वेळापत्रक आणि मी हा सहसंबध खरे तर माझा जवळचा विषय. शाळेत असताना किंवा लहानपणापासून हे सर्व आठवणे म्हणजे असे काही उल्लेखनीय घडले नाही तर लिहिणार काय? हा एक प्रश्नच आहे. एक बरे असते की शाळेचे वेळापत्रक, आपल्या कार्यालयाचे वेळापत्रक हे ठरलेले असते म्हणून निदान ह्या दोन्ही ठिकाणी बरोबर वेळेत पोहचायचे. शिक्षिका असल्याने शाळेत विद्यार्थ्यांसारखे उशीर करून चालत नाही. वर्ग सांभाळायला पर्यायी शिक्षक असला तर ठीक नाहीतर वर्ग शिक्षिकेशिवाय तसाच राहू शकतो.
पण अशी अनेक वेळापत्रके केली व ती कधीच पूर्ण झाली नाहीत. कॉलेज ला असताना संध्याकाळी नियमित मैदानावर खेळायला जायचे कारण तसा नियम क्लब चा होता. वेळ पाळण्याचे बंधन असले की सगळ्या गोष्टी वेळेतच होतात. स्वतःच्या आवडीच्या गोष्टी करिता एखादे ध्येय किंवा उद्दिष्ट पूर्ण करणे हे एकवेळ जमते. पण अशाच दुसऱ्या गोष्टी वेळ पाळून, नियम करून जमतातच असे नाही. अशा गोष्टी का झाल्या नाहीत म्हणून कारणे शोधणे म्हणजे आपलेच समाधान करून घेणे ठरते. सकाळचा ठराविक व्यायाम, चालणे,किंवा पोषण मुल्ये पाहून खाणे, आहारात प्रोटीन पाहून बदल करणे, अशा गोष्टींचा नादच सोडून दिला आहे. जे वेळेत जमत नाही ते उद्या पासून नक्की करू असे ठरवत असते.
अजिंक्य चा जन्म झाला आणि मला वयानुसार तान्ह्यांचे खाणे काय असते ही पुस्तके वाचण्याचा छंद लागला. आपले बाळ आरोग्यपूर्ण असावे म्हणून मी तो जसजसा मोठा होईल तसे अनेक पुस्तकांचा आधार घेऊन आईशी हिरहिरीने चर्चा करून अनेक पोष्टिक मुल्ये जपणारे असे त्याच्या खाण्याच्या वेळेचे पत्रक बनविले व स्वयंपाकाच्या दारावर लावुन ठेवले होते. त्याचा दिनक्रम, भुकेच्या वेळा इत्यादीचा कुशलतेने विचार करून अनेक डाळींचे रवे, पीठे, भाजी चे सत्व ह्याचे बारकाईने टिपण करून डोळ्यासमोर ठेवले. आई ऐकून घेत होती, रवा, पीठे वैगरे बनवून ठेवण्यासाठी मदत पण करत होती. पण स्वतःचे मत काही व्यक्त करीत नव्हती, मी विचारले तर म्हणाली तुमची पुढची पिढी, नवीन विचार चांगले आहेत.
इथेच माझे हे वेळापत्रक कोलमडले, कारण अजिंक्य ला सुरवातीला मी मोठ्या कौतुकाने भाताची पेज वैगरे भरवली पण आई पोळ्या करीत असताना त्याला पोळीचा छोटासा तुकडा तूप लावुन चघळायला द्यायची हा ही पठ्या माझे आधुनिक विचार केलेले खाणे फुर्र करून तोंडातून उडवायचा. भाजी केली की, छोट्याशा ताटलीत देऊन त्याच्या पुढे ठेवायची, मजेत भाजी चिमटीत पकडून खायचा. आपले पुस्तकी शहाणपण फारसे उपयोगाचे नाही हे समजून मी वेळापत्रकाचा कागद काढून टाकला. आईची पोष्टिक मुल्ये सोपी होती. आपलेच जेवण तेल, तिखट, मसाले कमी करून प्रथम बाळांना द्यायचे मग तो पदार्थ मोठ्या करिता बदल करून वाढायचा. आपण जेवत असताना त्यांना नेहमी आपल्या बरोबर जेवणासाठी बसवायचे आपोआपच चांगल्या सवयी लागतात. बाळ मोठे कधी झाले हे मलाच समजले नाही. सर्व घरचेच, पण बाळापासून ते वयस्कर पर्यंत सर्वाना आरोग्य पूर्ण व संस्कार सहित वदनी कवळ घेता म्हणून जेवणास सुरवात करून देणारे ठरले
अजिंक्य च्या अभ्यासाचे वेळापत्रक हे कायम अयशस्वी झालेले आहे. मी त्याला वेळापत्रक करून द्यायचे. आज हा अभ्यास पूर्ण करायचा आहे म्हणून उद्यापासून बघू असे वचन मला देतच राहिला. आता मात्र तो स्वतःचा अभ्यास स्वःताच करतो. काही अडले तरच मदत करावी लागते. ठराविक वेळी काही विषय आवर्जून करतो असे माझ्या लक्षात आले. त्याला विचारले तर म्हणतो कसा तूच आतापर्यंत किती वेळा मला अभ्यासाचे वेळापत्रक करून दिले त्यामुळे मी स्वतः अभ्यास करायला लागलो. संध्याकाळच्या वेळी खेळून आला की रात्री तो वाचन करतो व सकाळच्या वेळी लिखाण करतो.
