अमीर ची शाळा…….. शिक्षकांची शाळा

थ्री इडीयट, एकदाचा पहिला. हा सिनेमा पाहावा का? कुठल्या वयाला हा सिनेमा पाहणे योग्य आहे? वास्तव जग असेच असते का? ह्या वर अनेक ठिकाणी चर्चा झालेली आहे. प्रत्येकाचे मत,आवड वेगवेगळी असते. माझा मुद्दा असा आहे की, अमीर ला शाळा, किंवा कॉलेज ज्या पद्धतीने असावे असे वाटत होते. त्या ‘त्याच्या शाळेचे’ चित्रीकरण फार कमी दाखवले आहे. सायकल वर मोटर चालवून गिरणी दाखवली आहे, असेच काहीसे सायन्स वर आधारित त्याच्या शाळेचे प्रयोग फार घाईने दाखवले गेले. लहान मुले दिव्याची वायर सोडून खाली सोडतात, तिथल्या उभ्या व्यक्तीला आरोग्याच्या दृष्टीने काही घातक परिणाम तर होत असेल का? ह्याचे प्रयोग पण लहान मुलांनी अनुकरण करण्याची भीती वाटते.

अमीर ज्या होस्टेल ला राहत होता तेथील रेक्टर कधीच दिसले नाहीत? होस्टेल ला दारू सहज उपलब्ध असते? अजिंक्य चे पुढे येणारे प्रश्न मला भेडसावू लागले आहेत. मुले आत्महत्या करतात, पोलीस चौकशी नाही? घरी आल्यावर आम्ही अजिंक्य शी चर्चा करायचे ठरविले, तोच आपणहून म्हणाला, आई मला जगात वाईट काय आहे ह्याची कल्पना आहे. मी असले सीन कधी मनावर घेत नाही. पण छोट्या मुलां करिता अवघड आहे. असे बरेच वादादीत मुद्दे आहेतच. मी शिक्षिका असल्याने मला शाळेचे चित्रीकरण ह्या मुद्द्या वर जास्त भर असावा असे वाटले असावे.

अमीर च्या शाळेने जे काही ओझरते प्रयोग दाखवले, त्यावरून मी माझ्या पूर्वीच्या शाळा जगतात मनाने गेले. प्रत्यक्ष असे अनेक प्रयोग मी स्वतः शाळेत राबविले आहेत. जेंव्हा वार्षिक शास्त्र प्रयोग प्रदर्शन असते तेंव्हा शास्त्र शिक्षक व वर्ग शिक्षक ह्यांच्या मार्गदर्शनाने विद्यार्थी प्रयोगाचे सादरीकरण करतात. मला मुळात स्वभावतः प्रतिकृती बनवण्याची विशेष आवड आहे. माझ्या शाळेने मला पूर्ण संधी दिली. मी प्रदर्शनाची तारीख कळली की, मुलांच्या घोळक्यात कायम असायचे, त्यांच्या कल्पना, काही माझे बदल असे करीत मी ज्या मुलांना मार्गदर्शन केले ते विद्यार्थी आंतर शालेय पासून ते राष्ट्रीय स्तरावर बक्षीस पात्र ठरायचे.

मला मात्र कधीच मार्गदर्शक शिक्षक म्हणून खात्या तर्फे प्रमाण पत्र मिळाले नाही. कारण मी शास्त्र विषयाची शिक्षिका नाही. असे आपले शिक्षण खाते नियम बद्ध आहे. शाळेने, माझ्या सहकारी शिक्षकांनी, माझ्या विद्यार्थ्यांनी कायम माझा गौरव करून मला नेहमीच प्रोत्साहित केले. तुम्ही ज्या विषयाच्या शिक्षिका म्हणून सरकारी नोंदीत आहात त्या विषय पुरतेच पहा. असा नियम असल्याने शिक्षकांची इतर विषयाची आवड खुंटली जाते. आपल्याला काही मिळणार नसेल तर का करा? असा प्रश्न काही सहकारी मला विचारायचे. ज्याचा तो पाहून घेईल. साहजिकच आपल्या आवडीला आपणच कुंपण घालणे होय. माझ्या विद्यार्थ्यांना बक्षीस मिळते, आपल्या शाळेचे नाव आज राष्ट्रीय स्तरावर घेतले जाते हि माझ्या सन्माना पेक्षा खूप मोठी गोष्ट आहे. तुम्ही करा, आम्हाला ह्यात घेऊ नका. असे ही सल्ले मी पचवलेत. पण स्वभावानुसार असलेली मूळ आवड मला धडपड करावयास भाग पाडते.

