झाम्प्थ……जेंव्हा विहीर गाते

zampth हा एक पारंपारिक ओमानी खेळ आहे. पूर्वी विहिरी ह्या पाण्याकरिता एक प्रमुख स्त्रोत म्हणून असायच्या. ओमान मध्ये सुद्धा विहिरी आहेत. पण बऱ्याच विहिरी आता कोरड्या पडलेल्या आहेत. ‘झाम्प्थ’ हा खेळ विहिरीच्या रहाटाचा, पाणी विहिरीतून काढण्यासाठी मोट असते. अनेक सुंदर गाणी, काव्य रचना ह्या मोटेच्या नाद मधुर तालावर आहेत.
इथे ही ओमान मध्ये विहिरीच्या रहाट वरती हा खेळ खेळला जातो. फक्त रहाटाला गाडगी नसतात. लाकडाचे चाक, अत्यंत सुबक कोरीव काम केलेले एका मोठ्या आडव्या खांबावर अडकवले जाते. त्याला दोरखंड लावला जातो. निदान दहा जण सहभागी असतात. दोघे विहिरीवर खांब पकडून उभे असतात.आठ जण जाडजूड दोरखंड ओढून चाक ओढून घेतात. लाकडावर लाकूड घासले जाते त्याचा आवाज परिसरात गुंजतो.

प्रत्येक आठवड्याच्या वीक एंड ला ( गुरवारी )रात्री खेळाला सुरवात होते. पहाटेपर्यंत हा खेळ खेळत असतात. बुधवारी ह्या खेळाची तयारी केली जाते. हा खेळ दोन जवळच्या विहिरीवर म्हणजे दोन विहिरीत खेळला जातो. प्रत्येक गट आपापली चाके घेऊन येतो. रात्रीच्या शांत वेळेत हा खेळ रंगतो. अनावश्यक बोलणे बंद करायचे असते. भला मोठ्ठा दोर व प्रचंड चाक व आडवा ठेवलेला खांब ह्यांच्या घर्षणाचा नाद जेव्हढा मोठ्ठा तो गट विजयी होतो.

ह्या खेळाकरिता बक्षीस नसते. सर्वात मोठ्ठा नाद कुठल्या गटाचा आला ते पाहण्या करिता एक पंच असतो पंचाला काही रक्कम आदराने दिली जाते. वयस्कर व्यक्तींना पंच म्हणून खूप महत्व असते. हा खेळ महागडा आहे. चांगल्या प्रतीचे लाकूड कि जे ‘पुली’ करिता म्हणजे चाका करिता वापरले जाते. ते साधारण पणे अडीच लाख ते पाच लाख पर्यंत महाग असते. त्या लाकडातून कोरीव काम करण्यास दोन ते तीन महिने लागतात.

सोळा आऱ्या असलेले हे चक्र असते. गावाकडून ह्याची रक्कम भरली जाते. दोर म्हणजे वेताचा नसतो तर पांढरा असतो. आवाज जास्त येण्यासाठी लाकडाचे चाक म्हणजे पुली गरम करतात. लाकूड गरम झाले कि जास्त आवाज येतो. ठराविक तालात, नादात हा आवाज वाढवत न्यायचा असतो. ह्या करिता दोर कसा ओढावा ह्याचा अनुभव लागतो. घर्षणाचा आवाज नाद मधुर पण निदान ५०० मीटर ते एक किलोमीटर च्या परिसरात ऐकू येतो. इथे असा समज ओमानी लोकात आहे की, पूर्वज मदत करतात. ह्याला काही शास्त्रीय आधार नाही. एक लोक समज एव्हढेच. हा आवाज अरेबिक म्युझिकल नोट सारखा असतो.

दोन गट एकमेकांना मदत करतात. विशेषतः पुली गरम करण्या साठी व जागेवर आणण्यासाठी. रोप खेचण्यासाठी खास टेक्निक लागते. हा खेळ पुरुष खेळतात. रात्रभर चालणारा हा खेळ वेगवेगळ्या गटाच्या पुली लावून खेळला जातो. मस्त थंड हवा, निरभ्र आकाश, स्वच्छ चंद्र प्रकाश, शांतता आणि गरमागरम बार्बेक्यू, खजूर, ओमानी स्वीट्स, बिन दुधाचा छोट्या कपमधून प्यायला जाणारा kahwa चहा. अशी जय्यत तयारी प्रामुख्याने स्त्रिया करतात. ही जागा कुटुंबांनी एकत्र येऊन कॅम्प सारखी करतात. परिसरातले नातेवाईक आवर्जून रात्री येतात. हा खेळ खेळल्या शिवाय त्यांचा आठवडा पूर्ण होत नाही.

