मी उद्योजिका…….. व्यवसाय मराठी मनाचा.

माझ्या वडिलांनी एक छोटासा व्यवसाय सुरु करायचे ठरवले, त्याप्रमाणे व्यवसायाच्या सर्व मिटींग्स आमच्या घरी होत होत्या. मी कॉलेज ला होते. प्रत्येक मिटींग्स न मला आवर्जून वडील तिथे बसवायचे. आईला पटायचे नाही, मुलीची जात संसार करायला लागणार, असे वातावरण नाही मिळाले तर? पण तेंव्हाच व्यवसायाचे आकर्षण मला वाटू लागले. वडिलांनी विचारांची बैठक तयार केली. लग्न होवून सासरी आले. मिस्टर पण इंजिनीअर झाल्यावर त्यांच्या वडिलांचा कारखाना सांभाळू लागले. वय व अनुभव, शिक्षण यांचे त्रैराशिक कमी पडले व नोकरी करू लागले.

मुलगा आता मोठा होउ लागला आहे. त्याचे विश्व वेगळे आहे. मुंज केल्यावर आई म्हणून मी वेगळी पडले ह्या धक्क्याने मी मुंज लागताना एकटीच हॉल च्या बाहेर येऊन खूप रडले. माझ्या बाळाचे मुंडावळ्या लावलेले गोंडस रूप मी अक्षता हाती घेत पाहू शकत नव्हते. तिथूनच मला जाणवले की, बच्चा मोठा झाला आहे, हे मला समजून घ्यायला हवे. मन मानेल तर न.

आता पण तो सुट्टी करिता आईकडे भारतात गेला आहे. एक आठवडा घर सफाई करण्यात गेले. बरे वाटत होते, त्याची लुडबुड नाही. त्याचे कपाट तर मनसोक्त आवरले. नंतर मात्र पसारा नाही म्हणून रडू येऊ लागले. करियर करण्याची वर्ष पिल्लू करिता मी अशीच उधळली. अर्थात त्याचे दुखः कधीच नव्हते. कारण त्याच्या करिता ते गरजेचे होते. पण आता त्याचे विश्व तयार होवू लागले आहे. शिक्षण व पुढील करिअर ह्या करिता तो कदाचित दूर देशी पण जाईल. मग मी काय करू? बायकांचा वेळ घरात जातो पण पुरुषांना मात्र मन खायला उठते. नको ती दुखणी मन आजारी असल्याने मागे लागतात.

माझ्या करिता व ह्यांच्या करिता काहीतरी उद्योग सुरु करावयास हवा ह्या मनात रेंगाळणाऱ्या विषयांनी पुन्हा जोर धरला. ह्याचे श्रेय माझ्या सासू ला जाते. मुलांचे संसार मार्गी झाल्यावर त्यांनी सासऱ्यांच्या मदतीने स्वता:ची दुध डेअरी चालू केली. दोघेही मजेत व्यवसाय करतात. संसारात राहूनही स्वःताचे अस्तित्व त्या दोघांनी जपले. जो पर्यंत तब्येत साथ देईल तिथ पर्यंत करूच. असा निश्चय त्यांचा आहे. वयाच्या ८० नंतर ही मजेत कोणाच्या ही भानगडीत न पडता व्यायाम तर होतोच पण चार माणसे ही भेटतात. मी पण तसाच विचार फार पूर्वी पासून करीत होतेच. योग्य वेळ येण्याची वाट पाहत होते. मुलाच्या विश्वात अडकून त्याला पण मर्यादा घालायच्या हे पटत नाही.

आतापासूनच प्लान्निंग केले तर १५ वर्षात मी नक्कीच उद्योग जगतात माझे नाव मिळवू शकेन. ह्यांच्या आवडीचे इंजिनीअरिंग विश्व व तेथील अनुभव हे माझे पाठबळ होते. म्हणून हेच क्षेत्र निवडले. मी तर इंजिनीअर नाही परंतु मला मार्केटिंग मधील भरपूर अनुभव आहे. प्रत्येक प्रोडक्ट मी अभ्यासले, पूर्ण माहिती मिळवली. माझ्या स्किल वर मी हा व्यवसाय करू शकते हा विश्वास मला आहे. अर्थात ह्यांचे मार्गदर्शन ह्या शिवाय हे शक्यच नव्हते. ह्यांनी रोजचा होमवर्क दिला. मी व्यवसाय करणार, हे माझे स्वप्न म्हणून कधीच नव्हते तर संसाराला सुरवात केल्यावर आपला व्यवसाय योग्य वेळ आली कि नक्की करायचा हे ठरवून ठेवले होते.