मी सायकल च्या सीट मागे असलेल्या कॅरिअर वर पाणी ओढ्ण्याकरिता असलेली मोटर ठेवली. ह्या मोटर ची जोडणी सायकल च्या चाकांशी केली. विजेची मदत न घेता, जसे सायकल ला पायडल केले जाईल तशी मोटर कार्यान्वित होऊन पाणी साठवलेल्या टाकीतून ओढून बागेत ठिबकसिंचन पद्धतीने पाठविता येईल. ही प्रतिकृती प्रत्यक्ष चालवून दाखविता येत होती.आपल्या संकुलाच्या जिन्याच्या पहिल्या पायरीवर पाय ठेवताच खालच्या टाकीतले पाणी वरच्या टाकीत येऊन पडेल. अशी रचना पायरीची करून दाखविले होती. जेणे करून विजेची बचत होऊन पाणी सुद्धा मिळेल.

आता सुद्धा अमीर ने दाखवलेली स्कूटर वरची गिरणी स्टार माझा ने गेल्या वर्षी जळगाव च्या पेंटर व्यक्तीने केली आहे म्हणून बातमी दाखवलेली होती. तीच गेल्या वर्षीची बातमी पाहून तर अमीर ला चित्रपटाची कथा सुचली तर नसेल. असो शाळा हा जिव्हाळ्याचा विषय आहे. ह्याचे फोटो शाळेत कदाचित असतील. मिळतील तेंव्हा दाखवीन. पण पोस्ट लिहिण्याचे अडू नये म्हणून लिहिले. आपल्या आठवणी ह्या फोटो पेक्षा खूप जवळच्या असतात. आता सुद्धा मी वेगवेगळ्या माध्यमातून प्रतिकृती बनवीत असते. मला बी.एड. महाविद्यालयात असताना मुंबई विभागाचे प्रथम पारितोषिक मिळाले. शिक्षणाच्या अध्ययन प्रक्रियेत प्रतिकृती द्वारा उलगडा सहज सोपा होतो.

माझा विषय पर्यावरण, भूगोल मग शास्त्र विषयात लक्ष घालण्याचे काम नाही असा सरळ धोपट मार्ग अवलंबिला जातो. पण मी प्रतिकृती म्हंटले की कुठल्याही विषयात सहभागी होत होते. बक्षीस, पुरस्कार हा विचार मनात येऊन दु:खी कधीच झाले नाही. माझी शाळा, माझे शास्त्र विषयाचे सहाध्यायी शिक्षक नेहमीच मला प्रोत्साहन देत होते. सगळ्यात महत्वाचे होते की, मला विद्यार्थ्यांबरोबर काम करावयास मिळायचे. नामांकन, लोकप्रियता याची गणिते माझी आयुष्यात कधी उत्त्पन्न झालीच नाहीत. माझा विषय शास्त्र शाखेशी पण जवळचा आहे. प्रोजेक्शन करून प्रतिकृती बनविणे हे तर माझ्या आवडीचे काम आहे. माझा विषय पूर्ण जगात कुठे ही नोकरी देऊ शकतो.

भूगोल विषय हा प्रात्यक्षिक केल्याशिवाय पूर्ण करता येत नाही. दूरस्थ शिक्षण याचे घेता येत नाही. सर्वांनी दुर्लक्षिलेला हा विषय पण मला कधीच नोकरी शिवाय घरी बसावे लागले असे झाले नाही. सरकारी नोकरी, शाळेपासून ते महाविद्यालयात अध्यापक म्हणून सहज काम करता येते. कंपनी मध्ये पण पर्यावरणाचे मापदंड सांभाळावे लागतात. अशा कंपनीत पण नोकरी मिळते. जगमान्य विषय पण त्याची व्याप्ती बरीच मोठी आहे. पण आपल्या शिक्षण खात्याने माझ्या सारखे असे अनेक शिक्षक असतील. त्यांना विषयानुसार गृहीत धरल्याने काम करण्यास मर्यादा घातल्या आहेत. हा दृष्टीकोन जर खात्याने बदलला तर अशा प्रायोगिक गोष्टींवर भर देणारे अमीर सारखे शिक्षक आपसूकच तयार होतील. नुसता अभ्यास क्रम बदलून ताण विरहित अभ्यास होणार नाही त्यासाठी शिक्षक म्हणून सरकारने घातलेल्या मर्यादांचा पण पुनर्विचार करावयास हवा.