चाक किंवा पुली बनविणे हे काम परंपरेने केले जाते. पिढ्यान पिढ्या ह्याचा अभिमान बाळगतात. पुली म्हणजे चाक त्याला ओमानी भाषेत ‘मंजूर’ असे म्हणतात. हे खूप जुन्या परंपरेची असते. १५० वर्ष जुनी ‘मंजूर’ येथे आहे. हा खेळ म्हणजे शारीरिक तंदुरुस्ती करिता महत्वाचा मानतात. तसेच गुंजत मोठा मोठा होत जाणारा आवाज म्हणजे जीवनाचे गाणे आहे असे मानतात.

हा पारंपारिक खेळ ‘बरका’ म्हणून टाऊन आहे. तेथील Al Muraisy ह्या ठिकाणहून सुरु झाला असे येथील वयोरुद्ध व्यक्तींचे म्हणणे आहे. आत्ता ओमान मिनिस्ट्री ऑफ स्पोर्ट्स अफेअर्स ने नोंदवले आहे की, सेन्चुरीस पासून हा खेळ खेळला जातो. पण ह्याची सुरवात आमच्या गावापासून झाली. असे पुरावे देत इथले स्थानिक लोक आग्रही आहेत. ओमान मध्ये साधारणपणे ९८ खेळ हे पारंपारिक खेळ म्हणून मिनिस्ट्री ने सर्वे करून नोंदवले आहेत. अजूनही काम सुरु आहे. आतापर्यंत २५ खेळ हे पूर्ण माहितीनिशी आहेत. कोंबड्यांची झुंज, बैलांच्या झुंजी, उंटाची, घोड्यांची शर्यत असे पारंपारिक खेळ ओमान मध्ये अजूनही खेळले जातात.

zampth म्हणजे शब्दशः अर्थ ‘ध्वनीची शर्यत’ असा आहे. इथे जाचक नियम नाहीत. परंपरा जपण्याची आवड व त्यातून मिळणारा कुटुंबाचा एकत्रित आनंद हे महत्वाचे आहे. पूर्ण रात्र चालणारा शांत वातावरणातला हा खेळ खरच एकदा तरी आनंद घेण्यासारखा आहे.

येथील लोकांचे म्हणणे आहे की आम्ही ह्या पुली किंवा हे चक्रे पुढच्या पिढी करिता जपून ठेवली आहेत. त्यानाही कळू दे की, विहिरीतून पाणी कसे काढले जात होते. आता हा खेळ कोरड्या पडलेल्या विहिरीत खेळला जातो. पुढची पिढी पण नवीन चक्र बनवण्याकरिता वयस्कर व्यक्तींकडून मार्गदर्शन घेऊन पुली बनवीत आहे. विहिरीतून पाणी काढणे हे कधीकाळी आवश्यक होते. परंतु ही परंपरा मानून जीवनाचे गाणे असे सुरेल पद्धतीने पुढच्या पिढी करिता आवर्जून ऐकवले जाते. सर्व कुटुंबीय, आप्त, मित्र परिवार एकत्र येऊन हा खेळ खेळतात. खेळा नंतर एकमेकांची खुशाली, निरोप, आपसातील विचारांची देवाण घेवाण करतात. लहान थोर एकत्र असतात. ह्यातूनच समाज बांधला जातो. नाती दृढ होतात. मने कलुषित न राहता निकोप प्रकृती राहते. असे हे जीवनाचे गाणे म्हणजे विहिरीने म्हंटलेले एक शब्दांवाचून असलेली सुरेल लय, ताल आपल्याला ही नकळतपणे शेतातल्या विहिरी कडे बघण्याचा वेगळा दृष्टीकोन देते.

हा खेळ म्हणजे आवाजाचा, तो ही नादमधुर अशा संगीतासारखा आहे. विशिष्ठ कोनात दोर खेचला जातो, त्यामुळे आवाजाची लय वाढत जाते. एक पूर्ण गाणे विहिरी कडून म्हंटले जाते.