अचानक साक्षात्कार झाला असे नसते तर आधी अभ्यासून व्यवसाय केला तर रिस्क मॅनेज करणे बरेच सोईचे होते. परिश्रम खूप आहेत. स्वप्न म्हणून नव्हे तर एक ध्येय म्हणून माझ्या सर्व स्कील च्या मदतीने मी पूर्ण करणार. मला टाटा व बिर्ला एका रात्रीत व्हायचे नाही पण जे काही करेन त्यात पूर्ण समाधानी नक्कीच असेन. सातत्य व नियोजन ह्यावर माझा विश्वास आहे. ही माझी सेकंड रिव्हर्स एन्ट्री आहे. तो मोठा होतोय. आई, मला करिअर करता कदाचित तुझ्या पासून लांब जावे लागेल. माय मॉम इज अ ब्रेव्ह अशी समजूत माझी काढतो.

एक संधी मला खुणावू पाहते. ज्यात मला ह्यांचे व माझे छोटेसे जग पुन्हा दिसते. संसाराची जवाबदारी पेलवत बरेच वर्षे आम्ही आमचा विचार केला नव्हता. आतापासून काही सुरवात केली तर लोनली पिपल म्हणून राहणार तर नाही. आमच्या दोघांच्या वडिलांनी एक मार्ग आम्हाला शिकवला, हेच वय आहे अजिंक्य चे संस्काराचे, व्यवसाय कसा असतो हे आम्ही त्याला शिकवले पाहिजे. भले तो छोटासा असेल पण त्यातूनच कदाचित मराठी मुलाचा व्यवसाय असे समीकरण जमेल.

नोकरीच्या रहाट गाडग्यात छंद म्हणू काही जोपासता आले नाही. अशा आवडीच्या विषयाचा पण व्यवसाय होतो. आमची आवड उद्योग जगात रमायचे अशी आहे. ह्या आवडीला साजेसा व्यवसाय सुरु करते. मराठी माणसाने व्यवसाय करावा हे सांगणे आजकाल एक पद्धत पडली आहे. भांडवल हा मोठा प्रश्न असतो. आम्हालाही आहे. पण अनेक योजनामधून आपण पैशांचे पाठबळ मिळवू शकतो. आता तर रिसेशन सुरु आहे. नोकऱ्या सुद्धा गेल्यात मग हे व्यवसायाचे खूळ काय झेपणार?

दैनदिन गरजा भागवणारे पण व्यवसायच असतात. ठाण्याला एक गुजराती व्यक्ती चिरलेली भाजी विकायला घेवून बसते. हातोहात सर्व संपते.एक दिवस मी उत्सुकता म्हणून विचारले तर त्याच्या मागे असलेली बंद पडलेली कपड्याची कंपनी त्याचीच आहे. धंद्यात खोट आली म्हणून कोर्टाने कंपनीच्या जागेला सील केले. तिथेच समोर बसून हा भाजी विकतो. मी म्हटले तुम्हाला खूप दुख: झाले असेल. त्याने उत्तर दिले, कंपनी बंद पडली म्हणून दुख: नकीच झाले. पण तेच कामगार घेवून आज भाजी कापण्याची मशीन मी ठेवली आहेत. आता बिल्डर मोठे संकुल बांधणार आहे.मी पण एक दुकानाचा गाळा विकत घेतला. ह्याला म्हणतात जिगर..

हि जिगर मराठी माणसात नक्की आहे. फक्त हवे आहे नियोजन व्यवसायाचे. मी आमच्या शिक्षण व अनुभव धरून व्यवसाय नक्कीच करणार. कुठलाही व्यवसाय हा पूरक उत्पन म्हणून पण उपयोगी पडतो. नोकरीचा पगार हा सेफ असतो पण छोटासा एका होईना एक व्यवसाय कुठल्यातरी पिढीने सुरवात म्हणून तरी करावयास हवा.

माझ्या प्रत्येक पावलाच्या पुढे माझा जीवन साथीदार उभा आहे. माझ्या पाठीमागे “भिऊ नकोस…….असे म्हणत माझे गुरु आहेत. मला जे उचित आहे तेच मला निश्चित देतील हि खात्री माझ्या सदगुरूनी मला दिलेली आहे. हेच माझे विश्व आहे. मला खुणावणारी उद्योग जगताची संधी हीच मला नवीन प्रकारे ब्रेव्ह बनवेल.

लेकाकरिता संगणक माहिती करून घेतला, त्याच्या भविष्यात पण आई वडिलांच्या खुणा, संस्कार हेच पाठबळ असेल. मराठी माणसाचा व्यवसाय असाच तर सुरु होत असेल. पिढीजात व्यवसाय असेल तर त्या व्यवसायाचे मापदंड वेगळे असतात. पण आमचा छोटासा व्यवसाय मुलाला हे ही कार्यक्षेत्र आहे असे नक्कीच शिकवेल असा विश्वास आहे.

आमच्या वडिलांनी जे स्वप्न पहिले, ते आमच्या पिढीचे ध्येय होते व पुढच्या पिढीचे सत्य असेल. मराठी माणूस व्यवसायात स्थिरावतोय ह्या आशेवर आमचा प्रयत्न……