ठराविक पठडीतून शिक्षक जात असतात. त्यांच्या कौशल्यांना, आवडीला वाव मिळाला पाहिजे तरच अध्ययन हे खाते वाटपासारखे साचे बंद होणार नाही. विषय हे एकमेकांना पूरक असतात. शिक्षकाच्या काम करण्याऱ्या क्षमतेला संधी अधिकृत पणे द्या तरच निकोप वातावरणात शिक्षक पण राहतील. एखाद्या शास्त्र शिक्षकाला जर कलेची आवड असेल तर शाळेत व शिक्षण खात्यात त्याला योग्य ती संधी मिळणे आवश्यक आहे. किती वर्ष आपलेच विषय कवटाळून बसणार? मग अध्ययन व अध्यापिकता ही कंटाळवाणी होते.

साचेबंद काम हे सरकारी नोकरीत, खाजगी नोकरीत करावे लागते. शिक्षण खात्यात अशी मनोभूमिका अमीर च्या चीडचीडेला कारणीभूत ठरते. आज अमीर च्या ठिकाणी अनेक शिक्षक आहेत. कंटाळवाणी अभ्यास पद्धती विद्यार्थ्यांची आहेच पण शिक्षका करिता पण आहे. विषय ज्या त्या शिक्षकाने शिकवणे योग्य आहे. काही स्पर्धा ह्या शिक्षंका करिता असतात. परंतु गणिताच्या सरांनी जर चित्रकलेच्या स्पर्धेत मुलांना मार्गदर्शन केले तर ते ग्राह्य धरले जात नाही.

मी वर्गशिक्षक असल्याने मी जर गणिताच्या काही स्पर्धा करिता मार्गदर्शन केले तर त्या विद्यार्थ्यांना स्पर्धेला पाठवताना गणित शिक्षकाचे नाव घालावे लागते. असे शिक्षण खाते नियमात कटी बद्ध आहे. मग कोणता शिक्षक अशी फुकटची कामगिरी करेल. शिक्षक पण माणूस आहे. विद्यार्थ्यांकरिता करणे हे खूप त्यागाचे लक्षण आहे अशी झळाळी, अशी लेबले म्हणजे आपले टॅग लावणे सोपे आहे पण ज्याचे जळते त्यालाच कळते. खऱ्या, सच्च्या शिक्षकाला मान सन्मान काय महत्वाचा? माझी मनोभूमिका सगळ्यांनाच पटणारी नक्कीच नव्हती. आपले नाव नसले म्हणून काय झाले? प्रश्न विचारणे सोपे होते पण आजच्या काळात व्यवहार्य नक्कीच नव्हते.

अशी अमीर ची शाळा सर्व शिक्षकांना नक्कीच आवडेल. पण त्यातील काही प्रयोग मात्र टाळले तर चांगले होईल. कारण मुलांबरोबर शिक्षकांचा पण साचेबंद शिक्षण पद्धतीत कोंडमारा होतोच आहे. विषय आपल्या शिक्षणा प्रमाणेच शिकवावा पण इतर विषयांशी त्याची जोडणी ही काळाची गरज आहे. ज्या ठिकाणी शेती हा प्रमुख व्यवसाय तेथील भागाचा आहे तिथे शेती विषय अभ्यासास असावाच. शहरी भागात छोटे व्यवसायभिमुख विषय असावेत.

असे बदल झाले तर ऑल इज वेल….आपण सुद्धा म्हणू शकू. अमीर ची शाळा खऱ्या अर्थाने शिक्षकांच्या मनातील शाळा होय.