलेही मनाने दमतात. त्यांना पण खजील वाटू लागते. मी अजिंक्य च्या ह्या स्पष्टीकरण देण्याने उत्सुकतेने ऐकू लागले.

आई तुमच्या कडे गरजे पेक्षा जास्त साड्या, पर्सेस असतात. त्याचे बिल कमी केले तर अधिक बचत घराकरता होऊ शकते. मग मुलांनी एखादा टी शर्ट जास्त मागितला तर तो मुलगा चुकला का? दर सणांना तुम्ही डायमंड किंवा सोन्याचे दागिने घेता मग बाबा गरीब कसे? दर महिन्याला मोठ्या माणसांचे माप बदलत नसते त्यामुळे ते वर्षातून सारखे कपडे घेत नाहीत. आमचे माप बदलून कपडे तोकडे होतात त्याला आमचा काय दोष?

बाबा अधिक अधिक जागा राहण्यासाठी घेतात त्याचे कर्ज देतात त्यातच बराचसा पगार जातो. हे सर्व मुलां करता असते. पण त्यात तुम्ही राहणार नाही का? मला एक जागा ठेवली. मी माझ्या मुलाकरता बंगला घेईन, तो पुढच्या पिढी करता थंड हवेच्या ठिकाणी, समुद्र किनारी अशा वेगवेगळ्या जागा घेत राहील त्यात विशेष काय आहे. मी जर माझ्या पगारात नियोजन करून ह्या गरजा वाढवून निभावू शकतो तर तो पुरुषार्थ आहे. ती घराकरता पालकांची जवाबदारी आहे.

बाबा त्यांच्या करता एखादी गोष्ट पैशाचे नियोजन करून घेऊ शकत नाहीत का? आम्ही बऱ्याच वेळेला हट्टी पणा करत असतो. पण तुम्हाला जर दागिना घेतला नाही तर आई पण रुसून बसते की नाही. आम्ही त्याला ठराविक रक्कम पगार म्हणून सांगितली आहे. त्यात घरचे हिशोब, शिल्लक राहणारी काही विशिष्ट रक्कम ह्याचा हिशोब ठेवण्याचे काम त्याला दिले आहे. तो दर महिन्याला लिहून काढत असतो. शिल्लक रकमेत तींघांच्या गरजे प्रमाणे खरेदीचे नियोजन तोच आम्हाला सांगतो. त्यामुळे गरीब बिच्चारे बाबा असे उद्दातीकरण माझ्या घरी नाही.

आमचा बाबा दमतो पण लेकाला त्याचा दबाव देत नाही. आता पण फोर व्हील अशी जी एम सी/ प्राडो लैंड क्रूज़र गाडी घेऊया असा आग्रह करतो. नंतर कर्जाचा हप्ता पगारात कसा बसवायचा ह्याचा हिशोब लावत गणिते मांडत राहतो. शेवटी आमच्या बजेट मध्ये बसणारी ही गाडी त्याला मिळाली. त्याचे टेक्निक, सोई सुविधा ह्या बाबी त्याने शोरूम मध्ये जाऊन पहिल्या. आंम्ही तिघांनी ही गाडी जमू शकते असा निर्णय घेतला आहे. असे नियोजन मुलांना प्रत्यक्ष सहभागी करून शिकवता येते.

पुढे म्हणाला आई ज्यांचे बाबा सैनिक असतील तेच खरे दमतात. मुलांना भेटण्यासाठी त्यांना ठराविक सुट्टी दिली जाते. त्यांचे घर त्यांची मूले ही त्या घरच्या आईची जवाबदारी असते. त्यांची खूप घरे ही नसतात. ते देशाकरता प्राण पण देण्यास तयार असतात. मला तेच खरे बाबा वाटतात. मुलांना उशिरा का होईना पण तुम्ही भेटू शकता. पण सैनिक असलेला त्यांचा बाबा पुढच्या वेळेस आपल्याला मूले, घर, दिसेल याची खात्री नसूनही कसा निर्धाराने देशाकरता लढतो. आई आम्हा सगळ्यांचे बाबा स्वतःच्या घराकरता कष्ट करतात, संपत्ती वाढवतात, पण तुला नाही का वाटत हे सैनिक असलेल्या बाबा च्या पुढे खूप स्वार्थी आहे. सगळे सैनिक नसतात पण मग दमून जाण्या इतक्या गरजा का वाढवतात. मुलांना पण ह्याचे प्रेशर देतात.

आमचे छान छोटेसे बालपण त्यात तुमच्या काळज्या असल्या की मोठे होणे वाईट आहे का असा विचार येतो. आई पालकांचे कष्ट, बाबांचे दमणे, त्यांचे घराकरता मन मारून राहणे, स्वतःची आवड, हौस पूर्ण करता न येणे. आईचे बिल न मागता काम करणे हे पालकांना कमी करता येणार नाही का?आम्हालाही आमचा अभ्यास, परीक्षा, स्पर्धा, मित्र परिवार ह्यांच्या काळज्या आहेतच की आम्ही कोणाला न सांगता हे सर्व लहान म्हणून पूर्ण करत राहायचे आहे. हेच स्पर्धात्मक जग तुम्ह्लालाही आहेच मग मनाने असे दुबळे होऊन कसे चालेल? अजिंक्य च्या ह्या प्रश्नाने मला चांगलेच कोंडीत पकडले.

पैशाचे नियोजन, वेळेचे नियोजन केले तर बराचसा ताण कमी होऊ शकतो. आपले काम त्याचा दबाव मुलांवर आणू नका. त्यांना घरच्या नियोजनाच्या कामात योग्य वय झाले की सामावून घ्या. दिनू च्या आई सारखे बिन मोबदल्याचे काम मुलांना सांगण्याची वेळ येणार नाही. दमलेले बाबा त्याचे उद्दातीकरण करू नये. आपण त्यांना समजावून सांगणे हा एक मध्यम मार्ग होऊ शकतो. आपले बाबा दमून, न झेपणारी कामे करून वैतागत होते हे किल्मिष मुलांच्या मनात राहणार नाही.

मुख्य म्हणजे आई, वडील, मूले, घरचे जेष्ट ह्यांना समान सन्मान द्या तरच दमलेले बाबा असे समीकरण कायमचे पुसून जाईल व पुढच्या पिढीत दमलेले दिनू राहणार नाहीत.