मला वाटत होते की माझे प्रयत्न फुकट गेले पण त्यानेच वेळापत्रकाचे निरीक्षण करून स्वतः ही जवाबदारी घेतली हे पण माझ्या अयशस्वी वेळापत्रकाचे यश म्हणावे लागेल. बरेच वेळेला वाटते की शाळेतले प्रोजेक्ट्स आपल्यालाच पूर्ण करावे लागतात. मुले कधी करणार हा प्रश्न पडतो पण ती एकटी करायला लागतात तेंव्हा समजते की त्यांनी आपली निरीक्षणं करून ठेवली होती. मुलेच आपल्याला धीर देतात. स्वतः ते कधी शिकतात ते आपल्याला समजत नसते. असा हा दुसरा वेळापत्रकाचा प्रयोग.
सकाळच्या वेळेत चालणे हे आरोग्यदायी नक्कीच आहे पण हे मला काही निग्रहाने जमत नाही. काल झोपच पूर्ण झाली नाही, कंटाळा आला, नाहीतर सकाळची कामे डबे तयार करणे कोण करणार इत्यादी कारणे माझीच मला मी देत राहते. स्वतःचे वेळापत्रक अजूनही जमत नाही. कामाला निघायचे त्याआधी घरातील सर्व कामे लगबगीने पूर्ण करावी लागतात. कामाचे नियोजन मात्र जमावेच लागते कारण कार्यालयात वेळेवर पोहचायचे असते. सध्या एक विम्याची जाहिरात सतत दाखवतात त्यात कर्मचारी आरोग्याच्या काळजीने व्यायाम करतात. जाहिरातीसारखे दरोरोज कामाच्या ठिकाणी काही वेळ आलटून पालटून प्रत्येकाला असे व्यायाम प्रकार करावयास कार्यालयातच जागा ठेवली किंवा एखादे छोटेसे जिम ठेवले, किंवा मार्गदर्शनाने योगासने करून घेतली तर? अशक्य बाब आहे पण प्रत्यक्षात आली तर आरोग्यम धनसंपदा असा कर्मचारी वर्ग तयार होईल.
तसेच जेवणाच्या वेळेत सलाड, कोशिंबिरी असे पोष्टिक मुल्ये जपणारे पूरक अन्न पुरवठा (घरगुती ऑर्डर) करून डब्याच्या सोबत घेतले तर दुपारचे जेवण उरकणे न राहता, उत्साह वाढवणारे ठरेल. अर्थात बरेच कर्मचारी सहभागी असले तर सहज शक्य होईल. असे माझे व्यायामाचे वेळापत्रक कार्यालयात करता येईल का म्हणून आशेवर राहिले आहे. तसेच सलाड वैगरे पैसे देऊ पण आयते मिळू दे अशा इच्छे वर तग धरून आहे.
अजिंक्य वडिलांच्या पावलावर पाय ठेवून पक्का खवय्या झाला आहे. सध्या मी घरचे मेनू आठवडी प्रमाणे करण्याचे नवीन वेळापत्रक ठरविले आहे. महिन्याचे साधारणपणे चार आठवडे त्या प्रमाणे एक आठवडा पंजाबी, गुजराथी, चायनीज, मराठी व पाचवा आठवडा आलाच तर कॉनटीनेनटल असे नाश्ता, जेवण त्या त्या पद्धतीचे करायचे असे ठरविले आहे. आतापर्यंत तरी घरी माझ्या नवीन कल्पनेचे ह्या दोघांनी स्वागत केले.
सध्या गुजराथी आठवडा सुरु आहे त्या प्रमाणे फुलके, ज्वार बाजारांनी रोटली, खिचडी, कढी, ढोकले, खमणी, उंधियो असे प्रकार करून झाले. गुजराथी पद्धतीची भाजी, त्यात कच्छ असा प्रदेश पण मी सहभागी करून घेतला आहे. पण मलाच मध्येच पिठलं भाकरी करावी असे वाटू लागले आहे. नवनवीन वेळापत्रके करून माझीच मी मोडत असते. वेळापत्रके बनवण्याची हौस काही पूर्ण होत नाही. असे माझे उत्साहपूर्वक प्रयोग कोलमडतात, पण बनवता येतात हा तरी आनंद आहेच.
अजिंक्य ला प्रांतीय मेनू कळावेत व आई पण सुगरण आहे हे दाखवायचा सुप्त हेतू आहेच.खवय्ये हे उत्तम खाणे असेल तर विना तक्रार मजेत असतात. म्हणून माझा हा आटापिटा चाललेला असतो. आठवडी मेनू ठरला असला तर आधीच तयारी करून ठेवता येते. माझ्या ह्या वेळापत्रक मुळे हे दोघेही खुश आहेत. त्यात पण माझे शाकाहारी व त्यांचे सामिष असे दोन्ही मेनू करीत असते. सकाळी कामाला निघण्या आधी दिवस भराचे खाण्याचे नियोजन करून तशी तयारी करून असते. खाण्यात प्रांतीय वाद माझे घर मानत नाही. सर्व जाती धर्माच्या खाण्याला समान वागणूक मिळते. मला ह्या दोघांच्या उत्साहाकरिता हे वेळापत्रक कसोशीने अमलात ठेवले पाहिजे.
माझ्या ह्या अभूतपूर्व अनेक वेळा पत्रकांमुळे ह्यांना नवीन वर्षाच्या संकल्पना म्हणता येणार नाही कारण अनेक वेळा पत्रके मला गरजे प्रमाणे सुचतात. कधीही एक जानेवारीला मी काहीही ठरवत नाही. कारण पूर्ण वर्ष नवनवीन संकल्पना नव्हे तर वेळा पत्रके मी बनवत राहते. आता मात्र सकाळी जमत नाही म्हणून संध्याकाळी आवर्जून हेल्थ क्लब ला जाते. मदती करिता कामाला मुलगी ठेवली आहे. नवीन अत्याधुनिक उपकरणांची मदत घेऊन पूर्ण होणारी नवीन वेळा पत्रके बनविणार आहे.